30 July, 2009

मानसमणिमाला (२२)

मानसमणिमाला (२२)


हिंदी : छमिहहिं सज्जन मोरि ढिढाई । सुनिहहिं बाल वचन मन लाई ॥ ८ ॥

जैं बालक कह तोतरि बाता । सुनहिं मुदित मन पितु अरु माता ॥ ९ ॥

हँसिहहिं क्रूर कुटिल कुबिचारी । जे पर दूषन भूषन धारी ॥ बाल. २.७.१० ॥

मराठी : सज्जन मम उद्धटता क्षमतिल । मन लावुन शिशु-शब्द ऐकतिल ॥ ८ ॥

बोल बोबडे बालक बोलति । माता पिता मुदित मन ऐकति ॥ ९ ॥

क्रूर कुटिल हसतिल कुविचारी । जे पर-दूषण-भूषण-धारी ॥ १० प्रज्ञानानंद ॥


अर्थ : या माझ्या ज्यादा धीटपणा बद्दल संत, सज्जन मला नक्कीच क्षमा करतील; आणि माझी बालभाषा मनापासून ऐकून घेतील. जेव्हां आपले लहान मूल बोबडे बोल बोलू लागते तेव्हां आईबाप ते बाळबोल ऐकून आनंदित होतातच ना ! कदाचित्‌ कुविचारी कुटिल माणसे मला हसतील. कारण दुसर्‍याचे दोष शोधून ते इतरांना दाखविण्यंत त्यांना स्वतःला भूषणच वाटत असते.


संत सज्जनांचे चित्त उदार आणि सर्वांप्रति क्षमाशील असते. त्यामुळे ते इतरांचे अपराध, गैरवर्तन माफ करतात. त्यातून असे वर्तन एकाद्या अज्ञानी बालबुद्धीच्या व्यक्तिकडून घडले असेल तर अहैतुकि कृपासिंधु असलेले संत क्षमा तर करतातच पण ते वर्तन सुधारावे म्हणून मार्गदर्शनही करतात, चूक सुधारून घेतात.


इथे तुलसीदास संतांना विनवीत आहेत' की मी जे रामयशोगान करण्याचे माझ्या अवाक्याबाहेरचे काम करण्याचे धाडस करीत आहे त्याबद्दल आपणही अशीच उदार दृष्टि ठेवावी. मी लहान अज्ञानी बालक आहे, त्यामुळे आपल्यासमोर बोबड्या शब्दांत काहीतरी सांगायचा प्रयत्‍न करीत आहे. मातापित्यांनाच आपल्या बाळाचे चुकत माकत काढलेले शब्द समजतात, ते मनापासून ते शब्द ऐकतात आणि त्यांचे मन आनंदाने भरून जाते. त्याचप्रमाणे आपणही माझ्या बालबोलीकडे दुर्लक्ष करावे. आपण क्षमा करालच याबद्दल मला खात्री आहे कारण मी 'रामचरितगान' करीत आहे, हा माझा उद्देश तरी उदात्त आहेच. माऊली ज्ञानेश्वर म्हणतात - " नातरी बालक बोबडा बोली । कां वाकुडा विचुका पाऊली । ते चोज करुनी माऊली । रिझे जेवी ॥ तैसा मी जरी तुम्हाप्रती । चावटी करीतसे बाळमती । तरी तुम्ही तोषिजे ऐसी जाती । प्रेमाची या ॥ (ज्ञानेश्वरी ९-६,१६) "


माझे हे धाडस कांही कुविचारी लोकांना हास्यास्पद वाटण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते यांतील चुका, त्रुटी शोधून काढण्यांतच दंग होतील एवढेच नव्हे तर हेच आपले बुद्धिचातुर्य आहे असे भूषण मिरवितील. मिरवू देत बापडे ! त्यांची वृत्तीच तशी असते ना ! - 'हंसहि बक गादुर चातकहि । हँसहि मलिन खल विमल बत कही (२.८.२) - डबक्यांत मासे धरणारे ढोंगी बगळे मानस सरोवरांत विहार करणार्‍या राजहंसांनाही हसतात आणि निशाचर , कर्कश आवाज करणारी वटवाघुळे अनन्यचित्त चातकांना क्षुद्र लेखतात. अगदी तसेच खल दुर्जन माझ्या या विमल, अनन्य प्रेमभक्तिला व उपासनेला हसतील, क्षुद्र लेखतील. परंतु माझे मायबाप संतसज्जन व प्रभु सीताराम मला खचितच आपला म्हणतील नां !

डॉ. सौ. उषा गुणे.

28 July, 2009

बद्ध - मुक्त लक्षणे - (३) (भागवत स्कंध ११ अध्याय ११)

बद्ध - मुक्त लक्षणे - (३)
(भागवत स्कंध ११ अध्याय ११)

कैवल्य उपनिषदांत म्हटले आहे - त्यागेन एके अमृतत्त्वं आनशुः - त्याप्रमाणे भगवंतांनी, "तीव्र वैराग्याने देहाभिमान घालवायचा" असे एक prescription in a nutshell सांगून टाकले. शुकमुनि, शंकराचार्य, ज्ञानदेव अशा सारख्या मंडळींसाठी या वैराग्य गुटीच्या उपदेशाची एक मात्रा पुरे. पण सामान्यांचे काय ? उद्धव श्रीकृष्णाला सांगत आहे, आमचे चित्त तर इतके चंचल [’प्रमाथी बलवत् दृढम्’ - गीता] आहे की तू हे जे वैराग्य म्हणतोस ते दोन पळेसुद्धा टिकणारे नाही. आता बोल.

भगवंत म्हणतात - खरे आहे. ’मी विरागी’ हा अभिमान देखील मनुष्यासाठी कोणते वेगळे जाळे विणतो आणि त्यामुळे तो या मायामय संसारात कसा पहिल्यापेक्षाही अधिकच गुरफटून जातो याचा त्याला पत्ताही लागत नाही. कारण थोड्या प्रमाणांतील वैराग्यही आसपासच्या लोकांत मान-मरातब मिळवून द्यायला कारणीभूत होते. आणि अशावेळी जर मनुष्य सावध राहिला नाही, तर ’लोकेषणा’ नामक वासनेच्या अधीन व्हायला वेळ लागत नाही. लोकेषणेची तहान भल्याभल्यांना देखील गुंडाळून टाकते. मग वैराग्ययुक्त आचरणाचा उपदेश अशा self glory च्या वासनेत रमणार्‍या लोकांना पटतही नाही. ज्याला आत्मप्रौढीच्या वासनेतून निर्मुक्त होऊन सहज आत्मस्वरूपात स्थित व्हायची तीव्र इच्छा आहे अशांसाठीच हे prescription.

वैराग्य म्हणजे संन्यास. संन्यास दोन प्रकारचा असतो. आळसामुळे, तमोगुणाच्या प्राबल्यामुळे कष्ट टाळण्यासाठी अंगिकारलेला बाह्य कर्मसंन्यास, आणि दुसरा उत्साहाने पण आसक्तिरहित होऊन सर्व कर्मे पार पाडीत असतां कर्मफलाशी असंग राहून (no trace of proud if accomplished or no regret if failed) घडणारा आंतरीक संन्यास. बाह्य संन्यासाचा अंगिकार केलेला संन्यासी प्रत्यक्ष कर्म करीत नसला तरी ’मनसा स्मरन्’ करीत असतो आणि बाहेरून ’कर्मेंद्रियाणि संयम्य’ असा देखावा करीत असतो. त्यामुळे वासनाक्षय कधीच होत नाही आणि म्हणून पुढे लोकेषणेची तहान दृढावते. या करीता संन्यास - वैराग्य या दिशेने पाऊल टाकायच्या आधी कर्म कोणते, अकर्म कोणते, विकर्म कोणते हे नीट जाणून घेणे आवश्यक आहे.

आता चंचल, प्रमाथी मनाला संयमीत करायचे, वैराग्य, त्यागवृत्ति जोपासायची म्हणजे सदा भरकटत असणार्‍या मनाला सतत (हो अगदी सतत) जागरूक राहून - hey ! turn back, not that way, this way असे निरंतर वळवत राहावे लागणार. मग go this way म्हणजे which way ? भगवंत दोन तीन मार्ग सांगतात. ’तत्त्वजिज्ञासा’ (श्लोक २१). जितकी शरीरे दिसतात, जितक्या चेतन वस्तु दिसतात, ते सर्व पृथक् पृथक आत्मे आहेत असा मनुष्याला जो भास होतो तो दूर सारून ’आत्मा सर्वत्र एकच आहे’, ’सर्व दृष्यमय जगत् भासमय - मिथ्या आहे’ हा भाव दृढ करावा. ’नानात्वभ्रममात्मनि’ अनेकत्वाचा भास दूर करावा. अशा प्रकारे मनाची शुद्धी होत होत त्याला मज सर्वव्यापी परमेश्वराचे ठिकाणी लावावे - मनो मय्यर्प्य विरजं. पण हे सोपे नाही. याला विहंगम मार्ग म्हणतात. तो सर्वांसाठी नाही. मग दुसरा मार्ग ? ’मयि सर्वाणि कर्माणि निरपेक्षः समाचर (श्लोक २२) सर्व कर्मे निरपेक्षपणे केवळ माझ्यासाठीच करतोयस ही भावना ठेवून कर. म्हणजे काय होईल ? धर्म, काम, अर्थ मदर्थे आचरन्, मयि निश्चलां भक्तिं लभते (श्लोक २४). OK. पण तुझी भक्ति लाभली की मी बद्धाचा मुक्त कसा होईन ? ’मदर्पण’ भावनेने धर्म, अर्थ कामाचे आचरण करायला लागलास की संतांचा सत्संग लाभतो. मग सत्संगाने मनुष्य भक्तिपूर्वक माझी उपासना करतो. आणि पुढे संत ज्याचे नेहमी वर्णन करतात, ज्याचा निर्देष करतात, जे भक्तांना दाखवितात, ते माझे परमपद तो सहजच प्राप्त करतो, अर्थात् त्यायोगे बद्धाचा मुक्त होतो.

आता हा संत कसा असतो ? त्याची लक्षणे कोणती ? भक्ति आम्हाला ठाऊक आहे. पण संतांनी सांगितलेली भक्ति कोणती ? ती कशा प्रकारची असते ? हो, आता आमचा गणूही गायन करतो आणि तानसेनही गायन करायचा. मग कोणासारखे गायन केले असता परमपद प्राप्त होईल ? संतांमध्ये असे कोणते वैशिष्ट्य असते की जे गायनकले मधे तानसेनाचे म्हणावे ? पाहू पुढे.
(क्रमशः)
एकोहम्

26 July, 2009

श्री विष्णु सहस्त्रनाम - (प्रस्तावना -२)

।। श्री विष्णु सहस्त्रनाम ।।

सध्या दक्षिणेमध्ये प्रचलित असलेल्या व उत्तरेत प्रचलित असलेल्या विष्णु सहस्त्रनामामध्ये थोडा थोडा फरक आढळून येतो. परंतु या पाठभेदांना फारसे महत्व देण्याचे कारण नाही. तसेच विष्णु सहस्त्रनामाचे पारायण करण्यापूर्वीच्या अर्चना पद्धती मध्येही थोडासा फरक आढळून येतो.

पुराणांची रचना करणार्‍या श्रीवेदव्यासांनीच श्रविष्णु सहस्त्रनामाची रचना केलेली आहे व हे अप्रतिम स्त्रोत्र त्यांच्या विख्यात अशा महाभारत ह्या ग्रंथात समाविष्ट झालेले आपल्याला आढळते. भारतीय युद्धाचे शेवटी ज्येष्ट पांडव राजा युधिष्ठीर भीष्म पितामहांच्या दर्शनांस जातो. त्यावेळी कुरूवंशातील अपराजित व दुर्दम्य असा हा पुरूषश्रेष्ठ परमेश्वराकडे घेऊन जाणार्‍या पवित्र क्षणांची वाट पहात, तीक्ष्ण बाणांची शय्याकरून पहुडलेला असतो. धर्मज्ञ युधिष्ठीराने त्यांना सहा प्रश्न विचारले आहेत. व भगवान कृष्णाचे नित्य स्मरण करणार्‍या व महान कर्मयोगी भीष्मांनी त्यांची सहज शांतपणे उत्तरे दिलेली आहेत. अशातर्‍हेने हिंदूंच्या अक्षर वाङमय असलेल्या महाभारतात हे विष्णू सहस्त्रनाम अंतर्भूत झाले आहे.

युधिष्टीर हा धर्मपरायण व आध्यात्मिक मनोवृत्तीचा आहे. पूर्णतः नितिनिपूण असून विचक्षण व्यक्तीमत्वाचा हा राजा साधारणतः सर्वच साधकांचे समोर जे प्रश्न उठतात तेच प्रश्न ह्या ठिकाणी विचारतो आहे.

प्रश्न १ - किमेकं दैवतं लोके ?
जगतामध्ये सर्वश्रेष्ठ असे दैवत कोणचे आहे?
उत्तर १ : - पवित्राणां पवित्रं यो मंगलानांच मंगलम् ।
दैवतं देवतानांच भूतानां योऽव्ययः पिता ।

सर्व पवित्र वस्तूंना ज्याच्यामुळे पावित्र्य प्राप्त झाले आहे व जो स्वतःच मूर्तीमंत पावित्र्य आहे; जो मंगलांचे मंगल असा परममंगल आहे; सर्व दैवतांचे दैवत आहे, सर्व प्राणिमात्रांचा आद्यपिता जगत्प्रभू "श्री विष्णू''.

प्रश्न २ - किंवाप्येकं परायणम् ?
सर्वांचे 'आश्रयस्थान' असा कोण आहे ?
उत्तर २ : - परमं यो महत्तेजः परमं यो महत्तपः ।
परमं यो महद्ब्रह्म परमं यः परायणम् ।

जो महान तेजस्वी आहे, जो सर्वश्रेष्ठ नियन्ता आहे, जो सर्वव्यापी असे महान ब्रह्म आहे, तोच सर्वांचा सर्वश्रेष्ठ 'आश्रय' आहे. '' श्री विष्णू''.

प्रश्न ३ - स्तुवंतं कं प्राप्नुयुर्मानवाः शुभम् ?
कोणाची स्तुती केली असता मानवाला शुभ प्राप्ती होईल? (शांति व समृद्धी)
उत्तर ३ - जगत्प्रभुं देवदेवमनन्तं पुरूषोत्तमम् ।
स्तुवन्नाम सहस्त्रेण पुरूषः सततोत्थितः ।

जगताच्या कल्याणकरतां जो सदैव जागृत व कर्मरत आहे असा जगताचा प्रभू अनन्त पुरूषश्रेष्ठ '' श्री विष्णू''

प्रश्न ४ - कमर्चन्तः प्राप्नुयुर्मानवाः शुभम् ?
कोणाची पूजा केली असता मानवाला सर्व शुभ प्राप्ती होईल ?
उत्तर ४ : - तर्मेव चार्चयन्नित्यं भक्त्या पुरूषमव्ययम् ।
ध्यायंस्तुवन्नमस्यश्च यजमानस्तमेवच ।

त्या पुरूषोत्तमाचे नित्य ध्यान केले असता, त्याचे नित्य पूजन केले असतां व त्याला वारंवार नमन केले असता मनुष्याला सर्व शुभ प्राप्ती होईल.

प्रश्न ५ - को धर्मः सर्व धर्माणां भवतः परमो मतः ?
आपल्या मताप्रमाणे सर्वधर्मात श्रेष्ठ धर्म कोणता?

प्रश्न ६ - किं जपन् मुच्यते जन्तुर्जन्मसंसार बन्धनात् ?
कोणाचा जप केला असता प्राणी जन्म व संसार बंधनातून पलीकडे जाईल ?

उत्तर ५व ६ : - अनादि निधनं विष्णुं सर्वलोक महेश्वरम् ।
लोकाध्यक्षं स्तुवन्नित्यं सर्वदुःखातिगो भवेत् ।

शेवटच्या दोन्ही प्रश्नांचे हे उत्तर आहे. सर्वश्रेष्ठ धर्म स्वतः श्री विष्णुच आहे. ज्याला 'आदि ' नाही व 'अंत' ही नाही असा तो जगताचा महाप्रभू आहे. जो नित्यशः सहस्त्रनामाचा पाठ करतो व सर्वज्ञानी परमेश्वराची अंतरांत स्तुती करतो तो सर्व दुःखे पार करून जातो व संसार बंधनातून मुक्त होऊ शकतो.

परमेश्वराचे असे वर्णन केले जाते कि, ' ज्याचेपासून सुरवातीला सर्व नामरूपात्मक जगताची उत्पत्ती झाली, ज्याच्या आधाराने जगताचे पालन (स्थिती) होत आहे व प्रलयाचे वेळी ज्याच्यामध्ये सर्व जगत् लय पावते तो परमेश्वर म्हणजेच "श्री महाविष्णु''.

युधिष्ठीराच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर भीष्म म्हणतात, '' आता मी तुला त्याची एक हजार नावे सांगतो. ती तू पूर्ण अवधान देऊन श्रवण कर.'' अशाप्रकारे विष्णु सहस्त्रनाम हे स्त्रोत्र महाभारतात गुंफले गेले.

त्या ईश्वराची खरे पाहतां व्याख्या करतांच येत नांही, कारण तोच सर्व गुणांचा मूलाधार आहे त्यामुळे कुठल्याही नावांने त्याचे नामकरण होऊ शकत नाही. कुठल्याही उक्तीने त्याचा निर्देश करतां येत नाही, कोणत्याही भाषेत त्याची व्याख्या करता येत नांही अगर कुठल्याही वांङमयीन कृतीने त्याचे पुसटसे वर्णनही करतां येत नांही. तो सर्व ज्ञात व अज्ञात जगताच्याही पलीकडे आहे. आपले सर्व अनुभव ग्रहण करणारी व ज्ञान प्रकाश देणारी शक्ती तो स्वतःच आहे.

तरीही त्याची अनेक व्यक्तरूपेहि आहेत. त्या व्यक्तरूपांच्या संदर्भात त्याची अनेक नामेही असणे शक्य आहे. ज्या वस्तूची व्याख्या केली जाते तिचे पूर्ण स्वरूप आपल्याला सरळ त्या व्याख्येमुळे समजते. या ठिकाणी जे सत्य आहे व अनंत आहे त्याची व्याख्या एक हजार पर्यायी सीमित व नाशवंत वस्तूमधून कलेली आढळते. पूर्वी ऋषींनी ही सहस्त्रनामे तयार केली व जगताला उपदेशिली. द्रष्टेकवी श्री व्यासांनी ती सर्व नामे श्रीविष्णुस्त्रोत्र रूपाने एकत्र बांधली व मोठ्या श्रध्देने ही भक्तीमाला श्रीविष्णूला अर्पण केली.

अशा तर्‍हेने ह्यातील प्रत्येक नाम हे ज्ञाताच्या माध्यमातून त्या अज्ञात सत्याचा निर्देश करीत असल्यामुळे ज्यावेळी आपण त्या त्या व्याख्यांवर सूक्ष्मचिंतन करतो तेव्हा मन एका उच्च अवस्थेत झेप घेते व दिव्य अनुभवापर्यंत पोहोचते. त्यामुळेच हे विष्णुसहस्त्रनाम भक्त आपल्या दैवता बरोबर मधुर भक्तीभावनांची क्रिडा करण्याकरिता उपयोगात आणतात तर तत्वज्ञानाचे जिज्ञासू विद्यार्थी आपल्या तत्वचिंतनातून उच्च जाणिवेच्या अवस्थेत जाण्याचे वाहन म्हणून ह्याचा उपयोग करतात.

'कलिसंतरण उपनिषत्'१ नावाचे एक लहान उपनिषतद आहे व त्यामध्ये असा उल्लेख आहे कि एकदां परमभक्त नारद ब्रह्मदेवाकडे जातात व त्या कलीयुगातील अनिवार्य व कठीण अशा बहिर्मुखवृत्तींपासून निवारण करून मनुष्याला स्वतःचा विकास करता येईल असा उपाय विचारतात. तेंव्हा '' आदिपुरूष नारायणाच्या नामजपानेच मनुष्याचा उद्धार होईल '' असे उत्तर ब्रह्मदेवाकडून मिळाले. ह्या ठिकाणी एका गोष्टीचा मुद्दाम उल्लेख करणे अत्यावश्यक आहे किं सहाव्या प्रश्नामध्ये '' प्राणिमात्रास त्याचे श्रेष्ठ ज्ञान कसे होईल'' अशी विचारणा केली आहे. 'जन्तु ' ह्या शब्दाचा अर्थ जो जन्मास आला तो. (जनन धर्मा) त्या शब्दामुळे सर्व मनुष्येतर प्राणीहि हे ज्ञान मिळविण्यास अधिकारी आहेत असे सुचविले आहे. व ह्याचे अनेक उल्लेख आपल्याला पुराणांनी अत्यंत काव्यमय भाषेत उपलब्ध करून दिले आहेत. त्रिकुटाचलावरील तळयात असलेल्या मगरीने गजेद्राचा पाय धरला असतां त्याचे त्याचे परमेश्वराने रक्षण केले ( गजेन्द्रमोक्ष ) त्याच प्रमाणे जडभरताची कथा हेहि त्याचे आणखी एक उदाहरण आहे.

शंकराचार्यांनी आपल्या भाष्यामध्ये ह्या ठिकाणी तीन तर्‍हेच्या जपाचा समावेश केला आहे. (अ) जो जप इतरांना ही ऐकू जाईल असा (ब) जो स्वतःलाच ऐकू येतो असा (क) व जो केवळ मानसिकच आहे असा. विष्णुसहस्त्रनामाचा जप तीनही प्रकारांनी करता येतो.

ह्या सहस्त्रनामामध्ये कांही ठिकाणी क्वचित्त पुनरूक्ती झालेली आपल्याला आढळून येते. ह्यातील बरोबर ९० नामांची पुनरूक्ती झालेली आहे. त्यापैकी ७४ नामे दोनवेळा पुनरूक्त झालेली आहेत; १४ नामे ३ वेळां व २ नामे चारवेळां पुनरूक्त झालेली आढळतात. कांहीवेळां एकच नाम पुनःपुन्हा आलेले आहे. जसे विष्णु विष्णु , शिव शिव.

कांहीवेळां समानार्थी शब्दच अनेकवेळा वापरलेले आहेत. जसे श्रीपती - माधव, पुष्कराक्ष - कमलाक्ष. परंतु हे स्त्रोत्र त्याच्याच विभूतींचे वर्णन करणारे असल्यामुळे हा दोष मानण्याचे कांही कारण नाही, स्तुतीस्त्रोत्रांमध्ये पुनरूक्ती ग्राह्य मानली जाते. भावपूर्ण हृदय आपली प्रेम भावना व्यक्त करण्याकरतां हीच पद्धत स्विकारते.

ह्या सहस्त्रनामामध्ये परमेश्वराची १०३१ एकेरी नामे दिलेली आहेत. ह्यातील १०० पेक्षां जास्तीची ३१ नामे ही त्याला लागून आलेल्या आधीच्या नामांची विशेषणे समजली पाहिजेत. ज्यावेळी परमेश्वराची ह्या सहस्त्र नामांनी अर्चना२ केली जाते त्यावेळी त्या नामाचे चतुर्थी विभक्तीचे रूप वापरले जाते. ह्या स्त्रोत्रांमध्ये २० जोडनांवे आहेत व ती३ पहिल्या पांचशे नामामध्ये आली आहेत. पुढील ११ जोडनांवे स्त्रोत्राच्या पुढील अर्ध्या भागांत आली आहेत.

ह्या स्त्रोत्रात एकच अव्यय वापरण्यात आलेले आहे. (८९६ वे - सनात्), अर्चनेमध्ये 'सनात् नमः' असे त्याचे चतुर्थीचे रूप वापरले जाते. त्याचप्रमाणे ९२९वे नाम हे अनेकवचनी असल्यामुळे अर्चनेमध्ये सदभ्यो नमः असे म्हटले जाते.

आपण ह्या दिव्य नामांचा खोल अर्थ पाहू लागलो कि असे दिसून येते किं व्यासांनी कांही ठिकाणी पुल्लिंगी नामें वापरली आहेत, कांही ठिकाणी स्त्रीलिंगी तर कांही ठिकाणी नपुसकलिंगीहि नामे आहेत. ज्या ठिकाणी पुल्लिंगी नामे आहेत तेथे लक्ष्मीचा पती श्रीविष्णु ह्याचा निर्देश केला जातो. ज्या ठिकाणी स्त्रीलिंगी नामे आहेत तेथे शक्ति, सत्ता अगर महत्ता निर्देशिली आहे, व जेथे नपुंसकलिंगी नामे आहेत तेथे शुद्ध ब्रह्म, अनंतज्ञानाचा निर्देश आहे.

साधारणतः ही अर्चना भगवत्भक्त रोज करतात. व ते करणे सोईचे नसेल तर ही पूजा स्वतःचे वाढदिवशी, ग्रहणाचे दिवशी अगर सूर्य एका वृत्तामधून दुसर्‍या वृत्तांत जातो अशा संक्रमणाचे दिवशी केली जाते. शास्त्रामध्ये अशातर्‍हेचा पूजाविधी ग्रहयोग, राजाची अवकृपा, असाध्य व्याधी, दुष्टशत्रू ह्या सर्वांपासून होणार्‍या दुःखाच्या निवारणार्थ सांगितलेला आहे. परंतु सर्वात महत्वाचा परिणाम म्हणजे अंतःकरण शुद्धि व त्यामुळे साधकांस ध्यानामध्ये उत्तरोत्तर मिळत जाणारे समाधान !
----------------------------------------------------
१ सर्व श्रुतिरहस्यं गोप्यं तत् येनकति संसारं तरिप्यसि भगवतः आदिपुरूषस्य नारायणस्य नामोच्चारणमात्रेण निर्धूतकलिभवति ।। कलिसंतरण उपनिषत् .१.
२ पहिल्या शंभरांत ५ जोडनांवे आहेत ती अनुक्रमे १२, १६, ३०, ४६, ५५. दुसर्‍या शंभरांत २ जोडनांवे आलेली आहेत ती अनुक्रमे १२०, १२४. तिसर्‍या शंभरांत ४ जोडनांवे आलेली आहेत ती अनुक्रमे २१७, २३२,२७५. चवथ्या शंभरांत ४ जोडनांवे आलेली आहात ती अनुक्रमे ३३३, ३५९, ३९०, ३९९. पाचव्या शहभरांत ५ जोडनांवे आलेली आहेत ती अनुक्रमे ४०४, ४२७, ४२९, ४५४, ४९३.
३ उत्तरार्धात ६ व्या शतकांत ६ जोडनांवे आहेत. ५१४, ५३१, ५५२, ५५६, ५७२, ५७३. ७ व्या शतकांत १ जोडनांव आहे. ६२७. ८ व्या शतकांत ३ जोडनांवे आहेत. ७३२, ७९४, ७९९.
_________________________
(क्रमशः)
डॉ. सौ. उषाताई गुणे .



22 July, 2009

श्री विष्णु सहस्त्रनाम - (प्रस्तावना -१)

।। श्री विष्णु सहस्त्रनाम ।।



।। श्री कृष्णपरमात्मने नमः ।।
शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम् ।
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगम् ।
लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।
वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।।

।। हरि ॐ ।।


ते अनंत एकच आहे आणि ते एकच असणे शक्य आहे. अगणित नामरूपांनी नटलेले वैचित्र्यपूर्ण जगत हे त्याचेच एक मूर्त स्वरूप आहे. ज्याप्रमाणे सोन्यापासून बनविलेले निरनिराळया आकाराचे अलंकार तत्वतः सोनेच असतात त्याप्रमाणे जगतातील अनेक साकार वस्तू म्हणजे त्या अनंताची व्यक्त रूपे होत. खरे म्हणजे कार्याला त्याचे कारणावाचून वेगळे अस्तित्व असूच शकत नाही.

मनुष्यास त्याच्या सामान्य जाणीव स्थितीमध्ये इंद्रिये-मन-बुद्धी यांचेमार्फत सीमित वस्तूंचे ज्ञान तात्काळ होते. अध्यात्म साधकाचा प्रयत्न मात्र त्याची आत्ताची ज्ञानग्रहण प्रक्रिया व साधने पार करून आत्मजागृतीच्या अवस्थेला येण्याचा असतो. त्यामध्ये तो एका निरालंब साक्षित्वाचा अनुभव घेऊ शकतो. ह्या विश्वाच्या मागे असलेले परम सत्य पूर्वीच्या ऋषीमुनींना साक्षात् अनुभवास आलेले होते. परंतु आपल्या शिष्यांना ते प्रत्यक्ष दाखविण्यास, त्याची व्याख्या करण्यास अगर ते समजावून सांगण्यास त्यांची वाणी असमर्थ ठरली. त्या अनंताचे निर्देशन जगतातील ज्या सान्त वस्तूंचे द्वारा केले गेले त्या वस्तूंना त्या अनंतत्वाचे मूर्तरूप अगर विभूती मानले गेले. त्यातील प्रत्येक वस्तू ही परमेश्वराचीच विभूति आहे व तिला आपल्या धर्मामध्ये परमेश्वराचे नाममहात्म्य प्राप्त झाले आहे.

थोडक्यात हे ' विष्णु सहस्त्रनाम ' म्हणजे आपल्याला ज्ञात असलेल्या वस्तूमधून निघालेले किरणच होत. त्यांच्या सहाय्याने आज आपणास अबोध असलेले अनंतत्व सुबोध होईल. त्याचे चिंतन केले असता आपली श्रद्धा सखोल होईल, भक्ति अमर्याद होईल व सर्वव्यापक परमेश्वराचे ( श्री विष्णुचे) ज्ञान दृढमूल होईल.

भक्त आपल्या भक्तिच्या सहाय्याने व तत्वचिंतक आपल्या ज्ञानसाधनेने त्या अनंतत्वाप्रत जावून पोहोचले. त्यांनी मार्गक्रमणा करण्याकरिता वापरलेले साधन वेगवेगळे असल्यामुळे त्याची मार्गक्रमणा करण्याची पद्धतही भिन्नभिन्न राहिली. आपल्या प्रेमास्पदाचे मंदिरात जाण्याकरिता भक्तांनी आपल्या हृदयातून मार्ग काढला तर तत्वचिंतंकांनी सत्यमंदिराकडे धाव घेण्याकरतां बुद्धिवाद व तर्काचा आधार घेतला. त्यांनी आपल्या बुद्धिने सत्यान्वेषण करण्याचा प्रयत्न केला. मार्ग कोणताही असो, अगर वापरात आणलेले साधन कोणतेही असो, आपल्या मार्गक्रमणेचे अंतीमस्थान गाठेपर्यंत सर्व साधकांना आवश्यक असतो, एक आधार, एक आश्रय, त्याच्याच सहाय्याने साधकांना आपल्या साधनांचा सातत्याने व कौशल्यपूर्ण रितीने उपयोग करून घेता येतो.

हे सहस्त्रनाम दोन्ही प्रकारच्या साधकांना आपल्या सहस्त्रावधी प्रतीकातून आधार मिळवून देते. त्यातील प्रत्येक नाम भक्ताला एकतर्‍हेची प्रेरणा देते, तर तत्वचिंतक बुद्धिला ज्ञानाच्या उत्तूंगतेकडे भरारी मारण्यास सुचना देते.

भक्तांची श्रद्धास्थाने भिन्न भिन्न असतात, अर्थातच त्या श्रध्देनुसार संस्मरण करण्याकरिता वेगवेगळया ध्यानमूर्ती उपलब्ध आहेत व त्याप्रमाणे आपल्याकडे अनेक सहस्त्रनामेही उपलब्ध आहेत. त्यापैकी शिवसहस्त्रनाम, ललिता सहस्त्रनाम, श्रीराम सहस्त्रनाम यांचा उल्लेख करता येईल. व त्या सर्वांमध्ये निस्संशयरीतिने हिंदूमध्ये जास्त लोकप्रिय आहे ते विष्णु सहस्त्रनामच होय !

श्री शंकराचार्य नर्मदा तीरावर रहाणार्‍या आपल्या श्रीगुरू गोविंदपादाचार्य यांचे पायाशी जावून पोहोचले आणि ह्या कालडीच्या नंबुद्रिपाद बटूला आचार्यांकडून परमगुह्य अशा महावाक्याचा उपदेश मिळाला. आपली तीव्र व उत्कट ज्ञानसाधना अल्पकाळातच पूर्ण केल्यानंतर आपल्या आयुष्यातील दिव्यभव्य कार्य करण्याचा मानस असलेल्या शंकरांना गुरूंच्या शुभार्शिवादाची तीव्र इच्छा होती. गोविंदपादाचार्यांनी शंकराचार्यांची परीक्षा घेण्याचे ठरविले व त्यांना विष्णु सहस्त्रनामावर एक विस्तृत भाष्य लिहिण्यास सांगितले. शंकरांनी हे भाष्य पूर्ण केले. सातव्या शतकातील एक हिंदूधर्मरक्षणकर्ता व उपनिषद भाष्यकार म्हणून ख्यातनाम पावलेल्या आचार्यांचे हे पहिलेच भाष्य अत्यंत लोकप्रिय म्हणून प्रसिद्धिस पावले.

आपल्या शिष्याची ही कार्यतत्परता पाहून श्री गोविंदाचार्य प्रसन्न झाले, त्यांनी मनःपूर्वक आशिर्वाद दिला व आपल्या शिष्याला सेवा व धर्म कार्य करण्याची अनूज्ञा दिली. सद्गुरूंची कृपा व श्रीविष्णूंचे आशिर्वाद प्राप्त केलेल्या शंकराचार्यांनी सातव्या शतकांत हिंदू धर्मावर आलेली ग्लानी व मरगळ झटकून टाकण्याचे व धर्माचा उद्धार करण्याचे अतुलनीय कार्य हाती घेतले. ह्या ग्रंथामध्ये आपण शंकराचार्यांच्या भाष्याचे अनुसरण करणार आहोत. त्याचप्रमाणे कांही संदर्भ पौराणिक वांङ्मयातूनही घेणार आहोत. कारण त्या वांङ्मयात भक्तांच्या मनाला प्रेरणा मिळतील अशा असंख्य गोष्टी आहेत.

(क्रमशः)
डॉ. सौ. उषाताई गुणे .