29 March, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक २३

गुरुर्गुरुतमो धाम सत्यः सत्यपराक्रमः ।
निमिषोऽनिमिषः स्रग्वी वाचस्पतिरूदारधीः ।।
(२०९) गुरुः :  - शिक्षक किवा आचार्य. जो आपल्या शिष्यांना पूज्य धर्मग्रंथातील गूढार्थाचा उपदेश करतो त्याला गुरू असे संबोधिले जाते. स्वतः परमेश्वर हाच सर्व वेदांचा कर्ता, उद्गाता व ज्ञाता असल्यामुळे सर्व वेदांताच्या अध्यापनांतही तोच गुरू असतो. आत्मा हाच सर्व प्रकाशक असल्यामुळे मानवी गुरूंचे ज्ञानही तोच प्रकाशित करतो. त्याची शिष्याला शिकविण्याची, सांगण्याची कला तसेच शिष्याची ऐकण्याची, समजून घेण्याची व ते सत्य आत्मसात करण्याची बुद्धिही तोच प्रकाशित करतो (कार्यान्वित करतो). म्हणूनच ज्ञानदानाची प्रक्रिया जिथे जिथे चालते तेथे तोच एकमेव गुरू असतो.
(२१०) गुरुतमः :  - महान गुरू. ज्याने प्रजापती ब्रह्मदेवाला चारही वेदज्ञानाचा उपदेश केला, ज्ञानसाधना करावयास प्रवृत्त केले. तो महत् गुरू प्रत्यक्ष परमेश्वरच आहे. सृजनशक्ति असलेल्या त्या पहिल्या दिव्यज्ञान साधकाला जो परमतत्वाचा अनुभव आला तो त्या परब्रह्मावाचून कुणीही दे शकणार नाही. त्यानंतर ज्या दिव्य ज्ञानी मानवांना सत्यज्ञान झाले त्यांनी आपल्या शिष्यांना मार्गदर्शन केले. त्यामुळे साहजिकच पुढील शिष्यांची अशी मनोमन श्रद्धा असते की आपल्या गुरूंनीच आपल्याला सत्यदर्शन घडविले. परंतु सार्वकालिन सत्य हेच आहे की वेदांनी प्रतिपादिलेला अंतिम साक्षात्कार हा शेवटी सत्य प्रकटनातूनच होतो व त्याचा प्रत्यक्ष गुरूशी अगर कुठल्याही धर्मग्रंथाशी कांही संबंध नसतो. श्वेताश्वतर उपनिषद म्हणते (६- १८) ज्याने प्रथम सृष्टिकर्ता ब्रह्मदेवाची उत्पत्ति केली व त्याला वेदज्ञान दिले तो (गुरू.)
     गुरू, तत्वज्ञानाचे ग्रंथ, परमेश्वराची भक्ती, ध्यान, सदाचरण आणि धर्मतत्वांचे आचरण (किवा उपासना) ह्या सर्वांची आवश्यकता आहे, कारण त्यामुळे साधकाचे अंतःकरण अंतिम सत्याचे दर्शन घेण्याकरतां तयार होते. परंतु शेवटचा साक्षात्कार हा केवळ परब्रह्मामुळेच होतो. म्हणूनच तो परब्रह्म स्वरूप 'श्रीविष्णु' हा श्रेष्ठ गुरू आहे.
     एकाद्या वस्तुची गुरूता (जडपणा - वजन) दर्शवण्याकरतांही 'गुरूत्व' हा शब्द वापरला जातो व त्या दृष्टिने पहाता परमात्मा हा सर्व गुरू वस्तूमध्येही गुरू (जड) आहे
(२११) धाम :  - अंतिम ध्येय. सर्व तीर्थयात्रांचे पवित्रतम शेवटचे गंतव्यस्थान. ते परब्रह्म हेच परमधाम आहे, व ज्या ध्येयाला पोहोचल्यावर पुढे कुठेही जावयाचे शिल्लक रहात नाही असे हे निरपवाद पूर्णत्व म्हणजेच शेवटचे शिखर अगर धाम होय. संस्कृतमध्ये धाम ह्या शब्दाचा दुसरा अर्थ 'तेज'. 'शुद्धज्ञान' हे सर्व अनुभवांचेही प्रकाशक असल्यामुळे त्याची 'सर्व प्रकाशांचा प्रकाश' अशी स्तुती केली आहे. [1]
(२१२) सत्यः :  - जो स्वतःच सत्य स्वरूप आहे असा. सर्वसाधारणपणे सत्य हा शब्द जसा वापरला जातो त्यापेक्षा वेगळया अर्थी हा शब्द इथे वापरला आहे. तो म्हणजे जे भूत भविष्व वर्तमान ह्या तीही कालांत विकाररहित  (परिवर्तनरहित ) असते ते सत्य. 'सत्यं ज्ञांनं अनंतम ब्रह्म ! अशी उपनिषदांची  घोषणा आहे. बृहत् उपनिषद् म्हणते ''हे प्राण सत्य आहेत व तो प्राणांचेही  सत्य आहे. (४-१-२०)
(२१३) सत्यपराक्रमः :  - गतिमानसत्य. निष्क्रिय सत्यप्रियता हे मुर्खांचे आश्रयस्थान आहे किवा भित्र्या लोकांची लपण्याची गुहा (पळवाट) आहे. आत्मघातकी, पूर्णतः असत्य किवा अपराधपूर्ण लबाड व्यवहार ह्यापेक्षा ते काही प्रमाणात ठीक आहे परंतु परमात्मा हा केवळ सत्यस्वरूपच होऊन राहिलेला नाही तर तो गतिमान सत्यस्वरूप आहे. त्यामुळे सत्याच्याच नेहमी विजय होतो, असत्याचा कधीही होत नाही हेच सिद्ध होते. (सत्यमेव जयते् न अनृतम्)
     गुरूत्वाकर्षण हा निसर्गाचा नियम आहे व तो सर्व ठिकाणी खरा आहे इतकेच नव्हे तर त्या नियमातून कुणीहि, सुटू शकत नाही किवा त्या नियमांचा भंग करू शकणार नाही हेही निसर्ग बघतो. त्याचप्रमाणे सुसंगती व अमर्याद प्रेम हे अपरिहार्य सत्य आहे व ते जीवनामध्ये सदैव दृढमूल झाले आहे. म्हणूनच परमात्मा 'सत्यपराक्रम' या नावांने संबोधिला जातो.
(२१४) निमिषः :  - डोळयाच्या पापण्या मिटणे ह्या स्थितीला निमिष असे म्हणतात. व पापण्या उघडणे ह्या स्थितीला म्हणतात अनिमेष. जेव्हा डोळे उघडे असतात तेंव्हा मन बहिर्गामी होते. मनाची अंतर्मुखता ही डोळयांच्या अभावितपणे मिटण्याशी सुसंगत असते कारण जेव्हा मनुष्य खोल विचारांत गढलेला असतो, एकादी गोष्ट आठविण्याचा प्रयत्न किवा मनन करत असतो तेंव्हा त्याचे डोळे सहजच मिटलेले आपण पहातोच.
     खोल ध्यान मग्न अवस्थेत बुद्धि तिच्या सर्व अनुभवजगतापासून आंत वळलेली असते. अंतःकरणाला आंत व बाहेर एकाच दिव्य वस्तूचा अनुभव येत असतो तो परमात्मा ह्या ठिकाणी निमिष ह्या शब्दांनी निर्देशित केला आहे कारण तो स्वतःच स्वतःमध्ये ध्यानमग्न आहे. त्याचे दृष्टीने पाहतां सर्व सृष्टिच्या उभारणीमध्ये आंतबाहेर त्याच्याखेरीज दुसरे कांहीच नाही अशी स्थिती असते.
(२१५) अनिमिषः :  - ज्याची दृष्टि पापण्यांची उघड झाप न झाल्यामुळे स्थिर आहे असा. जेव्हा आपण पापण्यांची उघड झाप करतो तेंव्हा दोन्ही डोळयांच्या पापण्या एकाच वेळी बंद होतात. आणि दृष्य वस्तूवर एकतर्‍हेचे आवरण पडून बघणारा वस्तू बघू शकत नाही. ह्याठिकाणी अ निमिष या संज्ञेने असे सुचवायचे आहे की ज्ञानवान आत्मा सर्वकाळ ज्ञाताच असतो. ( द्रष्टुः दृष्टेः अविपरिलोपात् पश्यन्नेव भवति ) श्री शंकराचार्यांच्या छांदोग्य भाष्यातील शब्द असे आहेत '' ज्ञात्याच्या ज्ञान प्रक्रियेत केव्हाही खंड पडत नाही.''
(२१६) स्रग्वी :  - स्रक् म्हणजे माला. अर्थात स्रग्वी शब्दाचा अर्थ होइल जो कधीही न कोमेजणार्‍या फुलांची माला सतत परिधान करतो तो. विष्णुची सुपरिचीत माला वैजयंती होय.
(२१७) वाचस्पतिरूदारधीः :  - जो जीवनाचे महान तत्वज्ञान प्रसृत करण्यामध्ये वक्तृत्वशाली आहे त्याला वाचस्पती असे संबोधिण्यात येते. धी म्हणचे बुद्धिची शक्ति. उदारधी म्हणजेच त्याची बुद्धी उदार आहे असा. जो आपल्या मतांचे बाबतीत दुराग्रही नाही असा. म्हणून संपूर्ण संज्ञेचा अर्थ असा होईल की, 'परमात्मा केवळ जीवनाचे तत्वज्ञान देणाराच नव्हे तर त्याचे जवळ अत्यंत विशाल हृदयही आहे ज्यामुळे तो मायेच्या क्रीडेमुळे मोहित झालेल्या साधकांच्या मन बुद्धितील त्रुटी समजू शकतो व त्यामुळे तो माणसांचे गुणदोष सहानुभुती पूर्वक सहन करतो. म्हणूनच पतितांच्या बद्दल परमेश्वराच्या मनांत अपार करूणा असते असे म्हटले जाते.
     निसर्गाचे व सृष्टिचे नियम हे अंध व तडजोड न करणारे असे असतात. त्या उलट धार्मिक नीतीनियम मनुष्य पुष्कळ काळपर्यंत कुठलेही कडक शासन न होता डावलू शकतो. अग्निचे जवळ कसलीही दया बुद्धि नाही. परंतु परमेश्वर आपल्याला जीवनाचे तत्वज्ञान उत्तम सतत तर्‍हेने सांगत असतानांही त्याचे हृदय करूणामयच असते. आपल्या उदार बुद्धिने व मात्यापित्याच्या ममतेनें मनुष्यांचे नीतिमर्यादा सोडून वागणे तो सहन करतो.

डॉ. सौ. उषा गुणे


[1]   नारायणोपनिषद म्हणते - नारायण परमज्योती स्वरूप आहे. तर मुंडकोपनिषद म्हणते परब्रह्म हे परिपूर्ण आहे.

25 March, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक २२

अमृत्युः सर्वदृक् सिंहः संधाता संधिमान् स्थिरः ।
अजो दुर्मर्षणः शास्ता विश्रुतात्मा सुरारिहा  ।।
(१९८) अमृत्युः :  - ज्याला मृत्यु - क्षय ज्ञात नाही असा. जन्म, वृद्धी, क्षय, व्याधी व मृत्यु या पांच अवस्था अगर स्थित्यंतरे प्रत्येक सजीव व सान्त वस्तूंना अपरिहार्य आहेत. जे जे जन्मास येते ते ते विनाश पावतेच. ज्यास जन्म नाही त्यास अर्थातच मृत्युही नाही. समुद्रांत उत्पन्न होणार्‍या लाटा लय पावतात परंतु समुद्राचा लय होत नाही. प्रकृतीच्या निरंतर चालणार्‍या स्थित्यंतरामध्येही जो स्थित्यंतर रहित असतो तो 'श्रीमहाविष्णु'. भगवत् गीतेमध्ये श्रीकृष्ण आग्रहाने सांगतात, ' जो या परिवर्तनशील नामरूपामध्ये अपरिवर्तनिय असे पूर्णब्रह्म पाहू शकतो त्यालाच जीवनाचे ध्येय व अर्थ समजला. ( विनश्यत्सु अविनश्यन्तं यःपश्यति स पश्यति)
(१९९) सर्वदृक् :  - जो सर्व वस्तु पाहतो व जाणतो तो. प्रत्येक माणसाची जाणीव शक्ती त्याच्या सर्व कृतीमागील हेतु व विचार प्रकाशित करते. व तीच ज्ञान शक्ति सर्वकाळी सर्वसाक्षी असते. व तीलाच 'महाविष्णु' 'सर्वदृक्' असे संबोधिले आहे.
(२००) सिंह :  - जो नाश करतो तो सिंह. प्रकृती मधील सर्व परीवर्तन व विनाश ह्याच्या मागे असलेला एक समर्थ नियम स्वतःच परमात्मा आहे. जेव्हा शरीर मन व बुद्धि यांच्या पलिकडे जावून आपल्या अनुभव विश्वातील सर्व संवेदना, भावनां व विचार नाहीसे केले जातात, तेंव्हा जो अनुभव उरतो तो केवळ 'पूर्णब्रह्मच' होय.  या अद्वितीय श्रेष्ठ अवस्थेत दुसरा कुठलाही विषय समविष्ट होऊच शकत नाही. म्हणून ती सर्वलयावस्था म्हणूनच ओळखली जाते. जागृतावस्था ही स्वप्नावस्थेचा नाश करते, सुषुप्ती अवस्था जागृती व स्वप्नावस्थेचा नाश करते. तर परमात्म्याच्या साक्षात्काराची अवस्था ही तीनही जाणीवावस्थाचा नाश करणारी आहे म्हणूनच त्याला 'सिंह' म्हटले आहे. 'सिंह' हा शब्दही हिंसा ह्या शब्दातील अक्षरांची उलटसुलट मांडणी करून तयार झाला आहे.
     या संज्ञेचा अगदी स्पष्ट व सहज प्रतीत होणारा अर्थ असाही होईल की ' आपल्या अंतःकरणातील संसारवनाचा राजा सिंह म्हणजेच भगवान् महाविष्णू होय. त्या नारायणरूपी सिंहाच्या गर्जनेनें मनाच्या जंगलातील सर्व पाशवी वासना पलायन करतात. भगवत् गीतेतही स्वतःच्या विभूतींचे वर्णन करताना भगवांन श्रीकृष्ण म्हणतात, 'सर्व पशूंमध्ये त्यांचा राजा सिंह मीच आहे’ - मृगाणांच मृगेंद्रोऽहम् – गीता १०.३०.
(२०१) सन्धाता :  - सन्धि करणारा, नियमन करणारा. जो कर्म व त्याचे फल यांचा संधि वा संयोग घडवून आणतो तो. वस्तुतः कर्मफल दुसरे कांही नसून प्रत्यक्ष कर्मच (वेगळया स्वरूपांत) असते. कर्मफलाच्या नियमाप्रमाणे कर्मच विशिष्ठ कालानंतर कर्मफलांत परिवर्तित होते, व हा कर्मफल सिद्धांत स्वतःच श्रीविष्णू आहे. म्हणूनच त्याचे साधक त्याला सर्व कर्मांचे फल प्रदान करणारा ईश्वर मानतात. (कर्मफलदाताईश्वरः)
(२०२) संधिमान् :  - मनुष्याच्या व्यक्तिमत्वाची जडण घडण हे निसर्गातील एकअत्यंत शक्तिशाली व अद्‍भुत असे कार्य आहे. व त्याचे सर्व नियम तयार केले आहेत त्या परमात्म्याने, व तो स्वतःच नियम स्वरूप आहे. मन व बुद्धि मध्ये कार्यकारी असलेले ज्ञानयुक्त चैतन्य 'जीवात्मा' या स्वरूपांत प्रकट होते, व कर्मफलाच्या नियमाप्रमाणे सुखदुःखात्मक अनुभव घेते. याप्रमाणे तो परमात्मा केवळ कर्म फलदाताच आहे असे नसून सुखदुःखकारक कर्म फल भोक्ताही तोच होतो. म्हणूनच त्याच्याच पासून उत्पन्न होणार्‍या कर्मफलाच्या नियमामुळे तो स्वतःच बांधला गेल्याप्रमाणे (संधिमान्) वाटतो. खरे पाहतां तोच सर्व कर्मे करवितो (कर्माध्यक्ष), त्या कर्माचे ज्ञानही त्याच्याचमुळे होते, सर्व क्रियांचे नियमनही तोच स्वतः आहे व त्या पासून होणारा सर्व मानवांचा सर्वकालिक कर्मांचा अनुभव घेणाराही तोच आहे. मानवांच्या, विशेषतः आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचा विचार करतां आपल्यातील दिव्य चैतन्य सर्व अनुभवांमध्ये उपाधिबद्ध, (संधिमान्) असल्याप्रमाणे वाटते. हा संधिमान जीव त्याच्या मूळ शुद्ध स्वरूपांत आहे 'श्री महाविष्णु'.
(२०३) स्थिरः :  - स्थिर, एकविध. जो स्वभावतःच सर्व कालांत स्थिर, एकविध आहे. विकार रहित आहे असा.
(२०४) अजः :  - अजन्मा. ज्याला जन्म नाही असा. ह्याच संज्ञेने ब्रह्मदेवाचाही निर्देश केला जातो. जो हिरण्यगर्भ ह्या स्वरूपाने या मायिक, विविधतापूर्ण जगताची उत्पत्ती करतो तो महाविष्णु.
(२०५) दुर्मर्षणः :  - ज्याचेवर प्रहार करतां येत नाही व ज्याला जिंकता येत नांही असा. प्रत्येक जीवाला आपल्या आयुष्यांत पूर्णता प्राप्त करून घेण्यासाठी परमेश्वराचे अस्तित्व मान्य करावेच लागते व त्याच्या प्राप्तीसाठी वाटचाल करावी लागते कारण तोच ध्येय स्वरूप आहे परंतु कांही अप्रगत मानवांमध्ये असे दिसते की तो पशुतुल्य मानव त्याच्यामधिलच दिव्य जीवनमूल्ये नाकारतो व त्या बरोबरच शांती व आनंद गमावून बसतो. इंद्रिय सुखाने मोहित होऊन व शरीर सुखाने भुलून तो कांही कालपर्यंतच्या क्षणभंगूर आनंदाचा अनुभव घेत राहतो. पण लवकरच अपरिहार्यपणे त्याला खर्‍या आनंदाच्या व पूर्ण समाधानाच्या शोधाकरतां श्रीविष्णूचे पाय धरावेच लागतात व शेवटी परमेश्वराचाच विजय होतो. परमेश्वरावर विजय मिळविण्यात मानवाला हार मानावीच लागते.
(२०६) शास्ता :  - जो सर्व ब्रह्मांडाचे नियमन करतो तो. तो सर्व नियमन करणारा आहे इतकेच नव्हे तर त्याचे पालनही करविणारा तोच आहे. आपल्याला शास्रनियमानुसार धर्मपथावर चालण्याचे अत्यंत उत्तम व समर्थ मार्गदर्शन तो करतो. त्याचवेळी सांस्कृतिक सौंदर्याच्या परिपूर्तीकडेही तो आपली पावले वळवितो व शेवटी उत्क्रांतीच्या सर्वोच्च स्थानापर्यंत आपल्याला नेऊन पोहोचवितो, ते पद आहे ’विष्णूपद’.
(२०७) विश्रुतात्मा :  - वेदामधील सर्व विख्यात व सर्वश्रुत अशी संज्ञा म्हणजे 'आत्मा'. व तिने श्री विष्णूचाच निर्देश केला जातो. ह्या विष्णूसहस्र नामावलीतील सर्व संज्ञा जरी श्री विष्णूच्या सगुणभक्तीकरतां उपयुक्त आहेत तरी या संज्ञेने मात्र हे स्पष्ट होते की, हिंदुधर्मग्रंथांना ज्याचे आख्यान करावयाचे आहे ते दुसरे कांही नसून 'पूर्णब्रह्मच' होय. शतविध सूचक लक्षणांच्या सहाय्याने त्या पूर्णब्रह्माची यशस्वी रीतीने व्याख्या करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. तसेच त्याच्या शब्दातीत स्वरूपाचे नकारात्मक विधानांनी (नेति-नेति) वर्णन करून तो ’जे’ नाही तेही स्पष्ट करण्याचा प्रयत्‍न केला आहे.
(२०८) सुरारिहा :  - (१) सुर - स्वर्गातील देव (२) अरि - शत्रू (३) हा - नाश करणारा. देवांच्या शत्रूंचा नाश करणारा तो परमात्मा सुरारिहा. स्वतःची उन्नत्ती करून घेणार्‍या साधकाच्या उन्नत मनाचे शत्रु म्हणजे शरीर व इंद्रियाच्या मागण्या, अहंकाराचे आग्रहपूर्ण प्रतिपादन व वासनारूपी व इच्छारूपी निशाचर. शुद्ध भक्तीने मन परीपूर्ण असेल तर तो परमात्माच साधकाच्या मनातील प्रतिकूल नकारात्मक विचार बाहेर घालवून नष्ट करतो व साधकाला आपल्या स्वतःवरच विजय मिळवायला मदत करतो म्हणून श्री नारायणच 'सुरारिहा' आहे.

डॉ. सौ. उषा गुणे

21 March, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक २१

मरीचिर्दमनो हंसः सुपर्णो भुजगोत्तमः ।
हिरण्यनाभः सुतपाः पद्मनाभः प्रजापतिः  ।।
(१८९) मरीचिः :  - मरीचि या शब्दाचा अर्थ होतो तेजःपुंज. ज्ञानशक्तीमुळे सर्व वस्तूज्ञान होते (प्रकाशित होतात). म्हणूनच सर्व प्राकृतिक अगर ऐहिक विषयांचे बाबतीत उपनिषद सांगते की सर्व विश्व प्रकाशित करणारा तो अनंत प्रकाश आहे. भगवान् श्रीकृष्ण गीतेत सांगतात ' मी सर्व तेजस्वी वस्तूंचे तेज आहे. (तेजस्तेजस्विनामहम् – गीता १०.३६)
(१९०) दमनः :  - मानवांच्या अंतकरणातील सर्व राक्षसी वृत्तींचे दमन व नियमन करतो तो. सदाचारी व सत्प्रवृत्त व्यक्तींचा छळ करणार्‍या उद्दाम व दुष्ट प्रवृत्तींचे दमन करण्याकरतां त्यानें वेगवेगळया आकारांत दहावेळा अवतार धारण केले. शारीरिक व्यथा अगर मानसिक विक्षेप दुःख, मृत्यू इत्यादी स्वरूपांच्या शिक्षांनीही तो मनुष्याच्या अंतःकरणातील दुष्प्रवृत्तींचे दमन करतो.
(१९१) हंसः :  - वेदांची जी सर्व श्रेष्ठ ब्रह्म वाक्ये आहेत त्यापैकी एक ' अहं ब्रह्मास्मि' हे आहे. ह्या ठिकाणी योजलेला 'अहं' (मी) हा शब्द प्रथमपुरुषी एकवचनी वापरलेला असून 'उपाधिंमध्ये कार्यकारी असलेल्या परमात्म्याचा ह्या शब्दाने निर्देश केला आहे. व त्यालाच 'जीव' असे म्हटले जाते. 'मी' म्हणजेच जीव (अहं) जेव्हा उपाधिं पासून मुक्त होतो तेंव्हा 'स्वभावतःच तो दुसरा कोणी नसून 'तो' च (सः) (परमात्मा) असतो. अहं सः हा अनुभव म्हणजेच परमात्म्याचा साक्षात्कार होय. त्या श्रीविष्णूच्या साक्षात्काराच्या उच्च अवस्थेलाच म्हटले आहे 'हंसः'
(१९२) सुपर्णः :  - पर्ण म्हणजे पंख. ज्याचे पर्ण (पंख) अत्यंत सुंदर आहेत तो सुपर्ण.
     [१]अनन्य स्नेहभाव असलेले व सुंदर शुभ्र पंख असलेले दोन पक्षी एकाच झाडावर बसतात. परंतु त्यातील एक झाडाची फळे खात असतो व दुसरा कांहिही न खातां निरीक्षण करीत असतो.
     उपनिषदांच्या पारंपारिक अर्थाप्रमाणे हे दोन पक्षी म्हणजे एक जीवात्मा व दुसरा परमात्मा. ते दोन्ही एकाच वृक्षावर बसतात (शरिराच्या अधाराने रहातात) त्यातील जीव कर्म फलांचा आस्वाद घेतो व दुसरा (परमात्मा) साक्षीरूपाने पहात असतो. 'श्री महाविष्णू' हा सर्व अनुभव घेणारा 'साक्षी' आहे.
(१९३) भुजगोत्तमः :  - पुराणांमध्ये पूजनीय अशा नागाला - सर्पाला अनंत म्हटले आहे. तसेच गीतेमध्येही श्रीकृष्ण सांगतात, ' मी नागांमध्ये; अनंतनाग आहे. (अनंतश्चास्मिनागानाम् - गीता १०.२९)
(१९४) हिरण्यनाभः :  - ज्याने आपल्या नाभीमध्ये ब्रह्मदेवाला (हिरण्यगर्भ) आधार दिला आहे तो. कांही टीकाकार ' ज्याची नाभी सुवर्णमयी असल्याने सुंदर आहे असाही या संज्ञेचा अर्थ करतात. परंतु तो अयोग्य वाटतो कारण ह्या श्लोकातील इतर संज्ञांच्या संदर्भात तर तो सुसंगत नसल्यानें साधकाच्या मनास आवाहन करूं शकत नाही.
(१९५) सुतपाः :  - ज्याची तपःश्चर्या तेजस्वी आहे असा. निरंतर सर्जनशील विचारसरणी ठेवणे याला 'तप' म्हणतात. व त्या करतां मानसिक एकाग्रता अत्यावश्यक आहे. ज्ञानेंद्रियांचेवर पूर्णताबा असल्या खेरीज मन सतत एकाग्र राहूं शकत नाही. मन इंद्रियांचे पासून परावृत्त केले तरी त्याला एकाग्रता टिकवण्या करतां एकादे वैचारिक ध्येय आवश्यक असते. उपनिषदांमध्ये उल्लेख आहे, त्याने तप केले व तपश्चर्येतून या सर्वाची उत्पत्ती केली - . 'स तपः तप्त्वा इदमेतदसृजत्'
(१९६) पद्‌मनाभ :  - ज्याने आपल्या नाभीचे ठिकाणी सर्व सृजनशक्तिला आधार दिला आहे तो. या संज्ञेचा अर्थ पूर्वी विशद केलेलाच आहे (४८), शंकराचार्यांचे मते या संज्ञेचा अथे होईल की ' ज्याची नाभी पद्माप्रमाणे (कमलाप्रमाणे) सुंदर वर्तुलाकार आहे असा.
(१९७) प्रजापतिः :  - सर्व प्रजेचा (प्राणिमात्रांचा) पति - स्वामी. सर्व प्राणीमात्र त्याच्यापासूनच उत्पन्न झालेले असल्यामुळे सर्व प्राणी त्याचीच प्रजा आहे. व तो त्यांचा पति आहे. त्या ठिकाणी पति ह्या शब्दाचा स्पष्ट अर्थ आहे पिता. याप्रमाणे श्रीविष्णू सर्व प्राण्यांचे उगमस्थान असल्याने त्याला प्रजापति म्हटले आहे.
डॉ. सौ. उषा गुणे


          द्वा सुपर्ण सयुजा सखाया समानंवृक्षं परिष्वजाते ।
            तयोरन्य पिप्पलं स्वाद्वत्तिः अनशन् अन्यो अभिचाकशीति (मुंडकोपनिषद् ३-१)

17 March, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक २०

महेष्वासो महीभर्ता श्रीनिवासः सतां गतिः ।
अनिरूद्धः सुरानन्दो गोविन्दो गोविदां पतिः ।।
(१८१) महेष्वासः :  - ज्याने शारङ्ग नांवाचे धनुष्यधारण केले आहे असा.
(१८२) महीभर्ता :  - धरणी मातेचा पति. संस्कृतमध्ये पति या अर्थी भर्ता हा शब्द वापरला जातो. व त्याचा अर्थ होतो भरण पोषण करणारा, आधार देणारा. पुराण वाङ्‌मयातील वचनानुसार पृथ्वीला त्यानें प्रलयजलातून वर काढले होते. तत्वज्ञानाचे दृष्टीने पाहीले असतां सोने त्याच्यापासून तयार केलेल्या सर्व आभूषणाचा आधार असते त्याप्रमाणे परमतत्वापासून निर्माण झालेल्या ह्या विश्वाला आधार तोच आहे. पृथ्वीचा अगर पृथ्वीवरील सर्व वस्तूंचा आधार तोच आहे त्यामुळेच त्याला पृथ्वीचा आधार पती (भर्ता) म्हटले आहे.
(१८३) श्रीनिवासः :  - श्रीचे म्हणजेच लक्ष्मीचे अक्षय्य आश्रयस्थान. या ठिकाणी 'श्री' या शब्दामध्ये सर्व ऐश्वर्य व शक्ती, व धर्मास अनुसरून केलेले सर्व सृजनकार्य, त्याकरतां लागणारी शक्ति व पात्रता या सर्वांचा अंतर्भाव केला जातो. लक्ष्मी केव्हा ही एकाचएक स्थानांत स्थिर रहात नाही. सर्व इतिहासामध्येही आपल्याला दिसते, की मोठमोठें साधुसंतही वेळ प्रसंगी पूर्णतेच्या बाबतीत तडजोड करतात. परंतु श्री नारायणाचे प्रशांत अंतःकरण हे एकच स्थान असे आहे की ज्या ठिकाणी अपूर्णतेचा थोडाही उपसर्ग होवूं शकत नाही. म्हणूनच लक्ष्मीचे तेथे सतत वास्तव्य असते. व त्या करितांच महाविष्णुला 'श्रीनिवास' असे संबोधिले जाते.
(१८४) सतांगतिः :  - सत् पुरूष आणि परमार्थ साधकांचे ध्येय- गंतव्य. गीतेमध्ये यालाच परागति असे म्हटले आहे. गति ह्या शब्दाने केवळ ध्येयाचाच निर्देश अपेक्षित नाही तर प्रत्यक्ष ध्येयाकडील वाटचाल व दिशा यांचाही त्या शब्दांत अंतर्भाव केलेला आहे. श्री नारायण हाच साधकांकरितां प्रत्यक्ष दिशा, मार्ग, प्रगती व ध्येय आहे.
(१८५) अनिरूद्धः :  - ज्याला कुणीही कधीही विरोध करू शकत नाही, अडवू शकत नाही असा. सर्व निर्मित जडचेतन वस्तूमध्ये केवळ परमात्म्याची इच्छाच अप्रतिहतपणे कार्य करते आहे. ज्याप्रमाणे दृश्य जड जगतामध्ये निसर्गाचेच नियम अविरोधपणे कार्य करीत असतात, त्याचप्रमाणे सत्याचे सुसंवादित्व व लयबद्धता आपल्या अहेतुक प्रेमाने व पूर्णतेच्या दिशेने सतत प्रगत होत असते. काल व गती कोणाही करीता थांबत नाहीत. जेव्हा सूर्य उगवतो तेंव्हा सर्व प्राणी सृष्टी त्याच्यापासून शक्ति व उर्जा स्विकारते व ह्या प्रक्रियेमध्ये कुणीही अडथळा आणू शकत नाही. त्याचप्रमाणे आत्मतत्वाच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण प्राकृतिक सृष्टि स्पंदन पावू लागते व प्रत्येक घटक कार्यरत होतो. या सर्व प्रयत्‍न व साक्षेपामध्यें, त्यांच्या यश अपयशामध्ये, सुखदुःखामध्ये ते आत्मतत्व आपल्या मोहमयी सौंदर्यासहित नित्य उपस्थित असते. तरीही ते त्यांत समाविष्ट होत नाही. रासक्रिडेमध्ये गोपींना आपल्या स्वतःच्याच नृत्यामध्ये पूर्णता व समाधान मिळते स्वतः भगवान् त्यापासून पूर्ण अलिप्तच असतात.
पुराणांमध्ये असे आढळते की भगवान विष्णुंनी अनेक अवतार घेतलेले आहेत व त्यामध्ये वेगवेगळे आकार धारण केलेले आहेत. सर्व अवतारांमध्ये ते विजयीच झालेले आहेत, ह्याकीरतां त्यांची शक्ति अनिरूद्ध आहे असे म्हटले जाते.
(१८६) सुरानंदः :  - स्वर्गामध्ये वस्ती करणार्‍या देवानांही जो आनंद प्रदान करतो तो. तो पूर्णब्रह्म परमात्मा स्वतः पूर्णानंद स्वरूपच आहे असे विधान आपण उपनिषदांमध्ये वाचतो. ''आनन्दं ब्रम्हेति व्यजानात्'' तैतिरीयोपनिषदातील आनंदवल्लीमध्ये तर आनंदाचे गणिती पद्धतीनें विधान केले आहे व ऋषींनी असा निष्कर्ष काढला आहे की स्वर्ग-पृथ्वीवरील सर्व मानसीक, अतिमानसिक एकत्रित केलेला आनंदही केवळ त्या परमानंदाच्या एका लहानशा किरणाचे लुकलुकणे होईल. असा तो परमात्मा 'महाविष्णु' होय.
(१८७) गोविन्दः :  - संस्कृतमध्ये गो या शब्दाचे चार अर्थ होतात. ते म्हणजे १) पृथ्वी, २) गाय, ३) वाणी ४) वेद
(१) अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तुमात्रास ज्याप्रमाणे पृथ्वी आधार देते त्याप्रमाणे मानवांच्या सर्व आंतरिक घटकांना आधार देणारा तो गोविंद. (२) ज्यानें गाईंचे रक्षण केले तसेच गोकुळांत वास्तव्य करून गोपाळांची भूमिका वठविली तो गोविंद. तोच मनुष्यांच्या अंतःकरणातील पाशवी बुद्धि व वासना काबूमध्ये ठेवतो. (३) ज्याच्या वाचून कुठेही कोणाच्याही मूखातून केंव्हाही शब्द स्फुरण पावू शकत नाहीत तो गोविंद. केनोपनिषद म्हणते ' सर्व प्राणीमात्रातील[1] चैतन्य तो स्वतःच असल्यामुळे वेदांनी वर्णिलेले, उदघोषित केलेले सत्य म्हणजेच सर्वोकृष्ट वाणी केवळ त्याच्याच मुळे अस्तित्वात आली आहे. (४) त्या वेद वाणीचा उद्‌गाता तोच आहे. व वेदांचा मुख्य विषयही परमात्मा 'श्रीविष्णु' आहे.
(१८८) गोविंदांपतिः :  - मंत्रद्रष्टे ऋषी अगर प्रज्ञावान (गोवित्) महात्म्यांचा स्वामी. गो म्हणजे वेद व ते जाणणारा तो गोविद् किवा वेदविद्. वेदांनी उदघोषीत केलेले अंतिम सत्य ज्यांनी स्वतःच्या अंतःकरणांत आत्मस्वरूपाने अनुभविले आहे, ( साक्षात्कार केला आहे) ते गोवित्- वेदविद्. त्यांना द्रष्टेऋषी म्हटले जाते. अशा प्रज्ञावान द्रष्ट्या ऋषींचा परमात्मा श्रीविष्णु हाच स्वामी अगर पति आहे.

डॉ. सौ. उषा गुणे


[1]   यत् वाचा नाभ्युदितं येन वागभ्युद्यते । तदेवब्रह्म त्वं विद्धि नेदं यदिदमुपासते ॥ केन उप. १.४

13 March, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक १९

महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः 
अनिर्देश्यवपुः श्रीमानमेयात्मा महाद्रिधृक्  ।।
(१७३) महाबुद्धि :  - आधीच्या संज्ञेमध्ये परमेश्वर सर्वसमर्थ आहे असे सांगितले आहे. या संज्ञेमध्ये तो सर्वज्ञ आहे असे सुचविले आहे. ज्यावेळी ते परमतत्व मनुष्याच्या बुद्धिच्या माध्यमातून काम करते त्यावेळी त्याला बुद्धिमत्ता म्हणतात. या बुद्धिमत्तेची सखोलता आणि प्रत ज्या बुद्धिच्या माध्यमातून ते परमतत्व प्रकट होते त्या बुद्धिच्या अवस्थेवर अवलंबून आहे. गणितज्ञाची बुद्धिमत्ता, कवी अगर कलाकाराची बुद्धिमत्ता, शास्रज्ञ अगर राजकारणी व्यक्तीची बुद्धिमत्ता हे सर्व वेगवेगळे प्रकट झालेले बुद्धिमत्तेचे प्रकार त्या एका सर्वज्ञ बुद्धिमत्तेपासून आपले सामर्थ्य मिळवतात. श्रीमहाविष्णु हा सर्व बुद्धिमत्तेचा संग्रह म्हणजेच 'महाबुद्धि' आहे असे म्हटले आहे.
(१७४) महावीर्यः :  - सर्वश्रेष्ठ सारभूत तत्व. सर्व सृजनाचे सामर्थ्य म्हणजेच 'वीर्य' व त्याचे उगमस्थान आहे स्वतःच परमेश्वर कारण सर्व सृष्टिच्या सृजनाची प्रक्रिया त्याचे पासूनच सुरू होते, म्हणूनच त्या दैवी शक्तीला म्हटले आहे 'महावीर्य'.
(१७५) महाशक्तिः :  - 'सर्व शक्तिमान ' ह्या ठिकाणी शक्तिचा अर्थ सामर्थ्य असा आहे. जो परमात्मा क्रियाशक्ति, कामशक्ति व ज्ञानशक्ति ह्या तीन शक्तिंमधून प्रकट होतो त्या त्याच्या शक्तिही अत्यंत सामर्थ्यवान आहेत व त्या शक्तिंची केवळ एक क्रीडा म्हणजेच हा संपूर्ण सृष्टिव्यापार होय.
(१७६) महाद्युतिः :  - जो तेजःपुंज प्रकाशस्वरूप आहे असा. द्युति म्हणजे प्रकाश किवा शोभा. पूर्ण परब्रह्म हे सर्व प्रकाशक आहे. या सृष्टिला प्रकाशमान करणारे सूर्य, चंद्र, तारे अग्नि इत्यादि प्रकाशकही त्याच्याचमुळे प्रकाशमान होतात. इतकेच नव्हे तर तो स्वतःच एक तेजःपुंज स्वयंप्रकाश आहे व तोच आत्मस्वरूप महाविष्णु होय. मांडुक्य उपनिषदांत तो 'प्रकाशाचाही प्रकाश आहे ' असे वर्णन आलेले आहे. (४-९). तर बृहदारण्यकोपनिषदांत (६-३-९) ' तो स्वयंप्रकाशी आहे ' असे म्हटले आहे.
(१७७) अनिर्देश्यवपुः :  - ज्याच्या आकाराची (वपु) व्याख्या करता येत नांही, त्याचे वर्णन करता येत नाही, अगर विवेचन करतां येत नाही असा श्री महाविष्णु अनिर्देश्यवपु होय. सर्व सामान्य वस्तूंची आपल्याला व्याख्या करता येते, तिचे आपण वर्णन करूं शकतो अगर विवेचनही (निर्देश्य) करू शकतो कारण आपल्याला तिचा अनुभव येत असतो. आपण वस्तूंचे अनुभवजन्य ज्ञान शब्दामध्ये वर्णन करून सांगू शकतो. परंतु श्री महाविष्णु हे महत् तत्व आपल्या प्रत्येकामधील सारभूत असे आत्मतत्वच आहे. ते एक असे ज्ञान आहे ज्याच्या प्रकाशांत इतर ज्ञाने आत्मसात करता येतात. खरे पहाता कुठलेही ज्ञान 'प्रमाण' (प्रत्यक्षप्रमाण अगर अनुमान इत्यादि) उपयोगात आणून आत्मतत्वाचा शोध घेणे शक्य नाही. श्रीमहाविष्णूच्या ’अस्ति’ स्वरूपाची व्यक्तिगत अनुभूती होणे शक्य आहे. परंतु ती इतरांना सांगता येईल अशी ’कल्पना’ होऊ शकत नाही. अगर अनुभवता येईल अशी भावनाही होऊ शकत नाही किवा वर्णन करतां येईल अशी ती वस्तूही असू शकत नाही.
(१७८) श्रीमान् :  - श्री म्हणजे ऐश्वर्य. महाविष्णु नित्यशः माता लक्ष्मीशी संलग्न असल्यानें सर्व ऐश्वर्य त्याचे सेवेत तत्पर असते म्हणूनच तो 'श्रीमान्' आहे.
(१७९) अमेयात्मा :  - जे आत्मतत्व अमर्याद व प्रमाणांनी मोजता येण्यासारखे नाही ते (अमेय) तत्व श्री महाविष्णु होय. तो आत्मा क्षेत्रज्ञ स्वरूपात असल्यानें व क्षेत्राच्या प्रत्येक अणूरेणू मधून क्रीयाशील असल्यानें सर्व साधनांचा तोच ज्ञाता आहे. जीव रूपाने निर्माण झालेली ही असंख्य क्षेत्रे आहेत व त्यांची साधनेही असंख्य आहेत. त्या सर्वांमधून त्याचे अपरिमीत ऐश्वर्य व शक्ती सतत व्यक्त रूपाला येत असते.
(१८०) महाद्रिधृक् :  - जो विशाल पर्वतांना आधार देतो तो. पुराणांमध्ये दोन ठिकाणी अशातर्‍हेचे वर्णन आले आहे, जेथे त्याने पर्वतांनां उचलून धरले आहे किवा आधार दिला आहे. मंदार पर्वताच्या सहाय्यानें देव दानव क्षीरसमुद्राचे मंथन करीत असतां मंदार पर्वताची रवी खाली खाली जावून समुद्राच्या तळाशी गेली. त्यावेळी परमेश्वरानें प्रचंड कासवाचे रूप धारण करून मंदार पर्वत पाठीवर ऊचलुन धरला, देव दानवांनी मंथन पुन्हा सुरू केले व शेवटी अमृताची प्राप्ती करून घेतली.
     तसेच कृष्णावतारांत सामर्थ्यशाली गोपालकृष्णानें गाईचे रक्षण करण्याकरतां गोवर्धन पर्वत उचलून धरला होता. पुराणातील वरील दोन्ही कथांवरून असे दिसून येते की साधनेमध्ये साधकाच्या मनाला आधार देणारा परमात्मा 'महाद्रिधृक' आहे. अमृतत्वाचा अनुभव घेण्याकरतां साधक जेव्हा आपल्या दुग्ध सदृश पवित्र व भक्ति युक्त अंतःकरणाचे श्रवण मनन इत्यादीचे सहाय्यानें मंथन करत असतो तेंव्हा स्वतः श्रीविष्णु आपल्या दिव्यत्वानें साधकाच्या मन बुद्धि रूपी रवीला आधार देतात.

डॉ. सौ. उषा गुणे