17 December, 2009

विष्णुसहस्रनाम : श्लोक ६

विष्णुसहस्रनाम : श्लोक ६


अप्रमेयो हृषीकेशः पद्मनाभोऽमर प्रभुः  । विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्ठः स्थविरो ध्रुवः  ।।


(४६) अप्रमेयः :  - ज्याची व्याख्या अगर विवरण कुठल्याहि विशिष्ठ तर्काने अगर इतर वस्तुच्या संदर्भाने करता येत नाही तो '' अनिर्वाच्य '' असा श्रीविष्णु. ज्या वस्तुचे आपल्याला 'प्रत्यक्ष ' ज्ञान होते तिचे वर्णन करता येते. काहींचे ज्ञान प्रत्यक्ष होत नाही परंतु इतर गोष्टींचे संदर्भाने त्याचे अनुमान करता येते. तर कांही गोष्टी अशा असतात किं त्यांचे ज्ञान ऐकणार्‍या व्यक्तिला इतर समानधर्मी वस्तूंच्या वर्णनावरून करून देता येते. (उपमान). परंतु हे अनंततत्व गुण रहित असल्याने त्याने प्रत्यक्ष ज्ञान होत नाही, इतर संदर्भावरून त्याचे ज्ञान होत नाही किंवा समधर्मी अगर विधर्मी वस्तूवरूनहि त्याचे ज्ञान होत नाही. म्हणूनच त्या सर्वश्रेष्ठ सत्याला 'अप्रमेय ' असे म्हटले आहे व तोच श्रीविष्णु होय. आपले सर्व भेदज्ञान संपुष्टात आले म्हणजेच ज्याचा केवळ एकरूपतेने अनुभव येवू शकतो तो परमात्मा अप्रमेय होय.


(४७) हृषीकेश :  - पुराण वाङमयावरून ह्या शब्दाचा अर्थ निघतो किं ज्याचे केस अत्यंत आखूड कापलेले आहेत किंवा ज्याच्या केसांच्या कुरळ बटा वरती बांधल्या आहेत तो 'हृषीकेश'. त्याच संज्ञेचा दुसरा अर्थ इंद्रियांचा स्वामी (हृषीक + ईश) असाही होतो. कारण हृषीक म्हणजे इंद्रिये. (ही संज्ञा आता अप्रचलीत झाली आहे). आत्मा हा जाणीव रूपाने सर्व इंद्रियांना प्रकाश देत असतो. म्हणून त्याला इंद्रियांचा स्वामी असे म्हटले आहे. तोच ' श्रीविष्णु ' होय.
    तसेच हृषीक ह्या अप्रचलीत शब्दाचा अर्थ किरण किंवा 'जो आनंद देतो तो' असाहि होतो. म्हणून हृषीकेश या संज्ञेचा अर्थ होईल किरणांचा स्वामी म्हणजेच 'चंद्र' अगर 'सूर्य'. अशातर्‍हेने अर्थ केला असता 'तो परमात्मा स्वतःच चंद्र-सूर्य झाला आहे असा ध्वनी निघतो. ह्या चंद्र-सूर्य स्वरूपांत परमेश्वर स्वतःच सर्व जगाला उठवून कार्य प्रवण करतो व सर्व जगाला विश्रांतीहि देतो. साधकास आपल्या सूक्ष्म चिंतनात असे प्रतीत होते किं तोच परमेश्वर स्वतःच विश्व स्वरूपात उदयास येतो, ह्या विश्वाच्या कार्यशीलतेमध्ये व्यतीत होतो व शेवटी क्रीडा आवरून प्रलयाचे वेळी स्वतःमध्येच विश्रांती घेतो.


(४८) पद्मनाभः :  - ज्याच्या नाभीपासून उत्पन्न झालेले कमळ हे चतुर्मुख ब्रह्मदेवाचे आसन आहे तो श्रीविष्णु पद्मनाभ आहे. हिंदु संस्कृतीमध्ये 'कमळ' हे सत्याचे अगर त्याच्या व्यक्तावस्थेचे प्रतीक - अगर आधार मानले जाते. मनुष्यामधील सृजनशक्तीचा स्त्रोत त्याचे नाङीपासून प्रवाहीत होतो व तो चतुर्मूख स्वरूपात प्रतीत होतो त्यालाच अंतःकरण असे म्हटले जाते. ह्या अंतःकरणाचे चार घटक आहेत. मन, बुद्धी, चित्त व अहंकार. योगशास्त्रामध्ये ह्या कल्पनेचा विस्तृत विचार झाला आहे. त्यानुसार प्रत्येक संकल्पना ही परमेश्वरा पासूनच उत्पन्न होते. व त्यावेळी तिचे स्वरूप असते 'परा'. त्यानंतर ती अस्फुट स्वरूपांत प्रतीत होते. नाभीजवळ त्यावेळी तिला म्हटले जाते 'पश्यंती'. ज्यावेळी ती जास्त स्पष्ट स्वरूपांत येते तेंव्हा ती हृदयांत विचाररूपाने स्फुरण पावते. तेंव्हा तिलाच म्हटले जाते 'मध्यमा'. व जेंव्हा ती आपापल्या कार्यक्षेत्रात अत्यंत स्पष्टतेला येते - प्रत्यक्ष कृतीरूपानें - तेंव्हा तिलाच म्हटले जाते 'वैखरी'. अशातर्‍हेने प्रत्येक संकल्पना परेपासून वैखरी पर्यंत उत्क्रांत होत जाते. (कल्पना- स्फुरण - विचार- कृती) म्हणजेच प्रत्येक कल्पनाही कृतीमध्ये कशी परीणत होत जाते त्याची आपल्याला स्पष्ट जाणीव होते. व त्याच्याच सूक्ष्म चिंतनातून 'सृष्टीकर्ता ब्रह्मदेवाचे स्थान परमेश्वराच्या नाभीमधून निघालेले 'कमळ' हे आहे त्या प्रतिकाचा अर्थ असा स्पष्ट होतो. ज्याच्या संकल्पनेतून सर्व विश्वाची उत्पत्ती झाली तो श्री महाविष्णु होय.


(४९) अमरप्रभुः :  - अमर अशा देवांचा स्वामी. इंद्र, दि्कपाल यांच्या सहित सर्व स्वर्गाचे रहिवासी देव या संज्ञेस पात्र आहेत. व ते स्वर्गातील अमरत्वाचा आनंद सापेक्षतेने जास्त काल उपभोगतात. जेव्हा ब्रह्मदेवाचा निद्राकाल येतो व प्रलय सुरू होतो तो पर्यंत सर्व देव आपापली कार्ये करत आपले आयुष्य उपभोगतात. ह्या जगाच्या पाठीवरील मानवांचे अस्तित्व (आयुष्य) देवांच्या आयुष्याच्या कालक्रमणेशी तूलना करता फारच अल्प असते म्हणूनच देवांचे आयुष्य अमर्याद वाटते. अर्थातच त्यांना अमर म्हटले जाते. ह्या देवांचे आपल्या शक्तिने जो पालन करतो तो सर्व प्राणीमात्रांस आधार देतो तो अमरप्रभु होय.


(५०) विश्वकर्मा :  - सर्वप्राणीमात्र, त्याचे इंद्रियार्थ. त्या इंद्रियार्थांचे ज्ञान करून घेणारी सर्व प्राणीमात्रांची सर्व इंद्रिये व त्या सर्वांच्या हृदयांत उत्पन्न होणारे अनुभवजन्य ज्ञान ह्या सर्वास उत्पन्न करणारा तो विश्वकर्मा होय.
    या सर्व ठिकाणी परमेश्वर साक्षीभावाने सर्व अनुभवांचे वेळी उपस्थित असतो. ज्याचा अनुभव घेतला जातो ते सर्व विश्व जरी त्याच्याच आधाराने अस्तित्वात असले तरी तो प्रत्यक्ष त्या विश्वाच्या अपूर्णतेमध्ये अगर विनाशामध्ये सहभागी होत नाही. विश्वातील सर्वघटना सर्व कालामध्ये ज्याच्या आधाराने होतात तो श्रीविष्णु ' विश्वकर्मा ' होय.


(५१) मनु:  - (मननशीलः मनुः) :  - उच्चविचारांसंबंधी मनन करण्याची पात्रता ज्याचे जवळ आहे तो मनु ह्या संज्ञेचा दुसरा अर्थ आहे मंत्र. जो आपणास वैदिकमंत्राचे स्वरूपात प्रकट करतो तो श्रीविष्णु 'मनु' होय. असे ह्या संज्ञेचे स्पष्टीकरण होईल.


(५२) त्वष्टा :  - अत्यंत विस्तृत व स्थूल वस्तूंना अत्यंत सूक्ष्म परमाणु स्वरूपांत नेणारा तो ' त्वष्टा '. प्रलयाचे वेळी विश्वातील सर्व जड वस्तूंचा सूक्ष्म घटकांमध्ये विलय होतो. व शेवटी जड सूक्ष्म वस्तुरहित शुद्ध स्वरूपांत अवकाश अस्तित्वात रहाते.


(५३) स्थविष्ठः :  - स्थूल ह्या शब्दाचे तमभावाचे रूप 'स्थविष्ठ ' असे होते. म्हणून जे अत्यंत सूक्ष्म सत्य आहे तेच अत्यंत स्थूल, सर्वात जास्त स्थूल (स्पष्ट) असा ह्या संज्ञेचा अर्थ होईल. ह्या संज्ञेमधील विरोधाभास हेच या संज्ञेचे सौदर्य आहे. व तिची ओजस्विताहि आहे. ते परमसत्य स्वभावतःच अत्यंत सूक्ष्म असल्याने सर्वव्यापी असते. हा महाविष्णु स्वतःच विश्वातील सर्व स्थूल वस्तूजाताचे रूप घेऊन राहिलेला आहे. ज्याप्रमाणे समुद्रातील सर्व लाटा या वस्तुतः समुद्रच असतात त्याप्रमाणे सर्व स्थूल वस्तूंनी तयार झालेले जगत् हे श्रीविष्णुंचेच रूप आहे.
    गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने आपले विश्वरूप अर्जुनाला दाखविले. अर्जुनाने त्याच्या स्तवनांत योजलेल्या शब्दावरून 'हे सर्व जडस्थूल विश्व हे भगवंताचेच दिव्य स्वरूप आहे' असे प्रतितीस येते.


(५४) स्थविरोध्रृव:  - स्थविर म्हणजे पुरातन. व ध्रृव म्हणजे स्थिर. परमेश्वराला पुरातन म्हटले आहे कारण कालाचा 'प्रथमघटक' हा त्याचेच पासून उत्पन्न झालेला आहे. मानवीबुद्धीमध्ये कालाची संकल्पना निर्माण करणारा तोच आद्यपुरूष होय. म्हणूनच तो सर्वात पुरातन आहे व दृढ सत्य आहे. जगामध्ये घडणार्‍या कोणत्याही काळातील कोणत्याही घटनांचा त्याचेवर परिणाम होत नाही.
डॉ. सौ. उषा गुणे.