31 January, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ९

श्री विष्णु सहस्रनाम  श्लोक ९

ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमः क्रमः ।
अनुत्तमो दुराधर्षः कृतज्ञः कृतिरात्मवान्  ।।
(७४) ईश्वरः :  - जो सर्व शक्तिमान आहे व म्हणूनच सर्व शक्ति ज्याचेमध्ये पूर्णतेच्या अवस्थेत रहातात तो ईश्वर. प्रत्येक बुद्धिवान मनुष्यातील चैतन्यशक्ति तीन प्रकारांनी व्यक्त होत असते. (१) शरीराची कृती करण्याची शक्ति - क्रियाशक्ति (२) मनाची इच्छा करण्याची शक्ति - इच्छाशक्ति (३) बुद्धिची ज्ञान करून घेण्याची शक्ति - ज्ञानशक्ति. ह्या तीनही शक्ति चैतन्याचीच व्यक्त रूपे आहेत म्हणून तोच सर्व ठिकाणी व्यक्त होत असतो. तोच सर्व शक्तिमान श्रीविष्णु आहे.
(७५) विक्रमी :  - जो विक्रम (शौर्य) युक्त आहे, म्हणजेच शक्ति, धैर्य व साहस युक्त आहे. दुसरा अर्थ असा की ज्याचे 'पदक्रमण' वैशिष्ठ्यपूर्ण आहे तो. विक्रमी, बटुमुर्ती वामनाने आपल्या लहानशा पावलांनी तीनही लोक व्यापून टाकले ह्या कथेची येथे आठवण दिली आहे.
(७६) धन्वी :  - भगवान् विष्णूचे दिव्य धनुष्य शारंग नावाने ओळखले जाते; व ते अत्यंत शक्तिमान असे शस्र मानले जाते. ज्याचे जवळ नित्य अत्युत्कृष्ठ असे धनुष्य असते तो धन्वी. धन्वी ह्या संज्ञेनें आपल्याला श्रीविष्णुचा सातवा अवतार 'श्रीरामचंद्र' ह्यांचे स्मरण होते. राक्षसाधिपती रावणापासून जगताचे रक्षण करण्याकरतां श्रीरामानें आपल्या आयुष्यातील बराच मोठा काळ रानात व्यतीत केला, त्यावेळी त्याला सतत धनुष्य सज्ज ठेवावे लागत असे म्हणून श्रीरामांना ' धनुष्पाणी ' असे म्हटले जाते. व शरणगताचेे रक्षण करण्याच्या त्यांच्या व्रतामुळे त्यांना 'कोदंडराम' असे संबोधिले जाते. म्हणूनच ' धन्वी - धनुष्य धारण करणारा ' ही संज्ञा श्रीविष्णुला पूर्णपणे लागू पडते. याकरतांच गीतेमध्ये ' धनुष्यधारण करणार्‍यामध्ये मी श्रीराम आहे' असे भगवंतांनी स्वतःच सांगितले आहे. गीता १०.३१
(७७) मेधावी :  - उत्कृष्ठ मेधा - बुद्धी असलेला. म्हणजेच जो सर्व ज्ञान संपन्न आहे असा. सर्व घडणार्‍या गोष्टी आपल्या बुद्धिनें जो पूर्णपणे जाणू शकतो त्याला मेधावी असे म्हटले जाते. सर्व प्राणीमात्रांमध्ये असलेली ज्ञानशक्ती ही प्रकाशमय आहे. व त्या सर्व प्रकाशानेच बुद्धि प्रकाशित होते. श्रीविष्णु हा अनंत प्रकाशमय असल्याने सर्व कालात घडणार्‍या सर्व घटनांचा ज्ञाता तोच आहे. म्हणूनच विद्या व ज्ञानदात्री श्री सरस्वती देवी ही श्रीविष्णुची प्रत्यक्ष जिव्हा आहे असे मानले जाते.
(७८) विक्रमः :  - विक्रमी या नामाचे विवरण करतांना (७५) आपण विक्रम ह्या शब्दाचे स्पष्टीकरण केलेलेच आहे. श्रीविष्णुने वामन अवतारामध्ये तीन पावलांनी तीनही लोकांचे आक्रमण (मापन ) केले ह्या दैवी कृतीला अनुलक्षून ही संज्ञा वापरली आहे.
     तसेच 'वि' म्हणजे पक्षीराज, शुभ्र मान असलेला गरूड. क्रम - पदन्यास किवा प्रवास, गमन. म्हणून ह्या संज्ञेचा अर्थ होईल जो शुभ्र मान असलेल्या गरूडावरून (मन) गमन करतो तो श्रीविष्णु. गरूड हे श्रीविष्णुचे वाहन आहे.
(७९) क्रमः :  - जो सर्वाला व्यापून राहिलेला आहे तो 'क्रम' या नावांने ओळखला जातो. त्याच्या सर्व व्यापकत्वामुळे त्या अनंतालाच श्रीविष्णु म्हटले जाते. सर्व ज्ञात सृष्टिच्याही मर्यादांचे पलीकडे जो असतो तोच 'परमात्मा' व तो विश्वस्वरूपाने व्यक्त झालेला आहे. पुरूषसूक्तामध्ये त्याचे वर्णन करतांना असे म्हटले आहे की ' केवळ ज्ञात सृष्टिस तो व्यापून आहे इतकेच नव्हे तर त्या पलिकडेही तो दहा अंगुळे विस्तार पावला आहे. ( अत्यतिष्ठत् दशांगुलम्)
(८०) अनुत्तमः :  - ज्याची दिव्यता अतुलनीय आहे असा तो अनुत्तम. संस्कृत शब्दरचने प्रमाणे जेव्हा शब्दाने सांगितलेल्या अर्थापेक्षां कांही जास्त सुचवायचे असते तेव्हां अशी रचना केली जाते. ज्याचे पेक्षा दुसरा जास्त उत्तम (उत्तमोत्तम) अस्तित्वातच नाही असा जो तो अनुत्तम. ( अविद्यमानः उत्तमो यस्मात् ) उपनिषदही म्हणते '' (अविद्यमानः परं नापरम् अस्ति किंचित्) तुझ्याइतके तुल्य कोणीही नाही तर तुझ्यापेक्षा जास्त श्रेष्ठ कोण असणार ? गीतेतही हयाच अर्थाचे वचन आहे. ( ११-४३ ) तसेच नारायण उपनिषदांत आपल्याला आढळते 'परमेश्वरापेक्षा उच्च अगर नीच तुलने करता काहीही नाही.'
(८१) दुराधर्षः :  - ज्याचेवर यशस्वीरित्या प्रहार करतां येत नाही, चढाई करता येत नाही किवा ज्यास विच्छिन्न करतां येत नाही असा. म्हणजेच जो सर्वापेक्षा शक्तिमान आहे असा. पुराणातील कथांवरून आपल्याला समजते की अनेक बलवान असूर व दैत्य हतबल होऊन त्याचे सामर्थ्यापुढे शरण आले किवा त्याच्यामुळे नष्ट झाले. ज्याला परम सत्याचे दर्शन झाले आहे त्याच्या मनातील हीनवृत्ती (दैत्य) व इंद्रियांची मायावी शक्ति (राक्षस) परमेश्वरावर विजय मिळविण्यांत हतबल ठरतात. (रसोप्यस्य परंदृष्ट्वा निवर्तते - गीता २-५९)
(८२) कृतज्ञः :  - सर्व प्राणीमात्रांची सर्व कर्मे जाणणारा ज्ञाता कृतज्ञ होय. तो सर्वांची शारीरिक कर्मे जाणतो, सर्वाच्या भावना जाणतो, सर्वांच्या बुद्धितील विचार व हेतू जाणतो तो कृतज्ञ. त्याचे मुळेच सर्वांना, सर्वकालात सर्व ज्ञान होते. म्हणून त्याला कृतज्ञ म्हटले जाते.[1]
     श्रीविष्णु भगवान हाच भक्तांची प्रामाणिक तळमळ, खरी विनम्र भक्ति व अंतःकरण शुद्धि जाणणारा आहे. व त्या प्रमाणे तो भक्तांचे हृदय आनंदाने व परमधन्यतेने भरून टाकतो.
(८३) कृतिः :  - सर्व कर्मामधील प्रत्यक्ष चैतन्य म्हणजेच श्रीविष्णु. तोच सर्व कर्मांच्या परिणामामागेही अवशतेने असतोच. जो सत्कृत्याला अभय देण्याकरतां व दुष्कृत्याला शिक्षा देण्याकरतां अवतार कार्य करतो त्यालाच कृती असे म्हटले आहे. म्हणजे तोच कर्मफलदाता आहे.
(८४) आत्ममान् :  - जो प्राणीमात्रांचा आत्मस्वरूप आहे असा. छांदोग्य उपनिषदांमध्ये शिष्य विचारतो, तो अनंत परमात्मा कोठे स्थित असतो ? ' व त्याला श्रुतीने उत्तर दिले आहे ' तो स्वतःच्या सामर्थ्याने नित्य स्थित आहे. तो आत्मा ' स्वतःच्या महिम्यात'' स्थित आहे. (स्वेमहिम्नि प्रतिष्ठितः – ७.२.१)
डॉ. सौ. उषा गुणे. 


[1]  आधुनिक समाजामध्ये हा शब्द केवळ कृतज्ञता प्रदर्शित करण्याकरता वापरला जातो. स्तोत्रातील येथपर्यंतच्या विचारसरणीचा मागोवा घेताः ’कृतज्ञता’ ही केवळ शब्दांनी प्रदर्शित करावयाची भावना नवे, तर आपल्यासाठी इतरांनी केलेल्या सर्व कृतींबद्दल सतत जाणीव ठेऊन तत्परतेने परत त्यांची सेवा करून त्यांच्या ऋणांतून उतराई होण्याचा प्रयत्‍न करणे होय. भारतामध्ये ही कृतज्ञता केवळ ’आपला आभारी आहे’ अशा दोनतीन कोरड्या शब्दात व्यक्त केली जात नाही.

28 January, 2011

श्री विष्णु सहस्रनाम - श्लोक ८




श्री विष्णु सहस्रनाम  श्लोक ८


ईशानः प्राणदः प्राणो ज्येष्ठः श्रेष्ठः प्रजापतिः 

हिरण्यगर्भो  भूगर्भो माधवो  मधुसूदनः  ।।

(६४) ईशानः :  - पंच महाभूतांचे नियंत्रण करणारा. या संज्ञेने असे सुचवायचे आहे की ईश्वर या विविधतेने नटलेल्या जगाचे स्वतःच केलेले नियम अमलांत आणणारा नियंता आहे. जेव्हा त्याची इच्छा शक्ती 'कार्य नियंता ' ह्या भूमिकेतून प्रतीतीस येते तेंव्हा तो ' ईशान ' स्वरूपांत कार्य करतो. तोच परमेश्वर आहे असाही या संज्ञेचा अर्थ होतो.

(६५) प्राणद:  - (प्राणान् ददाति इति प्राणदः) :  - सर्व प्राणीमात्रांना प्राण देतो तों प्राणद. तत्वज्ञानाप्रमाणे सजीव शरीरातील जीवनाचा निर्देश ( व्यक्तता ) ज्याचेमुळे होतो त्याला ' प्राण ' असे संबोधिले जाते. जगातील सर्व सजीवांच्या सर्व हालचाली ज्या एका जीवनाच्या स्त्रोतापासून होत असतात त्यालाच प्राणद असे म्हटले जाते. तैतिरीय उपनिषद् म्हणते (२-७) जर तो सर्वत्र नसेल तर कोण सजीव राहू शकेल? कोण श्वासोच्छ्श्वास करू शकेल ?

(६६) प्राण:  - ( प्राणिति इति प्राणः ) :  - जो धारण करतो ( जीव ) तो प्राण, व अशातर्‍हेचा ' प्राण ' ज्याचे मध्ये कार्यकारी आहे तो प्राणी. ह्या ठिकाणी शरीरातील प्राण म्हणजेच प्रत्यक्ष परमेश्वर असे सूचित केले आहे. तोच नित्य आहे, अनंत आहे. येथे असाही अर्थ होईल की 'जो वायूलाही जीवनदायी शक्ति देतो तो परमेश्वर प्राणद आहे कारण वातावरणातील सर्व चैतन्य धारण करण्याची शक्ति त्याचेपासूनच निर्माण झाली आहे. कठोपनिषदांत परमेश्वराची व्याख्या तो प्राणाचा प्राण आहे, (प्राणस्य प्राणः) अशी केली आहे.

(६७) ज्येष्ठः :  - जो सर्वांपेक्षा वृद्ध आहे तो ज्येष्ठ. [1] अवकाशाची संकल्पना प्रत्यक्षात येण्याचाही आधी ते अनंत अस्तित्वात होते. वृद्ध ह्या शब्दाचा तमभाव दर्शविणारी दाखविणारी ही संज्ञा आहे. आपल्या शास्त्रामध्ये चिरपरीचित असलेल्या 'सनातन' शब्दाने सूचित होणारा अर्थ ह्याही संज्ञेला लागू पडतो.

(६८) श्रेष्ठः :  - सर्वाहून अधिक गौरवास्पद असा. ह्या ठिकाणी पुन्हा 'श्रेयः' ह्या शब्दाचे तमभावाचे रूप[2] वापरले आहे.

(६९) प्रजापतिः :  - सर्व प्रजेचा (सजीव प्राण्यांचा ) पति ( स्वामी ). प्रजा म्हणजे संतती व त्यांचा स्वामी अगर पिता. म्हणून ह्या संज्ञेने जगातील सर्व सजीव प्राण्यांचे पितृत्व त्याचेकडे जाते. व सर्वप्राणी त्याचीच मुले आहेत असे सुचविले जाते. सर्वप्राणीमात्रांचा उत्पत्तीकर्ता तोच आहे.

(७०) हिरण्यगर्भः :  - जो हिरण्यमय ब्रह्मांडाच्या गर्भात रहातो तो. उपनिषदांत म्हटले आहे ' हे सर्व त्यानेच व्याप्त आहे.[3] संस्कृतमध्ये हिरण्यमय विश्व हा एक वाक्प्रचार आहे. यातील सुवर्णवाचक शब्दाने सर्व आनंददायक व सर्व सुखदायक गोष्टींचा निर्देश केला जातो. या सर्व आनंददायक गोष्टींनें अंतर्भूत असलेला तों हिरण्यगर्भ. या संज्ञेचा आणखी एक अर्थ असा करतां येईल की ' तो स्वतः सृष्टिकर्ता असल्यामुळे त्यालाच सर्व जडचेतन सृष्टिचे गर्भस्थान [4] (उत्पत्तिस्थान) मानले जाते.

(७१) भूगर्भः :  - जो या पृथ्वीचे गर्भस्थान आहे तो भूगर्भ. म्हणजेच त्याचेपासूनच सर्व सृष्टिची उत्पत्ति झाली आहे. मातेच्या गर्भस्थानांत असलेला गर्भ ज्याप्रमाणे माता अत्यंत प्रेमाने व स्वतःच्या जीवनशक्तिने सतत वाढविते, पोसते त्याप्रमाणे ह्या ब्रह्मांडाचा अत्यंत लहान भाग असलेले जगत् त्या परमेश्वराकडून अत्यंत प्रेमाने धारण केले जाते, पोषिले जाते. आणखी एक अर्थ - या दिव्य सृष्टिचा (भू) भर्ता ( रक्षणकर्ता - गर्भ ) असा होतो.[5]

(७२) माधवः :  - मा - माया - महालक्ष्मी. तिचा पति ( धवः ) मायेचा पति किवा स्वामी. किवा छांदोग्य [6] उपनिषदांत वर्णन केल्याप्रमाणे 'मधुविद्येच्या' सहाय्याने ज्याचे ज्ञान प्राप्त होते तो माधव. या संज्ञेचा अर्थ असा होईल की 'जो मौनी आहे ( शांत आहे ) जो शरीर मन व बुद्धिचे बदलत्या जगातील व्यापार साक्षीत्वाने पहातो तो माधव. दुसर्‍या शब्दात ज्या साधकाने आपले मन स्थिर करून व योग साधनेने आपले अंतःकरण शुद्ध केले आहे त्या साधकांस प्रतीत होतो तो माधव'.[7]

(७३) मधुसूदनः :  - ज्याने मधु राक्षसाचा निःपात केला तो. श्रीविष्णुनें मधु व कैटभ या दोन राक्षसांचा वध केला. त्या संबंधी महाभारतामध्यें आलेली कथा गूढार्थपूर्ण आहे. वेदांमध्ये कर्माचे फल म्हणजेच 'मधु' असे म्हटले आहे. ही कर्मे वासना निर्माण करतात. ह्या वासनांचा नाश परमात्म्याच्या सत्यस्वरूपाचे चिंतन केले असता होतो. म्हणून परमेश्वरांस 'वासनांचा' नाश करणारा 'मधुसूदन' असे म्हटले आहे.
डॉ. सौ. उषा गुणे.
 ---------------------------------------------------------------
[1]     वृद्धः ज्यायात् ज्येष्ठः
[2]   श्रेयः श्रेय श्रेष्ठः
[3]    इशावास्यमिदं सर्वम्
[4]   हिरण्यगर्भः समवर्त्तताग्रे  ।। 
[5]    तैत्तिरिय ब्राह्मणामध्ये ( ३-१-२ ) ही दिव्य पृथ्वी श्रीविष्णुची पत्नी आहे असे म्हटले आहे.
[6]    मधुविद्यावबोधत्वात् धवत्वद्वा श्रियोऽनिशम्  । मौनात् ध्यानाच्चयोगाच्च विद्धिभारत माधवम् 

24 January, 2011

श्लोक ७ वा
अग्राह्यः शाश्वतः कृष्णो लोहिताक्षः प्रतर्दनः  ।
प्रभुतस्त्रिककुब्धाम पवित्रं मंगलं परम्  ।।


(५५) अग्राह्यः :  - ज्याचे ज्ञान इंद्रियांचे सहाय्याने होऊ शकत नाही तो 'अग्राह्य ' आहे. तो इंद्रिय ज्ञानाचा विषय नाही तर सर्व प्राणीमात्रांना आपापल्या इंद्रियाने होणारे सर्व ज्ञान ज्याला होते तो प्रत्यक्ष ज्ञाता आहे. स्वतः ज्ञाता कधीच ज्ञेयविषय होऊ शकत नाही. इतर इंद्रियगम्य वस्तूप्रमाणे 'सत्य' हे इंद्रियांचे सहाय्याने ज्ञात होत नाही. सर्वकालामध्ये सर्व प्राणीमात्रांना सर्व इंद्रियांचे द्वारा सर्व विषयांचे ज्ञान ज्याला होते असा तो एकमेव ज्ञाता आहे. इंद्रियज्ञानाचा ज्ञाता तो असतो इतकेच नव्हे तर मनातील भावना व बुद्धीतील विचार जाणणाराही तोच आहे.
    याप्रमाणे इंद्रियांनी तो समजत नाही, मनाला तो भासत नाही व बुद्धिला ज्ञात होत नाही उपनिषदांमध्ये म्हटले आहे “मनासहित शब्द तेथे पोहोचू न शकल्याने परत फिरतात व तोच परमेश्वर आहे” ( यतोवाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह) म्हणूनच तो अग्राह्य आहे, इंद्रियातीत व विचारातीत आहे. केनोपनिषद स्पष्टपणे व ठासून सांगते “ज्याला नेत्र पाहू शकत नाहीत परंतु नेत्र ज्याच्यामुळे पाहू शकतात तेच ब्रह्म (महाविष्णु) आहे असे तू समज. तू इथे ज्याचे पूजन करतोस ते नव्हे.”

(५६) शाश्वत:  -(शश्वत् भवतीति शाश्वतः) :  - जे सर्व कालामध्ये जसे आहे तसेच रहाते ते शाश्वत - जे शाश्वत आहे ते तीनही कालामध्ये विकाररहितच असते. म्हणजेच ते कालबंधना पलिकडे आहे. ते परमसत्य ज्ञान स्वतःच सर्व कालाला प्रकाशित करते व जो प्रकाशक आहे तो प्रकाश्य वस्तूकडून कधीच परिणाम पावत नाही. ते विकाररहित सत्य म्हणजेच 'श्रीविष्णु '.


(५७) कृष्णः :  - संस्कृत भाषेतील कृष्ण या शब्दाचा अर्थ आहे काळा रंग. ज्या सत्याचे बुद्धिने थोडेसे ज्ञान होते परंतु परमार्थतः त्याची प्रतीती येत नाही ते सत्य विशिष्ठ कृष्णपटलाने झाकले आहे असे मानले जाते.
    मूळ (२)  'कृष्' ह्या धातुचा अर्थ आहे 'सत्ता' किवा 'अस्तित्व' व ’ण’ शब्दाचा अर्थ आहे आनंद. हा उल्लेख महाभारतातील उद्योग पर्वात (७०-५) आलेला आहे. म्हणून कृष्ण (कृष्+ण) म्हणजे सत्ता व आनंद अर्थात कृष्ण हे नांवच अत्यंत श्रेष्ठ परमानंदाचे द्योतक आहे. त्याच्या कृष्णवर्णामुळेही त्याला 'कृष्ण' असे संबोधिले जात असे. “माझा वर्ण काळा असल्यामुळे हे अर्जुना मला कृष्ण असे संबोधिले जाते.” असा उल्लेख महाभारताचे शांती- पर्वात आहे. (३४३)
    महाभारतात आपल्याला असे आढळते की श्रीकृष्ण स्वतःच अर्जुनास समजावून सांगतात की - जेव्हा पृथ्वीचे कवच अत्यंत कठीण होते तेंव्हा मी स्वतःच कृष्ण वर्णाचा लोहाचा नांगर होऊन ही भूमी नांगरतो. - कृषी देवता (३)
    वरील अर्थाखेरीज कृष्ण ह्या शब्दाचा जो आपल्या भक्तांना आकर्षून घेतो तो असाही अर्थ होतो. ( आकर्षणात् कृष्णः) सत्य हे प्रत्येकाला आपल्याकडे आकर्षून घेते. व त्याचा प्रतिकार ही होऊ शकत नाही. टीकाकारांनी या अर्थाचे विवरण फार आकर्षक शैलीने व समर्पक रितीने केले आहे. व त्यांचा निष्कर्ष असा की जे भक्त त्याचे ध्यान चिंतन करतात त्यांच्यां हृदयातील पाप  नाहीसे करतो, तो कृष्ण.
    सत्यामध्ये अशी एक आकर्षण शक्ति असते की जी मनुष्याचा अहंकार अगर अहंकेन्द्रित सर्व वासना आपल्याकडे ओढून घेते. या दृष्टीकोनातून पाहिले असतां कृष्ण ही एक सामान्य कृषीदेवता रहात नाही तर मनुष्यांच्या मनोभूमीमध्ये खोल रूजलेल्या दुष्ट पापवृत्ती खणून ती मनोभूमी अत्यंत निरामय आनंद रूजविण्यास तयार करणारी थोर देवता ठरते. व त्या आनंदाचेच सत्य हे एक स्वरूप आहे.


(५८) लोहिताक्षः :  - लाल डोळे असलेला. पुराण वाङ्ग्मयात अनेक ठिकाणी परमेश्वराचे वर्णन ' रक्तकमलाप्रमाणे डोळे असलेला ' असे केलेले आढळते. साधारणतः लाल डोळे क्रोध दर्शवितात. परमेश्वराने दुष्टतेचा नाश करण्याकरतां अनेक अवतार धारण केलेले आहेत. जे परमसत्याकडे दुर्लक्ष करून ऐहिकतेमध्येच रममाण होणारे व खलप्रवृत्तीचे मानव असतात त्यांचेवर परमेश्वराचा कोप होतो.


(५९) प्रतर्दन:  - ( तर्दहिंसांयाम्) :  - मूळ धातू तर्द ह्या शब्दाचा अर्थ विनाश. त्याचे पूर्वी लागलेला 'प्र' हा उपसर्ग आधिक्य दाखविणारा आहे. त्यामुळे 'प्रतर्द ' ह्या शब्दाचा अर्थ होतो पूर्णनाश. प्रलयाचे वेळी रूद्र स्वरूपात अवतीर्ण होऊन जो सर्वांचा विनाश घडवून आणतो तो प्रतर्दन ' श्रीविष्णु'.


(६०) प्रभूतः :  - ह्या पदाचा अर्थ होतो जन्मतःच परिपूर्ण अगर नित्य परिपूर्ण. तो परमात्मा स्वभावतःच परिपूर्ण असल्याने अंतिम सत्य स्वरूपांत किवा अवतार धारण केलेले असतानाही त्याचा जो अविष्कार होतो तोही परिपूर्ण असतो. विशेषतः परमेश्वराने आपला मुख्य व दिव्य अवतार असा जो ' श्रीकृष्णावतार ' त्यामध्ये आपली सर्वज्ञता व सर्व सामर्थ्य प्रकट केले आहे. त्यामुळे तो पूर्णअवतार मानला जातो.
डॉ. सौ. उषा गुणे.


(६१) त्रिककुब्धाम :  - जो तीन विभागांचा (ककुभ) आधार (धाम) आहे तो त्रिककुब्धाम. साधारणता टीकाकार ह्या शब्दाचे विवरण करताना ' उर्ध्व, मध्य व अध' ह्या तीन स्तरांचे सर्व विभाग असे करताना दिसतात. वेदांताच्या भूमिकेवरून विचार करतां हे तीन स्तर म्हणजेच जाणिवेचे जागृत, स्वप्न व सुषुप्ति हे तीन स्तर असे म्हणता येईल. व चवथी अवस्था तूर्यावस्था ही ह्या तीनही अवस्थांचा आधार आहे व परमेश्वर ह्या सर्व अवस्थांचा आधार आहे.


(६२) पवित्रम् - जो अंतःकरणाला शुद्धता अगर पावित्र्य देतो तो. जे भक्त त्याचे ध्यान करतात त्याचे अंतःकरणास शुद्धि देणारा परमेश्वर पवित्र या नावांने ओळखला जातो.
    किवा पवि म्हणजे वज्र. जो आपल्या भक्तांचे इंद्राच्या वज्रापासून रक्षण करतो ( त्रायते) तो पवित्र. वज्र हे आयुध दधिची नामक ऋषींच्या अस्थिंपासून केले असे त्याचे वर्णन आहे. इंद्र हा इंद्रियांचा राजा (इंद्रियाणा राजा) आहे. वेदांता प्रमाणे इंद्र म्हणजेच मन होय. मनातील उलट सुलट विचार संभ्रम, बौद्धिक तडजोड ह्या सर्वाचा परिणाम म्हणजे आपल्याच मनातील संकल्प विकल्पाने घडवून आणलेला आपलाच मनोबलाचा नाश, हे एक इंद्राचे (मनाचे) आयुध आहे व ते अल्पकाळातच साधकाच्या तपश्चर्येचा नाश घडवून आणते.
    पूर्ण भक्ति, निश्चयपुर्वक केलेले ध्यान व श्रीविष्णुवरील दृढश्रद्धा यांच्या सहाय्याने ह्या मनवज्रापासून साधकाचे रक्षण होते म्हणून परमेश्वराचे 'पवित्र' हे नाव सार्थ ठरते.

(६३) परं मंगलम् - मंगल हे दुष्टप्रवृत्तींपासून होणारे दुःख तर नाहीसे करतेच इतकेच नव्हे तर सद्गुणांपासून होणारा आनंदही मिळवून देते. परं मंगलं म्हणजेच श्रेष्ठतम मंगल आहे व ते फक्त परमेश्वरच असणे शक्य आहे. ज्याचे (४) स्मरणामुळे सर्व अशुभांचा नाश होतो. व सर्व शुभ संकल्पांनी हृदय भरून जाते तो परमेश्वर स्वतःच परममंगल आहे. उपनिषत् सांगते जे ब्रह्म केवळ स्मरण केले असतां मनुष्याच्या हृदयातील सर्व अशुभांचा नाश करते ते आम्हास परममंगल कारक होवो.
-----------------------------------
१    यत् चक्षुषानपश्यति येन चक्षुंषि पश्यति  ।

      तदेव ब्रह्मत्वं विद्धि न इदं यदिदमुपासते  ।।

२    कृषीर्भूवाचक शब्दो नश्च निर्वृत्ति वाचकः  ।

      तयौरैक्यं परंब्रह्म कृष्ण इत्यभिधियते ।।

३    कर्षामि पृथिवीं भूत्वा कर्षणाय अयसो हलः ।

४    अशुभानि निराचष्ठे तनोति शुभ संततिम् । स्मृतिमात्रेण यत् पुंसां ब्रह्म तन्मंगलं विदुः ।।




सौ. उषा गुणे.