27 December, 2008

मानसमणिमाला (१७)

मानसमणिमाला (१७)

:

हिंदी : लखि सुबेष जग बंचक जेऊ । बेष प्रताप पूजिअहिं तेऊ ॥ बा. कं १.६.५

उघरहिं अंत न होइ निबाहू । कालनेमि जिमि रावण राहू ॥ ६ ॥

किएहु कुबेष साधु सनमानू । जिमि जग जामवंत हनुमानू ॥ ७ ॥

मराटी : बघुनि सुवेषहि जग-वंचक जे । वेष बलें पुजिले हि जाति ते ॥ प्रज्ञा - बा. कां. १.६.५

बेंड फुटे अंति न निर्वाहू । कालनेमि रावण इव राहू ॥ ६ ॥

सन्मानहि कृत-कुवेष संतां । जगिं सम जांबवंता हनुमंता ॥ ७ ॥

अर्तः : जगाला फसविणारे जे लबाड लोक केवळ साधुवेष अगर उत्तम पोषाख (सुवेष) धारण करतात ते त्यांच्या बाह्यवेषाच्या प्रभावाने पूजिले जातात. परंतु त्यांची लबाडी, दंभ उघड होणारच. शेवटपर्यंत त्याचा उपयोग (निर्वाह) कधीच होत नाही. कालनेमि राक्षस, रावण किंवा राहू यांची लबाडी तात्काळ उघड झाली. साधूंचे मोठेपण बाह्य वेषावर अवलंबून नसते, त्यामुळे त्यांचा सामान्य पोषाख असला तरी त्यांना मान दिला जातोच. जांबवंत हनुमान यांची उदाहरणे स्पष्टच आहेत.

जगामध्ये चांगले वाईट, सज्जनपणा-दुर्जनता, श्रेष्ठ-कनिष्ठ यांची निवड करण्याचे माणसांचे ठोकताळे अगदी वरवरचे असतात. खरा नीरक्षिरविवेक फारच थोड्या जणांना करतां येतो. केवळ बाह्यांगावरून माणसे आपली मते तयार करतात व याचाच लबाड, संधिसाधू माणसे फायदा करून घेतात. 'दिसते तसे नसते म्हणूनच जग फसते.' टापटीपीचा पांढरा शुभ्र पोषाख अथव भगवी वस्त्रे बघूनच माणसे आपली मते ठरवितात व त्या व्यक्तींना वंदन करण्यास धावतात. इतका जबरदस्त प्रभाव बाह्यांगाचा आणि पूर्वग्रहांचा आपल्या मनावर असतो आणि तो तात्कालिक नसतो तर बराच काळ टिकतो. तोपर्यंत लबाड स्वार्थी माणसे पद्धतशीरपणे आपले काम साधून घेतात. पण केव्हां ना केव्हां तरी ही लबाडी उघडकीस येतेच, व त्याची भरपाईही त्या लबाडांना करावी लागते. याची उदाहरणे आपल्याला पुराणांतून जशी मिळतात तशी रोजच्या व्यवहारांतही पदोपदी दिसतात. म्हणून माणसाने नेहमी सावध, दक्ष असले पाहिजे असे समर्थही सांगतात.

संतसज्जनांचे लक्ष सतत अंतरंगाकडे लागलेले असते त्यामुळे वेषभूषेला त्यांचे दृष्टीनें फारसे महत्त्व नसते. त्यांची राहणी साधारणतः साधीच असते त्यामुळे त्यांच्या मोठेपणाची कल्पना एकदम येत नाही. 'वेष असावा बावळा । परि अंतरी नाना कळा' अशीच स्थिती असते. श्रीगोंदवलेकर महाराज, श्रीगाडगेमहाराज अगर श्रीसाईबाबा यांची उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आहेतच. परंतु त्यांचे मोठेपण बाह्य परिस्थिती निरपेक्ष असल्याने झाकून राहाणारच नाही. त्यामुळेंच ते युगानुयुगे लोकवंदनास पात्र होतात.

डॉ. सौ. उषा गुणे.

25 December, 2008

जडातून सूक्ष्माकडे

जडातून सूक्ष्माकडे

:

भगवंताचा साक्षात्कार नित्यनवा आहे, First hand आहे, second hand नव्हे. सर्व सामान्यतः सेकंड हँड देवच लोकांना माहीत आहे, असतो. दुसर्‍यांच्या अनुभवावरून आपण देवाची कल्पना करत असतो. 'उपनिषदांत असे सांगितले आहे", "गीतेत तसे सांगितले आहे" हेच सर्वसामान्यपणे बोलतात, बोलले जाते. अर्जुनाने विश्वरूपाचे वर्णन केले. आपण अनुभवलेल्या विश्वरूपाचे त्याने वर्ण न केले. त्याला आलेला अनुभव हा सर्वतोपरी first hand, नित्यनवा होता. यशोदेला आलेला विश्वरूपाचा अनुभवपण नित्यनवाच होता. आपला देवाचा नित्यनवा अनुभव सर्व संतांनी लिहून ठेवला. त्यांचे नुसते लिखाण वाचल्याने, त्यांच्या केवळ शब्दार्थाने आपल्याला जो आनंद होतो तो जर अमर्याद, अलौकिक, अगदी आगळा वेगळा असतो, तर प्रत्यक्ष भगवंताचा अनुभव किती श्रेष्ठ नाही का ?


देवच देवाला पाहू शकतो. आत्मारामालाच आत्मारामाचे दर्शन होते. जनक राजाच्या दरबारांत पंडितांची चर्चा चालू होती. त्य चर्चेत याज्ञवल्यांनी तेथे जमलेल्या सर्वच्या सर्व पंडितांना हरवले. शेवडी जनक राजाशी त्यांचा वाद सुरूं झाला. "कुंभारांनी केलेल्या मडक्याला कुंभाराचे ज्ञान होते कां ?" असा प्रश्न जनकांनी विचारला. प्रश्न अति महत्त्वाचा आहे. जो परमार्थप्रेमी आहे, परमार्थ पाहण्याची ज्यांना तीव्र तळमळ आहे, त्यांच्यापुढे हा प्रश्न आलाच पाहिजे. "होय, कुंभाराला जाणण्याची शक्ति घटाला आहे. [कुंभार म्हणजे परमात्मा, घट म्हणजे जीव] या आपल्या देहांतच असणार्‍या आत्म्यालाच परमात्मा जाणण्याची शक्ति, युक्ति, बुद्धि आहे. "ती किमया आत्मस्वरूपाशिवाय इतर कोणालाच नाही" असे याज्ञवल्क्यांनी जनकराजास मोठे छान, खरे खरे अचूक उत्तर दिले.


आत्मारामाच्या या क्रियेला dichotomy हा शब्द तत्त्ववेत्यांनी वापरला आहे (म्हणजे एकाचे दोन होणे). एकाचे असे दोन होण्याचे सामर्थ्य फक्त आत्मारामातच आहे. आता एकाचे दोन होतात म्हणजे "आत्मा निम्मा निम्मा झाला" असे वाटण्याचीच शक्यता जास्त नाही कां ? पण ते तसे नव्हे. dichotomy म्हणजे पाहणा व दिसणारा दोघें एकच एक असतात. म्हणूनच स्वप्नांतूनपण अद्वैताचा अनुभव येतो. एकाचे दोन होणे, म्हणजे आरशांत आपण आपल्याला पाहिल्यासारखे नव्हे. आरशातील प्रतिबिंब विकृत असते (उजव्याचे डावे तर डाव्याचे उजवे). जशाचे तसे दिसण्याचे सामर्थ्य फक्त एका आत्मारामातच आहे. हे स्व-स्वरूपाचे ज्ञान कुणाला होते ? आत्म्याचा अनुभव केवळ आत्मारामालाच.


हा आत्मसाक्षात्कार मग कोणाला ? देहाला की आत्मदेवाला ? "मी देव पाहिला" आपण सहज बोलून जातो. त्यांनी देव पाहिला, असेही आपण सहज बोलून जातो.


हा देह जड आहे, तर आत्मा अत्यंत सूक्ष्म आहे. किती सूक्ष्म आहे ? बरं शब्दांनी सांगायच झालं तर एका खसखशीच्या दाण्याचे १००० भाग करावेत व त्यातील १/१००० श भागाची विभागणी पुनः १००० भागांत करावी (त्याला 'रेणू' म्हणतात). आत्मा त्यापेक्षांही सूक्ष्मातिसूक्ष्म आहे. अशा सूक्ष्मतम आत्मारामाचे ज्ञान या जड देहाला कसे होणार ? जडाला सूक्ष्माचे ज्ञान होणे कधीच शक्य नाही. जडाने जडाला जड माध्यमांतूनच जडाचेच ज्ञान होते. सूक्ष्म कळणार नाही.


पण या जड देहात एक चैतन्य आहे,. एक शक्ति आहे, एक आनंद आहे. त्याला मग तुम्ही काहीही नाव द्या. याला आत्मा असं शास्त्रकार म्हणतात. सारांश काय तर जड इंद्रियांना देव कळत नाही. मग मनाला कळतो कां ? तर मनाचा डोळा पण देव पाहू शकत नाही. मन पण जडच आहे; तर आत्मचक्षूच आत्मारामाला, देवाला जाणूं शकतात, पाहू शकतात.


बुद्धीला देवाचं ज्ञान होऊं शकतं का ? बुद्धिला गुरुदेव 'lower intellect' खालच्या पातळीची बुद्धि अस म्हणत असत. या बुद्धीला फक्त देवाचे अस्तित्व कळते. तेवढाच या बुद्धीचा उपयोग. म्हणून आपल्या बुद्धीने देवाच्या महामंदिराच्या दरवाजापर्यंत जाता येते. म्हणून मनाने बुद्धीने कळणार नाही, वाचेने सांगता येणार नाही.


मग इंद्रियांना दिसत नाही, बुद्धीला कळत नाही, मनाला कल्पना/ आकलन करता येत नाही, असा हा देव आहे तरी कशावरून ? देव हे काय गौडबंगाल, किमया, जादू आहे ? तर देवाचा साक्षात्कार हे 'intuitive apprehension' आहे. ते प्रतिभ दर्शन आहे, इंद्रियजन्य, बुद्धिगम्य अगर मानसिक नाही, तर प्रज्ञा दर्शन आहे. याला लागणारी प्रज्ञा म्हणजे प्रतिभ शक्ति. त्याला आत्मदृष्टि, आत्मशक्ति असे पण म्हणताता. गुरुदेव त्यालाच intuition असं म्हणत.


मग नामाचा काय उपयोग ? नामाने काय होते ? तर नामाने देवाला जाणण्याची ही आपल्यतीलच गुप्त, निद्रित असणारी शक्ति नामस्मरणाने जागृत होते. याच शक्तिला योगशास्त्रांत कुंडलिनी म्हणतात. भक्तिशास्त्रांत प्रेमभाव म्हणतात, तर माधुर्यभावांत याच शक्तीला राधा असें म्हणतात.


अण्णा -

19 December, 2008

मानसमणिमाला (१६)

मानसमणिमाला (१६)
:

हिंदी : अस बिबेक जब देई विधाता । सब तजि दोष गुनहि मनुराता ॥ १ ॥
काल सुभाउ करम बरि आई । भलेऊ प्रकृति बस चुकई भलाई ॥ २ ॥
सो सुआरि हरि जन जिमि लेहीं । दलि दुख दोस विमल जसु देहीं ॥ बा. कां. १.६.३
मराठी : देई विधाता विवेक हा जै । गुणिंहि रमे मन त्यजि दोषांतै ॥
काल कर्म नी स्वभाव दडपणीं । भले प्रकृतिवश चुकति भलेपणिं ॥
ती घे हरिजन चूक सुधारुनी । देई सुयश दुख दोष निवारुनी ॥ १.६.१,२,३,॥ (प्रज्ञानंद)
अर्थ : हा नीराक्षिर विवेक विधाता जेव्हां देतो तेव्हां दोषांस सोडून मन गुणातच रमते ॥ १ ॥ क्वचित्‌ प्रसंगी काल, कर्म, स्वभाव यांच्या दडपणाने प्रकृतिवश होऊन भल्या माणसाकडूनही चुका होतात. ॥ २ ॥ ती सेवकाची चूक भगवान सुधारुन घेतात, व दुःखकारक दोषांचा नाश करून विमल यश देतात. ॥ ३ ॥

संपूर्ण सृष्टी परमेश्वराने जड चैतन्य युक्त तसेच गुणदोषयुक्त अशीच निर्मिलेली आहे. त्यातील सद्‌गुणांचा स्वीकार करणे, उपयोग करून घेणे व दुर्गुणांचा त्याग करणे, असा विवेक माणसाला करता येतो. तो सर्व व्यवहारात लागू करायला हवा. त्याकरितां आपली जीवनदृष्टि बदलायला हवी. देवाने आपल्या करताच जणू दुःख, अडचणी, विकृति निर्माण केल्या आहेत असे समजून खूप माणसे चिंतातूर झालेली असतात व परमेश्वराला सतत जाब विचारत असतात. जगातल्या सर्व घडामोडी काल, कर्म व स्वभावानुसार होत असतात. माणसाने त्याबद्दल परमेश्वराला, विशिष्ट व्यक्तीला, तिच्याच कर्माला अगर परिस्थितीला संपूर्ण जबाबदार धरता कामा नये. त्यामध्ये कांही गोष्टी आपल्या अनुकूल असतील, कांही नसतील. कांही इतरांना अनुकूल वा प्रतिकूल असतील व त्याही कालाच्या गतीनुसार बदलत राहात असतात. त्यामुळे शांतपणे, समदृष्टिने त्याचे, त्यातील योग्यायोग्यतेचा स्वीकार करून आपले कार्य करीत राहिले पाहिजे. चुका अगर दोष इतरांप्रमाणेच आपल्यांतही असतात याचेही भान सतत राहिले पाहिजे. संपूर्ण निर्दोष, सर्वगुणसंपन्न किंवा सर्वदोष युक्त असे कुणीच नसते. काल, कर्माच्या प्रभावाने चांगल्या व्यक्तींच्या हातूनही चुका घडण्याची शक्यता असते. परंतु भली माणसे आपल्या चुकांचे समर्थन करीत नाहीत. आपल्या हातून 'हिमालया एवढ्या चुका झाल्या' असे मोकळेपणाने कबूल करून महात्मा गांधींनी समाजाची, देशाची व परमेश्वराची क्षमा मागितली आहे ! अर्थातच अशा 'हरिजनां'च्या चुका सुधारण्याची मोठी जबाबदारी परमेश्वरावर, त्या हरिवर येऊन पडते. ती जबाबदारी परमेश्वर अत्यंत आनंदाने स्वीकारतो, एवढेच नाही तर त्यातील दुःख, दोष नाहीसे करून अत्यंत विमल, दिव्य यश प्रदान करतो !

डॉ. सौ. उषा गुणे.

18 December, 2008

उद्धरेत्‌ आत्मनात्मानं

उद्धरेत्‌ आत्मनात्मानं


देवकार्य, धर्मकार्य वा समाजकार्य यात "मम" म्हणणर्‍यांचा वाटा मोठा असतो, पण "मम"च्या जागी "इदं न मम" अशा भूमिकेवर येणं हे फार मोठं सौभाग्य, महत्‌भाग्य. श्रीगुरुज्ञानोबारायांनी dichotomisingचा, अध्यात्मातील अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत अनुभवांतून, आपल्या साहित्यांत जागोजागी मांडला आहे. म्हणजे एक आत्मारामच स्वतः आपल्याला आपल्यातच विभागून आपल्यालाच पाहतो, अनुभवतो, भक्तिप्रेमाचा आनंद अनुभवतो. आता माया धरून बसलेला आत्माच बाहेर येऊन परमात्मस्वरूपाने नटतो, दर्शन देतो. असा हा आत्मा - भगवंतच. मग रूप, रस, गंध, नाद, स्पर्श (पण अगदी अतिंद्रिय) अनुभवाने साधकासमोर आविष्कृत होतो. देह, मन व बुद्धि सुद्धा जड असल्याने त्यांना आत्मदर्शनाची शक्ति नाही तर हे दर्शन होण्यासाठी प्रज्ञा लागते. तो प्रज्ञेचा अधिकार, सन्मान आहे.

अशी प्रज्ञा परिणत होण्यासाठी साक्षात्कारी संतांच्याकडून नाममंत्राची, सबीजनामाची, बीजाक्षराच्या अनुग्रहाची मोठीच आवश्यकता असते. असा अनुग्रह लाभला, साधकाने, सत्‌शिष्याने सबीजनामाचा स्वीकार केला, एवढ्याने संपत नाही तर सुरुवात होते. श्रीसद्‌गुरुवचनावर अविचल श्रद्धा ठेवावी. नेमाने निष्ठापूर्वक पालन, संकल्प-विकल्प, एवढच काय, ध्यानविरहित होण्यासाठी सतत स्वतःचे स्वतःच आत्मनिरीक्षण व आत्मपरीक्षण करीत राहिले पाहिजे. श्रीमद्‌भगवद्‌गीता हेंच सांगते - "उद्धरेत्‌ आत्मन्‌ आत्मानं" त्यासाठी कथनी, करनी व रहनी यात एकवाक्यता फार फार मोलाची. ह्या त्रयीने अवघे जीवन व्यापलं पाहिजे.

यासाठी साधकाने, संसाराकडे विश्वस्त अगर साक्षी या नात्याने पहावे, म्हणजे मग संसाराचाच परमार्थ होतो. "दुःखांत सुख पाहावे", संसार दुःखमय आहे, तो भयग्रस्त आहे, तो मुळांत खोटा नाशवंत आहे, हे मनांत दृढ धरून मग संसार करावा म्हणजे तो बाधक नाही तर साधकच होतो. लाभ-तोटा, सुख-दुःख, यश-अपयश याकडे साक्षित्वाने पाहावे व निष्ठेने परमार्थ आचरावा. त्यातलं वर्म आहे - "मी देह नव्हे तर आनंदघन आत्माराम आहे" याची सतत आठवण असावी. 'जीवभावाचा शिवभाव करावा' त्यासाठीं काय करावे लागते ? सदा नामस्मरण करावे. 'देवा बरे झाले' असे अनुभवावे, खरे खरे सुख मिळते, खरी खरी शांती लाभते.

ज्ञान म्हणजे उपनिषदे, भगवद्‌गीता, ब्रह्मसूत्र, अकारादि प्रकरणादि ग्रंथ, भाष्य, टिका, वार्तिके, दर्शने, पुराणग्रंथ, संतसाहित्य यांचे शाब्दिक ज्ञान नव्हे. या शब्दज्ञानाला मग कांहीच मूल्य नाही कां ? तर आहे. या शाब्दिक ज्ञानाने काय होईल ? तर या शब्दज्ञानावर विश्वास असल्यास भगवंताच्या केवळ अस्तित्वाची खात्री होईल. फार फार तर साक्षात्काराच्या महाद्वारापर्यंत जाता येईल. पण आत्मसाक्षात्काराच्या गाभार्‍यात प्रवेश होणार नाही. म्हणून शब्दज्ञान हे ज्ञानच नव्हे, कां तर 'ज्ञान' ही एक परमविकसित अवस्था आहे. प्रत्यक्षानुभूती आहे. भगवंत बोलण्याची गोष्ट नाही तर तो प्रज्ञेनी अनुभवायचा आहे.

जी गोष्ट ज्ञानाचे तीच भक्तीची. भक्ति निष्काम असावी. एकनिष्ठ - अव्यभिचारी असावी. ही शुद्ध भक्तीची ठळक लक्षणे आहेत. अशा शुद्ध भक्तीची परिणती आत्मसाक्षातकारांत दर्शन, स्पर्शन, संभाषणादि अनुभूतीत होते. ही आवडीप्रमाणे सगुण किंवा निर्गुण अशा दोन्ही स्वरूपांत होते. प्रेमळ भक्ताला सगुणाचे प्रेमाबरोबर निर्गुणाचे ज्ञान असतेच, पण सगुणाचे विलक्षण प्रेम असते. भक्ति स्वयंफलरूप आहे म्हणून ती ज्ञानस्वरूपही आहे.

मग आपण काय करावे ? तर नामसाधना, नामस्मरण. दीर्घकाल, निरंतर व सत्कारयुक्त करीत राहावे. याने काय साधते ? तर हळूं हळूण् जीवभावाचा क्षय होतो व कमी होत होता त्याचाच मग शिवभाव होतो. देहबुद्धीची आत्मबुद्धि होते. या नामस्मरणांत निष्ठेबरोबर आर्जवाची मोठीच गरज आहे. आई लेकराला जेवायला घालताना किती आर्जव करते, तसेच नाम घ्यावे. अशा नामस्मरणाने भगवंत खुणा दाखवत असतो. त्या खुणा आपण ओळखाव्यात. तुकोबारायांच्या शब्दांत सांगायचे तर, "ओळखा रे वस्तू उघडा ज्ञान दृष्टी". आपण डोळे उघडे ठेवावेत, तो दाखवतो त्या खुणा ओळखाव्यात, या आनंदाच्या खूणा ओळखून नाम घेत राहावे.

अण्णा -

16 December, 2008

मानसमणिमाला (१५)

:
मानसमणिमाला (१५)
:

हिंदी : जडचेतन दोषमय बिस्व कीह्न करतार ।
संतहंस गुन गहहिं पय, परिहरि बारि विकार ॥ बा. का. १.६
मराठी : जड चेतन गुणदोषमय कर्ता निर्मि जगास ।
संतहंस गुण घेति पय, त्यजुनि जला दोषास ।
अर्थ : परमेश्वराने जगाची निर्मिती केली तीच मुळात जडचेतनयुक्त आणि गुणदोषमय अशी आहे. यांचे अगदी एकजीव मिश्रण झालेले आहे. परंतु संत हे हंसासारखे (नीराक्षिर विवेकी) असल्याने गुणरूपी दुधाचा स्वीकार करतात व दोषरूपी जलाचा त्याग करतात.

विश्वनिर्मिती करताना परमात्म्यानें जड-चेतन व प्रकृतिजगत सत्त्व रज तम हे त्रिगुण यांच्या मिश्रणानेंच ती केलेली आहे. ज्यांना आपण गुण अगर दोष अशी लेबले लावतो ते या गुणमयी प्रवृत्तीचे वेगवेगळे आविष्कार, प्रगटीकरण आहे, व ते जसे आहे तसे ते संतांना स्वीकार्य आहे. त्यामुळे संत या प्रकृतीवर कधीही रुष्ट होत नाहीत तर नेहमीच त्या आविष्कारांचा सदुपयोग कसा करता येईल याचाच विचार करतात. ज्याअर्थी परमेश्वरानेंच त्या तथाकथित गुणदोषांसहित ही निर्मिती केली त्या अर्थीं त्यांचेही काही काही विशिष्ट कार्य भगवंताला अपेक्षित असणार. तो परमेश्वराचा उद्देश समजण्याकरिता समदृष्टि व उदार मन यांची आवश्यकता असते. कुणाचा व कशाचाही तिरस्कार, द्वेष अगर आसक्ति न धरतां ते ते कार्य समजून घेऊन त्याप्रमाणे व्यवहार करणे यालाच म्हणतात 'नीरक्षिरविवेक' ! संतांच्या जवळ ही सूक्ष्म दृष्टि असते त्यामुळे ते दुष्टांचा दुर्जनांचा त्याग करीत नाहीत तर त्यांचेसाठी अशी प्रार्थना करतात कीं 'खळांची व्यंकटी सांडो । विश्व स्वधर्मे सूर्ये पाहो ॥' खळांच्या खल वृत्तीचा त्याग व त्यांच्या चैतन्यमयतेचा स्वीकार.

जड चेतनांच्या मिश्रणाबद्दल तर अधिकच गूढता आहे. शास्त्र असे सांगते कीं, "पूर्ण जडामध्येही चैतन्य असतेच व त्याचे प्रमाण :- जडांत १/३२, स्थावरांत १/१६ अंश, कीटक-पतंगादिकांत १/४ अंश, पशुपक्षी, मोठ्या प्राण्यांत ३/८, मनुष्यांत १/२, देवतांमध्ये ५/८ अंश व महासिद्धवंतांमध्ये १६ पैकी १० ते १२ अंश इतके असते. १६ पैकी १२ अंशांचे पुढे फक्त अवतारांमध्येच चैतन्याचा अंश असतो. प्रभु रामचंद्र व भगवान श्रीकृष्ण हे पूर्णावतार असल्याने त्यांच्यात जडाचा अंश मुळीच नाही तर ते १६ कलांचे पूर्णावतार आहेत. म्हणून आपण प्रार्थना करायची कीं, 'अस बिबेक जब देई विधाता । सब तजि दोस, गुनहि मनुराता ॥' परमेश्वराने हा विवेक आम्हांस द्यावा, त्यामुळे दोषदृष्टी नाहीशी होऊन गुणांमध्येच मन रममाण होईल. - जय श्रीराम.

डॉ. सौ. उषा गुणे.

15 December, 2008

रसो वै सः

रसो वै सः
:
तुकोबाराय भक्ताचार्य. निर्व्याज, निरंजन, दिव्य अशी भक्ति कशी प्राप्त करावयाची ? तर भक्ति म्हणजे खरोखरी अगदी नवीन, वेगळे असे काहीच करावयाचे नाही. फक्त आपल्या अंतःकरणाचे सर्वभाव आणि विचार हे एका भगवंताकडे वळवायचे. असं सर्वभावांनी, सर्वस्वी त्याच्याशी लगटून, त्याचेच होऊन राहणे हीच मंगलभक्ति.

अशी ही भक्ति परमप्रेमस्वरूप तर आहेच, पण अमृतास्वरूपाची सुद्धा आहे. भक्ताचार्यांनी भक्तीला उद्देशून 'रूप' आणि 'स्वरूप' असे म्हटले आहे. या दोन शब्दांत काही फरक आहे ? का एकाच अर्थाचे ? सामान्य व्यवहारांत हे दोन्ही शब्द एकार्थाचे वापरले जातात; पण भक्ति हे शास्त्र आहे. 'रूप' शब्दाने वस्तूचा रंग, आकार, उंची, भारमान, काठिण्य आदि बाह्य गुणांचा बोध होतो; तर त्या वस्तूच्या अंगभूत स्थायीभावाचे 'स्वरूप' या पदाने सुस्पष्ट होत असते. साधक भक्ति साधना करू लागला की त्याच्या आचार, विचार व उपासनेचे दर्शन इतरेजनांस/सर्वांना जाणवते. पण या परम प्रेमलक्षण भक्तीची सुधा (अमृत) जो प्रत्यक्ष भक्त चाखत असतो, त्यालाच त्याची अवीट गोडी कळते; इतरेजनांना नाही. पराभक्ति हे अमृत आहे. आणि ही भक्ति साध्य करून घेतलेला भक्त हा अमृतमयच नाही तर अमृतस्वरूप होतो.

अमृत म्हणजे काय ? जे मृत, नष्ट होत नाही ते अमृत. आत्मा/परमात्मा हाच एकमेव अमृत, अविनाशी आहे. म्हणून अशी भगवंताची परमप्रेमस्वरूपा भक्ति करणारा हा परमात्मस्वरूप, अमृतस्वरूप होतो.

अमृत म्हणजे मोक्ष, आपल्या समग्र भाव भावना, विचार व क्रियाव्यवहार यांचे शुद्धीकरण, उदात्तिकरण, आणि अध्यात्मिकरण करीत करीत साधकाला अपूर्णतेतूनच परीपूर्ण परमात्म्याकडे सुखरूपपणे घेऊन जाणारी प्रभावी शक्ति म्हणजे ही निष्काम, एकप्रवाही, परमप्रेमस्वरूप, अमृता भक्ति होय.

खरं सांगायचं तर अमृत म्हणजे अनुभवगम्य आनंदरस आहे. मात्र हा केवळ भौतिक, द्रवपदार्थ, रसायन नाही. तसेच सागर मंथनातून काढलेले (देव-दैत्यांनी) अमृतपण नाही. रस हा केवळ उपमेय भाव आहे. रस म्हणजे ब्रह्मरस, तथा भगवंताच्या परमानंदाचे अनुभवगम्य रसायन. भगवंत वस्तुतः रसमय आहे. भक्ताला अमृतरसपानाचे भाग्य लाभते. मग तो सर्वथैव आनंदातच राहतो, आनंदच होतो. आणि म्हणून द्रवीभूत ब्रह्मज्ञान, ब्रह्मरस म्हणजेच दुसरे तिसरे कांही नसून परमप्रेमस्वरूप भक्तिच.

या पराभक्तिच्या अमृतपानाने मत्त होऊन हरिनाम गात भक्त विश्वसंचार करतात आणि आपला स्वानुभवच जगाला सांगतात. नुसता सांगतात एवढेच नाही तर "सेवितो हा रस, वाटितो आणिका" अशा अवघ्या विश्वाला पाजतात.

भगवंत इतका रसमय, "रसो वै सः" की त्याच्यामुळे साहित्यातील असो वा स्वयंपाकातील असो सर्व रसांना रसत्व लाभते. तो रसराज आहे. मग त्याचे रूप, त्याचे नाम, त्याच्या लीला, त्याचे चरित्र केवढे रसाळ. नाम तर अमृताहूनी गोड त्या नामातून गळणारा रस अखंड सेवन करावयाचा, अमृतपान करायचं एवढंच भक्ताच काम.

अण्णा -


14 December, 2008

मानसमणिमाला (१४)

मानसमणिमाला (१४)


हिंदी : खल अघ अगुन, साधु-गुन गाहा । उभय अपार उदधि अवगाहा ॥
तेहि तें कछु गुनदोस बरवाने । संग्रह त्याग न बिनु पहिचाने ॥ बा. कां. १.५.२
मराठी : खल अध अगुण साधुगुण वर्णन । दोन अपाय पयोधि च ठाव न ।
म्हणुन अल्प गुण दोष वानले । त्याग न संग्रह विना जाणले ॥

अर्थ : खलांच्या पापांचे, अवगुणांचे वर्णन व साधुंच्या गुणांचे वर्णन (गाथा) हे दोन्ही अपार अगाध सागरच आहेत. म्हणून मी त्यांचे थोडे थोडकेच वर्णन करीत आहे. त्याचे कारण असे की अवगुणांचा, दोषांचा त्याग किंवा सद्‌गुणांचा स्वीकार ते जाणल्याखेरीच करताच येत नाही.

या जगांत असंख्य सद्‌गुण व असंख्य दुर्गुण आहेत. जणू ते दोन महासागरच ! सर्व जग हे गुणावगुणांनीच भरलेले आहे. ईश्वरानेंच सृष्टि निर्मिती करतांना सत्त्व, रज, तम या तीन गुणांनी युक्त अशीच केलेली आहे. त्यामुळे प्रत्येक पदार्थ, वस्तू, प्राणी, मनुष्यमात्र तिन्ही गुणांनी युक्त असतात. परंतु मनुष्याला मात्र या तीनही गुणांतून निर्माण होणारे असंख्य सद्‌गुण वा दुर्गुण यांचे ज्ञान करून घेता येते. या ज्ञानाच्या सहाय्याने त्याला आपली उन्नती करता येते.

आपल्या मधील दोष, अवगुण ओळखता आले पाहिजेत, तरच त्यांचा त्याग करता येईल तसेच इतरांचे गुण ओळखता आले पाहिजेत, तर त्यांचे अनुकरण करता येईल. समर्थ म्हणतात - 'या कारणे करंट लक्षणे । ऐकोनी त्यागचि करणे । म्हणिजे कांही एक बाणे । सदेवलक्षण ॥ दास. १९.३.३
परंतु साधारणतः मनुष्य उलटेच करतो. इतरांचे सद्‌गुण न बघतां केवळ दोषदर्शन, वर्णन इतके सतत चालते कीं ते दोष स्वतः मध्येंच केव्हां येऊन रुजले ते त्याला कळतही नाही. त्यामुळे स्वतःच्या सद्‌गुणांनाही तो मुकतो. स्वतःच्या दोषांचे अलिप्तपणे मूल्यमापन करता आले पाहिजे व कठोरपणे त्याग करता आला पाहिजे. इतरांच्या दोषांचे मूल्यमापन सहृदयतेने करून त्यांचा अलिप्ततेने स्वीकार अगर अस्वीकार करता आला पाहिजे.

तसेच आपल्या सद्‌गुणांचा खूप बडेजाव न करता ते ओळखून त्यांचा सदुपयोग करता आला पाहिजे व इतरांच्या सद्‌गुणांचा मान राखता आला पाहिजे. परंतु त्याकरिता गुण - अवगुण अलिप्तपणे शोधतां आले पाहिजेत व त्यातून बोध घेऊन त्यांचा त्याग-स्वीकार केला पाहिजे. 'हिताऽहिता पशुपादी जाणती । मनूज-तनू गुणबोध खाण ती ॥ असे गोस्वामी म्हणतात ते याचकरिता.

डॉ. सौ. उषा गुणे.

13 December, 2008

वृक्ष नामबीजाचा

वृक्ष नामबीजाचा
.
परमार्थात सद्‍गुरूंची किती आवश्यकता आहे ते उपनिषदांपासून ज्ञानेश्वरमहाराज तुकोबारायांपर्यंत सार्‍यांनी एकमुखाने सांगितले आहे. आत्मज्ञान हे अत्यंत गहन असल्यामुळे (राजविद्या राजगुह्यं) ते केवळ स्वतःच्या बुद्धिबळावर प्राप्त होणे शक्य नाही. त्यासाठी ज्याने ते करून घेतले आहे, अशा आत्मज्ञानी श्रीगुरूची मोठी आवश्यकता आहे. कठोपनिषदांत असे अगदी सुस्पष्ट व ठामपणे म्हटले आहे. पारमार्थिक अज्ञानाची काळोखी रात्र श्रीगुरुकृपेच्या सूर्योदयावांचून उजळत नाही.

श्रीगुरू हा सत्‌शिष्याने - साधकाने परीश्रमपूर्वक साधनबाग फुलवणारा उपायन वसंत आहे. एका मूळसिंचनाने लता वेली वृक्षाच्या शाखापल्लवांना टवटवी यावी, त्याप्रमाणे एक गुरुभक्तिने, गुरुसेवेने (म्हणजे गुरुपदिष्टित साधनाने) साधक 'पूर्णकाम' कृतकार्य होतो; असा खुद्द श्रीगुरुज्ञानेश्वर माऊलीचा निर्वाळा आहे. गुरुकृपा ही आत्मानंदाच्या भांडारगृहाची एक किल्लीच आहे. प्लेटो सारख्या पाश्चात्य तत्त्वज्ञानेंही "गुरुमुखांतून लाभणारे जीवनज्ञान व पुस्तकातील निर्जीव ज्ञान यांची तुलनाच होऊं शकत नाही" असे म्हणून श्रीगुरूची आवश्यकता प्रतिपादिली आहे.

'सद्‌गुरू शिष्यासाठी काय करतात ?' दूरध्वनीच्या उपमेने हे छान स्पष्ट करून सांगता येईल. आपल्याला दूरवर कोणाशी बोलावयाचे असेल तर आपण क्रमांक फिरवितो, आणि एक्सचेंजच्या द्वारा तो क्रमांक जोडला जातो. हेंच कार्य श्रीसद्‌गुरु करतात. ते देव व भक्त यांची गांठ घालून देतात. विजेच्या पॉवर हाऊसची उपमा देऊन असे म्हणता येईल कीं, श्रीसद्‌गुरु म्हणजेच साक्षात्कारी संत. हे विजेच्या मुख्य तारांप्रमाणे असून आपण सर्वजण त्या तारांच्या उपशाखांना लावलेल्या विजेच्या दिव्यांप्रमाणे आहोत. मुख्य तारांतून विद्युतप्रवाह आला कीं सर्व दिवे एकदम प्रकाशतात. त्याचप्रमाणे साक्षातकारी संतांच्या अंतःकरणांत भरून राहिलेला भगवंताच्या चित्‌प्रकाशाचा झोत त्यांच्याशी संबद्ध झालेल्या त्या साधकांच्या - शिष्यांच्या अंतःकरणांत चित्‌प्रकाश उत्पन्न करतो.

जेथें देव जागा झाला आहे, त्याच्याशी संलग्नता साधली कीं देव अगदीं हमखास संपडतोच. यासाठीं नादाच्या निनादाचा (resonance) दृष्टांतहि चांगलाच लागू पडतो. सुरात लावलेल्या सतारीची एक तार छेडली, तर दुसर्‍या बाकीच्या तारा आपोआपच वाजू लागतात. त्याप्रमाणे आत्मानंदाचा दिव्य झणत्कार ज्यांच्या ठिकाणी झणाणत असतो, त्यांच्या संगतीने, तो त्याच्या सत्‌शिष्यालाही प्राप्त होतो.

"अंतरीं गेलियां अमृत । अवघी काया लखलखीत॥" या न्यायाने ज्याच्या अंतरीं स्वरूपस्थिती बाणली असा साक्षात्कारी सहजच गुरूत्वाला पोहोचतो. ज्याच्याकडे पाहिले असतां भगवंताकडे पाहिल्याचे समाधान मिळते तो संत, तो श्रीगुरू. हे श्रीगुरु आपल्या शिष्याला त्याच्या ठिकाणींच गुप्त रूपांत असलेल्या स्वात्मानंदाची स्वानुभवाच्या पातळीवर ओळख करून देतात.

श्रीगुरू स्वतः भगवत्‌नामाचा प्याला भरभरून आपण तर पितातच व आपल्या सत्‌शिष्यालाही पाजतात. "सेवितो हा रस, वाटतो आणिका ।" असं तुकोबारायपण म्हणतात. नामस्मरणांत भाव फार महत्त्वाचा. भगवंताला पण हा अंतःकरणातील भाव फार फार प्रिय. आणि हा भाव निर्माण होण्याचे साधन म्हणजे नामस्मरण. "सार, सार, सार नाम, विठोबा नाम तुझे सार"

असे नाम श्रेष्ठ कां ? तर हे नाम भगवंताच्या रूपाचा - आनंदाचा अनुभव आणून देते म्हणून. नाम हे तेल असून त्यांत मनाची वात चांगली भिजवली असतां भगवंताच्या रूपाची ज्योत श्रीगुरुकृपादृष्टी काडीने पेटते. नाम हे सगुण व निर्गुण या भगवंताच्य दोहीं स्वरूपाचे साक्षी असून स्वानंदाचा प्रकाश नामधारकाच्या जीवनांत पसरविणारी दिव्य स्वयंभू ज्योतच आहे. अशा नामाचाच श्रीगुरुंकडून मिळालेल्या नामाला दिव्य नाम अगर सबीजनाम असे म्हणतात. अशा सबीज नामाचे रुपांतर पारमार्थिक अनुभवाच्या वृक्षांत होते.

श्रीगुरू नाम-बीज देतात. पोते भरून खाण्यासाठी फुकट दाणे देत नाहीत. ते बीज नाम साधनेच्या शेतांत पेरून, राबून, मशागत निगराणी करून स्वतःच पिकवावी लागते. असे दिव्य नाम पूर्वजन्मींचे सुकृत असल्याशिवाय थोडेच मिळते ?
अण्णा -

12 December, 2008

मानसमणिमाला (१३)

मानसमणिमाला (१३)
:

हिंदी : गुन अवगुन जानत सब कोई । जो जेहि भावनीक तोहि सोई ॥ बा. कां. १.४.९

मराठी : गुण अवगुण सगळेच जाणती । जो ज्या रुचे श्रेष्ठ तो गणती ॥

अर्थ : गुण किंवा अवगुण कशाला म्हणायचे हे सर्वजण जाणतात. परंतु ज्याला यातील जे चांगले वाटते तेच तो योग्य वा श्रेष्ठ मानतो व स्वीकारतो.

साधारणतः समजूत अशी असते कीं लहान मुलाला चांगले वाईट, खरे खोटे यांतला फरक फारसा चांगला समजत नाही तसाच अडाणी अज्ञ व्यक्तीसही चांगले वाईट गुण अवगुण यातील फरक किंवा गुण कोणते अवगुण कोणते हे नीट कळत नसावे. म्हणूनच त्यांच्या हातून अनेक चुका होतात. पण ही समजूत खरी नाही. सर्व माणसांना परमेश्वराने सत्‌ असत्‌ विवेकबुद्धि दिलेली असते, व त्यामुळे गुण कशाला म्हणतात, योग्य काय अयोग्य काय, अवगुण कोणते हे सर्वांना समजते. परंतु त्याच ज्ञानाचा स्वतःच्या बाबतीत उपयोग करायची वेळ आली की भल्याभल्यांची फसगत होते व चुकीचे निर्णय घेतले जातात.

स्मर्थ म्हणतात : सकळ अवगुणांमध्ये अवगुण । आपले अवगुण वाटती गुण ।

मोठे पाप करंटपण । चुकेना की ॥ दासबोध १९.८.८

रागीट स्वभाव हा दुर्गुण समजला जातो, पण तो इतरांचा ! आपल्या रागीटपणाचे आपण नेहमी किती प्रकाराने समर्थन करतो, त्याची आवश्यकता स्वतःला आणि इतरांनाही पटवून देतो ! त्यामुळे तो रागीटपणा सोडून देण्याचा प्रश्नच येत नाही. त्यालाच समर्थांनी 'करंटेपणा' म्हटले आहे. कारण सुधारण्याची तिथे आशाच राहात नाही. आपल्या दुर्गुणांचे दुर्गुणत्व बोचत नाहीच, उलट ती एक अभिमानाचीच गोष्ट आहे असे वाटते. "पहा बरं, माझा स्वभाव फार रागीट आहे, तेव्हां तुम्हीच जपून वागा !' म्हणजे मी कांहीही सुधारणा कधीच करणार नाही ही गर्भित धमकी.

याचे उलट ज्याचे जवळ कांही सद्‌गुण आहेत त्यालाही त्या सद्‌गुणांचे महत्त्व चांगलेच समजलेले असते त्यामुळे ते वाढीला कसे लागतील याचा तो अगदे आवडीने प्रयत्‍न करतो, पण त्यालाही त्याचा थोडासा अभिमान असतोच. समर्थ सहजपणे सुचवितात - 'मूर्ख मूर्खपणे भरंगळती । ज्ञाते ज्ञातेपणे कलहो करिती । होते दोहोकडे फजिती । लोकांमध्ये ॥ दा. १९.७.२९

आपले किंवा इतरांचे सद्‌गुण किंवा अवगुण योग्य तऱ्हेने जाणून घेऊन त्याचे उपयोग अगर समर्थन करावे अन्यथा लोकांमध्ये आपली फजिती होणार हे ठरलेलेच आहे.

डॉ. सौ. उषा गुणे.




11 December, 2008

अमला भक्ति

अमला भक्ति
:
श्रीगुरुजवळ काय मागावे तर "अवीट पदपद्माची अमला भक्ति दे मला." हे सद्‌गुरुराया, तुझ्या पदकमली रमून जाणारी, अवीट गोडी असलेली, अशी ती अमला भक्ति तेवढी मला द्या. अमला भक्ति = शुद्धभक्ति, परमश्रेष्ठ भक्ति असाच तिचा अर्थ आहे. अशी ही अमला भक्ति भक्तीमध्ये सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. ज्याचे मन, बुद्धी, काया, आणि वाचा पूर्ण शुद्ध झालेली असते, जो आनंद, समाधान, प्रसन्नता यांचाच जणू प्रत्यक्ष मूर्तिमंत आकार असतो. स्वतः भगवंताचा, सद्‍गुरूंचा दास म्हणवून घेण्यातच ज्याला कृतार्थता वाटत असते असा भक्त जी भक्ती करतो तीच अमला भक्ती.
" मुखी अमृताची वाणी । देह देवाचे कारणी । सर्वांग निर्मळ । चित्त जैसा गंगाजळ ॥ " असा असून जो भक्तीच करतो ती अमला भक्ती. अशा भक्ताच्या ठायी मग विवेक, वैराग्य, ज्ञान अगदी सहजपणाने प्रकट होतात. त्या शिवाय त्याच्या ठिकाणी रसमयता, आनंद हा त्या भक्ताचा उल्लेखनीय विशेष असतो. श्रद्धा, निखळ भक्तीप्रेमभाव त्याच्या ठिकाणी ओसंडून वाहात असतो बघ. तो सदा सर्वदा समर्पितच होऊन गेलेला असतो. ही सर्व लक्षणं तर अतिश्रेष्ठ भागवतांची सामान्य लक्षणं आहेत.
असा भक्तभागवत मग देवाजवळ, श्रीगुरुंजवळ अशा अमला भक्तीशिवाय दुसरं काय मागणार ? नामदेवासारखे श्रेष्ठ भक्तराज काय मागतात बघ ! "देई भक्तिरस प्रेमा । देवा घाली आम्हा जन्मा ॥" असा लडिवाळ हट्ट भक्तच फक्त आपल्या देवाकडे, श्रीगुरुंकडे करू शकतात. भगवंताशी, श्रीगुरूमाऊलीशी अशा भक्ताचे एक अतूट, अत्यंत सुंदर, नितांत रमणीय, परमविशुद्ध आणि ऋजु असेच नाते जमून गेलेले असते. भक्तिप्रेम - प्रेमभक्ति या पलीकडे त्याला कांही कळत नाही. तो काही पाहात नाही आणि अनुभवीत सुद्धा नाही. याला 'संयोगदीक्षा' असं भक्तिशास्त्रकार म्हणतात. "मिळोनि मिळतची असे । समुद्री गंगाजळ जैसे । मी होवोनी मज तैसे । सर्वस्वे भजती ॥" अशी त्या भक्ताची अवस्था होऊन गेलेली असते. भक्त भगवंताला सर्वार्थानी, सर्वांगानी समर्पित होतो. आणि पहा भगवंत तर त्याचा स्वतःहून अंकित होऊन राहतो. अशा त्या भगवंतालाही प्रिय असण्यार्‍या अमला भक्तीची प्राप्ती होऊन, तद्‌द्वारा अमलानंद (म्हणजे परमपवित्र, परमश्रेष्ठ आनंद) आपल्याला प्राप्त व्हावा अशीच मागणी भक्त भगवंताजवळ, श्रीगुरुरायांजवळ करत असतो. समुद्रावर समुद्राची लाट आनंदाने, अत्यानंदाने क्रीडा करते. आकाशात वारा अगदी मुक्तपणे वाहात असतो, तसेच भक्ताचे असणे म्हणजे भगवत्‌ सत्तेतील आनंदक्रीडाच असते.
परमरसाने अमृतरसाने रसना ओलावली, मनाची वृत्ती आनंदकंदाच्या चरणी राहिली, या विश्वातील सगळी मांगल्ये एकत्र येतात, आनंदजळाचीच वृष्टी होते, मग अशाने सगळीच्या सगळी, अगदी सगळीच्या सगळी इंद्रिये ब्रह्मरूप होतात, त्यांना सर्व क्रियाकर्मामध्ये एका स्व-स्वरूपाची, आत्मस्वरूपाचीच प्रचिती येते, त्याच्याजवळ प्रत्यक्ष देवच नांदत असतो.
अशी अमला भक्ती लाभलेला भक्त सहजच स्वरूपज्ञानी असतोच. ज्ञान, कर्म, योग त्याच्या ठिकाणी सहजच नांदू लागतात. तो तत्त्वज्ञ, भक्त आणि जीवनमुक्तही असतो. थोडक्यात सांगायचे तर तो परमार्थाचे भूषणच होऊन गेलेला असतो. भगवंतानी स्वमुखाने अशा भक्ताचे वर्णन केले आहे. झाडाच्या फांद्या जरी लहानमोठ्या असल्या तरी त्या जशा एकाच झाडाच्या असतात; सूर्यकिरणे अनंत असली तरी ती जशी एकाच सूर्याची असतात, तसेच प्राणीमात्र भिन्न भिन्न असले तरी त्यांच्या अंतर्यामी एकच एक परमात्मा भरून राहिलेला असतो.
भक्त हा स्वरूपज्ञानी असतोच. रामकृष्ण म्हणत "मूल वृद्ध होण्याचे नाकारीत असेल तर ती विकृतीच मानावी लागेल. बीजाचा अंकुर, अंकुराचे रोपटे, रोपट्याचा वृक्ष असाच विकास झाला पाहिजे. तसाच भक्त हृदयाचा पण विकास झाला पाहिजे आणि भक्तीने तो होतोच होतो. सर्वत्र भरून राहिलेले, विलसत असलेले चैतन्य हे आपल्या उपास्य दैवताचे, श्रीपांडुरंगाचे खरे व्यापक स्वरूप आहे हे त्याला ओळखता येते. सर्व रूपानी सर्वत्र एक आपला पांडुरंगच नटला आहे असा व्यापक अनुभव त्याचा असतो. "जेथे तेथे देखे, तुझीच पाऊले । विश्व अवघे कोंदाटले ॥ अशा व्यापक स्वरूपावर आरूढ झाल्यावर पुन्हा त्याचे नामाचा उच्चार, स्मरण, चिंतन नित्य व्हावे हेही मागणे भगवंताजवळ असतेच.

अण्णा -