26 January, 2008

भक्ति कशी ?

भक्ति कशी ?


भक्ति हा द्वैतभावातला प्रकार आहे, असं बर्‍याच अडाण्यांना वाटतं. ते म्हणत असतात, भगवंत वेगळा आणि भक्त वेगळा ! अशी वेगळीक असल्याखेरीज भक्ति होणारच नाही. ही मंडळी सतत अथ पासून ते इति पर्यंत द्वैतभावातच डचमळत असतात.

भागवतधर्म मंदिराचा पाया घालणारे ज्ञानोबाराय [पुढील सगळे वैष्णव यांच्या तत्त्वज्ञानाला अनुसरणारे असून त्याचेच पाईक आहेत] त्यांना मात्र द्वैता-अद्वैताच्या चांदण्या गिळून द्वैतभावाच्या पलिकडे गेलेला, ईश्वराशी पूर्णत्वाने एकरूप झालेला भक्त कळला आहे.

हा भक्त आहे तरीही त्याला विश्वव्यापी चेतनातत्त्वाची जाण आहे. त्याचबरोबर सगुणाचे विलक्षण प्रेम ही आहे.

सर्वव्यापी परतत्त्वाचे भान असल्याने, आणि सर्वत्र तेच एकमेव परतत्त्व अनुभवत असल्याने, हा ज्ञानी भक्त कुणाचाही द्वेष करत नाही. कारण द्वेष भावना ही परकेपणातच असते. या ज्ञानी भक्ताला सारे विश्वच स्वकीय झालेले असते. "किंबहुना चराचर आपणचि जाहला" - त्यामुळे तो सर्वांचाच मित्र असतो. प्रत्येक भूतमात्राबद्दल त्याच्या मनात अपार करुणाच असते. आत्मीयताच असते.

चराचर सृष्टीच्या ठिकाणी, ज्ञानी भक्ताची ऐक्यभावाची भूमिका असते. त्यामुळे तो निरहंकारी असतो. तो अत्यंत निःस्वार्थी असतो. त्याचा "स्व" मर्यादित न राहतां आत्मस्वरूपी विसर्जित झालेला असतो. त्याचा "मी"पणा एका विश्वात्मक भावनेने पुसून गेलेला असतो. पृथ्वी, प्राण, पाणी, दीप या दाखल्यांनी ज्ञानराजांनी १२व्या अध्यायांत, या ज्ञानी भक्ताची अपूर्व गुणवत्ता, त्यांनी मूर्तिमंतपणे साकार केली आहे.

हा ज्ञानी भक्त कायम संतृप्त असतो. वर्षाकाळ असो अथवा नसो, सागराची पातळी नेहमी तेवढीच असते ना ! तो सतत संतुष्ट असतो. या संतोषाचे कारण म्हणजे जीव आणि परमात्मा हे दोघेही त्याच्या हृदयांत एकाच आसनावर विराजमान झालेले असतात.

" जीवू परमात्मा दोन्ही । बैसोनि ऐक्यासनी ।
जयाच्या हृदयभुवनी । विराजति ॥ "
जीव व परमात्मा, देव आणि भक्त, श्रीगुरु सत्‌शिष्य यांचे ऐक्य त्याने जाणलेले असते. तसेच जगाचे व आपले ऐक्यही त्याने ओळखलेले असते, नुसते ओळखलेले नसते तर तो ते प्रत्यक्ष जगतच असतो. " हे विश्वचि माझे घर " अशी त्याची मति स्थिर झालेली असते.

या ऐक्य भावनेमुळेच भवतीच्या व्यक्तीची, परिसराची त्याला भिती वाटत नाही. कारण सार्‍या चराचरातून एकच चैतन्याचा/ ब्रह्मचैतन्याचा [म्हणजे फक्त गोंदावलेकर महाराज नव्हेत तर एकच एक सच्चिदानंद प्रेममय भगवंताचा] स्त्रोत वहात असतो, ह्याचे त्याला ज्ञान आहे. सागर खवळला तरी माशांना (माशी नव्हे, मासा याचे अनेकवचन) त्याची भिती वाटत नाही.

आपले शरीर आणि आपलेच हात-पाय आदि अवयव यांच्यात जी ऐक्यता/एकता असते तशीच एकरसता जग व ज्ञानी भक्त यांच्यात असते. याच्या ठायी समग्र विश्वाविषयी कोणताच दुरावा नसतो. आज आपण बोलघेवडे, सामाजिक बांधिलकीचे कोरडे गोडवे गातो, पण ज्ञानी भक्त मात्र विश्वात्मक बांधिलकीचा पुरस्कार करतो, आचार करतो. ही विश्वात्मकता त्याच्या ठायी इतकी भिनलेली असते की जगच त्याचा देह झालेला असतो, त्यामुळे द्वैतबुद्धीच निखळून पडलेली असते.

"हे जगचि देह झाले । म्हणौनि प्रियाप्रिय गेले ॥" हा भक्त "कैवल्याचा अधिकारी" असून "मोक्षाची सोड-बांध करणं ही त्याची लीला असते. तो म्हणेल त्याच्यापाशी महाबोधाचा सुकाळ होत असतो / झालेला असतो. मात्र हा बोध ओळखता आला पाहिजे.

-- अण्णा

25 January, 2008

समाधान

समाधान

धर्म आणि अध्यात्म यांमध्ये खूपच मोठा फरक आहे. धर्मानें अध्यात्माचें रक्षण केलं जात असेल, पण धर्म म्हणजे कांही अध्यात्म नाही, याचं नेमक भान असलं पाहिजे. जसं कुंपण पिकाचं रक्षण करतं , पण म्हणून कुंपण म्हणजे कांही पिक नव्हे.

धर्म हा बर्‍याच वेळी अध्यात्माची गळचेपी करत असतो. त्याचे कर्मकांड करून टाकतो. आपल्याला श्रीगुरुंकडून प्राप्त झालेल्या उपासनेचं कर्मकांड होऊं देता कामा नये. म्हणजे काय ? तर उदाहरणार्थ , वेळा पत्रक ठरलं की - " रोज ५॥ ला फिरायला जायचं, फिरून आल्यावर स्नान करायचं, मग देवपूजा करायची, आणि पूजा झाल्यावर अर्धा तास 'जप' करायचा ", की झालं आपलं काम. आता आपला आणि देवाचा संबंध संपला उद्यापर्यंत. असं होता कामाचं नाही बरं ! मग हे अध्यात्म काय आहे ?

अध्यात्म शब्दाचा अर्थ असा आहे- अधि+आत्म. आत्म्यासंबंधी म्हणजे माझ्यामधला जो परमात्मा आहे, जो कीं सर्वांच्यात आहे, तो एकच आहे. आपल्यात जो खरा 'मी' आहे [आतला मी] त्याच्याशी अखंड अनुसंधान, त्याचं स्मरण, अनुभव म्हणजे अध्यात्म.

आत्मा कसा आहे ? तर तो अत्यंत शाश्वत आहे. काय गंमत आहे बघ. साडी आणायला गेलात, साडी पसंत केली; आणि काय विचारलं ? रंग पक्का आहे ना ? दुकानदार म्हणतो, " अगदी पक्का आहे; जर गेला तर परत घेईन". घेत नाहीत कधी. पण नुसतं बोलायला काय जातं, नाही का ?

आता तुम्हीच विचार करा. आपण अशाश्वत. साडी जेम तेम वर्ष दीड वर्ष टिकणारी, देणारा-विकणारा अशाश्वत, पैसा अशाश्वत. रंग मात्र या सगळ्यांत आपल्याला शाश्वत पाहिजे ! म्हणजे अशाश्वतांत आपणच शाश्वत शोधतो. आपण गॅरंटी मागतो. म्हणजे एक प्रकारे शाश्वतताच मागतो. अशाश्वतांत शोधून शाश्वत कसं हाती येणार, नाही कां ??

मग शाश्वत तरी काय ? शाश्वत आहे एक समाधान. समाधान हा जीवनाचा धर्म आहे. कुत्री मांजरं यांच्या शरीराच्या गरजा भागल्या कीं ती स्वस्थ झोपून जातात. माणसांत आणि प्राण्यांत हा मोठाच फरक आहे कीं, त्याला भगवंतानें विकसित मन दिले आहे. त्यामुळे शरीराच्या गरजा भागून सुद्धां तो शांत, तृप्त होत नाही. मनाचं समाधान व्हावं लागतं. मनाची शांतता ती खरी शांतता. मनाचं समाधान हे खरं समाधान.

मग आपल्याला काय हवे ? काय मिळाले पाहिजे ? तर जन्मभर पुरून उरेल असं समाधान. या देहांत, या अशाश्वत अशा देहांत, संपूर्ण समाधान अनुभवत राहणे म्हणजे अध्यात्म.

जसे जसे दिवस जातील, तसे तसे समाधान वाटायला पाहिजे. याचं नाव समाधान. समाधान कायमस्वरूपी आहे. त्याला घट नाही. अव्यय आहे. त्यालांच वेदांत अक्षर असें म्हणतात.

समाधान म्हणजे तरी काय ? समाधान शब्द समाधीशी संबंधीत आहे. ती स्थितप्रज्ञाची अवस्था आहे. 'सम+धी'. म्हणजे बुद्धी नव्हे, तर प्रज्ञा सम होणे म्हणजे समाधी. एक गंमतीशीर बाहुली असते बघ, कशीही टाका, फेका ती नेहमी उभीच राहते, तशी प्रज्ञा.

म्हणजे समाधान याचा अर्थ असा की देह, प्रपंच कोणत्याही अवस्थेत असला तरी मन भगवंताला चिकटून असणं. म्हणजेच अध्यात्म. मन भगवंताला चिकटून राहिल्यावर समाधान कां राहतं ? तर तेथे मन कसं असतं ? प्रज्ञा कशी असते ? परमात्मा आनंदस्वरूप आहे. आनंदस्वरूप म्हणजे तरी कसा ?? तर आ+नंद. 'नंद' म्हणजे तृप्त होणे, आणि आ म्हणजे सर्व बाजूनें तृप्तता. आनंद म्हणजे शांतता. परमशांतता. भगवंताला चिकटून राहिल्यावर सर्व बाजूनी तृप्तता, अभय, संशयरहितता याचंच नाव समाधान, म्हणजेच अध्यात्म. आनंदघन भगवंताला सतत चिकटूनच नव्हे तर आनंदस्वरूप होण्याचे साधन - एकच एक साधन, श्रीगुरुंनी प्रसादपूर्वक दिलेल्या "नामा"चे स्मरण.

-- अण्णा

22 January, 2008

अमृतरस

अमृतरस


श्रीगुरुंनी आपल्याला आत्मशक्तिसहीत नाममंत्र दिला; आणि अपल्याला मोठ्या प्रेमाने आपल्या करीं धरिले; आपल्या मस्तकावर त्यांनी त्यांचा कृपामृतकोमल तळहात साशिर्वाद धरला. मग याचा परिणाम काया झाला ? नामशब्द हृदयपटलावर उमटू लागले; आणि त्याचबरोबर हृदयाकाशांत नाना ध्वनि उठले.

'हे ध्वनि तरी कसें ?' असं म्हणशील तर कधी पैंजणांच्या घागर्‍यांचा ऋणझुणाट, कधी मोकळी घागर फुंकण्याचा आवाज/घोष, कधीतरी मंदिरांतील असंख्य लहान-मोठ्या घंटांचा घणघणाट, केव्हां बासरीचे मंजूळ सूर, कित्येकदा सुरांत लावलेल्या विणेचा झणत्कार, कधी दुंदुमीची गर्जना, कधीतरी सागराच्या लाटांचा गंभीर शब्द, तर कधी नभांचा गडगडाट, कधीमधी शंखनाद तर मध्येच केव्हांतरी सिंहनाद सुद्धां .

त्यांच्या कृपेने मन स्वस्वरूपी लुब्ध होते. अंगणांत स्वानंदाभिरामाचे वारे भरते, आणि आनंदाची काही बाही अशी जी स्वस्थिती होतें कीं 'वाचेनी बोलतां नये'. बारा- सोळा [अंतःकरणवृत्ति] हातांमध्ये भक्तिप्रेमाच्या ज्योति/ बोध कांकडे घेऊन आपल्या भोंवती गोळा होतात, फेर धरतात. त्यांची ताल- लय- स्वर यांच्याबरोबर एकच दाटणी (गर्दी) होते; त्यांच्या हातीं असणार्‍या आत्मबोधाच्या ज्योतींचा सभोंवार एकच दाट स्वच्छ, लखलखीत प्रकाश पडतो. आपण त्या प्रकाशजलांत सचैल न्हाऊन निघतो व भक्तिप्रेमभावाने निथळतो.

इतका हर्ष होतो कीं बस्स !!! दशमद्वारींचे अमृतपान होते. हृदयआकाशांत लक्ष लावून पाहतां पाहतां तटस्थता प्राप्त होते. एक आगळा वेगळा निवांतपणा लाभतो; त्याचबरोबर परमशांतीच्या साम्राज्यभुवनी सुखासनावर स्वानंदरसाचा पट्टाभिषेक होतो. परमसिद्धी चवर्‍या ढाळतात. महासुखे अबदागिरी धरतात.

श्रीगुरुप्रसादे अंतर्मौन लाभते. नक्षत्रांचा सडा भरदिवसा अनुभवास येतो. कधी अति ज्वलंत अग्निच्या ज्वाळा दिसतात, तर कधी पौर्णिमेचा पूर्ण शुभ्र चंद्रमा डोळ्यांसमोर चकाकत असतो. त्या आत्मचंद्राचा ललित प्रकाश पाहून मन वेडावून जाते. मनाचा राजहंस ह्या चंद्राच्या चांदण्यातील अमृतकणांचा अति मवाळपणे आस्वाद घेतो. हा मानसीचा राजहंस मोठ्या दिमाखाने सारखा डोलत असतो, झुलत असतो.

हा आत्मस्वरूप, आनंद राजहंस उडून जाऊं नये म्हणून, एका भक्तिप्रेमभावाच्या एकांती त्याला आपल्या डोळ्यांत सांठवून ठेवावयाचा. त्याला नाहाळून न्याहाळून, पुनः पुनः पहात रहायचं. मग तो आपल्या डोळ्याच्या बाहुलींतच कायमस्वरूपी स्थानापन्न होतो.

श्रीगुरुंनी दिलेल्या दिव्य "नामाचे" अखंड स्मरणांत हा सगळा स्वानंदानुभव घडोघडीं घ्यावयाचा. ज्याचे त्यानें, आपण आपणांत हे महासुख भोगावयाचे. हा सुखानुभव काय सांगावा ?? "तें सुख काय सांगो । वाचें बोलतां न ये ॥ " श्रीसद्‍गुरुनाथांच्या कृपाशिर्वादाने आनंद बाळ नामसंकीर्तन करतो, सुखात डोलतो. गुरुकृपेनीच या आनंद महासागरीं अवभृथस्नान करण्याचे महद्‍भाग्य लाभते.

आपल्या श्रीगुरुंनी दिलेल्या नाममंत्राचा हा सगळा अनाकलनीय महिमा. त्यांच्याच असीम कृपेमुळे हें सर्व अमृत अनुभव येत असतात; आणि थोर नवलाव वाटतो. हे अनुभवत असतांना कानांत वारे भरलेल्या वासरासारखी गत होते. शब्दांनी जरी व्यक्त केले असले तरी खरे पाहतां तें शब्दांच्या पलिकडचें आहे. श्रीगुरुंच्या कमलाकर स्पर्शांनी मात्र ते आपल्या शुद्ध जाणीवेला भावल्याशिवाय राहात नाही.

या तेजाने तेजाची दाटणी होते, अत्यंत थोर अशा आनंदाची कारंजी सहस्रधारांनी थुईथुई उडत असतात. स्वरूप दर्शनाने, विस्मयकारक प्रकाशदर्शनाने मन तटस्थ होते. चित्ताला या दर्शन सोहळ्याचे वेडच लागते ना !!!

अमृतरस सतत झिरपतो. त्याने सहस्रदलांतील तळें भरते; ओसंडून वाहते. मधुरवाणीने 'भगवत्‌नाम' अनाहत्‌ध्वनि रूपानी उमटते. तेजाचा पाऊस पडतो. भगवंताचे समग्र वैभव प्रकटते. मग सहजच मुखांतून त्या गुणवंताची, त्या भगवंताची स्तुति बाहेर पडते (अण्णाच्या बाबतीत ती कागदावर अक्षर रुपाने अवतरते) या फार सूक्ष्म, तरल गोष्टी आहेत. अनुभवाच्या आहेत. सतत.

-- अण्णा

20 January, 2008

स्थितप्रज्ञ

स्थितप्रज्ञ


"निर्वातीचा दीपू । सर्वथा नेणें कंपू ॥" निर्वात स्थळी तेवत असलेला दीप जसा निश्चल असतो, तसा स्थितप्रज्ञ निश्चल असतो. भगवान श्रीकृष्णांनी गीतेत दुसर्‍या अध्यायाच्या अखेरीस स्थितप्रज्ञाचे वर्णन केले आहे, ते अर्जुनाची दोलायमान मनःस्थिति सावरण्याकरिता. गीतेपेक्षा माऊलींनी 'स्थितप्रज्ञ' अधिक स्पष्ट केला आहे.

अटीतटीच्या संघर्षप्रसंगी माणसाचे मन कसे असावे याचा हा एक उत्कृष्ट आदर्श आहे. सामान्य माणूस असल्या प्रसंगी असाच गोंधळतो, बावरतो, किंकर्तव्यमूढ होतो. अर्जुनासारखा मोहाने अगदी वेढला जातो. भावविवश होतो. अंती "स्वधर्माचा" विसर पडतो, बुद्धिभ्रंश होतो, आणि या सर्वातून आत्मनाशाची वाट चालू लागतो. कधी ? ते त्याचे त्यालाच उमजत नाही.

सर्व प्राणीमात्रात मनुष्य हा अत्यंत बुद्धिमान प्राणी आहे. पण जनावरापेक्षांही तो बहिर्मुख होतो. सुखाने हुरळून जातो, आनंदाने उड्या मारतो. कधी तो चिडतो, संतापतो वा क्रोधाविष्ट होतो नाही कां ? कधी हर्षाने तर कधी विशादाने त्याची बुद्धि सारखी हेलकावे खात असते. सोसाट्याच्या वार्‍यात सांपडलेल्या पाण्यावरील नावेसारखी. आणि या सगळ्याचा परिणाम काय तर 'आत्मारामाची' विस्मृती. रात्र जशी सूर्याला गिळून टाकते तसा अस्थिर माणसाचा स्मृतिभ्रंश आत्मारामाला झांकोळून टाकतो.

याच्या अगदी उलट "स्थितप्रज्ञ". तो अंतर्मुख वृत्तीचा असतो. भौतिक सुखाने तो नाचत नाही, तसाच दुःखप्रसंगी हतबलही होत नाही. तो आत्मानंदाने परिपूर्ण असतो. सूर्याची किरणे जगातील अणूरेणूला स्पर्श करतात, पण जगात लिप्त मात्र होत नाहीत. तसाच हा स्थितप्रज्ञ. सर्वदा 'आत्मरते निर्भिन्नं, संगदोषे न लिंपते".

हा स्थितप्रज्ञ आणि कसा असतो ? तर निरहंकारी असतो. आपला अहंकार तर नेहमी एवढ्या तेवढ्या कारणांवरून फणा काढत असतो, होय की नाही ? अहंकार गेला की काय होते ? तर मग सर्व प्राणिमात्राबद्दल स्थितप्रज्ञ्याला आत्मीयता असते. विश्वात्मक वृत्तीने तो उजळून निघालेला असतो. "विचरे विश्व होऊनि । विश्वामाजी ॥". संयम , अभ्यास, यम-नियम यांमुळे त्याचे मन त्याच्या मुठीत असते.

कोणाबद्दल राग आणि द्वेष त्याच्या ठायी नसल्याने 'आत्मप्रसन्न' असतो. चेहरा जरी उदास दिसला तरी आत्मारामाची प्रसन्नता कायमस्वरूपीच असते. पाणी कधीतरी पाण्याला बुडवते का ? त्याचप्रमाणे हा परिपूर्ण स्थितप्रज्ञ.

बुद्धी आत्मस्वरूपी स्थिरावली की अंतःकरण, मन कधीही किंचितदेखील विचलीत होत नाही. बुद्धी आत्मारामाच्या ठायी कायमस्वरूपी स्थिर होण्यास सोन्यासारखा उपाय म्हणजे नाम. जातां जातां तुला नामाचा गूढार्थ सांगतो. "राम-कृष्ण-हरि" एवढेच नाम नाही तर "अखंड आत्मारामचे भान" म्हणजे नाम आणि नाम तेच रूप, अत्मरूपाचे दर्शन. म्हणून "नाम तेचि रूप । रूप तेचि नाम ॥" अशी नाम-रूपाच्या एकरसतेची अनुभूती.

सर्व नद्या जरी सागराला मिळाल्या तरी समुद्राची पातळी वाढत नाही का त्याला कधी महापूर येत नाही. किंवा याच्या उलट उन्हाळ्यात नद्या आटल्या आणि त्यांचे पाणी सागराला मिळेनासे झाले तरी त्याची पातळी कमी होत नाही. कधी तो आटतही नाही. ह्या सागरा सारखा स्थितप्रज्ञ अक्षुब्ध असतो.

स्थितप्रज्ञाच्या पुढ्यात साक्षात रंभा उर्वशी अगर ऋद्धि सिद्धि जरी उभ्या ठाकल्या, अगदी कर जोडून ! तरी त्याच्या मनाची जराही चलबिचल होत नाही. एका आत्मबोधानेच तो इतका संपन्न झालेला असतो की त्यापुढे इतर कोणतेही ऐश्वर्य फिके पडते. ज्ञानोबाराय म्हणतात 'सूर्याच्या घरी प्रकाशाकरितां कधी वातीचा दिवा लावावा लागतो कां ?' समजा दिवा लावला नाही, तर काय सूर्य अंधारात कोंडला जाऊ शकतो थोडाच ? हे जितके असंभव तितकेच स्थितप्रज्ञ विचलीत होणे असंभव आहे.

हा अंतरीक महासुखाने तृप्त असतो, आत्मबोधाने संतुष्ट असतो, परमानंदाने पुष्ट असतो. असा असूनही केवळ स्वकेंद्रित नसतो तर विश्वात्मक पातळीवर आरूढ झालेला असतो.

अण्णा -

19 January, 2008

नाम व प्रारब्धभोग -

अध्यात्म रामायणात लक्ष्मण एके ठिकाणी म्हणतो -

सुखं वा यदि वा दुःखं स्वकर्मवशगो नरः ।
यद्यद्यथागतं तत्तद्‌ भुक्त्वा स्वस्थमना भवेत्‌ ॥ (अध्यात्म रामायण २.६.७)
स्वतःच्या प्रारधानुसार माणसाने जे जे सुख अथवा दुःख जसे येईल तसे ते भोगून स्वस्थ मनाने राहावे. श्रीमहाराज आजच्या (१९ जाने) प्रवचनात म्हणतात - नामात राहणारा मनुष्य प्रारब्धाचे भोग भोगीत असताना देखील आनंदात असतो. नामाच्या आनंदापुढे त्याला प्रारब्धाची किंमत राहात नाही. लक्ष्मण पुढे म्हणतो -
मे भोगागमे वाञ्छा न मे भोगविवर्जने ।
आगच्छत्वथ मागच्छत्वभोगवशगो भवेत्‌ ॥
आपण भोगांच्या प्राप्तीची इच्छा करू नये. भोग येऊ नयेत अशी इच्छाही नाही. माझ्याकडे भोग येवोत अथवा न येवोत, असे मानून माणसाने भोगांच्या अधीन होऊ नये.
श्रीमहाराज म्हणतात - नामधारकाला कलीची बाधा नाही आणि प्रारब्धाची क्षिती नाही. नामाने पुण्यशरीर बनते. ज्याच्या अंतरात नाम असते तिथे भगवंताला यावे लागल्याने त्याच्या शरीरात सत्त्वगुणाची वाढ होते आणि तो पुण्यवान बनतो. देह प्रारब्धावर टाकून . . .

http://shribrahmachaitanya.googlepages.com/प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्यमहाराज१९जानेवारी

17 January, 2008

संतांची कळकळ

संतांची कळकळ

कळकळीच्या दृष्टीने संतांचा नंबर सदा पहिला. हे स्वतः पूर्ण असतात. जगत् कल्याणासाठी आपले सर्वस्व उदारतेने, करुणेने वाटत राहतात. अवघ्यांच्या हिताची, उद्धाराची तीव्र कळवळ त्यांच्या ठायी नांदते.

समोरच्यांच्या कमी-जास्त अधिकाराचा कोणताही विचार न करता त्यांच्याच परम कल्यासाठी त्यांच्याच पायां पडतात. कोण ? तर फक्त संतच. अजून उपकार तो कोणता असावा ? यापरती अजून कळवळ ती काय असावी नां ? सगळ्यांना दंडवत घालण्यांतही कळकळ आणि प्रसंगी शिव्या घालण्यांतही एक तोच कळवळा.

संतांना माऊलीची उपमा देतात. "लेकुराचे हित । जाणे माऊलीचे चित्त ॥". "ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभाविण प्रीति ॥ पोटी भार वाहे । त्याचे सर्वस्वही साहे ॥

खरे सांगू का ? व्यवहारांतील हा माऊलीचा दृष्टांतसुद्धां कमीच पडतो. संताच्या प्रेमाचे वर्णन करण्यासाठी आईच्या प्रेमाची उपमा तोकडीच आहे. कळवळ्याच्या बाबती संत व आई एकाच जातीचे आहेत, पण " करी लाभाविण प्रीति " ही फक्त संतप्रेमाचीच विशेषता आहे.

रामायणांत तुलसीदासांनी भरत व हनुमान यांना संत म्हटले आहे. प्रभू रामरायांना ज्या कैकयीने वनवासास पाठविले, अशा मातेलाही चित्रकूट यात्रेच्या निमित्ताने, श्रीरामाच्या पायावर घालण्याचे काम एका भरतानेच केलेले आहे.

रामायणांत एक प्रसंग आहे. मारुतीराय वानरांना घेऊन सीतामाईच्या शोधासाठी निघाले, तेव्हां एका प्रसंगी सर्वजण तहानेने व्याकूळ झाले व पाणी लवकर मिळाले नाही तर वानरांचे प्राणोत्क्रमण होणार अशी अवस्था झाली. संतवृत्तीचे, कृपावृत्तीचे बलभीम, त्यांना हे पाहवले नाही. "बुद्धिमतां वरिष्ठ" असणारे अंजनीसुत पाणी शोधण्यासाठी एका डोंगरावर चढले. तेव्हां त्यांना एक गुहा आढळली. त्यांतून पक्षी ये जा करीत होते. या वरून तेथे पाणी असले पाहिजे असे अनुमान त्यांनी केले. पण स्वतः एकटे जाऊन पाणी पिऊन आले नाहीत. डोंगरावरून खाली आले, सर्व वानरांना घेऊन वर गेले, सर्वांची तहान भागवली व मगच स्वतः पाणी प्याले. तसेच संत ! भगवत् साक्षात्काराच्या प्राप्तीवर आरूढ होऊनही समाजाच्या कल्याणासाठी परत खाली येतात. संतस्वरूप हनुमंतांनी भित्र्या सुग्रीवाचा संबंध रामाशी जुळवून त्याला निर्भय केले. मारुतीरायांना काय लाभ हवा होता ? "कशी लाभाविण प्रीति" हेच.

कळकळीमुळे संत अत्यंत थोर अशा आत्मीयतेने कशी जवळीक करतात पहा ! श्रीतुकोबारायांचा एक अभंग आहे. "अर्भकाचे साठी । पंते होती धरिली पाटी ॥ तैसे संत जगीं । क्रिया करुनी दाविती अंगी ॥ बालकाचे चाली । माता जाणुनि पाऊल घाली । तुका म्हणे नाव । जनासाठी उदकी ठांव ॥ " पाटी हाती धरण्याची गरज नसतांना सुद्धां मुलाला लिहितां यावे म्हणून पंत हाती पाटी धरतात. आईला चांगले भरभर चालतां येत असतांनाही बालकाला चांगले चालता यावे म्हणून जाणून बुजून आई त्याच्या चालीने चालते. नाव लोकांना तरून पलीकडे नेण्यासाठी पाण्यात राहते. तसेच संत पूर्णत्वाच्या स्थितीवर असूनही, कळवळ्यापोटी क्रिया (कर्म) करून दाखवतात. जगासाठी ह्या भवसागरांत नावेचे काम करतात.

"दिव्यत्वाची जेथ प्रचिती । तेथे कर माझे जुळती ॥" संतांच्या उपकाराचे काय वर्णन करणार ? नारदांनी भक्तिसूत्रांत त्यांचे असेंच वर्णन केले आहे. " स तरति , स तरति । स लोकान् तारयति ॥". कांही कर्तव्य प्राप्तव्य नाही. पण आहे तो एक फक्त असीम असा कळवळा, कळकळ. आपल्याला फोडण्या तोडण्यासाठी आलेल्या लोखंडालाही सुवर्णत्वाचा लाभ करून देणारी एकच कृपाळू उदार दृष्टी.
अण्णा -

15 January, 2008

मकरसंक्रांत

मकरसंक्रांत

आज मकर संक्रमण. संक्रमण म्हणजे स्थित्यंतर, स्थानांतर, अवस्थांतर. तीळ शर्करा, वाण-वसा हा अधिभौतिक भाग. जीवदशा ओलांडून शिवदशा अनुभवणे हे अवस्थांतर. त्यासाठी उपासना म्हणजे भगवंताची प्रेमलक्षणा परमप्रेमस्वरूप भक्ति. भक्तिरसायनाचा सुमधुर पाक. भगवद्‌दर्शनाच्या उत्कट आचेवर, जीवरूप तिळावर हळूवारपणे चढवता चढवता अष्टसात्त्विक भावाचा छान काटा येतो ढळतो, येतो ढळतो, आणि होता होता जीवाचे रुपांतर दाणेदार, शुभ्र, स्निग्ध, मधुर हलव्याच्या रुपाने शोभू लागतो.

भक्तिसाधक हा (किंवा ही) कोणीही असो ९९% संसारीच असतो. तो लोकांमध्येच राहतो, वावरतो आणि जीवन व्यवहार करत असतो. त्यामुळे त्याच्या जीवनक्रमावर अगदी सहजच, स्वाभाविकपणे अनेक लौकिक बंधने पडत असतात. तथापि भगवद्‌प्राप्ती हेच ध्येय निश्चित करून, निरलसपणे, निष्ठेने एकविधभावाने, कांही काळ (कित्येक वर्षेसुद्धा) साधना केल्यानंतर मात्र त्त्याच्या स्थितीत असा फरक पडावयास हवा की इतरेजनांच्या आवडी निवडीपेक्षा आपली आवड वेगळ्या स्वरूपाची आहे; हळूहळू हा फरक लक्षात येतो. नंतर तर एक अशी स्थिती येते की लौकिकाचा संसर्गही सहन होईनासा होतो. एक प्रकारचा भिन्न भिन्न मनोवृत्तींचा सरळ विरोध (Temperamental confilict) उद्‍भवतो. अशावेळी तळमळीच्या साधकाने काय करावे ? आपले भगवद्‍प्राप्तिचे ध्येय सोडून इतरेजनांप्रमाणेच वर्तावे काय ?
काही झाले तरी भगवद्‍प्राप्ति साधावयाचीच असा दृढ संकल्प करावा. मग कायावाचामने एकच एक हरिभक्ति करावी. आपले सर्व अवधान एकमात्र हरिभक्तिकडेच केंद्रित करावे. हाच स्वधर्म. भगवंताच्या भक्तिप्रेमाच्या तुलनेत लौकिक, व्यावहारिक गोष्टी या दुय्यमच. म्हणून एक ऐकांतिक परमप्रेमलक्षण भक्तिचीच कास धरावी. कांही लौकिक सोडाव लागला तरी चालेल. प्रसंगी निंदा, चेष्टा, कुचेष्ट सुद्धा होईल. पण ते सर्व मनोधैर्याने सहन केले पाहिजे. ' हे करूं का ते करूं ' असा धर-सोडपणा सोडला पाहिजे. भगवान सांगतात " अर्जुना ! सर्वधर्मान्‌ परित्यज्य मां एकं शरणं व्रज ॥ "

मात्र लौकिक टाकायचा तो कांहीतरी लोक विलक्षण, सनसनाटी, प्रसिद्धी यासाठी नाही. समाज धारणेसाठी कर्तव्यविचार आचार आवश्यकच आहे. पण ते पाळीत असताना एक श्रीहरि हाच आचार, विचार, उच्चार व व्यवहार करावा. " बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥ "

14 January, 2008

शिदोरी

शिदोरी

नामदेवांचा एक सुंदर अभंग आहे :

'रामकृष्णहरि' जप ममत्त्वे साधावा ।
अहंकार टाकावा, समबुद्धि ॥ १ ॥
निवृत्ति योगे पुण्य होईल अगाध ।
एका नामें गोविंद तुष्ट सदा ॥ २ ॥
नामदेव म्हणे सद्‍गुरुपासोनी ।
नाम घ्यावे जाणोनि ना ना कांही ॥ ३ ॥

भगवंताचे गुण व स्वरूप यांपासून भक्ताच्या अंतःकरणांत निर्माण होणार्‍या भावना व भाव, भगवत वत्सल ईश्वराचे भक्तावरील प्रेम व भक्ताची देवावरील भक्ति, संत/श्रीगुरु हीच देवाची प्रत्यक्ष रुपडी म्हणूनच देवाप्रमाणें, प्रसंगी देवाहून कांकणभर अधिकच, संतांवर/श्रीगुरुवर असणारा विश्वास, देवाला भक्तानी करावयाची काकुळतीची प्रार्थना, व भक्तिप्रेमाची याचना या गोष्टींना नामस्मरण साधनेंत फार फार महत्त्व आहे.

साधनेला लागल्यानंतर सुद्धा साधकाने सद्‍गुरुला/संतांना देवपण कशाने (कोणत्या साधनांनी) आले त्य साधनांचा विचार नित्य करावयास हवा. त्याचबरोबर आपल्या परमार्थ प्रवृत्तीची कारणें, सद्‍गुण संवर्धन, व देव-भक्तांचे / सद्‍गुरु-शिष्याचे नातें या गोष्टींचा सातत्याने विचार करावयास हवा.

या सगळ्या विचारांना परमार्थ पदावर चालतांना लागणारी 'शिदोरी' असं म्हणतात. त्याचबरोबर नित्यानित्यविवेक, अपूर्णतेची जाणीव, परमात्म्याच्या अगाध लीलासामर्थ्याची जाणीच ही देखील एक प्रकरची छान, पवित्र, पौष्टीक, स्वादिष्ट, खुसखुशीत अशी शिदोरीच आहे.

हा परमार्थ प्रवास फारच लांबचा, दीर्घकाल चालणारा असल्याने, एकदा सुरुवातील निघतांना तयार करून घेतलेली शिदोरी मुक्कामाच्या टोकापर्यंत पुरत नाही, तर चालत असतांना (म्हणजे अखंड नामस्मरण करतांना) वाटेंत त्या शिदोरींत सारखी सारखी भर घालावी लागते. जसा जहाजावर, समुद्रांतून प्रवास करतांना, दर बंदरावर गोडे पाणी व अन्न यांचा साठा करावा लागतो, वाफेवर चालणार्‍या गाडीच्या इंजिनांत जसा वारंवार पाणी व कोळसा भरावा लागतो, त्याचप्रमाणे या 'नामस्मरणस्वरूप' परमार्थ पदावर देखील, मुक्कामाला जाईपर्यंत वरील वर्णन केलेल्या साधनांचा विचार पुनः पुनः करावा लागतो.

भगवंताचा साक्षात्कार व वरील विचारांचे श्रवण-मनन-निदिध्यास यांचा अनोन्य संबंध आहे तसाच श्रीगुरु-शिष्य देवभक्तांचे नात्याचा संबंध पण अतिशय महत्त्वाचा. श्रीगुरु-शिष्य वा देव-भक्त या नात्याच्या विचाराने, आचाराने आपला भाव वाढतो. या चढत्या वाढत्या भावामुळें साक्षात्काराला फार मोलाची मदत होते, व साक्षात्कारामुळे श्रीगुरु-शिष्य / देव-भक्तांचे नाते अधिकाधिक गोड, दृढ होऊन भाव अधिकच वाढीस लागतो. याप्रमाणे भाव आणि साक्षात्कार, परंपरांच्या सहाय्याने अनेक पायर्‍यांनी वाढतच जातात. आणि शेवटी पूर्ण साक्षात्कार म्हणजेच पूर्णभाव, पराभक्ति, भगवंत होऊन भगवंताचे नामस्मरण, शिव होऊन शिवाला भजणे, अशी पूर्णावस्था लाभते.

कां सारखा हा शिदोरीचा विचार करावयाचा ? तर माणसाला विस्मरण फार ! त्यांत पुनः मौजेची (परमार्थाच्या दृष्टीने फार घातकच) गोष्ट म्हणजे 'हवें ते विसरायचे व नको तें मात्र न विसरतां स्मरणांत ठेवायचे.

म्हणून परमार्थांत आरंभ-शूर फार, पण शेवटचा मुक्काम गाठणारे विरळाच नाही कां ? म्हणून श्रीसमर्थांनी अगदी आग्रहानी सांगितले "केलेंचि करावे भोजन । घेतलेंचि घ्यावे जीवन । तैसे श्रवण आणि मनन । केलेंचि करावें ॥

सर्व परमार्थपर ग्रंथांतून देहादिप्रपंचाच्या असारत्वाची व भगवंताच्या सारसर्वस्वाची नित्य यशोगाथा वर्णन केलेली असते. भगवंताचे/श्रीगुरुंचे सामर्थ्य, कृपा, ऐश्वर्य आदिंचे वर्णन असते. कशासाठी ? तर भक्तिभाव वाढण्यासाठी. हरिकथेंत याच गोष्टींचे वर्णन. साधकाने या गोष्टी नैमित्तिक न करतां सातत्याने करावयास पाहिजे. आपण श्वासोश्वास कधी कधी करतो का ? तर नाही ना ? तो सतत अखंड अविरत चालूच असतो. नाम असे चालू रहावयास हवे नाही का ??

अण्णा -

12 January, 2008

नामाचे विस्मरण

नामाचे विस्मरण

श्रीहरीची अखंड प्राप्ती व्हावी असं वाटत असल्यास, त्याचेच अखंड नामस्मरण करावयास पाहिजे. सगळ्या वेद, शास्त्र, पुराणे, संतश्रेष्ठांनी हे नामस्मरणाचे महत्त्व कळवळून सांगितले आहे. श्रीगुरु तर नामाशिवाय काहीच बोलत नाहीत ना ??
भगवंताचे नामस्मरण अखंड होण्यासाठी त्याचा क्षणभरही विसर पडता कामा नये. आणि श्रीहरीचा कधीच विसर पडू नये असं वाटत असेल तर त्याचे आत्मवत अखंड प्रेम लागणे अत्यंत जरूरीचे आहे. कोणत्याही वस्तूचे ज्या मानाने आपल्याला प्रेम असेल त्याच आणि तेव्हढ्याच प्रमाणात त्या वस्तूचे मनात स्मरण होत असते.
आपल्या स्वतःचे आपल्याला निःसीम प्रेम आहे, आणि त्यामुळे आपल्याला आपला विसर कधीच पडत नाही. जेव्हढे काही आपण करतो ते सर्व आपण आपल्यावर असलेल्या आपल्या प्रेमाकरिता करत असतो. आपले आपल्या स्वतःवरचे प्रेम कधीच नाहीसे होत नाही. म्हणून आपल्याला आपला विसर कधीच पडत नाही, तर सतत आठवच राहतो.
पण स्थावर-जंगम आदि वस्तूचे प्रेमात खंड पडतो, कां तर जो पर्यंत ते आपल्या सुखाला कारणीभूत होतात, अनुकूल असतात तोपर्यंत त्यांचे प्रेम राहते. मधुमेह नाही तो पर्यंत साखर/गोड हवीशी वाटते. पण मधुमेहाला साखर गोडच असून सुद्धा नकोशी वाटते. कां तर ती प्रतिकूल असते, दुःखाला कारणीभूत होते. म्हणूनच एकाच वस्तूचे आपल्याला सारखेच अखंड प्रेम राहत नाही. कधी घराचे तर कधी धनाचे, तर कधीतरी अन्य कोणत्या तरी वस्तूचे. ज्या वस्तूचे ज्या वेळी प्रेम असते त्यावेळी त्या एका वस्तू वाचून दुसर्‍या वस्तूचा आपल्याला सहजच विसर पडतो.
या सगळ्याचे तात्पर्य हे की, आपले आपल्यावर अखंड - निर्हेतुक - निरालस - निरामय प्रेम आहे, आणि त्यामुळेच आपल्याहून ज्या वस्तू भिन्न आहेत, त्यावरील प्रेमभाव खंडित होत असतो व आपल्याशी ज्याचे ऐक्य होईल त्या वस्तूचे प्रेम अखंड राहते. याचे साधे प्रत्यंतर आपण आपल्या देहाच्या ठिकाणी सतत पाहतो. "देहच मी" असे देहाशी ऐक्य - तादात्म्य - एकरूपता केल्याने बाह्य देहभिन्न वस्तूंपेक्षा देहाचे प्रेम अखंड असते.
म्हणूनच भगवंताला - श्रीगुरुला आपण आपल्याहून जोपर्यंत भिन्न पाहू, तोपर्यंत भगवंताचे / श्रीगुरुचे ठायी अखंड भक्तीप्रेमभाव जडणे शक्य होत नाही, व त्याचे अखंड नामस्मरणही होणे जमत नाही.
म्हणजेच भगवंताचे अखंड नामस्मरण घडावयास हा श्रीहरी / श्रीगुरु माझ्याहून यत्‍किंचितही भिन्न नाही, तो माझेच स्वरूप आहे किंवा माझे खरे स्वरूप म्हणजे श्रीहरी / श्रीगुरुच होय. मी श्रीहरी / श्रीगुरुहून एव्हढासुद्धा निराळा नाही, असे एकाकारतेचे ज्ञान अनुभवास येणे आवश्यक आहे.
एव्हढेच नाही तर जो पर्यंत श्रीहरी / श्रीगुरुपासून आपण भिन्न-वेगळे आहोत अशी द्वैतबुद्धी जोपर्यंत आहे, तोपर्यंत पूर्वसंस्कारानुसार भगवंताचे प्रेम व स्मरण यात खंड पडत राहणार. श्रीहरी / श्रीगुरुची अद्वैत सत्ता असून त्याचा आपला अभेद संबंध असून त्याचीच सर्वत्र व्याप्ती आहे अशी एकसत्ता अनुभवास आली, की मग त्याचे स्मरण-भक्तिप्रेमभाव, अखंड नामस्मरण सहजच होते - होतच राहते.
अण्णा -


10 January, 2008

अध्यात्म

अध्यात्म


माणसाला जर "अध्यात्म" यथार्थ कळले तर, हे जग काय ? हा जीव कोण ? जगाचा-जीवाचा संबंध काय ? ब्रह्म काय ? आणि या ब्रह्माचा वरील सर्वांशी (जीव आणि जगाशी) कशा प्रकारचा संबंध ? एव्हढ्या गोष्टी मूलभूतदृष्ट्या समजल्या तर "आपण कोण ?" आपले स्थान काय ? या सर्वाची निश्चित जाणीव हो‍ईल.

बाह्य दृष्य-जगाचा व आपल्या स्थूल-सूक्ष्म-कारण देहाचा तादात्म्यभाव सुटल्याशिवाय "सुखरूपता" नाही हेंच खरें. आकाशांतील गंधर्व नगरीच्या विस्ताराप्रमाणे, डोक्यांत विचारांचे (आत्मविचार सोडून हं) वादळ सुटलेले असते तोंवर आत्मारामाचा अनुभव येणार नाहीं हें त्रिवार सत्यच.

सूर्यप्रकाशाच्या ठिकाणीं कोळशाची पूड पडलेली पाहून, त्या कोळशाच्या काळेंपणामुळें सूर्यावर कृष्णवर्णाचा आरोप करतां ये‍ईल कां ? तर मुळीच नाही.

गाढ झोपेंत "मी"चें भान नसतें, पण म्हणून तेथें कांहींच नाही असें होत नाही. त्या ठिकाणी न कळत पण आहेंपणाचें भान हें असतेंच असतें; आणि म्हणून तर झोपेंतून उठल्यानंतर झोपेचा आनंद जाणवत असतो.

वाहत्या पाण्याला भूमीचा गुण-रंग हा लागतोच. स्वच्छ पाण्यांत काचेचा भास होणारच. त्याचप्रमाणें गाढ अज्ञानाचें मुळाशीं न कळत कां हो‍ईना, जीवेश्वराचें अस्तित्व असतेंच. या जीवेश्वराच्या अस्तित्त्वामुळेंच या बाह्य वस्तु असतात, डोळ्यांना त्या दिसतात, आणि मनाला भासतात. कार्य-कारणांची ही मोठी विलोभनीय वर्तुळ परंपरा जगाच्या उत्त्पत्तिपासून अखेरपर्यंत अशीच चालत राहणारच. ही वर्तुळ परंपरा वेदान्ताच्या - संतवाङ्‍मयाच्या अभ्यासानें समजून घेतलीं म्हणजे मग "रम्य-समाधान" लाभते बरं !!

एखाद्या व्यसनाधीन माणसाला तें व्यसन आपल्या नादीं लावून जसे नाचवतें, त्याप्रमाणें ही सगळीं शरीररूपी यंत्रें आंत खेळत असलेल्या एका शक्तीनें अव्याहत कार्यपर असतात. यंत्रातून खेळणारी विद्युत-शक्ति ज्याप्रमाणे सार्‍या यंत्राला चालविते त्याप्रमाणेच.

आशा सार्‍या जगाला आपल्या नादीं लावून, आपल्या म्हणण्याप्रमाणेंच नाचवीत असते, या आशेला जगाला भुलविण्याचें सामर्थ्य जर कशामुळें प्राप्त झालें असेल, तर तें या दृष्याच्या लालीमुळेंच. आपल्या सर्व धमन्यांमधून जसें रक्त वाहतें, त्याप्रमाणेंच सर्व प्राणीमात्राच्या कार्यांतून सुखाची आशा अव्याहत प्रवाहरूपानें वाहत असतें. जीवाला बांधून आपल्यामागें पळावयास लावणारी अशी ही आशेची विचित्र मोहक शृंखला सर्व जीवांच्या पायांतून जखडून गेल्यामुळेंच हें सर्व जग सुखाकडें (?) दृष्टी ठेवून त्याच्या प्राप्तीकरतां सारखें आशेच्या मागें धांवत सुटलें आहे.

हे विश्व ही एक मोठी प्रयोगशाळा आहे. यांत असलेल्या सर्व पदार्थांच्या सहाय्यानें यांतील सर्व माणसें जर कशाचा सारखा शोध करत असतील तर तो या सुखाचाच. या सुखाच्या भावनेचा उगम जरी मन, बुद्धि इंद्रियांच्या बाह्य पदार्थांशी संयोग हो‍ऊन जरी [अंतःकरणात] होत असला, तरी आत्म-विचाराच्या दृष्टीनें पाहूं गेलें असतां या संबंधापेक्षा/हून कुठेंतरी वेगळीकडेंच या सुखाचा खरा ठेवा आहे. आणि मनु बेटा या सुखाच्या मूळ उगमस्थानाचा [म्हणजेच अत्यंत सुखरूप अशा भगवंताचा] शोध लागला म्हणजे मगच जीवाला निरंकुश, नितांत, तृप्तिकर, निरतिशय, निरुपाधिक, नित्य, निर्व्याज, निर्मळ सुखरूपतेचा लाभ होतो.

खारें पाणी जसें तहानलेल्या माणसाची तृप्ति करत नाही, तसेच दृष्याचे सत्यत्व कोणालाहि तृप्तीकारक ठरत नही. 'यद अल्पं, तन मर्त्यम '. जें जें अल्प, मर्यादित, परिच्छिन्न तेंच मर्त्य - म्हणजे नष्ट होणारे असतें. अल्प वस्तू पूर्ण होत नाही. तसेंच अल्पवस्तूंत पूर्ण वस्तुचा समावेशहि अशक्यच. जें जें अल्प तें तें कार्य. म्हणून कार्य हें कारण हो‍ऊं शकत नही. म्हणून एक भगवंतच पूर्ण.

-- अण्णा

08 January, 2008

गुणातीत

गुणातीत


गुणातीत होता आलं, की, मग अधिकाधिकच आत्मसंमुखता लाभते आणि मग अशा आत्मनिर्भर अवस्थेत गुणांची [म्हणजे त्रिगुणांची] काळजी करण्याचे कारणच राहात नाही. सापाने एकदा कात टाकली की मग ती कात सतत सांभाळून ठेवण्याची त्याला कांहीच आवश्यकता नसते. अगदी त्याचप्रमाणे गुणांना ओलांडून पलिकडे गेलेला गुणातीत गुणांची पर्वा करीत नाही.
सांडूनि आंगिची खोळी । सर्पु रिगालेया पताळी ।
ते त्वचा कोण सांभाळी ? । तैसे जाले ॥
तसेच हे सत्त्व, रज, तम हे प्रकृतीचे तीनही गुण आपापल्या सामर्थ्याद्वारा देहाची सोंगे नाचवीत असतात. सूत्रधार आत्माराम मात्र गुणांच्या पडद्यामागे अदृश्यच असतो. गुणातीताचे सारेच्या सारे अवधान - अनुसंधान आत्मवस्तूकडेच असते. गुणप्रभावामुळे जीवाचे जे नर्तन होत असते तिकडे मात्र त्याचे लक्ष किंचितमात्रही नसते. कां ? तर त्याचा अहं लोपलेला असतो. " तिन्ही गुण आपुलिया प्रौढी । देह नाचविती बागडी । तो न पाहे धडी । अहंते ते ॥ "

असा हा शरीरधारी असूनही निरहंकारी असतो. देह असूनही त्याला देहबुद्धी नसते. कारण गुणांपासून तो सर्वथैव अलिप्तच राहतो. ज्ञानराजांनी योगी पुरुषाचे वर्णन करतांना आलेला घटाकाशाचा दाखला, गुणातीताच्या वर्णातही येतो बघ. घट फुटला की मग घटात प्रतिबिंबित झालेले घटाकाश हे महदाकाशात सामावते. त्याचप्रमाणे देहभिमानाचा लोप झाला की निखळ एक आत्मस्वरूपच राहते. देहधारी असूनही मग केवळ आत्मबोधानेच देहात राहणे होते. आत्मबोध कायम जागता असतो, आणि म्हणूनच त्याला भगवान श्रीकृष्ण गुणातीत म्हणतात.
गुणातीताचे गुणगान श्रीज्ञानराजांनी असे भरभरून केले आहे पहा. अर्जुनाने गुणातीताची लक्षणे विचारतांच श्रीज्ञानोबारायांचा श्रीकृष्ण अधिकच उल्हास पावतो आणि - "परिस आता तेथासि । रूप करू ॥ " असे म्हणतो. "रूप करणे" हा माऊलीचा अतिशय आवडता शब्दप्रयोग आहे. खरेच, काय सामर्थ्य आहे त्यांच्या शब्दकळेचे !!!
रजोगुणामुळे माणूस कार्यप्रवृत्त होतो. कार्य करतां करतां कर्तेपणाच्या अहंकारामुळे तो वेढला जातो. उन्मत्त होतो. सत्त्वगुणाने सर्वेंद्रियांवर ज्ञानाचे तेज फाकते. विद्येच्या अभिमानाने मनुष्य खुंट्यासारखा ताठतो. तमोगुणाच्या प्रभावाने माणूस मोहवश होतो. अज्ञानाच्या गर्तेत फसत जातो. गुणातीत मात्र या तीनही गुणांच्या कर्तृत्वाकडे तटस्थपणे पाहतो. एका आत्मतत्त्वाच्या सत्तेनेच या तीन गुणांचा वावर सर्वत्र होत असलेल्याचे तो जाणतो. सूर्य जसा अलिप्तपणे समस्त लोकव्यवहार पाहतो, तसा हा गुणातीत गुणांचा खेळ बघत असतो.
सागराला चंद्रामुळे भरती येते. चंद्रामुळे सोमकांत मणी पाझरतो. याच चंद्र प्रकाशाने कमळे उमलतात. पण चंद्र मात्र आपल्याच जागी निवांत आणि अलिप्त असतो. गुणातीताच्या संदर्भातही सत्व-रज-तम आपापला स्वभाव प्रकट करत असतातच पण गुणातीत मात्र या सगळ्यापासून अत्यंत अलिप्तच असतो. सूर्याच्या घरी जसा अंधार नसतो किंवा दिवाही नसतो तसाच हा गुणातीत. रात्रीला कधी प्रकाश दिसतो का ? सूर्याला कधी अंधार कळतो का ? अंधारच काय तर त्याला प्रकाश पण कळत नाही, इतका स्वयंप्रकाश ! आहे की नाही गंमत !
गुणातीत एका अर्थाने दगडासारखा (?) निश्चल असतो, पण तो चेतनाशून्य, संवेदनाशून्य नसतो, तर अत्यंत तरल असतो. गुणातीत अवस्थेतही तो ज्ञानी भक्तांप्रमाणे भगवंताची अव्यभिचारी भक्ति अखंडत्त्वाने करीतच असतो. ही फार महत्त्वाची बाब आहे.
हा परमतत्त्वाची निश्चल ऐकांतिक भक्ति करतो. विश्वासह विश्वात्म्याचे त्याचे भान (म्हणजे अनुभव) अचल असते. असा हा गुणातीत ज्ञानोत्तर भक्ति करणार्‍या भक्ताप्रमाणेच परमतत्त्वाच्या ठायी तो भक्ति-प्रेम सुखाचा भुकेला असतो. त्याला भगवंताची व भगवंताला अशा भक्ताची भूक असते. हेच भक्ति-प्रेम सुखाचे ऐश्वर्य !
--- अण्णा.

03 January, 2008

स्वानंद

स्वानंद


अपेक्षा करणे चूक नाही पण आग्रह धरणे चुकीचे आहे - "नहि स्वात्मारामं विषय मृगतृष्णा भ्रमयन्ति". स्वात्माराम तृप्त आहे, तो परिपूर्ण आहे, याचा अर्थ काय आहे ? जीवनाचे खरे लक्षण कय आहे ?

पण अंतर्मुख होऊन आत बघितले पाहिजे. पण आपण बघतो बाहेरच. ज्या सुखाकरितां या जगांत रात्रंदिवस आपण धडपडतो, त्या ऐवजी आपण जर आपल्या आतमध्ये जे सच्चिदानंद आत्मस्वरूप आहे, त्याच्या किंवा त्याला अनुभवण्याची कला जर आपण शिकून घेतली तर सार्थकच झाले. अष्टौप्रहर, बारा महिने, तेरा काळ आनंदच आनंद-स्वानंद. कारण आपल्या आत आहे तो नुसता दाशरथी राम नाही तर तो स्वानंदाभिराम आहे. हा केवळ नंदलाल नसून आनंदलाल आहे बघ.

भगवत्‌नामाचे तात्पर्य तरी काय आहे ? नामाची व्याख्या अशी आहे, "आपण आपल्या मनाने नामाचा हात धरून चारी वाणींच्या पायर्‍या उतरून आपल्या अंतःकरणात उतरायचे, की जेथे परमानंदाचा अक्षय खजिना आहे". हा परमानंद खंड भोगण्याचे नाव म्हणजे "नामसाधना".

पण केवळ आपल्या मनाच्या सहाय्याने, परा, पश्यन्ति, मध्यमा, व वैखरी या चार वाणींच्या पायऱ्या उतरून आत खोलवर जाऊ शकत नाही. मग याला काही उपाय आहे की नाही ? तर त्याला एकच एक उपाय आहे - "नाम". नाम हीच एक अशी वस्तू आहे, असे तत्त्व आहे, की एका वाणीतून दुसर्‍या वाणीत उतरता उतरता ते आपल्याला भगवंतापर्यंत घेऊन जाते.

म्हणूनच असे आत आत उतरण्याकरितां, अवघ्या विश्वात पसरलेले आपले जे मन आहे, त्या मनाला आत ओढून घेऊन भगवत्‍नामाशी बांधून मग त्या मनाला आत सोडायचे. तरी ते उसळ्या मारून वर वर येण्याचा प्रयत्न करतेच, पण नामाच्या वजनाने, नाईलाजाने कां असेना, पण त्या मनाला आंत उतरावेच लागते. आंत भगवंताचे - आपल्या श्रीगुरुंचे अधिष्ठान आहे. जिथे भगवंत प्रत्यक्ष आपल्या अनुभवास येतो, त्या परावाणीच्या ठिकाणी भगवंताचे अखंड अनुभव घेत घेत आनंदाने, महानंदाने, ब्रह्मानंदाने समृद्ध, समर्थ जीवन जगणे हेच नामसाधनेचे अमृतफळ आहे.

ज्ञानेश्वर महाराज तर ज्ञानीयांचे राजे, योगीराज, तत्त्वज्ञानी, संजीवन समाधीचे सम्राट आणि स्वानंदसाम्राज्याचे सार्वभौमचक्रवर्ती असे असूनही आपल्या 'हरीपाठांत' काय म्हणाले तर, "हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥ "

किती सोपे सांगितले ना ? पण या सोप्यालासुद्धा आपण उपाधी लावून त्याला उगीचच जास्तीत जास्त आवघड करून टाकतो. एक सांगतो बघ - श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी एकाला नाम सांगितले. तोही घेऊं लगला मोठ्या श्रद्धेने, प्रेमाने. सहा महिने झाले. एक दिवस आला महाराजांकडे, म्हणाला - "महाराज गुडघे फार दुखतात, मांड्या भरून येतात". महाराज म्हणाले, "कां, कशाने दुखतात ?" त्याने काय म्हणावे. म्हणाला, "बद्धपद्मासन घालून बसतो". महाराज म्हणाले, "मी तसे सांगितले होते कां ?" तो म्हणाला, "मग मी कोणत्या आसनावर बसून जप करूं ?" महाराज म्हणाले, "तुम्ही प्रपंचाचा विचार करता, चिंता करता, काळजी करता, ती कोणत्या आसनावर बसून ?? "

चोवीस तास नाम घ्यावे. कशाला त्या कष्टप्रद आसनाची उठाठेव, नाही का ? "निजल्याने गाता उभा नारायण । बैसल्या कीर्तन करिता डोले ॥". म्हणून ज्ञानेश्वर महाराज काय म्हणाले ? तर 'हरि मुखे म्हणा'. हरि-राम-कृष्ण या तिन्ही नामाचा भाव एकच आहे. "रामकृष्णहरि"

एक नाम घेतले ना, पुरे झाले. अन्य काही आटापिटा नको. ते नाम आपल्याला वाणीच्या पायर्‍या उतरून आंत नेईल आणि भगवत स्वरूपाचा साक्षात्कार म्हणजे आनंदाची-स्वानंदाची अनुभूती देईल. ही जबाबदारी दिव्य नामाची; ज्यांनी / श्रीगुरुंनी आपल्या नाम दिलेले असते, त्यांची. आपण काय करावयाचे तर नाम घेत रहावयाचे. कसे ? कुठे ? तर, "आसनी शयनी भोजनी उठता बसता येता जाता काम करता करता. अगदी भांडतांना कांडतांना सुद्धां". एक नाम आणि नाम. आपण नाम घ्यावे. काळजी 'तो' करतो.

-- अण्णा