03 May, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक ३२ वा

शिवः शक्तिः कामः क्षितिरथ रविः शीतकिरणः
स्मरो हंसः शक्रस्तदनु च परामारहरयः ।
अमी हृल्लेखाभिस्तिसृभिरवसानेषु घटिता
भजन्ते वर्णास्ते तव जननि नामावयवताम् ॥ ३२॥


देवता ही मंत्रमय असल्यामुळें तंत्रशास्त्रांत मंत्रालाच प्राधान्य असतें. मागील  श्लोकांत श्रीमहात्रिपुरसुंदरी देवीच्याच आग्रहावरून लोककल्याणाकरिता शंकरांनी हें सर्व तंत्रामध्ये श्रेष्ठ असलेलें महात्रिपुरसुंदरीतंत्र अथवा श्रीविद्यातंत्र भूतलावर प्रकट केलें असें सांगितलें. आतां त्या तंत्रातील प्रधान अंग असलेल्या मंत्रालाच या श्लोकामध्ये निर्दिष्ट करीत आहेत. मंत्र हा अत्यंत गोपनीय असल्यामुळें प्रत्यक्ष अक्षरांनी मंत्राचा निर्देश न करतां तो परोक्षपद्धतीनेंच केला जात आहे. व्यवहारामध्यें देखील पुष्कळांना प्रत्यक्ष नांवानेंच केलेला व्यवहार रुचत नाहीं. दादासाहेब, बाबासाहेब असें म्हटलें म्हणजे बरे वाटते. हाच देवांचाही स्वभाव आहे. "परोक्षप्रिया इव ही वै देवाः" हें श्रुतिवचन प्रसिद्धच आहे. परोक्षपद्धतीनें व्यवहार केल्यास मुख्य नांवाची गुप्तताही राखली जाते व देवतांचाही संतोष होतो. अशा अभिप्रायानें आचार्य मोठ्या युक्ती या श्लोकांत श्रीविद्येचा निर्देश करीत आहेत.

पंचदशीविद्या, षोडशीविद्या, कादिविद्या, हादिविद्या असे श्रीविद्यामंत्राचे संप्रदायभेदानें अनेक भेद आहेत. आपआपल्या संप्रदायाप्रमाणे आपल्याला अभीष्ट असलेल्या मंत्राचा उद्धार अनेक विद्वानांनी या श्लोकांतून केलेला आहे. मंत्रातील अक्षरांची आनुपूर्वी ही प्रत्यक्ष गुरुमुखांतूनच अवगत करून घ्यावयाची असते. अधिकारी गुरूंच्या मुखांतून प्राप्त झालेल्या मंत्राक्षरांत एक प्रकारचा अनिर्वचनीय प्रभाव असतो यांत शंकाच नाहीं. भगवापूज्यपाद श्रीमान् आद्य शंकराचार्य हें आपले श्रीविद्यातंत्राचे गुरूच आहेत असें आपण समजू या. जगाचेच गुरु आहेत ते. आणि आपण तर त्यांच्याच शब्दांच्या आधारे श्रीमहात्रिपुरसुंदरीचे स्वरूप पहात आहोंत. आतां आपण आपल्या इष्टदेवतेचें मंत्रमय स्वरूप त्यांच्याच शब्दानी पाहूं.

या  श्लोकांत "शिवः शक्तिः" इत्यादि शब्दांनी श्रीविद्येतील एका एका अक्षरांचा उल्लेख केलेला आहे. हे शब्द शास्त्रीय परिभाषेनें क्वचित् साक्षात, क्वचित् लक्षणेने तर क्वचित् लक्षितलक्षणेनें मंत्रातील घटक अक्षरांचा बोध करून देतात. जशा चंद्राच्या कला सोळा आहेत त्याचप्रमाणें श्रीविद्येच्या देखील सोळा कला आहेत. याच अभिप्रायाने श्रीविद्यातंत्राला चंद्रकलाविद्यातंत्र असेंही नांव आहे. या सोळा कलांपैकी "दर्शा" नांवाची पहिली कला, तिची अधिष्ठात्री देवता त्रिपुरसुंदरीच आहे. ती कला शिवतत्त्वात्मक असल्यामुळें प्रकृत स्थळी शिव शब्दाचा अर्थ ती "दर्शा" नांवाची कला असा करतात. दर्शाकलेचें प्रकृतिभूत अक्षर क आहे म्हणून श्लोकांतील शिव शब्दाने क हेंच अक्षर समजावे. त्याचप्रमाणे शक्ति हा शब्द "दृष्टा" नांवाच्या दुसऱ्या कलेचा वाचक आहे. दृष्टाकला ही शक्तितत्त्वात्मक असल्यामुळें शक्तितत्त्वाचे प्रकृतिभूत अक्षर ए आहे. तेंच श्रीविद्यामंत्रातील दुसरें अक्षर होय. काम शब्द हा "दर्शता" नांवाच्या तिसऱ्या कलेचा वाचक आहे. या तिसऱ्या कलेची देवता कामच आहे. दर्शताकलेचें बीजभूत अक्षर ई असल्यामुळें तेंच या मंत्रातील तिसरे अक्षर होय. क्षिति शब्दाचा अर्थ पृथ्वी असा आहे. पृथ्वीतत्त्वाचें बीज ल हें प्रसिद्धच आहे. तेंच प्रस्तुत मंत्रातील चौथें अक्षर होय. अथ शब्द हा मागील चार अक्षरांचा एक खंड पूर्ण झाल्याचे सुचवीत आहे. प्रत्येक खंडाच्या शेवटी ह्रीं बीज असतेंच. ह्रीं बीजासह चार अक्षरांच्या या खंडाला अग्रिखंड असें म्हणतात. या खंडांत ह्रीं या बीजासह पांच अक्षरें होतात. या पांच अक्षरांच्या समूहाला वाग्भवकूट असें म्हणतात.

श्लोकांतील अथ शब्दानंतर दुसऱ्या खंडाला आरंभ होतो. दुसऱ्या खंडातील पहिला शब्द रवि आहे. दुसरें खंड सूर्यतत्त्वाचें आहे. याला सूर्यखंड असेंच म्हणतात. ज्याप्रमाणें श्रीचक्र हें "सोमसूर्यानलात्मकं" या वचनाप्रमाणें त्रिखंड म्हणजे सोम, सूर्य आणि अग्नि या तीन तत्त्वांचे आहे. त्याचप्रमाणें श्रीमंत्र देखील त्रिखंड अर्थात् अग्नि, सूर्य आणि सोम या तीन तत्त्वांचा आहे. रवि शब्दाने सूचित होणारें सूर्यतत्त्वाचे 'ह' हें अक्षर या मंत्रातील सहावें अक्षर होय "शीतकिरण" या शब्दाचा अर्थ चंद्र असा आहे. "सकारश्चन्द्रबीजं" असा शास्त्रसंकेत आहे. या संकेताप्रमाणें शीतकिरण या शब्दाचा अर्थ स हें अक्षर समजावे. सकार हा या मंत्रातील सातवे अक्षर होय. स्मर म्हणजे कामदेव. कामराजाचे प्रकृतिभूत अक्षर क आहे. तेंच या मंत्रातील आठवे अक्षर होय. "हंस" म्हणजे सूर्य. तो ह या अक्षराचा अधिपति आहे. म्हणून लोकातील हंस शब्दाने हकार समजावा. हकार हा या मंत्रातील नववें अक्षर होय. त्याचप्रमाणे शक म्हणजे इंद्र. " लकार इन्द्रबीज " या शास्त्रीय संकेताप्रमाणे शक्र शब्दाचा अर्थ ल असा झाला. लकार हा श्रीमंत्रांतील दहावे अक्षर होय. याला पहिल्या खंडाप्रमाणें ह्रीं हें बीजाक्षर जोडले म्हणजे दुसरा खंड पूर्ण होतो. दुसऱ्या खंडांत सहा अक्षरे आहेत. या दुसऱ्या खंडाला कामराजकूट असें म्हणतात.

"तदतु च" म्हणजे आणि त्यानंतर. "परा-मार-हरयः" परा शब्दाचा अर्थ या ठिकाणी चंद्रकला असा आहे. चंद्राचे बीजभूत अक्षर सकार आहे. स हें अक्षर आपल्या उपास्यदेवतेच्या पंचदशाक्षरी मंत्रातील बारावें अक्षर होय. याचप्रमाणे "मार" म्हणजे कामदेव. तो सर्वांना मारतो अथवा त्याच्यापायी सर्व मरतात म्हणून त्याला 'मार' असे नांव दिलेले आहे. कामराजाचे प्रकृतिभूत अक्षर क आहे. तें या मंत्रातील तेरावें अक्षर होय. तसेंच हरि या शब्दाचा अर्थ इंद्र असा आहे. इंद्राचें बीजभूत अक्षर ल आहे. तेंच आपल्या या मंत्रातील १४ चौदावे अक्षर होय. त्याच्या पुढें ह्रीं हें बीज जोडले म्हणजे मंत्राचा तिसरा खंड पूर्ण होतो. या खंडाला सोमखंड अथवा चंद्रखंड असें म्हणतात. या तिसर्‍या खंडाला शक्तिकूट असेंही म्हणतात. शेवटच्या ह्रीं या बीजासह एकंदर पंधरा अक्षरें होतात. "अवसानेषु तिसृभिः हृल्लेखाभिः घटिताः ते अमी वर्णाः हे जननि तव नामावयवतां भजन्ते" वर सांगितल्याप्रमाणें पहिल्या खंडांत चार अक्षरे व शेवटीं ह्रीं हें बीज आहे. दुसऱ्या खंडांत पांच अक्षरे व शेवटीं ह्रीं हें बीज आहे, आणि तिसऱ्या खंडांत तीन अक्षरे व शेवटीं ह्रीं हें बीज आहे. "अवसानेषु" म्हणजे प्रत्येक खंडाच्या शेवटीं 'हृल्लेखाभिः' म्हणजे ह्रीं या बीजांनी, "घटिताः" म्हणजे युक्त असलेले, "ते अमी वर्णाः " म्हणजे ते हे वर्ण अर्थात ही अक्षरे, "जननि" हे मातोश्री ! तुझ्या मंत्रात्मक नामाच्या अवयवांचें रूप धारण करीत आहेत. असा या श्लोकाचा सरळ अन्वयानुसारी अक्षरार्थ आहे.

ह्रीं हें बीज मंत्रशास्त्रांत फार महत्त्वाचे मानले आहे. हें बीज सर्वमंत्रांची जणुं कांहीं प्राणशक्ति आहे. ह्रीं हे बीज मंत्राच्या सामर्थ्याचे उद्‌बोधन करीत असतें. ह्रीं या बीजाने मंत्रामध्ये चैतन्य निर्माण होत असते ! ह्रीं हें बीज नसेल तर मंत्रराशि निर्जीव होतो. हृदयामध्ये जशी प्राणांची ज्योत विलसत असते, त्याचप्रमाणे ह्रीं हें बीज मंत्रांतील प्राणज्योतच आहे. आकाशांत जशी विद्युलेखा चमकते त्याचप्रमाणें ह्रीं हें बीज साधकाच्या हृदयांत प्रकाश देणारे आहे म्हणूनच ह्रीं या बीजाला हृल्लेखा असे म्हणतात.

"हृदि लेखेव जागर्ति प्राणशक्तिरियं परा ।
हृलेखा कथ्यते तस्मान्मायैवाचिन्त्यवैभवा ॥
अनया रहिताः सर्वे निर्जीवा मन्त्रराशयः ।
अतस्तु सर्वमन्त्राणामियमुद्‌बोधनी मता ॥ "

असें मंत्रशास्त्रांत ह्रीं या बीजाचें वर्णन केले आहे. विश्वाची उत्पत्ति, स्थिति आणि संहार या तिन्ही अवस्था ह्रीं बीजांत सामावलेल्या आहेत. त्याचें प्रामुख्याने कर्तुत्त्व श्रीत्रिपुरसुंदरीकडेच असल्यामुळें तिला ह्रींकारी असे म्हटलेले आहे. " ह्रींकारी ह्रींमती हृद्या" ही तिचीं नांवेच आहेत. फार काय सांगावे, ह्रीं हें तिचेच स्वरूप होय. याच अभिप्रायाने तिला त्रिशतीमध्ये "ह्रींषींशरीरिणी" असे म्हटलेले आहे. श्रीत्रिपुरसुंदरी ही माया अथवा महामायास्वरूप असल्यामुळें ह्रीं या बीजाला मायाबीज असें म्हणतात. त्रिपुरसुंदरी ही सर्व भुवनांची अधिष्ठात्री असल्यामुळें तिला भुवनेश्वरी असेंही म्हणतात. आणि याच अभिप्रायाने ह्रीं या बीजाला भुवनेश्वरीबीज असेंही म्हटले आहे. असें हे ह्रीं बीज अत्यंत महत्त्वाचें असल्यामुळें या मंत्रातील तिन्ही खंडांच्या शेवटीं ह्रीं या बीजाचा प्रयोग झालेला आहे.

या पंचदशाक्षरी श्रीविद्यामंत्रांतील पहिली चार अक्षरे अग्निखंड म्हणून मानली जातात. त्यानंतर ह्रीं हें बीज आहे. त्याच्यापुढील पांच अक्षरे सौरखंड म्हणून ओळखली जातात. सूर्य हा त्यांचा अधिष्ठाता आहे. अग्निखंड आणि सूर्यखंड यांच्यामध्ये असलेल्या ह्रीं या बीजाला रुद्रग्रंथि असे म्हणतात. दुसऱ्या खंडाच्या शेवटींही ह्रीं बीज आहेच. या ह्रीं बीजापुढील तीन अक्षरे हा या मंत्रातील तिसरा खंड होय. या तिसऱ्या खंडाला सौम्यखंड अथवा चांद्रखंड असें म्हणतात. सौरखंड आणि चांद्रखंड यांच्यामध्ये असलेल्या ह्रीं बीजाला विष्णुग्रंथि असें म्हणतात. तिसऱ्या खंडापुढे असलेल्या ह्रीं बीजानंतर आणखी एक अक्षर आहे. ते फारच महत्त्वाचे आहे, तें गुरुमुखानेंच जाणावे असें सांगितलेले आहे. त्या अक्षरासह आपल्या उपास्यदेवतेचा - श्रीत्रिपुरसुंदरीचा मंत्र हा सोळा अक्षरांचा होतो. म्हणूनच या मंत्राला षोडशीविद्या असें म्हणतात. हें अक्षरही स्वतंत्र मंत्रस्वरूप आहे. या अक्षराचा अंतर्भाव न करतां राहिलेल्या पंधरा अक्षरांच्या मंत्राला पंचदशीविद्या असें म्हणतात. षोडशीविद्येंतील सोळाव्या अक्षराला चंद्रकलाखंड असें म्हणतात. सौम्यखंड आणि चंद्रकलाखंड यांच्यामध्ये असलेल्या ह्रीं बीजाला ब्रह्मग्रंथि असें म्हणतात. याप्रमाणे " त्रिखंडो मातृकामन्त्रः सोमसूर्यानलात्मकः" मातृका म्हणजे माता त्रिपुरसुंदरी, तिचा हा मंत्र त्रिखंड म्हणजे चंद्र, सूर्य आणि अग्नि या तीन तत्त्वांचा आहे ही गोष्ट लक्षांत घ्यावी. त्रिखंड या विशेषणाने आणखी एक विशेष सूचित केला जात आहे. तो म्हणजे ज्ञानशक्ति, इच्छाशक्ति आणि क्रियाशक्ति. त्याचप्रमाणे जागृति, स्वप्न आणि सुषुप्ति. तसेच विश्व, तैजस आणि प्राज्ञ या चैतन्याच्या तीन अवस्था. तमोगुण, रजोगुण आणि सत्त्वगुण. त्याचप्रमाणें स्थूल सूक्ष्म आणि कारण अशा विविधरूपाने श्रीयंत्राचे व श्रीमंत्राचें त्रिखंडत्व पहाता येतें.

वर चौथे खंड म्हणून चंद्रकलाखडाचा उल्लेख केलेला आहे. हें खंड तिन्ही खंडांच्या पलीकडचे आहे. तें सर्वातीत आहे. अवस्थात्रयातीत, गुणत्रयातीत देहत्रयातीत, कूटत्रयातीत खण्डत्रयातीत इत्यादि शब्दानी त्याचें वर्णन करतात. वस्तुतः तें वर्णनातीत आहे. "सत्यं ज्ञानमननं", "नित्य विज्ञानमानन्द" अशा शब्दांनी उपनिषदे ज्याचे वर्णन करतात तेंच तें श्रीविद्येचें चतुर्थ खंड होय. त्याला तुरीयखंड असें म्हणतात. हें शुद्धचित्स्वरूप असल्यामुळें याला 'चिदेकरस' असेंही म्हटलेले आहे. तिला पराकला असे म्हणतात. परा म्हणजे सर्वश्रेष्ठ आणि कला म्हणजे तत्त्व. चन्द् धातूचा अर्थ आनंद देणे किंवा प्रकाशणें असा आहे. "चन्दयति अथवा चन्दति इति चन्द्रा" जी सर्वांना आनंद देते, प्रकाश देते अथवा आपल्या स्वतःसिद्ध प्रकाशाने प्रकाशते ती चन्द्रा. "चंद्रा चासौ कला च चन्द्रकला." तात्पर्य, सर्वांना आनंद देणार, प्रकाश देणार आणि स्वतःसिद्ध प्रकाशानें प्रकाशित असलेले असें जें अनिर्वचनीय तत्त्व तेंच चंद्रकला या शब्दाचा अर्थ होय. या चंद्रकलेलाच महात्रिपुरसुन्दरी असें म्हटलेले आहे. श्रीसूक्तामध्ये तर चंद्रा हेंच नांव श्रीमहात्रिपुरसुंदरीला दिलेले आहे. "चन्द्रा हिरण्मयीं लक्ष्मीं" "चन्द्रा प्रभासां यशसा ज्वलन्तीं" इत्यादि. असो

चंद्र जसा सोळा कलानी पूर्ण असतो त्याचप्रमाणे श्रीललितामहात्रिपुरसुंदरी ही सोळा कलांनी पूर्ण आहे. त्रिपुरसुंदरीकला, कामेश्वरीकला, भगमालिनी- कला इत्यादि पंधरा कलांची पंधरा नांवे आहेत. सोळावी कला ही स्वतः श्रीमहात्रिपुरसुंदरीच होय. ज्योतिःशास्त्रामध्यें चंद्राच्या पहिल्या कलेला प्रतिपदा हें नांव दिले आहे. दुसऱ्या कलेला द्वितीया व तिसऱ्या कलेला तृतीया याप्रमाणें सर्व तिथींची नावे ही चंद्राच्या कलांचीच नांवे होत. या तिथि एकंदर सोळा आहेत. पंधराव्या तिथीला पौर्णिमा आणि सोळाव्या तिथीला अमावास्या असें म्हणतात. प्रतिपदेपासून पूर्णिमेपर्यंत चंद्राची एक एक कला रोज वाढत असते व पूर्णिमेच्या दिवशीं आपल्याला पूर्ण चंद्राचे दर्शन घडते. सोळावी कला त्यांतच सामावलेली असल्यामुळें सोळा कलांचा पूर्णचंद्र पूर्णिमेला दृग्गोचर होत असतो. त्यानंतर क्रमाक्रमानें रोज एक एक कला ऱ्हास पावते. सोळावी कला ही कधींच ऱ्हास पावत नसते. कारण ती नित्य आणि सच्चिदानन्दस्वरूप आहे. " दर्शाद्याः पूर्णिमान्ताश्च कलाः पञ्चदशैव तु । षोडशी तु कला श्रेया सच्चिदानन्दरूपिणी । " (सुभगोदयतन्त्र)

वस्तुस्थिति अशी आहे कीं, चंद्राच्या कला किंवा चंद्र हा ऱ्हासही पावत नाहीं आणि वृद्धिंगतही होत नाहीं. चंद्र हा तत्त्वतः सदासर्वकाळ परिपूर्ण स्वरूपांतच असतो. महात्रिपुरसुंदरीचें अधिष्ठान असलेल्या मुर्धस्थानच्या सहस्त्रदलकमलांतील चंद्रमंडलाचें स्वरूपही असेंच मानलेले आहे. यावर कोणी असें विचारील कीं, चंद्र जर सदासर्वकाळ पूर्णरूप आहे तर मग त्याच्या कलांची वृद्धि आणि ऱ्हास का दिसतात ? यावर उत्तर असें कीं, चंद्रमंडल हें आप्य म्हणजे जलीय आहे. सूर्यमंडल हें तेजोमय आहे. सूर्यमंडळ आणि चंद्रमंडल ही दोन्ही मंडलें एका नक्षत्रामध्यें आली म्हणजे चंद्रमंडल आपल्याला दिसत नाहीं. कारण तें आपल्या दृष्टीने सूर्यमंडळाच्या आड गेले असतें. अर्थात् आपली दृष्टि आणि चंद्रमंडल यांच्यामध्ये समरेषेत सूर्यमंडल मध्येंच आलेले असतें. त्यामुळें चंद्रमंडल आपल्याला दिसत नाहीं. त्या काळाला आपण अमावास्या असें म्हणतो. अमा म्हणजे एकत्र, सह, बरोबर. आणि वास्या म्हणजे रहाणे. अर्थात् सूर्य आणि चंद्र यांचें ज्या काळीं एकत्र रहाणें घडते त्या काळाला अमावास्या असें म्हणतात तें अगदीं बरोबर आहे. यालाच ज्योतिषशास्त्रांत दर्श असें म्हणतात.

दर्शाच्या दिवशीं आपली दृष्टि आणि चंद्रबिंब यांच्यामध्ये सूर्यमंडळ आलेले असल्यामुळें आपल्या दृष्टीला चंद्रबिंब दिसत नाहीं. आपल्या दृष्टीला तें दिसलें नाहीं म्हणून ते नाहीं असें कसें म्हणतां येईल ? मोठ्या पर्वताच्या पलीकडे समरेषेत असलेला छोटा पर्वत आपल्याला दिसला नाहीं. म्हणून तो नाहीं असे म्हणतां येत नाहीं. तो त्या मोठ्या पर्वताच्या आड असतोच. चंद्राला एका नक्षत्रांतून दुसऱ्या नक्षत्रामध्ये जाण्यास साठ घटकांचा अवधि लागतो, तर सूर्याला एका नक्षत्रांतून दुसऱ्या नक्षत्रामध्ये जाण्यास तेरा दिवस लागतात. .प्रतिपादेपासून सूर्यमंडळ रोज थोडें थोडे बाजूला होत असतें. रोज सूर्यमंडळाचा पंधरावा हिस्सा बाजूला होत असतो. पंधरावा हिस्सा म्हणजेच एक कला. सूर्याचा जेवढा भाग बाजूला होत असतो तेवढाच तो चंद्रविबामध्यें प्रतिबिंबित होत असतो. तीच आपण शुक्लपक्षामध्यें प्रतिपदेच्या दिवशीं अथवा द्वितीयेच्या दिवशीं चंद्राची कोर म्हणून पहातो. याप्रमाणें सूर्याची रोज एक एक कला चंद्रबिंबामध्यें प्रतिबिंबित होत असते व कलेकलेने चंद्र वाढला असें आपण म्हणत असतो. पौर्णिमेच्या दिवशी चंद्रमंडल आणि सूर्यमंडल यांच्यामध्यें पूर्ण व्यवधान असल्यामुळें आपल्याला पूर्णचंद्र पहावयास सांपडतो. अशा रीतीनें आपल्या दृष्टीच्या आड येणाऱ्या सूर्यमंडलाच्या गतीचा हा खेळ आहे. तात्पर्य, चंद्रबिंब हें नेहमींच पूर्ण असतें, तथापि वर सांगितलेल्या कारणामुळे कळांची बुद्धि आणि ऱ्हास हे औपचारिक स्वरूपाने मानले जातात. चंद्राची सोळावी कला ही नेहमींच सर्व कलांमधून अनुस्यूत असतेच. लाक्षणिकदृष्ट्याही तिला वृद्धि-ऱ्हासांचा संपर्क नाहीं म्हणून ती कला नित्य मानली जाते.

प्रतिपदा, द्वितीया इत्यादि तिथिक्रमानें १ दर्शा, २ दृष्टा ३ दर्शता ४ विश्वरूपा, ५ सुदर्शना, ६ आप्यायमाना, ७ आप्यायमाना, ८ आप्याया ९ सूनृता, १० इरा, ११ आपूर्यमाणा, १२ आपूर्यमाणा, १३ पूरयन्ती, १४ पूर्णा, १५ पूर्णमासी अशी सर्व तिचीची वेदामध्ये नावे दिलेली आहेत. श्रीमहात्रिपुरसुंदरीच्याही सोळा कला आहेत. त्रिपुरसुंदरी, कामेश्वरी, भगमालिनी नित्यक्लिन्ना, भेरूण्डा, वह्निवासिनी, महावजेश्वरी, रोद्री, त्वरिता, कुलसुंदरी नीलपताका, विजया, सर्वमंगला, ज्वाला, मालिनी अशीं त्यांची क्रमशः नावें आहेत. सोळावी कला नामरूपातीत आहे. म्हणूनच तिला "सच्चिदानन्दरूपिणी" असें म्हटलेले आहे. तथापि उपासकांच्या कल्याणाकरितां तिचाही एकाक्षरी बीजभूत मंत्र तंत्रशास्त्रामध्ये निर्दिष्ट केलेला आहेच. तो मंत्र गुरुमुखानेच जाणावा. शकार, रेफ, ईकार आणि बिंदु यांचें क्रमशः समुच्चित स्वरूप म्हणजेच तो मंत्र होय. याच बीजाला श्रीविद्या असे म्हणतात. हें बीज आणि पंचदशाक्षरी श्रीविद्येतील तीन खंड मिळून हा मंत्र चार खंडांचा मानला जातो.

"त्रिखण्डो मातृकामंत्र" या ठिकाणी मातृका शब्दाचा अर्थ वर्णमाला अथवा मुळाक्षरे असाही करतात. त्रिपुरसुंदरीमंत्र हा पंधरा आणि सोळा अक्षरांचा आहे. संपूर्ण मंत्र त्रिपुरसुंदरीचें स्वरूप असल्यामुळें ही सोळा अक्षरे त्रिपुरसुंदरीच्या सोळा कलाच मानल्या जातात. प्रत्येक कला देवतास्वरूप आहे. त्यांची नांवे वर दिलींच आहेत. या मंत्रातील सोळा अक्षरांतच संपूर्ण वाक्प्रपंचाला कारणीभूत असलेली मुळाक्षरे समाविष्ट झालेलीं आहेत. या मंत्रातील पहिलें अक्षर क आणि तिसऱ्या खंडातील शेवटचे अक्षर ल मिळून कला हा प्रत्याहार तयार होतो. प्रत्याहार म्हणजे अनेकांचा थोड्यांत संग्रह करणें. कला शब्दाने क-पासून ळपर्यंतची सर्व व्यंजने संगृहीत होतात. व्यंजने ही परतंत्र असतात. स्वरावांचून त्यांचा उच्चार होत नाहीं. तेव्हां व्यंजनांचे पूर्ण उच्चार होण्यासाठीं स्वरही उपलब्ध व्हावेत म्हणून या मंत्रातील दुसऱ्या अक्षराच्या मागे असलेला अ आणि तृतीय खंडातील शेवटचा ल मिळून "अल्" प्रत्याहार मानतात. व्याकरणशाखाच्या दृष्टीने अल् प्रत्याहारांत अ-पासून ह पर्यंतचे सर्व वर्ण येतात. शंकरांच्या डमरूंतून प्रकट झालेल्या "अइउण्" इत्यादि सूत्रांत पहिलें अक्षर अ आहे तर शेवटचे अक्षर ल् हें व्यंजन आहे. गा अल् प्रत्याहारामध्यें अ-पासून ह-पर्यंत सर्व वर्ण समाविष्ट होतात ही एक प्रकारें वर्णमालाच तयार होते. या वर्णमालेचा मेरुमणि क्ष असल्यामुळें या वर्णमालेला अक्षमाला असे म्हणतात. असा हा त्रिखंडमंत्र संपूर्ण मातृका म्हणजे वर्णप्रपंचाचें अधिष्ठान आहे. या त्रिखंडांत नाद, बिंदु आणि कला यांचाही समावेश करतात.

अ पासून ह - पर्यंतच्या सर्व वर्णांना पृथक् पृथक् अधिष्ठात्री देवता आहेत व हे वर्ण नामरूपाने नटलेल्या विश्वप्रपंचाला कारणीभूत असलेली जी तत्त्वें आहेत त्या तत्त्वांचे बीजभूत वर्ण म्हणून मानले जातात. या दृष्टीने ह्या सर्व वर्णांचा षोडशकलात्मक श्रीमहात्रिपुरसुंदरीच्या स्वरूपांतच अन्तर्भाव होतो. "षोडशेन्दोः कला भानोर्द्विर्द्वादश दशानले । ताः पचाशत्कला ज्ञेया मातृकाचक्ररूपिणी ॥" कला म्हणजे वर्ण किंवा अक्षर. श्रीविद्येंतींल पंधरा अक्षरे ज्याप्रमाणें सोम, सूर्य आणि अग्नि या तीन तत्त्वांत विभागली आहेत त्याचप्रमाणे संपूर्ण मुळाक्षरे देखील या तीन तत्त्वांत विभागली गेली आहेत. सोळा अक्षरें चंद्राची आहेत तर चोवीस अक्षरें सूर्याचीं आहेत. अग्नितत्त्वाचीं दहा अक्षरें आहेत. ही सर्व श्रीचक्रांत दाखविलेली आहेत. याप्रमाणे आपली श्रीत्रिपुरसुंदरी देवता ही "मातृकाचक्ररूपिणी" म्हणजे वर्णसमुहस्वरूप आहे. अशा रीतीनें मंत्र, मातृका, श्रीचक्र, देहांतील चक्रे, पिंड आणि ब्रह्मांड यांच्यांतील शब्दप्रपंचाच्या व अर्थप्रपंचाच्या दृष्टीने असलेली एकरूपता लक्षांत घ्यावी. त्याचप्रमाणें सर्वोच्च तत्त्वस्वरूप असलेल्या श्रीमहात्रिपुरसुंदरीचेंही स्वरूप लक्षांत घ्यावे आणि गुरुमुखानें प्राप्त झालेल्या श्रीमंत्राच्या मननानें साधकाने सर्व दुःखांतून मुक्त व्हावें आणि आपलें जीवन धन्य करावे. अर्थमननाचें सामर्थ्य नसलें तरी साधकाने केवळ मंत्रजपानेंही सिद्ध व्हावें, धन्य व्हावें, कृतार्थ व्हावें असें सामर्थ्य या अक्षरांतही आहे. श्रीविद्येच्याच कृपेने श्रीविद्येच्या तत्त्वाचा साक्षात्कार व्हावयाचा असतो व ही कृपा अनन्यशरणागतीवरच अवलंबून असते. "यस्य वा पश्चिम जन्म यदि वा शंकरः स्वयम् ।  तेनैव लभ्यते विद्या श्रीमत्पञ्चदशाक्षरी ॥" ज्याची जन्ममरणपरंपरा शेवटाला येऊन पोंहचली असेल अथवा जो स्वयं शंकर असेल त्यालाच ही पंचदशाक्ष्री श्रीविद्या प्राप्त होऊं शकते. असा या मंत्राचा महीमा आगमतंत्रांत गाइलेला आहे. आम्ही स्थालीपुलाकन्यायानें वाचकांना या विषयाचे दिग्दर्शन मात्र केलेले आहे.

हे यंत्र सोन्याच्या पत्र्यावर काढून पंचेचाळीस दिवस पूजा करावी. रोज या श्लोकाचा एक हजार जप करावा. नैवेद्य दहींभात आणि उडदाचे वडे. हे सिद्धयंत्र धारण केल्यास सर्व विद्या सिद्ध होतात. रसायनेंही सिद्ध होतात.

No comments: