25 February, 2009

मानसमणिमाला (२१)

मानसमणिमाला (२१)

हिंदी : निज बुधि बल भरोस मोहि नाही ।

तातें बिनय कर‍उँ सब पाहीं ॥ बा. कां. २.७.४

करन चह‍उँ रघुपति गुण गाहा ।

लघु मति मोरे चरित अवगाहा ॥ ५ ॥

सूझ न एक‍उ अंग उपा‍ऊ ।

मन मतिं रंक मनोरथ राऊ ॥ ६ ॥

मति अति नीच उँचि रुचि आछी ।

चहि‍अ अमि‍अ जग उर‍इ न छाछी ॥ ७ ॥

मराठी : मज निज मतिबल-निश्चित नाहीं ।

म्हणून विनवितो सर्वांनाही ॥ ४ ॥

मज इच्छा रघुपति-गुण-गानी ।

चरित अगाध नि मम मति सानी ॥ ५ ॥

नुमजें अंगां एक उपाया ।

मन मति रंक मनोरथ राया ॥ ६ ॥

मति अति नीच उच्च रुचि रुचिरहि ।

अमृत इच्छि जगिं मिळत तक्र नहिं ॥ ७ ॥


अर्थ : मला माझ्या बुद्धीचा व बलाचा जराही भरवसा वाटत नाही. म्हणून मी सर्वांना विनंती करत आहे ॥ ४ ॥ रघुपतींच्या चरित्राचे, गुणांचे वर्णन करावे अशी माझी फार इच्छा आहे खरी, पण त्यांचे चरित्र किती अगाध आहे आणि माझी बुद्धि किती तोकडी आहे ॥ ५ ॥ उत्कृष्ट काव्याची अंगे, त्याच्या पद्धती यातील कांहीच मला माहीत नाही. माझी बुद्धि अगदी निकृष्ट आहे, मन कंगाल आहे पण माझे मनोरथ मात्र राजाचे आहेत बरं ! ॥ ६ ॥ मी अल्प बुद्धीचा असलो तरी माझी रुचि मात्र उच्च प्रतीची आहे. प्रत्यक्षांत जगात मला कुणी ताकही द्यायला तयार नाही पण, महत्वाकांक्षा मात्र अमृत प्राप्त करून घ्यायची आहे ॥ ७ ॥


संत तुलसीदास आपल्या ग्रंथाचा आरंभ करीत आहेत. प्रभु रामचंद्रांचे गुणगान करण्याची मनीषा ते व्यक्त करीत आहेत. अत्यंत विनम्रभावाने या कार्याकरितां आपले, बुद्धि, बल अगदीच अपुरे आहे अशी ते कबूली देतात. हा त्यांचा विनय असला तरी प्रभूंचे चरित्र अगाध, अपार आहे यांत काहीच शंका नाही. त्यामुळे आपल्याला सर्वांनी सांभाळून घ्यावे अशी ते वारंवार विनंती करतात. मुळात भगवंताच्या चरित्राचे गान करायचे हा आपला विचारच इतका राजस, उच्च प्रतीचा आहे कीं आपली बुद्धि तुटपुंजी असली तरी चालेल, मन सद्‌विचारांच्या बाबतीत अगदी दरिद्री असले तरी चालेल, आणि लौकिकात आपल्याला ताकासारखी क्षुद्र वस्तू मिळविण्याची पात्रता नसली तरी चालेल पण आपली रुचि प्रभूंचे गुणगान करणारी, उच्च प्रतीची आहे म्हणून तिला अमृतप्राप्ति होणारच असा त्यांचा ठाम विश्वास आहे. ज्ञानेश्वर माऊली भावार्थ दीपिकेंत म्हणतात -

शब्द कैसा घडिजे । प्रमेयीं कैसें पां चढिजें ।

अळंकारु म्हणिजे । काय तें नेणें ॥ १८.१७६८ ॥

सायिखडेयाचें बाहुलें । चालवित्या सूत्राचेनि चाले ।

तैसा मातें दावीत बोले । स्वामी तो माझा ॥ १७६९ ॥


आपल्या स्वामींवर पूर्ण श्रद्धा असल्याने ते सर्व तर्‍हेने सांभाळून घेतात याचा भरंवसा सर्वच संतांना असतो. त्यामुळेच त्यांच्या हातून उत्तुंग कार्ये घडतात. भगवंताच्या कृपेने "जरी प्रकटे सिद्धसरस्वती । तरी मुकेयाहि आथी भारती । एथ वस्तुसामर्थ्यशक्ति । नवल कायी ॥ १.७८ ॥ स्वतःला अल्पमति म्हणविणे, मुका बाहुला म्हणविणे हा त्यांचा विनम्र भाव असला तरी 'वस्तु सामर्थ्य शक्ति' त्यांच्यातूनच व्यक्त होते नां ?

डॉ. सौ. उषा गुणे.

20 February, 2009

या देवी सर्वभूतेषु

या देवी सर्वभूतेषु

:

प्राणीमात्राच्या जीवनाची एकंदर जडण घडण श्रद्धेतूनच होत असते. प्रत्यक्ष हे एक श्रद्धेचे महत्त्वाचे प्रमाण आहे. आपण प्रत्यक्ष पाहिलेल्यावर मनुष्यमात्राची सहजच श्रद्धा बसते. त्याच प्रमाणे शब्द प्रमाणाचे. आप्त वाक्यातून पण श्रद्धेचा उगम होत असतो. येथे आप्त म्हणजे नातेवाईक सोयरे धायरे असा अर्थ अभिप्रेत नाही. तर आप्त म्हणजे, संत, साधु, श्रीसद्‌गुरू, अध्यात्मग्रंथ इत्यादि. ज्यांना आपण ज्येष्ठ श्रेष्ठ पूज्य मानतो. त्यांच्या शब्दावर आपला सहजच मोठा विश्वास बसतो. त्यांचे शब्द आपल्याला सत्य वाटतात. वेदतुल्य वाटतात.


श्रद्धाकेंद्रे अनेक असतात. व्यक्ति व्यक्ति समाज राष्ट्र यांच्या स्तरावर भौतिक जीवनांत ती भिन्न भिन्न सगळ्यांचे ध्येय एकच. ते म्हणजे आत्मज्ञान, आत्मसाक्षात्कार, आत्मानुभव. आणि ते ध्येय गांठण्याचा निश्चित मार्गही पण एकच. तो म्हणजे नामसाधन. नामस्मरण. या साधनाची प्रक्रिया पण सामान्यतः एकच आहे. म्हणून अध्यात्म जीवनांत श्रद्धेचे स्थान एकच. आपले श्रीगुरू.


या क्षेत्रांतील महाजनांमध्ये श्रीसद्‌गुरूचे स्थान श्रेष्ठतम. त्यानंतर क्रमांक म्हणजे सगळे आत्मसाक्षात्कारी संत.


संत सद्‌गुरु भेटणं कठीण. महाकठीण. "पूर्व जन्मी सुकृते थोर केवी । ती मज आजि फळासी आली ॥" असे खुद्द श्रीगुरूज्ञानेश्वरमहाराज म्हणतात, मग आपला काय पाड नां ? बरं भेटले तर त्यांच्यावर श्रद्धा बसणे आणखी कठीण. एवढ्यानीही झालं नाही. श्रद्धा बसली आपली, तरी त्यांची कृपा होणे कठीण. श्रीगुरुंची कृपा म्हणजे त्यांच्याकडून सबीज नाम मिळणे त्याहून कठीणच. श्रीगुरूंची कृपा म्हणजे त्यांच्याकडून नाम मिळणे. पण आपल्या संपर्कात, सान्निध्यात, आपल्याजवळ देणार्‍या जीवींचा भक्तिप्रेमभाव, श्रद्धा, त्याचे अंतःकरण ते जाणतात. आणि मगच त्याच्यावर कृपानुग्रह करतात. आता अशा कसोटीला उतरून नाम जरी मिळाले तरी, सुरुवातीची श्रद्धा, पुढे शेवटपर्यंत टिकवणे हे पण अति महत्त्वाचे. अत्यंत प्रयासाने, कष्टाने, त्याआड येणार्‍या सर्व गोष्टी निर्भयपणे बाजूस सारून ती श्रद्धा जोपासावी लागते, टिकवावी लागते.


श्रीगुरुंवरील अर्थात निवृतिमार्गावरील श्रद्धेला प्रवृत्ति मार्गातील अनेक धोके असतात. अध्यात्ममार्गातील या श्रद्धेचा मुख्य शत्रु म्हणजे देहभाव. देह भावांतच सुख वाटले तर श्रद्धा तेथेंच विसंबते. कारण जेथें सुख तेथें श्रद्धा हा सामान नियम. आपले सुख, पैसा, लौकिक, व्यवहार इत्यादि ठिकाणी विभागलेले. हे प्रवृत्तितील सुख सहज अनुभवता येते. थोड्या श्रमाने, प्रयत्‍नाने सहज हाती येते (आले असे वाटते) त्यामुळे अध्यात्माकडील श्रद्धा कमी पडते.


श्रद्धा हा मनाचा स्थायीभाव आहे. श्रद्धा ही भावनामय असते. देहभावाला चिकटलेल्या मनाच्या कल्पना श्रीगुरुवरील श्रद्धेच्या आड येतात. त्यासाठी देहभावातून हळूहळू आत्मभावाकडे पाऊले टाकणें फार आवश्यक.


मनाची संकल्पशक्ति आणि बुद्धीची भावनाशक्ति यांचा सुंदर समन्वय साधला की मग श्रद्धा वाटते, ती सूक्ष्म पण बळकट होते. सगळ्या शंकासुरांना तोंड देऊन त्यांचे निर्दळण करते मग ही श्रद्धास्वरूपी महालक्ष्मी - महाकाली - महासरस्वति. "या देवी सर्वभूतेषु श्रद्धा रूपेण संस्थिता । नमस्तस्मै नमस्तस्मै नमस्तस्मै नमो नमः" ॥" मग परमपदाचे, भगवद्‌साक्षात्काराचे ध्येय श्रद्धा आणि नामसाधना यांतून साकार होतेच होते. म्हणून सद्‌गुरूंवर नितांत श्रद्धा ठेवून त्यांनी दिलेल्या सबीजनामाचे नित्य, अखंड स्मरण असावे.


अण्णा -

18 February, 2009

मानसमणिमाला (२०)

मानसमणिमाला (२०)

:

हिंदी : जड चेतन जग जीव जत सकल राममय जानि ।

बंद‍उँ सबके पद कमल सदा जोरि जुग पानि ॥ बा. कां. १.७(ग)

देव दनुज नर नाग खग रेत पितर गंधर्व ।

बंद‍उँ किंनर रजनिचर कृपा करहु अब सर्व ॥ (घ)

मराठी : जगिं जड चेतन जीव सव राममयचि जाणून ।

सर्व-पदाब्जां वंदितो सदा करां जोडून ॥ प्रज्ञा. बा. कां. १.७(ग)

देव दनुज नर नाग खग प्रेत पितर गंधर्व ।

नमतो निशिचर-किंनरां कृपा करा तरि सर्व ॥ (घ)

अर्थ : या जगांत असलेले सर्व जड-चेतन जीव राममयच आहेत, असे समजून मी सर्वांच्या पदकमलांना सदा हात जोडून वंदन करतो ॥ ग ॥ देव, दानव, नाग, पक्षी, प्रेत, पितर, गंधर्व, किंनर, निशाचर या सर्वांना मी आता नमन करतो. तरी सर्वांनी माझ्यवर आता कृपा करावी. ॥ घ ॥


संत तुलसीदासांचा सर्वांभूती भगवत्‌ भाव अवर्णनीय आहे. सगुणोपासक असूनही त्यांची भक्ति मर्यादित, संकुचित भावनेत अडकलेली नाही. पृथ्वीवरील सर्व जड चेतन जीवांमध्ये त्यांना प्रभू रामचंद्रांचे दर्शन नित्य होतच होते व त्यामुळे ते सर्वांचे ठिकाणी विनम्र भावनेने वंदन करतात. याखेरीज देव, दानव, प्रेत, पितर, गंधर्व, किंनर इत्यादि अदृष्य, अमानवी योनीतील जीवांनाही नमन करतात, तेही भगवान राम समजून ! इतके विशाल अंतःकरण व सर्वांविषयी भगवत्‌ भावना स्वतः रामस्वरूप - प्रेमस्वरूप झाल्याखेरीज कशी होईल ?


माऊली ज्ञानेश्वर विभूतियोगांत भगवंताच्याच मुखाने बोलतात - "जे जे भेटे भूत । ते ते मानिजे भगवंत । हा भक्तियोगु निश्चित । जाण माझा ॥" (ज्ञानेश्वरी १०.११८) आणि ही भगवंताची आज्ञा शिरोधार्थ मानून सर्व भूतमात्रांचे ठिकाणी गोस्वामी विनम्र भाव प्रकट करतात; त्याच बोधामध्ये निमग्न होतात.


' चित्ते मीचि जाहले । मियांचि प्राणि धाले । जीवों मरों विसरले । बोधाचिया भुलिं ॥ (ज्ञा. १०.११९) त्यामुळे पुढच्या चौपायीमध्यें द्विरुक्तिचे भय न बाळगतां ते पुन्हा पुन्हा हात जोडून वंदन करतात व कृपायाचना करतात -

सीयराममय सब जग जानी । कर‍उँ प्रनाम जोरि जुग पानी ॥

जानि कृपाकर किंकर मोहू । सब मिलि करहू छाडि छल छोहू ॥ बा. कां. २.७.२,३

सर्व जगच सीताराममय आहे असे जाणून मी सर्वांनाच हात जोडून प्रणाम करतो. आपण सर्व कृपाकर आहात म्हणून माझा दास म्हणून स्वीकार करावा अशी मी विनंती करतो. माझ्यातील छल-कपट (ढोंगीपणा) इत्यादि दोष विसरून आपण मजवर कृपा करा. - (१.७.१,२)


धन्य ते संत तुलसीदास व धन्य त्यांचे रामभक्ति.


डॉ. सौ. उषा गुणे.

16 February, 2009

आनंदे निर्भर डुल्लतसे

आनंदे निर्भर डुल्लतसे

:

अमृताभक्तिप्रेमसुख प्राप्त झाले कीं मनुष्य अंतिम पारमार्थिक ध्येय (भगवद्‌प्राप्ती व भगवत्‌सेवाप्रेम) साध्य करतो. तो जन्ममरणाच्या फेर्‍यातून सुटतो. अमर होतो. भक्त स्वतःच अंगेकरून अमृतस्वरूप सत्वगुणाचा पुतळा बनतो आणि तो तृप्त, शांत, कृतार्थ होतो.


भक्तिप्रेमसुख हे नुसत्या पौरुष प्रयत्‍नाने मिळत नाही. मानवी प्रयत्‍नाने मिळवता येते त्याला भक्तिशास्त्रकार "यत्‌प्राप्य" म्हणतात. आणि ज्या गोष्टींची प्राप्ति होणे, हे मानवी प्रयत्‍नांच्या जोडीने, ईश्वराच्या कृपेवरच अवलंबून असते. त्यासाठी "यत्‌ लब्ध्वा" असा शब्दप्रयोग करतात. खरे तर त्या कृपाळू, दयाघन भगवंताच्या कृपेशिवाय कांहीच मिळत नाही. आत्मसाक्षात्कार, सगुण भगवंताच्या रुपांत ईश्वराचा साक्षात्कार, आणि सायुज्यता मुक्तिच्याही मस्तकावर किरीटासारखी विराजमान होणारी भक्तिप्रेमा हे केवळ ईशकृपेनेच, श्रीगुरुकृपेनेच मिळतात. "यं एव एष वृणुते तेन लभ्यः" असंच कठोपनिषदकारांचेही सांगणे आहे.


विश्वरूप अर्जुनाच्या विनंतीस अनुसरून प्रकट केले भगवंतानी. पण अर्जुन केव्हा पाहूं शकला ते ? तर अर्जुनावर कृपादृष्टि होऊन त्याला जेव्हा दिव्यचक्षू मिळाले तेव्हा ना ? अशी त्या कृपावंत भगवंताची विशेषकृपा झाल्यावांचून, मायेच्या अतीत असणार्‍या परमसत्यस्वरूप परमात्म्याचे अत्यंत निरूपाधिक स्वरूप कधीच जाणतां येत नाही; अनुभविता येत नाही. भक्ताचार्य नारद म्हणतात "भगवंताची अत्यंत उत्कट प्रेमभावाने, निष्काम भक्ति कराल तर तुमची पात्रता एवढी वाढेल कीं तो भक्तिप्रेमाच्या भुकेचा पभूच स्वतः प्रयत्‍न होऊन आपले स्वरूप दाखवतो, आणि संवित्‌ज्ञान, मुक्ति आणि मुक्तीला लाभ आणणारे परम भक्तिप्रेमसुख भरभरून देतो.


ही परम प्रेमस्वरूप भक्ति आचरण्यास, भाषाभेद, वर्णभेद, वंशभेद, जातीभेद आणि कोणतेही भेद न मानता सर्वांनाच आचरण्यास पूर्ण मुभा आहे. "या रे या रे लहान थोर । याति भलते नारी नर । करावा विचार । न लगे चिंता कोणासी॥" तुकोबारायांची ग्वाही आहे - "सकळांसि येथे आहे अधिकार ।"


असा प्रेम प्रेमस्वरूप भक्ति करणारा भक्त हा सिद्ध होतो. व्यवहारांत सिद्ध याचा अर्थ सिद्धि प्राप्त झालेला. म्हणजे तरी काय ? तर जग रहाटीवेगळा कांहीतरी चमत्कार करून दाखविता येण्याचे सामर्थ्य. मंत्र - तंत्र, जप - जाप्य, तसेच अघोरी साधना यामुळे प्राप्त होते. अशा माणसाभोंवती नेहमीच गर्दी असते, त्यची वाखाणणी प्रशंसा होते, पण अंती नरकावस्था.


भक्ति शास्त्रकारांनी सिद्ध शब्दाचा अर्थ फार सुंदर सांगितला आहे. सिद्ध होणे म्हणजे परम प्रेमरूपभक्तिने संपन्न होऊन हरिप्राप्ति साधणे. अशा भक्ताला भगवंत हेच साध्य प्राप्त झालेले असल्याने अन्य कांही साध्य उरतच नाही. आणि त्यामुळे तो तृप्त होतो. गंगा सागराला मिळाली की तिचा पुढचा प्रवासच खुंटतो ना ? अगदी तसंच भक्ताच. मग तो सगळा उर्वरीत काळ परमानंदात, भक्तिप्रेमसुख अनुभविण्यांत, भगवद्‌सेवेत घालवतो.


आता हा अनन्य भक्त पूर्ण तृप्त होतो तरी कसा ? तर अंतःकरणाचे सर्व भाव, विचार व चिंतन एका भगवंताकडे वळविल्यानंतर मन, बुद्धि, इंद्रिये यांची धावच कमी होते. आणि शेवटी हरि-साक्षात्कार झाल्यावर तर काय "परं दृष्ट्वा निवर्तते ।" मग भक्त पूर्ण शांत, तृप्त व समाधानाने सर्वांगाने अलंकृत होतो. "सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार । आनंदे निर्भर डुल्लतसे ॥" सर्व आशा आकांक्षा लय पावतात. द्वेष, मत्सर, क्रोध, दुःख अस्तंगत होतात.


असा भक्त अमृतस्वरूप होतो, म्हणजे अमृतासारखाच गोड, मधुर, सर्वांना हवा हवासा वाटणारा व सर्वजनप्रिय होतो. रज-तम गुणांचा निरास झाल्याने, शुद्ध सत्त्वगुणांचा पुतळा होतो. त्यच्या अंगकांतीद्वारे बोलण्यात चालण्यात वागण्यात विलक्षण आनंद प्रेमळपणा प्रकटतो. त्याच्या भोवतालचे वातावरण मांगल्याने भरून जाते. पराशांतीचे साम्राज्यच त्याचे रूपानें नांदत असते. अमृत म्हणजे अमर. यालाच मोक्ष, निर्वाण म्हणतात. पण हा भाग्यवान भक्त मोक्ष मिळूनही हरिनाम गाण्याकरितां, भगवद्‌सेवेसाठी, भक्तिप्रेम सुखासाठी पुनः पुनः जन्म घेण्यास भीत नाही. तर उलट प्रतिज्ञापूर्वक या प्रेमभक्ति सेवेसाठी जन्माला येतो.


अण्णा -

15 February, 2009

मानसमणिमाला (१९)

मानसमणिमाला (१९)

हिंदी : ग्रह भेषज जल पवन पट पा‍इ कुजोग सुजोग ।

होहिं कुबस्तु सुबस्तु जग लखहिं सुलच्छन लोग ॥ बा. कां. १.७(क)

सम प्रकास तम पाख दुहुँ नाम भेद बिधि कीन्ह ।

ससि सोषक पोषक समुझि जग जस अपजस दिन्ह ॥ बा. कां. १.७(ख)

मराठी : ग्रह भेषज जल पवन पट मिळुनि कुयोग सुयोग ।

होती कुवस्तु सुवस्तु जगिं बघति सुलक्षण लोक ॥ प्रज्ञा . बा कां १.७(क)

नाम भेद विधि पक्षिं करी सम तम जरी प्रकाश ।

शशि पोषक शोषक गणुनिं दे जगिं यश-अयशास ॥ १.७.(ख)

अर्थ : ग्रह, औषध, जल, वायु, वस्त्र यांचा सुयोग्य अथवा अयोग्य उपयोग झाल्याने त्या वस्तू चांगल्या वस्तू अगर वाईट वस्तू मानल्या जातात. ॥ क. ॥ दोन्ही पंधरवडे सारख्याच प्रकाशाचे अगर अंधाराचे असतात. परंतु त्यांना शुक्लपक्ष - कृष्णपक्ष अशी नांवे दिल्यामुळे एक चंद्राची वृद्धी करणारा व दुसरा क्षय करणारा मानला जातो व म्हणूनच एक शुभ म्हणजे यश देणारा ठरतो तर दुसरा अशुभ म्हणजे अपयश देणारा ठरतो. (ख)


सूर्य, चंद्र, मंगळ शनि, गुरु इत्यादि ग्रह यांचे पृथ्वीवरील प्राणी, वस्तू यांचेवर विशिष्ट परिणाम होत असतात असे मानले जाते. औषधासारखी वस्तू खरे तर रोगनिवारकच असायला हवी. परंतु तिचा उपयोग करताना रोगी त्याचे वय, रोगाची अवस्था, काल, पथ्य अनुपान, औषधाचे शीत उष्णादि परिणाम, मात्रा या सर्व गोष्टींचा सुयोग साधावा लागतो तरच ते औषध गुणकारी होते. अन्यथा निरुपयोगी अथवा हानिकारकही ठरू शकते. परंतु हा दोष औषधाचा नसूनहि औषधालाच दोष दिला जातो. विषारी टाकावू द्रव्यांच्या, रोगजंतूंच्या संपर्कात आलेले पाणी जीवनदायी ठरण्यापेक्षा घालाघातक ठरूं शकते. तीच गोष्ट आजूबाजूच्या वातावरणाची ! आपण म्हणतो 'अमुक हवामान सोसत नाही' परंतु त्याच हवेमध्ये इतर माणसे आनंदाने राहात असतात. म्हणजे दोष हवेत नाही माझ्यामध्ये आहे, तरी हवेलाच, वातावरण, पाणी, अन्न व इतर वस्तूंना दोष देऊन मनुष्य नामानिराळा होतो !


शुभशकून अपशकूनांच्या कल्पनांनी तर माणसांची मति इतकी गुंग करून टाकली आहे कीं माणूस भितीपोटी त्यांचा स्वच्छ मनानें विचार करायलाही तयार नाही. म्हणून समर्थ म्हणतात - 'प्रचितीविण जे ज्ञान । तो अवघाचि अनुमान ॥ या कारणे मुख्य प्रत्यये । प्रचीतिविण कामा न ये । उपायासारिखा अपाये । शाहाणे जाणती ॥ दासबोध. १४.७.१९ उपाय आणि अपाय, सदुपयोग आणि दुरुपयोग, उपयोग आणि उपभोग, यांच्यामधील सीमारेषा स्वच्छ मनाने समजून घेतल्यास, त्यावर आपल्याच पूर्वग्रहांतून चांगले-वाईट, शुभ-अशुभ, पाप-पुण्य अशी लेबलें न लावतां शास्त्र प्रचीति, गुरुप्रचीति व आत्मप्रचीति घेतल्यास हे जग किती आनंदमय, सुंदर आहे याचीही प्रचीति निश्चित येईल. म्हणूनच संत तुलसीदास म्हणतात - "जग जानकीनाथ सहाय करे - कौन बिगाड करे अब तेरा ?

डॉ. सौ. उषा गुणे.

08 February, 2009

अमृतानुभव - एक चिंतन - 2


श्रीज्ञानेश्वर अमृतानुभवात म्हणतात, सत्य, ब्रह्म, परब्रह्म, ज्ञान, मोक्ष, कर्म, पाप-पुण्य हे सर्व केवळ मानवनिर्मित शब्दच. त्या सर्व शब्दांचा अर्थदेखील आपणच लावलाय. वेदांतात जसे म्हणतात - ब्रह्म सत् ही नाही आणि असत् ही नाही. जेथे ज्ञान ही वस्तू देखील एक कल्पनाच आहे तेथे अज्ञानही कसे असू शकेल ? मग अज्ञानाचे आवरण दूर करायचे म्हणजे काय, आणि कसे ? अखंड आनंद स्थितीची प्राप्ती करायची ती कशी ? कारण 'कसे' हा शब्द आला की एक प्रणाली, एक सिद्धांत एक सिस्टीम वगैरे आले. पण वस्तुतः There is no 'HOW' or no system for achieving that state.
अमृतानुभवाचा खोलात जाऊन अभ्यास करायचे म्हटले तर आपल्यासारख्या (म्हणजे माझ्यासारख्या) सामान्य मनुष्याचे डोके भिरभिरायला लागते. मग प्रश्न पडतो की मग आपण आहोत कोण ? आणि करायचे ते काय ? मोठमोठे साधक जेव्हां साधना करता करता उत्थान मार्गातील निरनिराळ्या अवस्था प्राप्त करतात तेव्हां त्यादेखील जीवभावातल्याच पण सामान्य माणसापेक्षा थोड्याफार उन्नत अवस्थाच. पण सर्व उपाधीयुक्तच ना ? मग मला वाटते "काही न होणे" हा एकच मार्ग (अर्थात् त्याला मार्ग म्हणता आले तर) शिल्लक राहतो. 'काही न होणे' म्हणजे काय ? मुक्त नव्हे, मोक्ष नव्हे, परमात्म्यात विलीन होणे नव्हे, ज्ञानप्राप्ती नव्हे - यातले काही काही नाही. श्रीमद् भागवतातील पाचव्या स्कंधाच्या ७ ते १२ अध्यायामध्ये भरतराजाची कथा आहे (ज्याच्या नावावरून या देशाला भारत नाव पडले) - त्यावरून 'काही न होणे' याची कल्पना येते. अर्थात् सारांशरूपे पाहायचे म्हणजे चुकूनही कशातही न अडकणे याची नितांत काळजी घेणे असा त्याचा अर्थ. अगदी संक्षेपात त्याची कथा सांगायचे तर असे -

हजारो वर्षे सम्राटपदी स्थित असा भरत राजा एकदा सर्व काही मुलांवर सोपवून तप करण्याकरता अरण्यात निघून गेला. तप करता करता इतका काळ गेला की हा एके काळी हा आपला सार्वभौम राजा होता हेही प्रजेला माहित नाहीसे झाले. निर्विषय अंतःकरण (मन, बुद्धि, चित्त, अहंकार) होऊन बस आता जन्ममृत्युच्या फेर्‍यातून त्याची सुटका होण्यास काही थोडासा अवधी होता, एवढ्यात एक घटना घडली. एक गर्भिणी हरिणी पाणी पीत असता एका सिंहाची डरकाळी ऐकून जिवाच्या आकांताने तिने उडी मारली आणि गर्भपात होऊन शिशू हरिण बाहेर पडले आणि ती पळून गेली. त्या शिशू हरिणाला पाहून भरताचे चित्त द्रवले आणि त्याने त्याचा सांभाळ केला. माया, आसक्ति जडली आणि संसार परत सुरू झाला. काही काळ गेल्यावर ते हरिणाचे पाडस निघून गेले. तेही काय करणार ? कोणताही प्राणी आपल्या सदृश कळपातच रमणार ना ? पण भरताला त्याच्यावाचून चैन पडेना ? सदा त्याचाच ध्यास. कुठे असेल ? कसे असेल ? काही वर्षांनी तो मेला आणि लगेच हरिणाचा जन्म घेऊन अवतरला. पण पूर्वाभ्यासामुळे त्याला गतजन्मांचे ज्ञान होते, आणि तेव्हां त्याला जाणवले की आपण हे काय करून बसलो. तेव्हाच त्याने निश्चय केला की काहीही करून कशातही अडकायचे नाही. हरिणाचा अवतार संपला आणि पुढे एका ब्राह्मणाच्या घरात त्याचा जन्म झाला. तो जडभरत या नावाने. आधी ठरविल्याप्रमाणे अगदी बालपणापासून तो अगदी मूढ भाव घेऊनच वागत असे. त्याला शिकविण्याचे वगैरे संस्कार सर्व व्यर्थ झाले. अन्न, वस्त्र, निवारा काही मिळो न मिळो तो केवळ आपल्यातच रमत असे; पण इतरांना तो एक मूढ, वेडा, पागल असेच भासवीत असे. पण त्याची खरी स्थिती कशी होती हे बाराव्या अध्यायातील राजा रहूगण याच्याशी त्याची गाठ पडल्यावर रहूगणाला त्याने जो उपदेश केला त्यावरून कळते आणि आपण 'ज्ञानी' कसा असतो याची कल्पना करू शकतो.

ही झाली पुराणातील कथा. पण असे ज्ञानी खरेच या युगात असतात का ? होय, असतात. एका संताने स्वतः अनुभव घेतलेल्या सुमारे २५-३० वर्षापूर्वीची अमृतसर इथली ही गोष्ट -

अमृतसर मध्ये एके ठिकाणी ज्ञानसत्र चालत असे आणि त्या ठिकाणी रोज दिसणारी अगदी भणंग अवस्थेतील एक व्यक्ति सर्वांना परिचित होती. अस्ताव्यस्त केस दाढी नखे वाढलेली, मलीन वस्त्रे, पाहता क्षणीच ओंगळ वाटाणारा एक भिकारीच म्हणा. तेथे एकदा कोणाचेतरी भागवतावर प्रवचन चालले होते. एके दिवशी प्रवचनकाराला एका वचनाचा/श्लोकाचा सामाधानकारक अर्थ सांगता येईना. त्याने काहीतरी सांगून वेळ निभावली. प्रवचन संपल्यावर तो भिकारी त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, "महाराज, मघाशी आपण अमक्या वचनाचा जो अर्थ सांगितलात तो चुकीचा होता. त्याचा अर्थ/भावार्थ असा असा आहे". त्या भिकार्‍याचे ते ज्ञान पाहून प्रवचनकाराला तो भिकारी म्हणजे एक महात्मा आहे याची जाण झालीच आणि लगेच त्याने त्याचे चरण धरले. इतर लोकही ते दृष्य पाहून अवाक् झाले. प्रवचनकार म्हणाला, "आपण खरोखर महात्मा आहात. एवढे ज्ञानी असून आपण जराही तसे कधी भासवत नाही". तो भिकारी म्हणाला, ते सर्व ठीक आहे. पण आता यानंतर अमृतसरमध्ये माझे राहणे दुष्कर झाले ना ? आणि त्यानंतर ती व्यक्ति अमृतसरमध्ये कधीही दिसली नाही. कारण ? कोणत्याही उपाधीने, कोणतेही कारण झाल्यामुळे, कोणत्याही गोष्टीत अडकल्यामुळे कधी कशाची आसक्ति निर्माण होईल आणि भवसागरात पडून केव्हां आणि कसे या जन्मजमृत्यूच्या चक्रात परत अडकून फेर्‍या माराव्या लागतील याचा सुतराम भरवसा नाही.

मग आपल्यासारख्या संसारी लोकांनी काय करायचे ? - भागवत ५.१२.१७ इथे सांगितल्या प्रमाणे प्रयत्‍न करायाचा -
गुरोर्हरेश्चरणोपासनास्त्रो, जहि व्यलीकं स्वयमात्ममोषम् ॥
मनरूपी हा शत्रू संपूर्णपणे जरी मिथ्या असला तरी त्यानेच आत्मस्वरूपाला अच्छादित करून ठेवले आहे. म्हणून श्रीगुरू आणि श्रीहरींच्या चरणांच्या उपासनेच्या अस्त्राने त्याला मारून टाक. हळू हळू ढाळे ढाळे, केउतेनी एके वेळे - कधीतरी आपण ती अवस्था गाठूच ही आशा मात्र सदा जागृत असावी म्हणजे झाले.
एकोहम् -

05 February, 2009

अमृतानुभव - एक चिंतन - 1

एका मित्राने विचारले - It will be of great help for this group if you share you thoughts on "amrutanubhav". म्हणून हा प्रयत्‍न .
ब्रह्म म्हणजे काय, आनंदस्थिती म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय याचे वर्णन करून सर्व शास्त्रे, सर्व वेद, उपनिषदे, पुराणे थकली. या सर्व शास्त्रांनुसार जीव उपासना करतो, तपश्चर्या करतो; पण प्रत्यक्षात ती स्थिती, त्याचे ज्ञान व्हायची वेळ येते तेव्हां जीव अवस्थेतून शिव व्हायला तयार होणारा कोणी विरळाच असतो. पाण्याच्या निरनिराळ्या अवस्था - ग्लासाचा आकार घेतलेले पाणी, टाकीचा आकार घेतलेले पाणी, आप, वाफ, ढग, बर्फ, पाऊस, ओहळ, नदी, तलाव, या सर्व पाण्याच्या निरनिराळ्या एकापेक्षा एक उन्नत अशा अवस्था आहेत. अगदी जीवाच्या प्रवासाप्रमाणे. पाणीदेखील शेवटी अगदी उच्चतम अवस्था, म्हणजे महासागर बनून तिथे स्थिरावते. तत्वद् जीवदेखील हिरण्यगर्भ स्थितीला पोचून आनंदाची परिसीमा गाठली, मोक्षप्राप्ती झाली असे समजून सुखावतो. तिथे जीव ब्रह्मज्ञानी झाला. (ब्रह्म नाही झाला). अशा उच्चतम अवस्थेला पोहोचल्यावरही आपले अस्तित्व, आपले वेगळेपण, म्हणजे आपला 'मी' भाव सोडणे केवळ अशक्य. म्हणून मी वर म्हटले आहे जीवाचा शिव झाला तो विरळाच. कारण महासागर झालावरही त्याला इतर जीवांची, त्यांच्या अज्ञानाविषयी करुणा, त्यांना आनंदस्थिती, मोक्षप्राप्ती व्हावी ही तळमळ असते. कितीतरी महात्मे या स्थितीला येऊन थांबतात. मला ’अमृतानुभव' वाचल्यावर जे समजले, जे जाणवले ते त्याही पलिकडचे आहे. पाण्याचे उदाहरण घेऊन सांगायचा प्रयत्‍न करतो. त्या पलिकडची अवस्था म्हणजे जलतत्त्व. त्या तत्त्वात जीव सहसा विलीन होत नाही. कारण अस्तित्वहीन अशी ती अवस्था आहे. 'काही न होणे' अशी ती अवस्था. कारण त्याला थेंब, वाफ, बर्फ, झरा, तलाव या उपाधींसंबंधी काहीच माहीत नसते. माहित झाली तर अद्वैतस्थिती सांडून उपाधीयुक्त द्वैत स्थिती झाली. द्वैत म्हणजे जीव - मग त्याला संसार, सुखदुःखे आलीच. पाण्याला जर मनुष्य म्हणेल, भगवन् पाणीदेवा, तू जेव्हां सागर बनून छोट्या छोट्या लाटा निर्माण करतोस तेव्हां खूप मजा वाटते. पण भयंकर मोठा सुनामी बनतोस तेव्हां भारच भयंकर असतोस. तेव्हां पाणी काहीच बोलू शकत नाही. बोललेच तर म्हणेल, सागर म्हणजे काय, लाट म्हणजे काय, सुनामी म्हणजे काय, मजा वाटते म्हणजे काय, भयंकर असतोस म्हणजे काय - त्याला काहीच समजत नाही. म्हणून वाटते की सर्व संत, सर्व ऋषि, मुनि, योगी, आचार्य, गुरू, सर्वच हिरण्यगर्भ अवस्थेपर्यंत जातात, कारण तिथेही 'अहं ब्रह्मास्मि' हा भाव राहतोच. पण विलीन झालेला कोणी विरळाच. त्याला 'अहं ब्रह्मास्मि' हेही स्फुरण नसतेच.
पुढच्या भागात एका महात्म्याची कथा ..
एकोहम् -