06 August, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ५६

अजो महार्हः स्वाभाव्यो जितामित्रः प्रमोदनः 
आनंदो नन्दनो नन्दः सत्यधर्मा त्रिविक्रमः  ।।
(५२) अजः :  - ज्यास जन्म नाही असा. सत्यास जन्म, मरण अगर विकार नाहीत. त्यामुळे परमात्म्यास जन्म नाही व क्षयही नाही. तत्वज्ञानाप्रमाणे जे अ-ज आहे तेच अ-मर आहे म्हणूनच शाश्वत व विकाररहित आहे. दुसरा अर्थ - विष्णुचा पुत्र प्रद्युम्न – (अज) प्रेमस्वरूप कामदेवाच्या अवताररूपाने जन्मला असे पुराणामध्ये वर्णन आहे.
(५२) महार्हः : - जे सर्वात श्रेष्ठ म्हणूनच पूजनीय आहे असा (अर्ह म्हणजे पूजा).
(५२) स्वाभाव्य :  - आपल्या स्वभावात’ (आत्मस्वरूपात) जो नित्य दृढमूल झालेला आहे असा. तो कारणरहित कारण असा प्रत्यक्ष परमात्माच आहे.
(५२) जितामित्रः :  - ज्याने आपले अंतर्गत व बाह्य शत्रू जिंकले आहेत असा. अंतर्गत शत्रू - कामक्रोध व बाह्यशत्रू म्हणजे रावण हिरण्यकश्यपू इत्यादि, जिंकले आहे असा..
(५२) प्रमोदनः :  - नित्य आनंदी. आपले आनंदस्वरूप आपणच नित्यतेने सेवित असतो असा. श्रीनारायण भक्तांच्या अंतःकरणांत नेहमी आनंद निर्माण करतो म्हणून या संज्ञेने तो विष्णु प्रमोदन आहे असे सुचविले आहे.
(५२) आनंदः :  - शुद्ध आनंदघन. आनंद हेच त्याचे स्वरूप आहे बृहदारण्यक म्हणते त्याच्या आनंदाच्या [1] एका मात्रेने (अंशाने) सर्व प्राणी आनंदीत असतात तो परमात्मा श्रीविष्णु.
(५२) नन्दनः :  - जो इतरांसही आनंदी करतो तो. भगवंत स्वतः सर्व आनंदाचे उगमस्थान आहेत. त्यामुळे जे साधक साधनेने त्या शुद्ध, दिव्य परमात्म स्वरूपापर्यंत जावून पोहोचतात ते त्याच्या अमर्याद आनंद स्वरूपांत अनंत कालपर्यंत धुंद होऊन जातात.
(५२) नन्दः :  - जो लौकीक मर्यादित विषय सुखापासून स्वतःस मुक्त ठेवतो असा. ज्ञानेंद्रियांचा विषयांशी संबंध आल्याने लौकिक सुख प्राप्त होते. तो परमात्मा शरीर, मन, बुद्धि इत्यादि लौकीक विषयसुखांच्या साधनां पलीकडे असल्याने त्यांच्याशी त्याचा संसर्गच येत नाही. असेही संज्ञा सुचविते. छादोग्य उपनिषत् सांगते, 'जो अनंत आहे तोच [2] आनंद स्वरूप आहे व जे अल्प आहे ते आनंद स्वरूप असत नाही.
(५२) सत्यधर्मा :  - ज्याचेमध्ये सर्व सत्य धर्म सामाविष्ट झालेले आहेत असा. अहिंसा, दया, दान इत्यादि भाव उच्च धर्म समजले जातात. व श्री नारायणाचे ठिकाणी यासर्व परमधर्माची पराकाष्ठा आपल्याला आढळते. थोडक्यांत तो साक्षात् मूर्तीमंत योगेश्वर आहे. दुसरा अर्थ असा की जो परमात्म दर्शनानें परिपूर्ण आहे असा तो सत्यधर्म. उपनिषद [3] म्हणते ' योगसाधनेने आत्मदर्शन करणे हाच खरा परमधर्म आहे.'
(५३०) त्रिविक्रमः :  - ज्याने तीन पावले आक्रेमली तो. वामनावतारामध्ये त्याने तीन पावलांमध्ये तीनही भुवने आक्रेमली म्हणून तो त्रिविक्रम. आत्मचिंतन करणार्‍या साधकाला स्वतःच्या स्व-स्वरूपापर्यंत पोहोचावयास जागृत, स्वप्न व सुषुप्ती ही अनुभव क्षत्रे एकदा त्याने पार ओलांडली की तो निश्चितपणे आत्मस्वरूपापर्यंत पोहोचतो. संस्कृत भाषेप्रमाणे 'त्रि' ह्या शद्बाचा अर्थ तीन लोक असा होतो व श्रेष्ठ तत्वचिंतक मुनी [4] स्पष्ट करतात की 'हे तीन लोक म्हणजेच तीन अनुभव कक्षा 'त्रि'ने निर्देशित आहेत.
 डॉ. सौ. उषा गुणे.



[1]   एतस्यैवानन्दस्यान्यानि भूतानि मात्रामुपजीवन्ति  । (बृह ४-३-३२)
[2]       यौ वैभूमातदमृतमथ यदल्पं तन्मर्त्यम  ।। (छा. २४-१) यौ वैभूमा तत्सुखं नाल्पेसुखमस्ति  । (छादोग्य २३-१)
[3]    अयंहि परमोधर्मः यद्योगेनात्मदर्शनम् ।
[4]    त्रिरित्येव त्रयो लोकाः कीर्त्रिता मुर्तिसत्तमैः (हरिवंश ३-८८-१)

No comments: