28 February, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक १६

भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः 
अनघो विजयो जेता विश्वयोनिः पुनर्वसुः  ।।
(१४१) भ्राजिष्णुः :  - जे स्वयंप्रकाशी ज्ञानतत्व सर्व जगत् प्रकाशित करते ते. ते ज्ञानतत्व हा प्रकाश दुसर्‍या कशापासूनही घेत नाही. 'हा प्रकाशाचाही प्रकाश असून तो अंधःकारासही प्रकाशित करतो. (गीता १३-१८), [१]उपनिषदांनीही ठामपणे उद्धृत केले आहे की ' तेथे सूर्याचा प्रकाश नाही, तारकाचंद्राचा प्रकाश नाही तसेच विद्युलतेलाही नाही तर ह्या अग्निला कोठून असणार ? 'त्याचे प्रकाशामुळे या सर्वांना प्रकाश मिळतो व ते प्रकाशित झाले असतां या सर्वांचे ज्ञान होते.
(१४२) भोजनम् :  - या संज्ञेचा प्रथम अर्थ होतो अन्न - खाद्यपदार्थ. परंतु तत्वज्ञानांत या शब्दाला व्यापक अर्थ आहे. 'भोजन ' या शब्दांत सर्व इंद्रियांना प्रतीत होणारे त्यांचे उपभोग्य अनुभव जगत् समाविष्ट होते. इंद्रियांना प्रतीत होणारे सर्व विषय, अंतर्गत मानसिक क्रिया - प्रतिक्रिया, जड जगतातील विचित्रपूर्ण सर्व विषय या सर्वांच्या समुच्चयानें जी संकल्पना तयार होते तिला 'माया' असे संबोधण्यात येते. मायेच्या कार्यावरून व तिच्या स्वरूपा-वरून टीकाकारांनी तिलाच 'भोजन' अशी संज्ञा देउन टाकली. तैत्तिरीय उपनिषद म्हणते, ' ते खरोखर रसमयतत्व आहे.' (रसो वै सः । २-७)
(१४३) भोक्ता - उपभोग घेणारा :  - हे उपभोग्य अनुभव जगतच केवळ विष्णुस्वरूप आहे असे नाही तर उपभोग घेणारी इंद्रिये व विषयातून मिळणारे सुखदुःख हेही सर्व लक्ष्मीपती विष्णुच्याच अस्तित्वाने प्रतीतीस येते. शुद्धज्ञान स्वरूप चैतन्य स्थूल, सूक्ष्म व कारण देहामधून अभिव्यक्त होते, व जागृत स्वप्नद्रष्टा किवा सुषुप्त अशा अवस्था धारण करते व या जीवनातील सर्व बर्‍यावाईट घटनांचा जीव रूपाने अनुभव घेते. चैतन्य अगर [२] पुरूष प्रकृतीशी तादात्म्य पावून तिच्या गुणांबरोबर अगर अनेक कार्यां बरोबर एकरूप होतो व त्यातून उत्पन्न होणार्‍या अनेक विकारांचा व अवस्थांचा अनुभव घेतो. शुद्ध स्वरूपांत आत्मा हा कार्यरहित आहे परंतु मायेच्या सानिध्यात तोच कार्यकारी असल्याचे भासते व त्यामुळेच कर्मातून उत्पन्न होणारे 'सुखदुःखरूपी' फल भोगणारा भोक्ता तो होतो.
(१४४) सहिष्णु :  - बाह्य घटना व त्यांचे परिणाम जो अत्यंत शांतपणे व अलिप्ततेने सहन करू शकतो त्यास 'सहिष्णु' म्हटले जाते. पृथ्वीवर पडणार्‍या सूर्याच्या प्रतिबिंबामध्ये कितीही फेरबदल झाले तरी अंतराळातील सूर्यावर त्याचा कांहीही परीणाम होत नाही. त्या प्रतिबिंबाच्या संदर्भाने सूर्य 'सहिष्णू' आहे व आपल्या असंख्य प्रतिबिंबाचा केवळ साक्षी आहे.
     सहिष्णू या संज्ञेचे संस्कृतमध्ये इतर दोन अर्थ आहेत. (१) क्षमा करणारा (२) जेता. आपल्यामधील अनेक दुष्कृतींना श्रीविष्णु क्षमा करतो व आपल्या अनेक प्रतिकूल दुष्प्रवृत्ती जिंकतो.
(१४५) जगदादिजः :  - जो विश्वाच्या (जगत्) उत्पत्तीच्या पूर्वी (आदि) जन्मला (जः) तो जगदादिजः श्रीविष्णु. [३] प्रलयाचे वेळी जेव्हा सर्व स्थूल व सूक्ष्म शरीरे महाकारण देहामध्ये लीन होऊन रहातात. तेंव्हा ते जगत् ईश्वरामध्ये लीन झाले असे म्हणतात. पुन्हा उत्पत्तीचे वेळी स्थूल जगत् निर्माण होते. त्यापूर्वी त्याची सूक्ष्म विचारात्मक (स्पंदनात्मक) अवस्था असते. त्या विचारांनी मन बुद्धीची घडण होते. ज्यावेळी परमात्मा ह्या समष्टी मनातून व्यक्त [४] होतो त्यावेळी त्याला ' हिरण्यगर्भ ' असे संबोधिले जाते. तेच सर्व पदार्थांचे उत्पत्ति स्थान आहे. या हिरण्यगर्भावस्थेतून सर्व स्थूल सृष्टि व्यक्त दशेला येते व परमात्मा विराट आत्मा ह्या स्वरूपांत तेथे कार्य करतो. महाविष्णु जो विश्वातील सर्व स्थूल देह जन्माला येण्याचेही आधी जन्मला त्याचेपासूनच सर्व जगत् उत्पन्न झाले म्हणून 'हिरण्यगर्भ' या नांवाने उद्धृत केला जातो, व तोच जगताचा कर्ता आहे.
(१४६) अनघः :  - अघ म्हणजे पाप किंवा मल. अनध म्हणजे पाप नाही असा. किवा ज्याचे ठिकाणी अपूर्णतेचा कलंक नाही असा. तसेच सकाम कर्मातून निर्माण होणार्‍या सुखकारक अगर दुःखकारक वासनांमध्ये तो कधीही लिप्त होत नाही म्हणून तो अनघ आहे. आत्म्याचा ज्ञानप्रकाश मनाला प्रकाशित करतो परंतु मनातील सद्‌गुणांची शांती अगर पाप वासनेची खळबळ आत्मप्रकाशावर प्रभाव पाडूं शकत नाही. कारण प्रकाशक हा नेहमीच प्रकाश्याहून भिन्न असतो. म्हणूनच छांदोग्य उपनिषद् म्हणते, ' तो पापरहित आहे.' (८-१५)
(१४७) विजयः :  - जय मिळविणारा. जो आत्म्याचे सत्यज्ञान जाणतो व त्यानंतर प्रकृतीच्या बंधनातून मुक्त राहू शकतो, शरीराच्या सुख दुःखात्मक यातनांवर विजय मिळवूं शकतो. तसेच मनाच्या भावना, कल्पनांचे पलिकडे जाऊ शकतो, तो विजय स्वरूप श्रीविष्णु होय. अर्थात् प्रकृतीवरील विजयाचे स्थान म्हणजे आत्म्याचे स्थान. आत्म्याची शांती व सुसंवादित्व जगातील विविध द्वंद्वाच्या गलबल्याने कधीच नष्ट होत नाही.
     अर्जुनाचे एक नांव विजय होते व श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात 'पांडवांमध्ये मी अर्जुन आहे. (१०-३०)
(१४८) जेता :  - नेहमी जिंकणारा. सर्व व्यवहारामध्ये नेहमी त्याचाच जय होत असतो. ज्याला कधीही अपयश माहिती नाही तो जेता श्रीविष्णु. उपनिषद् म्हणते सत्याचाच नेहमी जय होतो. असत्याचा कधीही नाही. (सत्यमेव जयते नानृतम्).
(१४९) विश्वयोनिः :  - ह्या संज्ञेचे दोन तर्‍हेने अर्थ केले जातात. (१) जो सर्व विश्वाचे उत्पत्ती स्थान (कारण) आहे तो किवा (२) सर्व विश्व हे ज्याला कारण स्वरूप होते तो. ज्यांना आता पर्यंतच्या विवेचनावरून पहिला अर्थ अत्यंत सुलभ व स्पष्ट झाला आहे, त्यांना दुसरा अर्थ मात्र खचितच गोंधळात टाकाणारा वाटेल. परंतु पुराणांच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास दुसरा अर्थही तर्कसंगत आहे. परमात्म्यानें या विश्वामध्ये जगातील विशिष्ट परिस्थितीकरताच वेळोवेळी अवतार घेऊन स्वतःला प्रकट केले आहे म्हणजेच त्याच्या प्रकटीकरणाचे विश्व हे कारणच झाले आहे.
(१५०) पुनर्वसु:  - (वसति इति वसुः) :  - जो पुनःपुन्हा शरीरातील वेगवेगळया उपकरणांमध्ये वसती करतो, स्थित होतो तो पुनर्वसु.

 डॉ. सौ. उषा गुणे.

[१]   तत्र सूर्यो भाति न चन्द्रतारकं नेमाः विद्युतो भान्ति कुतोऽयमग्निः 
    तमेव भान्तमनुभाति सर्व तस्य भासा सर्वभिदं विभाति  ।।
[२]   पुरुषः प्रकृतिस्थो हि भुङक्ते प्रकृतिजान् गुणान् 
[३]    समष्टि कारण शरीराभिमानी आत्मा ईश्वरः 
[४]    समष्टि सूक्ष्मशरीराभिमानी आत्मा हिरण्यगर्भः 





24 February, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक १५

लोकाध्यक्षः सुराध्यक्षो धर्माध्यक्षः कृताकृतः 
चतुरात्मा  चतुव्यूहश्चतुर्द्रंष्ष्ट्रश्चतुर्भुजः  ।।
(१३३) लोकाध्यक्षः :  - जो सर्व लोकांवर (अनुभवक्षेत्रांवर) अध्यक्षता करतो तो. सभेचे संचालन करणे ही अध्यक्षाची जबाबदारी असते. सभेतील चर्चेचे तो शिस्तबद्ध रीतीने नियमन करतो, मार्गदर्शन करतो व शेवटी सभेचे विसर्जन करणे हेही त्याचेच काम असते. सर्व चर्चामध्ये, वक्त्यांच्या भाषणामध्ये, अगर कृतीमध्ये जोपर्यंत ते वक्ते नियमानुसार विहित कार्यक्रम पार पाडीत असतात तोपर्यंत तो कोणत्याही तर्‍हेने अडथळा आणीत नाही. त्याचप्रमाणे परमेश्वर जीवांच्या सर्व कर्मामध्ये त्यांच्या प्रत्यक्ष कृतीमध्ये भाग न घेता व त्यांच्या स्वातंत्र्याला बाध न आणतां अध्यक्ष स्वरूपाने उपस्थित असतो. तो पुरुषोत्तम या शरीरामध्ये साक्षीरूपानें असतो,[1] तोच अनुमती देणारा, आधार देणारा, उपभोग घेणारा, स्वामी व परमात्मस्वरूप असतो. पुराणांच्यामते वामनावतारामध्ये भगवंतांना तीनही लोकांचे अध्यक्षस्थानी बसविले गेले म्हणून ही संज्ञा त्यांना दिली, असे पौराणिकांनी म्हटले आहे.
(१३४) सुराध्यक्षः :  - स्वर्गाचा अध्यक्ष. दैत्य अगर असूरांनी हल्ला केला असतां सर्व देव रक्षणार्थ ज्याचेकडे धाव घेतात तो सुराध्यक्ष. आपल्या हृदयातील स्वर्गभुमीतील देव म्हणजे सद्वासना. व दैत्य म्हणजे दुष्टप्रवृत्ती, पापवासना. या असूरांकडून जेव्हां देवांच्यावर आक्रमण केले जाते तेंव्हा हृदयातील देव (सद्वासना) ज्याचेकडेआश्रय सहाय्य मागतात व शरण जातात तो हृदय सिंहासनस्थ (अध्यक्ष) श्रीविष्णु होय.
(१३५) धर्माध्यक्षः :  - जीवांची सर्व कर्मे परमात्म्याच्या अध्यक्षते खालीच होत असतात. त्याकर्मातील सत्प्रवृत्ती अगर दुःप्रवृत्ती आत्मप्रकाशानेच प्रकाशांत आणली जाते. जे परमतत्व सतत शरीर मन बुद्धी यांची सर्व कर्मे प्रकाशित करते व धर्मही प्रकाशित करते ते तत्व म्हणजेच धर्माध्यक्ष भगवान् श्रीविष्णु होय.
(१३६) कृताकृतः :  - कृत - जे झालेले आहे. प्रकट झालेले अगर कृतीत उतरले आहे ते. अकृत म्हणजे जे झालेले नाही. प्रकट झालेले नाही अगर कृती झालेली नाही असे. कृत या शब्दाने कर्त्याच्या सर्व क्रियाकर्माचा परिणाम जें कार्य त्याचा निर्देश केला जातो. अकृत या संज्ञेने जे अद्याप व्यक्त झालेले नाही, कार्यरूपाने प्रकट झालेले नाही असे 'कारण' सुचविले आहे. 'स्थाणु-पुरूष' ह्या उदाहणातील स्थाणू हा आत्मस्वरूप आहे. त्याचेच ठिकाणी 'कार्य' व कारण स्वरूपातील व्यक्त अव्यक्तांची भ्रांतरुपातील क्रीडा प्रतीतीस येते. या संज्ञेने कृत हे व्यक्त (कार्य) व अकृत हे अव्यक्त (कारण) या दोन्हीचे निर्देशन केले आहे.
(१३७) चतुरात्मा :  - परमात्मा हा चतुर्विध असून आत्मा हा परमात्म्याची विभूतीमात्र आहे. ज्या तत्वांच्या आधारानेच केवळ विश्वाच्या उत्पत्ति, स्थिती व लयाचा खेळ अनंत कालपर्यंत चालू रहातो ती तत्वे परमात्म्याच्या विभूती आहेत. विष्णुपुराणांत परमात्म्याचे उत्पत्तिकर्ता, स्थितीकर्ता व संहारकर्ता अशा चार स्वतंत्र विभूती सांगितल्या आहेत. शुद्ध वेदांताच्या अभ्यासकाच्या दृष्टीने आत्मतत्व हे निर्द्वंद्व असून त्याचे खेरीज इतर कशाचेच अस्तित्व नाही. व्यष्टि व समष्टि मधील स्थूल, सुक्ष्म व कारण देह हे सर्व जडतत्वांचा खेळ असून सर्व आत्मतत्वाच्या विभूती आहेत. ते परमतत्व त्या सर्वांच्या पलिकडे आहे. जागृत, स्वप्न, सुषुप्ति व चतुर्थ अवस्था तुर्या ह्याही सर्व विभूती होत व या विभूती धारण करणारे शुद्ध चैतन्य तूर्येच्याही  पलिकडे असल्याने त्याला 'तूर्यातीत ' असे म्हटले आहे.
(१३८) चतुर्व्यूहः :  - जो चार सामर्थ्यशाली शक्तिंमधून व्यक्त होतो तो (व्यूह) चार स्तरांवर (व्यूह) प्रकट होणारे ते परमसत्य सर्व अनुभव जगत् उत्पन्न करते व त्यालाच व्यापून रहाते म्हणून तो श्रीविष्णु होय. वैष्णवांचे वाङ्‌मया- नुसार हे विश्व उत्पन्न करण्याकरतां श्रीमहाविष्णुच चार शक्तिरूपांनी व्यक्त झाला (व्यूह) व त्यांची नांवे आहेत (१) वासुदेव (२) संकर्षण (३) प्रद्युम्न (४) अनिरूद्ध . ह्या विश्वाचे धारण करण्याकरतां ज्याचेजवळ ह्या चार महान शक्ति आहेत तो परमात्मा श्रीविष्णु.
(१३९) चतुर्दंष्ट्रः :  - संस्कृत भाषेप्रमाणे मांसभक्षक प्राण्यांच्या जबड्यातील खालचे व वरचे पूर्ण वाढलेले सुळे दांत 'दंष्ट्रा' या नांवाने ओळखले जातात. 'चतुर्दंष्ट्र' ही संज्ञा भक्त प्रल्हादाचे रक्षण करणार्‍या नरसिंहाच्या मुखातील 'दंष्ट्राची आठवण करून देते. तसेच पुराणांमध्ये स्वर्गातील इंद्राचा भव्य हत्ती ' ऐरावत ' या नावांने ओळखला जातो व त्याला चार सुळे आहेत असे वर्णन आहे. चार सुळे असलेला ऐरावत ही ज्याची विभूती आहे तो ' महाविष्णु' होय. उपनिषदांच्या अभ्यासकाला लक्षांत येईलच की चार दांत म्हणजे दुसरे कांही नसून ज्याचे मांडूक्य उपनिषदांत 'चतुष्पाद' असे वर्णन आले आहे ते 'पाद' आहेत. जागृत- स्वप्न - सुषुप्तिमधील जाणीवेची क्रीडा म्हणजेच त्या आत्मतत्वाच्या सामर्थ्याचे व दिव्यतेचे प्रकटीकरण होय. ह्या तीनही अवस्थांचा विचार करतां असे दिसते की या सर्वापलीकडील चतुर्थ अवस्था ही सर्वावस्थांची आधारभूत आहे. ज्या द्वंद्वातीत अवस्थेच्या आधारावरच ह्या सर्व द्वंद्वात्मक, सुखदुःखात्मक व भयकारक स्थितींचा (जागृत, स्वप्न, इ स्थितींचा) अनुभव घेणे शक्य आहे ती द्वंद्वातीत आत्मस्वरूप अवस्था म्हणजेच 'महाविष्णु' होय.
(१४०) चतुर्भुजः :  - ज्याला चार हात आहेत असा. श्रीविष्णूला चार हात आहेत हे प्रसिद्धच आहे. या हातामध्ये त्यानें शंख, चक्र गदा, व पद्म धारण केले आहे. मानवांमध्ये धर्माची स्थापना व धारणा व्हावी म्हणून परमेश्वराने ही चार आयुधे धारण केली आहेत असे पुराण सांगते. शंख आपल्या नादांने मनुष्यांना धर्मपथावरून चालण्याचे आवाहन करतो व हाच पथ त्यांना पूर्णता व शांतीस्वरूप असे विष्णुपद प्राप्त करून देईल असे सांगतो.
     आपल्यापैकी अनेकजण इंद्रिय सुखाने भुललेले असल्यामुळे आपल्या अंतंरंगामधील पांचजन्य शंखाचा हा सूक्ष्म आवाज ऐकण्याचेच नाकारतात. तेंव्हा परमेश्वर आपली गदा चालवितो. त्यामुळे आपल्याला कांही सामान्य संकटांना व अडचणीनां सामोरे जावे लागते. त्यातील कांही संकटे सामाजिक, राजकीकिवा वांशिक स्वरूपाची असतात. मनुष्यांनी तरीही त्या शंखनादाचा अव्हेर केला तर परमेश्वर आपले सुदर्शन चक्र टाकतो व ते कालस्वरूप चक्र सर्वांचा संहार करते. ते आवाहन किवा शिक्षा ज्या एका अंतिम ध्येयाकडे जाण्यास उद्युक्त करीत असतात ते ध्येय परमेश्वराचे हातातील 'कमलाने' निर्देशित केले आहे.
     मनुष्याचा आत्मा हा विष्णुस्वरूप असून तो ज्या सूक्ष्म देहातून प्रतीत होत असतो त्याला चार अंगे (भुजा) आहेत. त्यांचे काम आहे पार्थिव जड देहाचे त्याच्यासर्व क्रियांमध्ये नियमन करणे व संरक्षण करणे. हा सूक्ष्म देह अंतःकरण चतुष्ट्य रूपाने मन, बुद्धि, चित्त व अहंकार या चार शक्ति धारण करतो. त्यापैकी चित्त हे कमल आहे, बुद्धि ही शंख आहे, अहंकार ही गदा आहे व मन हे चक्र आहे. पीतवस्रधारी नीलवर्ण असलेला श्रीविष्णु आत्मस्वरूप असून ही चारतर्‍हेची उपकरणे त्यांनी सर्व बरे वाईट द्वंद्वात्मक अनुभव जगत चालविण्याकरतां धारण केली आहेत. अशाप्रकारे आत्माच ह्या चार साधनांनी कृतीशील असतो. म्हणून त्या विष्णूला नांव पडले आहे चतुर्भुंजः
 डॉ. सौ. उषा गुणे



[1]   उपद्रष्टानुमन्ता च भर्ता भोक्तामहेश्वरः । परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः – गीता १३.२२