25 February, 2008

संतांचा "मी" ..

संतांचा "मी" ..

श्रीगुरु ज्ञानदेवांना ज्या परमतत्त्वाची जाण आहे, त्या परतत्त्वाच्या संदर्भात ते "मी बोलेन । बोली अरुपाचे रूप दावीन ।" असें म्हणतात. या चरणांत "मी" हा कर्ता आहे. "मी" म्हणजे एक ज्ञानेश्वर नामक व्यक्ती असे वर पाहता प्रथमदर्शनी वाटेल, पण हा "मी" व्यक्तिवाचक एकवचनी मी नाही. तो केवळ ज्ञानदेव नामक व्यक्तीचा सूचक नाही.
हा "मी" सर्वात्मक शक्तिशाली आत्मरूपाचा वाचक आहे. व्यक्ति आणि समष्टी यांच्यातील एक अपूर्व एकरुपता, एकात्मता, एकरसता या "मी" मध्ये सातत्याने जाणवत असते. त्यांच्या "मी" मध्ये अवघे विश्व सामावलेले आहे. आणि त्यांचा "मी" विश्वात विस्तारला आहे.
जेव्हां "मी" असा विश्वात्मक होतो, तेव्हा मी मध्ये स्वार्थाचा किंचितही लवलेश नसतो. "हे विश्वचि माझे घर" एवढा तो व्यापक, उन्नत असतो. विश्वकल्याणार्थ समग्रतेची एक सर्वव्यापी सर्वंकश धारणाच तेथे "मी"च्या स्वरुपांत कार्यरत झालेली असते.
या दृष्टीने खुद्द श्रीज्ञानराजच स्वतःचे "अरुपाचे रूप" (ब्रह्म) असे आहेत. "दिसो परतत्त्व डोळा" (म्हणजे परब्रह्मसुखाचा अद्वैताच्या पातळीवर अनुभव यावा) ही देखील एकट्या ज्ञानदेवांचीच, ज्ञानदेव नामक एका व्यक्तीची स्वतःपुरती वैयक्तिक आकांक्षा नाही तर या विश्वरूप "मी"ने परतत्त्वदर्शनद्वारा अवघ्या विश्वसुखाची मागणी विश्वात्मक आत्मदेवाजवळ केली आहे. म्हणूनच तर त्यांना ज्ञानराजमाऊली म्हणतात. "दिसो परतत्त्व डोळा । पाहो सुखाचा सोहळा । रिघो महाबोध सुकाळा । माजि विश्व ॥" समग्र विश्वाला महाबोधाचा सुकाळ व्हावा आणि परिणामी विश्वाने सर्वसुखाचा सोहळा अनुभवावा हीच ज्ञानेश्वरमहाराजांची अभिलाषा आहे.
गुरुमाऊलीचा "मी" असा सर्वात्मक असल्याने "अहं ब्रह्मास्मि" (मी ब्रह्म आहे) या वेदातील महावाक्यात असणार्‍याच "मी"शी त्यांचे अद्वैताचे अतूट, अनन्य, घनिष्ट नाते आहे. "अयमात्मा ब्रह्म" (हा माझा आत्माच ब्रह्म आहे) किंवा "तत्त्वमसि" (ते ब्रह्म तूच आहेस) या सगळ्याच महावाक्यातील अद्वैत पातळीवरची "मी-तू" अशी द्वैतरहित परिभाषाच श्रीज्ञानराजांच्या जाणिवेला व्यापून बसली आहे. आणि त्यामुळेच हीच सर्वात्मकता, त्यांच्या अमृतापेक्षा रसाळ अशा बोलांतून अखंड ठिबकत असते, पाझरत असते, एवढेच नाही तर ओसंडून वाहात असते. श्रीगुरुंच्या रोमारोमांत एकच सर्वात्मभाव भिनलेला आहे.
श्रीज्ञानेश्वर महाराजांसारख्या सगळ्याच संतांचा "मी" असा विश्वात्मक असल्याने, इतरेजनांना जे "अरूप" (म्हणजे अनुभवापलीकडील) आहे, न दिसणारे आहे, ते परब्रह्म त्यांना स्पष्ट दिसत असते। नरेंद्रांनी एकदा श्रीरामकृष्णांना विचारले, "जगन्मातेविषयी सारखे बोलतां, पाहिली आहेत का ?" तेव्हां परमहंसांनी उत्तर दिले, "नरेंद्रा, तू जितका या चर्मचक्षूंचा प्रत्यक्ष विषय आहेस, त्यापेक्षा कित्येक पटींनी "माता" माझ्या अनुभवाची आहे". या आत्मदर्शनाने ते आनंदाकार झालेले असतात, आणि ही आनंदाकारता अवघ्या मानव समाजास प्राप्त व्हावी हीच त्यांची विश्वात्मक अभिलाषा असते. "मागणं" जेव्हां विश्वात्मक होते, तेव्हां त्यात स्वार्थ नसतो तर केवळ आणि केवळ "जगत्‌कल्याण" हाच एकमेव विचार असतो.
अण्णा -

24 February, 2008

मंत्र, स्तोत्रे आणि सूक्ते - २

मागच्या (पहिल्या) भागात आपण पाहिले की मनुष्यमात्राच्या उन्नतीचा पाया वैचारीक संतुलनावर अवलंबून आहे. म्हणून मनातील विचार प्रवाहाला निरंतर चांगल्या गोष्टीत -Positive Thinking- गुंतवून ठेवणे आणि बहिर्मुख मनाला अंतर्मुख करणे आवश्यक आहे. चित्तस्थैर्य, शुद्ध सात्विक विचार, मनाचे संतुलन वाढविण्यास उपयुक्त आहेत प्रवाही मनाला स्थैर्यप्राप्तिसाठी ऋषि-मुनींनी अनेक मंत्र, स्तोत्रे, सूक्ते यांची निर्मिती केली. स्थीर मनातच 'आनंद तरंग' उठतात. ब्रह्मणस्पती सूक्त, विष्णुसहस्रनाम, ललिता सहस्रनाम, पुरुषसूक्त, नारायणसूक्त, देवीसुक्त, रुद्रसूक्त - किती variety ज्याची जशी taste ज्याची जशी कुवत त्याप्रमाणे वैदिक साहित्यात स्तोत्रे, सूक्ते उपलब्ध आहेत. सर्व सूक्ते वेद, उपनिषदे, ब्राह्मण ग्रंथ, अरण्यके इत्यादिंमधून वेचून condenced स्वरूपातील निर्माण केलेल्या कृति. सूक्तांच्या संदर्भात लक्षात घेणे आवश्यक आहे की कोणत्याही सूक्ताचे नुसते पठण करून विशेष काही साध्य होणार नाही. वेदांमध्ये कर्मकाण्ड व ज्ञानमार्ग दोन्ही मार्ग उपलब्ध आहेत पण दोन्ही वेगवेगळे आहेत. ज्ञानाद्वारे मोक्ष व कर्माद्वारे ऐहिक व स्वर्गादिची प्राप्ति. म्हणून सुक्तांच्या उपयोगाची फळे भिन्न आहेत. अनुष्टान करतांना दोन्ही प्रयोजनांचा समुच्चय होणे शक्य नाही, किंवा एकात दुसरे अंतर्गत आहे असेही होऊं शकत नाही. सूक्तांचा तीन प्रकारे उपयोग केलेला आढळतो. १) उपासना - पठण मनन करून परमात्व तत्त्वाची ओळख करून घेणे २) कर्म - एक धार्मिक विधि म्हणून उपयोग करून इच्छित साध्य करून घेणे ३) ह्या लोकी ऐहिक साध्यासाठी तसेच स्वर्गादि पारलौकिक प्राप्तिसाठी सूक्त मंत्रांचा उपयोग अभिषेक वा यज्ञाहुति देण्यासाठी करणे [ २ आणि ३ मध्ये प्रयोग वेगळा असला तरी उपयोग एकच ] ४) अगदी यांत्रिक पद्धतीने पाठ करून 'आपण काही विशेष केले' असे थोड्या वेळेपुरते टिकणारे समाधान मिळविणे ( पण ह्यामध्ये क्वचित अहंकार बळावण्याचा धोका उद्‍भवू शकतो ). जो पर्यंत जीव 'अहं-मम' च्या (मी-माझे) कक्षेत वावरतो तोपर्यंत सुख-दुःख असणार. कारण ' यत् अप्लं तन् मर्त्यम् ' हा नियम आहे. छांदोग्य उपनिषदात ब्रह्माला 'भूमा' म्हटले आहे. 'भूम' म्हणजे विशाल, इतके विशाल की दृष्य जगताचे ते एक आधारभूत तत्त्व आहे. परमात्म स्वरूप विशाल आहे. आपण त्या विराटाचाच अंश आहोत. उपासनेने साधकही व्यापक होतो आणि तशी वृत्ती विशाल व्हावी म्हणून सूक्तांचा अभास आवश्यक. अखंड आनंद प्राप्तीसाठी आपण परमात्म्याचा (अल्प) अंश नसून आपण स्वतःच परमेश्वर आहोत असा भाव ठेवून 'भूम' बनायचे हा उद्देश ठेवून उपासना करायची असे ऋषींचे म्हणणे. म्हणून नुसता सूक्त पाठ करण्य़ापेक्षा सूक्तांचा अर्थ जाणून परमेश्वर स्तुति म्हणून उपासना करणे जास्त लाभदायक होणारच. काही विद्वान म्हणतात सूक्ताद्वारा 'शिवो भूत्वा शिवं भजेत' किंवा 'विष्णुः भूत्वा विष्णूं अर्चयेत्' अशा भावनेने उपासना केल्यास त्वरीत लाभ होतो.

13 February, 2008

मानसमणिमाला रत्‍न ३ रे


मानसमणिमाला (३)


हिंदी दोहा : जथा सु‍अंजन अंजि दृग साधक सिद्ध सुजान ।
कौतुक देखत सैल बन भूतल भूरि निधान ॥ १ ॥ बालकाण्ड
गुरु-पद रज मृदु मंजुल अंजन ।
नयन अमिअ दृग दोष विभंजन ।
तेहिंकरि बिमल बिबेक बिलोचन । चौपाई - १
मराठी : नेत्रि सु-अंजन घालिता साधक सिद्ध सुजाण ।
वनि पर्वति कौतुकि बघतो भूतळि भूरि निधान ॥
गुरु-पद रज मृदु मंजुल अंजन ।
नयनामृत दृग-दोष-विभंजन ।
तत्कृत विमल विवेक-विलोचन । प्रज्ञानानंद
अर्थ : डोळ्यात सिद्धांजन (सु‍अंजन) घातले असतां साधकभक्त सिद्ध व सुजाण होतो आणि त्याला सहजतेने, विनाप्रयास वन, पर्वत किंवा भूमिमध्ये सलेले गुप्त धन स्पष्ट दिसते. श्रीगुरुमहाराजांचे पदरज हे अत्यंत मृदु व मुलायम नेत्रंजन आहे. त्यामुळे दृष्टीदोष पूर्ण नाहीसे होतात तसेच आपला ज्ञानचक्षु स्वच्छ व निर्मल होतो.
गुरु पदरजांची प्राप्ती म्हणजे गुरूंची कृपा प्राप्त होणे व ही कृपा अनेक चमत्कार घडवूं शकते. तातील प्रमुख चमत्कार म्हणजे साधकाला एक वेगळीच दृष्टि प्राप्त होते. रोजच्या जीवनांत घडण्यार्‍या घटना, प्रसंग यांचेकडे पाहण्याची त्याची दृष्टि बदलू लागते. सामान्यतः आपल्या जीवनांत घडणार्‍या प्रसंगांकडे आपण व्यक्तिनिरपेक्षतेने, वस्तु निष्ठतेने पहात नाही. त्यांना दुख-दुःखांचा, मी-तू पणाचा, मानापमानाचा रंग लावून तांचे विकृत मूल्यमापन केले जाते. त्यामुळे ते प्रसंग व त्यातून निघणारा खरा अर्थ आपल्याला नीट कळत नाही. अनेक गैरसमजांचे, अज्ञानाचे जाळे तयार होते. कोण बरोबर चूक, काय खरे खोटे, किती आवश्यक अनावश्यक सगळेच्या सगले धूसर आणि विकृत होते.
भूमीमध्ये खोलवर पुरलेले किंवा गहन अरण्यांत नेऊन लपवून ठेवलेले धन सहजगत्या दृष्टीला दिसत नाहीच, परंतु अनेक वेळां फसगत होऊन गोंधळ मात्र आणखीच वाढतो. असे म्हणतात की विशिष्ट तर्‍हेचे अंजन डोळ्यात घातले असतां भुमीतील धनही स्स्पष्ट दिसते. पण हे अंजनहि असे सहजी उपलब्ध नसते. ते मिळविण्याकरितां खूप प्रयत्‍न करावे लागतात.
त्यापेक्षां अनंतपटीने गुरुकृपारूपी अंजन दुर्लभ आहे. त्यकरितां गुरुसेवा, दास्य करणे अत्यंत आवश्यक आते. गुरुंची आज्ञा पालन करून गुरुंना प्रसन्न करून घेतले तर मात्र हेगुरू हे अमृतमय सिद्धांजन आपल्या सिष्याच्या नेत्रांत घलतात. त्यामुळे जगाकडे बघण्याची साधकाची दृष्टिच बदलून जाते. पूर्वीचे मूल्यमापन, त्यांतील सुखदुःखें, मी-तूपणा किती हास्यास्पद, अनावश्यक होता हे त्याला जाणवू लागते. 'विमल विवेक' जागृत होऊन त्याला शुद्ध ज्ञानाचा एक दिव्य चक्षु 'विलोचन' म्हणजे प्राप्त होतो आणि त्याला आपल्या गुप्तधनाचा म्हणजेच स्व-स्वरूपाचा ठावठिकाणा कळतो.
मग मीराबाई आनंदाने म्हणतात 'पायोजी मैने रामरतन घन पायो ! आणि मुकुंदराज म्हणतात - 'आजि मी ब्रह्म पाहिले !
आणि ज्ञानदेव तर तुलसीदासांच्याच शब्दांत म्हणतात -
(गुरुकृपेने) जैसे डोळ्या अंजन भेटे । ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे । मग वास पाहिजे तेथ प्रकटे । महानिधी ॥ [ज्ञानेश्वरी १.२३]

डॉ. सौ. उषा गुणे.

10 February, 2008

मंत्र, स्तोत्रे आणि सूक्ते - १

भारतीय संस्कृति मुख्यतः यज्ञप्रधान संस्कृति आहे असे म्हटलेले बऱ्याच ठिकाणी पहायला मिळते. कांही शतकांपूर्वी तसे असेलही कदाचित्, पण आज तरी ती शिथील होऊन नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहे असे वाटते. पुरातन काळी यज्ञ घरोघर केले जात असत. पुढे जसजशा मनुष्याच्या गरजा वाढू लागल्या तसतसे यज्ञयागासाठी वेळ काढणे, सामुग्रीची जमवाजमव, त्या साठी लागणारा खर्च या सर्व दृष्टीने वैयक्तिक यागाची जागा सामुहिक यज्ञाने घेतली. कालांतराने तेही कोणा मोठ्या धनिकाच्या पाठिंब्याने शक्य होऊन कोणी मोठा धनिक (यजमान) यज्ञ करणार आणि इतर सर्व प्रेक्षक असे त्याचे स्वरूप झाले. मोठे यज्ञ काही दिवस वा एक-दोन महिनेही चालणारे असत. त्यांत सकाळी अग्निमंथन आणि दुपारी ऋषि समुदायाचे वैचारिक मंथन असा क्रम होऊ लागला. तिथे आपापल्या ध्यानसाधनेत स्फुरलेल्या विचारांची, अनुभवांची देवाणघेवाण होत असे आणि कधी कधी सिद्धांत मांडले जात. थोडक्यात upanishadic declarations सरखे काहिसे. बहुतेक वेळेस चर्चेचा विषय 'मनुष्याची उन्नती कशा प्रकारे होऊ शकेल' अशा स्वरुपाचे असत.

मानवी जीवनाच्या परीक्षणावरून ऋषिंना जाणवले की मनुष्याचे जीवन प्रायः बहिर्मुखी आणि भोगैकप्रवण असते. त्यामुळे त्याचे जीवन सतत सुख-दुःखांमध्ये हेलकावत असते. स्वस्थ शांत जीवन फारच थोड्यांच्या वाटेला येते. ज्यांचे जीवन स्वस्थ आणि शांत आहे त्यांचे जीवनाचा स्तर साधारण मनुष्यापेक्षा कितीतरी उंच असतो. अशा मनुष्याची वृत्ति अंतर्मुखी असते, त्याचे चित्त स्थिर असते. परिस्थितीनुसार त्याचा आनंद हेंदकाळत नाही. मग त्यामागील कारणांच्या संशोधनांतून, परीक्षणातून त्यांना जाणवले की मनुष्याच्या विचारांची बैठक त्याच्या असलेल्या स्तराला कारणीभूत असते. जर जीवनाचा स्तर वाढवायचा असेल तर अंतर्मुख होण्यासाठी बहिर्मुख वृत्तीवर नियंत्रण हवे. आणि हे नियंत्रण कोणी कोणावर लादू शकत नाही. ते स्व-निश्चय करूनच पत्करावे लगते. पण अनुभव असा असतो की एखाद वेळेस मोठ्यातली मोठी कामे जमू शकतील पण नियंत्रण ? छे, अतिशय कठीण. पण पर्याय तर नाही. मग कसे आणायचे नियंत्रण ? त्यासाठी सतत चालणारा विचारांचा जो प्रवाह असतो त्यात परिवर्तन होणे आवश्य आहे. त्यांना हे कळून चुकले की वाईट कृतिपेक्षा वाईट विचार भयानक परिस्थिती निर्माण करतात. कृति क्षणिक असते पण विचारांनी होणारे संस्कार जन्मोजन्मी पिच्छा सोडीत नाहीत. अगदी चांगल्या वाटणार्‍या व्यक्तीच्या ठिकाणीही ते बीज रुपाने सुप्त असतात; आणि एकादे वेळेस असे डोके वर काढतात की त्याचे परिणाम स्वतःसकट इतरांनाही भोगायला लावतात. कारण जन्मोजमींचा वासना संचय आणि इंद्रियांची बलवत्तर शक्ति यांच्या संयोगामुळे बीज रूपातील क्षुद्र वृत्ति संधीच शोधत असतात. कधी परिस्थितीमुळे मनुष्याची आंतरीक श्रद्धा डळमळते तर कधी बाह्य कारणांमुळे (संगती वगैरे) क्षुद्रवृत्ति डोके वर काढतात. उदाहरण घ्यायचे तर रामायणातील (रामायण इतिहास मानल्यास) कैकयी. तिचा पिंड राजस गुणी. श्रीरामावर कौसल्यापेक्षाही जास्त प्रेम करणारी. पण अचानक रामाचा द्वेष करून भरतावरील ममत्व जाहीर करते. वास्तविक मंथरेच्या प्राथमिक संभाषणानेही तिच्या विचारसरणीत बदल झालेला नसतो; पण मंथरेच्या अधिक उकसवण्यामुळे कैकयीच्या सुप्त असलेल्या क्षुद्र वृत्ति जागृत होतात.

उन्नतीचा पाया वैचारीक संतुलनावर अवलंबून आहे हे तर सर्वमान्य झाले. वैदिक काळीच ऋषींच्या यज्ञीय सभांमधून असे निष्कर्ष काढले गेले. आजही गेल्या ५० वर्षांतील पाश्चात्य देशातील Dr. Wayne Dyer सारखे इतर psycologist, psychiatrist, psychotherapist यांचे साहित्य पाहता सर्वजण एकमताने Positive Thinking चा पुरस्कार करणारे दिसतात. म्हणून मनातील विचार प्रवाहाला निरंतर चांगल्या गोष्टीत गुंतवून ठेवणे आवश्यक. बहिर्मुख मनाला अंतर्मुख करणे निकडीचे. मग प्रवाही मन स्थिर झाले की सर्वदा 'आनंदाचे डोही आनंद तरंग' उठतात. side benefit म्हणून अद्‌भुत शक्तीचा प्रत्यय तर येतोच पण आचरणसुद्धा कोणालाही हेवा वाटेल असेच असते.

वैदिक सूक्तांच्या निर्मितीत ( आणि आधुनिक काळात अभंगांच्या निर्मितीत ) परमेश्वर स्तुति वगैरे दिसून येतेच पण मुख्यतः मन एके ठिकाणी स्थिर करणे ह्यासाठी त्याचा उपयोग जास्त होतो असे म्हणतात. सूक्तांच्या निर्मितीतही मंत्रांची रचना करताना मंत्रातील शब्द, वर्ण यांची देखील खूप अभ्यासपूर्ण वैज्ञानिक पद्धतीने योजना झाली. कित्येक मंत्र, उच्चार आणि भाव यांच्या योगे चित्तस्थैर्य, शुद्ध सात्विक विचार, मनाचे संतुलन वाढविण्यास उपयुक्त आहेत आणि त्याचबरोबर त्यात काही सुप्तशक्ति (उदा - वाक्‌सिद्धी) जागृत होण्याचेही सामर्थ्य आहे. आधुनिक "विज्ञाननिष्ट" मनुष्याला त्याची प्रचिती येत नाही कारण त्या मंत्राचा अर्थ आणि रहस्य जाणून घेण्याचा धीरही नसतो आणि त्यासाठी लागणार्‍या कष्टाची तयारीही नसते. MBA, MBBS इ. करायलाही काही कमी कष्ट पडत नाहीत. पण ते केल्याने अर्थप्राप्ति आणि ऐहिक सुखासाठी लागणारे सर्व काही मिळवण्याचा जो विश्वास आणि जी श्रद्धा असते, ते सर्व मिळवून देण्यास मंत्र/सूक्ते इ. देखील तितकीच सामर्थ्यवान आहेत अशी श्रद्धा नसते.
एकोऽहम्‌

09 February, 2008

अरुपाचे रूप..

अरुपाचे रूप..


"अरूपाचे रूप दावीन" अशी श्रीगुरु ज्ञानराज माऊलीची प्रतिज्ञा. "रूप दाखविणे", "रूप करणे" असे शब्द प्रयोग त्यांनी आपल्या ग्रंथात अनेक ठिकाणी आणि अनेक अर्थांनी उपयोजिलेले आहेत. "अहिंसा रूप किजैल", "गुरु सामर्थ्या रुप करू", "नेणे रुप करू देवा", अशा सारख्या ठिकाणी वर्णन करणे, रूप दाखविणे, मर्म स्पष्ट करून सांगणे, अशा अर्थांनी ज्ञानराज "रुप करणे" हा शब्दप्रयोग वापरतात.
समग्र वाङ्मय व्यवहारच / साहित्याची निर्मिती, हा सगळा अक्षर प्रपंचच अरुपाला रूप देण्यातून साकारत असतो. साहित्यिकाच्या मनातील अमूर्त भावना, भावभावना आणि कल्पना या शब्दांच्याच माध्यमातून अभिव्यक्त होत असतात. लेखकाच्या मनात जे अव्यक्त असते ते याच अक्षर माध्यमातून व्यक्त होते. अरुप रूपवान होते. यालाच शब्दचित्र असे पण म्हणतात. आता ही ओवी बघा - " नाना कथा रूपे भारती । प्रकटली असे त्रिजगती । आविष्करोनि महामती । व्यासाचिये ॥ " कशी आणि किती बोलकी आहे ना ? भारती म्हणजे प्रत्यक्ष वाग्देवताच. महाभारत कथेच्या रूपाने, व्यासांच्या विशाल बुद्धीला नित्य स्फुरण देत या त्रिभुवनात प्रगटली असे श्रीज्ञानराज म्हणतात. पण "अरूपाचे रूप दावीन" यांत केवळ वाङ्मयीन अभिव्यक्तीच्याच उद्देशाने म्हणतात असे नाही, तर एखादे सर्वथैव असाध्य साध्य करण्याच्या ताकदीने, अभिनिवेशाने म्हणतात -
तेणे कारणे मी बोलेन । बोली अरुपाचे रूप दावीन । अतिंद्रिय परी भोगवीन । इंद्रियांकरवी ॥
या ओवीच्या शब्दाशब्दातून ज्ञानदेवांना काय अभिप्रेत आहे याचा विचार फार महत्त्वाचा आहे. हा शब्द तसा दुर्बोध नाही, पण त्याचबरोबर तो आपल्याला वाटतो तेवढा सुबोधही नाही.
मन, ज्याला रूप नाही त्याला रूप देणे हा "अरूप" शब्दाचा वाच्यार्थ आहे. पण वाच्यार्थातून नेमका आशय आपल्या लक्षात येत नाही. ही ओवी आली आहे ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायाच्या मंगलाचरणांत, म्हणजेच या अध्यायाच्या प्रास्ताविकांत. या अध्यायांत योगाचे विवेचन आहे. कुंडलिनी मार्गाचे सविस्तर वर्णन आहे. योगाद्वारे साधकाने प्रगती कशी साधावी ते या अध्यायांत सांगितले आहे. तरी सुद्धा या सहाव्या आध्यायापुरतेच फक्त योगविद्येच्या संदर्भांत श्रीगुरुमहाराज ज्ञानदेव "अरूपाचे रूप" दावीन असे म्हणत नाहीत तर, अरूप म्हणजे "निर्गुण निराकार परब्रह्म" एवढा सखोल अर्थ श्रीज्ञानदेवांना अभिप्रेत असल्याचे लक्षात येते.
ज्ञानेश्वरीत केवळ सगुण साकार अशा- "तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥" एवढेंच वर्णन / रूपवर्णन आहे असे नाही. परतत्त्वाच्या संदर्भातच ज्ञानेश्वर महाराज "अरुपाचे रूप दावीन" असे म्हणतात. परतत्त्व दाखविणे हे सामान्याचे काम नाही. श्रीज्ञानराजांसारखाच थोर आत्मसाक्षात्कारी संतश्रेष्ठांचीच ती योग्यता.

अण्णा -

06 February, 2008

मानसमणिमाला रत्‍न २ रे


मानसमणिमाला (२)


हिंदी : कुंद इंदु सम देह उमारमण करणाअयन ॥
जाहि दीनपर स्नेह कर‍उ कृपा मर्दनमदन ॥ बालकाण्ड मं. ४
मराठी : कुंद इंदु सम देह उमारमण करुणायतन ॥
जो करि दीनी स्नेह करो कृपा मर्दन मदन ॥ प्रज्ञानानंद
अर्थ : कुंदाच्या वेलीचे शुभ्र फूल, व शुभ्र शीतल चंद्राप्रमाणे ज्यांचे शरीर गौरवर्णाचे आहे असे उमापती भगवान्‌ शंकर करुणानिधान आहेत. ते अत्यंत दीन भक्तांवर अतिशय प्रेम करतात म्हणून ते मजवर कृपा करून माझ्या अंतःकरणातील कामादि दोष नष्ट करोत.

कुंदाचे पुष्प अत्यंत शुभ्र, नाजुक व सुगंधित असते. बघणार्‍या माणसाच्या मनांत सात्त्विकतेचे भाव निर्माण करते. त्याचप्रमाणे पूर्ण प्रकाशमान चंद्र आपल्या शुभ्र शीतल चांदण्याने भक्ताच्या मनांत प्रेम आल्हाद व शांति निर्माण करतो. असेच सर्वभाव भगवान्‌ शंकराची गौरवर्ण मूर्तीचे दर्शन केले असतां अंतःकरणात जागृत होतात शांत, स्थिर आसनांत बसलेले भगवान शंकर आपल्या तेजस्वी गौरवर्ण कांतीने भक्तांच्या केवल नेत्रांनाच सुखकर नाहीत तर भक्ताच्या मनांत ती शांतता, स्थिरता सहजतेने संक्रमित करतात. त्याचे विकार, विचार हळूहळू लय पावू लागतात. मनुष्य आपल्या चिंता, विवंचनांनी कितीही त्रस्त झालेला असला तरी शांत शीतल चांदण्याचा स्पर्श त्याला खूपच आश्वासक वाटतो, तसेच भगवान शंकराच्या गौरवर्ण, शांत, गंभीर दर्शनाने मनाला आश्वासन मिळते. प्रभु माझ्यावर खचितच कृपा करतील कारण ते करुणेचे निवासस्थान आहेत अशी त्याची खात्री असते.
त्यांची कृपा करण्याची रीतीही अगदी आगळी वेगळीच आहे. मनुष्याने आपणच निर्माण केलेले, स्विकारलेले व दैववशात त्याच्यावर आरूढ झालेले विकार, कामादि दोष स्वतःच्या प्रयत्‍नाने पूर्णपणे नष्ट करूं शकत नाही. तितकी विचक्षण बुद्धि, वैराग्य व दृढता त्याच्यात साधारणतः नसतेच. पण भगवान शंकरांनी तर या विकारांचे दहनच करून टाकले ! कसे ? तर आपला तृतीय नेत्र उघडून ! म्हणजेच तृतीय नेत्रातील ज्ञानाग्नीने सर्व कामादि विकार नष्ट करतां येतात हे प्रत्यक्ष उदाहरणानेच त्यांनी दाखवून दिले.
सर्व जीव हे शिवाचेच अंश असल्याने प्रत्येक व्यक्ति जवळ हा तृतीय नेत्र ज्ञानचक्षु उपलब्ध आहे. व त्यातील ज्ञानाग्नीने सर्व विकार भस्मसात करून माणसाला आपले अंतःकरण शुद्ध शांत करता येणे शक्य आहे. असेच भगवंत सुचवित आहेत.
धन्य भगवंताची करणी ! एकाच वेळी दाहक आणि शीतल, उग्र आणि प्रशांत, संहारक आणि संजीवक अशी करुणा !
अशा भगवान शंकराला संत तुलसीदासांनी आपला प्रथम गुरु मानलेले आहे. तोच आपल्याला आपल्या इष्ट दैवतापर्यंत प्रभु रामचंद्र यांच्यापर्यंत नेऊन पोहोचविणार आहे अशी त्यांची दृढ श्रद्धा आणि विश्वासही आहे. म्हणून आपल्या रामचरितमानस ग्रंथाच्या संस्कृत मंगलचरणांत ते म्हणतात : -
वंदे बोधमयं नित्यं गुरुं शंकर रूपिणम्‌ ।
यमाश्रितो हि वक्रोऽपि चंद्रः सर्वत्र वंद्ययते ॥
नित्य ज्ञानमय अशा गुरूंना भगवान शंकरांना नमन असो. त्यांच्या आश्रयाला राहिल्यामुळे वाकडा (द्वितीयेची कोर असलेला) चंद्रही जगाला वंद्य झाला आहे. द्वितीयेच्या चंद्राचे दर्शन अवश्य घेतले जाते. म्हणूनच माझ्या सारख्या दीन मतिहीन भक्ताला जवळ करण्यांत कांहीच अडचण येणार नाही. भगवान शंकरांना प्रिय असलेल्या प्रभु रामचंद्रांची कथा आतां मी सांगणार आहे म्हणून ते मला निश्चितच जवळ करतील. अशा गुरुंना त्रिवार वंदन !

डॉ. सौ. उषा गुणे.

03 February, 2008

संतांचिया गांवी..

संतांचिया गांवी..

परमार्थ हे ध्येय ठरल्यावर प्रपंच हा परमार्थाचे साधन म्हणून करावयाचा. तेव्हां परमार्थाला उपयोगी पडेल अशा रीतीनेंच प्रपंच करावयाचा, टाकावयाचा नाही. 'मानीला प्रपंची आनंद । केला परमार्थी विनोद ॥' ह्या समर्थवचनाप्रमाणे करावयाचें नाही.
परमार्थांत श्रीगुरु-शिष्य हे नातें पवित्र, मधुर, पुण्यमय असून महद्‌भाग्याने जोडले जाणारे आहे. श्रीगुरु हे एक स्थूल, पांचभौतिक शरीर नसून परम सत्याचा एक अनुभवी आकार आहे. मातपिता, आप्तबंधू, पुत्रपौत्र यांच्यापेक्षाही श्रीगुरु/देवाबद्दल अधिक जवळिक व आपुलकी हा फार महत्त्वाचा भाव आहे.
यस्य देवे पराभक्ति, यथा देवे तथा गुरौ । ज्याची भगवंतावर [म्हणजे जशी त्या भगवंतावर आहे, तशीच ह्या भगवंतावर नाही असे नव्हे] पराभक्ति आहे, तो नामधारक. 'आत्मज्ञं अर्चयेत भूतिकामः' ज्याला परमार्थात अगर प्रपंचात वैभव, ऐश्वर्य पाहिजे असेल त्याने आत्मदर्शी अशा श्रीगुरुंची भक्ति करावी, असें उपनिषदें सांगतात.
अशा महापुरुषांचे दर्शन, संगती, सहवास, कृपाशिर्वाद म्हणजे प्रत्यक्ष ईश्वराचेंच दर्शन. ज्याची प्राप्ती करून घ्यावयाची त्या भगवंताची मूर्त म्हणजेच असा महात्मा. देवाची सगुण साकार कृपामृताचा वर्षाव करणारी मूर्तच म्हणून त्यांच्याकडे पाहतां येते. अशी श्रीगुरुस्वरूपाची महती आहे."जाको दरसें । साहेब दरसे ॥" असे कबीराने त्यांचे गुणगान केले आहे. जगाला न दिसणाऱ्या अशा परमात्म्याच्या गुप्त रूपाशी ऐक्य पावलेला पुरुष म्हणजे श्रीगुरु.
जड, निर्जीव पदार्थ (त्यांनाही अल्प प्रमाणांत जीव आहेच) वनस्पति, सूक्ष्म जीव, मानवेतर मोठे प्राणी, व मानव या भिन्न भिन्न जाति, त्यांच्या त्यांच्या ठिकाणी असणार्‍या देवाच्या चढत्या प्रकाशामुळें झाल्या आहेत. देवाचा अधिक प्रकाश मानवांत आणि सर्वाधिक प्रकाश श्रीगुरु/संताच्या ठिकाणी असतो. ते देहधारीच असतात, देहधारीच दिसतात, तरी त्यांचा आत्मा परमात्म्याशी एकरूप झालेला असतो. भगवंत हा सागर, तर हा महात्मापुरुष त्यावरील तरंग. दोन्ही एका समान गुणधर्माचे पाणीच. त्यांच्या ठिकाणचा उज्ज्वल देवप्रकाश संपर्कात येणार्‍याला प्रकाशित करून सोडतो.
भाव भक्ति वाढवण्याचे उत्तम साधन म्हणजे श्रीगुरु भक्ति-प्रेम, असा सर्वच्या सर्व सत्‍पुरुषांचा सिद्धांत आहे. "आत्मज्ञाने चोखडीं । संत ते माझी रूपडी ॥ " निराकार देव दिसत नाही, त्याला भेटतां येत नाही, त्याच्याशी बोलतां येत नाही. ही उणीव भरून काढणार्‍या देहातल्या मूर्ती म्हणजेच श्रीगुरु. "देव ते संत, देव ते संत । निमित्त त्या प्रतिमा ॥ "
त्यांच्या संगतीने, उपदेशानें, प्रबोधनानें, शिकवणीनें निधडे झालेले चित्त ब्रह्मासारखे संशयरहित होते. श्रीगुरु हे श्रेष्ठ तीर्थ आहे. त्यांच्या संगतीने भ्रांतालाही ब्रह्मभाव प्राप्त होतो. त्यांच्या सहज स्मरणानें त्यांचीच योग्यता प्राप्त होते. श्रीगुरु हे देवाचेच रुपडें. जसा भाव देवावर ठेवावयाचा तसाच, तोच भाव श्रीगुरुवर/संतावर ठेवावयाचा. महात्म्यांच्या या वचनांवर दृढ श्रद्धा ठेवायची.
एक थोर सत्पुरुष म्हणत असत कीं, तुम्ही आपल्या श्रीगुरुंना मनुष्य समजता म्हणून तुमचे साधन चांगले होत नाही. आपल्या श्रीगुरुंना देव मानल्यावर उत्तम अनुभव येतात. खरी सगुणभक्ति म्हणजे संतांवरील/श्रीगुरुवरील भक्तिभाव. याच भक्तिभावानें भगवंतावरील भक्तिभाव वाढतो. साधनावरील [म्हणजे नामावरील] श्रद्धा दृढ होते. भय नष्ट होऊन अभयादि दैवीसंपत्ती लाभते.
नामस्मरण होण्याला सर्वांत उत्तम साह्य (भावरूपी) श्रीगुरुसंगत. "संतांचे संगती । मनोमार्ग गति ॥ " श्रीगुरु/संत भक्ति-प्रेमच देतात व भक्ति-प्रेमच घेतात. आपण संतांच्या घरी भिकारी होऊन कां गेलो हे श्रीतुकोबारायांनी फार सुंदर वर्णन करून सांगितले आहे. आपल्या पूर्वपुण्याईनें संतच घरी आला.
संतांचिया गांवी प्रेमाचा सुकाळ ।
नाही भयशंका तळमळ ॥ १ ॥
तेथें मी राहीन होऊन याचक ।
घालतील भीक तेचि मज ॥ २ ॥
संतांचिया गांवी वसे भांडवल ।
अवघा भक्तिप्रेमभाव घनचित्त ॥ ३ ॥
संतांचे भोजन अमृताचे पान ।
करिती नामस्मरण सर्वकाळ ॥ ४ ॥
संतांचा उदीम उपदेशाची पेठ ।
भक्तिप्रेम सुख देती घेती ॥ ५ ॥
तुका म्हणे तेथे आणिक नाही परी ।
म्हणोनि भिकारी झालो त्यांचा ॥ ६ ॥

अण्णा -

मानसमणिमाला - रत्‍न १ ले


मानसमणिमाला (१)


गोस्वामी तुलसीदासांचे 'रामचरितमानस' सर्वश्रुत आहेच. प.पू. प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी यांनी 'रामचरितमानस'चे समश्लोकी समछंद असे मराठीतून रुपांतर केले आहे. रामचरितमानस जरी रामकथा असली तरी त्यात कित्येक चौपायांतून सिद्धांत प्रतिपादन केला आहे. त्यातील काही निवडक चौपाया/दोहे (ओव्या) वेचून त्यांची 'मानसमणिमाला' गुंफून त्यातील प्रत्येक रत्‍नावर सौ. उषा गुणे यांनी सुंदर विवरण केले आहे. तेच क्रमशः येथे उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.
एकोऽहम्‌

* * * * * * * * *


हिंदी : मूक होई वाचाल पंगु चढ‍ई गिरीवर गहन ।
जासु कृपासी दयाल द्रव‍उ सकल कलिमल गहन ॥ बालकाण्ड
मराठी : मूक होई वाचाल - पंगु चढे गिरीवर गहन ।
कृपयायस्य दयाल द्रवु तो सब कलिमल दहन ॥ प्रज्ञानानंद.
अर्थ : मुक्या माणसास वाचा प्राप्त होईल, आणि पायाने अधु, पंगु मनुष्यही अत्यंत दुर्गम असे गिरीपठार चढून जाऊ शकेल. हे सर्व ज्याच्या कृपेने घडते तो सर्व कलिमलाचे दहन करणारा प्रभु माझ्यावर द्रवून कृपा करो.

परमेश्वराच्या कृपेने मुका मनुष्य वाक्‌पटु होऊ शकतो किंवा अधु मनुष्यही पर्वत ओलांडण्यासारखे अवघड कृत्य करून जातो. ज्ञानेश्वर माऊली आपल्या ज्ञानेश्वरीत (१०.८) म्हणतात - "आपुलिया स्नेहाची वागेश्वरी । जरी मुकेयाते अंगिकारी । तो वाचस्पतीशी करी । प्रबंधु होडा ॥" गुरुराया, आपण जर एखाद्या मुक्याचा प्रेमाने अंगिकार केलात, तर तो पैजेने बृहस्पतीशी देखील स्पर्धा करू शकेल. परंतु याचा अर्थ असा नव्हे किं त्या व्यक्तिनें स्वतः कांहीही न करतां परमेश्वराने आपल्या कृपेच्या सामर्थ्याने त्याला एकदम पर्वतावर आरूढ करावे किंवा त्याला एकदम पण्डीत करावे. ज्याची स्वतःची प्रेरणा आणि प्रयत्‍न दुर्दम्य असतील आणि भगवंतावर अतूट श्रद्धा ठेवून कार्य हाती घेण्याची उमेद असेल तर असंख्य अडचणी संकटे यांचे निवारण होऊन त्याचे कार्य पूर्णतेला जातेच जाते. अशा उमेदिकरितां, आत्मविश्वासाकरितां भगवंताजवळ कृपायाचना करावयाची.
संत तुलसीदासांनी 'रामचरितमानस' लिहायचा मानस प्रभुजवळ व्यक्त करून कार्यसिद्धि व्हावी याकरितां त्याचेच चरणी ही कृपायाचना व आशिर्वाद मागितले आहेत. सुप्रसिद्ध 'मूकं करोति वाचालं पंगु लंघयते गिरीम्‌' । या श्लोकाचेच हे अत्यंत सुंदर, सुगम, अर्थवाही रुपांतर आहे. पण त्याहिपेक्षां मूळ श्लोकांत नसलेले 'सर्व कलिमलाचे दहन' हे फलही येथे सूचित केले आहे. माझ्या हातून अशक्यप्राय वाटणारे कार्य तुझ्या कृपेने पार पडो असे तर म्हटलेच आहे परंतु त्याहिपुढे जाऊन कलियुगांत प्रत्येक कर्मामध्ये निर्माण होणारे दोषही नाहिसे होवोत अशी प्रार्थना केली आहे. कलीयुगांत तीव्र वित्तेषणा, लोकेषणा, स्पर्धा, ईर्षा, मत्सर व त्यातून निर्माण होणारे संघर्ष अपरिमित असतात. निष्काम कर्म कुणालाच नको असते.
परंतु स्वतः तुलसीदास मात्र म्हणतात "स्वांतःसुखाय तुलसी रघुनाथ गाथा - या ग्रंथाची रचना अगदी हेतुरहित निर्मळ आनंदाकरितां माझ्या हातून व्हावी ! अत्यंत निष्काम भावनेने श्रीरघुनाथाच्या सेवेप्रित्यर्थ हे कार्य हाती घेतलेले आहे " अशा तर्‍हेने अत्यंत सरलभावाने केवळ आनंदाप्रित्यर्थ, निष्ठेने कार्य करण्याचे उदाहरण स्वतः तुलसीदासांनी आपल्यासमोर ठेवले आहे.
ही रामकथा त्यांनी सात अध्यायांत - कांडामध्ये सविस्तर वर्णन केली आहे, व त्या सात काण्डांचा निर्देश अगर प्रास्ताविक त्यांनी सुरुवातीला सात संस्कृत श्लोकांमध्ये केले असून त्यातून वस्तुनिर्देश मंगलाचरणही केले आहे. वस्तुतः तुलसीदासांना संपूर्ण कथा संस्कृतमध्येच रचावयाची होती. परंतु प्राकृत हिंदी बोली भाषेचे दैव खरोखर बलवत्तर ! प्रत्यक्ष भगवान्‌ शंकरांनीच आदेश दिल्यामुळे तुलसीदासांनी 'भाषा निबंध मति मंजुल' अशी हिंदी मधूनच रचना केली व भगवंतांनी ती स्वतः पाहून अत्यंत प्रसन्नतेने त्यावर स्वाक्षरी केली - 'सत्यं शिवं सुंदरम्‌' !
डॉ. सौ. उषा गुणे