Thursday, May 7, 2009

बद्ध - मुक्त लक्षणे - (२) (भागवत स्कंध ११ अध्याय ११)

बद्ध - मुक्त लक्षणे - (२)
(भागवत स्कंध ११ अध्याय ११)

"भगवंता ! एखाद्या मनुष्याकडे पाहून हा बद्ध, हा मुक्त हे कसे बरे जाणावे ? जसे एखाद्याकडे बघितल्यावर हा जपानी दिसतोय, हा आफ्रिकेतला असावा, हा तर नक्कीच ऑस्ट्रेलियन असणार हे ओळखता येते तसे मुक्ताला ओळखता येईल का ? बद्ध व मुक्त यांतील वैलक्षणे कोणती ?" सांगतो, ऐक. एकाच शरीरात आत्मा तर असतोच पण "मी" ची उपाधी लावून घेतलेला जीवात्माही तिथेच वास करतो. एका झाडावर दोन पक्षी बसावेत त्यासमान एका शरीरात या दोघांचे वास्तव्य असते. एक चिदानंदस्वरूपी एकधर्मिणि आहे. त्याचा एकच धर्म आहे. कारण त्याच्या विश्वात 'अन्य' नाहीच. त्याच्या विश्वातील सर्वकाही त्याच्या अधीन असते. अर्थात् त्याचा तोच 'नियंता' असतो. . पण दुसरा आपल्याला वेगळा मानत असतो. आपण बद्ध आहोत. आपले सर्व व्यवहार कोणा अज्ञात पराशक्तिच्या नियंत्रणेनुसार घडतात आणि म्हणून आपल्याला 'नियम्य' मानत असतो. असे एकाच शरीरात ज्ञानस्वरूप, कर्मफलभोगरहित, ज्ञानानंदाच्या शक्तिने पुष्ट असा नित्यमुक्त परमात्मा असतो आणि कर्मफलरूप सुख-दुःख भोगणारा नित्यबद्ध जीवात्माही असतो. आता परमात्मा अहंकार (देहाभिमान) धारण करीत नसल्यामुळे, इंद्रिय-विषय विकारांनी रहित असल्यामुळे अविकृत राहतो. त्याचे ठिकाणी कर्म, कर्माचा कर्ता, कर्मफलाचा भोक्ता या सगळ्यांचा अभाव असतो. पण नियम्य जीव नियंता परमात्म्याच्या अधीन असल्यामुळे देहांत राहून सर्व कर्मांचा 'मी कर्ता' असा अभिमान धारण करीत असल्यामुळे मी कृश, मी लठ्ठ, मी सुखी, मी दुःखी इत्यादि विकारांनी लिप्त राहतो.

भगवंताला उद्धवाच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह दिसले. 'मग जीवात्म्याने बद्धच राहायचे का ? हा देह-अभिमान जाणार कसा ? आणि एकाच शरीरात हे दोघे राहात असून एक नित्यमुक्त, सदा आनंदी आणि दुसरा नित्यबद्ध, दुःखाने पीडित; असे कां ?

भगवान म्हणतात - दुःखरहित नित्य आनंदाचा अनुभव घेत असणारा सर्वज्ञ, सच्चिदानंद, सर्वव्यापी श्रीहरि शरीरात राहूनही त्याला शरीराभिमान नसल्यामुळे 'मी या शरीरात राहणारा' असे म्हणवीत नाही. त्याकरिता त्याला देहगत दुःख (वा सुखही) नाही. जसे स्वप्नातून उठलेला जागृतपणी दुःखादिकांचा अनुभव घेत नसतो कारण तो स्वप्नजगतातील दृष्यांशी संलग्न (identified) झालेला नसतो, तद्‍वत्. पण जीव शरीराशी बांधल्या गेल्यासारखा देहाशी तादात्म्य पावून देहाभिमानी झाल्याने स्वप्नातल्याप्रमाणे सुखी दुःखी होतो. मग उपाय काय ? शरीरात राहूनही देहाभिमानापासून विरक्त होणे. मग शरीराने भले झोपी जावो, उठून बसो, दृष्य पाहो, अन्नसेवन करो - हे सर्व गुणप्रभावित इंद्रियांकडून घडते - त्याच्याशी संग कशासाठी ? वायु जसे सर्वत्र गमन करीत असता सुगंध-दुर्गंधापासून असंग, अलिप्त राहतो तसे देह, विषय यांपासून अलिप्त राहण्याचा - वैराग्याचा, त्यागवृत्तिचा अभ्यास करावा. वैराग्याने मन अविचल झाले की सर्व शंका पार झाल्याच - 'न व्यतिक्रियते बुधः'. मग कोणी निंदा करो वा कोणी पूजा करो - हे सर्व व्यवहार देहाचे, शरीराचे. माझे त्याच्याशी तादात्म्य नसल्यामुळे 'माझे' नव्हेत. मग कुठे झाले सुख आणि कुठे राहिले दुःख. वैराग्य दृढ झाले की अविद्येचे आवरण जाणारच. मग असा जीव काय करतो ? 'विचरेत् जडवन् मुनि’ मुनि आहे खरा पण कधी कधी इतर संसारी लोकांच्या दृष्टीत तो एक एक विकारशून्य, संस्कारशून्य, परिणामशून्य जड मूढ व्यक्ति. उदाहरणासाठी पहावे 'जडभरत - (भागवत. स्कंध ५, अध्याय ९)

Tuesday, May 5, 2009

बद्ध - मुक्त लक्षणे (भागवत स्कंध ११ अध्याय ११)

बद्ध - मुक्त लक्षणे
(भागवत स्कंध ११ अध्याय ११)
:
आत्मा बद्धा का मुक्त ? जीव बद्ध का मुक्त ? मनात प्रश्न उठतो तेव्हांच जाणवते की मी काही मुक्त नाही. मझ्यावर कोणा अज्ञात शक्तिचे नियंत्रण आहे. मला सदा कसले ना कसले तरी भय असतेच. या पृथ्वीतलावरील कोणाचेही नसेना का ? ईश्वराचे तरी आहेच. माझ्यावर शासन करणारा कोणीतरी आहे. सामान्यतः मनुष्याचे जीवन फारफार तर शंभर सव्वाशे वर्षाचे. पण लोकपाल, दिक्‍पालांचे एक कल्प आहे. ब्रह्मदेवाचे दोन परार्ध आहे. कितीही का असेना पण मर्यादित आहे. मर्यादा घालणारा 'कोणीतरी' आहे. 'कोणीतरी' दुसरा म्हटले की द्वैत आले. द्वैत म्हणजे भेद. भेद कोणाशी ? 'ब्रह्माशी, परमात्म्याशी, आत्म्याशी. 'यदा हि एवैष एतस्मिन् अंतरं कुरुते । अथ तस्य भयं भवति' (तैत्ति उप. २-७). मनुष्य (जीव) जेव्हां आत्म्यामध्ये थोडेसेही अंतर, छिद्र, भेददर्शन करतो - भेद करणे हेच अंतर करणे आहे - अल्पही भेद पाहतो, तेव्हां भेददर्शन करणार्‍या आत्म्यालाच भय होते. भय असल्यास कसला मुक्त ? बद्धच तो. म्हणून तर दैवी संपत्तीत (गीता अध्याय १६) 'अभयं' पहिल्या क्रमांकावर आहे.


हा विचार करून उद्धव [भागवत स्कंध ११] दहाव्या अध्यायाच्या शेवटी भगवंताला म्हणतो - "आपण म्हणता एकच आत्मा गुणांचा संबंध आला असता नित्यबद्ध होतो आणि मोक्ष नित्य असल्यामुळे (पारतंत्र्यरहित) तो नित्यमुक्तही असतो. मला हे जरा गोंधळात टाकणारे वाटतो. जरा मला स्पष्ट स्पष्ट समजेल असे सांग पाहू." भगवंताच्या नित्य सहवासातले अर्जुन व उद्धव यांसारख्या श्रेष्ठ भक्तांनाही भगवंत जे सांगतात ते व्यामिश्रेणेव वाटते, तर अध्यात्म्यात 'पडलेल्या' आमच्यासारख्यांना संतमहात्मे जे सांगतात ते कसे समजावे ?

साधन करीत असताना जसजशी दोन-चार पावले योग्य दिशेने पडतात तेव्हां साधकाला वाटते - This world is a big chaos - हा संसार एक प्रचंड मोठा गडबडगुंडा आहे - असाच प्रत्यय यायला लागतो. साधकाला अपेक्षित असते ते watertight division. एक तर मी मुक्त तरी आहे वा बद्ध तरी आहे. भगवंत व संत तेच सांगतात. 'तू मुक्तच आहेस. पण तू आपल्याला गुणांच्या (मायेच्या) प्रभावामुळे मर्यदित (conditioned) करून घेतले आहेस. गुणांच्या प्रभावाखाली असलेल्या इंद्रियांचे मर्यादित्व (limitation) तू मानतोस. मग त्यापलीकडील तुला काही दिसत नाही, जाणवत नाही, उमजत नाही. थोडक्यात मुक्त आहेसच, पण मायेच्या आवरणामुळे (conditioned by trigunas) बद्धही आहेस."

भगवान् पुढे म्हणतात - उद्धवा ! जेव्हां कोणामध्ये सात्त्विकतेचे विपुल दर्शन व्हायला लागते. त्याच्या शांत चित्तामुळे त्याच्या सत्त्वगुणाची उन्नत अवस्था होऊन त्याच्या आचरणात गुणांचा अभाव दिसायला लागतो, तेव्हां इतर लोक म्हणतात, "तो मुक्त आहे". अर्थात् असे म्हणणारे स्वतः रजोगुण, तमोगुणाच्या प्रभावाखाली असून सदा सुख-दुःख अनुभवीत असतात म्हणून ते बद्ध होत.

"बद्धोमुक्त इति व्याख्या गुणतो मे न वस्तु्तः" - पण एक लक्षात घे. बद्ध, मुक्त यांची व्याख्या मीच केली आहे. खरे सांगायचे तर कोणी बद्धही नाही वा कोणी मुक्तही नाही. गुणांच्या संगाने बद्ध वा मुक्त म्हटले जाते. आणि गुण तर मायेचे आहेत. म्हणून 'न मे मोक्षो न बंधनम्' - माझ्या (परमात्म्याच्या) स्वरूपभूत जो जीवात्मा आहे त्याला न बंधन आहे, ना तो मुक्त आहे. देहाशी तादात्म्य पावून देहाभिमानी ('मी' चा प्रादुर्भाव) उत्पन्न झाल्यास मायेचे अविद्यारूपी आवरण पडते आणि लगेच सुख, दुःख, मोह, शोक इत्यादि संसार सुरू होतो. थोडक्यात संसृतिचा परिणाम अविद्या आणि त्यामुळे संसार. पण मुळात ही संसृतिच (माया) वास्तविक आहे का ? ती केवळ आभासमय आहे. जसे स्वप्न व त्यात दिसणारे सर्व दृष्यजगत् बुद्धिमुळे भासमान होते. ते काय खरे असते का? म्हणजे विद्या अविद्या दोन्हीही खर्‍या नव्हेत. मानलेल्या. तसेच जीव (देहाभिमानी) मी बद्ध, मी मुक्त 'मानतो' अवढेच. हा जीव अविद्येमुळे बद्ध 'मानून' त्याच्या प्रभावाखाली असेपर्यंत "मी" चे अस्तित्व वेगळे मानतो. पण ज्ञानप्राप्तीनंतर "मी" जेव्हां आत्म्यापासून अविभाज्य होतो, म्हणजेच विद्येची प्राप्ति होते, तेव्हां तोच "मी" आपल्याला मुक्त मानतो.
(क्रमशः)

Wednesday, February 25, 2009

मानसमणिमाला (२१)

मानसमणिमाला (२१)

हिंदी : निज बुधि बल भरोस मोहि नाही ।

तातें बिनय कर‍उँ सब पाहीं ॥ बा. कां. २.७.४

करन चह‍उँ रघुपति गुण गाहा ।

लघु मति मोरे चरित अवगाहा ॥ ५ ॥

सूझ न एक‍उ अंग उपा‍ऊ ।

मन मतिं रंक मनोरथ राऊ ॥ ६ ॥

मति अति नीच उँचि रुचि आछी ।

चहि‍अ अमि‍अ जग उर‍इ न छाछी ॥ ७ ॥

मराठी : मज निज मतिबल-निश्चित नाहीं ।

म्हणून विनवितो सर्वांनाही ॥ ४ ॥

मज इच्छा रघुपति-गुण-गानी ।

चरित अगाध नि मम मति सानी ॥ ५ ॥

नुमजें अंगां एक उपाया ।

मन मति रंक मनोरथ राया ॥ ६ ॥

मति अति नीच उच्च रुचि रुचिरहि ।

अमृत इच्छि जगिं मिळत तक्र नहिं ॥ ७ ॥


अर्थ : मला माझ्या बुद्धीचा व बलाचा जराही भरवसा वाटत नाही. म्हणून मी सर्वांना विनंती करत आहे ॥ ४ ॥ रघुपतींच्या चरित्राचे, गुणांचे वर्णन करावे अशी माझी फार इच्छा आहे खरी, पण त्यांचे चरित्र किती अगाध आहे आणि माझी बुद्धि किती तोकडी आहे ॥ ५ ॥ उत्कृष्ट काव्याची अंगे, त्याच्या पद्धती यातील कांहीच मला माहीत नाही. माझी बुद्धि अगदी निकृष्ट आहे, मन कंगाल आहे पण माझे मनोरथ मात्र राजाचे आहेत बरं ! ॥ ६ ॥ मी अल्प बुद्धीचा असलो तरी माझी रुचि मात्र उच्च प्रतीची आहे. प्रत्यक्षांत जगात मला कुणी ताकही द्यायला तयार नाही पण, महत्वाकांक्षा मात्र अमृत प्राप्त करून घ्यायची आहे ॥ ७ ॥


संत तुलसीदास आपल्या ग्रंथाचा आरंभ करीत आहेत. प्रभु रामचंद्रांचे गुणगान करण्याची मनीषा ते व्यक्त करीत आहेत. अत्यंत विनम्रभावाने या कार्याकरितां आपले, बुद्धि, बल अगदीच अपुरे आहे अशी ते कबूली देतात. हा त्यांचा विनय असला तरी प्रभूंचे चरित्र अगाध, अपार आहे यांत काहीच शंका नाही. त्यामुळे आपल्याला सर्वांनी सांभाळून घ्यावे अशी ते वारंवार विनंती करतात. मुळात भगवंताच्या चरित्राचे गान करायचे हा आपला विचारच इतका राजस, उच्च प्रतीचा आहे कीं आपली बुद्धि तुटपुंजी असली तरी चालेल, मन सद्‌विचारांच्या बाबतीत अगदी दरिद्री असले तरी चालेल, आणि लौकिकात आपल्याला ताकासारखी क्षुद्र वस्तू मिळविण्याची पात्रता नसली तरी चालेल पण आपली रुचि प्रभूंचे गुणगान करणारी, उच्च प्रतीची आहे म्हणून तिला अमृतप्राप्ति होणारच असा त्यांचा ठाम विश्वास आहे. ज्ञानेश्वर माऊली भावार्थ दीपिकेंत म्हणतात -

शब्द कैसा घडिजे । प्रमेयीं कैसें पां चढिजें ।

अळंकारु म्हणिजे । काय तें नेणें ॥ १८.१७६८ ॥

सायिखडेयाचें बाहुलें । चालवित्या सूत्राचेनि चाले ।

तैसा मातें दावीत बोले । स्वामी तो माझा ॥ १७६९ ॥


आपल्या स्वामींवर पूर्ण श्रद्धा असल्याने ते सर्व तर्‍हेने सांभाळून घेतात याचा भरंवसा सर्वच संतांना असतो. त्यामुळेच त्यांच्या हातून उत्तुंग कार्ये घडतात. भगवंताच्या कृपेने "जरी प्रकटे सिद्धसरस्वती । तरी मुकेयाहि आथी भारती । एथ वस्तुसामर्थ्यशक्ति । नवल कायी ॥ १.७८ ॥ स्वतःला अल्पमति म्हणविणे, मुका बाहुला म्हणविणे हा त्यांचा विनम्र भाव असला तरी 'वस्तु सामर्थ्य शक्ति' त्यांच्यातूनच व्यक्त होते नां ?

डॉ. सौ. उषा गुणे.

Friday, February 20, 2009

या देवी सर्वभूतेषु

या देवी सर्वभूतेषु

:

प्राणीमात्राच्या जीवनाची एकंदर जडण घडण श्रद्धेतूनच होत असते. प्रत्यक्ष हे एक श्रद्धेचे महत्त्वाचे प्रमाण आहे. आपण प्रत्यक्ष पाहिलेल्यावर मनुष्यमात्राची सहजच श्रद्धा बसते. त्याच प्रमाणे शब्द प्रमाणाचे. आप्त वाक्यातून पण श्रद्धेचा उगम होत असतो. येथे आप्त म्हणजे नातेवाईक सोयरे धायरे असा अर्थ अभिप्रेत नाही. तर आप्त म्हणजे, संत, साधु, श्रीसद्‌गुरू, अध्यात्मग्रंथ इत्यादि. ज्यांना आपण ज्येष्ठ श्रेष्ठ पूज्य मानतो. त्यांच्या शब्दावर आपला सहजच मोठा विश्वास बसतो. त्यांचे शब्द आपल्याला सत्य वाटतात. वेदतुल्य वाटतात.


श्रद्धाकेंद्रे अनेक असतात. व्यक्ति व्यक्ति समाज राष्ट्र यांच्या स्तरावर भौतिक जीवनांत ती भिन्न भिन्न सगळ्यांचे ध्येय एकच. ते म्हणजे आत्मज्ञान, आत्मसाक्षात्कार, आत्मानुभव. आणि ते ध्येय गांठण्याचा निश्चित मार्गही पण एकच. तो म्हणजे नामसाधन. नामस्मरण. या साधनाची प्रक्रिया पण सामान्यतः एकच आहे. म्हणून अध्यात्म जीवनांत श्रद्धेचे स्थान एकच. आपले श्रीगुरू.


या क्षेत्रांतील महाजनांमध्ये श्रीसद्‌गुरूचे स्थान श्रेष्ठतम. त्यानंतर क्रमांक म्हणजे सगळे आत्मसाक्षात्कारी संत.


संत सद्‌गुरु भेटणं कठीण. महाकठीण. "पूर्व जन्मी सुकृते थोर केवी । ती मज आजि फळासी आली ॥" असे खुद्द श्रीगुरूज्ञानेश्वरमहाराज म्हणतात, मग आपला काय पाड नां ? बरं भेटले तर त्यांच्यावर श्रद्धा बसणे आणखी कठीण. एवढ्यानीही झालं नाही. श्रद्धा बसली आपली, तरी त्यांची कृपा होणे कठीण. श्रीगुरुंची कृपा म्हणजे त्यांच्याकडून सबीज नाम मिळणे त्याहून कठीणच. श्रीगुरूंची कृपा म्हणजे त्यांच्याकडून नाम मिळणे. पण आपल्या संपर्कात, सान्निध्यात, आपल्याजवळ देणार्‍या जीवींचा भक्तिप्रेमभाव, श्रद्धा, त्याचे अंतःकरण ते जाणतात. आणि मगच त्याच्यावर कृपानुग्रह करतात. आता अशा कसोटीला उतरून नाम जरी मिळाले तरी, सुरुवातीची श्रद्धा, पुढे शेवटपर्यंत टिकवणे हे पण अति महत्त्वाचे. अत्यंत प्रयासाने, कष्टाने, त्याआड येणार्‍या सर्व गोष्टी निर्भयपणे बाजूस सारून ती श्रद्धा जोपासावी लागते, टिकवावी लागते.


श्रीगुरुंवरील अर्थात निवृतिमार्गावरील श्रद्धेला प्रवृत्ति मार्गातील अनेक धोके असतात. अध्यात्ममार्गातील या श्रद्धेचा मुख्य शत्रु म्हणजे देहभाव. देह भावांतच सुख वाटले तर श्रद्धा तेथेंच विसंबते. कारण जेथें सुख तेथें श्रद्धा हा सामान नियम. आपले सुख, पैसा, लौकिक, व्यवहार इत्यादि ठिकाणी विभागलेले. हे प्रवृत्तितील सुख सहज अनुभवता येते. थोड्या श्रमाने, प्रयत्‍नाने सहज हाती येते (आले असे वाटते) त्यामुळे अध्यात्माकडील श्रद्धा कमी पडते.


श्रद्धा हा मनाचा स्थायीभाव आहे. श्रद्धा ही भावनामय असते. देहभावाला चिकटलेल्या मनाच्या कल्पना श्रीगुरुवरील श्रद्धेच्या आड येतात. त्यासाठी देहभावातून हळूहळू आत्मभावाकडे पाऊले टाकणें फार आवश्यक.


मनाची संकल्पशक्ति आणि बुद्धीची भावनाशक्ति यांचा सुंदर समन्वय साधला की मग श्रद्धा वाटते, ती सूक्ष्म पण बळकट होते. सगळ्या शंकासुरांना तोंड देऊन त्यांचे निर्दळण करते मग ही श्रद्धास्वरूपी महालक्ष्मी - महाकाली - महासरस्वति. "या देवी सर्वभूतेषु श्रद्धा रूपेण संस्थिता । नमस्तस्मै नमस्तस्मै नमस्तस्मै नमो नमः" ॥" मग परमपदाचे, भगवद्‌साक्षात्काराचे ध्येय श्रद्धा आणि नामसाधना यांतून साकार होतेच होते. म्हणून सद्‌गुरूंवर नितांत श्रद्धा ठेवून त्यांनी दिलेल्या सबीजनामाचे नित्य, अखंड स्मरण असावे.


अण्णा -

Wednesday, February 18, 2009

मानसमणिमाला (२०)

मानसमणिमाला (२०)

:

हिंदी : जड चेतन जग जीव जत सकल राममय जानि ।

बंद‍उँ सबके पद कमल सदा जोरि जुग पानि ॥ बा. कां. १.७(ग)

देव दनुज नर नाग खग रेत पितर गंधर्व ।

बंद‍उँ किंनर रजनिचर कृपा करहु अब सर्व ॥ (घ)

मराठी : जगिं जड चेतन जीव सव राममयचि जाणून ।

सर्व-पदाब्जां वंदितो सदा करां जोडून ॥ प्रज्ञा. बा. कां. १.७(ग)

देव दनुज नर नाग खग प्रेत पितर गंधर्व ।

नमतो निशिचर-किंनरां कृपा करा तरि सर्व ॥ (घ)

अर्थ : या जगांत असलेले सर्व जड-चेतन जीव राममयच आहेत, असे समजून मी सर्वांच्या पदकमलांना सदा हात जोडून वंदन करतो ॥ ग ॥ देव, दानव, नाग, पक्षी, प्रेत, पितर, गंधर्व, किंनर, निशाचर या सर्वांना मी आता नमन करतो. तरी सर्वांनी माझ्यवर आता कृपा करावी. ॥ घ ॥


संत तुलसीदासांचा सर्वांभूती भगवत्‌ भाव अवर्णनीय आहे. सगुणोपासक असूनही त्यांची भक्ति मर्यादित, संकुचित भावनेत अडकलेली नाही. पृथ्वीवरील सर्व जड चेतन जीवांमध्ये त्यांना प्रभू रामचंद्रांचे दर्शन नित्य होतच होते व त्यामुळे ते सर्वांचे ठिकाणी विनम्र भावनेने वंदन करतात. याखेरीज देव, दानव, प्रेत, पितर, गंधर्व, किंनर इत्यादि अदृष्य, अमानवी योनीतील जीवांनाही नमन करतात, तेही भगवान राम समजून ! इतके विशाल अंतःकरण व सर्वांविषयी भगवत्‌ भावना स्वतः रामस्वरूप - प्रेमस्वरूप झाल्याखेरीज कशी होईल ?


माऊली ज्ञानेश्वर विभूतियोगांत भगवंताच्याच मुखाने बोलतात - "जे जे भेटे भूत । ते ते मानिजे भगवंत । हा भक्तियोगु निश्चित । जाण माझा ॥" (ज्ञानेश्वरी १०.११८) आणि ही भगवंताची आज्ञा शिरोधार्थ मानून सर्व भूतमात्रांचे ठिकाणी गोस्वामी विनम्र भाव प्रकट करतात; त्याच बोधामध्ये निमग्न होतात.


' चित्ते मीचि जाहले । मियांचि प्राणि धाले । जीवों मरों विसरले । बोधाचिया भुलिं ॥ (ज्ञा. १०.११९) त्यामुळे पुढच्या चौपायीमध्यें द्विरुक्तिचे भय न बाळगतां ते पुन्हा पुन्हा हात जोडून वंदन करतात व कृपायाचना करतात -

सीयराममय सब जग जानी । कर‍उँ प्रनाम जोरि जुग पानी ॥

जानि कृपाकर किंकर मोहू । सब मिलि करहू छाडि छल छोहू ॥ बा. कां. २.७.२,३

सर्व जगच सीताराममय आहे असे जाणून मी सर्वांनाच हात जोडून प्रणाम करतो. आपण सर्व कृपाकर आहात म्हणून माझा दास म्हणून स्वीकार करावा अशी मी विनंती करतो. माझ्यातील छल-कपट (ढोंगीपणा) इत्यादि दोष विसरून आपण मजवर कृपा करा. - (१.७.१,२)


धन्य ते संत तुलसीदास व धन्य त्यांचे रामभक्ति.


डॉ. सौ. उषा गुणे.

Monday, February 16, 2009

आनंदे निर्भर डुल्लतसे

आनंदे निर्भर डुल्लतसे

:

अमृताभक्तिप्रेमसुख प्राप्त झाले कीं मनुष्य अंतिम पारमार्थिक ध्येय (भगवद्‌प्राप्ती व भगवत्‌सेवाप्रेम) साध्य करतो. तो जन्ममरणाच्या फेर्‍यातून सुटतो. अमर होतो. भक्त स्वतःच अंगेकरून अमृतस्वरूप सत्वगुणाचा पुतळा बनतो आणि तो तृप्त, शांत, कृतार्थ होतो.


भक्तिप्रेमसुख हे नुसत्या पौरुष प्रयत्‍नाने मिळत नाही. मानवी प्रयत्‍नाने मिळवता येते त्याला भक्तिशास्त्रकार "यत्‌प्राप्य" म्हणतात. आणि ज्या गोष्टींची प्राप्ति होणे, हे मानवी प्रयत्‍नांच्या जोडीने, ईश्वराच्या कृपेवरच अवलंबून असते. त्यासाठी "यत्‌ लब्ध्वा" असा शब्दप्रयोग करतात. खरे तर त्या कृपाळू, दयाघन भगवंताच्या कृपेशिवाय कांहीच मिळत नाही. आत्मसाक्षात्कार, सगुण भगवंताच्या रुपांत ईश्वराचा साक्षात्कार, आणि सायुज्यता मुक्तिच्याही मस्तकावर किरीटासारखी विराजमान होणारी भक्तिप्रेमा हे केवळ ईशकृपेनेच, श्रीगुरुकृपेनेच मिळतात. "यं एव एष वृणुते तेन लभ्यः" असंच कठोपनिषदकारांचेही सांगणे आहे.


विश्वरूप अर्जुनाच्या विनंतीस अनुसरून प्रकट केले भगवंतानी. पण अर्जुन केव्हा पाहूं शकला ते ? तर अर्जुनावर कृपादृष्टि होऊन त्याला जेव्हा दिव्यचक्षू मिळाले तेव्हा ना ? अशी त्या कृपावंत भगवंताची विशेषकृपा झाल्यावांचून, मायेच्या अतीत असणार्‍या परमसत्यस्वरूप परमात्म्याचे अत्यंत निरूपाधिक स्वरूप कधीच जाणतां येत नाही; अनुभविता येत नाही. भक्ताचार्य नारद म्हणतात "भगवंताची अत्यंत उत्कट प्रेमभावाने, निष्काम भक्ति कराल तर तुमची पात्रता एवढी वाढेल कीं तो भक्तिप्रेमाच्या भुकेचा पभूच स्वतः प्रयत्‍न होऊन आपले स्वरूप दाखवतो, आणि संवित्‌ज्ञान, मुक्ति आणि मुक्तीला लाभ आणणारे परम भक्तिप्रेमसुख भरभरून देतो.


ही परम प्रेमस्वरूप भक्ति आचरण्यास, भाषाभेद, वर्णभेद, वंशभेद, जातीभेद आणि कोणतेही भेद न मानता सर्वांनाच आचरण्यास पूर्ण मुभा आहे. "या रे या रे लहान थोर । याति भलते नारी नर । करावा विचार । न लगे चिंता कोणासी॥" तुकोबारायांची ग्वाही आहे - "सकळांसि येथे आहे अधिकार ।"


असा प्रेम प्रेमस्वरूप भक्ति करणारा भक्त हा सिद्ध होतो. व्यवहारांत सिद्ध याचा अर्थ सिद्धि प्राप्त झालेला. म्हणजे तरी काय ? तर जग रहाटीवेगळा कांहीतरी चमत्कार करून दाखविता येण्याचे सामर्थ्य. मंत्र - तंत्र, जप - जाप्य, तसेच अघोरी साधना यामुळे प्राप्त होते. अशा माणसाभोंवती नेहमीच गर्दी असते, त्यची वाखाणणी प्रशंसा होते, पण अंती नरकावस्था.


भक्ति शास्त्रकारांनी सिद्ध शब्दाचा अर्थ फार सुंदर सांगितला आहे. सिद्ध होणे म्हणजे परम प्रेमरूपभक्तिने संपन्न होऊन हरिप्राप्ति साधणे. अशा भक्ताला भगवंत हेच साध्य प्राप्त झालेले असल्याने अन्य कांही साध्य उरतच नाही. आणि त्यामुळे तो तृप्त होतो. गंगा सागराला मिळाली की तिचा पुढचा प्रवासच खुंटतो ना ? अगदी तसंच भक्ताच. मग तो सगळा उर्वरीत काळ परमानंदात, भक्तिप्रेमसुख अनुभविण्यांत, भगवद्‌सेवेत घालवतो.


आता हा अनन्य भक्त पूर्ण तृप्त होतो तरी कसा ? तर अंतःकरणाचे सर्व भाव, विचार व चिंतन एका भगवंताकडे वळविल्यानंतर मन, बुद्धि, इंद्रिये यांची धावच कमी होते. आणि शेवटी हरि-साक्षात्कार झाल्यावर तर काय "परं दृष्ट्वा निवर्तते ।" मग भक्त पूर्ण शांत, तृप्त व समाधानाने सर्वांगाने अलंकृत होतो. "सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार । आनंदे निर्भर डुल्लतसे ॥" सर्व आशा आकांक्षा लय पावतात. द्वेष, मत्सर, क्रोध, दुःख अस्तंगत होतात.


असा भक्त अमृतस्वरूप होतो, म्हणजे अमृतासारखाच गोड, मधुर, सर्वांना हवा हवासा वाटणारा व सर्वजनप्रिय होतो. रज-तम गुणांचा निरास झाल्याने, शुद्ध सत्त्वगुणांचा पुतळा होतो. त्यच्या अंगकांतीद्वारे बोलण्यात चालण्यात वागण्यात विलक्षण आनंद प्रेमळपणा प्रकटतो. त्याच्या भोवतालचे वातावरण मांगल्याने भरून जाते. पराशांतीचे साम्राज्यच त्याचे रूपानें नांदत असते. अमृत म्हणजे अमर. यालाच मोक्ष, निर्वाण म्हणतात. पण हा भाग्यवान भक्त मोक्ष मिळूनही हरिनाम गाण्याकरितां, भगवद्‌सेवेसाठी, भक्तिप्रेम सुखासाठी पुनः पुनः जन्म घेण्यास भीत नाही. तर उलट प्रतिज्ञापूर्वक या प्रेमभक्ति सेवेसाठी जन्माला येतो.


अण्णा -

Sunday, February 15, 2009

मानसमणिमाला (१९)

मानसमणिमाला (१९)

हिंदी : ग्रह भेषज जल पवन पट पा‍इ कुजोग सुजोग ।

होहिं कुबस्तु सुबस्तु जग लखहिं सुलच्छन लोग ॥ बा. कां. १.७(क)

सम प्रकास तम पाख दुहुँ नाम भेद बिधि कीन्ह ।

ससि सोषक पोषक समुझि जग जस अपजस दिन्ह ॥ बा. कां. १.७(ख)

मराठी : ग्रह भेषज जल पवन पट मिळुनि कुयोग सुयोग ।

होती कुवस्तु सुवस्तु जगिं बघति सुलक्षण लोक ॥ प्रज्ञा . बा कां १.७(क)

नाम भेद विधि पक्षिं करी सम तम जरी प्रकाश ।

शशि पोषक शोषक गणुनिं दे जगिं यश-अयशास ॥ १.७.(ख)

अर्थ : ग्रह, औषध, जल, वायु, वस्त्र यांचा सुयोग्य अथवा अयोग्य उपयोग झाल्याने त्या वस्तू चांगल्या वस्तू अगर वाईट वस्तू मानल्या जातात. ॥ क. ॥ दोन्ही पंधरवडे सारख्याच प्रकाशाचे अगर अंधाराचे असतात. परंतु त्यांना शुक्लपक्ष - कृष्णपक्ष अशी नांवे दिल्यामुळे एक चंद्राची वृद्धी करणारा व दुसरा क्षय करणारा मानला जातो व म्हणूनच एक शुभ म्हणजे यश देणारा ठरतो तर दुसरा अशुभ म्हणजे अपयश देणारा ठरतो. (ख)


सूर्य, चंद्र, मंगळ शनि, गुरु इत्यादि ग्रह यांचे पृथ्वीवरील प्राणी, वस्तू यांचेवर विशिष्ट परिणाम होत असतात असे मानले जाते. औषधासारखी वस्तू खरे तर रोगनिवारकच असायला हवी. परंतु तिचा उपयोग करताना रोगी त्याचे वय, रोगाची अवस्था, काल, पथ्य अनुपान, औषधाचे शीत उष्णादि परिणाम, मात्रा या सर्व गोष्टींचा सुयोग साधावा लागतो तरच ते औषध गुणकारी होते. अन्यथा निरुपयोगी अथवा हानिकारकही ठरू शकते. परंतु हा दोष औषधाचा नसूनहि औषधालाच दोष दिला जातो. विषारी टाकावू द्रव्यांच्या, रोगजंतूंच्या संपर्कात आलेले पाणी जीवनदायी ठरण्यापेक्षा घालाघातक ठरूं शकते. तीच गोष्ट आजूबाजूच्या वातावरणाची ! आपण म्हणतो 'अमुक हवामान सोसत नाही' परंतु त्याच हवेमध्ये इतर माणसे आनंदाने राहात असतात. म्हणजे दोष हवेत नाही माझ्यामध्ये आहे, तरी हवेलाच, वातावरण, पाणी, अन्न व इतर वस्तूंना दोष देऊन मनुष्य नामानिराळा होतो !


शुभशकून अपशकूनांच्या कल्पनांनी तर माणसांची मति इतकी गुंग करून टाकली आहे कीं माणूस भितीपोटी त्यांचा स्वच्छ मनानें विचार करायलाही तयार नाही. म्हणून समर्थ म्हणतात - 'प्रचितीविण जे ज्ञान । तो अवघाचि अनुमान ॥ या कारणे मुख्य प्रत्यये । प्रचीतिविण कामा न ये । उपायासारिखा अपाये । शाहाणे जाणती ॥ दासबोध. १४.७.१९ उपाय आणि अपाय, सदुपयोग आणि दुरुपयोग, उपयोग आणि उपभोग, यांच्यामधील सीमारेषा स्वच्छ मनाने समजून घेतल्यास, त्यावर आपल्याच पूर्वग्रहांतून चांगले-वाईट, शुभ-अशुभ, पाप-पुण्य अशी लेबलें न लावतां शास्त्र प्रचीति, गुरुप्रचीति व आत्मप्रचीति घेतल्यास हे जग किती आनंदमय, सुंदर आहे याचीही प्रचीति निश्चित येईल. म्हणूनच संत तुलसीदास म्हणतात - "जग जानकीनाथ सहाय करे - कौन बिगाड करे अब तेरा ?

डॉ. सौ. उषा गुणे.