20 January, 2009

आनंदानुभूति

आनंदानुभूति

:

'आनंदं ब्रह्मणो विद्वान", ब्रह्म आनंदस्वरूप आहे. का आनंदस्वरूप आहे ? हा विद्वानांच्या वादाचा विषय आहे. परंतु या ब्रह्माच्या अनुभवांत आनंद आणि केवळ आनंदच आहे. हे खास आनंदाचे मुख्य लक्षण म्हणजे भितीचा अभाव. ब्र्ह्मानुभावाच्या या आनंदानुभूतीत देहभावाचा अभाव असतो. तेथे जीवाशिवाचे सामरस्य, ऐक्य असते. जेथे द्वैत म्हणजे दोनपणा आहे/दोन आहेत तेथेच भिती असते. म्हणून ब्रह्मानंदाचे दुसरें लक्षण अभय आहे. ब्रह्मसंस्पर्श ज्याला झाला तो आनंदाच्या डोही आनंदतरंग होऊन राहतो.


या ब्रह्माचे दुसरे एक लक्षण ते अव्यय आहे. व्यय म्हणजे खर्ची पडणे, कमी होणे, नाहीसे होणे. व्यय याचा आणिक एक अर्थ - तो जुना होतो का ? त्याचा बदल् व्ययाकडे असतो का ? त्याला देश काल वस्तूचे बंधन आहे का ? तर वरील कोणताही अवगुण भगवंताला नाही, म्हणून परब्रह्म अव्यय आहे.


भगवंत/देव अनंत आहे. दिन प्रतिदिन तो वाढलेलाच अनुभवास येतो. या वाढत्या चढत्या साक्षात्कार सुखाचा आनंदपण देवाप्रमाणेच चढता वाढता असतो. आणि त्याला कारणभूत आहे श्रीसद्‌गुरूंकडून मिळालेले नाम. 'अठरा पुराणांच्या गोष्टी । नामाविण नाही गोष्टी ॥' जगातील सारसर्वस्व म्हणजे फक्त एक भगवंताचे नाम. तुकोबाराय म्हणतात, "सार सार सार । विठोबा नाम तुझे सार ॥" "नाम तेचि रूप" या साक्षात्कारी संतांच्या वचनाप्रमाणे नाम हे ब्रह्मबीज आहे. नाम हेच देव असल्याने त्याच्या स्मरणात कधी व्यय नाही, खर्च नाही. ज्या ज्या वेळी नामाचे स्मरण होते त्या त्या वेळी नामाची एकच असलेली जमेची बाजू सातत्याने वाढतच राहते. जाणून अगर न जाणून जरी नामाचा आठव झाला, तरी आपले सद्‌गुरू आपणास देवाचीच खूण दाखवत असतात. नाम व रूप एकच आहे. आपल्या प्रचीतीत सतत वाढ होते. "नाम आठवितां रूपी प्रगट पै झाला " हाच सोनियाचा अमृतस्वरूप आनंददिन.


या देवाच्या अनुभवात सातत्य पाहिजे. एकदा दिसलेले रूप पुनः पुनः दिसावयास हवे. "तो मज व्हावा, तो मज व्हावा । वेळोवेळा व्हावा पांडुरंग ॥" कटीवर हात ठेवलेला, पीतांबरधारी, गळा वैजयंतीमाळा, कस्तुरी मळवट, चंदनाची उटी, समचरण, समदृष्टी, सुंदर सावळे सुकुमार विठ्ठल पुनः पुनः दिसला पाहिजे. सातत्य हा देवाच्या स्वरूपाच्या सत्यानुभवाचा निकष आहे. या साठी चित्तात स्मरण, परेत नाम आणि डोळ्यांनी रूप एकाच वेळी झाले पाहिजे. स्मरण झाले पाहिजे, नाम आले पाहिजे आणि स्वरूप पाहिले - पाहतां आले पाहिजे.


कोणत्याही साध्यासाठी साधनाची नितांत गरज असतेच. साधना शिवाय साध्य शक्यच नाही. साधन व साध्य एका अर्थाने एकरूपच असतात. साधनात साध्य हे सामावलेले असतेच जसे दुधांत लोणी असतेच. पण तापवणे, विरजणे, घुसळणे ह्या प्रक्रिया खेरीज ते हातीं येत नाही. तसेच साध्य साधनाचे. साधनाची सुखात म्हणजे साध्याची पहिली पायरीच होय. "ज्या क्षणी अनुग्रह त्या क्षणीच मुक्तता" या वाक्याचा अर्थ हाच आहे. एकाच दिवसांत कोणी सावकार, श्रीमंत झाला नाही. आणि शाळेत जाऊन पहिल्याच दिवशी कोणी पंडित होत नाही. अगदी तसेच या देवाच्या आत्मसाक्षात्काराचे. भगवत्‌साक्षात्काराचे ध्येय गाठण्यासाठी सातत्याच्या साधनाचीच नितांत गरज आहे. साधकाला आपल्या उभ्या जीवनांत साधनेशिवाय दुसरे कांहीच मूल्यवान वाटता कामा नये.


साधनाचा उगम आपल्या सद्‌गुरूंकडून मिळालेल्या सबीज नामात आहे. या नामाचे निरंतर साधन करून अध्यात्माचे शिखर आपल्या शिष्याने गांठावे हीच श्रीगुरूंची आस. शिष्य शिष्यच न राहतां तो गुरुबोधाकार कधी होईल ? गुरुत्वास कसा पोहोंचेल अशीच वाट सद्‌गुरु पाहात असतात.


अण्णा -

11 January, 2009

मानसमणिमाला (१८)

मानसमणिमाला (१८)
:

हिंदी : हानि कुसंग सुसंगति लाहू । लोकहूँ बेद बिदित सब काहू ॥ बा. कां. १.६.८
गगन चढ‍इ रज पवन प्रसंगा । कीचहि मिल‍इ नीच जल संगा ॥ ९ ॥
साधु‍असाधु सदन सुक सारी । 'सुमिरहिं राम देहिं' गनि गारीं ॥ १० ॥
मराठी : हानि कुसंगी लाभ सुसंगमि । लोकी सकल विदित निगमागमिं ॥ प्रज्ञा. १.६.८
चढे पवनसंगति रज गगनीं । होइ चिखल नीचग-जल-मिलनीं ॥ ९ ॥
सज्जन-खल-गृहिं शुक साळुंक्या । राम वदति मुखीं शिव्या शेलक्या ॥ १० ॥
अर्थ : कुसंगतिने हानि व सुसंगतिने लाभ होतो हे सर्व लोकांत, वेद पुराणांत प्रसिद्धच आहे ॥ ८ ॥ पवनाच्या संगतीने धूळ आकाशांत चढते पण नीचगामी पाण्यात पडली तर चिखल बनते ॥ ९ ॥ साधू वा दुर्जनांच्या घरातील पोपट, मैना तोंडाने रामनामाचा उच्चार करतील किंवा वाईट शिव्या देतील हा संगतीचा परिणाम.

मनुष्याची जीवनदृष्टि घडविण्यामध्ये चांगली संगति अगर वाईट संगति या गोष्टींचा खूप मोठा प्रभाव असतो. संत तुलसीदास या गोष्टीला खूपच महत्त्व देतात. त्यामुळे अनेक तऱ्हेने अनेक उदाहरणांमधून ही गोष्ट पुनः पुन्हा पटविण्याचा ते प्रयत्‍न करतात. स्वतःच्या बलानें काहीही न करू शकणारी माती (अवकाशातील धूलिकण) ऊर्ध्वगामी, गतीशील वाऱ्याच्या संगतीने थेट आभाळाला भिडते व सुंदर दृश्य निर्माण करते; परंतु तीच माती अधोगामी जलाच्या संगतीने ओला चिखल होऊन जमिनीला पकडून बसते. सज्जनांच्या घरातील पोपट मुखाने राम राम म्हणेल, आपले स्वागत करील, या बसा म्हणेल, जातांना जयगोपाल म्हणेल; कारण त्याच्या कानावर असेच शब्द पडत असतात. याच्या उलट परिस्थिती दुर्जनांच्या घरांत असल्याने तिथे मात्र अपशब्द, शिव्या, कर्कश आवाजच ऐकायला मिळेल. हा सर्व संगतीचा परिणाम आहे.
वरील उदाहरणांत जडमाती अगत अज्ञानी प्राणी यांच्यावर होणारा संगतीचा परिणाम दाखविला आहे व त्यांना संगतीची निवड आपल्या मतानें करता येत नाही. मनुष्याला निवडीचे स्वातंत्र्य निश्चितच आहे. अत्यंत दुर्दैवी, विरुद्ध परिस्थिती मध्येंही आपले सद्‌विचार, चांगुलपणा, देशप्रेम, ध्येयनिष्ठा स्वतःमध्ये प्रयत्‍नपूर्वक निर्धाराने टिकवून धरून इतरांनाही सत्‌प्रवृत्त करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे सत्‌संगतीचे साक्षात उदाहरण नाही का ?
गोस्वामी तुलसीदासांच्या काळांत तर क्रौर्य, अधमता यांचा नंगा नाच आजूबाजूला दिसत होता व सर्वमंगल, कल्याणकारी मूल्ये, संस्कृती नष्ट होण्याची वेळ आली होती. अशावेळीं स्वधर्मसेतु भगवान रामचंद्रांच्या उज्ज्वल चारित्र्याची, सत्‌संगतीची व आदर्शाची आवश्यकता होती ना !

डॉ. सौ. उषा गुणे.

09 January, 2009

अवीट गे माये -

अवीट गे माये -
:
शुद्ध पवित्र अशा भक्तिमार्गाचा अर्थ अगदी साधा सोपा आणि सरळ आहे. भक्ति अमृतस्वरूप, म्हणजे उज्ज्वल अशी हरिभक्ति. अंतःकरणाने उपास्याशी, भगवंताशी, श्रीगुरुंशी एकरूप होऊन पर भक्ति झाली तर हे दिव्य अमृत प्राप्त होते. आणि हे भक्तिपदतीर्थामृत भक्ताचे जीवन सुशांत व सुमंगल करते.

एकदा भगवद्‌भक्ति हे साध्य ठरविल्यावर साधन काळात भक्त निष्ठेने, नेमाने, अनेकविध भक्ति-उपाय अवलंबितो. या अमृतस्वरूप रसमय भक्तिमार्गाचे वैशिष्ठ्य म्हणजे अंतिम ध्येय साधल्यावरही भक्त भक्ति करणे बंद करीत नाही, तर उलट अधिकाधिक प्रेमाने, उत्साहाने, आनंदाने अविरत, अविश्रम, अखंड भक्तीच करत राहतो.

मात्र साधना भक्ति व सिद्ध भक्ति यात महदंतर आहे. मग असा सिद्धभक्त भगवंतावाचून अन्य दुसरे काहीच बोलत नाही, चिंतीत नाही, पहात नाही व जाणत नाही. कारण त्याला आंत व बाहेर एकच सर्वत्र, सर्वव्यापी, सर्वेसर्वा, सर्वज्ञ विश्वेशराचीच प्रतीति येत असते. "आंत हरि बाहेर हरि । हरीने घटीं व्यापिले । बाहेरि भितरि तुजच मी देखे ॥" असा त्याचा अनुभव असतो. "हरिः सर्वेषु भूतेषु भगवान्‌ अस्ति ईश्वरः । इति भूतानि मनसा कामैस्तैः साधु मानयेत्‌ ॥ असं भागवतकारांच पण म्हणणं आहे. अशा सर्वात्मक भावाने, भावनेने देवाचे पूजन, अर्चन, गुणनाम स्वरूपसंकीर्तन करण्याएवढा अमूप आनंद अन्य कशातही मिळत नाही ह्यात नवल ते काय ? पण अशा भक्ताची, वैष्णवांची सर्वतोपरी नुसती साथसंगत लाभली तरीसुद्धा आभाळात मावणार नाही एवढा आनंद मिळतो.

अशा वैष्णवाचे संगतीने काय होते ? तर प्रतिक्षणी नवतेजाने चित्तात हरिनाम स्फुरणे हेच अमृतस्वरूप आहे. भागवतकार म्हणतात अशा वैष्णवाचं अमृतपान करणे, परस्पर वैष्णवांनी परस्परांना अमृतपान देणे हे प्रत्यक्ष स्वर्लोकीच्या अमृतालाही लाजेने मान खाली घालायला लावणारे आहे. केव्हढे हे श्रेष्ठ अमृतपान ? "यदि भवति मुकुंदे भक्तिः आनंदसांद्राः । विळुढति चरणाग्रे मोक्षसाम्राज्यलक्ष्मीः ॥" या अमृतपानापुढे मोक्षलक्ष्मीसुद्धा तुच्छ.

वेदांत अध्यात्म शास्त्राच्या मते निर्वाण, मोक्ष हेच अंतिम प्राप्तव्य आहे; परंतु भक्तिशास्त्रकारांच्या मते, अशा अमृतभक्तिचे मूल्य त्या मोक्षाहून कितीतरी जास्त मोलाचे आहे. या पराभक्तीच्या भक्तिप्रेमामृतापुढे लौकिक पारलौकिक सुखेच काय पण मुक्ति कःपदार्थ वाटते. तुलसीरामदासजी म्हणतात, "मुक्ति निराद री, भक्ति लुभाने" भक्तिप्रेमाचे हे अमृतकुंभ, मुक्तिपेक्षापण आनंददायक. मोठे रसाळ शांति पुष्टी तुष्टि प्रदान करणारे असे मधुरतम आहेत.

अमृत शब्दाचा आणखी एक अर्थ शास्त्र संमत आहे. तो म्हणजे "यज्ञ करून जे शेष राहते तेच अमृत", 'यज्ञशेषमधामृतम्‌', यज्ञशेष प्रसादान्न. भगवंताच्या भोजनातील, श्रीगुरुंच्या भोजनातील शेष भाग, उच्छिष्ट ह्याला पण भक्तिशास्त्रकारांनी अमृतच म्हटले आहे. ते सेवन करण्यार्‍याला नित्य ब्रह्मपदाचीच प्राप्ती होते, असं गीतापण छातीठोकपणे सांगते "यज्ञाशिष्ट अमृत भुजः यान्ति ब्रह्म सनतनम्‌ ।"

यज्ञ म्हणजे आपल्या सर्वस्वाचा त्याग करणे व स्वामित्व सोडणे. हे सर्वस्वाचे समर्पण जाणीवेने, स्वेच्छेने, 'इदं न मम' असे म्हणत सोडावयाचे. या अमृतस्वरूप भक्तिमार्गात कामना, इच्छा, अपेक्षापूर्तीसाठी जे देवतापूजन घडते त्यास सकामभक्ति असे म्हणतात. अशी भक्ति श्रेष्ठ भक्ताचार्यांना गौण कनिष्ठ हलकी वाटते. भक्ति आराधना करायची ती जगदीश्वर परमात्म्याची, परब्रह्मस्वरूप श्रीगुरूंची, आणि ती कोणत्याही ऐहिक, पारलौकिक लाभाची, सुखाची इच्छा मनात न ठेवता करावयाची असते. म्हणजे मगच ती अशी सर्वतोपरि, सर्वांगानी अमृतस्वरूप होते.

अशी ही अमृतस्वरूप परमप्रेमाभक्ति भगवंतासाठीच, श्रीगुरूंसाठीच. एकदा या अमृताभक्तीची गोडी लागली की मग ती कधीच सुटत नाही, सुटणार नाही, आणि तिचा कधीच वीट येणार नाही. "वीटे ऐसे नाही सुख । अवीट गे माये विटेना ॥ असा श्रीगुरुज्ञनोबा माऊलीचा या भक्तिप्रेमसुखामृताचा निर्वाळा.

खरोखरी आनंदस्वरूपी अमृतसागरांत, दिव्यतेजाने उन्मेषित होणारी चैतन्यवेळ म्हणजेच ही निर्मळ, निष्काम, नितळ, पारदर्शक, नित्यनूतन अनन्यभक्ति आहे.

ही परमप्रेमस्वरूप भक्ति अंतर्बाह्य अमृताने नुसती सदैव ओथंबणारी अमृतवल्लीच आहे. प्रत्येक मनुष्यमात्राने ही भक्ति साध्य करावी, आणि सच्चिदानंद भगवंताशी, श्रीगुरूंशी समरस होऊन अखंड अमृतसागरांत मुक्तपणे विहार करावा. मुक्तपणे या अमृतपानाचा रसास्वाद घ्यावा हा ज्ञानोबारायांचा आग्रह आहे.

त्या भाग्यवान गोपांगना अमृतपानाने तृप्त असूनसुद्धा पुन्हा भगवंताच्या वेणूचा भाग्योदय पाहून हेवा करत. केवढी भक्ति, केवढी तृतता, केवढी धन्यता ? पण रसामृत सेवन करून पुनः तृप्तीला भूक लागली म्हणावयाच्या. असा हा भक्तिप्रेमरस केवळ गोड, अमृतमय आणि अवीट.
अण्णा -