28 November, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ९३

श्लोक ९३
सत्ववान्सात्विकः सत्यः सत्यधर्मपरायणः ।
अभिप्रायः प्रियार्होऽर्हः प्रियकृत प्रीतिवर्धनः  ।।
(८६) सत्ववान् :  - जो अत्यंत पराक्रमी व धैर्यशील आहे असा. श्री नारायण साहसी धैर्यशील व पराक्रमी आहेच व हे सर्व गुण त्याच्या सर्व अवतारांत प्रकट झाले आहेत.
(८६) सात्विकः :  - जो सात्विक गुणांनी परिपूर्ण आहे असा. शांती स्थिरता, निस्तब्धता इत्यादि गुण सत्वगुण दर्शवितात. विधायक कार्य व तत्संबधी विचार करण्यापूर्वीची मनाची सर्जनशील स्तब्ध अवस्था म्हणजे 'सत्व' होय. सृजनांचे स्फुरणही परिपूर्ण आहे. तरीही जे च्यानावस्थेत स्थिर असते असे वैश्विक मन म्हणजेच श्रीनारायण.
(८६) सत्यः :  - सत्य, जे वर्तमान भूत भविष्य या तीनही कालामध्ये सम रहाते ते सत्य. आत्म्यामध्ये कसलेही विकार संभवत नाहीत. तो तीनही कालांत स्वस्वरूपांत स्थित असतो.
(८७०) सत्यधर्मपरायणः :  - जो सत्याचे व धर्माचे स्थिर आश्रयस्थान आहे. सर्व विचार, कृती व भावना मधील सत्यता, एकरूपता म्हणजेच सत्य व धर्म म्हणजेच कर्तव्य व अकर्तव्यामधील विवेक व त्याप्रमाणे आचरण.
(८७) अभिप्रायः :  - अनंताची वाटचाल करणारे सर्व साधक ज्याचेकडे सन्मुख होतात तो श्रीनारायण. दुसरा अर्थ होतो जो आपल्यामध्ये संपूर्ण विश्वाचा लय करतो तो.
(८७) प्रियार्हः :  - ज्यास आपले सर्व प्रेम अर्पण करावे अशा योग्यतेचा श्रीनारायण. प्रिय या पदाचा व्यापक अर्थ जी वस्तू आपणास अत्यंत आवडते ती. म्हणून संपूर्ण पदाचा अर्थ होईल,' भक्तांकडून त्याच्या अत्यंत प्रियवस्तूंनी पूजा करण्यास योग्य असा प्रियार्ह. आपल्या भक्तिचे प्रतिक म्हणून आपल्याला आवडणारी वस्तू आपण भगवंताला आवर्जून अर्पण करीत असतो.
(८७) अर्हः :  - सर्व भक्तांकडून पूजनीय असा श्रीनारायण. भगवंत आपले आत्मस्वरूपच असल्यानें आपल्या भक्तीचा गुप्त खजिनाच आहे. त्यामुळे आपला शरणभाव, प्रेम, भक्ती त्याचेकडून आकर्षित केली जाते.
(८७) प्रियकृत् :  - जो आपल्या भक्तांचे प्रिय करण्यांत तत्पर आहे असा. तो आपल्या भक्तांचे कल्याण (प्रिय) करण्यास अत्यंत उत्सुक असतो. या संज्ञेचा विरूद्ध अर्थही हो शकतो तो असा की दुष्प्रवृत्त व अश्रद्ध माणसांचे सुख समाधान हिरावून घेतो तो श्रीनारायण.
(८७) प्रितिवर्धनः : - जेव्हा एकादी व्यक्ती अगदी खरेपणानें व खूप खोल प्रेम करते तेंव्हा तिच्या हृदयांत जी आनंदाची धुंद अवस्था येते तिला 'प्रीति' असे म्हणतात. अशी प्रीति जो भक्तांच्या हृदयांत वाढवितो तो नारायणच होय. त्याचे संबंधी जितके जास्त चिंतन, मनन करावे तितकी त्याची महानता जास्त समजत जाते व तितके त्याचे प्रेम 'प्रीति' वाढत जाते.
डॉ. सौ. उषा गुणे.



   त्रिकालाबाधितं वस्तु सत्यमिति 
   कर्तव्याकर्तव्य विधिरेव धर्मः  ।।

25 November, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ९२

श्लोक ९२
धनुर्धरो धनुर्वेदो दण्डो दमयिता दमः 
अपराजितः सर्वसहो नियन्तानियमोयमः  ।।
(८५) धनुर्धरः :  - धनुष्य धारण करणारा. रामावतारामध्ये त्याने कुणीही धारण केले नाही असे भव्य धनुष्य धारण केले. उपनिषदांमध्ये एक प्रसिद्ध धनुष्यरूपक आहे. त्यामध्ये जीवात्मा हा बाण असून तो ब्रह्मरूपी लक्षापर्यंत जावून त्याच्याशी भिडतो असे वर्णन आहे. मुंडकोपनिषदामध्ये ऋषी म्हणतात 'प्रणवो धनुः'[1]
(८५) धनुर्वेदः :  - धनुर्वेदाचा उद्‌गाता. आत्मस्वरूपाचे ज्ञान होण्याकरतां ज्याने 'प्रणवाचे ध्यान' रूपी अमोघ विद्या निर्माण केली तो धनुर्विद्यानिर्माण कर्ता श्रीनारायणच होय.
(८५) दण्डः :  - जो दुष्टांना शिक्षा करतो असा. भगवत् गीतेमध्ये भगवान म्हणतात सर्व विश्वास नियमित करणारा (शासक) दंड मीच आहे.[2] तसेच हा दंड 'राजदंड' असल्यानें त्याचा सर्वाधिकार सुचवितो. या अनंत विश्वामध्ये श्रीनारायण हा राजांचाही चक्रवर्ती राजा असल्यानें सर्वाधिकाराचा राजदंड तोच धारण करतो.
(८६०) दमयिता :  - दमन - शासन करणारा. तो दुष्टांना शासन करतो. पाप्यांचा नाश करतो. व विश्वामध्ये चैतन्य निर्माण करतो, जोपासतो. त्यामुळे अध्यात्म्याचे सौंदर्य असलेली फुले फुलतात, विश्वाची जीवनरूपी बाग फुलते.
(८६) दमः :  - लौकीकातील विषयांचे दमन केल्याने शेवटी प्राप्त होणारा आत्मस्वरूपाचा, मोक्षाचा अनुभव श्रीनारायणच आहे.
(८६) अपराजितः :  - ज्यास कोणीही पराभूत करूं शकत नाही असा. नित्य विजयी. प्रत्येकाचे हृदयांत स्थित असलेले आत्मतत्वच अंतर्यामातून प्रकट होत असते. व तेच शेवटी विजयी होऊन आध्यात्मिक मूल्ये प्रस्थापित करत असते. इतर सर्व पराभूत होतात व आत्मतत्त्वच विजयी ठरते.
(८६) सर्वसहः :  - जो समर्थपणे संपूर्ण विश्वाचा भार सहन करतो तो. सर्वसह श्री नारायण होय. तो दुष्प्रवृत्तीरूपी शत्रूंना व वैषेयिक वासनांना समर्थपणे पराभूत करतो. 'माती' हे जसे घटाचे उपादान कारण आहे त्याप्रमाणे सर्व विश्वाचे उपादान कारण होऊन विश्वाचा भार सहन करतो.
(८६) अनियन्ता :  - ज्याचेवर कुणीही नियन्ता (शासक) असू शकत नाही असा. त्यानेच विश्वाचे नियमन करण्याकरतां चंद्र, सूर्य, वायू, जल इ. शासक नेमलेले आहेत.
(८६) अनियमः :  - जो इतर कुणाच्या नियमनाखाली असत नाही असा. कारण तोच एकमेव सर्व नियमांचा कर्ता आहे व स्वतःच नियमही आहे. त्याच्याच समर्थ बाहूंमध्ये निसर्गाचे अपरिवर्तनिय व अबाधित नियम निर्माण करण्याची व प्रवर्तित करण्याची शक्ती आहे.
(८६) अयमः :  - ज्यास मृत्यु माहितच नाही असा. तो अमर असल्यानें त्याला मृत्यू कसा येईल ? मृत्यू तत्व त्याचेवर प्रभाव करू शकत नाही. परिवर्तन अगर मृत्यूचे कार्य कालामध्येच चालते. शुद्ध चैतन्य हेच कालाची जाणीव प्रकाशित करते. त्यामुळे ते कालातीतच आहे - अमृत्यू आहे.
डॉ. सौ. उषा गुणे.



[1]   ॐकार हा मंत्र हेच एक धनुष्य आहे. आत्मा हा बाण आहे. ’ब्रह्मन्’ हे लक्ष्य आहे. ज्याने स्वतःस ध्यानाने एकाग्र केले आहे त्यानें हा बाण सोडावयाचा आहे. मनानें स्वतः शरवत् होऊन हा बाण सोडला असता तो ब्रह्माशी एकरूपच होऊन जातो. धनुर्गृहित्वौपनिषदं महास्रम् - उपनिषदांनी दिलेले हे महान् अस्र, धनुष्य उचलून व त्यामध्ये सतत ध्यानाने तीक्ष्ण केलेला बुद्धीरूपी बाण लावून व मनाने ब्रह्म हेच लक्ष्य निश्चित करून त्यावर सोडावे.
[2]   दण्डो दमयितामस्मि ।

22 November, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ९१

श्लोक ९१
भारभृत्कथितो योगी योगीशः सर्वकामदः 
आश्रमः श्रमणः क्षामः सुपर्णो वायुवाहनः  ।।
(८४) भारभृत् :  - सर्व विश्वाचा भार वाहून नेणारा. हे ओझे वाहून नेणे एकाद्या माणसानें आपल्याहून दुसरी एकादी वस्तू वाहून नेण्यासारखे नसते. कारण श्री नारयण स्वतःच विश्व बनलेला आहे. म्हणजेच परमात्मा सर्व विश्वाचे उपादान कारण आहे.
(८४) कथितः :  - ज्याचे वर्णन सर्व वेदपुराणे व इतर धर्मग्रंथ करतात असा. नारायणतत्व हेच जगातील सर्व आध्यात्मिक ग्रंथांचे प्रतिपादन असते.[1]
(८४) योगी :  - सर्वश्रेष्ठ योगी अथवा जो योगाने जाणला जातो असा. सर्व विचार प्रवाह थांबविण्याची प्रक्रिया म्हणजे योग, अशी योगाची शास्त्रामध्ये व्याख्या [2] केली आहे. ज्याला कुठलीही वैचारिक क्षुब्धता नाही व ज्याने आपले मन (माया) पूर्णपणे ताब्यात ठेवले आहे व जो नित्य आपल्या दिव्य स्व स्वरूपांत रहातो तो सर्वश्रेष्ठ योगी श्रीहरी.
(८५०) योगीशः :  - सर्व योग्यांचा स्वामी. योगेश्वर. जो आत्मा जाणतो तो स्वतःच आत्मस्वरूप होतो असा उपनिषदांचा [3] उद्‌घोष आहे. त्यामुळे आत्मा हाच पूर्ण योगी आहे व श्री नारायण परमात्मस्वरूप असल्यानें 'योगेश्वर' आहे. आपल्या कर्मामधील कर्तृत्वभाव व अनुभव क्षेत्रातील भोक्तृत्वभाव हाच आपला 'अहं' म्हणचे जीवभाव. या जीव भावनेतून वर येण्याकरतां आत्म्याचे विश्वचैतन्यस्वरूप जाणीवेत येणे आवश्यक आहे. सत्यस्वरूप श्री नारायण हाच स्वतः या विश्वापासून पूर्णपणे अलिप्त राहूं शकतो. तो या संसारामध्ये सदैव असूनही त्याच्या कार्यकलापात बुडलेला असूनही त्याहून वेगळा असतो म्हणून त्याचे 'योगीश' हे वर्णन महिमा, अत्यंत सार्थ असेच आहे.
(८५) सर्वकामदः :  - जो आपल्या खर्‍या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो तो. खर्‍या भक्तांना दुसरी कसलीच इच्छा नसते तर आपण त्याचेपर्यंत पोहोचावे, त्याला भेटावे व त्याच्यातच विलीन होऊन जावे इतकीच त्याची इच्छा असते व ती तो पूर्ण करतो. ही संज्ञा असेही सुचविते की जे अश्रद्ध अभक्त आहेत त्याच्या अपवित्र दुष्ट वैषयिक वासना तो नष्ट करतो.
(८५) आश्रमः :  - जे जन संसाराच्या झंझावातानें अंतर्बाह्य त्रस्त झालेले आहेत भरकटले आहेत अशांनाही स्वतःच हक्काचे स्वर्गतुल्य असे आश्रयस्थान 'आश्रम' आहे श्रीनारायण. व्यक्ती स्वतःच्या शरीर मन बुद्धि मधून कार्य करते व स्वतःस कर्ता मानते हाच सर्वसंसार तापाचा उगम आहे. मनुष्यानें आपल्या खर्‍या आत्मस्वरूपांत स्थिर रहाणे हीच सर्व पापतापाच्या दुःखातीत अवस्था होय. ही निस्तरंग, परमशांत दिव्यआनंदाची अवस्था म्हणजेच श्रीनारायण.
(८५) श्रमणः :  - लौकीकासाठी  बुबुक्षित झालेल्या इंद्रियजन्य सुखांच्या मागे लागलेल्या लोकांना जो संतप्त करतो, विशेष श्रम करावयास लावतो तो श्रमण. बाह्य इंद्रियविषयांमधील प्राकृतिक बदलांमुळे, व आपल्या इंद्रियांच्या अस्थिर स्वभावामुळे आपले अतृप्तीचे जीवन आपल्याला केवळ निष्फळ श्रम व घोर निराशाच प्रदान करते. हा प्रकृतीचाच कायदा आहे. व तो निर्माण करणारा आहे श्री नारायण. परमार्थात विधी व विधीकर्ता एकरूप असल्याने तो श्रमण आहे.
(८५) क्षामः :  - अंतिम प्रलयाचे वेळी सर्व संहार करतो तो. तो आपल्या अंतःकरणातील क्षुब्धता छाटून टाकतो व वैषयिक वासनातून निर्माण झालेले जग नष्ट करून टाकतो.
(८५) सुपर्णः : - सुवर्णमय पर्ण. भगवतगीतेत विश्वाला अश्वत्थ वृक्षाची उपमा दिली [4] असून वेद ही त्याची पाने आहेत असे वर्णन आहे. वेदांचा प्रतिपाद्य विषय एकमेव आत्मस्वरूप ब्रह्मच आहे. त्यामूळे ही संज्ञा मनोहारी असून अनेक गूढ अर्थवाही अशी आहे.
(८५) वायुवाहनः :  - वायुचे संचलन करणारा. त्याच्या भीतीनें अग्नी ज्वलन करतो, चंद्रसूर्य आपले कार्य करतात, पृथ्वी फिरते व वायु धावतो असे उपनिषदांचे सांगणे आहे.
डॉ. सौ. उषा गुणे.



[1]   वेदैश्चसर्वैरहमेव वेद्यः गीता १५-१५.
[2]   योगः चित्तवृत्ति निरोधः  ।। पा. योगसूत्र.
[3]   स यो ह वै तत्परंम ब्रह्म वेद ब्रह्मैव भवति । मुंडकोप ३-२-९
[4]   छंदासि यस्य पर्णानि यस्तंवेद सवेदवित्  ।। गीता १५-१

19 November, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ९०

श्लोक ९०
अणुर्बृहत्कृशः स्थूलो गुणभृन्निर्गुणो महान् 
अघृतः स्वघृतः स्वास्यः प्राग्वंशो वंशवर्धनः  ।।
(८३) अणुः :  - अत्यंत सुक्ष्म. सर्वव्यापी श्री नारायण हा आपल्या हृदयातील अत्यंत सुक्ष्म अशी जीवनज्योत असून या मूलतत्वापासूनच सर्व जीवनीय कार्ये उगम पावतात. तो सूक्ष्माचाही सूक्ष्म केंद्रवर्ती असल्यानें त्याला 'अणू' म्हटलेले आहे. [1]गीतेमध्ये भगवंत स्वतः सांगतात. मी सर्वांच्या हृदयात अंतर्यामी तत्वरूपानें प्रतिष्ठित आहे.
(८३) बृहत् :  - त्याचवेळी तो आकाराने मोठ्यात मोठा आहे कारण तो सर्वव्यापी आहे. या दोन्ही संज्ञा एकमेकीच्या पूर्ण विरूद्धार्थी आहेत असे वाटते. परंतु हा वरचा भास ध्यानातील दिव्य अनुभवात गळून पडतो व सत्य प्रतीतीस येते. उपनिषदांनीही [2] मोठ्या धिटाईनें या दोन्ही संज्ञा एकत्र वापरून त्या आत्मतत्वाचे अनंत व्यापकत्व अल्पसे, विद्यार्थ्याच्या आकलनांत आणून देण्याचा प्रयत्‍न केला आहे.
(८३) कृशः :  - जो अत्यंत कृश, सूक्ष्म आहे, नाजूक आहे असा, पुन्हा या ठिकाणी विरूद्धार्था संज्ञा वापरून पुढील संज्ञेचा विराध केलेला आढळेल. व तो मुद्दामच केला आहे. प्राचीन ऋषींनी या विरूद्धार्थाच्या संज्ञा कलात्मक पद्धतीनें व परिणामकारक रित्या एकत्र वापरून जे आकलन होण्यास अत्यंत कठीण आहे त विद्यार्थ्यास ध्यानाने आकलन व्हावे असा प्रयत्‍न केला आहे.
(८३) स्थूलः :  - आकाराने अत्यंत स्थूल, जड व कठीण असा. वरची संज्ञा व ही संज्ञा विरूद्धार्थी आहेत. त्याचा अर्थ असा होईल की जे सर्व व्यापी शुद्ध चैतन्य आहे ते सूक्ष्मही आहे व त्याचवेळी विश्वरूपाने अत्यंत स्थूलही आहे. (विराट)
(८३) गुणभृत् :  - जो तीन्ही गुणांचा आधार असून त्यांचे अस्तित्व टिकवून धरतो व त्यांमधून व्यक्त होतो तो गुणभृत्. रजोगुणानें तो निर्मीती करतो, सत्वगुणाने पालन करतो व तमोगुणाने संहार करतो.  जाणिवेच्या स्तरावर तो या तीन प्रकारच्या वासनांमधून व्यक्त होतो.
(८४०) निर्गुणः :  - कोणताही गुण नसलेला. ज्याला गुण आहेत ते जड असते म्हणूनच ते अशाश्वत , विकारी (बदल होणारे) व मर्यादित असते. जे शाश्वत, अविकारी व अनंत आहे ते निर्गुणच असते. जाणीव तत्व चैतन्यच सर्व गुणांना प्रकाशित करते. सगुण अवतारामध्ये मायेच्या जडाच्या सहाय्याने तो स्वतःस गुणभृत (सर्व गुणांचा आधार) असे व्यक्त करतो तर त्याच्या शुद्ध स्वरूपांत तो आकाररहित, द्वंद्वरहित आत्मा आहे.
(८४) महान् :  - सर्वापेक्षा मोठा, दैदिप्यमान, सामर्थ्यवान्. तो पंचमहाभूतांनी, अगर दिक्कालानी कधीही मर्यादित होत नाही, एवढेच नव्हे तर तोच सर्वांचे अस्तित्व असल्यानें महान आहे.
(८४) अधृतः :  - ज्याला कोणाचा आधार नाही परंतु जो स्वतःच सर्वांचा आधार आहे. ज्याप्रमाणे पटामध्ये तंतू, अलंकारांत सोने अगर घटामध्ये माती आधारभूत असते त्याप्रमाणे तो सर्व विश्वाचा आधार आहे. ज्या भक्तास भगवंत आपल्यापासून खूपच दूर आहे असे वाटते त्याने श्रीनारायणाचे स्वतःच्या आधार स्वरूपांत ध्यान केले तर त्याचे हृदय निश्चिंत होईल व श्रद्धा वृद्धिंगत होईल.
(८४) स्वधृतः :  - जो स्वतःच स्वतःचा आधार आहे असा. पूर्वीच्या संज्ञेमध्ये वर्णन केल्याप्रमाणे तो सर्व विश्वाचा आधार आहे, असे म्हटल्यावर साहजिकच तर्क करणार्‍या बुद्धिमध्ये प्रश्न उद्‍भवतो आत्म्याचा आधार कोण?. परंतु भगवंत दुसर्‍या कशाच्याही आधाराने नसून स्वतःच्या महिम्याने प्रतिष्ठित आहे. उपनिषदांमध्यें [3] अशाच तर्‍हेच्या प्रश्नाला उत्तर देतांना आचार्यांनी म्हटले आहे, 'तो कोणाच्या आधाराने असतो ? तर तो स्वतःच्या विभुतीमत्वाने सुस्थित आहे.
(८४) स्वास्यः :  - ज्याचे मुख अत्यंत तेजस्वी, शोभायमान् आहे असा. त्याच्याच मुखामधून निघाल्यामुळे वेदांना त्यांचे सौंदर्य प्राप्त झाले आहे. तो अत्यंत तेजस्वी, दिव्य सौंदर्यवान् मनास भुरळ पाडून त्याचे हरण करणारा, घुमविणारा असा आहे.
(८४) प्राग्वंशः :  - ज्याचा वंश अत्यंत पुरातन आहे असा. ते अनंततत्व सर्व विश्व व कालाचेही आदिकारण असल्याने त्यास पुराणपुरूष असे म्हटले जाते. या संज्ञेचा दुसरा अर्थ होतो - यज्ञ समारंभात निमंत्रितांच्या विश्रांतीसाठी राखून ठेवलेली जागा. साधारणतः घराच्या पूर्वेकडील या भागास प्राग्वंश असे म्हणतात. साधारणतः यज्ञ व यज्ञामध्ये उपयोगांत येणार्‍या सर्ववस्तू अत्यंत पवित्र मानल्या जातात, त्यामुळे ही प्राग्वंश संज्ञाही श्रीनारायणाचाच निर्देश करते.
(८४) वंशवर्धनः :  - जो आपल्या वंशाचा अनेक पटीने विस्तार करतो असा. भगवान् नारायणाचा वंश म्हणजेच अनेकविध जडचेतन जीवांची सृष्टि. तिची तो वृद्धि करतो. या संज्ञेचा विरूद्ध अर्थही होऊ शकतो. कारण 'वृध्' या धातूचा अर्थ होतो संहार. श्रीनारायण हे आपल्यातील परमपवित्र आत्मतत्व आहे व त्याच्याच पायाशी आपण प्रेमाने अनन्य शरण होतो एकरूप होतो (विलीन होतो), ज्याप्रमाणे जागे झालेल्या मनुष्याची स्वप्नसृष्टी त्याच्या मनांत विलीन होते त्याप्रमाणे आपल्या सर्व संवेदना, भावना व विचार त्याच्यामध्येच विलीन होतात.
डॉ. सौ. उषा गुणे.




[1]   सर्वस्यचाहं हृदि सन्निविष्टः – गीता १५.१५
[2]   अणोरणीयान् महतो महीयान्  । आत्मास्य जन्तोर्निहितं गुहायाम् ।। कठोपनिषद् १-२-२
[3]   स भगवः कस्मिन् प्रतिष्ठितः इति स्वेमहिम्नि  ।। छांदोग्य ७-२४-१

16 November, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ८९

श्लोक ८९
सहस्रार्चिः सप्तजिव्हः सप्तैधाः सप्तवाहनः 
अमूर्तिरनघोऽचिन्त्यो भयकृत् भयनाशनः  ।।
(८२) सहस्रार्चिः :  - ज्यास अत्यंत तेजस्वी अशी सहस्रावधी किरणे आहेत असा शुद्ध चैतन्य आत्मस्वरूप श्रीनारायण, आपल्या सर्व अनुभवांना प्रकाशित करतो. त्याला आपल्या शास्त्रांत प्रकाशाचाही प्रकाश असे म्हटले आहे. तसेच सत्यस्वरूपाच्या दिव्यत्वाचे व सामर्थ्याचे वर्णन करताना गीता म्हणते - ’हजारो सूर्य एकत्र येऊन एकाचवेळी आकाशांत पूर्ण प्रकाशमान होतील तेव्हां जितके दिव्य तेज निर्माण होईल तितके दिव्य तेज त्या परमात्म्याचे असते.’[1]
(८२) सप्तजिव्हः :  - ज्यास सात ज्वालास्वरूप जिव्हा आहेत असा. जिव्हा म्हणजे जीभ व या ठिकाणी जीभ म्हणजे ज्वालाच होत. या सात वेगवेगळया जीभांचे वर्णन मुंडकोपनिषदांत केले आहे. त्यामागची कल्पना अशी आहे की, 'जीवंत प्राण्यामधील जाणीवेचे प्रकटन त्याच्या चेहर्‍यावरील सात केंद्रामधून  होत असते व ती सात केंद्रे आहेत दोन डोळे, दोन कान, दोन नाकपुड्या व एक मुख. बुद्धिमान प्राण्यांची जाणीवशक्ति या केंद्रातून ज्वाला स्वरूपाने बाहेर पडून त्यास बाह्यजगताचे ज्ञान करून देते असे या रूपकानें सुचविले आहे. आपल्या हृदयांत स्थित असलेला श्रीनारायणच जणू कांही या सात स्वतंत्र जीव्हारूपी ज्वालामधून प्रकट होत असतो असे ही संज्ञा देणार्‍या कवी व तत्वज्ञ ऋषींना आपल्या काव्यमय संज्ञेतून सुचवायचे आहे.
(८२) सप्तैधाः :  - सात दैदिप्य ज्वाला स्वरूप. पूर्वीच्या संज्ञेमध्ये सात ज्वालारूपी जिव्हा असलेला असे वर्णन आहे. या संज्ञेत त्या ज्वालांचे दिव्यत्व सुचवायचे आहे. (एधांसि दिप्ती)
(८२) सप्तवाहनः :  - ज्याच्या वाहनाला सात घोडे जोडलेले आहेत असा. भगवान सूर्य नारायण आपल्या सात दिनरूपी घोडे जोडलेल्या वाहनातून जात असतो असे काव्यात्मक वर्णन वेदामध्ये मंत्रद्रष्ट्या ऋषींनी केले आहे.
(८३०) अमूर्तिः :  - ज्याला कुठलाही आकार नाही असा. आकार म्हणजे ज्याला इतर घटकांच्या मर्यादा आहेत असा. परंतु जे पूर्ण व्यापक आहे त्याला कसलाही आकार संभवत नाही, जसे आकाशाला कसलाही आकार नाही. ज्याला आकार आहे त्या सर्व वस्तू अशाश्वत आहेत. नारायण स्वतः अनंत व नित्य असल्यानें त्याला आकार नाही.
(८३) अनघः :  - अघ म्हणजे पाप किवा दुःख. ज्याचे ठिकाण कसलेही पाप अगर दुख नाही असा परमात्मा श्री परमेश्वर अत्यंत पवित्र आहे. व त्यास कुठल्याही वासनांचा स्पर्श नाही. तो वासनेने दूषित नाही. त्यामुळेच तो आनंदस्वरूप आहे व दुःखाचा त्यास स्पर्शही नाही.
(८३) अचिन्त्यः :  - ज्याचे माणसाच्या मनबुद्धिने आकलन होत नाही असा. श्री नारायण आकाररहित असल्याने आपणास प्रतीत होऊ शकत नाही, एवढेच नाही तर तो आपल्या मनाला भावनेतून अगर बुद्धीला जाणीवेतूनही प्रतीत होवूं शकत नाही. तो स्वतः दिव्य चैतन्यस्वरूप असल्याने त्याच्याच प्रकाशात आपल्या शारीरिक संवेदना, मानसिक भावना किवा बौद्धिक विचार आपणास प्रतीत होतात. गीतेमध्ये या सर्वांना धारण करणार्‍या परमेश्वराचे वर्णन शुभ्रपटलासारखे केले आहे; ज्याचेवर जीवनातील अनेक क्षणभंगूर घटना उमटतात.[2]
(८३) भयकृत :  - भय निर्माण करणारा. दुष्प्रवृत्तीच्या माणसांच्या मनांत भय निर्माण करतो. आपल्या सर्व अवतारांमध्ये असुरांना त्याने भय घातले आहे. त्यामुळे तरी त्यांनी धर्ममार्गाकडे वळावे.
(८३) भयनाशनः :  सर्व भयाचा नाश करणारा परमात्मा. उपनिषदांनी 'आत्मज्ञानी' अवस्था ही पूर्ण निर्भय अवस्था आहे असे वारंवार सांगीतले आहे. द्वैतातून अगर भेदातून भय निर्माण होते. जेथे एकमेव सत्यच आहे व दुसरे कोणीच नाही तेथे भय कसे असेल ? म्हणून श्रीनारायण भयनाशक आधार आहे.[3]
डॉ. सौ. उषा गुणे.



[1]   दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता । यदि भाः सदृशी सा स्याद् भासस्तस्य महात्मनः ॥ गीता ११.१२
[2]   सर्वस्य धातारमचिन्स्यरूपम् – गीता ८.९
[3]   न बिभेति कुतश्चनेति – तैत्तिरीय उप २.०९ ; द्वितीयाद् वै भयं भवति । बृहदारण्यक उप १.४२