17 December, 2009

विष्णुसहस्रनाम : श्लोक ६

विष्णुसहस्रनाम : श्लोक ६


अप्रमेयो हृषीकेशः पद्मनाभोऽमर प्रभुः  । विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्ठः स्थविरो ध्रुवः  ।।


(४६) अप्रमेयः :  - ज्याची व्याख्या अगर विवरण कुठल्याहि विशिष्ठ तर्काने अगर इतर वस्तुच्या संदर्भाने करता येत नाही तो '' अनिर्वाच्य '' असा श्रीविष्णु. ज्या वस्तुचे आपल्याला 'प्रत्यक्ष ' ज्ञान होते तिचे वर्णन करता येते. काहींचे ज्ञान प्रत्यक्ष होत नाही परंतु इतर गोष्टींचे संदर्भाने त्याचे अनुमान करता येते. तर कांही गोष्टी अशा असतात किं त्यांचे ज्ञान ऐकणार्‍या व्यक्तिला इतर समानधर्मी वस्तूंच्या वर्णनावरून करून देता येते. (उपमान). परंतु हे अनंततत्व गुण रहित असल्याने त्याने प्रत्यक्ष ज्ञान होत नाही, इतर संदर्भावरून त्याचे ज्ञान होत नाही किंवा समधर्मी अगर विधर्मी वस्तूवरूनहि त्याचे ज्ञान होत नाही. म्हणूनच त्या सर्वश्रेष्ठ सत्याला 'अप्रमेय ' असे म्हटले आहे व तोच श्रीविष्णु होय. आपले सर्व भेदज्ञान संपुष्टात आले म्हणजेच ज्याचा केवळ एकरूपतेने अनुभव येवू शकतो तो परमात्मा अप्रमेय होय.


(४७) हृषीकेश :  - पुराण वाङमयावरून ह्या शब्दाचा अर्थ निघतो किं ज्याचे केस अत्यंत आखूड कापलेले आहेत किंवा ज्याच्या केसांच्या कुरळ बटा वरती बांधल्या आहेत तो 'हृषीकेश'. त्याच संज्ञेचा दुसरा अर्थ इंद्रियांचा स्वामी (हृषीक + ईश) असाही होतो. कारण हृषीक म्हणजे इंद्रिये. (ही संज्ञा आता अप्रचलीत झाली आहे). आत्मा हा जाणीव रूपाने सर्व इंद्रियांना प्रकाश देत असतो. म्हणून त्याला इंद्रियांचा स्वामी असे म्हटले आहे. तोच ' श्रीविष्णु ' होय.
    तसेच हृषीक ह्या अप्रचलीत शब्दाचा अर्थ किरण किंवा 'जो आनंद देतो तो' असाहि होतो. म्हणून हृषीकेश या संज्ञेचा अर्थ होईल किरणांचा स्वामी म्हणजेच 'चंद्र' अगर 'सूर्य'. अशातर्‍हेने अर्थ केला असता 'तो परमात्मा स्वतःच चंद्र-सूर्य झाला आहे असा ध्वनी निघतो. ह्या चंद्र-सूर्य स्वरूपांत परमेश्वर स्वतःच सर्व जगाला उठवून कार्य प्रवण करतो व सर्व जगाला विश्रांतीहि देतो. साधकास आपल्या सूक्ष्म चिंतनात असे प्रतीत होते किं तोच परमेश्वर स्वतःच विश्व स्वरूपात उदयास येतो, ह्या विश्वाच्या कार्यशीलतेमध्ये व्यतीत होतो व शेवटी क्रीडा आवरून प्रलयाचे वेळी स्वतःमध्येच विश्रांती घेतो.


(४८) पद्मनाभः :  - ज्याच्या नाभीपासून उत्पन्न झालेले कमळ हे चतुर्मुख ब्रह्मदेवाचे आसन आहे तो श्रीविष्णु पद्मनाभ आहे. हिंदु संस्कृतीमध्ये 'कमळ' हे सत्याचे अगर त्याच्या व्यक्तावस्थेचे प्रतीक - अगर आधार मानले जाते. मनुष्यामधील सृजनशक्तीचा स्त्रोत त्याचे नाङीपासून प्रवाहीत होतो व तो चतुर्मूख स्वरूपात प्रतीत होतो त्यालाच अंतःकरण असे म्हटले जाते. ह्या अंतःकरणाचे चार घटक आहेत. मन, बुद्धी, चित्त व अहंकार. योगशास्त्रामध्ये ह्या कल्पनेचा विस्तृत विचार झाला आहे. त्यानुसार प्रत्येक संकल्पना ही परमेश्वरा पासूनच उत्पन्न होते. व त्यावेळी तिचे स्वरूप असते 'परा'. त्यानंतर ती अस्फुट स्वरूपांत प्रतीत होते. नाभीजवळ त्यावेळी तिला म्हटले जाते 'पश्यंती'. ज्यावेळी ती जास्त स्पष्ट स्वरूपांत येते तेंव्हा ती हृदयांत विचाररूपाने स्फुरण पावते. तेंव्हा तिलाच म्हटले जाते 'मध्यमा'. व जेंव्हा ती आपापल्या कार्यक्षेत्रात अत्यंत स्पष्टतेला येते - प्रत्यक्ष कृतीरूपानें - तेंव्हा तिलाच म्हटले जाते 'वैखरी'. अशातर्‍हेने प्रत्येक संकल्पना परेपासून वैखरी पर्यंत उत्क्रांत होत जाते. (कल्पना- स्फुरण - विचार- कृती) म्हणजेच प्रत्येक कल्पनाही कृतीमध्ये कशी परीणत होत जाते त्याची आपल्याला स्पष्ट जाणीव होते. व त्याच्याच सूक्ष्म चिंतनातून 'सृष्टीकर्ता ब्रह्मदेवाचे स्थान परमेश्वराच्या नाभीमधून निघालेले 'कमळ' हे आहे त्या प्रतिकाचा अर्थ असा स्पष्ट होतो. ज्याच्या संकल्पनेतून सर्व विश्वाची उत्पत्ती झाली तो श्री महाविष्णु होय.


(४९) अमरप्रभुः :  - अमर अशा देवांचा स्वामी. इंद्र, दि्कपाल यांच्या सहित सर्व स्वर्गाचे रहिवासी देव या संज्ञेस पात्र आहेत. व ते स्वर्गातील अमरत्वाचा आनंद सापेक्षतेने जास्त काल उपभोगतात. जेव्हा ब्रह्मदेवाचा निद्राकाल येतो व प्रलय सुरू होतो तो पर्यंत सर्व देव आपापली कार्ये करत आपले आयुष्य उपभोगतात. ह्या जगाच्या पाठीवरील मानवांचे अस्तित्व (आयुष्य) देवांच्या आयुष्याच्या कालक्रमणेशी तूलना करता फारच अल्प असते म्हणूनच देवांचे आयुष्य अमर्याद वाटते. अर्थातच त्यांना अमर म्हटले जाते. ह्या देवांचे आपल्या शक्तिने जो पालन करतो तो सर्व प्राणीमात्रांस आधार देतो तो अमरप्रभु होय.


(५०) विश्वकर्मा :  - सर्वप्राणीमात्र, त्याचे इंद्रियार्थ. त्या इंद्रियार्थांचे ज्ञान करून घेणारी सर्व प्राणीमात्रांची सर्व इंद्रिये व त्या सर्वांच्या हृदयांत उत्पन्न होणारे अनुभवजन्य ज्ञान ह्या सर्वास उत्पन्न करणारा तो विश्वकर्मा होय.
    या सर्व ठिकाणी परमेश्वर साक्षीभावाने सर्व अनुभवांचे वेळी उपस्थित असतो. ज्याचा अनुभव घेतला जातो ते सर्व विश्व जरी त्याच्याच आधाराने अस्तित्वात असले तरी तो प्रत्यक्ष त्या विश्वाच्या अपूर्णतेमध्ये अगर विनाशामध्ये सहभागी होत नाही. विश्वातील सर्वघटना सर्व कालामध्ये ज्याच्या आधाराने होतात तो श्रीविष्णु ' विश्वकर्मा ' होय.


(५१) मनु:  - (मननशीलः मनुः) :  - उच्चविचारांसंबंधी मनन करण्याची पात्रता ज्याचे जवळ आहे तो मनु ह्या संज्ञेचा दुसरा अर्थ आहे मंत्र. जो आपणास वैदिकमंत्राचे स्वरूपात प्रकट करतो तो श्रीविष्णु 'मनु' होय. असे ह्या संज्ञेचे स्पष्टीकरण होईल.


(५२) त्वष्टा :  - अत्यंत विस्तृत व स्थूल वस्तूंना अत्यंत सूक्ष्म परमाणु स्वरूपांत नेणारा तो ' त्वष्टा '. प्रलयाचे वेळी विश्वातील सर्व जड वस्तूंचा सूक्ष्म घटकांमध्ये विलय होतो. व शेवटी जड सूक्ष्म वस्तुरहित शुद्ध स्वरूपांत अवकाश अस्तित्वात रहाते.


(५३) स्थविष्ठः :  - स्थूल ह्या शब्दाचे तमभावाचे रूप 'स्थविष्ठ ' असे होते. म्हणून जे अत्यंत सूक्ष्म सत्य आहे तेच अत्यंत स्थूल, सर्वात जास्त स्थूल (स्पष्ट) असा ह्या संज्ञेचा अर्थ होईल. ह्या संज्ञेमधील विरोधाभास हेच या संज्ञेचे सौदर्य आहे. व तिची ओजस्विताहि आहे. ते परमसत्य स्वभावतःच अत्यंत सूक्ष्म असल्याने सर्वव्यापी असते. हा महाविष्णु स्वतःच विश्वातील सर्व स्थूल वस्तूजाताचे रूप घेऊन राहिलेला आहे. ज्याप्रमाणे समुद्रातील सर्व लाटा या वस्तुतः समुद्रच असतात त्याप्रमाणे सर्व स्थूल वस्तूंनी तयार झालेले जगत् हे श्रीविष्णुंचेच रूप आहे.
    गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने आपले विश्वरूप अर्जुनाला दाखविले. अर्जुनाने त्याच्या स्तवनांत योजलेल्या शब्दावरून 'हे सर्व जडस्थूल विश्व हे भगवंताचेच दिव्य स्वरूप आहे' असे प्रतितीस येते.


(५४) स्थविरोध्रृव:  - स्थविर म्हणजे पुरातन. व ध्रृव म्हणजे स्थिर. परमेश्वराला पुरातन म्हटले आहे कारण कालाचा 'प्रथमघटक' हा त्याचेच पासून उत्पन्न झालेला आहे. मानवीबुद्धीमध्ये कालाची संकल्पना निर्माण करणारा तोच आद्यपुरूष होय. म्हणूनच तो सर्वात पुरातन आहे व दृढ सत्य आहे. जगामध्ये घडणार्‍या कोणत्याही काळातील कोणत्याही घटनांचा त्याचेवर परिणाम होत नाही.
डॉ. सौ. उषा गुणे.

25 September, 2009

बद्ध - मुक्त लक्षणे - (७-अंतिम) (भागवत स्कंध ११ अध्याय ११)

बद्ध - मुक्त लक्षणे - (७-अंतिम) (भागवत स्कंध ११ अध्याय ११)


भगवंत उद्धवास सांगतात -
गुण व दोष यांना यथार्थपणे जाणून घेऊन, निवृत्तिपरायण होऊन माझे भजन करावे. मज ईश्वराला समग्रपणे जाणो अथवा न जाणो, पण माझी भक्ति मात्र अनन्यभावाने करीत जावे. माझ्या मूर्तिचे, माझ्या अनन्य भक्तांचे दर्शन, अर्चन, सेवा, गुणगान करीत जावे. माझ्या गुण-कर्मांचे अनुमोदन करावे तसेच माझ्या चरीत्राचे, माझ्या अपूर्व कर्मांच्या कथांचे श्रद्धापूर्वक श्रवण करावे. आपल्याला जे जे काही मिळेल ते सर्व मला अर्पण करावे आणि मगच प्रसाद म्हणून ग्रहण करावे. माझ्या दिव्य कथांचे कीर्तन करावे (अर्थात् इतर भक्तमंडळींना कथा सांगाव्यात). आपल्या गृही तसेच मंदिरांत, एकट्याने वा सामूहिकरीत्या पर्वे करावित. गणेशचतुर्थी, गोकुळाष्टमी, गुरुपौर्णिमा इ. उत्सव साजरे करावेत. मूर्तीची, पादुकांची शोभा यात्रा करवावी. बलिविधान तथा दीक्षा घेऊन वैदिक कर्मांचे अनुष्ठान करावे. श्रद्धापूर्वक मंदिर, उद्यान, उपवने, वेदपाठशाळा इत्यादिंची स्थापना व निर्मिती करावी. असे करताना स्वतः झटावे. केवळ रोकड मोजणे (देणगी वा दान करणे) इतकाच आपला सहभाग पुरेसा नाही. असे करीत असताना जराही दंभ मनास शिवता उपयोग नाही. आपण केलेल्या शुभ कर्मांची चर्चा करण्यापासून अलिप्त असावे. मज अर्पण केलेल्या वस्तु परत आपल्या व्यावहारीक उपयोगात आणूं नयेत. जसे मला फुले वाहायची आणि मग उचलून आपल्या मनगटी बांधायची. माझ्यापुढे उदबत्ती लाऊन मग ती आपल्या टेबलावर ठेवायची. माझ्यापुढे दिवा लावायचा आणि नंतर आपल्या व्यवहारासाठी तो उपयोगात आणायचा. आपण स्वतःस जे इष्ट असेल, जे प्रिय असेल ते सर्व मला अर्पण करावे.
उद्धवा, आता "माझी पूजा" म्हणजे काय हे नीट समजून घे. - सूर्योऽग्निर्ब्राह्मणो गावो वैष्णवः खं मरुज्जलम् (४२) - मी सर्वत्र आहे, सर्वव्यापी आहे. स्थावर जंगम, चेतन अचेतन, प्राणीमात्र, सगळीकडे आहे. तेव्हां सूर्य, अग्नि, ब्राह्मण, गाय, आकाश, जल. पृथ्वी, मरुत्, सर्व प्राणी, वृक्ष, पर्वत, नद्या ही सर्वच्या सर्व माझी पूजा स्थाने आहेत. पूजेचे प्रकार कोणते ? तर पाद्य, अर्घ्य, स्नान, धूप, दीप, प्रदक्षिणा, नमन, नैवेद्य, आरती हे सर्व तर आलेच; पण अग्निहोत्राद्वारे हविष्य अर्पण, ब्राह्मण, पाहुणे इत्यादिंचे सत्कारपूर्वक आतिथ्य, प्राणीमात्रास चारा इत्यादि, सर्व जनांशी बंधुत्व भावना ठेऊन, हृदयाकाशात ध्यानाने, मंत्रोच्चारण, स्तुति स्तोत्रे गाऊन या सर्व प्रकारे केलेले पूजन हे माझेंच पूजन समज.
एवढेंच नव्हे तर आपले आपणही पूजन करावे. कसें ? खाणे, पिणे, फिरणे, गाणे, नाचणे हे सर्व अंतर्यामी स्थित असलेल्या भगवंतासाठी, ही भावना ठेऊन - यद् यद् कर्म करोति तद् तद् अखिलं, शंभो तव आराधनम् - कारण अंतर्यामी मीच तर आहे. शरीराने (क्षेत्र) अंतर्यामीची आराधना तर करायची पण अंतर्यामीला पीडा न देता. झेपत नसताना उपासतापास करून शरीरास पीडा होत असेल तर अंतर्यामी पीडित होतो, तेव्हां अशा प्रकारे केले जाणारे तप इष्ट नव्हे. सामर्थ्य नसताना घोर तप करणे म्हणजे अंतस्थ अंतर्यामीला कष्ट देणे - कर्षयंतः शरीरस्थं, तां विद्धि आसुर निश्चयान् - अंतर्यामीला ताप देऊन केले जाणारे तप आसुरी तप समज. तेव्हां तामसिक तप वर्ज्य.
हे सर्व ज्याला, मनापासून, सहजपणे, आपसूकच करणे जमले, तसेच करीत असताना ’मी कर्ता’, माझ्यामुळे इ. अहं मम भावना भाव विरहित करणे जमले, तो खरा मायेपासून मुक्त. मग त्याच्या आसपासचे इतरेजन त्याला मुक्त मानोत वा न मानोत. कारण पहिल्या श्लोकातच सांगितले आहे - गुण मायेचे, आणि गुणाच्या प्रभावात (कचाट्यात) आहे तो बद्ध. आत्मस्वरूपाला ना बंधन आहे, ना मोक्ष.
हं ! परमेश्वराची कृपा होणे, त्यासाठी योग्य गुरूचे मार्गदर्शन लाभणे या मनुष्याच्या हातांतील गोष्टी नाहीत. असे म्हणतात की ’पूर्वसुकृत’ असेल तरच गुरू, कृपा इत्यादिंचा लाभ होतो. म्हणजे सु+कृत (कर्म) ओघाने आलेच. ’न कर्मणा ..’ ज्ञान कर्माने प्राप्त होत नाही असेही शास्त्रात म्हटले आहे. मग या दोन्हींचा मेळ बसायचा कसा ? प्रयत्‍न (पुरुषार्थ) तर करायलाच पाहिजे ? पण यथार्थ स्वप्रयत्‍न सुरू झाला की "तो" हात पुढे करतो हेही खरेच. लहान मूल आपल्या प्रयत्‍नांनीच उ भे राहते. एक पाऊल पुढे टाकायचा प्रयत्‍न करते. पडते. पण असा प्रयत्‍न दिसता क्षणीच माता बाळाचे बोट धरते. पण तो पर्यंत तीही बाळाला उभे करायचा, त्याल पहिले पाऊल उचलायला उद्युक्त होत नाही. पण स्वप्रय‍त्‍नानंतर मूल केव्हां भराभर पुढे जाते, केव्हां धावायलाही लागते हे त्याचे त्याला सुद्धा समजत नाही. मग असे करताना त्याला पडण्याचे, लागण्याचे दुःखही सुसह्य होते. चालणे आपोआप घडते. चालणे हे कर्म करावे लागत नाही.
अकराव्या अध्यायाच्या अगदी शेवटी भगवंत उद्धवास उत्कंठा निर्माण करणारे एक वाक्य बोलून गेले - परमं गुह्यं तथा गोप्यं वक्ष्यामि - मी तुल आता एक अत्यंत गोपनीय असे परम रहस्य सांगणार आहे. काय असेल हे रहस्य ? 
**संपूर्ण**
एकोहम्

23 September, 2009

विष्णुसहस्रनाम : श्लोक ५

विष्णुसहस्रनाम : श्लोक ५

स्वयम्भूः शंभुरादित्यः पुष्कराक्षो महास्वनः ।
अनादिनिधनो धाता विधाता धातुरूत्तमः ।

(३७) स्वयंभूः : - जो स्वतः मधूनच स्वतःला अविष्कृत करतो त्याला स्वयंभू ( स्वतःच स्वतःला उत्पन्न करतो) असे म्हणतात. जगातील ज्या वस्तू तयार केल्या गेल्या आहेत अगर जन्माला आल्या आहेत अशा सर्वास त्यांचे 'कारण' आहे. परंतु परमात्मा हा सर्व कार्यांचे कारण आहे. परंतु त्याला स्वतःला कोणीहि कारण नाही. स्वतःस कोणतेहि कारण नसलेले हे 'मूळकारण' त्याच्यामुळेच सर्व कार्यस्वरूप सृष्टिची उत्पत्ती होते. ते स्वतः केवळ कारण स्वरूप असणार म्हणून त्यास स्वयंभू असे म्हटले जाते.
(३८) शंभूः : - आपल्या भक्तांना सर्व शुभ मंगलकारक गोष्टींचा लाभ करून देतो तो. ह्या मध्ये आंतरिक मंगलकारकता व लौकिकांतील सुखकारक (समृद्धी) गोष्टी दोन्हींचा अंतर्भाव आहे. 'शंभु' हे भगवान् शंकराचेहि नांव आहे. विष्णुस्तवनांत हे नांव योजून असे सुचविले जाते किं विष्णु व शिव ही दोन वेगळी दैवतेनसून एकाच अंतिम सत्याचे ते दोनही अविष्कार आहेत.
(३९) आदित्यः : - सूर्यमंडलामध्ये तेजस्वी सोनेरी वलयांने चमकणारा पुरूष; त्यासच आदित्य असे म्हणतात. असे आदित्य बारा आहेत.** त्यापैकी एक विष्णु आहे. ''आदित्यानां अहं विष्णु'' गीता १०- २१. आदित्य ह्या संज्ञेचा दुसरा अर्थ होईल आदितीचा मुलगा तो आदित्य व हे नांव भगवंताच्या वामनावतारास अनुलक्षून आहे.
आदित्य शब्दाची अशीहि उकल करता येतेकिं त्याचे आदित्याशी साधर्म्य आहे म्हणून तो आदित्य आहे असा. सूर्य हाच सर्व जगतास प्रकाशमान करतो. सर्व जीवंत प्राणी सूर्यामुळेच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या वृद्धिंगत होत असतात, पुष्टीप्राप्त करतात. त्याचप्रमाणे सर्व प्राणीमात्रांस सर्व तर्‍हेचे अनुभवजन्य ज्ञान त्या ब्रह्मरूपी ज्ञानसूर्यामुळेच प्रतीतिस येते.
(४०) पुष्कराक्ष : - ( पुष्कर - कमळ ) - ज्याचे डोळे कमळाप्रमाणे आहेत असा. मनुष्याच्या मनांत असलेला आनंद व शांती इतर कुठल्याही शरीराच्या अवयवांपेक्षा डोळयाचे ठिकाणी जास्त स्पष्टपणे प्रतीतिस येते. जलाशयांत डोलणारे कमळ पाहिले असतां सौंंदर्याने व आनंदाने मन थरारून जाते. तसेच परमेश्वराच्या हृदयातील परमानंद व असीम शांती त्याच्या नेत्रातून स्त्रवत असतांना पाहून भक्ताचे हृदय आनंदाने भरून येते. अर्थात ह्या पदाने असे सुचविले जाते किं परमेश्वर केवळ आपल्या दृष्टिक्षेपाने भक्ताच्या हृदयातील दुःख अगदी जादूसारखे नाहीसे करू न त्याचे अंतःकरण आनंद, शांती व पूर्णतेने भरून टाकतो.
(४१) महास्वनः : - स्वन म्हणजे नाद. ज्याचा नाद मेघगर्जनेप्रमाणे अतिशय गंभीर आहे असा श्रीविष्णु. सर्वांच्या हृदयांत घुमणारा त्याचा 'घोष' अत्यंत गंभीर व खोलवर जाणारा (प्रभाव करणारा) आहे म्हणून त्यास महास्वन असे म्हटले आहे. स्वन ह्या शब्दाचा दुसरा अर्थ आहे श्वास. म्हणून महास्वन ह्या शब्दाचा अर्थ होईल ज्याचा मोठा निश्वास म्हणजेच वेद होत तो परमात्मा श्रीविष्णु. '' हे मैत्रेयी, त्या परमात्म्याचे श्वासनिश्वासातून ऋग्वेद, यजुर्वेद आपणास प्राप्त झालेले आहेत.'' असे बृहदआरण्यकोपनिषदांत म्हटले आहे (४-४-१०) हिन्दुस्थानातील सर्व धर्मग्रंथात वेद ही त्याची निश्वसिते आहेत' असे वर्णन आढळते. त्याचे निश्वास म्हणजेच वेद होत.
(४२) अनादि निधनः : - ज्याला जन्म ( आदि) नाही व मरणहि (निधन) नाही असा. म्हणजेच त्याचेमध्ये कसलाहि बदल अगर परिवर्तन संभवत नाही तो अनादिनिधन. परिवर्तन म्हणजेच पूर्वीच्या स्थितीचा मृत्यु व नवीन स्थितीची उत्पत्ती. पण जे विकार रहित व अमर आहे त्यामध्ये बदल - परिवर्तन संभवतच नाही.
(४३) धाता : - नामरूपात्मक जगताचे जे अंगभूत आधारतत्व तेच तत्व सर्वांच्या अनुभव विश्वाचा आधार आहे. ह्या वैश्विक दृष्य चित्रपटाचा तो आधारभूत 'पटल' आहे.
(४४) विधाता : - जो सर्वांच्या कर्माचे फल देणारा आहे असा श्रीविष्णु. वेदांच्या कर्मकांड विभागामध्ये ईश्वराचे वर्णन 'कर्माचे फल देणारा' (कर्मफलदाता ईश्वरः) असे केले आहे.या सर्व विश्वाच्या मागे असलेले वैज्ञानिक सत्य व गति तो स्वतःच आहे. त्यानेच हे सर्व निसर्ग नियम केले आहेत इतकेच नव्हे तर ज्याच्या नियमांचा भंग प्रकृती कोणत्याहि काळी कुठेहि करू शकत नाही. सूर्याचा प्रकाश, अग्निची उष्णता, साखरेतील मधुरता, दुष्कृत्याचे दुःख, सत्कृत्यातील आनंद हे सर्व त्याचेच नियम आहेत व कुणीही हे नियम मोडण्याचे धाडस करीत नाही. सर्व विश्वाच्या मुळाशी असलेला निर्विवाद्य असा विश्वनियम म्हणजे तो स्वतःच परमात्मा विधाता होय.
(४५) धातुरूत्तमः : - कोणत्याही वस्तूचे अंगभूत आधार देणारे जे तत्व असते त्यास ' धातु ' असे म्हणतात. ऋषींनी संशोधन करून उदयास आणलेले जीवनाचे शास्त्र असे सांगते किं शरीर धारण करून राहिलेल्या प्रत्येक जीवाची निर्मिती त्याच्या विशिष्ट मूळ घटकांपासून झालेली आहे व त्यांनाच 'धातु' असे म्हणतात. अस्तित्वात असलेल्या अगणित धातुंमध्येहि ज्याचे वाचून सर्वांचेच अस्तित्व अशक्य आहे असा चित्-धातु हा सर्वोत्तम आहे म्हणून त्याला ''धातुरूत्तमः '' म्हटले आहे. कांही टिकाकारांनी ह्या शब्दाची धातु व उत्तम अशी दोन प्रकारे उकल केलेली आढळते. परंतु बहुतेकांनी हे एकच पद असल्याचे मान्य केले आहे व त्याचा ' सर्वात उत्तम सूक्ष्म धातु' असे वर्णन केले आहे.
[**(१) अरूण (२) सूर्य (३) भानुः (४) तपनः (५) चंद्रमस् (६) मित्रः (७) हिरण्यगर्भः (८) रविः (९) अर्यमा (१०) गभस्तिः (११) दिवाकरः (१२) विष्णुः]

डॉ. सौ. उषा गुणे.

22 September, 2009

बद्ध - मुक्त लक्षणे - (६) (भागवत स्कंध ११ अध्याय ११)

बद्ध - मुक्त लक्षणे - (६) (भागवत स्कंध ११ अध्याय ११)

भगवंतांनी उद्धवाला सज्जनांची, साधूंची, संतजनांची २८ लक्षणे सांगितली. पुढील (३२ व्या) श्लोकात या साधुजनांतही श्रेष्ठ कोण, त्याचे विशेषत्व ते काय हे सांगतात. "मी व माझे भक्त यांच्याकडून सांगितलेल्या गेलेल्या गुणांचे व दोषांचे (हे वर्ज्य म्हणून टाळण्यासाठी) यथार्थ ज्ञान करून घेऊन स्वविहित अशा भागवत धर्माचरणाचे फलही माझ्या चरणी समर्पण करून माझी सेवा करतो तो पुरुष साधुजनांत श्रेष्ठ. अशा भक्तांचा भजनभाव कसा असतो ? तर, माझ्या अनुसंधानाशिवाय स्नान, संध्या, जप, होम, दान हे सर्व अधर्मच. कायावाचामनेंकरून माझ्या भक्तींत मग्न असणे, भजन करताना दिवस वा रात्र याचे भान नसणे ही खरी भक्तिची स्थिति. जपाशिवायच ज्याच्या मुखांत नाम, धारणेशिवायच ज्याच्या मनांत ध्यान, प्राणायामाशिवाय वायूचा निरोध, विषयाशिवाय सदोदित स्वानंद, संकल्पाशिवाय सर्व कर्मे मला अर्पण करणे - हे सर्व ज्याचेपाशी असते तोच माझा शुद्ध भक्त."


ऑलिंपिकमध्ये होणार्‍या १०० मिटर दौडीमध्ये भाग घेण्यासही विशेष पात्रता लागते. योगाची, ज्ञानसंपादनाची, भक्तिची वाटचाल सुरू केल्यावर वरील २९ गुण अंगी बाणतात तो सज्जन, तो साधु. असा साधु 'आत्यंतिक भक्त' (ही अखेरची पायरी) होण्यास qualify झाला. भगवंताच्या प्रितीसाठी पात्र झाला. मग आता उरले ते काय ? भगवंताची कृपा. त्याचे लक्ष वेढून घेणे. शर्यतीत कितीही शिकस्त केली तरी photo-finish मध्ये रेषा पार केलेलाच जिंकला. तशीच एक firm dividing line पार केल्याशिवाय "त्याचे" लक्ष वेढले जाणार नाही. पण एकदा का भगवंताचे अशा भक्ताकडे लक्ष गेले, त्याची पूर्ण कृपा झाली की असा भक्त भगवंताशी एकरूपच होतो. Like Midas Touch. ज्याने "त्याचे" लक्ष वेधून घेतले तो "तो" झाला. तोच आत्यंतिक भक्त. भगवंत म्हणतात असा भक्त म्हणजे "भक्ततम". भक्ततम हे खरे तर भक्तिमार्गावर वाटचाल करणार्‍या साधकांनी केलेले नामकरण. कारण एकरूप झाल्यावर तो असतो सगुणरूप ब्रह्मच. वसिष्ठांनी रामाला केलेल्या उपदेशामध्ये (योगवसिष्ठ) अशा आत्यंतिक भक्ताच्या अंतरंगाचे खूप छान वर्णन आले आहे ते असे.
आपण ब्रह्मस्वरूप होतां पूर्ण । ब्रह्मरूप दिसे त्रिभुवन ।
शत्रु मित्र थोर लहान । ब्रह्मरूप सर्व दिसे ॥
घागरी मडकी रांजण । आंत बिंबला चंडकिरण ।
परी सूर्यासी स्त्रीपुरुषनपुंसकपण । कल्पांतीही घडेना ॥
सोनें साच लटिके अलंकार । तरंग मिथ्या एक सागर ।
पट मिथ्या तंतु निर्धार । तैसें चराचर ब्रह्मरूप ॥
नाना घट एक अंबर । नाना मणि एक सूत्र ।
नाना मातृका एक ओंकार । ब्रह्म सर्वत्र तैसेंचि ॥
म्हणोन सुटतां हृदयग्रंथि । सर्व संशयां होय निवृत्ति ।
कर्मींच होय ब्रह्मप्राप्ति । त्रिजगतीं ब्रह्मरूप ॥
उभय पक्षांचे बळेंकरूनी । विहंगम संचरती गगनीं ।
तैसें कर्मब्रह्म ऐक्य करूनी । स्वानंदवनीं विचरावें ॥
जेथें निमाल्या सकळ आधी । श्रीरामा पूर्ण तेचि समाधि ।
तटस्थता हे उपाधि । एकदेशीं जाण पां ॥
अंतरीं जाणोनि निर्वाणज्ञान । बाहेर दाविजे भिन्नाभिन्न ।
अंतरीं बोध परिपूर्ण । बाहेर जडपण दाविजे ॥
अंतरीं करून पूर्ण त्याग । बाहेर दाविजे लौकिक भाग ।
अंतरीं होऊनि निःसंग । विषयीं विराग धरावा ॥
बाहेर लटिकेंच कृपणपण । परी अंतरीं समसमान ।
रामा तोचि सावध पूर्ण । लोकसंगविवर्जिन ॥
जैसा बीजामधूनि वट थोर । निघे अद्‌भुत पर्वताकार ।
तैसें आत्मरूपा चराचर । जाहलें जाणोनि वर्तावें ॥
तैसें जग आणि जगदीश्वर । भिन्न नोहे साचार ।
हें ज्ञान जाणोनि निर्विकार । वर्तें सदा तूं राघवा ॥


असा भक्त जो भगवंताशी एकरूप झाला, असा भक्ततम, भगवंताला किती प्रिय असतो -
तयातें आम्ही माथां मुगुट करूं ।
तयाची टांच धरूं । हृदयीं आम्हीं ॥
तयाचिया गुणांचीं लेणीं । लेववूं अपुलिये वाणी ।
तयाची कीर्ति श्रवणीं । आम्हीं लेवूं ॥
तो पहावा हे डोहळे । म्हणौनि अचक्षूसी मज डोळे ।
हातींचेनि लीलाकमळें । पुजूं तयातें ॥
दोंवरी दोनी । भुजा आलों घेउनि ।
आलिंगावयालागुनी । तयाचें आंग ॥


मग असा स्वस्वरूप झालेला भक्त परत भजन कशाला करतो ?


कीं भक्तिसुखालागीं । आपणपेंचि दोही भागीं । 
वांटूनियां आंगीं । सेवकै बाणी ॥ (ज्ञानेश्वरी- १२.१८६)


आता असा आत्यंतिक भक्त होण्यासाठी आपण काय करायचे ? ब्रॉंझ सिल्व्हर सोडा, आधी धावायला तर यावे लागेल. पण त्यासाठीही कसून मेहनत - म्हणजे उपासना, तप, साधना यांचा अंगिकार करणे अनिवार्य. उपासनेंत वरील सर्व लक्षणांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे यम, नियम, आचरण, निष्काम कर्म सर्वच आले. पण हे सर्व करीत असताना एकच ध्येय पुढे असावयास हवे. ते म्हणजे भगवंताचे लक्ष वेधून घेणे, त्याची कृपा संपादन करणे. मग कशा प्रकारे करायची उपासना ? भगवंतच सांगतात उद्धवाला ३४ ते ४६ या श्लोकांतून.
क्रमशः


एकोहम्

20 September, 2009

बद्ध - मुक्त लक्षणे - (५) (भागवत स्कंध ११ अध्याय ११)

बद्ध - मुक्त लक्षणे - (५)
(भागवत स्कंध ११ अध्याय ११)


५. अनवद्य - मन निर्दोष, निष्कपट, निश्छल असणे अर्थात् मनाची सरलता. असणे आणि ठेवणे यात बराच फरक आहे. बर्‍याच तपस्येनंतर असे ’असणे’ साध्य होऊ शकते. "मनःप्रसादः सौमत्वं. स्थैर्यं आत्मविनिग्रहः । भावसंशुद्धि इत्येतत् तपो मानसं उच्यते ॥" मन प्रसन्न ठेवणे, सौम्यता, मुनिप्रमाणे वृत्ति असणे, मनोनिग्रह आणि शुद्ध भावना यांस मानस तप म्हणतात.

६. समभाव - सर्वत्र समबुद्धि व सर्वांवर समान भावनेने उपकर करणारा. सामान्य दृष्टीस सर्वत्र कळ्या लावत फिरणारे नारदमुनि असुरांनाही अंतिमतः त्यांचे कल्याण साधण्याच्या हेतुनेच ’कळी’ लावण्याचा उपक्रम करताना आढळतात. साधूच्या ठिकाणी विषमता नाही. समुद्रात मिठाचा खडा टाकला की विरघळून जावा त्याप्रमाणे साधूच्या अंतःकरणात विषमता पूर्णपणे नष्ट झालेली असते.

७. परोपकार - वृक्ष त्याचे संगोपन करणार्‍यावर वा घाव घालून तोडणार्‍यावर सारखीच छाया व फळे देतो. चंद्र विश्वाचा ताप करताना ’माझे चांदणे फक्त चकोरांसाठीच आहे’ असे म्हणत नाही. तसेंच साधूही काया-वाचा-मनेंकरून उपकारा करितांच असतात. दुष्ट लोक त्यांचा छळ करतात आणि भक्त सत्संगाचा लाभ घेतात पण साधु दोघांवर उपकारच करीत असतो.

८. अकामता - ’निजानंदे तृप्त’ असल्यामुळे प्राप्तव्य असे काहीच नाही. मनात कसलीच कामना नसल्यामुळे बुद्धि कधी विषयात रमत नाही. अगदी ऊर्वशी शय्येवर आली तरी कामविकार क्षुब्ध होत नाही.

९. इंद्रियदमन - साधु संत मनाचे नियमन करून इंद्रियांवर विजय मिळवितात.अशा प्रकारे इंद्रियदमन म्हणजे वास्तविक मनोजय. मनोवृत्तीचे जे नियमन तेच बाह्येंद्रियांचे नियमन. इंद्रिये आपले विषयच विसरून गेलेली असतात. अशा स्थितीत जे कर्म घडते ते निःसंशय निष्काम असेच असते.

१०. मृदु - गोड स्वभावाचा, पवित्र आणि चुकूनही कधी कठोर भाषण न करणे. कठोर भाषण करताना आढळले तरी ती कठोरता गळ्याच्या वरच दिसून येते. पोटातून वा हृदयातून नव्हे. (कारण कठोरतेचा केवळ आभासच निर्माण केलेला असतो). गंगेच पाणी कधी अवखळ भासले तरी गाय व वाघ दोघांची तृषा शमन करणारे. तसेच साधूचे हृदय मृदु, म्हणजे कोमल असते.

११. शुचि - काय-वाचा-मने सदा निर्मळ. ही निर्मलता भगवद्‌भक्तिमुळे प्राप्त होते. कुंभाराने चाकावरून मडके उतरविल्यावरही चाक जसे फिरत राहते तसे व्रत, तप, ज्ञानादि पूर्व संस्कारामुळे साधु वृत्तिशून्य राहात असतो. म्हणून त्यचे सर्व कर्मे देखील शुद्ध व पवित्र असतात.

१२. अकिंचन (अपरिग्रह) - देहाची वा घरादाराची सुद्धा संगति न धरणे हीच ’अकिंचनता’. कोठेही गुंतलेलाच नव्हे. राजा जनक राज्य करीत असतांही अकिंचन होता म्हणून तर शुक नारदही त्याला मान देत असत. ’उद्या’ चा विचार (चिंता) मनी नसल्यामुळे स्वाभाविकतः संग्रहाची आवश्यकता वाटत नाही असा परिग्रहासंबंधी उदास.

१३. अनिहा - ईहा म्हणजे इच्छा. ही कामाची स्त्री. आणि अहं व मम (ममता) या तिच्या बहिणी. या तीन कुठे नाहीत असे स्थान दुर्मिळच (अर्थात् संसारात). अनीहेला (म्हणजे ईहेच्या वैरिणीला) सर्वच झिडकारून हाकलून लावतात. मग संतांशिवाय तिला आधारच नाही. संतांनी तिला (अनीहेला) स्वहितासाठी थारा दिल्यामुळे त्यांच्या चित्तातून काम, अहं व ममत्व यांना मरण आले. अनीहा, निरीच्छता यामुळे काम्यकर्म नाही. म्हणून कर्ता नाही, मग कर्मफळ कुठले ? शांतिच शांति.

१४. मित्‌भूक - साधु जिव्हेच्या इच्छेला बांधलेला नसतो. अन्नाची इच्छा प्राण करतो. साधुने तर मनोजयाबरोबर प्राणजयही केलेला असतो. रसना, क्षुधा त्याला कधी पीडित करीत नाहीत. अन्नाला भोग्य पदार्थ मानीत नसल्यामुळे कधी ’हादडणे’ हा प्रकार घडत नाही. आहार हा केवळ आहारासाठीच. रोग्यासाठी जसे पथ्य, तसा. अगदी जरूरीपुरताच.

१५. स्थिरबुद्धिः - कुठे स्थीर ? तर महाविष्णु, श्रीहरि, परमात्म्याचे ठिकाणी. साधु व्यवहारकरिता मात्र शरीरधारी. पण निजांतरी स्वस्वरूप झालेला म्हणून स्थिर.

१६. शांत - कोणत्याही अवस्थेत मोह, ममता दाटत नाही, वर्तमान वा भूतकाळातील कोणतीही आठवण चित्तात चलबचलता निर्माण करीत नाही, असे झाले तर, तसे झाले तर अशा भविष्यकाळातील चिंता उद्‌भवत नाहीत, तो शांत.

१७. मत् शरणं - साधु परमेश्वराला अनन्य शरण झालेला असतो तेव्हां त्याच्या मनी एका परमेश्वराशिवाय त्याचे वेगळे असे अस्तित्वच नसते. नदी आपल्या मूळ स्थानापासून वेगळी असते तोवरच तिचे वेगळेपण, तिची चंचलता, तिचे अवखळणे. एकदा का ती समुद्रास शरण झाली सागराप्रमाणे की अगाध झाली, विशाल झाली. तीच आता समुद्र झाली. Total surrender चा प्रभाव.

१८. मुनि - सदा भगवद्‌गुणांचे मननात रमणारा तो मुनि.वेदशास्त्राचे निरूपण, गुरुवाक्याचे निरूपण, अद्वैताचे श्रवण - हे सर्व करीत असता विवेकाच्या युक्तिने मनाशी ’मनन’ करणार तो मुनि. मनन करता करता मन आत्मरूप होते आणि परमात्म्याचे ठिकाणे स्थिर, अचल बनते.

१९. अप्रमत्तो - प्रमाद हा तामस गुणाच्या अंशामुळे घडतो. साधुचे ठिकाणी सत्त्वगुणांची अधिकता असल्यामुळे आळस व प्रमाद यांचा पूर्णतः अभाव असतो. जो पर्यंत मन वृत्तिशून्य होत नाही तो पर्यंत भले भले ज्ञानीजन देखील प्रमादाच्या भोंवर्‍यात सापडतात. ज्ञानी दुर्वासाचे मनांत क्षणोक्षंई क्षोभ उत्पन्न होतो. नारदाकडून किंचित् प्रमाद घडला तर तो क्षणात ’नारदी’ झाला. जोवर वृत्तीचे दमन होत नाही तोव मन काय काय प्रमाद करायला लावेल हे सांगणे अवघडच. वृत्ति सत्त्वगुणाच्या आश्रयाने देखील मनाला क्षुब्ध करून ’मी मुक्त’ असा अभिमान निर्माण करते. मग यावर उपाय काय ? ’अखंड सावधानता’ कोठपर्यंत ? हाती धरलेल्या सर्पाचे तोंड कुठवर आवळून धरावे लागते ? तो मरेपर्यंत. हात जरा ढिला पडला तर सर्वनाशच. तद्‌वत मनाचे संपूर्णतया निर्दाळण होईपर्यंत आत्मज्ञानाने सदा सावधान असणे नितांत गरजेचे. मन-वृत्ति एकदा वश झाली की काम झाले. चित्तवृत्ति निरोधः. योग्याभ्यासाची ही पहिली पायरीच इतकी महत्त्वाची असताना बरेच ठिकाणी भक्तिचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी योगमार्ग, कर्ममार्ग या संबंधी कुत्सित वक्तव्ये आढळतात या चे कारण समजत नाही.

२०. गभिरात्मा - विषयांचा मनाशी संपर्कच नाही. समुद्र उन्हाळ्याने आटत नाही की पर्जन्याने फुगत नाही. तसा साधु धनप्राप्ति, कीर्ति, मान याने कधी उल्हसित होत नाही की निर्धन झाला, अवमान झाला तरी दीन होत नाही. विकार कितीही उभाळले तरी त्यामध्ये अढळ असणे म्हणजेच गंभीर असणे.

२१. धृतिमान् - वृत्ति इकडे तिकडे भरकटवूं न देता ती निश्चयाने आत्मज्ञानाकडे लावणे यासाठी प्रचंड धैर्याची आवश्यकता असते. विशेषतः आपत् काळी याची अत्यंत आवश्यकता असतेच. मन, बुद्धि, इंद्रिये, प्राण हे सर्व आपापली कर्मे करीत असतांना त्या सर्वांना धैर्याने आवरून धरणे, त्यामुळे प्राप्त होणारी सुख दुःखे यांना शरीराकडे येऊं न देणे, या प्रमाणे जो मन आणि शरीर यांना कधी संलग्न होऊं देत नाही तो धृतिमान.

२२. जितषडगुणः - भूक तहान (आधिभौतिक), जरा मृत्यु (आधिदैविक) व शोक मोह (अध्यात्मिक) या सहाही विकारांवर मात केलेला. साधूला हे विकार कधी उद्‌भवत नाहीत असे नव्हे. पण त्यामुळे कधी क्षोभ उत्पन्न होत नाही, त्यापासून तो कधी त्रासून जात नाही. मनाची प्रसन्नता अबाधित राहते.

२३. अमानी - मानाची इच्छा अपेक्षा तर नाहीच. पण जरी कोणी केला तरी तो मनाला शिवत नाही. आज मान करणारा उद्या अवमानही करू शकतो - मग मान मिळाल्यास हुरळून जाण्यात कोणते स्वारस्य ?

२४. मानदः - पण इतरांचा मात्र मान करतो. सर्वांविषयी सदा आदर भावच असतो. जैसें उंचीं उदक पडिलें । ते तळवटवरी ये उगेलें । तैसें नमिजे भूतजात देखिलें । ऐसा स्वभावोचि तयांचा ॥ २२४ ॥ कां फळलिया तरूची शाखा । सहजें भूमीसी उतरे देखा । तैसें जीवमात्रां अशेखां । खालावती ते ॥ २२५ ॥ अखंड अगर्वता होऊनि असती । तयांची विनय हेचि संपत्ती ।

२५. कल्पौ - ज्ञान विवरणात निष्णात असणे. शिष्याला प्रबोधन करताना कसलाही आडपडदा नाही, कसली अपेक्षा नाही. "शब्दज्ञानें पारंगत । जो ब्रह्मानंदें सदा डुल्लत । शिष्यप्रबोधनीं समर्थ । तो मूर्तिमंत स्वरूप माझें ॥११.१०२८॥ "

२६. मैत्रः - सर्वांचा सुहृद, सर्वांचा जिवलग - सख्यभाव असा की किती पुराणा मित्र असावा. परम मैत्री अशी की जशी दुधाची पाण्याशी.

२७. कारुणिकः - सर्वांविषयी करुणभाव धारण केलेला. हा गुण सर्वप्रथम, म्हणजे (१) मध्ये आलेलाच आहे.

२८. कविः - वेदशास्त्रांचा मथितार्थ ज्याला हाती असलेल्या आवळ्याप्रमाणे, निस्संग्दिग्ध, स्पष्ट कळतो तो कवि. काव्य करणारा कवि नव्हे. इथे अभिप्रेत असलेला कवि म्हणजे द्रष्टा.

क्रमशः
एकोहम्

17 September, 2009

विष्णुसहस्रनाम : श्लोक ४

विष्णुसहस्रनाम : श्लोक ४

सर्वः शर्वः शिवः स्थाणुर्भूतादिर्निधिरव्ययः ।
संभवो भावनो भर्ता प्रभवः प्रभुरीश्वरः ।।

(२५) सर्वः : - जो सर्व आहे तो विष्णु. ज्यामूळ कारणापासून सर्व जडचेतनाची उत्पत्ती झाली आहे ते मूळ कारणच सर्व ठिकाणी सर्व ठिकाणी व्याप्त आहे व तोच परमात्मा आहे. महाभारतातील उद्योगपर्वात (७०-१२) असे म्हटले आहे किं तो सर्वांचे उगम स्थान आहे व शेवटही तोच आहे. अस्तित्वात असलेल्या अगर नसलेल्या सर्वांचा आदी अंत तोच आहे तसेच सर्व काळी तोच सर्वाचा ज्ञाता असल्यामुळे त्यालाच 'सर्वः' असे संबोधिले जाते. सर्व लाटा सागरापासूनच उत्पन्न होत असतात म्हणून सर्व लाटांमध्ये तत्वतः सागरच असतो.


(२६) शर्वः : - जो मंगलमय आहे तो श्रीविष्णु. म्हणजेच जे त्याचे नाम श्रवण करतात, त्याचेच दर्शन करतात व त्याचे ध्यान करतात त्यांना सर्व मंगलाची प्राप्ती त्याच्यामुळेच होते.


(२७) शिवः : - जो सदैव अत्यंत शुद्ध आहे तो. रज- तमोगुणांमुळे निर्माण होणारे अपूर्णतेचे अशुभत्व ज्याला कधीच स्पर्श करीत नाही तो श्रीविष्णु शिव आहे.सत्याचे अज्ञान म्हणजेच तमोगुण व सत्याचे अयथार्थ ज्ञान म्हणजे रजोगुण. परमसत्यामध्ये ह्या दोन्हीचा पूर्ण अभाव आहे. सब्रह्म सः शिवः । ते ब्रह्म आहे तेच शिव आहे, अशा प्रकारे उपनिषदांनी ज्या एका अद्वितीय ब्रह्माचे वर्णन केले आहे तो म्हणजेच श्रीविष्णु.


(२८) स्थाणुः : - साधारणतः स्थाणु हा शब्द देशाची सीमा दाखविणार्‍या कायम केलेल्या व न हलविता येणार्‍या स्तंभाकरतां वापरला जातो. तो स्तंभ पक्का रोविलेला कायम त्याच स्थितीत असतो. जे सत्य अशा तर्‍हेने स्थिर व गतिरहीत आहे, स्तब्ध आहे व आपल्याच शुद्धतेमध्ये नित्य प्रतिष्ठित आहे त्यालाच 'स्थाणु ' ही संज्ञा दिली आहे. तो नित्य, सर्वव्यापक, स्थिर अचल व सनातन आहे असे गीतेमध्ये त्याचे वर्णन आहे (नित्यः सर्वगतः स्थाणुरचलोयं सनातनः ।).


(२९) भूतादिः : - पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश ह्या पंचमहाभूतांचे आदिकारण तो श्रीविष्णु.


(३०) अव्ययः निधिः : - अविनाशी संपत्ती निधियते अस्मिन इति निधिः । निधि म्हणजे ज्यामध्ये अमूल्य वस्तू अत्यंत गुप्तपणे ठेविल्या जातात व सांभाळल्या जातात तो. खजिना - ज्याच्या आधाराने अगर आवरणांमध्ये सर्व विश्वरूपी धन साठविले तो. प्रलयकाळामध्ये सर्व वस्तुजात ज्याच्यामध्ये लीन पावते व पुढील सृजनापर्यंत सूप्तस्थितीत रहाते तो स्वतः स्थिर असा निधि म्हणजेच श्रीविष्णु. त्याचे मध्ये कुठलाही बदल विकार संभवत नाही म्हणून त्या निधिला 'अव्यय' हे विशेषण आहे.


(३१) सम्भवः : - आपल्या स्वतःच्या इच्छेने जो जगताच्या हिताकरतां अवतार घेतो त्याला 'सम्भव' असे म्हटले आहे. खरे म्हणजे सर्व उत्पन्न झालेल्या वस्तुजाताचे तो स्वतःच उत्पत्तीस्थान आहे. हरिवंशामध्ये ह्या विधानाला पुष्टि दिलेली आढळते ती अशी 'मी नारायण' - ज्याचे पासून सर्व जड चेतन सृष्टी उत्पन्न झाली.' ( अहं नारायणो ब्रह्म संभवः सर्वदेहिनां सर्वभूतोद्‍भवकर ।।). गीतेमध्येही ' धर्म रक्षणाकरतां मी, पुन्हा पुन्हा जन्म घेईन ' असे आश्वासन भगवान् श्रीकृष्णाने दिलेले आहे ''संभवामि युगे युगे ।''


(३२) भावनः : - भावन म्हणजे देणे. आपल्या भक्तांना जो सर्व फल देतो तो श्रीविष्णु 'भावन' आहे. मनुष्यांच्या कर्माप्रमाणे त्यांना सुख अगर दुःखहि देणारा तोच आहे. मानवतेच्या दृष्टीने तोच मनुष्यमात्रांमधील दुष्ट प्रवृत्तीचा नाश करून सुख प्रदान करणारा आहे.


(३३) भर्ता : - जो सर्व जगताचे भरण (देखरेख) करतो तो भर्ता. जगताचे रक्षण करून त्याचे हिताकरतां व आनंदाकरतां भरण पोषण करणे हे त्यांत अंतर्भूत आहे. सर्वकाल सर्व प्राणीमात्रांचे जो भरण करतो तो श्रीविष्णु सर्वश्रेष्ठ भर्ता होय.


(३४) प्रभवः : - पंचमहाभूतांचे जो प्रत्यक्ष उत्पत्ति स्थान आहे, तसेच दिशा व काल ह्यांच्या संकल्पनांचेही तोच उगमस्थान आहे.


(३५) प्रभुः : - सर्व समर्थ परमात्मा. जो समर्थपणे व स्वतंत्रतेने कार्य करणे (कर्तुम्) अगर न करणे (अकर्तुम) किंवा पुर्वी केलेल्या पेक्षा पूर्णतः वेगळया प्रकाराने करणे हे ठरवू शकतो तो (अन्यथा कर्तुम्) श्री विष्णु.


(३६) ईश्वर: - ( ईष्टे इति ईश्वरः) : - कोणतेहि कार्य इतर कुठल्याही जडचेतनाचे सहाय्यावाचून करण्याचे ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे तो ईश्वर श्रीविष्णु.


डॉ. सौ. उषा गुणे.

15 September, 2009

विष्णुसहस्रनाम : श्लोक ३


विष्णुसहस्रनाम : श्लोक ३
योगो योगविंदा नेता प्रधान पुरूषेश्वरः ।

नारसिंहवपुः श्रीमान केशवः पुरूषोत्तमः ।।

(१८) योगः : - ज्याचे ज्ञान अगर अनुभुती योग मार्गाने होवू शकते तो श्रीविष्णु. आपापल्या व्यापारक्षेत्रातून इंद्रिये आवरून घेवून योगसाधक जेंव्हा आपले मन स्थिर करतो तेंव्हा त्याची जाणीव एका उच्च पातळीवर उचलली जाते व त्याला सत्याची प्रचीती येते म्हणजेच योग साध्य होतो. प्रशांत मन व बुद्धिची साम्यावस्था झाली असतां योगस्थिती प्राप्त होते. समत्वं योग उच्युते (गीता २-४८). योगामधून त्याचे ज्ञान होते म्हणून त्यालाच योग असे म्हटले आहे.


(१९) योगविंदा नेता : - योग जाणणार्‍या सर्व व्यक्तिंना (योगविंत) त्यांच्या सर्व कर्मामध्ये जो मार्गदर्शन करतो तो. सिद्धावस्थेस प्राप्त झालेल्या सर्व मनुष्यांचे एकच ध्येय असते व ते म्हणजे पूर्णब्रह्म परमात्मा.


आपल्यासारख्या सामान्य माणसांची सर्व कर्मे अहंकार व स्वार्थ प्रेरित असतात तर साक्षात्कारी व्यक्तिंच्या हृदयातील परमेश्वरच त्यांच्या सर्व कृतींना प्रेरणा देत असतो. ह्या अनुभवस्तरालाच ' महाविष्णु ' असे म्हटले आहे. ही ? कल्पना गीतेमध्येहि अत्यंत भावपूर्ण शब्दाने विशद केली आहे. (अनन्याश्चिंतयंतो मां ये जनाः पर्युपासते । तेषांनित्याभियुक्तांनां योगक्षेमं वहाम्यहम् ।। गीता - ९-२२) भगवान् म्हणतात. '' जे अनन्यभावाने सतत माझेच चिंतन करतात त्याच्या सर्व व्यवहारिक दैनंदिन गरजा व पारमार्थिक साधना दोनीही मी पूर्ण करतो'.


(२०) प्रधानपुरूषेश्वरः : - जो प्रधान व पुरूष या दोन्हींचा स्वामी आहे तो श्रीविष्णु. प्रधान या शब्दाचा अर्थ आहे 'माया' जी या संपूर्ण विश्वाचे कारण आहे. पुरूष शब्दाने आपल्यातील आत्म्याचा निर्देश केला आहे. तोच जीव होय. व ईश्वर म्हणजे स्वामी (ईशते इति ईश्वरः ) तो माया व पुरूष या दोन्हींचा स्वामी आहे. त्यांच्याचमुळे माया व जीव यांना अस्तित्व आहे व ते कार्यरत आहेत. माया,जीव व त्यांचा स्वामी ह्या तिन्हीतूनहि जे परमतत्व व्यक्त होते ते म्हणजेच श्रीविष्णु.


(२१) नारसिंह वपुः : - ज्याची आकृती अर्धमानव व अर्धसिंह अशास्वरूपाची आहे तो. श्रीविष्णुने आपल्या चवथ्या अवतारामध्ये अशी आकृती धारण केली. नास्तिक व उन्मत्त झालेल्या हिरण्यकश्यपुचा नाश करून भक्त प्रल्हादावर त्याने कृपा केली.


(२२) श्रीमान् : - जो नित्य श्रीसहित आहे तो. श्री म्हणजेच माता लक्ष्मी. पुराणवचनांप्रमाणे मातालक्ष्मी ही सर्वगुण व सर्वशक्तींचे प्रतिक आहे. सर्वशक्तिमान् परमेश्वरामधील व्यक्त दशेस येणारी शक्ति म्हणजेच श्रीलक्ष्मी. ही शक्ति त्याचे जवळ सतत असते म्हणून त्याला श्रीमान् असे संबोधिले आहे.


(२३) केशवः : - ज्याचे केश सौदर्ययुक्त व प्रशंसनीय (व) आहेत तो आपणास परीचित असलेला श्रीकृष्ण म्हणजेच ? श्रीविष्णु होय. (प्रशस्ताः केशाः सन्त्यस्येति केशवः । ) या संज्ञेचा दूसरा अर्थ होतो.- कंसाने पाठवलेल्या 'केशी ' राक्षसाचा वध करणारा तो 'बालकृष्ण', अशा तर्‍हेचे विवेचन विष्णुपुराणांत आले आहे. (यस्मात् त्वयैव दुष्टात्मा हृतः केशी जनार्दन । तस्मात् 'केशव'नाम्ना त्वं लोके ज्ञेयो भविष्यसि ।। विष्णु.पु. ५-१६-२३ )


(२४) पुरूषोत्तमः : - जीव कल्पनेचे आपण जेंव्हा विवरण करू लागतो तेंव्हा आपल्याला दिसते किं नाशवंत प्रकृती व अविनाशी आत्मा ह्या दोहोंनी मिळून जे व्यक्तित्व विकसीत होते त्यालाच 'जीव ' असे म्हटले जाते. पाण्याच्या पृष्ठभागावर नर्तन करतांना दिसणारी चंद्राची आकृती म्हणजे आकाशातील चंद्राचे प्रतिबिंब असते. ज्याप्रमाणे चंद्र हा पाण्याचा पृष्ठभाग व प्रतिबिंब या पासून पूर्णतः वेगळा आहे त्याचप्रमाणे परमात्मा हा शुद्धावस्थेत नाशवंत प्रकृती व अविनाशी आत्मा (जीवात्मा) ह्या दोन्हीपासून भिन्न असतो. पण तो प्रकृतीमधून व्यक्त होत असतो. म्हणूनच ते परात्पर सत्य 'पुरुषोत्तम' या नांवाने संबोधिले जाते.


डॉ. सौ. उषा गुणे.

12 September, 2009

विष्णुसहस्रनाम : श्लोक २

विष्णुसहस्रनाम : श्लोक २

पूतात्मा परमात्माच मुक्तानां परमागतिः ।
अव्यय पुरूषः साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षर एवच ।

(१०) पूतात्मा : - जे तत्व अत्यंत शुभ स्वरूपात आहे असा अथवा जो मायेच्या अशुद्धतेने यत्किंचीतहि गढुळलेला नाही असा पूतात्मा श्रीविष्णु. परमात्मा हा वासनांच्या पलिकडे असतो त्यामुळेमायेचा परिणाम म्हणजे बुद्धिची विचारग्रस्तता, मनाचे भावविवश होणे किंवा शरीर विषयाधीन होणे हे त्याच्या ठिकाणी संभवतच नाहीत. तो सदैव निष्कलंकच असतो म्हणूनच त्याला पूतात्मा (शुद्ध आत्मा) म्हटले आहे.

(११) परमात्मा : - सर्वश्रेष्ठ आत्मतत्व, जे तत्व प्रकृतीच्या सर्व बंधनाच्या व अपूर्णतेच्या पलीकडे आहे म्हणजेच परात्पर सत्य आहे ते. आत्मा हा प्रकृतीहून भिन्न आहे. त्याच्याच साक्षीने (अस्तित्वाने) प्रकृतीचे हे आवरण, त्याच्याचपासून शक्ति मिळवून सर्वकाल नियमितपणे आपली क्रीडा करीत असते. सर्ववैदिक वाङमयांत व उपनिषदांत हे सत्य एकमुखाने वरचेवर उद्घोषित केले आहे. आत्मबोध ह्या आपल्या ग्रंथामध्ये शंकराचार्यांनी म्हटले आहे किं

' आत्मा 1 हा तीनही देहांपासून भिन्न आहे. वतो एखादा राजा ज्याप्रमाणे देशावर सत्ता गाजवितो त्याप्रमाणे ब्रह्मांडावर सत्ता 2 ठेवतो. त्याच ग्रंथात असे म्हंटले आहे किं सूर्यापासून शक्ति मिळवून ज्याप्रमाणे जगत् कार्यान्वित होते, त्याप्रमाणे आत्म्याच्या 3 शक्तिने प्रकृति कार्यान्वित होते.
कठोपनिषद् 4 व गीता ह्यामधून आपल्याला असे मार्गदर्शन मिळते किं ' आपल्या व्यक्तिमत्वाचे बाह्यस्तर एका मागे एक ओलांडीत आपण सर्वांत अंतस्थ केंद्रापर्यंत गेलोतर तेथे तेच परात्पर अनंत तत्व असून त्याचीच सर्व अधिसत्ता आहे.' असे आपले आचार्य सांगतात. थोडक्यात जो कार्यकारण भावातीत आहे, मायातीत आहे तोच परमात्मा होय. विष्णुपुराणामध्ये 5 नन ह्या परमात्म्याची स्तुती ''श्री महाविष्णू '' या नांवाने केली आहे.

(१२) मुक्तानां परमागतिः । : - मुक्तावस्थेला गेलेल्या सर्वांचे जो उच्चतम असे ध्येय असतो तो. मनुष्यांना अनुभवास येणारी बंधने व मर्यादा ही प्रकृतीचीच बंधने असतात, तिच्यां आवरणाचे परिणाम असतात. अज्ञानाने मोहवश होवून आपण त्यांच्याशी तादात्म्य पावतो व ती खरी मानतो. त्यामुळेच अपूर्णतेचे दुःख आपणांस सहन करावे लागते. ह्या गुलामगिरीतून आपली मुक्तता करून घेणे म्हणजेच आत्मज्ञान करून घेणे. म्हणूनच सत्याची व्याख्या 'मुक्त झालेल्यांचे परमध्येय '' अशी केली आहे.
जे ध्येय गाठावयाचे त्यालाच संस्कृतमध्ये 'गति ' असा शब्द आहे. परमगति म्हणजे जेथून पुन्हा परत येणे संभवत नाही अशीच होय. जेथे पोहोचले असतां मनुष्यास परत यावे लागत नाही ते माझे ' परमधाम ' आहे . असे गीतेच्या १५व्या अध्यायात म्हटले आहे. (यद्‍गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम - गीता १५ -६) हीच कल्पना गीतेमध्ये श्रीकृष्णांनी पुन्हा स्पष्ट केली आहे. ''हे कुंतीपुत्रा, जे मला येवून मिळतात त्यांना पुनर्जन्म प्राप्त होत नाही. ( मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते - गीता ८-६)
तसेच या ध्येयाची व्याख्या करतांना ' ज्या ठिकाणी गेले असतां पुन्हा यावे लागत नांही ते' अशी केली आहे. (यस्मिन् गत्वा न निवर्तन्तिभूय: - गीता १५ - ४)

(१३) अव्ययः : - व्यय म्हणजे नाश. बदल झाल्याखेरीज नाश संभवत नांही. अर्थात जो विनाशरहित (अव्यय) आहे त्याचेमध्ये बदल होत नाही. विनाशरहित परमात्मा अर्थातच परिणाम रहित आहे. परिणाम अगर परिवर्तन म्हणजे एका स्थितीचे मरण व दुसर्‍या स्थितीचा जन्म होय. सत्चिदानंद स्वरूप ब्रह्म हे अनादि व अव्यय आहे व त्याखेरीज इतर सर्व सजीव निर्जीव जगत् हे परिवर्तनाच्या- विनाशाच्या तडाख्यात सापडते. परंतु ज्याच्या आधाराने हे सर्व बदल घडतात ते ब्रह्मतत्व मात्र 'अव्यय' आहे. उपनिषदांनी त्याचे स्तवन 'अजरो - अमरोऽव्ययः ' ते ब्रह्म जरा मृत्युरहित परिवर्तन रहित आहे असे केले आहे.

(१४) पुरूषः - पुरिशेते इति पुरूषः । : - जो पुर - नगरीमध्ये रहातो तो पुरूष. ऋषींनी ह्या ठिकाणी शरीराला एका भव्य दुर्ग अगर नगराची उपमा दिली आहे व त्याला नऊ द्वारे आहेत असे म्हटले आहे. ( नवद्वारे पुरे देही - गीता ५-१३) व या पुरामध्ये राहून जो त्याच्यावर राज्य करतो तो पुरूष.
ह्याच शब्दाचा आणखी दोन तर्‍हेनें अर्थ करता येईल व त्यावरून आपल्याला आत्मस्वरूपाचा जास्त सूक्ष्म अर्थ समजून येईल. पुरा आसित् इति पुरूषः : - जो सर्वप्राणी मात्रांच्याहि पूर्वी होता तो. (१) किंवा (२) पूरयति इति पूरूषः । म्हणजेच जो सर्व आस्तित्व पूर्णतेला नेतो तो पुरूषः ज्याच्या वाचून जगताचे अस्तित्व संभवतच नाही तो परमात्मा, हा परमात्मा सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी जीव ह्या स्वरूपात रहातो. त्याच्यामुळेच प्राणीमात्रांच्या शारिरिक, मानसिक व बौद्धिक क्रिया घडत असतात. ह्या क्रियांमध्ये तो ग्रस्त होत नाही तर साक्षीरूपानें सर्व क्रिया पहात असतो. ही कल्पना पुढील पदामध्ये जास्त स्पष्ट होईल.

(१५) साक्षीः : - पहाणारा - साक्षी म्हणजे घडणार्‍या घटनांचे जो व्यक्तिगत हितसंबंध अगर मानसिक गुंतवणूक न ठेवता निरीक्षण करतो तो असा सामान्यतः अर्थ केलो जातो. ( साक्षात् द्रष्टारि - साक्षीस्यात् अमरकोश) प्रत्येकाचे हृदयातील ज्ञानवान् आत्मा म्हणजेच तो परमात्मा होय. ( गीता १३ - ३) असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात. ह्या आत्म्यामुळेच सर्व गोष्टींचे ज्ञान होते तरी तो केवळ साक्षी आहे. कारण त्याचेमध्ये कोणतेही बदल संभवत नाहीत. ज्याप्रमाणे सूर्य सर्व जगताला प्रकाशित करतो परंतु जगताच्या कुठल्याही परीस्थितीचा सूर्यावर काहीही परिणाम होत नाही त्याचप्रमाणे हा परमात्मा विष्णु सर्व विश्व प्रकाशित करतो परंतु त्यामध्ये स्वतः ग्रस्त होत नाही.
पाणिनी सूत्राप्रमाणे साक्षी शब्दाची उकल स+ अक्षि अशी होते व त्याचा अर्थ ' प्रत्यक्ष पहाणारा ' असा होतो.

(१६) क्षेत्रज्ञ : - ज्याला शरीर व शरीरांत घडणार्‍या घटनांचे ज्ञान असते तो शरीर क्षेत्राचा ज्ञाता - क्षेत्रज्ञ होय. ब्रह्मपुराणांत असा उल्लेख आहे किं सर्व शरीरेही क्षेत्रे आहेत व त्या सर्वास आत्मा अत्यंत सहजतेने (प्रयत्नावाचून ) प्रकाशित करतो, म्हणून तो क्षेत्रज्ञ आहे.

(१७) अक्षर : - विनाशरहित. सान्त वस्तू दिक्कालाच्या बंधनाने सीमितच असतात परंतु अनंतहे बंधनातीत आहे. म्हणूनच अक्षर आहे, ते अविनाशी असल्यामुळे प्रकृतीच्या विनाशकारी नियमांच्या अगर मनुष्यकृत संहाराच्या तडाख्यांत सापडत नाही. ते संहारक शस्त्रानी छेदले जात नाही. अग्नि त्यास जाळू शकत नाही, जलाने ते भिजवता येत नाही व पवनाने त्याचे शोषण होत नाही. (गीता २-२३). ते ब्रह्म अक्षर आहे. अक्षरंब्रह्म परमम् ( गीता ८-३).
या ठिकाणी हे लक्षांत घ्यायला हवे किं या श्लोकांत 'एव' हा शब्द जास्त आला आहे व त्याचा अर्थ ''क्षेत्रज्ञ हाच अक्षर आहे'' असा होतो. त्याचेमध्ये फरक नाही. क्षेत्राचा ज्ञाता व क्षेत्र यांत फरक नांही.

टीप :
1 - देहेंद्रियमनोबुद्धि प्रकृतिभ्यो विलक्षणम् ।
2 - तद् वृत्तीसाक्षिणं विद्यादात्मानं राजवत्सदा ।
3 - सूर्याऽणेकमाया जनः । आत्मबोध २०
4 - इंद्रियाणि पराण्याहुः इंद्रियेभ्यः परं मनः । मनसस्तु परा बुद्धिः यो बुद्धे परतस्तु सः ॥
5 - परमात्माच सर्वेषां आधारः परमेश्वरः । विष्णुर्नाम सर्व वेदेषु वेदान्तेषु च गीयते ॥ विष्णुपुराण ६.४.१०

डॉ. सौ. उषा गुणे.

10 September, 2009

विष्णुसहस्रनाम - श्लोक : १

विष्णुसहस्रनाम - श्लोक : १

। अथ ध्यानम् ।


शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगम् । ।
लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं ।
वन्दे विष्णुं भवभयहरं सर्व लोकैक नाथम् ।।


जो जगताचा स्वामी श्री विष्णू स्वतः शांतस्वरूप आहे. जो नागशय्येवर निजला आहे, जो देवांचा देव आहे, जो विश्वाचा आधार आहे, जो गगनाप्रमाणे सर्वव्यापक आहे. जो घनःश्याम असून सर्वांगसुंदर आहे, जो लक्ष्मीपती आहे व ज्याचे नेत्र कमलाप्रमाणे सुंदर आहेत जो योगीजनांच्या हृदयांत रहातो. ज्याचे पर्यंत ध्यानाच्या सहाय्याने जातां येते ध्यानानेच ज्याचे ज्ञान होऊ शकते, जो सर्व भवदुःखाच्या भयाचा नाश करतो अशा श्रीविष्णूचे आम्ही ध्यान करतो, त्यास नमन करतो.

हे विष्णुच्या स्वरूपाचे ध्यान आहे. सर्व समावेशक असे परमेश्वराचे हे रूप डोळयासमोर आणून त्याचेवर ध्यान केंद्रीत करीत साधक आता या विष्णुसहस्त्रनाम स्त्रोत्राचे पठण सुरू करतो.


श्लोक १


विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्यभवत् प्रभुः ।
भूतकृत् भूतभृद्‍भावो भूतात्मा भूतभावनः ।


(१) विश्वं: - विविध आकारांमधून व्यक्त दशेला आलेले हे संपूर्ण विश्व हेच ज्याचे प्रकट झालेले रूप आहे तो विराट पुरूष'. कारण हे नेहमीच कार्यामध्ये उपस्थित असते. ज्या कारणापासून हे कार्यरूप विश्व व्यक्तदशेला आले त्या महत् कारणासच हा आकार धारण करणे शक्य आहे. स्थूल आकारमान धारण करणारे विश्व हे त्याचे व्यक्त रूप आहे. म्हणूनच त्याला 'विराट पुरूष ' असे संबोधले जाते. स एव सर्वभूतात्मा विश्वरूपो यतोव्ययः । संस्कृत 'विश्व ' हा शब्द 'विश् ' ह्या मूळ धातू पासून तयार झाला आहे. व त्याचा अर्थ आहे प्रवेश करणे. म्हणून याचा अर्थ होतो किं त्या सर्व व्यापक ब्रह्माने हे सर्व विश्व निर्माण केले व त्यातच प्रवेश करून ते विश्वाला व्यापून राहिले. ह्या शब्दाचा दुसरा अर्थ असा होऊ शकतो ? किं सर्व विश्व ज्याच्यामध्ये प्रवेश करून जिथे स्थिर रहाते तो. ही कल्पना उपनिषदांनिही प्रमाणित केली आहे. तर्काच्या सहाय्याने आपण हे समजूं शकतो किं तो ईश्वरच ह्या जगताचे कारण आहे. परंतु खोल चिंतनाने, ध्यानाने असे ? लक्षात येते किं कार्य हे दुसरे तिसरे काही नसून कारणाचेच एक रूप आहे. म्हणून मूळ कारण स्वरूप ईश्वराखेरीज जगताला चेगळे अस्तित्वच असू शकत नाही. खरेतर त्या परब्रह्माखेरीज दुसर्‍या कशासच अस्तित्व नाही आहे. मांडुक्य उपनिषदांत " ॐकार एवेदं सर्वम् '' असे म्हटले आहे तर गीतेत ' ओमित्येकाक्षरं ब्रह्म '' असे उधृत केले आहे.

(२) विष्णुः - विवेष्टि व्याप्नोति इति विष्णुः । जो सर्व व्यापुन रहातो तो विष्णु अशी ह्या शब्दाची उकल करता येईल. ज्याचा सर्वत्र पसरून रहाणे, व्यापून रहाणे हा धर्म आहे तो विष्णु 'ईशावास्यं इदं सर्वम् । हे सर्व ( जगत ) ईश्वराने व्यापलेले आहे. व त्यामध्ये तो भरून राहिला आहे. हीच कल्पना पूराणांमध्ये भगवंताच्या बटुमूर्ती वामनावताराचे खास शैलीपूर्ण वर्णन करतानां मांडली आहे. त्याने आपल्या तीन पावलांनी सर्व विश्व मोजून टाकले. त्याच कार्यामुळे त्यालां 'विष्णु ' हे नांव प्राप्त झाले असे महाभारत म्हणते. तर विष्णु पुराणांत असा उल्लेख आहे : -
यस्माद्विष्टमिदं सर्वंतस्यशक्त्या महात्मनः ।
तस्मादेवोच्यते विष्णुर्विशेर्धातोः प्रवेशनात् ।।

( ज्या महान आत्म्याच्या शक्तिने सर्व जग व्यापले आहे तो ' विष्णु ' या नावांने ओळखला जातो. कारण ' विश् ' ह्या धातुचा अर्थ आहे प्रवेश करणे, व्यापून टाकणे.)
मुळधातु 'विश् ' म्हणजे प्रवेश करणे. (प्रवेशनम्) सर्व प्राणिमात्रांनी व वस्तूजातांनी तयार झालेल्या ह्या जगताला जो व्यापून रहातो (अंतस्थ असतो). उपनिषदांनी असेहि ठामपणे सांगितले आहे किं 'हे जे सर्व आहे ते परिवर्तनशील आहे. (यत् किंच जगत्यां जगत् । ईशा.). त्याचाच अर्थ असा होतो किं तो ईश्वर ह्या देश, काल व वस्तुमात्राने सीमित नाही.


(३) वषट्कार : - वेदातील कर्मकांड सांगणार्‍या भागातील अनेक मंत्र 'वषट्' या शब्दाने पूर्ण झालेले आढळतात. भक्तियुक्त अंतःकरणाने हविर्भाग अर्पण करतांना त्याचा ( वषट् शब्दाचा) वापर होतो. म्हणून 'वषट्कार' ह्या शब्दाचा असा अर्थ करता येईल किं वैदिक विधीमध्ये वषट् शब्दाने पूर्ण होणार्‍या मंत्राने ज्याला आवाहन केले जाते व प्रसन्न करण्याकरतां हविर्भाग अर्पण केले जातात तो ' वषट्कार ' श्रीविष्णु.
साहचर्य नियमाने वषट्कार शब्दाचा दुसरा अर्थ होईल ' यज्ञ ' कारण श्रीविष्णु स्वतःच यज्ञ स्वरूप आहे. उपनिषदांमध्येहि ह्या अर्थाने 'वषट्कार ' शब्दाची योजना केलेली आढळते जसे '' यज्ञो वै विष्णुः ।'' म्हणजे यज्ञ हाच विष्णु आहे.


(४) भूतभव्यभवत् प्रभुः : - जो भूतकाळ, भविष्य व वर्तमान काळाचा स्वामी आहे असा ईश्वर. काल ही कल्पना आपल्याबुद्धीने तयार केलेली आहे. व दोन अनुभवांमधील अंतर म्हणजेच 'काल ' असे तिचे स्पष्टीकरण करता येईल. आपले अनुभव विचारांच्या स्वरूपांत नोंदविले जातात. व हे विचार नेहमीच बदलणारे असतात. ह्या विचारांचा बदल आपण अनुभवतो, समजुन घेतो. हे विचारांचे परिवर्तन जाणणारा त्या विचारांपेक्षा निश्चितच कोणीतरी भिन्न असला पाहिजे. अर्थात जो ह्या परिवर्तनरूपी कालाला प्रकाशित करतो, जाणतो तो आत्मा म्हणजेच 'श्री महाविष्णु.' तो या काल बंधनाने बांधला जात नाही.


(५) भूतकृत : - सर्व जीवमात्रांचा (भूत) निर्माणकर्ता (कृत) '' श्रीविष्णु ''. या शब्दाचा दोन तर्‍हेने अर्थ करता येतो.
१ - भूतानि करोति इति भूतकृत. - जो सर्व प्राणिमात्रास निर्माण करतो.
२ - भूतानि कृदन्ति इति भूतकृत. - जो सर्व भूतांचा कृतान्त (संहारक) आहे असा.

दोन्ही ठिकाणी तेच परमतत्व कार्यरत आहे व त्याचाच अविष्कार उत्पत्तिकर्ता, पालनकर्ता व संहारकर्ता असा होत असतो, व हे तो त्रिगुणांचे सहाय्याने करत असतो. रजोगुणांचे प्राधान्य असतां तो सर्वात्मा उत्पत्तिकर्ता होतो, सत्वगुणांचे प्राधान्य असतानां पालनकर्ता होतो व तमोगुणाचे प्राबल्य असतानां संहारकर्ता होतो.

व्यक्तिशः जेव्हा आत्मा मनबुद्धिच्या माध्यमातून कार्यरत होतो तेंव्हा तो 'मी' ह्या स्वरूपात प्रतीत होतो. माझे व्यक्तिमत्व माझ्या विचारांच्या गुणात्मकतेवर व पातळीवरच संपूर्ण अवलंबून असते. माझ्या मानसिक धारणे प्रमाणेच मी माझ्या अनुभवविश्वाचा उत्पत्तिकर्ता, पालनकर्ता अगर संहारकर्ता होतो. ह्या तीनहि अवस्थामधून व्यक्त होणारा, कार्य करणारा तो महाविष्णु होय.


(६) भूतभृत - सर्व प्राणिमात्रांचे सर्व परिस्थितीमध्ये जो भरण पोषण ( संगोपन व वृद्धी) करतो तो परमेश्वर 'भूतभृत ' ह्या नावांने ओळखला जातो. परमेश्वर कशा पद्धतीने हे भरण पोषण करतो त्याचे सुंदर वर्णन गीतेच्या १५ व्या अध्यायांत आले आहे. त्या ठिकाणी भगवान स्वतःच सांगतात किं - सूर्यातील तेजाच्या रूपाने, वनस्पतीमधील वृद्धीच्या रूपाने, अन्नातील पोषण गुणाने,व अग्नीतील उष्णतेच्या रूपाने तोच सर्वत्र अस्तित्वात असतो व सर्वांचा उपभोग घेतो. मन बुद्धीच्या सहाय्याने होणार्‍या सर्व कर्माचा तो अध्यक्ष आहे, सर्व प्राणीमात्रांची वृद्धी व पोषण करणारा आहे म्हणून सर्व प्राणीमात्र त्याचीच रूपे आहेत.

(७) भावः : - भवति इति भावः : - जो स्वतःच जगतातील जडचेतन वस्तू व प्राणी रूपाने असतो (होतो) तो श्री विष्णु. सर्व विश्वातील ज्ञानग्रहणक्षम प्राणी व संवेदनरहित जडवस्तू यामधील केवळ 'अस्तित्व ' स्वरूप तोच आहे. म्हणूनच त्याला भाव अशी संज्ञा दिली आहे.

(८) भूतात्मा : - सर्व प्राणीमात्रांचे ठिकाणी असलेला आत्मा तोच आहे. सर्व प्राणीमात्रांचे 'असणे ' ( अस्तित्व) तोच आहे. ज्या प्रमाणे विश्वव्यापी आकाश लहान खोलीमध्ये सिमित झाले असतां मठाकाश होते. व तेच आकाश पात्रांत सामावले असतां घटाकाश होते त्याचप्रमाणे तोच अनंत आत्मा प्राणीमात्रांच्या माध्यमातून त्या प्राण्याचा ''आत्मा '' ह्या स्वरूपात प्रतीतीस येतो. आकाश सर्व ठिकाणी सारखेच असते त्याचप्रमाणे ते एकच परमतत्व सर्वत्र असून प्रत्येकाचे ठिकाणी आत्मस्वरूपाने प्रकाशते. त्या परमतत्वास, विश्वात्म्यास वेदांतामध्ये ''परब्रह्म '' असे म्हटले आहे. भागवतामध्ये ' तूच सर्व प्राणीमात्रामधील आत्मा आहेस व त्यांना ज्ञान व प्रकाश तूच देतोस असे त्याचे स्तवन केले आहे. कंठोपनिषदामध्ये - '' एको वशी सर्व भूतांतरात्मा रूपं रूपं प्रतिरूपो बभूव '' - ते परमसुंदर सत्य सर्व प्राणीमात्रांमधून व्यक्त होत असते व प्रत्येक जीवाच्या आकारानुरूप विविध होते असे म्हटले आहे.

(९) भूतभावनः : - जो प्राणी मात्रांस उत्पन्न करतो त्यांची अपरिमित वंशवृद्धी करतो तो श्रीविष्णु. त्याचाच अर्थ तो प्राणीमात्रांचे जन्मकारण आहे व भरणपोषण करून वृद्धिही करतो.

डॉ. सौ. उषा गुणे.

12 August, 2009

विष्णुसहस्रनाम - संकल्प, न्यासादि..

- परमेश्वराची प्रतिष्ठापना -

हिंदू धर्मातील सर्व धार्मिक विधी एका सुंदर उपक्रमाने सुरू होतात व तो म्हणजे भक्ताच्या शरीरातच परमेश्वराची प्रतिष्ठापना. ह्यालाच अंगन्यास किंवा करन्यास असे म्हटले जाते. सर्व अंगांगामध्ये व करतलामध्ये प्रतिष्ठापना करणे. ह्या पद्धतीमध्ये स्वेच्छेने व हेतुपूर्वक केलेल्या शारीरिक क्रियांमुळे साधक आपल्या स्वतःला एक दैवी मंदीर समजतो व त्यामध्ये वेगवेगळया देवतांची स्थापना करतो.

ह्या विधीमुळे साधकास असे सुचविले जाते किं जरी तो आपल्या ध्येयस्वरूप परमेश्वराची सध्या अन्यभावाने किंवा भेद भावाने पूजा करीत असला तरी त्याने शेवटी परमेश्वराशी अनन्यभावाने किंवा अभेदभावाने एकरूपता मिळवावयाची आहे. महावाक्यांनी निर्देश केलेला पूर्ण साक्षात्कार म्हणजेच पूर्ण एकरूपता ! अहं ब्रह्मास्मि ! मी ब्रह्म आहे.

मूळ महाभारतात अगर उत्तरेकडील प्रचलित सहस्त्रनाम पाठांत आपल्याला हा अंगन्यास विधी आढळत नाही. परंतु दक्षिणेकडील पंडीत अंगन्यास विधी उपयोगात आणतात. साधकास अत्यंत उपयोगी व सुंदर असा विधी असल्याने दक्षिणेत लोकप्रिय असलेली ही पद्धत आम्ही या ठिकाणी उद्धृत करीत आहोत.

हा प्रतिष्ठापना विधी भक्तास असे निर्देशित करतो किं भक्ताने श्रीविष्णूच्या सगुण सुंदर रूपाच्या सहाय्याने शेवटी नामरूपातीत परमसत्याचे असे ज्ञान करून घ्यावे किं ज्या ज्ञानामध्ये ध्येय - ध्याता - ध्यान यांचेमधील भेदही लुप्त होतो. ह्या गूढतत्वाखेरीज दुसरा गौण उद्देश असा किं जिज्ञासू साधकास तात्कालीक का होईना एका शुद्धतेची पवित्रतेची भावना निर्माण होते . ज्याप्रमाणे पवित्र देवालयाच्या परिसरांत भक्तास एका उच्चतम दैवी भावनेचा अनुभव येतो त्याचप्रमाणे अंगन्यासविधी नंतर देवालयात शिरण्यापूर्वीची अत्यंत अस्थिर भग्न मनोवृत्ती नाहीशी होवून आपण एक पवित्र शांत मनोवृत्ती प्रस्थापित करूं शकतो.

संपूर्ण शरीर हे परमेश्वराचे मंदीरच आहे व त्यातील अवयव हे वेगवेगळया देवतांची स्थाने त्यात आहेत. अशी भावता करून भक्त अत्यंत प्रेमाने व श्रध्देने त्या त्या देवतांना आवाहन करतो. ह्या विधीतील गर्भितार्थ पूर्णपणे मनांत ठसण्याकरीतां संपूर्ण पद्धतीमध्ये प्रत्येक मंत्राच्या उच्चारणा बरोबर एकेक शारीरिक कृती करावयाची आहे. पूर्वीच स्पष्ट केल्याप्रमाणे त्या मागची कल्पना अशी आहे किं भक्ताचे भगवत चिंतन समर्पित मनोवृत्तीने व योग्य भावाने सुरू रहावे.

(अ) अस्य विष्णुसहस्त्रनाम स्त्रोत्रस्य वेदव्यास ऋषिः ।

श्री वेदव्यास हे त्या पवित्र विष्णु सहस्त्रनाम स्त्रोत्राचे ऋषी आहेत. खोल आध्यात्मीक अर्थ असलेले व उन्नत वैदिक श्रेष्ठता प्राप्त झालेले मंत्र म्हणजे कुठल्याही सीमित बुद्धीच्या मानवाची काव्यकल्पना नाही. ध्यान मग्न अवस्थेत व्यक्तिमत्वाचे निम्नस्तर ओलांडून जेंव्हा एखादे मन उन्नत भुमिकेवर विहार करू लागते तेव्हा कांही सत्ये त्या व्यक्तिपुढे उघड केली जातात. असे हे ऐकलेले ('श्रुतम्') मंत्रच आजपर्यंत कुतर्काची विनाशक शक्ती, नासधूस करणारी कालशक्ति व दुष्ट टीका यांना तोंड देत समर्थपणे उभे राहू शकले आहेत.

हेच मंत्र जेव्हा एखाद्या नव्या साधकाच्या चिंतनांत येतात तेंव्हा त्या आध्यात्मिक मंत्रवाणीच्या सामर्थ्यानें त्या साधकाला ही नकळत एका अज्ञात उच्च अवस्थेचा अनुभव येऊ लागतो; व सर्व सामान्यांना ज्या जगताचा मागमूसही नसतो अशा तर्‍हेचे अनुभव येऊ लागतात. हे मंत्र लिहीणार्‍या ऋषींना वैदिक वांङमयात ''मंत्रद्रष्टा'' असे म्हटले आहे. त्या मंत्रद्रष्ट्या ऋषींनीही प्रांजळपणे सांगितले आहे किं त्यांनी स्वतः हे मंत्र तयार केले नाहीत अगर रचलेही नाहीत तर त्यांना ह्या मंत्राचे दर्शन झालेले आहे.

ह्या मंत्राच्या सहाय्याने साधना करणार्‍या साधकाला मंत्रद्रष्टा ऋषी गुरूस्थानी असतो. म्हणूनच मंत्रद्रष्टया ऋषीची स्थापना मस्तकाचे उर्ध्वभागी केली जाते. विष्णुसहस्त्रनाम जपास सुरवात करतेवेळी साधक प्रथम आपल्या मनांत ह्या मंत्राचा पाठ म्हणतो व आपल्या उजव्या हाताचा अंगठा मधल्या व चवथ्या बोटाशी जुळवुन मस्तकाच्या सर्वोच्च भागास स्पर्श करतो.

(ब) अनुष्टुप छन्दः ।

ज्या छंदामध्ये हा मंत्र ऋषीच्या ध्यानांत प्रकट होतो त्या छंदाचाहि ह्या ठिकाणी निर्देश केला आहे व त्याच छंदामध्ये हा मंत्र म्हणणे (जप करणे) शिस्तीचे दृष्टीने आवश्यक आहे. विष्णुसहस्त्रनाम स्त्रोत्र ज्या छंदामध्ये म्हटले जाते त्याचे नाव ' अनुष्टुप छन्द ' असे आहे. हे स्त्रोत्र मुखाने म्हटले जाते म्हणुन ह्या मंत्राची स्थापना अर्थातच मुखाचे ठिकाणी केली जाते. जेव्हा हा दुसरा (ब) मंत्र म्हटला जातो तेंव्हा मस्तकाला स्पर्श करणारी उजव्या हाताची बोटे खाली आणून ओठांना स्पर्श करतात.

(क) श्री विश्वरूपो महाविष्णुर्देवता ।

सर्व विश्वातील नामरूपामधून व्यक्त होणारा विश्वरूप परमेश्वर. श्री महाविष्णु ही ह्या मंत्राची देवता आहे. वैकुंठाधिपती श्री विष्णुचे पायाशी अत्यंत विनम्र भावाने व पूर्ण शरणागतीने भक्त स्वतःस अर्पण करू इच्छितो.

श्री विष्णुभगवान हा भक्ताच्या हृदयाचा स्वामी असल्यामुळे त्याच्या केन्द्रस्थानी, हृदयाचे ठिकाणी त्याची तो पूर्ण भक्ती भावाने स्थापना करतो. व हा मंत्र मनांत म्हणत असतांना आपला हात मुखापासुन खाली आणून हृदयस्थानी ठेवतो.

(ड) देवकीनन्दन स्त्रष्टेति शक्तिः ।

प्रत्येक देवता ही त्या सर्वशक्तिमान परमेश्वराचे व्यक्तरूपच आहे. धर्मपालनकर्ता देवकीनन्दन कृष्णही परमेश्वराचे व्यक्तरूपच आहे. धर्माची ही सृजनशक्ती व शांती ह्यांची स्थापना नाभीच्या ठिकाणी केली जाते. म्हणून हा मंत्र म्हणतांना नाभीला स्पर्श केला जातो.

(ई) शंखभृन्नन्दकी चक्रीति कीलकम् ।

आवाहन केलेली सामर्थ्ययुक्त सृजनशक्ती नामीच्या ठिकाणी जरी स्थापित केली जाते तरी मन ही कल्पना पूर्णपणे धारण करूं शकत नाही. ही कल्पना आपल्या बुद्धीत पूर्णपणे रूजविण्याकरीता ( ठोकून बसविण्याकरीतां ) ह्या मंत्रामध्ये त्या शक्तीलाच शंखचक्र व नंदक तलवार धारण करणर्‍या विष्णूचे रूप दिले आहे. आपल्या आजच्या ज्ञानामध्ये पूर्णपणे ठसलेल्या उत्पत्ति - स्थिती - लय ह्या तीनहि वैश्विक शक्ती ह्या परमेश्वराचीच व्यक्त रूपे आहेत हे दर्शविण्याकरतां हा मंत्र योजला आहे. ह्या ठिकाणी 'शंख ' हा सत्याचे आवाहन (अवतरण) निर्देशित करतो. हे आश्वासन वेळोवेळी परमेश्वरानेच दिले आहे हे आपल्याला वैदिक वाङमयावरून समजते. ' नंदक ' हे शस्त्र अनुशासन दर्शविते. ज्यामुळे सर्व समाजाला आनंद व आधारही मिळतो. संहाराखेरीज उत्क्रांती अशक्य आहे हे दर्शविण्याकरतां ' चक्राची ' कल्पना केलेली आहे.


येथे असे ही दिसुन येते किं शंखाच्या नादानें वाणी ( उच्चार ); तलवारीच्या गतीने कृती ( आचार ) व ईश्वरापासून गतीमान होणार्‍या चक्राने त्याचेच विचार निर्देशित केले जातात. ह्या प्रमाणे नाभीच्या ठिकाणी स्थापित केलेली शक्ती उच्चार - आचार - विचार ह्यामधून जगताला प्रतीत होत असते.

ही कल्पना पूर्ण रूजण्याकरतां परमेश्वराचेच पाय धरले पाहिजेत, म्हणूनच हा मंत्र म्हणत असतानां नाभीला स्पर्श करणारा हात पायाकडे नेऊन साधक दोन्ही हातांनी आपलेच पाय धरतो.

ह्या प्रमाणे काळजीपूर्वक विचार केल्यास असे दिसुन येईल किं गुरूची स्थापना मस्तकावर, वेदांची स्थापना मुखांत, परमेश्वराची हृदयांत व शक्तीची स्थापना नाभीच्या ठिकाणी केल्यामुळे साधक स्वतःच इतका पवित्रतम होतो किं तो स्वतःचेच पाय धरतो ! परमेश्वराशी एकरूपता साध्य होण्याकरतां साधकाला ह्यापेक्षां एकादी अधिक सुगम पद्धत उपलब्ध असेल का ?

(फ) शारंगधन्वा गदाधर इत्यरत्रम् ।

ज्यावेळी एकादी मोठी संपत्ती एकाद्या मोठ्या पेटीमध्ये एकत्रित करून ठेवली जाते तेंव्हा ती बंदिस्त करावी लागते. व तिचे रक्षणही करावे लागते. पूर्वी निर्देश केल्याप्रमाणे सर्व देवता सर्वांगामध्ये स्थापित केल्यामुळे साधकाचे शरीर हे आतां एक देवालय झालेले आहे. व ह्या पवित्र धनाचे रक्षण करणेही आवश्यक आहे. परंतु साधकाजवळ अशी कोणतीही शक्ती नसल्यामुळे तो सर्व जगताचे रक्षण करणार्‍या श्रीविष्णूजवळच अशातर्‍हेच्या अस्त्राचे? आवाहन करतो; व ह्या हृदयमंदिराचे रक्षण करण्याकरितां त्याचा उपयोग करतो. सारंग हे विष्णुच्या धनुष्याचे नांव आहे व गदा हे त्याचे आणखी एक शस्त्र आहे. ही दोन्ही आयुधे परमेश्वराने जगताच्या रक्षणाकरतां धारण केलेली आहेत. हा मंत्र मनांत जपत असतांना भक्त आपले दोन्ही हात पायापासून वर उचलतो व उजव्या हाताच्या तर्जनी व मधल्या बोटाने पसरलेल्या डाव्या हाताच्या तळव्यावर आघात करतो.


(ग) रथाङगपाणिरक्षोभ्य इति नेत्रम् ।

श्री विष्णुने? श्री कृष्ण अवतारांत सारथ्यकर्म केले म्हणून त्याला ' रथांगपाणि ' असे नांव मिळाले, आनंदाने व सुरक्षितपणे मार्गक्रमणा करावी म्हणून रथाच्या सारथ्याने घोड्याला प्रत्येक पावलाला मार्गदर्शन करावे लागते. आपल्या सर्व इंद्रियांमध्ये डोळयाच्या संवेदना अत्यंत प्रबल असतात व त्याच्या प्रेरणेप्रमाणेच इतर इंद्रिये त्याच्या मागे जातात. स्वतः भगवान विष्णुची स्थापना डोळयांचे ठिकाणी केल्यानंतर अर्थातच साधकाची सर्व परमार्थाची वाटचाल सुरक्षित व योग्य तर्‍हेने होते. म्हणूनच लगाम हातात धरणार्‍या ह्या सारथ्याला मनांत आवाहन केले जाते व त्याची स्थापना दोन्ही डोळयांचे ठिकाणी करत असतांना दोन्ही हातांची बोटे दोन्ही डोळयावर ठेवली जातात.


(ह) त्रिसामा सामगः सामेति कवचं ।

देव - व्रत - प्रोक्त अशा तीनही तर्‍हेच्या सामगानांनी सामगायक ज्यांची स्तुती करतात, स्तुतीप्रद सामगानांचा जो स्वतःच एकमेव विषय आहे (सामगः); ज्याची स्तुती अगर प्रभा म्हणजेच व्यक्त झालेले सामवेद (साम) तो दुसरा कोणी नसून स्वतः परमेश्वरच आहे. प्रत्यक्ष परमेश्वरालाच संरक्षक कवच म्हणून साधक धारण करतो. त्या मंत्राचे मनांत स्मरण करूनच साधक प्रथम आपल्या हाताच्या बोटांनी त्याच बाजूच्या खांद्याला स्पर्श करतो. नंतर दोन्ही हातांनी विरूद्ध बाजूच्या खांद्यांना स्पर्श करतो. जणूकाही आपल्या अंगाभोवती हे दैवी कवचच तो आपल्या हातांनी घालतो आहे अशी कल्पना केली जाते.


(इ) आनंदं ब्रम्हेति योनिः ।

पूर्णब्रह्म - अपरिमित आनंद हे सर्व विश्वाचे गर्भागार अगर उत्पत्ती स्थान आहे. या उत्पन्न झालेल्या वैचित्र्यपूर्ण वस्तूजाताचा एकच पिता आहे व तो म्हणजे मंगल आनंदस्वरूप परमेश्वर. हा मंत्र म्हणत असतांना साधक ह्या परम आनंदाची स्थापना आपल्या शरीरांतील प्रजनन इंद्रियांचे ठिकाणी करतो. ह्या दैवी मंदिरातील हे स्थान असे आहे किं ज्याच्यापासून जगताची उत्पत्ती होते म्हणून ते सृजनशक्तीचे स्थान समजले जाते.


(ज) विश्वरूप इति ध्यानम् ।

मनुष्याला आपल्या शरीर, मन व बुद्धी यांच्या सहाय्याने होणार्‍या संवेदना, भावना व विचार ह्यांच्या माध्यमातून जे विस्तृत अनुभव येत असतात त्याला ह्या ठिकाणी ' विश्व ' असे म्हटले आहे. व ह्या अनुभव विश्वातून जो प्रत्यय येतो त्यालाच ' विश्वरूप ' असे म्हटले जाते. परमेश्वराचे हे ' विश्वरूप ' म्हणजेच प्रत्यक्ष सर्व विश्व. साधक त्याचे विश्वरूपाने ध्यान करतो व त्याची स्थापना बुद्धिमध्ये करतो. अशावेळी साधक आपले हात एकमेकांत गुंतवुन ध्यान स्थितीमध्ये बसतो.

(क) ऋतुः सुदर्शनः काल इति दिक्बन्धः ।

सत्य ( ऋतम् ) म्हणजे स्वतः ईश्वर. त्याचे शस्त्र म्हणजे सुदर्शन व त्याची विनाशक शक्ति म्हणजेच काल ह्या तीन महाशक्ति साधकाच्या या पवित्र जीवन मंदिराचे रक्षण करण्याकरतां अनुभवाच्या बाह्य प्रांगणात सज्ज असतात. (दि्क-बंध) सर्वकाळी सत्यशील रहाणे व सत्याचीच उपासना करणे म्हणजेच ' ऋतम् '. विवेकाने सर्व स्थितीमध्ये परमेश्वराची लीला बघणे हे ' सुदर्शन ' होय. आपल्यामधील कालाचे उपकरण असलेली जी बुद्धी तिचे नियमन करणे, ह्या तीनही प्रक्रियांमधून निर्माण होणार्‍या शक्तिने भक्त आपल्या हृदयातील पवित्र मंदिराचे असंख्य प्रतिकुल शक्तींपासून रक्षण करतो त्यालाच ' दिक्बंध ' म्हणतात. यावेळी आपल्या मधल्या बोटाने व अंगठ्याने चुटकी वाजवितो व नंतर आपल्या हाताचा तळवा आपल्या मस्तकाभोवती फिरवतो. कारण सर्व विश्वाची धारणा शेवटी बुद्धिमध्येच असते.

(ल) श्री महाविष्णुप्रित्यर्थे जपे विनियोगः ।

स्वतःमध्ये परमेश्वराच्या प्रतिष्ठापनेचा संकल्प केल्यानंतर व त्याला शरण जावून त्याच्याच संरक्षणछत्राचा आश्रय घेतल्यानंतर साधक पुढचे विधान करतो व ते म्हणजे तो आता स्वतःचा विनियोग जपकर्मा मध्ये करणार आहे. परमेश्वराच्या सहस्त्रानामाचा जप. प्रश्न असा येतो किं 'कुठल्या उद्देशाने तो हा जप करणार आहे ? ' त्याच मंत्रात त्याचे उत्तर आहे व ते म्हणजे श्री महाविष्णुच्या प्रीतीकरतां; कृपेकरतां. हा मंत्र म्हणून साधक एक पळीभर तीर्थ आपल्या उजव्या हाताच्या तळव्यावर घेतो व आपल्यासमोर जमिनीवर सांडतो.

खरा भक्त ऐहिक सुखसाधनाच्या वासनेमध्ये कधीच अडकून पडत नाही. त्याचे एकच ध्येय असते व ते म्हणजे परमेश्वराची कृपादृष्टि मिळविणे. हळू हळू साधनेने ती त्याच्या ज्ञानधारणेमध्ये प्रकट होऊ लागते.

ह्या स्फुर्तीदायक व परमार्थास उपयुक्त अशा बारा मंत्रांचा जप करून साधक परमेश्वरास आवाहन करतो व आपल्या अवयवांचे ठिकाणी त्याची प्रतिष्ठापना करतो. या सहस्त्रनाम स्त्रोत्रात ज्या सत्याचा निर्देश करण्यात आला आहे त्याचे सूक्ष्म ध्यान करण्यास येथे साधक पूर्ण समर्थ होतो.

हा सुंदर विधी अंगन्यास या नावांने ओळखला जातो. याचेमुळे साधकास साधना करण्यास स्फुर्ती मिळते एव्हढेच नव्हे तर नव्या साधकांनाही आपल्या पापबुद्धिच्या दडपणापासून थोडावेळ तरी विश्रांती अगर सुटका मिळते. योग्य त्या प्रकाराने व योग्य त्या भक्तीभावाने हा विधी केला असता कांही विशिष्ठ मर्यादेपर्यंत तरी भक्तास अंतर्यामी परमेश्वराशी सारूप्य साधल्याचा अनुभव प्राप्त होतो.

डॉ. सौ. उषा गुणे.






08 August, 2009

बद्ध - मुक्त लक्षणे - (४) (भागवत स्कंध ११ अध्याय ११)

बद्ध - मुक्त लक्षणे - (४)

भगवंत आता संतांना, भगवंताला अभिप्रेत असलेली भक्ति कशी असते आणि अशी भक्ति करणारा भक्त कसा असतो, त्या भक्ताचे २९ ते ३१ या तीन श्लोकांत २८ लक्षणे दर्शिविली आहेत. त्यापुढील दोन श्लोकात (३२ व ३३) आत्यंतिक भक्ताची विशेष लक्षणे सांगितली आहेत.

१. कृपा - सर्वांवर सदा कृपा करणारा, दयाळू . दयाळू भक्ताचे चित्त मोठे विलक्षण असते. प्राणीमात्रांचे जीव तो आपल्या जीवात घालतो, आणि दुःखाचे हरण करून सुख देतो. त्याची कृपा अद्‌भुत असते. श्रीमहाराज (श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज) तीर्थाटन करीत असताना एके समयी भिक्षा मागत एका घरी गेले. त्या घरची माऊली अति चिंतित दिसली. चवकशी करता कळले की घरात तिचा पुत्र अतिज्वराने फणफणत आहे. काही न बोलता महाराज घरात घुसले आणि तिच्या मुलाच्या हातून आपल्या हातावर उदक सोडवून घेतले आणि निघून गेले. काही वेळाने मुलाचा ताप उतरला आणि संध्याकाळपर्यंत तो खणखणीत बरा झाला. पण इकडे श्रीमहराज पुढील अकरा दिवस आजारी होते. (श्रीसद्‌गुरुलीलामृते समास दुसरा ओवी ५९ - ७२). असे भक्ततम जरी कधी कोणावर रागावले तरी - श्रीज्ञानेशांच्या शब्दात - शब्द पाठी अवतरे । कृपा आधी ॥

२. अद्रोह - कोणाशी द्रोह न करणारा. अमुक एक गोष्ट आपल्या मनाविरुद्ध असल्यास वा न पटणारी असल्यास द्रोह उत्पन्न होतो. पूर्ण विरागीच्या ठिकाणी मनोवांच्छेचा अभाव असतो म्हणून कशामुळेही द्रोह होत नाही. सर्वच प्राणीमात्रांमध्ये भगवंताला पहात असल्यामुळे द्रोहाची वार्ताच नाहीशी झालेली असते. कधी आपत्ती उत्पन्न झाल्यास आपत्तीमुळे वा आपत्तीविषयी देखील कधी द्वेष उत्पन्न होत नाही.

३. तितिक्षा - सुखदुःखादि सहन करणे. अभ्यासाने साध्य होणारी ही स्थिती आहे. उद्वेग निर्माण होणे हे साधारणतः बाह्य परिस्थितीमुळे होत असते, आणि तरीही मन शांत ठेवण्याच्या अभ्यासामुळे आंतरीक खळबळ नसते पण त्याचे स्वरूप काहीसे वादळापूर्वीच्या शांततेप्रमाणे सुप्त उद्रेकाप्रमाणे असू शकते. अगदी असह्य परीस्थितीमध्ये स्फोट होऊ शकतो. पण संतांना कोणत्याही बाह्य वस्तुंमध्ये (विषय वा ऊर्मी) भोग घेण्यात रस नसल्यामुळे त्यांच्या ठिकाणी तितिक्षा ही स्वाभाविक असते कारण - योगरतो वा भोगरतो वा सङ्गरतो वा सङ्गविहीनः - परिस्थिती अनुकूल असो वा प्रतिकूल, त्याचे चित्त सदा प्रसन्नच असते, सदा सर्वत्र आनंदी आनंदच असतो - यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नन्दति नन्दति नन्दत्येव ॥

४. सत्य - सत्य हेच जीवनाचे सार असणे - जीवनात कितीही मोठे संकट आले तरी असत्याचा आधार घ्यायचा विचारही मनांत येत नाही. संत आणि इतरांमध्ये मुख्य फरक असतो तो सत्याच्या परीभाषेचा. प्रत्येक व्यक्तिचे सत्, रज, तम या गुणांच्या मिश्रणाचे प्रमाण वेगळे असते. त्यामुळे व त्याच्या वासना, समाजातील त्याचे ठिकाण, सभोंवतालचे वातावरण, सहनक्षमता, मनःस्थैर्य या सर्व गोष्टींमुळे प्रत्येकाची सत्याची परीभाषा वेगळी असते. सनत्कुमार, गौतम, दुर्वास, विश्वामित्र हे सर्व ज्ञानी पण केव्हां ना केव्हां कोपिष्ट होऊन शाप देतच असत. द्रोण ज्ञानी ब्राह्मण पण कौरवांच्या मिंधेपणामुळे आपला स्वामी दुराचार करतोय हे जाणूनही त्याला साथ देणे हे त्यांचे सत्य. तसेच भीष्माला कोणत्याही परिस्थितीत "माझी" प्रतिज्ञा हीच सत्यापेक्षा महत्त्वाची. कृष्ण तर भगवानच. पण त्याच्या सांगण्यावरून सत्यवचनी युधिष्ठीराचे देखील द्रोणवधासाठी - ’नरो वा कुंजरो वा’ असे सांगणे म्हणजे सत्याला धरून चालणे, असे झालेच की. प्रसंगानुरूप सत्याची व्याख्या कशी बदलते याचे एक छान उदाहरण म्हणजे बलिने वामनाला ’तुला काय मागायचे आहे ते माग’ असे म्हटल्यावर त्याचा गुरू शुक्राचार्य त्याला जो उपदेश करतो ते. बलिने तर ’माग’ म्हणून टाकले पण शुक्राचार्य जाणतात की वामन काय मागणार आहे. ते बलिला सांगतात (भागवत ८.१९.३९-४०) - "हे राजा, श्रुति वाक्यानुसार आता ’हो’ म्हणणे हे सत्य आहे आणि नकार देणे असत्य आहे. पण एक लक्षात ठेव, हे शरीर हा एक वृक्ष आहे आणि सत्य याचे फूल व फळ आहे. पण वृक्षच राहिला नाही तर फूल वा फळ कसे राहणार ? असत्य हेच शरीररूप वृक्षाचे मूळ आहे. म्हणून नकार देऊन शरीर वाचवावे. जसे मूळ राहिले नाही तर काही काळातच वृक्ष सुकून गळून पडतो, त्याचप्रमाणे असत्याशिवाय देह तात्काळ नष्ट होईल यात शंका नाही." त्यांना बहुधा सांगावयाचे होते की ’अतिरेक करू नकोस.’ एवढे सांगूनही बलि वामनाला दान करतोच, पण तो सत्यासाठी का "माझा शब्द खोटा होऊ नये" या अभिमानापोटी याबद्दल भागवतात काही माहिती नाही. पण दान दिल्यावरही त्याला भगवंताने (वामनाने) सुतललोकी (पाताळात) पाठवलेच. पुढे भगवतात एके ठिकाणी (८.२०.१६) बलि सत्यापासून ढळला नाही असा उल्लेख असला तरी ८.२२.३ येथे तो म्हणतो - "नरक, पाश, दुःख, दारिद्र्य, शिक्षा याला मी भीत नाही जितका मी माझ्या अपकीर्तिला भितो." भविष्यात कोणत्यातरी मन्वंतरात त्याला इंद्र केले जाणार आहे हेही भागवतात सांगून ठेवले आहे. यावरून शंका येते की बलिला सत्यापेक्षा इंद्रपद, माझी अपकीर्ति (म्हणजे एकून विषयच ना ?) हेच महत्त्वाचे असावेत. as against this दशरथाने सत्यापासून न ढळता मरण पत्करले असले तरी पुत्रस्नेहाव्यतिरिक्त त्याला आणखी कोणतीही अभिलाषा असल्याचा कुठे उल्लेख नाही. असो.
तात्पर्य : जीवनात सत्याला कोणते स्थान द्यायचे, त्याचा अतिरेक करायचा का त्याला चिकटून राहून वेळप्रसंगी सर्वनाश ओढवून घ्यायचा, असे हे सत्य प्रत्येकासाठी वेगळे असते एवढे मात्र खरे.

पुढची (२४+२) लक्षणे यथावकाश.

क्रमशः

एकोहम्

30 July, 2009

मानसमणिमाला (२२)

मानसमणिमाला (२२)


हिंदी : छमिहहिं सज्जन मोरि ढिढाई । सुनिहहिं बाल वचन मन लाई ॥ ८ ॥

जैं बालक कह तोतरि बाता । सुनहिं मुदित मन पितु अरु माता ॥ ९ ॥

हँसिहहिं क्रूर कुटिल कुबिचारी । जे पर दूषन भूषन धारी ॥ बाल. २.७.१० ॥

मराठी : सज्जन मम उद्धटता क्षमतिल । मन लावुन शिशु-शब्द ऐकतिल ॥ ८ ॥

बोल बोबडे बालक बोलति । माता पिता मुदित मन ऐकति ॥ ९ ॥

क्रूर कुटिल हसतिल कुविचारी । जे पर-दूषण-भूषण-धारी ॥ १० प्रज्ञानानंद ॥


अर्थ : या माझ्या ज्यादा धीटपणा बद्दल संत, सज्जन मला नक्कीच क्षमा करतील; आणि माझी बालभाषा मनापासून ऐकून घेतील. जेव्हां आपले लहान मूल बोबडे बोल बोलू लागते तेव्हां आईबाप ते बाळबोल ऐकून आनंदित होतातच ना ! कदाचित्‌ कुविचारी कुटिल माणसे मला हसतील. कारण दुसर्‍याचे दोष शोधून ते इतरांना दाखविण्यंत त्यांना स्वतःला भूषणच वाटत असते.


संत सज्जनांचे चित्त उदार आणि सर्वांप्रति क्षमाशील असते. त्यामुळे ते इतरांचे अपराध, गैरवर्तन माफ करतात. त्यातून असे वर्तन एकाद्या अज्ञानी बालबुद्धीच्या व्यक्तिकडून घडले असेल तर अहैतुकि कृपासिंधु असलेले संत क्षमा तर करतातच पण ते वर्तन सुधारावे म्हणून मार्गदर्शनही करतात, चूक सुधारून घेतात.


इथे तुलसीदास संतांना विनवीत आहेत' की मी जे रामयशोगान करण्याचे माझ्या अवाक्याबाहेरचे काम करण्याचे धाडस करीत आहे त्याबद्दल आपणही अशीच उदार दृष्टि ठेवावी. मी लहान अज्ञानी बालक आहे, त्यामुळे आपल्यासमोर बोबड्या शब्दांत काहीतरी सांगायचा प्रयत्‍न करीत आहे. मातापित्यांनाच आपल्या बाळाचे चुकत माकत काढलेले शब्द समजतात, ते मनापासून ते शब्द ऐकतात आणि त्यांचे मन आनंदाने भरून जाते. त्याचप्रमाणे आपणही माझ्या बालबोलीकडे दुर्लक्ष करावे. आपण क्षमा करालच याबद्दल मला खात्री आहे कारण मी 'रामचरितगान' करीत आहे, हा माझा उद्देश तरी उदात्त आहेच. माऊली ज्ञानेश्वर म्हणतात - " नातरी बालक बोबडा बोली । कां वाकुडा विचुका पाऊली । ते चोज करुनी माऊली । रिझे जेवी ॥ तैसा मी जरी तुम्हाप्रती । चावटी करीतसे बाळमती । तरी तुम्ही तोषिजे ऐसी जाती । प्रेमाची या ॥ (ज्ञानेश्वरी ९-६,१६) "


माझे हे धाडस कांही कुविचारी लोकांना हास्यास्पद वाटण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते यांतील चुका, त्रुटी शोधून काढण्यांतच दंग होतील एवढेच नव्हे तर हेच आपले बुद्धिचातुर्य आहे असे भूषण मिरवितील. मिरवू देत बापडे ! त्यांची वृत्तीच तशी असते ना ! - 'हंसहि बक गादुर चातकहि । हँसहि मलिन खल विमल बत कही (२.८.२) - डबक्यांत मासे धरणारे ढोंगी बगळे मानस सरोवरांत विहार करणार्‍या राजहंसांनाही हसतात आणि निशाचर , कर्कश आवाज करणारी वटवाघुळे अनन्यचित्त चातकांना क्षुद्र लेखतात. अगदी तसेच खल दुर्जन माझ्या या विमल, अनन्य प्रेमभक्तिला व उपासनेला हसतील, क्षुद्र लेखतील. परंतु माझे मायबाप संतसज्जन व प्रभु सीताराम मला खचितच आपला म्हणतील नां !

डॉ. सौ. उषा गुणे.

28 July, 2009

बद्ध - मुक्त लक्षणे - (३) (भागवत स्कंध ११ अध्याय ११)

बद्ध - मुक्त लक्षणे - (३)
(भागवत स्कंध ११ अध्याय ११)

कैवल्य उपनिषदांत म्हटले आहे - त्यागेन एके अमृतत्त्वं आनशुः - त्याप्रमाणे भगवंतांनी, "तीव्र वैराग्याने देहाभिमान घालवायचा" असे एक prescription in a nutshell सांगून टाकले. शुकमुनि, शंकराचार्य, ज्ञानदेव अशा सारख्या मंडळींसाठी या वैराग्य गुटीच्या उपदेशाची एक मात्रा पुरे. पण सामान्यांचे काय ? उद्धव श्रीकृष्णाला सांगत आहे, आमचे चित्त तर इतके चंचल [’प्रमाथी बलवत् दृढम्’ - गीता] आहे की तू हे जे वैराग्य म्हणतोस ते दोन पळेसुद्धा टिकणारे नाही. आता बोल.

भगवंत म्हणतात - खरे आहे. ’मी विरागी’ हा अभिमान देखील मनुष्यासाठी कोणते वेगळे जाळे विणतो आणि त्यामुळे तो या मायामय संसारात कसा पहिल्यापेक्षाही अधिकच गुरफटून जातो याचा त्याला पत्ताही लागत नाही. कारण थोड्या प्रमाणांतील वैराग्यही आसपासच्या लोकांत मान-मरातब मिळवून द्यायला कारणीभूत होते. आणि अशावेळी जर मनुष्य सावध राहिला नाही, तर ’लोकेषणा’ नामक वासनेच्या अधीन व्हायला वेळ लागत नाही. लोकेषणेची तहान भल्याभल्यांना देखील गुंडाळून टाकते. मग वैराग्ययुक्त आचरणाचा उपदेश अशा self glory च्या वासनेत रमणार्‍या लोकांना पटतही नाही. ज्याला आत्मप्रौढीच्या वासनेतून निर्मुक्त होऊन सहज आत्मस्वरूपात स्थित व्हायची तीव्र इच्छा आहे अशांसाठीच हे prescription.

वैराग्य म्हणजे संन्यास. संन्यास दोन प्रकारचा असतो. आळसामुळे, तमोगुणाच्या प्राबल्यामुळे कष्ट टाळण्यासाठी अंगिकारलेला बाह्य कर्मसंन्यास, आणि दुसरा उत्साहाने पण आसक्तिरहित होऊन सर्व कर्मे पार पाडीत असतां कर्मफलाशी असंग राहून (no trace of proud if accomplished or no regret if failed) घडणारा आंतरीक संन्यास. बाह्य संन्यासाचा अंगिकार केलेला संन्यासी प्रत्यक्ष कर्म करीत नसला तरी ’मनसा स्मरन्’ करीत असतो आणि बाहेरून ’कर्मेंद्रियाणि संयम्य’ असा देखावा करीत असतो. त्यामुळे वासनाक्षय कधीच होत नाही आणि म्हणून पुढे लोकेषणेची तहान दृढावते. या करीता संन्यास - वैराग्य या दिशेने पाऊल टाकायच्या आधी कर्म कोणते, अकर्म कोणते, विकर्म कोणते हे नीट जाणून घेणे आवश्यक आहे.

आता चंचल, प्रमाथी मनाला संयमीत करायचे, वैराग्य, त्यागवृत्ति जोपासायची म्हणजे सदा भरकटत असणार्‍या मनाला सतत (हो अगदी सतत) जागरूक राहून - hey ! turn back, not that way, this way असे निरंतर वळवत राहावे लागणार. मग go this way म्हणजे which way ? भगवंत दोन तीन मार्ग सांगतात. ’तत्त्वजिज्ञासा’ (श्लोक २१). जितकी शरीरे दिसतात, जितक्या चेतन वस्तु दिसतात, ते सर्व पृथक् पृथक आत्मे आहेत असा मनुष्याला जो भास होतो तो दूर सारून ’आत्मा सर्वत्र एकच आहे’, ’सर्व दृष्यमय जगत् भासमय - मिथ्या आहे’ हा भाव दृढ करावा. ’नानात्वभ्रममात्मनि’ अनेकत्वाचा भास दूर करावा. अशा प्रकारे मनाची शुद्धी होत होत त्याला मज सर्वव्यापी परमेश्वराचे ठिकाणी लावावे - मनो मय्यर्प्य विरजं. पण हे सोपे नाही. याला विहंगम मार्ग म्हणतात. तो सर्वांसाठी नाही. मग दुसरा मार्ग ? ’मयि सर्वाणि कर्माणि निरपेक्षः समाचर (श्लोक २२) सर्व कर्मे निरपेक्षपणे केवळ माझ्यासाठीच करतोयस ही भावना ठेवून कर. म्हणजे काय होईल ? धर्म, काम, अर्थ मदर्थे आचरन्, मयि निश्चलां भक्तिं लभते (श्लोक २४). OK. पण तुझी भक्ति लाभली की मी बद्धाचा मुक्त कसा होईन ? ’मदर्पण’ भावनेने धर्म, अर्थ कामाचे आचरण करायला लागलास की संतांचा सत्संग लाभतो. मग सत्संगाने मनुष्य भक्तिपूर्वक माझी उपासना करतो. आणि पुढे संत ज्याचे नेहमी वर्णन करतात, ज्याचा निर्देष करतात, जे भक्तांना दाखवितात, ते माझे परमपद तो सहजच प्राप्त करतो, अर्थात् त्यायोगे बद्धाचा मुक्त होतो.

आता हा संत कसा असतो ? त्याची लक्षणे कोणती ? भक्ति आम्हाला ठाऊक आहे. पण संतांनी सांगितलेली भक्ति कोणती ? ती कशा प्रकारची असते ? हो, आता आमचा गणूही गायन करतो आणि तानसेनही गायन करायचा. मग कोणासारखे गायन केले असता परमपद प्राप्त होईल ? संतांमध्ये असे कोणते वैशिष्ट्य असते की जे गायनकले मधे तानसेनाचे म्हणावे ? पाहू पुढे.
(क्रमशः)
एकोहम्

26 July, 2009

श्री विष्णु सहस्त्रनाम - (प्रस्तावना -२)

।। श्री विष्णु सहस्त्रनाम ।।

सध्या दक्षिणेमध्ये प्रचलित असलेल्या व उत्तरेत प्रचलित असलेल्या विष्णु सहस्त्रनामामध्ये थोडा थोडा फरक आढळून येतो. परंतु या पाठभेदांना फारसे महत्व देण्याचे कारण नाही. तसेच विष्णु सहस्त्रनामाचे पारायण करण्यापूर्वीच्या अर्चना पद्धती मध्येही थोडासा फरक आढळून येतो.

पुराणांची रचना करणार्‍या श्रीवेदव्यासांनीच श्रविष्णु सहस्त्रनामाची रचना केलेली आहे व हे अप्रतिम स्त्रोत्र त्यांच्या विख्यात अशा महाभारत ह्या ग्रंथात समाविष्ट झालेले आपल्याला आढळते. भारतीय युद्धाचे शेवटी ज्येष्ट पांडव राजा युधिष्ठीर भीष्म पितामहांच्या दर्शनांस जातो. त्यावेळी कुरूवंशातील अपराजित व दुर्दम्य असा हा पुरूषश्रेष्ठ परमेश्वराकडे घेऊन जाणार्‍या पवित्र क्षणांची वाट पहात, तीक्ष्ण बाणांची शय्याकरून पहुडलेला असतो. धर्मज्ञ युधिष्ठीराने त्यांना सहा प्रश्न विचारले आहेत. व भगवान कृष्णाचे नित्य स्मरण करणार्‍या व महान कर्मयोगी भीष्मांनी त्यांची सहज शांतपणे उत्तरे दिलेली आहेत. अशातर्‍हेने हिंदूंच्या अक्षर वाङमय असलेल्या महाभारतात हे विष्णू सहस्त्रनाम अंतर्भूत झाले आहे.

युधिष्टीर हा धर्मपरायण व आध्यात्मिक मनोवृत्तीचा आहे. पूर्णतः नितिनिपूण असून विचक्षण व्यक्तीमत्वाचा हा राजा साधारणतः सर्वच साधकांचे समोर जे प्रश्न उठतात तेच प्रश्न ह्या ठिकाणी विचारतो आहे.

प्रश्न १ - किमेकं दैवतं लोके ?
जगतामध्ये सर्वश्रेष्ठ असे दैवत कोणचे आहे?
उत्तर १ : - पवित्राणां पवित्रं यो मंगलानांच मंगलम् ।
दैवतं देवतानांच भूतानां योऽव्ययः पिता ।

सर्व पवित्र वस्तूंना ज्याच्यामुळे पावित्र्य प्राप्त झाले आहे व जो स्वतःच मूर्तीमंत पावित्र्य आहे; जो मंगलांचे मंगल असा परममंगल आहे; सर्व दैवतांचे दैवत आहे, सर्व प्राणिमात्रांचा आद्यपिता जगत्प्रभू "श्री विष्णू''.

प्रश्न २ - किंवाप्येकं परायणम् ?
सर्वांचे 'आश्रयस्थान' असा कोण आहे ?
उत्तर २ : - परमं यो महत्तेजः परमं यो महत्तपः ।
परमं यो महद्ब्रह्म परमं यः परायणम् ।

जो महान तेजस्वी आहे, जो सर्वश्रेष्ठ नियन्ता आहे, जो सर्वव्यापी असे महान ब्रह्म आहे, तोच सर्वांचा सर्वश्रेष्ठ 'आश्रय' आहे. '' श्री विष्णू''.

प्रश्न ३ - स्तुवंतं कं प्राप्नुयुर्मानवाः शुभम् ?
कोणाची स्तुती केली असता मानवाला शुभ प्राप्ती होईल? (शांति व समृद्धी)
उत्तर ३ - जगत्प्रभुं देवदेवमनन्तं पुरूषोत्तमम् ।
स्तुवन्नाम सहस्त्रेण पुरूषः सततोत्थितः ।

जगताच्या कल्याणकरतां जो सदैव जागृत व कर्मरत आहे असा जगताचा प्रभू अनन्त पुरूषश्रेष्ठ '' श्री विष्णू''

प्रश्न ४ - कमर्चन्तः प्राप्नुयुर्मानवाः शुभम् ?
कोणाची पूजा केली असता मानवाला सर्व शुभ प्राप्ती होईल ?
उत्तर ४ : - तर्मेव चार्चयन्नित्यं भक्त्या पुरूषमव्ययम् ।
ध्यायंस्तुवन्नमस्यश्च यजमानस्तमेवच ।

त्या पुरूषोत्तमाचे नित्य ध्यान केले असता, त्याचे नित्य पूजन केले असतां व त्याला वारंवार नमन केले असता मनुष्याला सर्व शुभ प्राप्ती होईल.

प्रश्न ५ - को धर्मः सर्व धर्माणां भवतः परमो मतः ?
आपल्या मताप्रमाणे सर्वधर्मात श्रेष्ठ धर्म कोणता?

प्रश्न ६ - किं जपन् मुच्यते जन्तुर्जन्मसंसार बन्धनात् ?
कोणाचा जप केला असता प्राणी जन्म व संसार बंधनातून पलीकडे जाईल ?

उत्तर ५व ६ : - अनादि निधनं विष्णुं सर्वलोक महेश्वरम् ।
लोकाध्यक्षं स्तुवन्नित्यं सर्वदुःखातिगो भवेत् ।

शेवटच्या दोन्ही प्रश्नांचे हे उत्तर आहे. सर्वश्रेष्ठ धर्म स्वतः श्री विष्णुच आहे. ज्याला 'आदि ' नाही व 'अंत' ही नाही असा तो जगताचा महाप्रभू आहे. जो नित्यशः सहस्त्रनामाचा पाठ करतो व सर्वज्ञानी परमेश्वराची अंतरांत स्तुती करतो तो सर्व दुःखे पार करून जातो व संसार बंधनातून मुक्त होऊ शकतो.

परमेश्वराचे असे वर्णन केले जाते कि, ' ज्याचेपासून सुरवातीला सर्व नामरूपात्मक जगताची उत्पत्ती झाली, ज्याच्या आधाराने जगताचे पालन (स्थिती) होत आहे व प्रलयाचे वेळी ज्याच्यामध्ये सर्व जगत् लय पावते तो परमेश्वर म्हणजेच "श्री महाविष्णु''.

युधिष्ठीराच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर भीष्म म्हणतात, '' आता मी तुला त्याची एक हजार नावे सांगतो. ती तू पूर्ण अवधान देऊन श्रवण कर.'' अशाप्रकारे विष्णु सहस्त्रनाम हे स्त्रोत्र महाभारतात गुंफले गेले.

त्या ईश्वराची खरे पाहतां व्याख्या करतांच येत नांही, कारण तोच सर्व गुणांचा मूलाधार आहे त्यामुळे कुठल्याही नावांने त्याचे नामकरण होऊ शकत नाही. कुठल्याही उक्तीने त्याचा निर्देश करतां येत नाही, कोणत्याही भाषेत त्याची व्याख्या करता येत नांही अगर कुठल्याही वांङमयीन कृतीने त्याचे पुसटसे वर्णनही करतां येत नांही. तो सर्व ज्ञात व अज्ञात जगताच्याही पलीकडे आहे. आपले सर्व अनुभव ग्रहण करणारी व ज्ञान प्रकाश देणारी शक्ती तो स्वतःच आहे.

तरीही त्याची अनेक व्यक्तरूपेहि आहेत. त्या व्यक्तरूपांच्या संदर्भात त्याची अनेक नामेही असणे शक्य आहे. ज्या वस्तूची व्याख्या केली जाते तिचे पूर्ण स्वरूप आपल्याला सरळ त्या व्याख्येमुळे समजते. या ठिकाणी जे सत्य आहे व अनंत आहे त्याची व्याख्या एक हजार पर्यायी सीमित व नाशवंत वस्तूमधून कलेली आढळते. पूर्वी ऋषींनी ही सहस्त्रनामे तयार केली व जगताला उपदेशिली. द्रष्टेकवी श्री व्यासांनी ती सर्व नामे श्रीविष्णुस्त्रोत्र रूपाने एकत्र बांधली व मोठ्या श्रध्देने ही भक्तीमाला श्रीविष्णूला अर्पण केली.

अशा तर्‍हेने ह्यातील प्रत्येक नाम हे ज्ञाताच्या माध्यमातून त्या अज्ञात सत्याचा निर्देश करीत असल्यामुळे ज्यावेळी आपण त्या त्या व्याख्यांवर सूक्ष्मचिंतन करतो तेव्हा मन एका उच्च अवस्थेत झेप घेते व दिव्य अनुभवापर्यंत पोहोचते. त्यामुळेच हे विष्णुसहस्त्रनाम भक्त आपल्या दैवता बरोबर मधुर भक्तीभावनांची क्रिडा करण्याकरिता उपयोगात आणतात तर तत्वज्ञानाचे जिज्ञासू विद्यार्थी आपल्या तत्वचिंतनातून उच्च जाणिवेच्या अवस्थेत जाण्याचे वाहन म्हणून ह्याचा उपयोग करतात.

'कलिसंतरण उपनिषत्'१ नावाचे एक लहान उपनिषतद आहे व त्यामध्ये असा उल्लेख आहे कि एकदां परमभक्त नारद ब्रह्मदेवाकडे जातात व त्या कलीयुगातील अनिवार्य व कठीण अशा बहिर्मुखवृत्तींपासून निवारण करून मनुष्याला स्वतःचा विकास करता येईल असा उपाय विचारतात. तेंव्हा '' आदिपुरूष नारायणाच्या नामजपानेच मनुष्याचा उद्धार होईल '' असे उत्तर ब्रह्मदेवाकडून मिळाले. ह्या ठिकाणी एका गोष्टीचा मुद्दाम उल्लेख करणे अत्यावश्यक आहे किं सहाव्या प्रश्नामध्ये '' प्राणिमात्रास त्याचे श्रेष्ठ ज्ञान कसे होईल'' अशी विचारणा केली आहे. 'जन्तु ' ह्या शब्दाचा अर्थ जो जन्मास आला तो. (जनन धर्मा) त्या शब्दामुळे सर्व मनुष्येतर प्राणीहि हे ज्ञान मिळविण्यास अधिकारी आहेत असे सुचविले आहे. व ह्याचे अनेक उल्लेख आपल्याला पुराणांनी अत्यंत काव्यमय भाषेत उपलब्ध करून दिले आहेत. त्रिकुटाचलावरील तळयात असलेल्या मगरीने गजेद्राचा पाय धरला असतां त्याचे त्याचे परमेश्वराने रक्षण केले ( गजेन्द्रमोक्ष ) त्याच प्रमाणे जडभरताची कथा हेहि त्याचे आणखी एक उदाहरण आहे.

शंकराचार्यांनी आपल्या भाष्यामध्ये ह्या ठिकाणी तीन तर्‍हेच्या जपाचा समावेश केला आहे. (अ) जो जप इतरांना ही ऐकू जाईल असा (ब) जो स्वतःलाच ऐकू येतो असा (क) व जो केवळ मानसिकच आहे असा. विष्णुसहस्त्रनामाचा जप तीनही प्रकारांनी करता येतो.

ह्या सहस्त्रनामामध्ये कांही ठिकाणी क्वचित्त पुनरूक्ती झालेली आपल्याला आढळून येते. ह्यातील बरोबर ९० नामांची पुनरूक्ती झालेली आहे. त्यापैकी ७४ नामे दोनवेळा पुनरूक्त झालेली आहेत; १४ नामे ३ वेळां व २ नामे चारवेळां पुनरूक्त झालेली आढळतात. कांहीवेळां एकच नाम पुनःपुन्हा आलेले आहे. जसे विष्णु विष्णु , शिव शिव.

कांहीवेळां समानार्थी शब्दच अनेकवेळा वापरलेले आहेत. जसे श्रीपती - माधव, पुष्कराक्ष - कमलाक्ष. परंतु हे स्त्रोत्र त्याच्याच विभूतींचे वर्णन करणारे असल्यामुळे हा दोष मानण्याचे कांही कारण नाही, स्तुतीस्त्रोत्रांमध्ये पुनरूक्ती ग्राह्य मानली जाते. भावपूर्ण हृदय आपली प्रेम भावना व्यक्त करण्याकरतां हीच पद्धत स्विकारते.

ह्या सहस्त्रनामामध्ये परमेश्वराची १०३१ एकेरी नामे दिलेली आहेत. ह्यातील १०० पेक्षां जास्तीची ३१ नामे ही त्याला लागून आलेल्या आधीच्या नामांची विशेषणे समजली पाहिजेत. ज्यावेळी परमेश्वराची ह्या सहस्त्र नामांनी अर्चना२ केली जाते त्यावेळी त्या नामाचे चतुर्थी विभक्तीचे रूप वापरले जाते. ह्या स्त्रोत्रांमध्ये २० जोडनांवे आहेत व ती३ पहिल्या पांचशे नामामध्ये आली आहेत. पुढील ११ जोडनांवे स्त्रोत्राच्या पुढील अर्ध्या भागांत आली आहेत.

ह्या स्त्रोत्रात एकच अव्यय वापरण्यात आलेले आहे. (८९६ वे - सनात्), अर्चनेमध्ये 'सनात् नमः' असे त्याचे चतुर्थीचे रूप वापरले जाते. त्याचप्रमाणे ९२९वे नाम हे अनेकवचनी असल्यामुळे अर्चनेमध्ये सदभ्यो नमः असे म्हटले जाते.

आपण ह्या दिव्य नामांचा खोल अर्थ पाहू लागलो कि असे दिसून येते किं व्यासांनी कांही ठिकाणी पुल्लिंगी नामें वापरली आहेत, कांही ठिकाणी स्त्रीलिंगी तर कांही ठिकाणी नपुसकलिंगीहि नामे आहेत. ज्या ठिकाणी पुल्लिंगी नामे आहेत तेथे लक्ष्मीचा पती श्रीविष्णु ह्याचा निर्देश केला जातो. ज्या ठिकाणी स्त्रीलिंगी नामे आहेत तेथे शक्ति, सत्ता अगर महत्ता निर्देशिली आहे, व जेथे नपुंसकलिंगी नामे आहेत तेथे शुद्ध ब्रह्म, अनंतज्ञानाचा निर्देश आहे.

साधारणतः ही अर्चना भगवत्भक्त रोज करतात. व ते करणे सोईचे नसेल तर ही पूजा स्वतःचे वाढदिवशी, ग्रहणाचे दिवशी अगर सूर्य एका वृत्तामधून दुसर्‍या वृत्तांत जातो अशा संक्रमणाचे दिवशी केली जाते. शास्त्रामध्ये अशातर्‍हेचा पूजाविधी ग्रहयोग, राजाची अवकृपा, असाध्य व्याधी, दुष्टशत्रू ह्या सर्वांपासून होणार्‍या दुःखाच्या निवारणार्थ सांगितलेला आहे. परंतु सर्वात महत्वाचा परिणाम म्हणजे अंतःकरण शुद्धि व त्यामुळे साधकांस ध्यानामध्ये उत्तरोत्तर मिळत जाणारे समाधान !
----------------------------------------------------
१ सर्व श्रुतिरहस्यं गोप्यं तत् येनकति संसारं तरिप्यसि भगवतः आदिपुरूषस्य नारायणस्य नामोच्चारणमात्रेण निर्धूतकलिभवति ।। कलिसंतरण उपनिषत् .१.
२ पहिल्या शंभरांत ५ जोडनांवे आहेत ती अनुक्रमे १२, १६, ३०, ४६, ५५. दुसर्‍या शंभरांत २ जोडनांवे आलेली आहेत ती अनुक्रमे १२०, १२४. तिसर्‍या शंभरांत ४ जोडनांवे आलेली आहेत ती अनुक्रमे २१७, २३२,२७५. चवथ्या शंभरांत ४ जोडनांवे आलेली आहात ती अनुक्रमे ३३३, ३५९, ३९०, ३९९. पाचव्या शहभरांत ५ जोडनांवे आलेली आहेत ती अनुक्रमे ४०४, ४२७, ४२९, ४५४, ४९३.
३ उत्तरार्धात ६ व्या शतकांत ६ जोडनांवे आहेत. ५१४, ५३१, ५५२, ५५६, ५७२, ५७३. ७ व्या शतकांत १ जोडनांव आहे. ६२७. ८ व्या शतकांत ३ जोडनांवे आहेत. ७३२, ७९४, ७९९.
_________________________
(क्रमशः)
डॉ. सौ. उषाताई गुणे .