20 May, 2008

मानसमणिमाला (७)


मानसमणिमाला (७)


हिंदी : मति कीरति गति भूति भला‍ई । जब जेहिं जतन जहाँ जेहिं पाई ॥ ५ ॥
सो जानव सतसंग प्रभाऊ । लोकहु वेद न आन उपाऊ ॥ बालकाण्डा २.६
मराठी: मति गति भूति भलेपण कीर्ती । जैं ज्या जेथें प्राप्त जशीं ती ॥ ५ ॥
तो सत्संगति - महिमा जाणा । लोकीं वेदिं उपाय दुजा ना ॥ ६ ॥ प्रज्ञानानंद
अर्थ : सर्व प्राणिमात्र व मनुष्यांना जिथे, जेव्हां आणि ज्याप्रकारे सुमति, उत्तमगति, भूति म्हणजे ऐश्वर्य, भलाई व कीर्ति प्राप्त होते त्याचे मागे सत्‌संगतीचा प्रभाव हेच मुख्य कारण असते असे निश्चितपणे समजावे. लोकाधार व वेददेखील हाच एकमेव उपाय आहे असे आग्रहाने सांगतात.

ह्या पृथ्वीवर राहणारे सजीव कीटक, पशुपक्षी, वनस्पती सृष्टि व मनुष्य प्राणी या सर्वांच्या जीवनावर सत्‌संगतीचा प्रभाव पडतो व त्यांना सद्‌बुद्धि, कीर्ति, ऐश्वर्य, स्वास्थ्य, चांगलेपणा प्राप्त होतो असे संत तुलसीदास वेद, शास्त्रे व लोक व्यवहार यांच्या पुराव्यानिशी आपल्याला ठामपणे सांगतात. अनेकांना अशी विधाने अतिरंजित किंवा धर्मभोळेपणा निर्माण करणारी अशी वाटतात. परंतु विज्ञानाने, इतर शास्त्रग्रंथांनी व इतिहास-पुराणांनी यातील सत्यता अनेकवेळा सिद्ध केली आहे.
भगवान रामचंद्र सीतामाई व लक्ष्मणासह पंचवटीमध्ये वास्तव्याला आले आणि तेथल्या चराचरामध्ये अवर्णनीय स्थित्यंतर झाले. तेथील भितीप्रद, भयानक, उग्र अरण्याचे शांत, सुरक्षित व नयन मनोहर उपवनांत रुपांतर झाले. त्यांत वास्तव्य करणारे ऋषि-मुनि, गिरीजन अत्यंत सुखाने, आनंदाने कालगणना करूं लागले. इतकेच नव्हे तर -
खग मृग वृंद अनंदित रहहिं । मधुर मधुर गुंजत हरुनि लहहि ॥
सो बन बरनि ना सकें अहिराजा । जहाँ प्रगट रघुवीर बिराजा ॥
गीध, व्याघ्र, मर्कट व इतर हिंस्र प्राणीही आपापले त्रासदायक, भितीप्रद दुर्गुण सोडून एकत्र नांदू लागले. अहिंसा प्रतिष्ठायां तत्‌ संनिद्धौ वैरत्यागः । असे एक योगसूत्रही या सत्‌संगतीच्या प्रभावाची ग्वाही देते.
बालमुकुंद श्रीकृष्णाच्या सान्निध्याने गोकुळातील आबाल वृद्ध, स्त्री-पुरुष आनंदित सुखी झाले. इतकेच नव्हे तर गाई-गुरे, त्याच्या मधुर मुरलीनादाने वेडावून गेली. भरभरून दूध लोणी तुपाच्या गंगा वाहू लागल्या. यमुनेचे जल शांत निर्मल झाले. कालियाचे प्रदुषण नाहीसे केल्याने निर्विघ्न झाले. भूमि, गोवर्धन पर्वत सस्य शामल झाले व सर्वत्र शांतता समाधान समृद्धि नांदू लागली.
वनस्पती सृष्टिवर व प्राणिसृष्टिवर सत्‌विचारांच्या प्रक्षेपणाचा, संगतीचा, मंत्रोच्चारणाचा अत्यंत चांगला परिणाम होतो, योग्य तर्‍हेने वृद्धि होते, रोगराई नाहीशी होते हे तर विज्ञानानेही सिद्ध केले आहे. अशी अनेक मनोरंजक व उद्‌बोधक उदाहरणे आपल्या नेहमी वाचनात येतात, त्यामुळे त्याचाबद्दल शंका राहात नाही.
मनुष्यांचा बाअतीतही सत्‌संगतीचा प्रभाव मोठमोठी कार्ये घडवून आणतो, आणि अशी हजारो उदाहरणे इतिहास पुराणांत तर सापडतातच. पण वर्तमानांतही असंख्य उदाहरणे मिळतात. अगदी अलिकडच्या काळांत लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सारख्या संततुल्य नरवीरांच्या प्रभावामुळे अडाणी दीन भारतीय जनतेने आपला पारतंत्र्याचा अपमानास्पद कलंक पुसला व भारताला आत्मगौरवाचे अभिमानास्पद स्वातंत्र्य प्राप्त करून दिले. सुख समृद्धीचा व ज्ञानप्राप्तीचा मार्ग खुला झाला हा निःसंशय संतसंगतीचा प्रभावच नाही कां ?
संत संगतीचा हा लाभ संतांच्या प्रत्यक्ष सहवासाने होतोच पण तो प्राप्त होणे नेहमीच शक्य होत नाही. संतांच्या जीवन चारित्र्याचे, त्यांनी निर्माण केलेल्या ग्रंथ संपदेचे, त्यांच्या कार्याचे परिशीलन करून त्याचे अनुसरण करणे प्रत्यक्ष सहवासा‍इतकेच प्रभावी असते व म्हणूनच लाभदायी असते.

डॉ. सौ. उषा गुणे.

18 May, 2008

श्रीज्ञानेश्वरी महिमा - २

श्रीज्ञानेश्वरी महिमा - २

श्रीज्ञानदेवांसारखे वैष्णव नेहमीच अतिशय विनयाने पण तेवढ्याच आत्मविश्वासाने, श्रवणातून ब्रह्मरसाचा आस्वाद कसा घ्यावा याचा परिचय करून देत असताना श्रोत्यांचा अनुनय करतात. "वक्ता तो वक्ता नव्हे । श्रोतेनविण ॥" यात वक्त्याचे समाधान आणि श्रोत्यांचे अवधान सतत उत्सुक आणि उत्साहपूर्ण आहे. संवादातील वातावरण सदैव ताजेतवाने आहे. तोंड भरून विचारावे असे अर्जुनासारख्या श्रोत्याला वाटते आणि कान ओसांडून वाहतील इतके बोलावे असे भगवान श्रीकृष्णाला वाटते; आणि वक्ता व श्रोता यांच्या परस्परामधील प्रेमामुळे, भक्तिमुळे कधी कधी विषयांतराचा, पुनरुक्तिचा तसाच पाल्हाळाचा भागही रुचीने बोलला - ऐकला जातो.
"चातकाचिये कणवे । मेघु पाणियेंसी धावें । तेथ चराचर आघवें । निवालें जेवि ॥" अशी वाचकांचीही अवस्था होते. स्वतः आत्मतृप्तीने निवून श्रीगुरु थांबलेले नाहीत तर त्यांनी वाचकांनाही स्वानंदसाम्राज्याच चक्रवर्तीत्व बहाल केलं आहे. "मने काये वाचा । जो सेवकु होईल इयेचा । तो स्वानंद साम्राज्याचा । चक्रवर्ती करी ॥"
हे चराचर विश्व म्हणजे मूर्त-अमूर्ताची सुंदर, सुरेख, नयनरम्य, लोभसवाणी क्रीडाच आहे. कधी अमूर्त प्रकट होते, तर कधी मूर्त अनंतात लपून राहते. एकदा का आपल्याला मूर्तामूर्ताच्या या खेळाची गोडी लागली, की मग ज्ञानेश्वरीच्याच काय पण साऱ्याच संतसाहित्यातील कोडी अलगद, हळूवारपणे आपोआप उलगडू लागतात, मग अरुपाचे रूप दिसते, रुपातील अरूपता जाणवते, आणि त्याचबरोबर रुपारुपांतील द्वैतही, भेदपण मावळून जातो.
श्रीज्ञानेश्वरीच्या सर्वांगी हा खेळ कसा छान रंगला आहे. अगदी पहिल्याच ओवीत वेदप्रतिपाद्य आद्यतत्त्व आणि स्वसंवेद्य आत्मरूप यांचे आपल्याला चर्मुचक्षूंनी न दिसणारे पण तत्त्वतः असणारे ऐक्य श्रीगुरुंनी अतिशय चपखलपणे दाखवले आहे, आणि पाठोपाठ लगेचच या आत्मस्वरूपालाच "देवा तूंचि गणेशु" म्हणून सावयव, सगुण साकार केलं आहे.
आपल्या डोळ्यांसमोर अशी आपल्या परिचयाची गणेशमूर्ती पुढ्यांत दिसते न दिसते तोंच तिला वाङ्‍मय गणेशाचे रूप उभे केले आहे. श्रीज्ञानराजांच्या वाङ्‍मयीन आणि आध्यात्मिक रुपकांनी गणेशाचे रुपडे स्पष्ट होते. अठरा पुराणांची मणिभूषणे, षड्दर्शनांच्या भुजा, तर्कशास्त्राचा परशू, वेदांचा रसाळ मोदक असा गणराज साकार होतो. सगळे शब्दब्रह्मच मंगलमूर्तीस्वरूप होऊन जाते.
मूर्तास अमूर्त आणि अमूर्तास मूर्त करण्याची किमया हा श्रीज्ञानराजांच्या प्रतिभेचा, ऋतंभरा प्रज्ञेचा सहज विलास आहे. या सगळ्यामध्ये एकाच वेळी रुपाचे अरुप आणि अरुपाचे रूप होऊन जाते. श्रीज्ञानाईस यांत सगुण-निर्गुणाचे मूलभूत असलेले ऐक्यच अभिप्रेत आहे. या अभेद - अद्वैत सिद्धांताच्या बैठकीमुळे येथील भाषा सीमीत असलेली दिसली तरी अर्थाच्या अंगाने विस्तारतच जाणारी आहे. अशा वेळी श्रीज्ञानोबारायांच्या शब्दातील आशय पकडतांना, अर्थाला मनाची मिठी घालतांना जरी दमायला झाल्यासारखे वाटले तरी या दमण्यातही पूर्ण विसावा आहे. या विसाव्यातच आनंद आहे. समाधिसुख आहे.
अनंत अरूप संकल्पना श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या मनःचक्षूसमोर शब्दरूप घेत असतात आणि त्याचवेळी, प्रत्यक्षांतील रूपसंपन्न आकारांतील व्यापक अरुप चैतन्यतत्त्वही श्रीज्ञानोबारायांच्या अंतःचक्षूंना दिसत असते, आणि ही सगळीच रूपे त्यांनी शब्दबद्ध केली आहेत.
अरुपाला रूप आले, निराकार साकार झाले, निर्गुण सगुण झाले की त्याला नटवण्या सजवण्याची हौस ही भक्त भगवंताच्या - महाभागवतांच्या मनी जागी होत असते. म्हणून तर हा अक्षरांचा खेळ, अनुभवांतून - स्वानुभवांतून सतत कागदावर उतरत असतो.

अण्णा -

09 May, 2008

श्रीज्ञानेश्वरी महिमा

श्रीज्ञानेश्वरी महिमा
ज्ञानराजांच काव्य आत्मीय, आणि तसंच रसाळ व आस्वादक आहे. त्यांच सगळंच साहित्य त्या वलयात रमून जाण्यासारखं तर आहेच पण त्याचबोरबर गुंतून गुंग होण्यासारखं आहे. याच्या प्रभावामुळे, भक्तिभावामुळे कोठेतरी त्या माऊलीच्या परिवारातच जीव वावरत राहतो.
सगळ्याच संतमंडळाच्या आचार विचार उच्चारांनी आपण भारले जातो. त्यातून एक सूक्ष्म विचार-निवड, सत्य व अनृत वेगळं करण्याची दृष्टी प्राप्त होते. मग अभ्यास नकोसा होतो, आणि अधिष्ठानावरची नजर हालत नाही.
या संतसाहित्यात परब्रह्मस्वरूप अभिव्यक्त होत असले तरी त्याचे दर्शन सहजासहजी होत नाही. शब्द परिचय झाला, पाठ झाले, तरी त्यातला अर्थ आशय गळी उतरतोच असे नाही. संतांचे विचार आत्मारामाच्या अनुभवावर आधारलेले असतात. आपले श्रीतुकोबाराय म्हणतात, "अनुभवे आले अंगा । ते या जगा देतसे ॥"
आपल्याला शब्दार्थ कळला एकवेळ, तरी अनुभव नसतो म्हणून असे घडते. संतांचा अनुभव उत्कट तर असतोच आणि त्याबरोबरच प्रकट होण्यासाठी तो आतुरही असतो. अशी दिव्य भव्य उत्कटता आणि आतुरता, श्रीज्ञानराजांच्या सगळ्याच ग्रंथात विपुल आढळते. त्यामुळे त्यांच्या विभूतीमत्त्वाचा शोध घेतांना आपण मुग्ध होतो, स्तब्ध होतो.
श्रीगुरु माऊलीचे विभूतीमत्व असामान्य आहे, लोकोत्तर आहे, अद्वितीय आहे. त्याचबरोबर ते बहुकक्ष आहे. या चराचर विश्वातील एकही असा विषय नाही कीं तो ज्ञानोबारायांच्या ग्रंथात आला नाही. किंबहुना सगळ्याच संदर्भांना ज्ञानराजांच्या वाङ्‍मयीन स्पर्शाने अभूतपूर्व प्रतिष्ठा लाभली आहे.
आत्मनिष्ठा, अध्यात्म हा त्यांच्या रचनेचा, तसाच त्यांच्या विभूतीमत्वाचा गाभाच आहे. त्यातूनचे त्यांच्या विभूतीमत्वाचे अनेकानेक पैलू आकारास आले आहेत. हे सगळे पैलू जरी भिन्न भिन्न असले तरी एकात्म आहेत. त्यांची दृष्टीच चिन्मयी आहे. याच अलौकिकामुळे ते गगनालाही गवसणी घालतात. त्यांच्या अफाट कैवल्य स्वरूपाचा वेध घेण्यास जमिनीवरच उभ्या असलेल्या सामान्य माणसाचा अवाका अतिशय थिटा पडतो. तरीपण श्रीज्ञानदेवांच्याच "गीता जाणा रे वाङ्‍मयी । श्रीमूर्ति प्रभूची ॥" या वचनाने बोट धरून - "ज्ञानेश्वरी जाणा हे वाङ्‍मयी । श्रीमूर्ति ज्ञानदेवांची ॥" असं म्हणता येतं. नुसत म्हणणे नाही तर ते अक्षरशः अगदी खरेच आहे. श्रीज्ञानेश्वरी आणि श्रीज्ञानेश्वर महाराज दोन नाहीत, तर या अक्षर रूपांनी खुद्द श्रीज्ञानोबारायच आहेत.
श्रीगुरु ज्ञानदेवांनी आपल्या सगळ्याच ओव्या - अभंगांतुन आत्मस्वरूपापासून परमात्म स्वरूपापर्यंत सगळीच "रूपें" रेखाटली आहेत. ही सगळी रूपे अरुपाची आहेत, अक्षराच्या पलिकडे असणार्‍या उत्तम पुरुषाची आहेत. शब्दांत न गवसणारे "अरूप" माऊलीच्या अभिव्यक्ति सामर्थ्यामुळे शब्दरूपाने स-रूप झाले आहे; साकारले आहे.
या सगळ्या साहित्याचा उद्देश केवळ कला म्हणून नाही, तर विवेकाची वाण फिटावी, आणि ब्रह्मविद्येचा सुकाळ व्हावा हाच आहे. पण आत्मविद्या हा एक असा मौजेचा विषय आहे कीं तो मौनात दडत नाही आणि बोलांत सांपडत नाही. भक्ति-प्रेमभावाला हेच परिणाम अगदी तंतोतंत लागू पडते. तुकोबाराय म्हणतात - "प्रेम नये सांगता, बोलता दाविता । अनुभवे चित्ता चित जाणे ॥"
आपल्या श्रीगुरु ज्ञानमाऊलीची तर प्रतिज्ञाच अशी आहे की "ऐंद्रिय जाणिवांच्या पलिकडचे आत्मस्वरूप शब्दांत मांडावयाचे, तेही इतक्या गोड शब्दांत कीं, ज्ञानेंद्रियांत गोड भांडण लागेल आणि अमृताच्यापण तोंडाला पाणी सुटेल". म्हणून श्रीज्ञानेश्वरी म्हणजे तर शब्दांचे वस्त्रालंकार धारण केलेली प्रत्यक्ष परब्रह्म मूर्तीच. हे शब्दांचे वस्त्रालंकार परमात्म्यास नुसते सजवत नाहीत, तसेच झाकत तर नाहीतच, पण त्याला, म्हणजे परब्रह्माला, इंद्रियग्राह्य करतात. अशा ग्रंथाची साथ संगत कायम राखावी.

अण्णा -

06 May, 2008

प्रेमाची ऐसी जाती - लाभाविण प्रीति -

प्रेमाची ऐसी जाती - लाभाविण प्रीति -

आज गुढीपाडवा - सर्व वाचकांना, त्यांचे कुटुंबिय व आप्तजणांना हे नववर्ष सुख, समृद्धि आणि अखंड नामाने युक्त असे जावो ही परमेश्वराकडे आणि श्रीमहाराजांकडे प्रार्थना -
सद्‍गुरूंनी सांगितले, ' तुम्ही फक्त नाम घ्या, आणखी काही करू नका. ' आपल्यापैकी बरेचजण त्यातील गर्भितार्थाकडे लक्ष न देता केवळ शब्दच - शब्दार्थच पाहतात असे बरेच वेळेस जाणवते. मला वाटते यामागचे थोडे शास्त्र पाहणे वावगे होणार नाही. नामाबद्दल भगवद्‍गीतेचा १७.२३ श्लोक सांगतो - ॐतत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः - परब्रह्माचा ॐ तत्‌ सत्‌ अशा तीन प्रकारे नाम निर्देश केला आहे. ह्याचा अर्थ नामरूपरहित परमात्म्याला प्रथम केव्हांतरी नाम दिले गेले असे नव्हे तर परमेश्वराचा व नामरूपाचा संबंध अनादि आहे एवढेच. यावरच्या श्रीज्ञानदेवकृत दोन-तीन ओव्या पाहिल्यास भाव जास्त स्पष्ट होईल.
उपजलिया बाळकासी । नांव नाहीं तयापासीं ।
ठेविलेनि नांवेंसी । ओ देत उठी ॥ ३३० ॥
कष्टले संसारशिणे । जे देवों येती गार्‍हाणे ।
तया ओ दे नांवे जेणें । तो संकेतु हा ॥ ३३१ ॥
हे असो प्रजापती । शक्ति जे सृष्टी करिती ।
ते जया एका आवृत्ती । नामाचिये ॥ ३३५ ॥
जन्मास आलेल्या बालकास प्रथम नाम नसते, पण ठेवलेल्या नांवाने हांक मारली की हे आपले नांव आहे असे समजून ते 'ओ' देते. संसारात शिणलेले जीव आपल्या दुःख निवारणार्थ जेव्हां परमेश्वराचा धावा करतात, तेव्हां ज्या नांवाने हांक मारली असता मी धावून येतो ते ॐ हे संकेत रूप नाम हेच होय. प्रजापतीच्या ठिकाणी सृष्टी निर्माण करण्याची जी शक्ति आहे ती त्या एका नामाच्या आवर्तनामुळेच आली आहे. ह्यावरून काय दिसते ? नाम व रूपरहित निर्गुण परमात्म्यास सतत स्मृतीत ठेवणे कठीण म्हणून त्याला (जीवाने) नाम व रूप दिले, जेणेंकरून त्या (नामाच्या) योगे परमात्म्याशी अनुसंधानाने जडणे सोपे होते. ब्रह्मदेवाने (हाही एक श्रेष्ठ जीवच) जेव्हां 'नामाचिये आवृत्ति' केली तेव्हां त्याच्यासमोर कोणते रूप असेल ते असेल पण त्या नामाने त्याला थोर मात्र केले. अर्थात्‌ नामाबरोबर रूपाचीही आवश्यकता आहे. आणखी महत्त्वाचे म्हणजे नाम व रूप असलेले जे काही मूर्त स्वरूप असेल त्याच्या महतीची देखील थोडीफार तरी कल्पना असणे आवश्यक आहे. कोणी abrakadabra म्हणून जप केला तर त्याला काहीच साध्य होणार नाही हे सर्वविदितच आहे. अशा मूर्त रूपाची भक्ति करणे, प्रेम करणे शक्य होते. ह्यासाठी अमूर्त ॐ ऐवजी मूर्त देवाचे नाम घेणे सोपे. बरे इतक्या देवांमध्ये रामच कां ? कारण परमेश्वराच्या अनेकअवताररूपांत 'राम' ह्या नामाने निर्देशित रूप अत्यंत आदर्श असे आहे. रामायणाची सुरुवातच पाहिली तर दिसेल की जेव्हां श्रीनारदांना श्रीवाल्मीकि मुनिंनी विचारले की, " या जगात गुणी, वीर्यवान, धर्माचे रहस्य जाणणारा, कृतज्ञ, सत्यवचनी, प्रतिज्ञापालक, सद्वर्तनी, सर्वहितैषी, विद्वान, शक्तिमान, सुंदर, विवेकी, संयमी, तेजस्वी, अनिंदक (केवढी गुणांची यादी ही - ही माझी नव्हे, रामायणात आहे सर्ग १ श्लोक २ ते ४) ह्या सर्व गुणांनी युक्त कोण आहे ?" सर्वज्ञ अशा श्रीनारदांनाच जर ह्याशिवाय दुसरे रूप आदर्श माहीत नाही तर दुसरी आदर्श व्यक्ति असणे शक्यच नाही - मग श्रीराम ही सर्वांत आदर्श मूर्ति ठरणे हेओघाने आलेच. श्रीरामरूप भगवंताचे नाम घेणे - नामाची आवृत्ति करणे - नामस्मरण करणे म्हणजे दिव्यशक्तियुक्त देवाच्या प्रतिकाचे सतत स्मरण - अनुसंधान करणे. गुरुदेव रानडे म्हणतात - Name is a symbol of God, carrying spiritual divine power, and therefore Namasmarana is the process of constant identification with the Infinite - नामस्मरण म्हणजे देवाशी एकरूप होण्याची प्रक्रिया.
आता जरा श्रींचे आजचेच (६ एप्रिल) प्रवचन पाहू. फक्त पहिली ओळच पहा. 'व्यवहारात ज्याला चांगले वागता येत नाही, त्याला नाही परमार्थ करता येणार.' 'चांगले वागणे' म्हणजे आदर्श डोळ्यासमोर आलाच. मी माझा लोभ, माझा राग, माझी विषयासक्ति हे सर्व कायम ठेवून "नाम घेत राहिल्याने आपोआप नाहिसे होतील" असे म्हणत त्यांच्या निवृत्तिबद्दल विचारही न करणे अशाने व्यवहारात चांगले वागणे जमू शकेल का ? पुढे म्हणतात - 'भगवंतापरते कोणी नाही हे कळले म्हणजे मी कोण हे कळते.' हा संक्षिप्त उपदेश झाला. त्यावर चिंतन करा असे पुढे सांगावयाची आवश्यकता नाही. भगवंत म्हणजे सत्‌ चित्‌ आनंद - मी माझा लोभ, माझा राग, माझी आसक्ति कायम ठेऊन निरंतर समाधान, अबाधित आनंद स्थितीच्या प्राप्तीची कल्पनाही करू शकत नाही. समाधानात, आनंदात राहता आले तर भगवंत म्हणजे काय हेही कळते आणि एममेवाद्वितीयं असा भगवंत समजला, समत्व दृष्टी लाभली की 'मी' असा वेगळा राहातच नाही. श्रीरामाप्रमाणेच सद्‌गुरूंचे गुण सतत स्मरणात ठेवणे आणि ते आचरणात आणण्याचा प्रयत्‍न करणे हेही गरजेचे आहे. आधी एकच गुण पाहू - दुसर्‍यांच्या दोषांकडे दुर्लक्ष करून, दुसर्‍यावर लाभाविण प्रीति करणे. जो कोण संपर्कात येईल त्यावर श्रीमहाराजांनी निर्भेळ प्रेमाचा वर्षाव केल्याशिवाय का भक्तगण त्यांची एवढी भक्ति करायचे ? माझ्यापुरते म्हणायचे तर मी म्हणेन हा एकच गुण जरी अंमलात आणता आला तरी माझ्या ह्या जन्माचे सार्थक झाले, बाकीचे पुढच्या जन्मी बघू. 'नाम घ्या' हा श्रींचा core संदेश झाला. सर्वांगिण उपदेश लक्षात घ्यायचे म्हटले तर - नम्र व्हावे सर्वां भूता, परनारी राहो माता, आल्या अतिथा अन्न द्यावे. . . नामात मुरले पाहिजेच - पण त्याला नीतिची, सदाचरणाची, कर्तव्याची जोड देणे नितांत आवश्यक आहे हेही सांगितले. आणखी काही करू नका म्हणजे आपल्याला जे झेपणार नाहीत अशा इतर फंदात(उपासतापास, योग, ध्यानधारणा इ. साधने यांत) पडूं नका एवढाच त्याचा अर्थ.
एकोहम् -