30 July, 2008

आसक्ति - आनंदकंदाची

आसक्ति - आनंदकंदाची


आपल्या हृदयातील भक्तिप्रेम भावनेचा परमोच्च भाव म्हणजेच एकांतभक्ति होय. हिलाच कोणी अद्वैतभक्ति अथवा पराभक्ति असेही म्हणतात. अशी भक्ति करता करता मग भक्ताला सर्व लौकिक सुखे, सुखकल्पना व जीवनव्यवहार नीरस वाटू लागतो. एका भगवंतावाचून दुसरे काहीही आवडेनासे होते. भक्त मग आपला सर्व जीव प्राण एकवटून हरि प्राप्तीसाठी झटतो, तळमळतो. जरा एक क्षणभरसुद्धा श्रीहरीचे विस्मरण झाले तर तो कासावीस होतो, अगदी व्याकूळ होतो.
"ना अरत्र ना परत्र" म्हणजे लौकिक व्यवहाराविषयी उदासीनता आणि श्रीहरि प्राप्ति तर अद्याप झालेली नाही अशा, 'ना हा कांठ ना तो' अशा अवस्थेत दिवस कष्टाने कंठित असताही जो हरिस्मरण एक क्षणभरही सोडीत नाही, अशा भक्तास अचानकपणे आवडत्या देवाच्या स्वरूपात साक्षातकार होतो.
ईश्वरस्वरूप भक्ताला तृप्त करून, त्याच्यावर आनंदघनाचा अमृतवर्षाव करून अप्ल काळात अंतर्धान पावतो, आणि नंतर त्या सच्चिदानंदकंद परमात्म्याचा प्रत्यय चराचर स्वरूपांत सृष्टींत अणूरेणूत अव्यक्तपणे येऊ लागतो. ज्ञानदृष्टीने ही ब्राह्मीस्थिती, तर भक्तियोगाच्या दृष्टीने हीच एकांतभक्ति, पराभक्ति, अद्वैतभक्ति होय. या अनुभवाच्या स्थितीत भक्त व देव यंतील अंतरच लोपते. त्यांचे मुलभूत ऐक्य प्रकटते, विलसूं लागते. ही परमोच्च भक्ति प्रत्येक भक्ताने आत्मसात करावी असा नारदासारख्या भक्ताचार्यांचा प्रेमळ आग्रह आहे.
भक्तीचा अपार महिमा येवढ्याने संपत नाही बघ. ही परमप्रेमस्वरूपा भक्ति, कर्म, योग व ज्ञान या अध्यात्म मार्गापेक्षा अधिकतरा आहे. आता ही अधिकतरा कोणत्या बाबतील आहे ? तर परमविरहावस्था आणि विरोधी भक्ति.
पराभक्तीच्या प्रकर्षाने प्रकट होणार्‍या, आणि अखिल जीवन व्यापणार्‍या एका स्थिर प्रत्ययी महाभावाला - आनंदभावाला भक्तिशास्त्रकारांनी एक वेगळेच विशेषण जाणीवपूर्वक योजले आहे. ते म्हणजे आसक्ति. सक्त म्हणजे जोडले जाणे, वज्रलेप होणे. या व्युत्पत्तीनुसार आसक्ति म्हणजे "आपल्या आवडत्या विषयाबद्दल मनास वाटणारी अनिवार्य ओढ, आणि या ओढीमुळे मनुष्य त्या विषयाशी विचारांनी व भावनांनी आसक्त होणे." प्रत्येक मनुष्यमात्राचा आवडता विषय वेगळा वेगळा असतो. अनन्य भक्ताचा एक आनंदकंद भगवंतच आवडता विषय असतो. म्हणजे आसक्ति ही भगवंताशी जोडली गेल्यावर तिचे सुद्धा उन्नयन होते. तो श्रीहरीशी अतूटपणे जोडला जातो.
नाहीतरी एरव्ही साधारणपणे वाईट गोष्टींची सवय दर्शविण्यासाठी 'आसक्ति' हा शब्द योजला जातो. जसा व्यसनासक्ति, द्युतासक्ति, धनासक्ति, सत्तासक्ति इत्यदि. अशा माणसाला आपल्या आवडीच्या गोष्टीबद्दल आत्यंतिक ओढा असतो. तत्पूर्ततेसाठी तो वाटेल तेवढे कष्ट व साहस सोसतो. परंतु भगवंत हाच एक मात्र आवडीचा (आनंदाचा) विषय होतो व त्याच बरोबर परमभक्ति प्रेमाने ओथंबलेली अत्युत्कट भावधारा हृदयांत सतत उचंबळते, तेव्हा त्याच आसक्तिस मान्यप्रद "भक्ति" असे म्हणतात.
भगवंतच्या ठिकाणी चित्त आसक्त होणे ही गोष्ट भक्तिशास्त्राने अत्यंत प्रशंसनीय म्हणून वर्णिलेली आहे. ती भक्तिप्रेमाची एक अत्युच्च कोटी आहे. सामान्य आसक्त मनुष्याच्या ठिकाणी स्व-आवडीबद्दल, व्यसनाबद्दल जी एकनिष्ठता, क्रियाशीलता, तडफ, उत्साह इतकंच काय जशी निर्लज्जता असते, अगदी तशीच एकाग्रता, प्रयत्‍नशीलता भगवत्‌ प्राप्तीसाठी भक्ताच्या ठिकाणी असावी हेच "आसक्ति" या शब्दामागील प्रयोजन भक्तिशास्त्रकारांना अभिप्रेत आहे.
असे झाल्यावर भक्ताची काय अवस्था होते पहा - "आता मज एक विठ्ठलाचा छंद । लौकिक संबंध दूर ठेला ॥ विठ्ठलावाचून न बोले वचन । न देखे नयन दुजे काही ॥ मज रात्रंदिन विठ्ठलाचे ध्यान । वाटे जीवप्राण विठ्ठलचि ॥"
ब्राह्मीभाव प्राप्त झाल्यावर, ज्या सर्वात्मभावात ज्ञानी, योगी पुरुष असतो, त्याच शिखरोच्च अवस्थेत भक्त भक्तियोगाने, प्रेमाने अवस्थित असतो. पण त्यानंतर सुद्धा "आई मला निर्विकल्प समाधीचा निश्चेष्टपणा नको, तर मला तुझ्या सृष्टीत मुक्तपणे नाचूं दे, गाऊं दे, भजन पूजन करूं दे" असेच श्रीरामकृष्ण परमहंस विनवीत असत. अशा देवभक्त सापेक्ष द्वैतभावाला बाळगून तो भक्त काही विशेष्ट स्नेहसंबंध विविध नातेसंबंध स्विकारून त्या आनंदघनाशी आमरण अतूट नाते जोडतो.

अण्णा

29 July, 2008

मानसमणिमाला (१२)


मानसमणिमाला (१२)

हिंदी : भल अनभल निज निज करतूती ।
लहत सुजस अपलोक विभूती ॥ १.४.७. ॥
सुधा सुधाकर सुरसरि सधु ।

गरल अनल कलिमल सति ब्याधू ॥ १.४.८. ॥
मराठी : भले बुरे निज निज कर्तूती ।

घेती कीर्ति अकीर्ति विभूती ॥ ७ ॥
सुधा सुधाकर सुरसरि सज्जन ।

गरल अनल कलिमलसति दुर्जन ॥ प्रज्ञानानंद
अर्थ : सज्जन अगर दुर्जन आपल्या चांगल्या किंवा वाईट करणीनें जगामध्ये सुयश कीर्ति, अगर अपकीर्तिरुपी वैभव प्राप्त करतात. सुधा (अमृत), सुधाकर (चंद्र) व सुरसरि गंगा यांच्या सारखे साधू सज्जन असतात तर दुर्जन हे गरल (विष), अनल (अग्नि) व कर्मनाशा नदी सारखे वाईट निंद्य असतात.

गोस्वामी तुलसीदासांनी या चौपायांमध्ये अगदी उदाहरणाने चांगले वाईट, साधु असाधु यातील फरक स्पष्ट केला आहे. अमृत आणि विष, दाहक अग्नि आणि शीतल चंद्र, पुण्य सलिला गंगा व पुण्य कर्मांचा नाश करणारी कर्मनाशा नदी, इतरांवर उपकार करणारे साधू व इतरांची स्वार्थाकरितां पारध करणारे व्याध (पारधी) अशा जोड्या घेऊन लोकसुखकारक कल्याणप्रद चांगले गुण व, त्यामुळे प्राप्त होणारी सत्‌कीर्ति व परपीडादायक दुर्गुण व त्यामुळे होणारी अपकीर्ति यांतील विरोध चांगल्या रीतीने दाखविला आहे.
अमृत सर्व व्यथा व मरणभयापासून माणसाला सोडविते त्याच प्रमाणे संत साधु जनांचा सहवास निर्भय करतो व त्यामुळे दुःख हरण होते. चंद्राचे अमृतभरित किरण आल्हाददायक तापशमन करणारे असतात हा तर सर्वांचाच अनुभव आहे तसेच साधू जनांचे बोल जणूं अमृताचे कल्लोळ असतात, त्यामुळे दुःखशमन तर होतेच पण मनोमालिन्य दूर होऊन मोह नाश होतो. जगदंबा पार्वती भगवान शंकरांना म्हणते - 'शशिकर सम गिरा तुम्हारी । मिटा मोह सरदा तप भारी ॥ १.१२० - मोह नाश हा केवढा मोठा गुण आहे साधू वचनामध्ये ! तशीच सुरसरि गंगा नदी - "कां फेडित पाप ताप । पोखीत तीरींचे पादप । समुद्र जाय आप । गंगेचे जैसे ॥" (ज्ञाने. १६.१९९) - सर्व जगाचे पाप पोटात घालून आणि जातां जातां तीरावरील असंख्य वृक्ष, पशुपक्षी, माणसे, शेतीवाडी व इतरही उद्योगधंद्यांना जिवनदान देत देत गंगामाई जशी समुद्रांत मिसळून जाते तसेच संतजनही आपल्या जीवन कालावधींत तर असंख्य जणांचा उद्धार करतातच परंतु भविष्यांतील अनेक पिढ्यांनासुद्धां मार्गदर्शन करीत परमात्म्यामध्ये विलीन होऊन जातात. 'सकल सुलभ सब दिन सब देसां' असे संत साधू आपली गुणसंपत्ती परोपकारार्थ वेचून कीर्तिमान होतात.
परंतु जगामध्ये जसे सुजनत्व आहे तशीच दुष्प्रवृत्तीही आहे. तीव्र विषाप्रमाने ती इतरांचा नाश करते आणि भडकणार्‍या अग्निप्रमाणे त्यांचा ठावठिकाणाही उरूं देत नाही. त्यावेळी दुःखातून बाहेरही पडणे अशक्य होईल. कर्मनाशा नदीप्रमाणे उरले सुरले सत्‌कर्म व शुभ वासना बुडवून टाकून निराशेच्या खोल गर्तेत ढकलून देते.


डॉ. सौ. उषा गुणे.

12 July, 2008

तुझा विसर न व्हावा.

तुझा विसर न व्हावा.
भक्ति म्हणजे भगवंताविषयी परमप्रेम भाव. ही भक्तिप्रेमभावना मोठी उत्कट हवी. अखंड आणि क्षण प्रतिक्षण वर्धमान होत जाणारी अशी 'भक्तिप्रेम भावधारा' असली पाहिजे. थोडासा भाव, थोडेसेच पूजन, भजन , वाचन, श्रवण एवढ्याने भागत नाही. तर मग किती हवा तो भाव ? तर सर्वच्या सर्व अंतःकरणच या भक्तिप्रेम भावाने अंतर्बाह्य व्यापून गेले पाहिजे. आणि त्याच बरोबर आपले मन-बुद्धि ह्या एका भगवंताच्याच विचारात आत्मीयतेने रस घेणारी झाली पाहिजे. असे होण्यासाठी त्या सावळ्या सुकुमार, आनंदचिद्‌घन भगवंताबद्दल परम आदर, तसाच निःस्वार्थी निष्काम 'भक्ति-प्रेम-अनुराग' असणे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर काय होईल ? तर सुरुवातीच्या चार दिवसानंतर उत्साह, ओढ, अधिरता, तळमळ, उत्कटता पार सर्वच मावळून जाईल. श्रीज्ञानोबाराय म्हणतात, "वर्षाकाळी सरिता । जैसी चढो लागे पंडुसुता । तैसी निच नवी भजता । श्रद्धा दिसे ॥" नारद म्हणतात, "प्रतिक्षणं वर्धमानम्‌" भगवद्‌भक्ति प्रेमयुक्त झाल्यावाचून उत्कट, एकाग्र, अव्यभिचारी आणि चिरस्थायी होऊंच शकत नाही, आणि अशी भक्ति झाल्यावर ती अत्यंत उत्कट प्रेमभक्ति ही एक त्या भगवंताची/परमेश्वराची शक्तिरूपा होते. मग अशा भाग्यवान थोर महाभागवाताच्या निकट कृपाकटाक्षात, छायेत, आश्रयाला जे जे येतील ते ते सुद्धा मोठेच भगवद्‌भक्त होतात.
भक्ति ही दिव्य, भव्य आणि उदात्त आहे. कोणतेही लाभ हेतु अथवा लौकिक आशा अपेक्षा न ठेवता श्रीहरीची निष्काम, उत्कट, मधुरभक्ति सातत्याने चढत्या वाढत्या प्रमाणात करणे हेच निष्कलंक, निरागस, निरामय भक्तीचे द्योतक आहे.
ही अत्यंत विशुद्ध निष्काम भक्ति सदा सर्वदा अहैतुकी असते. जरासाही लाभ हेतू न ठेवता, अंतःकरणापासूनच उसळणार्‍या अकृत्रिम भक्तिप्रेमा पोटीच ती प्रकटते, आकाराला येते आणि क्रियारूप होते.
अशा भक्ताला दर्शनावाचून अन्य काहीच कामना नसते. एकच कामना - 'तो मज व्हावा, तो मज व्हावा । वेळोवेळा व्हावा पांडुरंग । 'नृसिंह भगवंताने जेव्हा प्रसन्न होऊन भक्त प्रह्लादास कोणताही वर मागण्यास सांगितले, तेव्हा त्याने तत्काळ चोख उत्तर दिले "स्वामिन्‌ कृतार्थोस्मि, वरं न याचे ॥ " तो म्हणाला, "हे प्रभो, आपल्या (इतरांना अलभ्य अशा) दर्शनानेच मी कृतार्थ् व पूर्णतृप्त झालो आहे, आता आपल्या पुण्यस्मरणावाचून अन्य कोणतेही वरदान मला नको. आपले तुकोबाराय हेच सांगतात "हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥"
अशा निरपेक्ष, निर्मम, निर्मळ भक्तीनेच तो मोठा जगदीश्वर परमात्मा प्रसन्न होऊ शकतो. अशा भक्ति प्रेम योगात एक केवळ एक त्या आनंदघन रामाचेच चिंतन उरते. अखंड एकमेव भगवत्‌ चिंतनासाठी मन एकाग्र व्हावयास हवे. आणि भगवत्‌ स्वरूपावर मन एकाग्र करणे, त्या केवळ आनंद स्वरूपाचेच चिंतन करणे किती कठीण् आहे याची कल्पना नाम-चिंतन करावयास सुरुवात केली म्हणजेच कळते, की ते किती भरकटते ? कोठे कोठे जाते ? कशा कशाचे चिंतन करते ?
मग यावर उपाय काय ? मन स्थिर करण्यासाठी योग व ज्ञान या मार्गात अनेक उपाय कथन केले आहेत, पण ते सर्वच्या सर्व अति रुक्ष आहेत. भक्तिमार्गात एकच उपाय आहे, व तो मोठा रम्य आणि अमोघ आहे. भगवंताची दृढ उपासना म्हणजे त्याचे नामस्मरण.
भक्तिमार्गात, तत्त्वचर्चा व शास्त्राभ्यास यापेक्षा आचारावर व भावनाप्रवाहावर अधिकाधिक भर दिला आहे. उपासकाने, भक्ताने आपल्या सर्वच्या सर्व भाव भावना भगवत्‌ केंद्रित, श्रीगुरुकेंद्रित व संबंधित करावयाच्या. मग सगळ्याच्या सगळा आचार श्रीहरि प्रित्यर्थ, त्या आनंदकंदासाठीच करावयाचा अशा सर्व भावभावना व सर्व आचार भगवत्‌ केंद्रित् होणे हीच भक्ति होय.
अशा प्रकारे चित्त, भाव, भावना आचार अतूटपणे वासुदेवाच्याच ठिकाणी जोडले जाणे, आसक्त होणे हाच श्रेष्ठ असा भक्तियोग आहे. हा साध्य झाला की मग पूर्ण वैराग्य, भगवंताचे समग्रज्ञान, त्याचे दर्शन व अचल अशी वासुदेव स्वरूपता या सर्व गोष्टी सहजच प्राप्त होतात आणि भक्त हा भगवंताशी मूळच्या तन्मयतेला, तदाकारतेला, तद्‌रूपतेला तल्लीनतेला प्राप्त होतो.

अण्णा -

10 July, 2008

मानसमणिमाला (११)

मानसमणिमाला (११)

हिंदी : तेज कृसानु रोष महिषेसा ।
अघ अवगुन धन धनी धनेसा ॥ ५ ॥
पर अकाजु लगि तनु परिहरहिं ।
जिमि हिम उपल कृषी दलि गरहीं ॥ बालकाण्ड ३.७ ॥
मराठी : तेजिं कृशानु रोषिं महिषेश्वर ।
अघ-अवगुण-धन धनी धनेश्वर ॥ ५ ॥
परिहरति तनु परापकारा ।
पीक विनाशुनि वितळति गारा ॥ ३.७ प्रज्ञानानंद
अर्थ : हे खलगण तेजाने (तापट) अग्नीच असून क्रोधाने महिषासुरच असतात. पाप आणि दुर्गुण हेच त्यांचे धन असते व या धनाने ते खूपच श्रीमंत, अगदी कुबेरच असतात. ते दुसर्‍याचा अपकार करण्यासाठी अगदी आपल्या देहाचा सुद्धां नाश करायला तयार असतत. जसे पिकाचा नाश करून गारा स्वतःही वितळून नष्ट होतात.

क्रोध उसळून येणे हे खलवृत्तीचे ठळक लक्षण आहे. एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली किंवा घडविली तर सामान्यतः माणसाला राग येतोच. पण तो राग कारणाच्या प्रमाणात व व्यक्तिनुसार कमीजास्त असावा. अजाण बालके, अज्ञानी मनुष्य, आजारी रोगी व्यक्ति यांच्याकडून चुका झाल्यास त्या क्षम्य मानाव्या. अपराध मोठाच असेल तर ती समज देऊन, कारवाई करून राग वाढूं न देतां सर्व प्रकरण हाताळणे हेच शहाणपणाचे असते. परंतु हा विवेक दुष्प्रवृत्त माणसांजवळ नसतो. अग्नी जसा एकदम भडकतो व त्याच्या समोर असेल ते जाळीत सुटतो तसा दुष्ट माणसांचा क्रोध असतो. त्यांना लहान मोठे, ज्ञानी अज्ञानी वंद्य निंद्य यातील कांहीच फरक समजत नाही इतके ते रागानें बेभान होतात व त्यामुळेच त्यांच्या हातून अनेक दुष्कृत्यें घडतात. अनेक तर्‍हेचे अवगुण त्यांना येऊन चिकटतात. पण त्यांना त्याचे वाईट वाटत नाही, उलट फुशारकी वाटते हे खरोखर दुर्दैवच असते. एखादा माजलेला रेडा उन्मत्तपणानें वाटेल त्याला धडका मारून लोळवितो आणि जीवही घेतो तसे दुष्ट माणसाला आपले विकार आवरत नाहीत व त्या भरात ते इतरांचा नाश घडवून आणतात. त्यातच त्यांचा आनंद साठविलेला असतो.
परंतु या सर्व खटाटोपात ते स्वतःचाही सर्वनाश करून घेत असतात हे त्यांच्या लक्षांत येत नाही; इतके ते त्या दुष्ट विचारानें भारावलेले असतात. नको असलेल्या व्यक्तिचा नाश घडवून आणण्याकरिता स्वतः 'मानवी बाँब' होऊन आपलाही नाश पत्करावयाचा हे किती अघोरी कृत्य आहे ? त्यातून ना कुठला स्वार्थ साधता येतो ना परार्थ. उलट स्वतःच्या मनुष्यत्वाची हानी आणि जगाकडून शिव्याशाप व निंदा !
जगाच्या कल्याणाकरितां, देशकार्याकरितां, मानवतेच्या भूमिकेतून अनेक संत सत्‌शील व्यक्तींनी आपल्या प्राणांचे बलिदान केलेले आपण आदरानें स्मरतो. अनंतकाल पर्यंत त्यांच्या कीर्तिंचे गायन होत राहते. मरावे परि कीर्तिरुपे उरावें - असे त्यांचे चारित्र्य. या पार्श्वभूमीवर स्वतःचा नाश झाला तरी चालेल पण दुसर्‍याचा नाश केल्याखेरीज राहणार नाही ही विचारसरणी किती विपरीत आणि विघातक आहे नां ?
डॉ. सौ. उषा गुणे.

08 July, 2008

यद् यद् आचरति श्रेष्ठ: ...

यद् यद् आचरति श्रेष्ठ: ...

श्रीमद् भगवद्‍गीतेत भगवान् श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना एके ठिकाणी म्हणतात, ' सामान्य लोक समाजातील श्रेष्ठ पुरुष जसे आचरण करतात त्याचे अनुसरण करतात'. पुढारी भ्रष्ट असेल तर अनुयायी त्याचेच अनुकरण करणार. आई वडीलांचे आदर्श वा स्वैर वागणुक, जे असेल त्याचा अपत्यांवर परिणाम होतोच. वैदिक संस्कृतीचा पाया रचणारे जे जे विचारवंत होते त्यांना मनुष्य स्वभावाच्या या मूलभूत तत्त्वाची जाण होती. ह्याबाबतीत नेहमी जनकराजा, ययाति इत्यादिंचे उदाहरण दिले जाते. पण प्रभु श्रीराम देखील हाच विचार बाळगून आपले आयुष्य कंठीत होते हे वाल्मीकि रामायणातील एका प्रसंगावरून चांगलेच जाणवते.
प्रसंग आहे पित्याच्या आद्न्येनुसार श्रीराम वनांत गेल्यावर भरत त्याला परत अयोध्येला नेण्यासाठी येतो. सर्वांना पटत असते की श्रीराम जे करत आहेत ते धर्माला अनुसरून आहेच. पण सर्व प्रजाच काय राजा दशरथाचे मंत्रीगण ज्यात वसिष्ठ व वामदेव या दोन महर्षींव्यतिरिक्त सुयश, जाबाली, कश्यप, गौतम, मार्कण्डेय व कात्यायन् यांसारखे ऋषि देखील होते (बाल. सर्ग ७); त्यांची देखील हीच इच्छा होती की श्रीरामांनीच राज्याभिषेक करवून घ्यावा.
भरताची प्रार्थना ऐकून श्रीरामांनी त्याला बराच उपदेश केला आणि त्यालाच अयोध्येचे राज्य करणे अनिवार्य आहे हे पटविले. त्यानंतर जाबालींनी एक प्रयत्न केला. ते म्हणाले - "रघुनंदन, आपण जे काही म्हणालात ते ठीकच आहे. पण श्रेष्ठ बुद्धीच्या तपस्वी मनुष्याने असे अडाणी माणसाप्रमाणे निरर्थक विचार करणे योग्य नव्हे. जीव एकटाच जन्म घेतो व एकटाच नष्ट होतो. हे जीवन म्हणजे मार्गस्थाला पुढच्या मुक्कामाआधी धर्मशाळेत एक रात्र आश्रय घेण्यासारखे आहे. कोण कुणाचा बंधू आणि कोण कुणाचा पुत्र. पिता केवळ जन्मास निमित्तकारण असतो. राजे आपले कोणी नव्हेत आणि आपण त्यांचे कुणी नव्हेत. त्यांना जे करायचे होते ते त्यांनी केले. आपण व्यर्थच कष्ट भोगीत आहात. प्राप्त झालेल्या अर्थाचा त्याग करून धर्म परायणता स्वीकारणारा मनुष्य या जगात केवळ दुःख म्हणूनच मृत्युनंतर नष्ट होतो.
"श्राद्धकर्माचे देव पितर आहेत. श्राद्धाचं दान पितरांना मिळतं असं लोक समजतात. पण जरा logic वापरून पहा. या असल्या परंपरेने काय साध्य होते. केवळ अन्नाची नासाडी. मरण पावलेल्याला अना कसे पोहोचेल. एकाने खाल्लेले अन्न जर दुसर्‍ पोचत असेल तर परदेशी जाणार्यांसाठी देखील शिदोरी द्यायच्या ऐवजी त्याचेही श्राद्धच करावे. तेव्हां असा निश्चय करा की या लोकाशिवाय दुसरा लोक नाही. परोक्ष अथवा पारलौकिक वगैरे विचार योग्य नाही. तेव्हां आपण भरताबरोबर परत अयोध्येत जाऊन राज्य ग्रहण करावं " हे सर्व ऐकून श्रीरामांनी जाबालींच्या नास्तिक विचारांची केवळ निंदाच केली. ते म्हणाले की वेदविरुद्ध मार्गाचा आश्रय करणारे आपण नास्तिक आहात. पुढे असेही म्हणाले की, अशा पाखंडी बुद्धीच्या द्वारे अनुचित विचर करणार्‍या आपणांस माझ्या पिताजींनी आपल्याला याचक बनविले ह्या त्यांच्या कृत्याचीच मी निंदा करतो. जाबालींचे नास्तिक व्यक्तव्य खोडून काढणारे असे श्रीरामांचे पुढे बरेच कथन आहे. पण त्यात महत्त्वाचे म्हणजे ते म्हणाले - " आपण सांगितलेल्या मार्गाने मी गेल्यास मी प्रथमतः तर स्वेच्छाचारी होईन. नंतर हा लोक स्वेच्छाचारी बनेल. कारण राजाचं जसे आचरण असते तसंच आचरण प्रजा करू लागते. " वडीलधारी, मंत्रीगणांपैकी एक आणि त्यात ऋषि असून श्रीरामांनी जाबालींना खडसावले ? पण मग आदर्श व्यक्ति अशीच असते नाही का ? असत्य, अधर्म याचा पुरस्कार करणारा मग कोणीही असो; प्रभू त्याला विरोध करणारच.
पण आता प्रश्न पडतो की जाबाली असे वेदविरुद्ध बोललेच कसे ? सर्गाच्या शेवटी स्पष्टीकरण आहे की केवळ समयाच्या आवश्यकतेनुसार ते नास्तिकवादी 'बनले' - त्यामागचा उद्देश होता की कोणत्याही कारणांनी श्रीरामांनी अयोध्येस परत जाण्यास राजी व्हावं. गंमत म्हणजे इतकं होऊनही वसिष्ठांनी देखील एक वेगळे कारण सांगून श्रीरामांना अयोध्येस परतवण्याचा प्रयत्न केलाच. तरीही कोणत्याही युक्तीला बळी पडून अधर्म करायचा असेल तर मग तो " आदर्श राम " नव्हेच. तसे झाले असते तर सर्व रामायणच कोसळले असते.

एकोहम् -

05 July, 2008

अनंत रूपें अनंत वेषें

अनंत रूपें अनंत वेषें

ज्ञानदेवादि सगळे भागवत सांप्रदायातील वैष्णव हे बहुतांशी अद्वैती आहेत. त्यांना सगुणाचे प्रेम आहे व निर्गुणाचे ज्ञान आहे. सगुण आणि निर्गुण एकच आहे असा त्यांचा दृढ विश्वास आहे व अनुभव पण आहे.
चराचर सृष्टिला व्यापून असणार्‍या चेतन तत्त्वावर/चैतन्यावर त्यांची नितांत निष्ठा आहे. या चेतन तत्त्वालाच प्राचीन तत्त्ववेत्यांनी ब्रह्म, आत्मा, परमात्मा, परतत्त्व वगैरे नामांनी संबोधले आहे. ह्या विश्वाच्या अणुरेणूत असलेल्या चेतनाला अनुस्मरूनच 'देव' ही संकल्पना आकाराला आली.
भक्तगणांनी आपल्या आवडीनुसार या देवाला नानाविध रूपे आणि नावे दिली आहेत. पण मुळात देव ही वस्तू त्या एका अरूप अशा परतत्त्वाचीच दर्शक आहे. हा देव सर्वत्र आहे. म्हणूनच "जे जे भेटिजे भूत । ते ते मानिजे भगवंत ॥" ही भागवत धर्माची शिकवण उपनिषद तत्त्वाला अनुसरणारीच आहे.
त्याच बरोबर भूतमात्र आणि भगवंत यांच्यातील परस्पर असणारा अन्योन्य संबंध हा एक अखंड असा चिंतनाचा विषय झाला आहे. अगदी अनादि कालापासून. आपल्या अवती भवतीच्या चराचर सृष्टीला नाम-रूप आहे. परतत्त्व ब्रह्म मात्र अरूप आहे. तरीही त्यांच्या परस्परांत आंतरीक नाते आहे. हे ब्रह्मच जगदाकाराने आकाराला येते. भक्तांसाठी हे आत्मतत्त्वच भगवंत म्हणून सगुण साकार होते. म्हणजे आता ब्रह्म, भगवंत आणि विश्व दिसावयास वेगळी असली तरी तत्त्वतः एकच एक आहेत. ह्यांच्यातील नाते शोधणे, ओळखणे, अनुभवणे आणि जपणे म्हणजेच भक्तीसाधना होय.
अध्यात्म शास्त्रकार जीवमात्राच्या ठायी असणार्‍या आत्मरूप चेतनतत्त्वाला "जीवात्मा", तर सर्वव्यापी अशा त्याच एक तत्वाला, मूलभूत तत्वाला "परमात्मा" असं म्हणतात. अगदी अनादि कालापासून जीवात्म्याला परमात्म्याची ओढ लागलेली आहे. या तीव्र ओढीतूनच अनेक साधनमार्ग निर्माण झाले. हे मार्ग आत्मज्ञानाने उजळले जातात. त्याचे राजमार्ग होतात. मग वाटचाल सोपी होते. सगळ्या संतांनी या मार्गावरून चालता चालता मुक्काम तर गाठलाच, पण त्याचबरोबर पायवाट सोपी केली. नुसती सोपीच नाही तर राजमार्ग केला, आणि हा राजमार्ग म्हणजे नामसाधना. भक्तिप्रेमयुक्त नामस्मरण.
आपल्या अवती भवतीचे विश्व दृश्य आहे, साकार आहे. त्याला एक विशिष्ट रूप आहे. तात्कालिक आहे. अस्थायी आहे. पण या विश्वामागील चेतन शक्तितत्त्व मात्र दृश्य नाही. त्याला रूप रंग आकार नाही. पण तरी ते चिरंतन आहे, स्थायी आहे. असे ते शाश्वत, अविनाशी आहे. म्हणून हा विश्वव्यापार अखंड अव्याहत सुरू आहे. कोणतीही शक्ति म्हटली की तिला रूप रंग आकार नसतोच. ती अरूप असते, अदृश्य असते. मात्र तिचा प्रभाव तेवढा सातत्याने जाणवत असतो. तिचे कार्य प्रत्यक्षात दिसत असते. त्यावरून दिसत नसली तरी तिचे अस्तित्व मानावेच लागते. या शक्तीचा अनुभव आपल्याला जाणवतो. या शक्तीला माध्यम लागते. महाभागवत, महावैष्णव, महात्म्यांच्या माध्यमांतून ही शक्तीच कार्यान्वित होते, कार्य करत असते.
सगळ्या संतांना विश्वामागील या चेतनाशक्तीचे सतत स्मरण असते. महामानवांची समग्र जाणीवच या चेतनाशक्तीने व्यापलेली असते. त्यांना या शक्तीचा अखंड ध्यास असतो. त्यामुळे तिचा अविरत शोध घेणं, घेत राहाणं, आणि शोध लागल्यावर सुद्धां अखंड स्मरणात राहाणं हेच त्यांचे जीवन आहे. हा त्यांचा स्थायी स्वभाव आहे. याच "अरूप" चेतनतत्त्वाची, शक्तीचीच रूपे, अनंत रूपे ते आपल्या अवती भवती न्याहाळत असतात. ज्ञानराज सांगतात, "अनंत रूपें अनंत वेषें देखिले म्या त्यांसी । बाप रखुमा देवीवरु, खूण बाणली कैशी ॥". अनंत रूपांनी, आकारांनी, नामांनी, वेषांनी एच भगवंत नटला आहे. तो नटनाट्य कुशल कान्हा आहे.
अण्णा -