12 August, 2009

विष्णुसहस्रनाम - संकल्प, न्यासादि..

- परमेश्वराची प्रतिष्ठापना -

हिंदू धर्मातील सर्व धार्मिक विधी एका सुंदर उपक्रमाने सुरू होतात व तो म्हणजे भक्ताच्या शरीरातच परमेश्वराची प्रतिष्ठापना. ह्यालाच अंगन्यास किंवा करन्यास असे म्हटले जाते. सर्व अंगांगामध्ये व करतलामध्ये प्रतिष्ठापना करणे. ह्या पद्धतीमध्ये स्वेच्छेने व हेतुपूर्वक केलेल्या शारीरिक क्रियांमुळे साधक आपल्या स्वतःला एक दैवी मंदीर समजतो व त्यामध्ये वेगवेगळया देवतांची स्थापना करतो.

ह्या विधीमुळे साधकास असे सुचविले जाते किं जरी तो आपल्या ध्येयस्वरूप परमेश्वराची सध्या अन्यभावाने किंवा भेद भावाने पूजा करीत असला तरी त्याने शेवटी परमेश्वराशी अनन्यभावाने किंवा अभेदभावाने एकरूपता मिळवावयाची आहे. महावाक्यांनी निर्देश केलेला पूर्ण साक्षात्कार म्हणजेच पूर्ण एकरूपता ! अहं ब्रह्मास्मि ! मी ब्रह्म आहे.

मूळ महाभारतात अगर उत्तरेकडील प्रचलित सहस्त्रनाम पाठांत आपल्याला हा अंगन्यास विधी आढळत नाही. परंतु दक्षिणेकडील पंडीत अंगन्यास विधी उपयोगात आणतात. साधकास अत्यंत उपयोगी व सुंदर असा विधी असल्याने दक्षिणेत लोकप्रिय असलेली ही पद्धत आम्ही या ठिकाणी उद्धृत करीत आहोत.

हा प्रतिष्ठापना विधी भक्तास असे निर्देशित करतो किं भक्ताने श्रीविष्णूच्या सगुण सुंदर रूपाच्या सहाय्याने शेवटी नामरूपातीत परमसत्याचे असे ज्ञान करून घ्यावे किं ज्या ज्ञानामध्ये ध्येय - ध्याता - ध्यान यांचेमधील भेदही लुप्त होतो. ह्या गूढतत्वाखेरीज दुसरा गौण उद्देश असा किं जिज्ञासू साधकास तात्कालीक का होईना एका शुद्धतेची पवित्रतेची भावना निर्माण होते . ज्याप्रमाणे पवित्र देवालयाच्या परिसरांत भक्तास एका उच्चतम दैवी भावनेचा अनुभव येतो त्याचप्रमाणे अंगन्यासविधी नंतर देवालयात शिरण्यापूर्वीची अत्यंत अस्थिर भग्न मनोवृत्ती नाहीशी होवून आपण एक पवित्र शांत मनोवृत्ती प्रस्थापित करूं शकतो.

संपूर्ण शरीर हे परमेश्वराचे मंदीरच आहे व त्यातील अवयव हे वेगवेगळया देवतांची स्थाने त्यात आहेत. अशी भावता करून भक्त अत्यंत प्रेमाने व श्रध्देने त्या त्या देवतांना आवाहन करतो. ह्या विधीतील गर्भितार्थ पूर्णपणे मनांत ठसण्याकरीतां संपूर्ण पद्धतीमध्ये प्रत्येक मंत्राच्या उच्चारणा बरोबर एकेक शारीरिक कृती करावयाची आहे. पूर्वीच स्पष्ट केल्याप्रमाणे त्या मागची कल्पना अशी आहे किं भक्ताचे भगवत चिंतन समर्पित मनोवृत्तीने व योग्य भावाने सुरू रहावे.

(अ) अस्य विष्णुसहस्त्रनाम स्त्रोत्रस्य वेदव्यास ऋषिः ।

श्री वेदव्यास हे त्या पवित्र विष्णु सहस्त्रनाम स्त्रोत्राचे ऋषी आहेत. खोल आध्यात्मीक अर्थ असलेले व उन्नत वैदिक श्रेष्ठता प्राप्त झालेले मंत्र म्हणजे कुठल्याही सीमित बुद्धीच्या मानवाची काव्यकल्पना नाही. ध्यान मग्न अवस्थेत व्यक्तिमत्वाचे निम्नस्तर ओलांडून जेंव्हा एखादे मन उन्नत भुमिकेवर विहार करू लागते तेव्हा कांही सत्ये त्या व्यक्तिपुढे उघड केली जातात. असे हे ऐकलेले ('श्रुतम्') मंत्रच आजपर्यंत कुतर्काची विनाशक शक्ती, नासधूस करणारी कालशक्ति व दुष्ट टीका यांना तोंड देत समर्थपणे उभे राहू शकले आहेत.

हेच मंत्र जेव्हा एखाद्या नव्या साधकाच्या चिंतनांत येतात तेंव्हा त्या आध्यात्मिक मंत्रवाणीच्या सामर्थ्यानें त्या साधकाला ही नकळत एका अज्ञात उच्च अवस्थेचा अनुभव येऊ लागतो; व सर्व सामान्यांना ज्या जगताचा मागमूसही नसतो अशा तर्‍हेचे अनुभव येऊ लागतात. हे मंत्र लिहीणार्‍या ऋषींना वैदिक वांङमयात ''मंत्रद्रष्टा'' असे म्हटले आहे. त्या मंत्रद्रष्ट्या ऋषींनीही प्रांजळपणे सांगितले आहे किं त्यांनी स्वतः हे मंत्र तयार केले नाहीत अगर रचलेही नाहीत तर त्यांना ह्या मंत्राचे दर्शन झालेले आहे.

ह्या मंत्राच्या सहाय्याने साधना करणार्‍या साधकाला मंत्रद्रष्टा ऋषी गुरूस्थानी असतो. म्हणूनच मंत्रद्रष्टया ऋषीची स्थापना मस्तकाचे उर्ध्वभागी केली जाते. विष्णुसहस्त्रनाम जपास सुरवात करतेवेळी साधक प्रथम आपल्या मनांत ह्या मंत्राचा पाठ म्हणतो व आपल्या उजव्या हाताचा अंगठा मधल्या व चवथ्या बोटाशी जुळवुन मस्तकाच्या सर्वोच्च भागास स्पर्श करतो.

(ब) अनुष्टुप छन्दः ।

ज्या छंदामध्ये हा मंत्र ऋषीच्या ध्यानांत प्रकट होतो त्या छंदाचाहि ह्या ठिकाणी निर्देश केला आहे व त्याच छंदामध्ये हा मंत्र म्हणणे (जप करणे) शिस्तीचे दृष्टीने आवश्यक आहे. विष्णुसहस्त्रनाम स्त्रोत्र ज्या छंदामध्ये म्हटले जाते त्याचे नाव ' अनुष्टुप छन्द ' असे आहे. हे स्त्रोत्र मुखाने म्हटले जाते म्हणुन ह्या मंत्राची स्थापना अर्थातच मुखाचे ठिकाणी केली जाते. जेव्हा हा दुसरा (ब) मंत्र म्हटला जातो तेंव्हा मस्तकाला स्पर्श करणारी उजव्या हाताची बोटे खाली आणून ओठांना स्पर्श करतात.

(क) श्री विश्वरूपो महाविष्णुर्देवता ।

सर्व विश्वातील नामरूपामधून व्यक्त होणारा विश्वरूप परमेश्वर. श्री महाविष्णु ही ह्या मंत्राची देवता आहे. वैकुंठाधिपती श्री विष्णुचे पायाशी अत्यंत विनम्र भावाने व पूर्ण शरणागतीने भक्त स्वतःस अर्पण करू इच्छितो.

श्री विष्णुभगवान हा भक्ताच्या हृदयाचा स्वामी असल्यामुळे त्याच्या केन्द्रस्थानी, हृदयाचे ठिकाणी त्याची तो पूर्ण भक्ती भावाने स्थापना करतो. व हा मंत्र मनांत म्हणत असतांना आपला हात मुखापासुन खाली आणून हृदयस्थानी ठेवतो.

(ड) देवकीनन्दन स्त्रष्टेति शक्तिः ।

प्रत्येक देवता ही त्या सर्वशक्तिमान परमेश्वराचे व्यक्तरूपच आहे. धर्मपालनकर्ता देवकीनन्दन कृष्णही परमेश्वराचे व्यक्तरूपच आहे. धर्माची ही सृजनशक्ती व शांती ह्यांची स्थापना नाभीच्या ठिकाणी केली जाते. म्हणून हा मंत्र म्हणतांना नाभीला स्पर्श केला जातो.

(ई) शंखभृन्नन्दकी चक्रीति कीलकम् ।

आवाहन केलेली सामर्थ्ययुक्त सृजनशक्ती नामीच्या ठिकाणी जरी स्थापित केली जाते तरी मन ही कल्पना पूर्णपणे धारण करूं शकत नाही. ही कल्पना आपल्या बुद्धीत पूर्णपणे रूजविण्याकरीता ( ठोकून बसविण्याकरीतां ) ह्या मंत्रामध्ये त्या शक्तीलाच शंखचक्र व नंदक तलवार धारण करणर्‍या विष्णूचे रूप दिले आहे. आपल्या आजच्या ज्ञानामध्ये पूर्णपणे ठसलेल्या उत्पत्ति - स्थिती - लय ह्या तीनहि वैश्विक शक्ती ह्या परमेश्वराचीच व्यक्त रूपे आहेत हे दर्शविण्याकरतां हा मंत्र योजला आहे. ह्या ठिकाणी 'शंख ' हा सत्याचे आवाहन (अवतरण) निर्देशित करतो. हे आश्वासन वेळोवेळी परमेश्वरानेच दिले आहे हे आपल्याला वैदिक वाङमयावरून समजते. ' नंदक ' हे शस्त्र अनुशासन दर्शविते. ज्यामुळे सर्व समाजाला आनंद व आधारही मिळतो. संहाराखेरीज उत्क्रांती अशक्य आहे हे दर्शविण्याकरतां ' चक्राची ' कल्पना केलेली आहे.


येथे असे ही दिसुन येते किं शंखाच्या नादानें वाणी ( उच्चार ); तलवारीच्या गतीने कृती ( आचार ) व ईश्वरापासून गतीमान होणार्‍या चक्राने त्याचेच विचार निर्देशित केले जातात. ह्या प्रमाणे नाभीच्या ठिकाणी स्थापित केलेली शक्ती उच्चार - आचार - विचार ह्यामधून जगताला प्रतीत होत असते.

ही कल्पना पूर्ण रूजण्याकरतां परमेश्वराचेच पाय धरले पाहिजेत, म्हणूनच हा मंत्र म्हणत असतानां नाभीला स्पर्श करणारा हात पायाकडे नेऊन साधक दोन्ही हातांनी आपलेच पाय धरतो.

ह्या प्रमाणे काळजीपूर्वक विचार केल्यास असे दिसुन येईल किं गुरूची स्थापना मस्तकावर, वेदांची स्थापना मुखांत, परमेश्वराची हृदयांत व शक्तीची स्थापना नाभीच्या ठिकाणी केल्यामुळे साधक स्वतःच इतका पवित्रतम होतो किं तो स्वतःचेच पाय धरतो ! परमेश्वराशी एकरूपता साध्य होण्याकरतां साधकाला ह्यापेक्षां एकादी अधिक सुगम पद्धत उपलब्ध असेल का ?

(फ) शारंगधन्वा गदाधर इत्यरत्रम् ।

ज्यावेळी एकादी मोठी संपत्ती एकाद्या मोठ्या पेटीमध्ये एकत्रित करून ठेवली जाते तेंव्हा ती बंदिस्त करावी लागते. व तिचे रक्षणही करावे लागते. पूर्वी निर्देश केल्याप्रमाणे सर्व देवता सर्वांगामध्ये स्थापित केल्यामुळे साधकाचे शरीर हे आतां एक देवालय झालेले आहे. व ह्या पवित्र धनाचे रक्षण करणेही आवश्यक आहे. परंतु साधकाजवळ अशी कोणतीही शक्ती नसल्यामुळे तो सर्व जगताचे रक्षण करणार्‍या श्रीविष्णूजवळच अशातर्‍हेच्या अस्त्राचे? आवाहन करतो; व ह्या हृदयमंदिराचे रक्षण करण्याकरितां त्याचा उपयोग करतो. सारंग हे विष्णुच्या धनुष्याचे नांव आहे व गदा हे त्याचे आणखी एक शस्त्र आहे. ही दोन्ही आयुधे परमेश्वराने जगताच्या रक्षणाकरतां धारण केलेली आहेत. हा मंत्र मनांत जपत असतांना भक्त आपले दोन्ही हात पायापासून वर उचलतो व उजव्या हाताच्या तर्जनी व मधल्या बोटाने पसरलेल्या डाव्या हाताच्या तळव्यावर आघात करतो.


(ग) रथाङगपाणिरक्षोभ्य इति नेत्रम् ।

श्री विष्णुने? श्री कृष्ण अवतारांत सारथ्यकर्म केले म्हणून त्याला ' रथांगपाणि ' असे नांव मिळाले, आनंदाने व सुरक्षितपणे मार्गक्रमणा करावी म्हणून रथाच्या सारथ्याने घोड्याला प्रत्येक पावलाला मार्गदर्शन करावे लागते. आपल्या सर्व इंद्रियांमध्ये डोळयाच्या संवेदना अत्यंत प्रबल असतात व त्याच्या प्रेरणेप्रमाणेच इतर इंद्रिये त्याच्या मागे जातात. स्वतः भगवान विष्णुची स्थापना डोळयांचे ठिकाणी केल्यानंतर अर्थातच साधकाची सर्व परमार्थाची वाटचाल सुरक्षित व योग्य तर्‍हेने होते. म्हणूनच लगाम हातात धरणार्‍या ह्या सारथ्याला मनांत आवाहन केले जाते व त्याची स्थापना दोन्ही डोळयांचे ठिकाणी करत असतांना दोन्ही हातांची बोटे दोन्ही डोळयावर ठेवली जातात.


(ह) त्रिसामा सामगः सामेति कवचं ।

देव - व्रत - प्रोक्त अशा तीनही तर्‍हेच्या सामगानांनी सामगायक ज्यांची स्तुती करतात, स्तुतीप्रद सामगानांचा जो स्वतःच एकमेव विषय आहे (सामगः); ज्याची स्तुती अगर प्रभा म्हणजेच व्यक्त झालेले सामवेद (साम) तो दुसरा कोणी नसून स्वतः परमेश्वरच आहे. प्रत्यक्ष परमेश्वरालाच संरक्षक कवच म्हणून साधक धारण करतो. त्या मंत्राचे मनांत स्मरण करूनच साधक प्रथम आपल्या हाताच्या बोटांनी त्याच बाजूच्या खांद्याला स्पर्श करतो. नंतर दोन्ही हातांनी विरूद्ध बाजूच्या खांद्यांना स्पर्श करतो. जणूकाही आपल्या अंगाभोवती हे दैवी कवचच तो आपल्या हातांनी घालतो आहे अशी कल्पना केली जाते.


(इ) आनंदं ब्रम्हेति योनिः ।

पूर्णब्रह्म - अपरिमित आनंद हे सर्व विश्वाचे गर्भागार अगर उत्पत्ती स्थान आहे. या उत्पन्न झालेल्या वैचित्र्यपूर्ण वस्तूजाताचा एकच पिता आहे व तो म्हणजे मंगल आनंदस्वरूप परमेश्वर. हा मंत्र म्हणत असतांना साधक ह्या परम आनंदाची स्थापना आपल्या शरीरांतील प्रजनन इंद्रियांचे ठिकाणी करतो. ह्या दैवी मंदिरातील हे स्थान असे आहे किं ज्याच्यापासून जगताची उत्पत्ती होते म्हणून ते सृजनशक्तीचे स्थान समजले जाते.


(ज) विश्वरूप इति ध्यानम् ।

मनुष्याला आपल्या शरीर, मन व बुद्धी यांच्या सहाय्याने होणार्‍या संवेदना, भावना व विचार ह्यांच्या माध्यमातून जे विस्तृत अनुभव येत असतात त्याला ह्या ठिकाणी ' विश्व ' असे म्हटले आहे. व ह्या अनुभव विश्वातून जो प्रत्यय येतो त्यालाच ' विश्वरूप ' असे म्हटले जाते. परमेश्वराचे हे ' विश्वरूप ' म्हणजेच प्रत्यक्ष सर्व विश्व. साधक त्याचे विश्वरूपाने ध्यान करतो व त्याची स्थापना बुद्धिमध्ये करतो. अशावेळी साधक आपले हात एकमेकांत गुंतवुन ध्यान स्थितीमध्ये बसतो.

(क) ऋतुः सुदर्शनः काल इति दिक्बन्धः ।

सत्य ( ऋतम् ) म्हणजे स्वतः ईश्वर. त्याचे शस्त्र म्हणजे सुदर्शन व त्याची विनाशक शक्ति म्हणजेच काल ह्या तीन महाशक्ति साधकाच्या या पवित्र जीवन मंदिराचे रक्षण करण्याकरतां अनुभवाच्या बाह्य प्रांगणात सज्ज असतात. (दि्क-बंध) सर्वकाळी सत्यशील रहाणे व सत्याचीच उपासना करणे म्हणजेच ' ऋतम् '. विवेकाने सर्व स्थितीमध्ये परमेश्वराची लीला बघणे हे ' सुदर्शन ' होय. आपल्यामधील कालाचे उपकरण असलेली जी बुद्धी तिचे नियमन करणे, ह्या तीनही प्रक्रियांमधून निर्माण होणार्‍या शक्तिने भक्त आपल्या हृदयातील पवित्र मंदिराचे असंख्य प्रतिकुल शक्तींपासून रक्षण करतो त्यालाच ' दिक्बंध ' म्हणतात. यावेळी आपल्या मधल्या बोटाने व अंगठ्याने चुटकी वाजवितो व नंतर आपल्या हाताचा तळवा आपल्या मस्तकाभोवती फिरवतो. कारण सर्व विश्वाची धारणा शेवटी बुद्धिमध्येच असते.

(ल) श्री महाविष्णुप्रित्यर्थे जपे विनियोगः ।

स्वतःमध्ये परमेश्वराच्या प्रतिष्ठापनेचा संकल्प केल्यानंतर व त्याला शरण जावून त्याच्याच संरक्षणछत्राचा आश्रय घेतल्यानंतर साधक पुढचे विधान करतो व ते म्हणजे तो आता स्वतःचा विनियोग जपकर्मा मध्ये करणार आहे. परमेश्वराच्या सहस्त्रानामाचा जप. प्रश्न असा येतो किं 'कुठल्या उद्देशाने तो हा जप करणार आहे ? ' त्याच मंत्रात त्याचे उत्तर आहे व ते म्हणजे श्री महाविष्णुच्या प्रीतीकरतां; कृपेकरतां. हा मंत्र म्हणून साधक एक पळीभर तीर्थ आपल्या उजव्या हाताच्या तळव्यावर घेतो व आपल्यासमोर जमिनीवर सांडतो.

खरा भक्त ऐहिक सुखसाधनाच्या वासनेमध्ये कधीच अडकून पडत नाही. त्याचे एकच ध्येय असते व ते म्हणजे परमेश्वराची कृपादृष्टि मिळविणे. हळू हळू साधनेने ती त्याच्या ज्ञानधारणेमध्ये प्रकट होऊ लागते.

ह्या स्फुर्तीदायक व परमार्थास उपयुक्त अशा बारा मंत्रांचा जप करून साधक परमेश्वरास आवाहन करतो व आपल्या अवयवांचे ठिकाणी त्याची प्रतिष्ठापना करतो. या सहस्त्रनाम स्त्रोत्रात ज्या सत्याचा निर्देश करण्यात आला आहे त्याचे सूक्ष्म ध्यान करण्यास येथे साधक पूर्ण समर्थ होतो.

हा सुंदर विधी अंगन्यास या नावांने ओळखला जातो. याचेमुळे साधकास साधना करण्यास स्फुर्ती मिळते एव्हढेच नव्हे तर नव्या साधकांनाही आपल्या पापबुद्धिच्या दडपणापासून थोडावेळ तरी विश्रांती अगर सुटका मिळते. योग्य त्या प्रकाराने व योग्य त्या भक्तीभावाने हा विधी केला असता कांही विशिष्ठ मर्यादेपर्यंत तरी भक्तास अंतर्यामी परमेश्वराशी सारूप्य साधल्याचा अनुभव प्राप्त होतो.

डॉ. सौ. उषा गुणे.






08 August, 2009

बद्ध - मुक्त लक्षणे - (४) (भागवत स्कंध ११ अध्याय ११)

बद्ध - मुक्त लक्षणे - (४)

भगवंत आता संतांना, भगवंताला अभिप्रेत असलेली भक्ति कशी असते आणि अशी भक्ति करणारा भक्त कसा असतो, त्या भक्ताचे २९ ते ३१ या तीन श्लोकांत २८ लक्षणे दर्शिविली आहेत. त्यापुढील दोन श्लोकात (३२ व ३३) आत्यंतिक भक्ताची विशेष लक्षणे सांगितली आहेत.

१. कृपा - सर्वांवर सदा कृपा करणारा, दयाळू . दयाळू भक्ताचे चित्त मोठे विलक्षण असते. प्राणीमात्रांचे जीव तो आपल्या जीवात घालतो, आणि दुःखाचे हरण करून सुख देतो. त्याची कृपा अद्‌भुत असते. श्रीमहाराज (श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज) तीर्थाटन करीत असताना एके समयी भिक्षा मागत एका घरी गेले. त्या घरची माऊली अति चिंतित दिसली. चवकशी करता कळले की घरात तिचा पुत्र अतिज्वराने फणफणत आहे. काही न बोलता महाराज घरात घुसले आणि तिच्या मुलाच्या हातून आपल्या हातावर उदक सोडवून घेतले आणि निघून गेले. काही वेळाने मुलाचा ताप उतरला आणि संध्याकाळपर्यंत तो खणखणीत बरा झाला. पण इकडे श्रीमहराज पुढील अकरा दिवस आजारी होते. (श्रीसद्‌गुरुलीलामृते समास दुसरा ओवी ५९ - ७२). असे भक्ततम जरी कधी कोणावर रागावले तरी - श्रीज्ञानेशांच्या शब्दात - शब्द पाठी अवतरे । कृपा आधी ॥

२. अद्रोह - कोणाशी द्रोह न करणारा. अमुक एक गोष्ट आपल्या मनाविरुद्ध असल्यास वा न पटणारी असल्यास द्रोह उत्पन्न होतो. पूर्ण विरागीच्या ठिकाणी मनोवांच्छेचा अभाव असतो म्हणून कशामुळेही द्रोह होत नाही. सर्वच प्राणीमात्रांमध्ये भगवंताला पहात असल्यामुळे द्रोहाची वार्ताच नाहीशी झालेली असते. कधी आपत्ती उत्पन्न झाल्यास आपत्तीमुळे वा आपत्तीविषयी देखील कधी द्वेष उत्पन्न होत नाही.

३. तितिक्षा - सुखदुःखादि सहन करणे. अभ्यासाने साध्य होणारी ही स्थिती आहे. उद्वेग निर्माण होणे हे साधारणतः बाह्य परिस्थितीमुळे होत असते, आणि तरीही मन शांत ठेवण्याच्या अभ्यासामुळे आंतरीक खळबळ नसते पण त्याचे स्वरूप काहीसे वादळापूर्वीच्या शांततेप्रमाणे सुप्त उद्रेकाप्रमाणे असू शकते. अगदी असह्य परीस्थितीमध्ये स्फोट होऊ शकतो. पण संतांना कोणत्याही बाह्य वस्तुंमध्ये (विषय वा ऊर्मी) भोग घेण्यात रस नसल्यामुळे त्यांच्या ठिकाणी तितिक्षा ही स्वाभाविक असते कारण - योगरतो वा भोगरतो वा सङ्गरतो वा सङ्गविहीनः - परिस्थिती अनुकूल असो वा प्रतिकूल, त्याचे चित्त सदा प्रसन्नच असते, सदा सर्वत्र आनंदी आनंदच असतो - यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नन्दति नन्दति नन्दत्येव ॥

४. सत्य - सत्य हेच जीवनाचे सार असणे - जीवनात कितीही मोठे संकट आले तरी असत्याचा आधार घ्यायचा विचारही मनांत येत नाही. संत आणि इतरांमध्ये मुख्य फरक असतो तो सत्याच्या परीभाषेचा. प्रत्येक व्यक्तिचे सत्, रज, तम या गुणांच्या मिश्रणाचे प्रमाण वेगळे असते. त्यामुळे व त्याच्या वासना, समाजातील त्याचे ठिकाण, सभोंवतालचे वातावरण, सहनक्षमता, मनःस्थैर्य या सर्व गोष्टींमुळे प्रत्येकाची सत्याची परीभाषा वेगळी असते. सनत्कुमार, गौतम, दुर्वास, विश्वामित्र हे सर्व ज्ञानी पण केव्हां ना केव्हां कोपिष्ट होऊन शाप देतच असत. द्रोण ज्ञानी ब्राह्मण पण कौरवांच्या मिंधेपणामुळे आपला स्वामी दुराचार करतोय हे जाणूनही त्याला साथ देणे हे त्यांचे सत्य. तसेच भीष्माला कोणत्याही परिस्थितीत "माझी" प्रतिज्ञा हीच सत्यापेक्षा महत्त्वाची. कृष्ण तर भगवानच. पण त्याच्या सांगण्यावरून सत्यवचनी युधिष्ठीराचे देखील द्रोणवधासाठी - ’नरो वा कुंजरो वा’ असे सांगणे म्हणजे सत्याला धरून चालणे, असे झालेच की. प्रसंगानुरूप सत्याची व्याख्या कशी बदलते याचे एक छान उदाहरण म्हणजे बलिने वामनाला ’तुला काय मागायचे आहे ते माग’ असे म्हटल्यावर त्याचा गुरू शुक्राचार्य त्याला जो उपदेश करतो ते. बलिने तर ’माग’ म्हणून टाकले पण शुक्राचार्य जाणतात की वामन काय मागणार आहे. ते बलिला सांगतात (भागवत ८.१९.३९-४०) - "हे राजा, श्रुति वाक्यानुसार आता ’हो’ म्हणणे हे सत्य आहे आणि नकार देणे असत्य आहे. पण एक लक्षात ठेव, हे शरीर हा एक वृक्ष आहे आणि सत्य याचे फूल व फळ आहे. पण वृक्षच राहिला नाही तर फूल वा फळ कसे राहणार ? असत्य हेच शरीररूप वृक्षाचे मूळ आहे. म्हणून नकार देऊन शरीर वाचवावे. जसे मूळ राहिले नाही तर काही काळातच वृक्ष सुकून गळून पडतो, त्याचप्रमाणे असत्याशिवाय देह तात्काळ नष्ट होईल यात शंका नाही." त्यांना बहुधा सांगावयाचे होते की ’अतिरेक करू नकोस.’ एवढे सांगूनही बलि वामनाला दान करतोच, पण तो सत्यासाठी का "माझा शब्द खोटा होऊ नये" या अभिमानापोटी याबद्दल भागवतात काही माहिती नाही. पण दान दिल्यावरही त्याला भगवंताने (वामनाने) सुतललोकी (पाताळात) पाठवलेच. पुढे भगवतात एके ठिकाणी (८.२०.१६) बलि सत्यापासून ढळला नाही असा उल्लेख असला तरी ८.२२.३ येथे तो म्हणतो - "नरक, पाश, दुःख, दारिद्र्य, शिक्षा याला मी भीत नाही जितका मी माझ्या अपकीर्तिला भितो." भविष्यात कोणत्यातरी मन्वंतरात त्याला इंद्र केले जाणार आहे हेही भागवतात सांगून ठेवले आहे. यावरून शंका येते की बलिला सत्यापेक्षा इंद्रपद, माझी अपकीर्ति (म्हणजे एकून विषयच ना ?) हेच महत्त्वाचे असावेत. as against this दशरथाने सत्यापासून न ढळता मरण पत्करले असले तरी पुत्रस्नेहाव्यतिरिक्त त्याला आणखी कोणतीही अभिलाषा असल्याचा कुठे उल्लेख नाही. असो.
तात्पर्य : जीवनात सत्याला कोणते स्थान द्यायचे, त्याचा अतिरेक करायचा का त्याला चिकटून राहून वेळप्रसंगी सर्वनाश ओढवून घ्यायचा, असे हे सत्य प्रत्येकासाठी वेगळे असते एवढे मात्र खरे.

पुढची (२४+२) लक्षणे यथावकाश.

क्रमशः

एकोहम्