30 June, 2008

मानसमणिमाला (१०)

मानसमणिमाला (१०)

हिंदी : बहुरि बन्दि खल गन सति भाएँ ।
जे बिनु काज दाहिनेहु बाएँ ॥ १ ॥
परहित हानि लाभ जिन्ह केरे ।
उजरें हरष बिषाद बसेरें ॥ बालकाण्ड ३.२ ॥
मराठी : अथ वन्दे सद्‌भावे खलगण ।
दक्षिणास जे वाम अकारण ॥ १ ॥
परहित-हानि लाभ त्यां वाटत ।
हर्ष विनाशिं विषादहिं नांदत ॥ प्रज्ञानानंद
अर्थ : आतां खलगणांसही शुद्ध भावनेने मी वंदन करीत आहे. अगदी निष्कारण ते आपल्या हितकर्त्याशींही विरोध करतात. दुसर्‍यांचे हित झाले तर त्यांना स्वतःची हानी झाल्यासारखे वाटते आणि दुसर्‍याची हानी हाच त्यांना लाभ वाटतो. दुसर्‍याचा विध्वंस झाला तर त्यांना हर्ष होतो आणि इतर सुखाने नांदू लागले तर त्यांना दुःख होते.

जगमध्ये जसे सज्जन आहेत तसे दुर्जनही आहेत. दैवी गुण संपत्तीनें सुशोभित असे संतसज्जन नेहमीच जगाचे हित-मंगल चिंतत असतात व ते घडवून आणण्याकरितां सातत्याने प्रयत्‍न करतात. आपल्या सरळ, निष्कपट भावाने जगाच्या आनंदात स्वतः आनंदित होतात. याच्याबरोबर उलट मनोवृत्ती दुर्जनांच्या ठिकाणी असते. एकतर ते अगदी निष्कारण कोणाशीही वैरभाव, शत्रुत्व धारण करतात. इतकेच नव्हे तर जे त्यांचे हितकर्ते आहेत, त्यांच्याशीही ते कृतघ्नतेने वागतात. ज्या पृथ्वीराज चव्हाणानें महंमद घोरीला उदार अंतःकरणाने सात वेळा जीवदान दिले त्याच पृथ्वीराज चव्हाणाचा या दुष्ट महंमद घोरीने कृतघ्नतेने घात केला. इतिहासात व आजूबाजूला असंख्य उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात. आपल्या हितैषी आईवडीलांशी, आपल्याला सांभाळून घेणार्‍या कुटुंबियांशी, मित्रांशीही निष्कारण वैर धरणारी माणसे आपल्याला पदोपदी भेटतात. त्यामध्ये वस्तुतः कांहीच फायदा नसतो. झाले तर अनहितच असते. परंतु केवळ गैरसमज, संशय, स्वतःची क्षुद्र लहर या पायी ते असले वैर जोपासतात व इतरांना त्रास देतात. त्यांचे मन व बुद्धी इतकी क्षुद्र व दुष्ट असते कीं इतरांची हानी झाली, संकटे आली तर त्यातच त्यांना आपला लाभ झाल्याचा आनंद होतो. रामचंद्रांना वनवासाच्या हाल‍अपेष्टा सहन करायला लावण्यांतच मंथरेला स्वतःला आसूरी आनंद वाटत होता नां ? आणि आपल्या अडचणींवर मात करून आपले राज्य इंद्रप्रस्थाला स्थापून आनंदाने जगू पाहणार्‍या पांडवांचे सुख दुर्योधनाच्या डोळ्यांत खुपू लागले व त्याने पांडवांना उध्वस्थ करण्याचा कपटी डाव अगदी हिकमतीने घडवून आणला.
तुलसीदास म्हणतात - सज्जनांप्रमाणेच मी दुर्जनांनाही वंदन करतो व तेही अगदी शुद्ध भावनेनं ! कारण त्यांचीही निर्मिती भगवत्‌ इच्छेतूनच झाली आहे नां ! त्यामुळे त्यांचे अस्तित्व मान्य करायलाच हवे. परंतु इतकेच म्हणता येईल कीं -
" खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रति वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जीवांचे ॥ "

डॉ. सौ. उषा गुणे.

26 June, 2008

"मी" कोण ?

"मी" कोण ?

आपल्या सर्वांच्या ठिकाणी "मी" म्हणून जे स्फुरण होते, त्यालाच शास्त्रकार जीव असे म्हणतात. या जीवाला "मी म्हणजे कोण" हे यथार्थ समजत नाही. "मी" म्हणजे देहस्वरूप, कर्मकर्ता, सुख-दुःखवादी फलभोक्ता, अज्ञानी, अपूर्ण, शब्दादी (विषय) भोगावर ज्याचे सुख अवलंबून आहे असा, जन्म-मरण भोगणारा, असे आपल्याला समजत असतो. त्याचे हे सर्वच ज्ञान विपरीत असून स्व-स्वरूपाचा यथार्थ विचार न केल्यामुळे आहे. आपल्याला आपल्या स्व-स्वरूपाचा यथार्थ योग्य विचार नसणे यालाच अज्ञान असे म्हणतात.
पण श्रुती-संतांनी दाखविलेल्या सन्मार्गांनी विचार केला तर जीवाचे हे स्वरुपाचे अज्ञान नाहीसे होऊन त्याला, आपल्या स्व-स्वरूपाचे यथार्थ ज्ञान होते.
विषय, देह, इंद्रिये, प्राण, मन, बुद्धी, अहंकार या सर्वांचा देहात समावेश आहे. मी म्हटल्याबरोबर विचार न करता, मनुष्य आपल्या देहाकडे बोट दाखवून जरी "मी" असे म्हणत असला तरी तो आपल्याला अनेकानेक प्रसंगी देहाहून निराळा समजतो असे दिसून येते.
"माझा देह" असा जेव्हा तो आपल्या देहाचा उल्लेख करतो, तेव्हां तो आपल्याला देहाहून अगदी निराळा समजत असतो. तो 'मी डोळा' असे म्हणत नाही, तर माझा डोळा, माझे मन, माझी बुद्धी असेच म्हणत असतो. कारण 'माझा' ही षष्ठी विभक्ति आपल्याहून सर्वथैव भिन्न असलेल्या पदार्थाचा आपल्याशी काही संबंध दाखवायचा असल्यासच उपयोगात आणली जाते.
जागेपणी ज्या देहाचा आपण "मी" म्हणून निर्देश करतो, तो देह ज्यावेळी अंथरुणावर पडलेला असतो तेव्हा आपण त्या देहावर मीपणा ठेवीत नाही. सुषुप्तीत तर देहाला आपण विसरतोच. म्हणूनच "मी म्हणजे देह" असे समजणे हे काही स्व-स्वरूपाचे यथार्थ ज्ञान नव्हे, तर ते अगदी विपरीत ज्ञान [म्हणजे अज्ञान] आहे.
देहाच्या बाहेरील गोष्टीशी व्यवहारीक संबंध आला असता, मनुष्य देहावर मीपणा ठेवून व्यवहार करतो. बाहेरील गोष्टींशी व्यवहार बंद पडला की मग देहावरचा मीपणा आत असलेल्या इंद्रियांवर येऊन थडकतो. तरी तो मीपणा देहावरचा नसतो (यथार्थतः), कारण या सर्व पदार्थांचा "माझे" म्हणून आपण निर्देश करत असतो. "मी" म्हणून त्यांचा निर्देश करूच शकत नाही. जसे मी डोळा, मी कान, मी मन, मी बुद्धी असे आपण म्हणत नाही याचे कारण हेच की "मी" म्हणणारा जीव या सर्वांहून अगदी निराळाच आहे.
या प्रमाणे जीव हा या सर्व गोष्टींपासून अगदी निराळा आहे. जीव हा स्वसंवेद्य असून अन्याला जाणत असतो. पणे दुसरे पदार्थ आपल्या स्वतःला जाणत तर नाहीतच पण दुसर्‍यालाही जाणू शकत नाहीत. जसे घोडा "मी घोडा" आहे असे जाणत नाही व अन्यालाही जाणत नाही. पण जीव जाणतो. म्हणून जीव ज्ञानस्वरूप आहे. ज्ञानाला उत्पत्ती नाश असू शकत नाहीत. कारण उत्पत्ती-नाश जाणण्याकरितां ज्ञान पाहिजेच ना ? "मला काही कळत नाही ?" हे कळण्यासही ज्ञानच लागते.
म्हणजेच ज्ञानरूप जीव उत्पत्ती-नाश रहित असा अविनाशीच आहे. अशा जीवाला अत्यंत दुःखरहित व अविनाशी सुखाची इच्छा असते. असे सुखच जर नसते तर ही सुखाची इच्छाच दुरापास्त. असे अविनाशी अखंड सुख जीवाहून जर वेगळे असते तर ते सुख अविनाशी म्हणताच येणार नाही. सुखाला अखंड तेव्हांच म्हणता येईल की जेव्हां ते नव्हते किंवा प्राप्त नव्हते असा अनुभव येणार नाही. असा अखंड सुखाचा अनुभव घेता येतो; कां तर जीव मुळातच सुखस्वरूप आहे.
सृष्टीतील एक नियम आहे - 'कोणतीही वस्तू आपल्या स्वरूपभूत धर्मांचा त्याग करू इच्छित नाही, किंवा तिला त्या धर्माचा कधी कंटाळा येत नाही'. जीवाला ज्या आनंदाची अपेक्षा आहे तो जीव मुळातच असा सत्-चित्-आनंद स्वरूप आहे. ह्या आपल्या सच्चिदानंद स्वरूपाची अनुभूती श्रीगुरुकृपेने नामस्मरणाच्या द्वारा येते.

अण्णा -

22 June, 2008

मानसमणिमाला (९)

मानसमणिमाला (९)

हिंदी दोहा : बंदऊँ संत समान चित हित अनहित नहिं कोइ ।
अंजलि-गत सुभ सुमन जिमि सम सुगंध कर दोइ ॥ बालकाण्ड ३
मराठी : वंदे संत समान मन हित अनहित ना कोणि ।
अंजलिगत शुभ सुमन जशिं सम सुगंध कर दोनि ॥ प्रज्ञानानंद

अर्थ : ओंजळीतील सुगंधी, पवित्र फुले आपला सुगंध दोन्ही हातांस सारखाच देतात व त्या हातांना सुगंधित करतात. त्याचप्रमाणे संताचे समचित्त, समभाव असल्याने शत्रू मित्र (अनहित-हित) यांच्याशी ते समानतेनेच वागतात. त्यांना दुजाभाव नसतोच. अशा संतांना मी वंदन करतो.

संतांच्या अंतःकरणांत शत्रू मित्र, आप पर, उच्च नीच, गरीब श्रीमंत असे भेदभाव कधीच नसतात. त्यामुळे त्यांची कृपा सर्वांवर सारखीच असते. फुलांना आपल्याजवळील सुगंध सर्वत्र विखुरणे इतकेच माहीत असते. आपण पवित्र देवघरांत आहोत कीं स्मशानभूमीत आहोत याचा विचार फुलांजवळ नाही. आपल्या जवळील सुगंधाचे सुख समाधान जो त्यांच्या जवळ येईल त्याला द्यायचे अशीच त्यांची सहजस्थिती असते. त्यांत डावे उजवे त्यांना माहीत नसते. तसाच संतांचा सहजभाव असतो. आपण इतरांवर कृपा केली असेही भान त्यांना नसते, तर ज्यांचेवर कृपा झाली त्यांच्यात चांगले वाईट, योग्य अयोग्य पाहणे तर लांबच असते. " ना तरी इक्षुदंडु । पाळितया गोडु । गाळीतया कडु । नोहेचि जेवी ॥ अरिमित्रीं जैसा । अर्जुना जया भावो ऐसा । मानापमानी । सरिसा पाडु ॥ (ज्ञानेश्वरी १२.२००-२०१) "
इतकेच नव्हे तर केलेल्या उपकारांची, कृपेची अगर सहाय्याची परतफेड कुणी अपमानकारक रीतीने केली, त्याची जाणीव ठेवली नाही, तरीही संतांचे मन सम शांतच राहते. अगदी जणुं सुमनच ! फुलांनी दिलेल्या सुगंधाबद्दल, दृष्टि सौख्याबद्दल ना कुणाच्या मनांत कृतज्ञभाव निर्माण होत नाही, ना उपकाराची भावना ! दुसर्‍या दिवशी त्यांची रवानगी होते निर्माल्यांत. पण फुलांची कांहीच तक्रार नसते. आपल्या कर्तव्यपूर्तीच्या समाधानांत त्यांचे जीवन पूर्णतेला जाते. संतांचेही अगदी तसेच असते. आपले प्रत्येक कर्म ते 'ईश्वर पूजा' याच भावनेने करत असतात. त्यामुळे लौकिकांतील चांगल्या वाईट गोष्टी, व्यक्ति यांचेबद्दल विचार करायला त्यांचे मन मोकळे नसतेच. ते आपल्याच आनंदाने आनंदित झालेले असतात व त्याचा सुगंध, त्याचे समाधान इतरांनाही मिळतेच. 'तया सर्वात्मका ईश्वरा । स्वकर्म कुसुमांची वीरा । पूजा केली होय अपारा । तोषालागी ॥ (ज्ञाने. १८.९१७)
तुलसीदास म्हणतात, अशा संतांना मी कृतज्ञतेने वंदन करतो आणि हे वंदन त्यांनी अगदी बालभावाने केलेले आहे. बालकाचा जसा आपल्या आईवर दृढ विश्वास असतो व अनन्य प्रेम असते तसाच विश्वास ते संतांचे ठिकाणी ठेवतात व त्यांना प्रार्थना करतात कीं त्या संतांसारखेच आपल्यालाही प्रभु रामचंद्रांच्या ठिकाणी अनन्य प्रेम, निरपेक्ष भक्ति प्राप्त होवो.


डॉ. सौ. उषा गुणे.

18 June, 2008

आचार्य आणि संत

आचार्य आणि संत

संतांनी समाजाला धर्म, तत्त्वज्ञान आणि परमार्थ शिकविण्यासाठी वर्णप्राधान्य, आश्रमप्राधान्य इतकंच नाही तर वेषप्राधान्य ह्याला गौणत्व दिले. त्याचे पूर्ण खंडनही केले नाही, तसाच त्याचा आग्रहही धरला नाही. वेदमार्गाला कुठेही यत्‍किंचित बाध येऊं न देता, त्यांनी समाज आणि परमार्थाचे प्रबोधन करणारे आचार्यपद यांतील अंतर कमी केले.
आचार्यांनी समाज प्रबोधन केले, पण आपल्या स्थानावरून, आसनावरून. त्यामुळे काय होत होते ? काय झाले ? तर समाजातील व त्यांच्यातील अंतर यात एक कायमची दरी - दुरावा राहिला. याच्या नेमके उलट संतांनी खूप खाली उतरून, जन सामान्यात मिसळून - "तुम्ही आम्ही खेळीमेळी । गदारोळी आनंदे ॥" असे वागून समाजाला वर उचलले, व यामुळे समाजातील व संतांमधील अंतर कमी झाले.
ऋषी, मुनी, आचार्य ह्यांच्यात व समाजात अंतर वाटते. आजही "श्रीशंकराचार्य" म्हटले की आपल्यात व त्यांच्यात एक अंतर वाटते. आचार्य परंपरेत, त्या त्या काळात, काळानुसार ते अंतर गरजेचे - योग्य होते. पण संतपरंपरेतील संत आपल्याला अगदी जवळचे वाटतात. उदाहरण द्यावयाचे तर ऋषी, मुनी आचार्य लेकराला पित्यासारखे तर संतमहात्मे माय-माऊली सारखे वाटतात. शंकराचार्य माऊली असं कुणी भजन करत नाही, पण "श्रीगुरुज्ञानेश्वरमाऊली" म्हणून हांक मारतांना, भजन करतांना एक मायेची, प्रेमाची अत्यंत जवळीक भावते.
पूर्वी ऋषी, मुनी, आचार्य यांच्या अधिकाराच्या कक्षा असायच्या. कुणीही आपल्याला एकदम ऋषी, मुनी अगर आचार्य म्हणवू शकत नव्हते. शंकराच्यार्यांच्या पीठावरील व्यक्ती संन्याशीच असावी लागते असे काटेकोर बंधन. आणि ह्या बंधनामुळे, कक्षेमुळे काय झाले ? तर "ह्या दृष्टीने आपण अनधिकारी आहोत" असा न्यूनगंड समाजात निर्माण होऊन समाज परमार्थापासून, साधनमार्गापासून, आत्मज्ञानापासून वंचित व दूर राहिला. ही जाणीव नेमकी संतांना आली. आणि म्हणूनच संतांनी सर्व देशात, सर्व कालात, सर्व समाजात, वर्णात, आश्रमात, जाती जमातीत, धर्म पंथात, स्त्री पुरुष अशा सगळ्याच्या सगळ्या स्तरांत अवतार घेतले.
यामुळे काय झाले ? संतांनी सामान्य, तळागाळातल्या समाजाशी इतकी कांही जवळीक केली, तीपण केवळ समाजाच्या कल्याणासाठीच, की सामाज मानसांत संतांबद्दल एक वेगळीच अंतरीची, जिव्हाळ्याची आपलेपणाची ओढ निर्माण झाली. समाजानी त्यांना ऋषी, मुनी, आचार्य इतकेच काय पण देवापेक्षाही 'आपल्या गळ्यातले ताईत बनवले'.
जरा संतचरित्रे वाचली तर अगदी सहज असं लक्षात येईल कीं, कोणत्याही अनुकूल प्रतिकूल बाह्य परीस्थितीत ते संत झाले. अशी एक परीस्थिती माणसाला बोट करून दाखविताच येणार नाही की 'काय करावे, माझी परीस्थिती "तशी" नसल्याने मला संत होता येत नाही'.
अत्यंत श्रीमंत सत्ताधीश, एका किल्ल्याचे किल्लेदार अशा, जनार्दन स्वामींसारखे राहून संत होता येतं. नाथांचे गृहवैभव संतत्त्वाच्या आड येत नाही. "तुम्हा घरी गायी म्हशी । आम्हा घरी उंदीर घुशी ॥" अशी आपल्या श्रीतुकोबारायांची गरीबी, तरी ते संत झाले. त्यांनी असं नामस्मरण व भजन केलं की त्यांचे 'सदेह' वैकुंठगमन झाले. संतत्त्वासाठी वय, वर्ण, लिंग, आश्रम कांही आड येत नाही, आलं नाही, आणि येणार पण नाही.
अशा प्रकारे सर्व देश, काल, परीस्थिती, वय आणि स्तर यात परमार्थ करता येतो, संत होता येते हे संतांनी आपल्या जीवनांत प्रत्यक्ष आचरून दाखविले. आम्ही मात्र (खोटी) कारणं सांगत बसतो. संतांनी आपल्याला आहे त्या परीस्थितीतून परमार्थ करून भगवंताकडे जायला शिकविले. त्यामुळे समाजाला संत जन्मदात्या मातेपेक्षाही जवळचे वाटतात.

अण्णा -

14 June, 2008

मानसमणिमाला (८)

मानसमणिमाला (८)

हिंदी : बिनु सतसंग बिबेक न होई । रामकृपाँ बिनु सुलभ न सोई ॥ ७ ॥
सत-संगत मुद मंगल मूला । सोइ फल सिधि सब साधन फूला ॥ बालकाण्डा २.८
मराठी: विण सत्संग विवेक न होतो । राकृपेविण सुलभ न हो ! तो ॥ ७ ॥
सत्संगति मुद-मंगल-मूलहि । ती फल सिद्धि साधने फूल हि ॥ ८ ॥ प्रज्ञानानंद
अर्थ : सत्‌संगाशिवाय विवेकविचार प्राप्त होत नाही. आणि श्रीरामाच्या कृपेशिवाय सत्‌संग मिळणेही सोपे नाही बरं ! सर्व आनंद मंगलाचे मूळ संतसंगतीच आहे. कारण सत्‌संगति प्राप्त होणे हेच फळही आहे आणि सर्व साधनांची सिद्धि आहे. इतर साधने केवल फुलेच आहेत.
संतसंगतीचा मुख्य परिणाम कशावर होत असेल तर तो आपल्या विचारसरणीवर. सामान्य माणूस साधारणतः विचार करतो तो स्वतःसंबंधी, स्वतःच्या कुटुंबासंबंधी, त्यातील सुखदुःखे अडीअडचणी वगैरे. आपल्या मानवी जीवनाचा मुख्य उद्देश यामध्येच साठविलेला आहे इतकीच त्याची धारणा असते. पण संत त्याला आपल्या कृतीने, वाणीने, सहवासाने जागे करतात त्याच्या जीवनाची प्रत व संतांच्या जीवनाची प्रत, त्यांच्या जीवनाची उंची त्याला जाणवूं लागते. आणि मग तो आपला जीवनस्तर सुधारण्याच्या मार्गाला लागतो. पण तुलसीदास म्हणतात आधी सत्‌संगाची प्राप्ती होणेच महाकठीण आहे. खरोखर प्रभु रामचंद्रांची कृपा असेल तरच सत्‌संग प्राप्त होतो.
मुळांत संताचे संतत्व कळणे खूप कठीण असते. कारण ते आपले वेगळेपण, आपली अंतःस्थिती कधीच प्रदर्शनीय होऊ देत नाहीत. उलट सामान्यपणेच जीवनाची पद्धती ठेऊन सामान्यांच्या बरोबर राहण्याचा प्रयत्‍न करतात. आपला महिमा वाढवूं देत नाहीत.
'वाचस्पतीचेनि पाडे । सर्वज्ञता जरी जोडे । परि वेडिवेमाजी दडे । महिमे भेणे (ज्ञानेश्वरी १३.१९०)' अश संताचे खरे संतपण चांगल्या तर्‍हेने ओळखायला आपल्याजवळ साधन तरी कोणचे आहे ? केवळ सामान्य बुद्धीच्या जोरावर ते कधीच उमजणार नाही, अगदी तीव्र बुद्धीनेही नाही. म्हणून परमेश्वराजवळ कृपायाचना करावयाची; व संताचे संतपण ओळखण्याची दृष्टि मागून घ्यावयाची.
ही दृष्टीच आपला विवेक जागा करते. संत तुकाराम महाराज म्हणतात - 'काय वानूं आतां संतांचे उपकार । मज निरंतर जागविती ॥' ही जागृती जीवनाचा खरा अर्थ शोधूं लागते. रामकृपेमुळे संताचे उदाहरण डोळ्यासमोर दिसूं लागते. त्यांच्या जीवनाची उंची खोली हळूहळूं समजूं लागते. त्यांचे अनुसरण करणे मंगलप्रद, कल्याणकारक आहे याची खात्री पटते. तेच आपल्या जीवानाचे फल, सार्थक आहे असे समजून, इतर साधनांचा त्याग करून सत्‌संगतीमध्येच आपल्या जीवनाची धन्यता आहे हे मनोमनी पटते !

डॉ. सौ. उषा गुणे.

10 June, 2008

संतपरंपरा

संतपरंपरा


ह्या चिंतनाला अक्षरस्वरूप देण्याआधी प्रथमतः अखिलगुणनिधान, सच्चिदानंदघन, करुणावरुणालय, भक्तवत्सल, प्रेमळजनप्रांजळ अशा रुक्मिणीप्राणसंजीवन श्रीपांडुरंगाच्या चरणांवर माथा ठेवतो.
चिंतन करताना श्रीमहाविष्णुचा अवतात "सखा माझा ज्ञानेश्वर" असं आपल्या श्रीजनाबाई ज्यांचा उल्लेख करतात, महाकैवल्यतेजोनिधी असे श्रीगुरु ज्ञानेश्वर महाराज यांचे जाज्वल्य, स्वयंभू अधिष्ठान, शब्दशक्तीचा सातत्याने पुरवठा करत असते.
या चिंतनाच्या मागे ऋषी, मुनी, आचार्य आणि संतपरंपरा यांचा प्रकाश आहे. अण्णा फक्त गोमुख - दगडाचे. ह्या सगळ्या परंपरांतील महात्मे, मनुष्यमात्राला प्रबोधन करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी झालेले ईश्वर शक्तीचेच अवतार आहेत.
सत्ययुग व त्रेतायुगात ऋषी व मुनी परंपरा प्राधान्य. आचार्य परंपरेचा प्रारंभ झाला द्वापारयुगातच. पण आता त्यानंतर ह्या कलियुगात प्रधान रूढ परंपरा म्हणजे संत परंपरा. ऋषी, मुनी, आचार्य ह्या जुन्या सनातन वैदिक औपनिषदिक तत्त्वज्ञान यांचा विचार आचार करणार्‍या परंपरा असल्या तरीसुद्धां आता त्या घोर कलियुगात आपल्यामध्ये परमार्थिक बी रुजवणारी मुख्य उपकारण असणारी संतपरंपराच आहे.
सांप्रदायिक चाकोरीचा आग्रह अट्टाहास प्रकाशित केला, 'यारे यारे लहान थोर' हा ज्यांचा उदार दृष्टिकोन 'येति भलते नारी नर' असा आवांका लोककल्याणाचा आणि "करावा विचार । न लगे चिंता कोणाची ॥" ही आश्वासकता ती संतपरंपरा. संतांनी परमार्थाच्या "सूक्ष्म-दुस्तर" वाटा मोडल्या आणि राजमार्ग रूढ केला, सर्वांसाठी खुला केला. हे करतांना त्यांनी ऋषी, मुनी आणि आचार्य या परंपरेचाच आधारभूत पाया म्हणून उपयोग केला. आपले श्रीतुकोबाराय काय म्हणतात - "वेदमार्गे मुनि गेले । त्याचि मार्गे चालिलो ॥". आपली ज्ञानराज माऊली - "व्यासांचा मागोवा घेतू । भाष्यकारांते वाट पुसतु ॥" अशी साक्ष. तुकोबारायांनी या सगळ्याचा सुंदर समन्वय साधला. "वाचा बोलो वेदनीति । पण करूं संतीं केले तें ॥" म्हणजेच औपनिषदिक वैदिक तत्त्वज्ञान. प्रमेय सिद्धांत समाजात रुजवतांना, देश-काल मानानुसार पद्धतीत थोडा बदल केला. पण हा बदलसुद्धा दार्शनिक दृष्ट्या, तत्त्वदृष्ट्या न करता तपशीलात केला. त्यांत सुलभता, सर्वंकशता आणली.
जरा विचार केला तर जेवढी जवळीक संतांची वाटते तेवढी "ऋषी, मुनी, आचार्य" यांची नाही वाटत. काय गंमत आहे पहा - मत्स्य, कच्छप, वराह हे अवतारच, पण ह्या अवतारातील भगवंताची कोणी उपासना करतं का ? नंतर नारसिंह, वामन , परशुराम, राम, कृष्ण. पण ह्यातदेखील प्राधान्येकरून उपासना 'राम कृष्णाचीच' नाही कां ?
राम अवतार उपास्य खरे पण ह्या अवतारांत प्रभूंचे राजेपण अवतार समाप्तीपर्यंत आहेच आहे. पण कृष्णावतार पहा. ह्या अवतारांत आपले मूळ अनादि स्वरूप तसंच्या तसं ठेवून गवळ्या घरी अवतार घेतला. समाजात इतके मिसळले कीं ह्या गवळ्यांच्या पोरांशी खांद्याला खांदा लावून खेळले. खेळतांनाही वेळ आली तर त्यांचा डाव त्यांना द्यावा. कृष्णावर डाव आला की पेंद्याने म्हणावे, "खाली वाक, मी आत तुझ्या पाठीवर बसणार रे". कृष्णाने खाली वाकावे, पेंद्याला येथून तेथवर वाहून न्यावे व डाव द्यावा.
एवढेच काय - 'पाहतां गोवळी । खाय त्यांची उष्टावळी ॥' - कुठे जगत नियंता परमात्मा व कुठे ही गवळ्यांची मुलं ! त्यांचं उच्छिष्ट खावे, ब्रह्मांडनायकांनी ? त्यामुळे भगवान कृष्ण अगदी सामान्य जीवालाही आपालाच वाटतो. खेळीमेळी खेळगडी वाटतो. तसंच संतांच. कुठे भगवतकृपा पात्र पुण्यवंत संत व कुठे सामान्य जीव. तत्त्वतः खूपच अंतर. पण तरीही संत समाज कल्याणासाठी खाली उतरतात, सोपं करून सांगतात. आणि सोपं काय ? तर "नाम". आणि ज्या लोकांना वर उचलतात - आपल्यासारखंच करतात. हे संतपरंपरेचे कौशल्य.
अण्णा -