27 December, 2008

मानसमणिमाला (१७)

मानसमणिमाला (१७)

:

हिंदी : लखि सुबेष जग बंचक जेऊ । बेष प्रताप पूजिअहिं तेऊ ॥ बा. कं १.६.५

उघरहिं अंत न होइ निबाहू । कालनेमि जिमि रावण राहू ॥ ६ ॥

किएहु कुबेष साधु सनमानू । जिमि जग जामवंत हनुमानू ॥ ७ ॥

मराटी : बघुनि सुवेषहि जग-वंचक जे । वेष बलें पुजिले हि जाति ते ॥ प्रज्ञा - बा. कां. १.६.५

बेंड फुटे अंति न निर्वाहू । कालनेमि रावण इव राहू ॥ ६ ॥

सन्मानहि कृत-कुवेष संतां । जगिं सम जांबवंता हनुमंता ॥ ७ ॥

अर्तः : जगाला फसविणारे जे लबाड लोक केवळ साधुवेष अगर उत्तम पोषाख (सुवेष) धारण करतात ते त्यांच्या बाह्यवेषाच्या प्रभावाने पूजिले जातात. परंतु त्यांची लबाडी, दंभ उघड होणारच. शेवटपर्यंत त्याचा उपयोग (निर्वाह) कधीच होत नाही. कालनेमि राक्षस, रावण किंवा राहू यांची लबाडी तात्काळ उघड झाली. साधूंचे मोठेपण बाह्य वेषावर अवलंबून नसते, त्यामुळे त्यांचा सामान्य पोषाख असला तरी त्यांना मान दिला जातोच. जांबवंत हनुमान यांची उदाहरणे स्पष्टच आहेत.

जगामध्ये चांगले वाईट, सज्जनपणा-दुर्जनता, श्रेष्ठ-कनिष्ठ यांची निवड करण्याचे माणसांचे ठोकताळे अगदी वरवरचे असतात. खरा नीरक्षिरविवेक फारच थोड्या जणांना करतां येतो. केवळ बाह्यांगावरून माणसे आपली मते तयार करतात व याचाच लबाड, संधिसाधू माणसे फायदा करून घेतात. 'दिसते तसे नसते म्हणूनच जग फसते.' टापटीपीचा पांढरा शुभ्र पोषाख अथव भगवी वस्त्रे बघूनच माणसे आपली मते ठरवितात व त्या व्यक्तींना वंदन करण्यास धावतात. इतका जबरदस्त प्रभाव बाह्यांगाचा आणि पूर्वग्रहांचा आपल्या मनावर असतो आणि तो तात्कालिक नसतो तर बराच काळ टिकतो. तोपर्यंत लबाड स्वार्थी माणसे पद्धतशीरपणे आपले काम साधून घेतात. पण केव्हां ना केव्हां तरी ही लबाडी उघडकीस येतेच, व त्याची भरपाईही त्या लबाडांना करावी लागते. याची उदाहरणे आपल्याला पुराणांतून जशी मिळतात तशी रोजच्या व्यवहारांतही पदोपदी दिसतात. म्हणून माणसाने नेहमी सावध, दक्ष असले पाहिजे असे समर्थही सांगतात.

संतसज्जनांचे लक्ष सतत अंतरंगाकडे लागलेले असते त्यामुळे वेषभूषेला त्यांचे दृष्टीनें फारसे महत्त्व नसते. त्यांची राहणी साधारणतः साधीच असते त्यामुळे त्यांच्या मोठेपणाची कल्पना एकदम येत नाही. 'वेष असावा बावळा । परि अंतरी नाना कळा' अशीच स्थिती असते. श्रीगोंदवलेकर महाराज, श्रीगाडगेमहाराज अगर श्रीसाईबाबा यांची उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आहेतच. परंतु त्यांचे मोठेपण बाह्य परिस्थिती निरपेक्ष असल्याने झाकून राहाणारच नाही. त्यामुळेंच ते युगानुयुगे लोकवंदनास पात्र होतात.

डॉ. सौ. उषा गुणे.

25 December, 2008

जडातून सूक्ष्माकडे

जडातून सूक्ष्माकडे

:

भगवंताचा साक्षात्कार नित्यनवा आहे, First hand आहे, second hand नव्हे. सर्व सामान्यतः सेकंड हँड देवच लोकांना माहीत आहे, असतो. दुसर्‍यांच्या अनुभवावरून आपण देवाची कल्पना करत असतो. 'उपनिषदांत असे सांगितले आहे", "गीतेत तसे सांगितले आहे" हेच सर्वसामान्यपणे बोलतात, बोलले जाते. अर्जुनाने विश्वरूपाचे वर्णन केले. आपण अनुभवलेल्या विश्वरूपाचे त्याने वर्ण न केले. त्याला आलेला अनुभव हा सर्वतोपरी first hand, नित्यनवा होता. यशोदेला आलेला विश्वरूपाचा अनुभवपण नित्यनवाच होता. आपला देवाचा नित्यनवा अनुभव सर्व संतांनी लिहून ठेवला. त्यांचे नुसते लिखाण वाचल्याने, त्यांच्या केवळ शब्दार्थाने आपल्याला जो आनंद होतो तो जर अमर्याद, अलौकिक, अगदी आगळा वेगळा असतो, तर प्रत्यक्ष भगवंताचा अनुभव किती श्रेष्ठ नाही का ?


देवच देवाला पाहू शकतो. आत्मारामालाच आत्मारामाचे दर्शन होते. जनक राजाच्या दरबारांत पंडितांची चर्चा चालू होती. त्य चर्चेत याज्ञवल्यांनी तेथे जमलेल्या सर्वच्या सर्व पंडितांना हरवले. शेवडी जनक राजाशी त्यांचा वाद सुरूं झाला. "कुंभारांनी केलेल्या मडक्याला कुंभाराचे ज्ञान होते कां ?" असा प्रश्न जनकांनी विचारला. प्रश्न अति महत्त्वाचा आहे. जो परमार्थप्रेमी आहे, परमार्थ पाहण्याची ज्यांना तीव्र तळमळ आहे, त्यांच्यापुढे हा प्रश्न आलाच पाहिजे. "होय, कुंभाराला जाणण्याची शक्ति घटाला आहे. [कुंभार म्हणजे परमात्मा, घट म्हणजे जीव] या आपल्या देहांतच असणार्‍या आत्म्यालाच परमात्मा जाणण्याची शक्ति, युक्ति, बुद्धि आहे. "ती किमया आत्मस्वरूपाशिवाय इतर कोणालाच नाही" असे याज्ञवल्क्यांनी जनकराजास मोठे छान, खरे खरे अचूक उत्तर दिले.


आत्मारामाच्या या क्रियेला dichotomy हा शब्द तत्त्ववेत्यांनी वापरला आहे (म्हणजे एकाचे दोन होणे). एकाचे असे दोन होण्याचे सामर्थ्य फक्त आत्मारामातच आहे. आता एकाचे दोन होतात म्हणजे "आत्मा निम्मा निम्मा झाला" असे वाटण्याचीच शक्यता जास्त नाही कां ? पण ते तसे नव्हे. dichotomy म्हणजे पाहणा व दिसणारा दोघें एकच एक असतात. म्हणूनच स्वप्नांतूनपण अद्वैताचा अनुभव येतो. एकाचे दोन होणे, म्हणजे आरशांत आपण आपल्याला पाहिल्यासारखे नव्हे. आरशातील प्रतिबिंब विकृत असते (उजव्याचे डावे तर डाव्याचे उजवे). जशाचे तसे दिसण्याचे सामर्थ्य फक्त एका आत्मारामातच आहे. हे स्व-स्वरूपाचे ज्ञान कुणाला होते ? आत्म्याचा अनुभव केवळ आत्मारामालाच.


हा आत्मसाक्षात्कार मग कोणाला ? देहाला की आत्मदेवाला ? "मी देव पाहिला" आपण सहज बोलून जातो. त्यांनी देव पाहिला, असेही आपण सहज बोलून जातो.


हा देह जड आहे, तर आत्मा अत्यंत सूक्ष्म आहे. किती सूक्ष्म आहे ? बरं शब्दांनी सांगायच झालं तर एका खसखशीच्या दाण्याचे १००० भाग करावेत व त्यातील १/१००० श भागाची विभागणी पुनः १००० भागांत करावी (त्याला 'रेणू' म्हणतात). आत्मा त्यापेक्षांही सूक्ष्मातिसूक्ष्म आहे. अशा सूक्ष्मतम आत्मारामाचे ज्ञान या जड देहाला कसे होणार ? जडाला सूक्ष्माचे ज्ञान होणे कधीच शक्य नाही. जडाने जडाला जड माध्यमांतूनच जडाचेच ज्ञान होते. सूक्ष्म कळणार नाही.


पण या जड देहात एक चैतन्य आहे,. एक शक्ति आहे, एक आनंद आहे. त्याला मग तुम्ही काहीही नाव द्या. याला आत्मा असं शास्त्रकार म्हणतात. सारांश काय तर जड इंद्रियांना देव कळत नाही. मग मनाला कळतो कां ? तर मनाचा डोळा पण देव पाहू शकत नाही. मन पण जडच आहे; तर आत्मचक्षूच आत्मारामाला, देवाला जाणूं शकतात, पाहू शकतात.


बुद्धीला देवाचं ज्ञान होऊं शकतं का ? बुद्धिला गुरुदेव 'lower intellect' खालच्या पातळीची बुद्धि अस म्हणत असत. या बुद्धीला फक्त देवाचे अस्तित्व कळते. तेवढाच या बुद्धीचा उपयोग. म्हणून आपल्या बुद्धीने देवाच्या महामंदिराच्या दरवाजापर्यंत जाता येते. म्हणून मनाने बुद्धीने कळणार नाही, वाचेने सांगता येणार नाही.


मग इंद्रियांना दिसत नाही, बुद्धीला कळत नाही, मनाला कल्पना/ आकलन करता येत नाही, असा हा देव आहे तरी कशावरून ? देव हे काय गौडबंगाल, किमया, जादू आहे ? तर देवाचा साक्षात्कार हे 'intuitive apprehension' आहे. ते प्रतिभ दर्शन आहे, इंद्रियजन्य, बुद्धिगम्य अगर मानसिक नाही, तर प्रज्ञा दर्शन आहे. याला लागणारी प्रज्ञा म्हणजे प्रतिभ शक्ति. त्याला आत्मदृष्टि, आत्मशक्ति असे पण म्हणताता. गुरुदेव त्यालाच intuition असं म्हणत.


मग नामाचा काय उपयोग ? नामाने काय होते ? तर नामाने देवाला जाणण्याची ही आपल्यतीलच गुप्त, निद्रित असणारी शक्ति नामस्मरणाने जागृत होते. याच शक्तिला योगशास्त्रांत कुंडलिनी म्हणतात. भक्तिशास्त्रांत प्रेमभाव म्हणतात, तर माधुर्यभावांत याच शक्तीला राधा असें म्हणतात.


अण्णा -

19 December, 2008

मानसमणिमाला (१६)

मानसमणिमाला (१६)
:

हिंदी : अस बिबेक जब देई विधाता । सब तजि दोष गुनहि मनुराता ॥ १ ॥
काल सुभाउ करम बरि आई । भलेऊ प्रकृति बस चुकई भलाई ॥ २ ॥
सो सुआरि हरि जन जिमि लेहीं । दलि दुख दोस विमल जसु देहीं ॥ बा. कां. १.६.३
मराठी : देई विधाता विवेक हा जै । गुणिंहि रमे मन त्यजि दोषांतै ॥
काल कर्म नी स्वभाव दडपणीं । भले प्रकृतिवश चुकति भलेपणिं ॥
ती घे हरिजन चूक सुधारुनी । देई सुयश दुख दोष निवारुनी ॥ १.६.१,२,३,॥ (प्रज्ञानंद)
अर्थ : हा नीराक्षिर विवेक विधाता जेव्हां देतो तेव्हां दोषांस सोडून मन गुणातच रमते ॥ १ ॥ क्वचित्‌ प्रसंगी काल, कर्म, स्वभाव यांच्या दडपणाने प्रकृतिवश होऊन भल्या माणसाकडूनही चुका होतात. ॥ २ ॥ ती सेवकाची चूक भगवान सुधारुन घेतात, व दुःखकारक दोषांचा नाश करून विमल यश देतात. ॥ ३ ॥

संपूर्ण सृष्टी परमेश्वराने जड चैतन्य युक्त तसेच गुणदोषयुक्त अशीच निर्मिलेली आहे. त्यातील सद्‌गुणांचा स्वीकार करणे, उपयोग करून घेणे व दुर्गुणांचा त्याग करणे, असा विवेक माणसाला करता येतो. तो सर्व व्यवहारात लागू करायला हवा. त्याकरितां आपली जीवनदृष्टि बदलायला हवी. देवाने आपल्या करताच जणू दुःख, अडचणी, विकृति निर्माण केल्या आहेत असे समजून खूप माणसे चिंतातूर झालेली असतात व परमेश्वराला सतत जाब विचारत असतात. जगातल्या सर्व घडामोडी काल, कर्म व स्वभावानुसार होत असतात. माणसाने त्याबद्दल परमेश्वराला, विशिष्ट व्यक्तीला, तिच्याच कर्माला अगर परिस्थितीला संपूर्ण जबाबदार धरता कामा नये. त्यामध्ये कांही गोष्टी आपल्या अनुकूल असतील, कांही नसतील. कांही इतरांना अनुकूल वा प्रतिकूल असतील व त्याही कालाच्या गतीनुसार बदलत राहात असतात. त्यामुळे शांतपणे, समदृष्टिने त्याचे, त्यातील योग्यायोग्यतेचा स्वीकार करून आपले कार्य करीत राहिले पाहिजे. चुका अगर दोष इतरांप्रमाणेच आपल्यांतही असतात याचेही भान सतत राहिले पाहिजे. संपूर्ण निर्दोष, सर्वगुणसंपन्न किंवा सर्वदोष युक्त असे कुणीच नसते. काल, कर्माच्या प्रभावाने चांगल्या व्यक्तींच्या हातूनही चुका घडण्याची शक्यता असते. परंतु भली माणसे आपल्या चुकांचे समर्थन करीत नाहीत. आपल्या हातून 'हिमालया एवढ्या चुका झाल्या' असे मोकळेपणाने कबूल करून महात्मा गांधींनी समाजाची, देशाची व परमेश्वराची क्षमा मागितली आहे ! अर्थातच अशा 'हरिजनां'च्या चुका सुधारण्याची मोठी जबाबदारी परमेश्वरावर, त्या हरिवर येऊन पडते. ती जबाबदारी परमेश्वर अत्यंत आनंदाने स्वीकारतो, एवढेच नाही तर त्यातील दुःख, दोष नाहीसे करून अत्यंत विमल, दिव्य यश प्रदान करतो !

डॉ. सौ. उषा गुणे.

18 December, 2008

उद्धरेत्‌ आत्मनात्मानं

उद्धरेत्‌ आत्मनात्मानं


देवकार्य, धर्मकार्य वा समाजकार्य यात "मम" म्हणणर्‍यांचा वाटा मोठा असतो, पण "मम"च्या जागी "इदं न मम" अशा भूमिकेवर येणं हे फार मोठं सौभाग्य, महत्‌भाग्य. श्रीगुरुज्ञानोबारायांनी dichotomisingचा, अध्यात्मातील अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत अनुभवांतून, आपल्या साहित्यांत जागोजागी मांडला आहे. म्हणजे एक आत्मारामच स्वतः आपल्याला आपल्यातच विभागून आपल्यालाच पाहतो, अनुभवतो, भक्तिप्रेमाचा आनंद अनुभवतो. आता माया धरून बसलेला आत्माच बाहेर येऊन परमात्मस्वरूपाने नटतो, दर्शन देतो. असा हा आत्मा - भगवंतच. मग रूप, रस, गंध, नाद, स्पर्श (पण अगदी अतिंद्रिय) अनुभवाने साधकासमोर आविष्कृत होतो. देह, मन व बुद्धि सुद्धा जड असल्याने त्यांना आत्मदर्शनाची शक्ति नाही तर हे दर्शन होण्यासाठी प्रज्ञा लागते. तो प्रज्ञेचा अधिकार, सन्मान आहे.

अशी प्रज्ञा परिणत होण्यासाठी साक्षात्कारी संतांच्याकडून नाममंत्राची, सबीजनामाची, बीजाक्षराच्या अनुग्रहाची मोठीच आवश्यकता असते. असा अनुग्रह लाभला, साधकाने, सत्‌शिष्याने सबीजनामाचा स्वीकार केला, एवढ्याने संपत नाही तर सुरुवात होते. श्रीसद्‌गुरुवचनावर अविचल श्रद्धा ठेवावी. नेमाने निष्ठापूर्वक पालन, संकल्प-विकल्प, एवढच काय, ध्यानविरहित होण्यासाठी सतत स्वतःचे स्वतःच आत्मनिरीक्षण व आत्मपरीक्षण करीत राहिले पाहिजे. श्रीमद्‌भगवद्‌गीता हेंच सांगते - "उद्धरेत्‌ आत्मन्‌ आत्मानं" त्यासाठी कथनी, करनी व रहनी यात एकवाक्यता फार फार मोलाची. ह्या त्रयीने अवघे जीवन व्यापलं पाहिजे.

यासाठी साधकाने, संसाराकडे विश्वस्त अगर साक्षी या नात्याने पहावे, म्हणजे मग संसाराचाच परमार्थ होतो. "दुःखांत सुख पाहावे", संसार दुःखमय आहे, तो भयग्रस्त आहे, तो मुळांत खोटा नाशवंत आहे, हे मनांत दृढ धरून मग संसार करावा म्हणजे तो बाधक नाही तर साधकच होतो. लाभ-तोटा, सुख-दुःख, यश-अपयश याकडे साक्षित्वाने पाहावे व निष्ठेने परमार्थ आचरावा. त्यातलं वर्म आहे - "मी देह नव्हे तर आनंदघन आत्माराम आहे" याची सतत आठवण असावी. 'जीवभावाचा शिवभाव करावा' त्यासाठीं काय करावे लागते ? सदा नामस्मरण करावे. 'देवा बरे झाले' असे अनुभवावे, खरे खरे सुख मिळते, खरी खरी शांती लाभते.

ज्ञान म्हणजे उपनिषदे, भगवद्‌गीता, ब्रह्मसूत्र, अकारादि प्रकरणादि ग्रंथ, भाष्य, टिका, वार्तिके, दर्शने, पुराणग्रंथ, संतसाहित्य यांचे शाब्दिक ज्ञान नव्हे. या शब्दज्ञानाला मग कांहीच मूल्य नाही कां ? तर आहे. या शाब्दिक ज्ञानाने काय होईल ? तर या शब्दज्ञानावर विश्वास असल्यास भगवंताच्या केवळ अस्तित्वाची खात्री होईल. फार फार तर साक्षात्काराच्या महाद्वारापर्यंत जाता येईल. पण आत्मसाक्षात्काराच्या गाभार्‍यात प्रवेश होणार नाही. म्हणून शब्दज्ञान हे ज्ञानच नव्हे, कां तर 'ज्ञान' ही एक परमविकसित अवस्था आहे. प्रत्यक्षानुभूती आहे. भगवंत बोलण्याची गोष्ट नाही तर तो प्रज्ञेनी अनुभवायचा आहे.

जी गोष्ट ज्ञानाचे तीच भक्तीची. भक्ति निष्काम असावी. एकनिष्ठ - अव्यभिचारी असावी. ही शुद्ध भक्तीची ठळक लक्षणे आहेत. अशा शुद्ध भक्तीची परिणती आत्मसाक्षातकारांत दर्शन, स्पर्शन, संभाषणादि अनुभूतीत होते. ही आवडीप्रमाणे सगुण किंवा निर्गुण अशा दोन्ही स्वरूपांत होते. प्रेमळ भक्ताला सगुणाचे प्रेमाबरोबर निर्गुणाचे ज्ञान असतेच, पण सगुणाचे विलक्षण प्रेम असते. भक्ति स्वयंफलरूप आहे म्हणून ती ज्ञानस्वरूपही आहे.

मग आपण काय करावे ? तर नामसाधना, नामस्मरण. दीर्घकाल, निरंतर व सत्कारयुक्त करीत राहावे. याने काय साधते ? तर हळूं हळूण् जीवभावाचा क्षय होतो व कमी होत होता त्याचाच मग शिवभाव होतो. देहबुद्धीची आत्मबुद्धि होते. या नामस्मरणांत निष्ठेबरोबर आर्जवाची मोठीच गरज आहे. आई लेकराला जेवायला घालताना किती आर्जव करते, तसेच नाम घ्यावे. अशा नामस्मरणाने भगवंत खुणा दाखवत असतो. त्या खुणा आपण ओळखाव्यात. तुकोबारायांच्या शब्दांत सांगायचे तर, "ओळखा रे वस्तू उघडा ज्ञान दृष्टी". आपण डोळे उघडे ठेवावेत, तो दाखवतो त्या खुणा ओळखाव्यात, या आनंदाच्या खूणा ओळखून नाम घेत राहावे.

अण्णा -

16 December, 2008

मानसमणिमाला (१५)

:
मानसमणिमाला (१५)
:

हिंदी : जडचेतन दोषमय बिस्व कीह्न करतार ।
संतहंस गुन गहहिं पय, परिहरि बारि विकार ॥ बा. का. १.६
मराठी : जड चेतन गुणदोषमय कर्ता निर्मि जगास ।
संतहंस गुण घेति पय, त्यजुनि जला दोषास ।
अर्थ : परमेश्वराने जगाची निर्मिती केली तीच मुळात जडचेतनयुक्त आणि गुणदोषमय अशी आहे. यांचे अगदी एकजीव मिश्रण झालेले आहे. परंतु संत हे हंसासारखे (नीराक्षिर विवेकी) असल्याने गुणरूपी दुधाचा स्वीकार करतात व दोषरूपी जलाचा त्याग करतात.

विश्वनिर्मिती करताना परमात्म्यानें जड-चेतन व प्रकृतिजगत सत्त्व रज तम हे त्रिगुण यांच्या मिश्रणानेंच ती केलेली आहे. ज्यांना आपण गुण अगर दोष अशी लेबले लावतो ते या गुणमयी प्रवृत्तीचे वेगवेगळे आविष्कार, प्रगटीकरण आहे, व ते जसे आहे तसे ते संतांना स्वीकार्य आहे. त्यामुळे संत या प्रकृतीवर कधीही रुष्ट होत नाहीत तर नेहमीच त्या आविष्कारांचा सदुपयोग कसा करता येईल याचाच विचार करतात. ज्याअर्थी परमेश्वरानेंच त्या तथाकथित गुणदोषांसहित ही निर्मिती केली त्या अर्थीं त्यांचेही काही काही विशिष्ट कार्य भगवंताला अपेक्षित असणार. तो परमेश्वराचा उद्देश समजण्याकरिता समदृष्टि व उदार मन यांची आवश्यकता असते. कुणाचा व कशाचाही तिरस्कार, द्वेष अगर आसक्ति न धरतां ते ते कार्य समजून घेऊन त्याप्रमाणे व्यवहार करणे यालाच म्हणतात 'नीरक्षिरविवेक' ! संतांच्या जवळ ही सूक्ष्म दृष्टि असते त्यामुळे ते दुष्टांचा दुर्जनांचा त्याग करीत नाहीत तर त्यांचेसाठी अशी प्रार्थना करतात कीं 'खळांची व्यंकटी सांडो । विश्व स्वधर्मे सूर्ये पाहो ॥' खळांच्या खल वृत्तीचा त्याग व त्यांच्या चैतन्यमयतेचा स्वीकार.

जड चेतनांच्या मिश्रणाबद्दल तर अधिकच गूढता आहे. शास्त्र असे सांगते कीं, "पूर्ण जडामध्येही चैतन्य असतेच व त्याचे प्रमाण :- जडांत १/३२, स्थावरांत १/१६ अंश, कीटक-पतंगादिकांत १/४ अंश, पशुपक्षी, मोठ्या प्राण्यांत ३/८, मनुष्यांत १/२, देवतांमध्ये ५/८ अंश व महासिद्धवंतांमध्ये १६ पैकी १० ते १२ अंश इतके असते. १६ पैकी १२ अंशांचे पुढे फक्त अवतारांमध्येच चैतन्याचा अंश असतो. प्रभु रामचंद्र व भगवान श्रीकृष्ण हे पूर्णावतार असल्याने त्यांच्यात जडाचा अंश मुळीच नाही तर ते १६ कलांचे पूर्णावतार आहेत. म्हणून आपण प्रार्थना करायची कीं, 'अस बिबेक जब देई विधाता । सब तजि दोस, गुनहि मनुराता ॥' परमेश्वराने हा विवेक आम्हांस द्यावा, त्यामुळे दोषदृष्टी नाहीशी होऊन गुणांमध्येच मन रममाण होईल. - जय श्रीराम.

डॉ. सौ. उषा गुणे.

15 December, 2008

रसो वै सः

रसो वै सः
:
तुकोबाराय भक्ताचार्य. निर्व्याज, निरंजन, दिव्य अशी भक्ति कशी प्राप्त करावयाची ? तर भक्ति म्हणजे खरोखरी अगदी नवीन, वेगळे असे काहीच करावयाचे नाही. फक्त आपल्या अंतःकरणाचे सर्वभाव आणि विचार हे एका भगवंताकडे वळवायचे. असं सर्वभावांनी, सर्वस्वी त्याच्याशी लगटून, त्याचेच होऊन राहणे हीच मंगलभक्ति.

अशी ही भक्ति परमप्रेमस्वरूप तर आहेच, पण अमृतास्वरूपाची सुद्धा आहे. भक्ताचार्यांनी भक्तीला उद्देशून 'रूप' आणि 'स्वरूप' असे म्हटले आहे. या दोन शब्दांत काही फरक आहे ? का एकाच अर्थाचे ? सामान्य व्यवहारांत हे दोन्ही शब्द एकार्थाचे वापरले जातात; पण भक्ति हे शास्त्र आहे. 'रूप' शब्दाने वस्तूचा रंग, आकार, उंची, भारमान, काठिण्य आदि बाह्य गुणांचा बोध होतो; तर त्या वस्तूच्या अंगभूत स्थायीभावाचे 'स्वरूप' या पदाने सुस्पष्ट होत असते. साधक भक्ति साधना करू लागला की त्याच्या आचार, विचार व उपासनेचे दर्शन इतरेजनांस/सर्वांना जाणवते. पण या परम प्रेमलक्षण भक्तीची सुधा (अमृत) जो प्रत्यक्ष भक्त चाखत असतो, त्यालाच त्याची अवीट गोडी कळते; इतरेजनांना नाही. पराभक्ति हे अमृत आहे. आणि ही भक्ति साध्य करून घेतलेला भक्त हा अमृतमयच नाही तर अमृतस्वरूप होतो.

अमृत म्हणजे काय ? जे मृत, नष्ट होत नाही ते अमृत. आत्मा/परमात्मा हाच एकमेव अमृत, अविनाशी आहे. म्हणून अशी भगवंताची परमप्रेमस्वरूपा भक्ति करणारा हा परमात्मस्वरूप, अमृतस्वरूप होतो.

अमृत म्हणजे मोक्ष, आपल्या समग्र भाव भावना, विचार व क्रियाव्यवहार यांचे शुद्धीकरण, उदात्तिकरण, आणि अध्यात्मिकरण करीत करीत साधकाला अपूर्णतेतूनच परीपूर्ण परमात्म्याकडे सुखरूपपणे घेऊन जाणारी प्रभावी शक्ति म्हणजे ही निष्काम, एकप्रवाही, परमप्रेमस्वरूप, अमृता भक्ति होय.

खरं सांगायचं तर अमृत म्हणजे अनुभवगम्य आनंदरस आहे. मात्र हा केवळ भौतिक, द्रवपदार्थ, रसायन नाही. तसेच सागर मंथनातून काढलेले (देव-दैत्यांनी) अमृतपण नाही. रस हा केवळ उपमेय भाव आहे. रस म्हणजे ब्रह्मरस, तथा भगवंताच्या परमानंदाचे अनुभवगम्य रसायन. भगवंत वस्तुतः रसमय आहे. भक्ताला अमृतरसपानाचे भाग्य लाभते. मग तो सर्वथैव आनंदातच राहतो, आनंदच होतो. आणि म्हणून द्रवीभूत ब्रह्मज्ञान, ब्रह्मरस म्हणजेच दुसरे तिसरे कांही नसून परमप्रेमस्वरूप भक्तिच.

या पराभक्तिच्या अमृतपानाने मत्त होऊन हरिनाम गात भक्त विश्वसंचार करतात आणि आपला स्वानुभवच जगाला सांगतात. नुसता सांगतात एवढेच नाही तर "सेवितो हा रस, वाटितो आणिका" अशा अवघ्या विश्वाला पाजतात.

भगवंत इतका रसमय, "रसो वै सः" की त्याच्यामुळे साहित्यातील असो वा स्वयंपाकातील असो सर्व रसांना रसत्व लाभते. तो रसराज आहे. मग त्याचे रूप, त्याचे नाम, त्याच्या लीला, त्याचे चरित्र केवढे रसाळ. नाम तर अमृताहूनी गोड त्या नामातून गळणारा रस अखंड सेवन करावयाचा, अमृतपान करायचं एवढंच भक्ताच काम.

अण्णा -


14 December, 2008

मानसमणिमाला (१४)

मानसमणिमाला (१४)


हिंदी : खल अघ अगुन, साधु-गुन गाहा । उभय अपार उदधि अवगाहा ॥
तेहि तें कछु गुनदोस बरवाने । संग्रह त्याग न बिनु पहिचाने ॥ बा. कां. १.५.२
मराठी : खल अध अगुण साधुगुण वर्णन । दोन अपाय पयोधि च ठाव न ।
म्हणुन अल्प गुण दोष वानले । त्याग न संग्रह विना जाणले ॥

अर्थ : खलांच्या पापांचे, अवगुणांचे वर्णन व साधुंच्या गुणांचे वर्णन (गाथा) हे दोन्ही अपार अगाध सागरच आहेत. म्हणून मी त्यांचे थोडे थोडकेच वर्णन करीत आहे. त्याचे कारण असे की अवगुणांचा, दोषांचा त्याग किंवा सद्‌गुणांचा स्वीकार ते जाणल्याखेरीच करताच येत नाही.

या जगांत असंख्य सद्‌गुण व असंख्य दुर्गुण आहेत. जणू ते दोन महासागरच ! सर्व जग हे गुणावगुणांनीच भरलेले आहे. ईश्वरानेंच सृष्टि निर्मिती करतांना सत्त्व, रज, तम या तीन गुणांनी युक्त अशीच केलेली आहे. त्यामुळे प्रत्येक पदार्थ, वस्तू, प्राणी, मनुष्यमात्र तिन्ही गुणांनी युक्त असतात. परंतु मनुष्याला मात्र या तीनही गुणांतून निर्माण होणारे असंख्य सद्‌गुण वा दुर्गुण यांचे ज्ञान करून घेता येते. या ज्ञानाच्या सहाय्याने त्याला आपली उन्नती करता येते.

आपल्या मधील दोष, अवगुण ओळखता आले पाहिजेत, तरच त्यांचा त्याग करता येईल तसेच इतरांचे गुण ओळखता आले पाहिजेत, तर त्यांचे अनुकरण करता येईल. समर्थ म्हणतात - 'या कारणे करंट लक्षणे । ऐकोनी त्यागचि करणे । म्हणिजे कांही एक बाणे । सदेवलक्षण ॥ दास. १९.३.३
परंतु साधारणतः मनुष्य उलटेच करतो. इतरांचे सद्‌गुण न बघतां केवळ दोषदर्शन, वर्णन इतके सतत चालते कीं ते दोष स्वतः मध्येंच केव्हां येऊन रुजले ते त्याला कळतही नाही. त्यामुळे स्वतःच्या सद्‌गुणांनाही तो मुकतो. स्वतःच्या दोषांचे अलिप्तपणे मूल्यमापन करता आले पाहिजे व कठोरपणे त्याग करता आला पाहिजे. इतरांच्या दोषांचे मूल्यमापन सहृदयतेने करून त्यांचा अलिप्ततेने स्वीकार अगर अस्वीकार करता आला पाहिजे.

तसेच आपल्या सद्‌गुणांचा खूप बडेजाव न करता ते ओळखून त्यांचा सदुपयोग करता आला पाहिजे व इतरांच्या सद्‌गुणांचा मान राखता आला पाहिजे. परंतु त्याकरिता गुण - अवगुण अलिप्तपणे शोधतां आले पाहिजेत व त्यातून बोध घेऊन त्यांचा त्याग-स्वीकार केला पाहिजे. 'हिताऽहिता पशुपादी जाणती । मनूज-तनू गुणबोध खाण ती ॥ असे गोस्वामी म्हणतात ते याचकरिता.

डॉ. सौ. उषा गुणे.

13 December, 2008

वृक्ष नामबीजाचा

वृक्ष नामबीजाचा
.
परमार्थात सद्‍गुरूंची किती आवश्यकता आहे ते उपनिषदांपासून ज्ञानेश्वरमहाराज तुकोबारायांपर्यंत सार्‍यांनी एकमुखाने सांगितले आहे. आत्मज्ञान हे अत्यंत गहन असल्यामुळे (राजविद्या राजगुह्यं) ते केवळ स्वतःच्या बुद्धिबळावर प्राप्त होणे शक्य नाही. त्यासाठी ज्याने ते करून घेतले आहे, अशा आत्मज्ञानी श्रीगुरूची मोठी आवश्यकता आहे. कठोपनिषदांत असे अगदी सुस्पष्ट व ठामपणे म्हटले आहे. पारमार्थिक अज्ञानाची काळोखी रात्र श्रीगुरुकृपेच्या सूर्योदयावांचून उजळत नाही.

श्रीगुरू हा सत्‌शिष्याने - साधकाने परीश्रमपूर्वक साधनबाग फुलवणारा उपायन वसंत आहे. एका मूळसिंचनाने लता वेली वृक्षाच्या शाखापल्लवांना टवटवी यावी, त्याप्रमाणे एक गुरुभक्तिने, गुरुसेवेने (म्हणजे गुरुपदिष्टित साधनाने) साधक 'पूर्णकाम' कृतकार्य होतो; असा खुद्द श्रीगुरुज्ञानेश्वर माऊलीचा निर्वाळा आहे. गुरुकृपा ही आत्मानंदाच्या भांडारगृहाची एक किल्लीच आहे. प्लेटो सारख्या पाश्चात्य तत्त्वज्ञानेंही "गुरुमुखांतून लाभणारे जीवनज्ञान व पुस्तकातील निर्जीव ज्ञान यांची तुलनाच होऊं शकत नाही" असे म्हणून श्रीगुरूची आवश्यकता प्रतिपादिली आहे.

'सद्‌गुरू शिष्यासाठी काय करतात ?' दूरध्वनीच्या उपमेने हे छान स्पष्ट करून सांगता येईल. आपल्याला दूरवर कोणाशी बोलावयाचे असेल तर आपण क्रमांक फिरवितो, आणि एक्सचेंजच्या द्वारा तो क्रमांक जोडला जातो. हेंच कार्य श्रीसद्‌गुरु करतात. ते देव व भक्त यांची गांठ घालून देतात. विजेच्या पॉवर हाऊसची उपमा देऊन असे म्हणता येईल कीं, श्रीसद्‌गुरु म्हणजेच साक्षात्कारी संत. हे विजेच्या मुख्य तारांप्रमाणे असून आपण सर्वजण त्या तारांच्या उपशाखांना लावलेल्या विजेच्या दिव्यांप्रमाणे आहोत. मुख्य तारांतून विद्युतप्रवाह आला कीं सर्व दिवे एकदम प्रकाशतात. त्याचप्रमाणे साक्षातकारी संतांच्या अंतःकरणांत भरून राहिलेला भगवंताच्या चित्‌प्रकाशाचा झोत त्यांच्याशी संबद्ध झालेल्या त्या साधकांच्या - शिष्यांच्या अंतःकरणांत चित्‌प्रकाश उत्पन्न करतो.

जेथें देव जागा झाला आहे, त्याच्याशी संलग्नता साधली कीं देव अगदीं हमखास संपडतोच. यासाठीं नादाच्या निनादाचा (resonance) दृष्टांतहि चांगलाच लागू पडतो. सुरात लावलेल्या सतारीची एक तार छेडली, तर दुसर्‍या बाकीच्या तारा आपोआपच वाजू लागतात. त्याप्रमाणे आत्मानंदाचा दिव्य झणत्कार ज्यांच्या ठिकाणी झणाणत असतो, त्यांच्या संगतीने, तो त्याच्या सत्‌शिष्यालाही प्राप्त होतो.

"अंतरीं गेलियां अमृत । अवघी काया लखलखीत॥" या न्यायाने ज्याच्या अंतरीं स्वरूपस्थिती बाणली असा साक्षात्कारी सहजच गुरूत्वाला पोहोचतो. ज्याच्याकडे पाहिले असतां भगवंताकडे पाहिल्याचे समाधान मिळते तो संत, तो श्रीगुरू. हे श्रीगुरु आपल्या शिष्याला त्याच्या ठिकाणींच गुप्त रूपांत असलेल्या स्वात्मानंदाची स्वानुभवाच्या पातळीवर ओळख करून देतात.

श्रीगुरू स्वतः भगवत्‌नामाचा प्याला भरभरून आपण तर पितातच व आपल्या सत्‌शिष्यालाही पाजतात. "सेवितो हा रस, वाटतो आणिका ।" असं तुकोबारायपण म्हणतात. नामस्मरणांत भाव फार महत्त्वाचा. भगवंताला पण हा अंतःकरणातील भाव फार फार प्रिय. आणि हा भाव निर्माण होण्याचे साधन म्हणजे नामस्मरण. "सार, सार, सार नाम, विठोबा नाम तुझे सार"

असे नाम श्रेष्ठ कां ? तर हे नाम भगवंताच्या रूपाचा - आनंदाचा अनुभव आणून देते म्हणून. नाम हे तेल असून त्यांत मनाची वात चांगली भिजवली असतां भगवंताच्या रूपाची ज्योत श्रीगुरुकृपादृष्टी काडीने पेटते. नाम हे सगुण व निर्गुण या भगवंताच्य दोहीं स्वरूपाचे साक्षी असून स्वानंदाचा प्रकाश नामधारकाच्या जीवनांत पसरविणारी दिव्य स्वयंभू ज्योतच आहे. अशा नामाचाच श्रीगुरुंकडून मिळालेल्या नामाला दिव्य नाम अगर सबीजनाम असे म्हणतात. अशा सबीज नामाचे रुपांतर पारमार्थिक अनुभवाच्या वृक्षांत होते.

श्रीगुरू नाम-बीज देतात. पोते भरून खाण्यासाठी फुकट दाणे देत नाहीत. ते बीज नाम साधनेच्या शेतांत पेरून, राबून, मशागत निगराणी करून स्वतःच पिकवावी लागते. असे दिव्य नाम पूर्वजन्मींचे सुकृत असल्याशिवाय थोडेच मिळते ?
अण्णा -

12 December, 2008

मानसमणिमाला (१३)

मानसमणिमाला (१३)
:

हिंदी : गुन अवगुन जानत सब कोई । जो जेहि भावनीक तोहि सोई ॥ बा. कां. १.४.९

मराठी : गुण अवगुण सगळेच जाणती । जो ज्या रुचे श्रेष्ठ तो गणती ॥

अर्थ : गुण किंवा अवगुण कशाला म्हणायचे हे सर्वजण जाणतात. परंतु ज्याला यातील जे चांगले वाटते तेच तो योग्य वा श्रेष्ठ मानतो व स्वीकारतो.

साधारणतः समजूत अशी असते कीं लहान मुलाला चांगले वाईट, खरे खोटे यांतला फरक फारसा चांगला समजत नाही तसाच अडाणी अज्ञ व्यक्तीसही चांगले वाईट गुण अवगुण यातील फरक किंवा गुण कोणते अवगुण कोणते हे नीट कळत नसावे. म्हणूनच त्यांच्या हातून अनेक चुका होतात. पण ही समजूत खरी नाही. सर्व माणसांना परमेश्वराने सत्‌ असत्‌ विवेकबुद्धि दिलेली असते, व त्यामुळे गुण कशाला म्हणतात, योग्य काय अयोग्य काय, अवगुण कोणते हे सर्वांना समजते. परंतु त्याच ज्ञानाचा स्वतःच्या बाबतीत उपयोग करायची वेळ आली की भल्याभल्यांची फसगत होते व चुकीचे निर्णय घेतले जातात.

स्मर्थ म्हणतात : सकळ अवगुणांमध्ये अवगुण । आपले अवगुण वाटती गुण ।

मोठे पाप करंटपण । चुकेना की ॥ दासबोध १९.८.८

रागीट स्वभाव हा दुर्गुण समजला जातो, पण तो इतरांचा ! आपल्या रागीटपणाचे आपण नेहमी किती प्रकाराने समर्थन करतो, त्याची आवश्यकता स्वतःला आणि इतरांनाही पटवून देतो ! त्यामुळे तो रागीटपणा सोडून देण्याचा प्रश्नच येत नाही. त्यालाच समर्थांनी 'करंटेपणा' म्हटले आहे. कारण सुधारण्याची तिथे आशाच राहात नाही. आपल्या दुर्गुणांचे दुर्गुणत्व बोचत नाहीच, उलट ती एक अभिमानाचीच गोष्ट आहे असे वाटते. "पहा बरं, माझा स्वभाव फार रागीट आहे, तेव्हां तुम्हीच जपून वागा !' म्हणजे मी कांहीही सुधारणा कधीच करणार नाही ही गर्भित धमकी.

याचे उलट ज्याचे जवळ कांही सद्‌गुण आहेत त्यालाही त्या सद्‌गुणांचे महत्त्व चांगलेच समजलेले असते त्यामुळे ते वाढीला कसे लागतील याचा तो अगदे आवडीने प्रयत्‍न करतो, पण त्यालाही त्याचा थोडासा अभिमान असतोच. समर्थ सहजपणे सुचवितात - 'मूर्ख मूर्खपणे भरंगळती । ज्ञाते ज्ञातेपणे कलहो करिती । होते दोहोकडे फजिती । लोकांमध्ये ॥ दा. १९.७.२९

आपले किंवा इतरांचे सद्‌गुण किंवा अवगुण योग्य तऱ्हेने जाणून घेऊन त्याचे उपयोग अगर समर्थन करावे अन्यथा लोकांमध्ये आपली फजिती होणार हे ठरलेलेच आहे.

डॉ. सौ. उषा गुणे.




11 December, 2008

अमला भक्ति

अमला भक्ति
:
श्रीगुरुजवळ काय मागावे तर "अवीट पदपद्माची अमला भक्ति दे मला." हे सद्‌गुरुराया, तुझ्या पदकमली रमून जाणारी, अवीट गोडी असलेली, अशी ती अमला भक्ति तेवढी मला द्या. अमला भक्ति = शुद्धभक्ति, परमश्रेष्ठ भक्ति असाच तिचा अर्थ आहे. अशी ही अमला भक्ति भक्तीमध्ये सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. ज्याचे मन, बुद्धी, काया, आणि वाचा पूर्ण शुद्ध झालेली असते, जो आनंद, समाधान, प्रसन्नता यांचाच जणू प्रत्यक्ष मूर्तिमंत आकार असतो. स्वतः भगवंताचा, सद्‍गुरूंचा दास म्हणवून घेण्यातच ज्याला कृतार्थता वाटत असते असा भक्त जी भक्ती करतो तीच अमला भक्ती.
" मुखी अमृताची वाणी । देह देवाचे कारणी । सर्वांग निर्मळ । चित्त जैसा गंगाजळ ॥ " असा असून जो भक्तीच करतो ती अमला भक्ती. अशा भक्ताच्या ठायी मग विवेक, वैराग्य, ज्ञान अगदी सहजपणाने प्रकट होतात. त्या शिवाय त्याच्या ठिकाणी रसमयता, आनंद हा त्या भक्ताचा उल्लेखनीय विशेष असतो. श्रद्धा, निखळ भक्तीप्रेमभाव त्याच्या ठिकाणी ओसंडून वाहात असतो बघ. तो सदा सर्वदा समर्पितच होऊन गेलेला असतो. ही सर्व लक्षणं तर अतिश्रेष्ठ भागवतांची सामान्य लक्षणं आहेत.
असा भक्तभागवत मग देवाजवळ, श्रीगुरुंजवळ अशा अमला भक्तीशिवाय दुसरं काय मागणार ? नामदेवासारखे श्रेष्ठ भक्तराज काय मागतात बघ ! "देई भक्तिरस प्रेमा । देवा घाली आम्हा जन्मा ॥" असा लडिवाळ हट्ट भक्तच फक्त आपल्या देवाकडे, श्रीगुरुंकडे करू शकतात. भगवंताशी, श्रीगुरूमाऊलीशी अशा भक्ताचे एक अतूट, अत्यंत सुंदर, नितांत रमणीय, परमविशुद्ध आणि ऋजु असेच नाते जमून गेलेले असते. भक्तिप्रेम - प्रेमभक्ति या पलीकडे त्याला कांही कळत नाही. तो काही पाहात नाही आणि अनुभवीत सुद्धा नाही. याला 'संयोगदीक्षा' असं भक्तिशास्त्रकार म्हणतात. "मिळोनि मिळतची असे । समुद्री गंगाजळ जैसे । मी होवोनी मज तैसे । सर्वस्वे भजती ॥" अशी त्या भक्ताची अवस्था होऊन गेलेली असते. भक्त भगवंताला सर्वार्थानी, सर्वांगानी समर्पित होतो. आणि पहा भगवंत तर त्याचा स्वतःहून अंकित होऊन राहतो. अशा त्या भगवंतालाही प्रिय असण्यार्‍या अमला भक्तीची प्राप्ती होऊन, तद्‌द्वारा अमलानंद (म्हणजे परमपवित्र, परमश्रेष्ठ आनंद) आपल्याला प्राप्त व्हावा अशीच मागणी भक्त भगवंताजवळ, श्रीगुरुरायांजवळ करत असतो. समुद्रावर समुद्राची लाट आनंदाने, अत्यानंदाने क्रीडा करते. आकाशात वारा अगदी मुक्तपणे वाहात असतो, तसेच भक्ताचे असणे म्हणजे भगवत्‌ सत्तेतील आनंदक्रीडाच असते.
परमरसाने अमृतरसाने रसना ओलावली, मनाची वृत्ती आनंदकंदाच्या चरणी राहिली, या विश्वातील सगळी मांगल्ये एकत्र येतात, आनंदजळाचीच वृष्टी होते, मग अशाने सगळीच्या सगळी, अगदी सगळीच्या सगळी इंद्रिये ब्रह्मरूप होतात, त्यांना सर्व क्रियाकर्मामध्ये एका स्व-स्वरूपाची, आत्मस्वरूपाचीच प्रचिती येते, त्याच्याजवळ प्रत्यक्ष देवच नांदत असतो.
अशी अमला भक्ती लाभलेला भक्त सहजच स्वरूपज्ञानी असतोच. ज्ञान, कर्म, योग त्याच्या ठिकाणी सहजच नांदू लागतात. तो तत्त्वज्ञ, भक्त आणि जीवनमुक्तही असतो. थोडक्यात सांगायचे तर तो परमार्थाचे भूषणच होऊन गेलेला असतो. भगवंतानी स्वमुखाने अशा भक्ताचे वर्णन केले आहे. झाडाच्या फांद्या जरी लहानमोठ्या असल्या तरी त्या जशा एकाच झाडाच्या असतात; सूर्यकिरणे अनंत असली तरी ती जशी एकाच सूर्याची असतात, तसेच प्राणीमात्र भिन्न भिन्न असले तरी त्यांच्या अंतर्यामी एकच एक परमात्मा भरून राहिलेला असतो.
भक्त हा स्वरूपज्ञानी असतोच. रामकृष्ण म्हणत "मूल वृद्ध होण्याचे नाकारीत असेल तर ती विकृतीच मानावी लागेल. बीजाचा अंकुर, अंकुराचे रोपटे, रोपट्याचा वृक्ष असाच विकास झाला पाहिजे. तसाच भक्त हृदयाचा पण विकास झाला पाहिजे आणि भक्तीने तो होतोच होतो. सर्वत्र भरून राहिलेले, विलसत असलेले चैतन्य हे आपल्या उपास्य दैवताचे, श्रीपांडुरंगाचे खरे व्यापक स्वरूप आहे हे त्याला ओळखता येते. सर्व रूपानी सर्वत्र एक आपला पांडुरंगच नटला आहे असा व्यापक अनुभव त्याचा असतो. "जेथे तेथे देखे, तुझीच पाऊले । विश्व अवघे कोंदाटले ॥ अशा व्यापक स्वरूपावर आरूढ झाल्यावर पुन्हा त्याचे नामाचा उच्चार, स्मरण, चिंतन नित्य व्हावे हेही मागणे भगवंताजवळ असतेच.

अण्णा -

30 November, 2008

नामसाधना - ६ (अंतिम)

नामसाधना - ६ (शेवटचा भाग)
आतापर्यंत नामस्मरण कसे, तसेच अति दक्षतेने करणे का आवश्यक आहे हा विचार झाला. पण नामस्मरण कशासाठी करायचे ? मोक्षप्राप्ती साठी, मुक्तिसाठी, परमेश्वर प्राप्तीसाठी आनंदप्राप्तिसाठी वगैरे म्हणतात. पण मोक्ष, मुक्ति, परमेश्वर प्राप्ती, नित्य आनंद स्थिती म्हणजे नेमके काय ?
वेदांतात चार सूत्रे 'महावाक्ये' म्हणून प्रसिद्ध आहेत. प्रज्ञानं ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म, तत् त्वं असि, अहं ब्रह्मास्मि, ही ती चार वाक्ये होत. ब्रह्म हे सर्व दृष्य जगताचे अधिष्ठानरूप आहे, प्रत्येक चेतन व जड वस्तूमध्ये ब्रह्म ओतप्रोत भरलेले आहे म्हणून 'सर्वं खलु इदं ब्रह्म' असे म्हणतात. जड आणि चेतन असे वेगळे वेगळे काही नाहीच, सर्वज ऊर्जा आहे, प्रत्येक वस्तू एका ऊर्जेचाच आविष्कार आहे, तर सर्वं दृष्यं जगत् खलु इदं ऊर्जा एव असे म्हणायला हरकत नाही. पण तेच ब्रह्म प्रत्येक प्राणीमात्राच्या हृदयात 'अंगुष्ठमात्रं तिष्ठति' असे म्हणतात. अर्थात् 'हृदयात अंगठ्या एवढ्या रूपाने राहतो' हे काल्पनिक आहे, physical नव्हे. त्याचा भावार्थ असा की तेथे तो साक्षीभावाने वास करतो. साक्षीभावाने म्हणजे ? म्हणजे या दृष्यमय जगताचे , या दृष्य ब्रह्माचे अदृष्य असणारे अधिष्ठान - the prime support. पण त्याला ब्रह्म म्हणत नाहीत. त्याला आत्मा म्हणतात. आता बाहेर जगत् रूपाने दिसते ते ब्रह्म आणि या दृष्य जगताचा, या ब्रह्माचा, हृदयात साक्षीरूपाने पाहणारा असतो तो आत्मा हे दोन्ही एकच आहे. पण बाहेरचे ते ब्रह्म आणि आंतला तो आत्मा, असे एकाच वस्तूला दोन नावांनी संबोधण्याचे convention आहे इतकेच. गोंधळ होतोय ना ? त्या ब्रह्माने जेव्हां 'एकोऽहं, बहुस्याम्' असा संकल्प केला [पहा ऐतरेय उपनिषद] तेव्हां आपल्या क्रीडेसाठी ८४ लक्ष योनी (शरीरे) निर्माण करून त्यात साक्षीरूपाने तो वास करता झाला. ह्या सर्व योनी म्हणजे जीव. हा जीव जेव्हां आपल्या शरीराशी तादात्म्य पावतो, तेथे अहंभावाने व्यवहार करतो तेव्हां त्याला आपल्या नित्य सत् चित् आनंद स्थितीचे विस्मरण होते आणि त्याची स्वस्वरूप जी ज्ञान स्थिती असते त्यावर अज्ञानाचे आवरण येते. त्याक्षणीच जीवाची संसार कहाणी आरंभ झाली. तो एकम् एव अद्वितीय असूनही आपल्या बुद्धीनेच, कल्पनेनेच आपले जगत् निर्माण करतो आणि आपल्या जगतात आपल्याहून भिन्न अशा अनेक वस्तू निर्माण करतो. आणि त्या वस्तूंपासून सुख मिळविण्याचा प्रयत्‍न करीत राहतो. [इथे म्हटले आहे की 'प्रत्येक जीव आपले एक जगत् निर्माण करतो’. पण माझ्या जगतातील कितीतरी गोष्टी इतर अनेक जीवांच्या जगतात, त्यांच्या ओळखीच्या असतात, हे कसे ? ह्याचे स्पष्टीकरण विस्तारभयास्तव अशक्य आहे. परत कधीतरी त्यावर चर्चा करता येईल. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी योगवासिष्ठ, निर्वाणप्रकरण (पूर्वार्ध), सर्ग ५२ पाहावा]. द्वैतात सुख नसल्यामुळे तो जीव कधीच सुखरूप होऊ शकत नाही. मग पुनरपि जननं पुनरपि मरणं करीत अनेक जन्मात दुःखच दुःख पावल्यामुळे एक दिवस असा उजाडतो की थकला भागलेला जीव चिरंतन आनंदाचा शोध घ्यायला लागतो. मी कोण चा शोध घेत घेत जेव्हां त्याने पसरलेले हे जगत् म्हणजेच इदं सर्वं अहं असा ठाम निश्चय होऊन त्याच्याशी जेव्हां एकरूप होतो, थोडक्यात आपल्या हृदि स्थित असलेल्या आत्म्याला ओळखतो तेव्हां त्याला त्याच्या मूळ स्वस्वरूप सत् चित् आनंदाची अनुभूति होते. पण हे 'ओळखतो' म्हणजे काय होते ? तो ओळखतो तेव्हां त्याची कोणती स्थिती असते ? तूर्त एवढेच समजायचे की आपण ज्याला जाग्रत् म्हणतो तीही जीवाची ज्ञानप्राप्ती पूर्वीची स्वप्न स्थिती आहे. ज्ञानप्राप्ती नंतरची स्थिती म्हणजे तुर्यावस्था. विस्तारभयास्तव ह्याचे स्पष्टीकरण येथे देणे अवघड आहे. ऐतरेय उपनिषदात ह्याचा उहापोह आहे. थोडक्यात आपण ज्याला जाग्रत् अवस्था समजतो त्या स्वप्नमय, आभासरूपी जगतातून बाहेर पडून खर्‍या अर्थाने जागे होणे म्हणजेच 'मी' ला ओळखणे. म्हणजे आपण सर्व झोपेत आहोत आणि स्वप्न बघतो आहोत असे आहे का ? होय, असेच आहे. म्हणून तर भगवंत गीतेच्या दुसर्‍या अध्यायात (२/६९) म्हणतात - या निशा सर्व भूतानां तस्यां जागर्ति संयमी । यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥ ज्या आत्म्याच्या बाबतीत मनुष्ये निजलेली, म्हणजे अज्ञानी असतात, त्या बाबतीत स्थिरबुद्धि योगी जागरूक असतो, तसेच ज्या प्रपंच्याच्या बाबतीत मनुष्ये जागरूक असतात, त्या बाबतीत योगी निजलेला, म्हणजे त्यापासून निवृत्त असतो. म्हणूनच श्री शंकराचार्य याला 'मिथ्या जगत्' म्हणतात.
आपल्या अंतरंगात जो आत्मा आहे तो मीच. गुरू आपल्याला 'तत् त्वं असि', म्हणजे तो जो आत्मा तो तूच आहेस असे सांगतात. त्याची अनुभूति आल्यावर जीव म्हणतो ओ हो, आता समजले. मग तो म्हणतो 'अहं ब्रह्मास्मि' , तो मीच आहे. 'तो मीच होय' अशी अनुभूति म्हणजेच मोक्ष, मुक्ति, परमात्मप्राप्ति, आनंदप्राप्ति वगैरे वगैरे. म्हणजे 'तो आत्मा मी आहे' ही वेदांताची central theme आहे असे म्हणायला हरकत नाही. मग कोणतीही साधना असो, 'मी' चा शोध, परमेश्वर प्राप्ति, मुक्ति, मोक्ष ह्या सर्वांचे मर्म 'तो मीच होय' असे जाणणे, उमजणे आहे. परमार्थात जर हे ध्रुपद बाजूला सारले तर बाकी काहीच शिल्लक राहात नाही. ह्याव्यतिरिक्त परमार्थ संबंधी जे काही आपण करू ती नुसतीच बौद्धिक कसरतच म्हणावी लागेल. साधनेचे पर्यवसन, मग तो ॐ, तो राम, तो परमात्मा दुसरा तिसरा कोणी नसून ’मीच तो' अशा प्रकारे होईपर्यंत साधना करणे, नाम घेणे नितांत आवश्यक आहे. आणि नुसतेच नाम घेत राहणेही पुरेसे नाही. त्यालाही साधन चतुष्टयाची जोड देखील नितांत आवश्यक आहे. आणि त्याकरिता साधनेत quantity तर पाहिजेच पण ती ज्या quality ने युक्त असेल त्या प्रमाणात गति लाभेल असे मला वाटते. मित्रांनो, आतापर्यंतच्या माझ्या लिखाणावरून वाटेल की, श्रीमहाराजांनी अगदी सोपे म्हणून जे सांगितले ते मी इतके क्लिष्ट, इतके भयावह करून का सांगतो आहे ? पण मला वाटत नाही की श्रीमहाराजांनी खरोखरच सांगितले की 'ते खरंच फार फार सोपे आहे' आपण जर सर्वच प्रवचनांचा आढावा घेऊन त्यावर चिंतन केले तर आढळेल की प्रपंच निवृत्ति आणि परमार्थ प्रवृत्ति जागी करण्याची गोडी लागावी ह्यासाठीच महाराजांनी सर्व खटाटोप केलाय. आणि एकदा का गोडी लागली, एकदा का मनुष्य मार्गी लागला तर मग कष्ट हे कष्ट राहात नाहीत. मनाच्या या स्वभावाबद्दल श्रीज्ञानेश्वरांच्या दोन छान ओव्या आहेत -
परि वैराग्याचेनि आधारें । जरी लाविलें अभ्यासाचिये मोहरें ।
तरी केतुलेनि एके अवसरें । स्थिरावेल ॥ ६/४१९ ॥
कां जें यया मनाचें एक निकें ।जें देखिलें गोडीचिया ठाया सोके ।
म्हणौनि अनुभवसुखचि कवतिकें । दावीत जाइजे ॥ ६/४२० ॥
आणि परमार्थ खरंच जर सोपा असता तर श्रीतुकारामांना - परमार्थ नोहे लेकुरांच्या गोष्टी - असे म्हणण्याची काय आवश्यकता होती ?
समाप्तः
एकोहम् 

27 November, 2008

दैव आणि पुरुषार्थ -

दैव आणि पुरुषार्थ -
दैव हा शब्द सहसा negative अर्थाने वापरला जातो. एकाच तत्त्वाची ही एक बाजू. त्याची जी दुसरी बाजू आहे त्याला लोक भाग्य म्हणतात. दैव वा भाग्य हे दोन्ही आपल्या गतकर्मानुसार मिळतात. पण जेव्हां अनिष्ट गोष्टी घडतात तेव्हां आपण त्या घटनेला " माझे दैवच खोटे " म्हणून दैवावर खापर फोडतो. जेव्हां अनुकूल गोष्टी घडतात, तेव्हां म्हणतो, "किती थोर भाग्य माझे, मागच्या जन्मी मी पुण्यकर्मे केली त्याचे हे फळ". म्हणजे आता जे माझ्या भाग्याला आले आहे ते माझ्या गतकालीन् सत्कर्मामुळे आणि आत्ता जे मला भोगावे लागते आहे ते ’त्याची' वक्रदृष्टी यामुळे. माणूस आपल्या संचितातल्या दुष्कर्मांना आपण जबाबदार आहोत हे कबूल करायलाच तयार नसतो.
वाल्मीकि रामायणात जेव्हां कैकयी आपला डाव टाकते तेव्हां श्रीराम लक्ष्मणाला म्हणतात, " या सगळ्याला दैवच कारणीभूत म्हटलं पाहिजे. माझ्या मतानं कैकेयीचे हे विपरीत मनोरथ दैवाचंच विधान आहे. जर तसः नसतं तर तिनें मला वनवासात पाठवून पीडा देण्याचा विचार का केला असता ? तू तर जाणतोसच की, माझ्या मनात आधी कधी मातांच्यात भेदभावा आला नाही आणि कैकेयीही कधीच माझ्यात व स्वतःच्या पुत्रात फरक करीत नव्हती. माझा अभिषेक थांबविण्यासाठी व वनवासात पाठविण्यासाठी महाराजांना प्रेरीत करण्यासाठी तिनं ज्या भयंकर कटू वचनांचा प्रयोग केला, तो सामान्य मनुष्याच्या तोंडून निघणं कठीणच. तेव्हा असा प्रयत्‍न दैवामुळंच समर्थनीय ठरतो. जर असं नसतं तर त्या उत्तम स्वभावाच्या व श्रेष्ठ गुणयुक्त राजकुमारी कैकेयीनं एका साधारण स्त्रीप्रमाणे आपल्या पतीसमोर मला पीडा देणारी गोष्ट काढली असती का ? ज्या विषयी कधी विचारही झाला नाही तेच दैवाचं विधान आहे. प्राण्यांमध्ये अथवा देवांमध्येसुद्धा कोणीच असं नाही की जे दैवाधीन नाही, तेव्हा नक्कीच दैवानंच हे फेरफार माझ्यात व कैकेयीत घडवून आणले आहेत." [वालिमीकि रामायण, बालकाण्ड, सर्ग २२, श्लोक १४-२०] श्रीरामांनी लक्ष्मणाला हे सांगितलं खरं [तो बिचारा शेषाचा अवतार, म्हणजे विष्णूचा सेवकच. Yes Sir म्हणून गप्प बसला. ’ह्या अवताराआधी तू काय काय क्लुप्त्या केल्यास मला ठाऊक नाहीत का ' असे नाही म्हणाला] पण रामावतारापूर्वी श्रीविष्णूने तीन चार अशी कर्मे केली होती की त्याला निरनिराळ्या आर्य स्त्रियांनी "तुलाही पत्‍नी विरह भोगावा लागेल" असा शाप दिला होता. पुराणांतून या कथा आलेल्या आहेत. ही झाली त्याच्या दैवाची पूर्व कहाणी. त्याबद्दल श्रीराम काही बोलले नाहीत.
महाभारतात भारत युद्धानंतर धृतराष्ट्राचे सर्व मनोरथ धुळीस मिळाले. सर्वनाश होण्यास मुख्य कारणीभूत कोण होता तर धृतराष्ट्र्; याबद्दल कोणाचे दुमत असेल असे मला वाटत नाही. तरीही तो संजयाला सांगतोय -
न मे विशेष पुत्रेषु स्वेषु पाण्डुसुतेषु वा ।
वृद्धं मां अनुसूयन्ति पुत्रा मन्युपरायणाः ।
अहं तु अचक्षुः कार्पण्यात् पुत्रप्रीत्या सहामि तत् ॥
- मी कधी माझ्या व पाण्डुपुत्रात भेद केला नाही. पण काय करावे, माझे पुत्र क्रोधाला वशीभूत होत मलाच दोष देऊन माझी कधीही कोणतीही गोष्ट ऐकत नसत. मी अंध आणि दीन आहे ना ? म्हणून मी हा सर्व (दोषारोपाचा) अन्याय सहन करीत आलो आहे. पुढे तो संजयाला कमीत कमी ६५ अशा घटना सांगतो की त्या जसजशा घडत गेल्या त्या प्रत्येक समयी त्याने विजयाची आशाच सोडली होती. संजय देखील मुकाट्याने ऐकून घेतो असे नव्हे. श्रीव्यासांच्या विशेष मर्जितला शिष्य तो. आपण जसे घरात बसून टीव्ही बघतो तसे त्याला बसल्या जागी सर्व युद्ध पाहण्याचीच काय पण एवढ्या अफाट सैन्यात कोण कोण कसल्या चर्चा करत आहेत हे सुद्धा स्पष्ट ऐकता येईल अशी दिव्य दृष्टी दिली होती. तो निर्भय होता. तो धृतराष्ट्राला म्हणाला " तू पुत्रांविषयी शोक करणे तर मुळीच उचित नाही. " त्याने पुढे दिव्य कर्म, पराक्रम, त्याग, सत्य, पवित्रता, दया, आर्जव इत्यादि सद्‍गुणांनी संपन्‍न अशा कमीत कमी ७८ महान् राजांची यादी सुनावली (श्रीराम हे त्यापैकी एक. लिखित इतिहासाअभावी आपण कितीतरी महान् महान् आदर्श व्यक्तिंच्या चरित्रांना मुकलो नाही का ? ]. हे सर्व बुद्धिमान शक्तिशाली महान् राजे देखील कालगतीमध्ये नष्ट झाले तेथे तुझ्या दुःस्वभावी, क्रोधी, लोभी आणि दुराचारी पुत्रांची काय कथा ? ते तर शोक करण्यास मुळीच पात्र नाहीत. तरीपण पुढे सांत्वन करण्याच्या उद्देशाने म्हणतो - "दैवगति कोण टाळू शकतो. सुख-दुःख, जन्म-मृत्यु या सर्वांचे कारण काळ अहे. काळच सृष्टी निर्माण करतो आणि त्याचे विसर्जनही करतो. सर्व शुभ-अशुभ गोष्टींचा कर्ता काळ आहे. काळाच्या गतिचे कोणीही उल्लंघन करू शकत नाही. तेव्हां - तान् कालनिर्मिता बुद्ध्वा न संज्ञां हातुमर्हसि - ही सर्व काळाची करणी आहे हे जाणून आपला विवेक सोडू नकोस.
शेवटचे वाक्य फार महत्त्वाचे आहे. कारण विवेकाने सांप्रत कर्मे करणे हे पुढील कर्मफळाचे बीज आहे हे पक्के लक्षात ठेवले पाहिजे. आपल्या जीवनातील सर्वच इष्ट-अनिष्ट घटनांशी आपल्या गतजन्मीचीच कर्मे कारणीभूत असतात असे नव्हे. या जन्मीच्या गत आयुष्यातील कमी अधीक प्रमाणातील प्रयत्‍न चालू परिस्थितीला कारणीभूत असू शकतात. उदा. शिक्षण घेत असताना अभ्यास कमी पडला तर यश त्याच लायकीचे असणार आणि त्यामुळे लाभणारी नोकरी धंदा यावर त्याचा परिणाम होणारच. हे एक उदाहरण झाले. याचा अर्थ शिक्षण न घेतलेले यशस्वी होत नाहीत आणि उत्तम शिक्षण घेतलेले बेरोजगार नसतात असे नव्हे. प्रयत्‍न कमी पडतो तेव्हां असेही होऊ शकते, एवढेच मला म्हणावयाचे आहे. सारांश सांप्रत काळातील आपल्या वाट्याला आलेले दैव वा भाग्य हे गतकर्मातील, गतआयुष्यातील कर्मगतिचे फळ आहे हे निश्चित. मग पौरुषाचा अर्थ काय ? आपल्याला पुढे कशा प्रकारचे आयुष्य वा जन्म अपेक्षित आहेत त्या ध्येयपूर्तीसाठी आत्ता काय करायला हवे याबद्दल जागरूक राहून विवेकाने चालू क्षण उत्तम कर्म करीत जगणे म्हणजे पुरुषार्थ.
अनिष्ट परिस्थितीत हतबल होऊन दैव दैव करत न बसता; तसेच इष्ट परिस्थितीत उन्मत्त न होता, वा खुशालचेंडू बनून ’मला हे करण्याची काय गरज' असे न म्हणता; आपण जे काही करतो आहोत ते सर्व शक्तिनिशी उत्तम प्रकारे करणे म्हणजे पुरुषार्थ.
आपण जे जे काही ज्या कशा प्रकारे करू ते ते सर्व भावी दैव वा भाग्याचे बीज आहे हे सदा ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. यासंबंधी मागे मी एके ठिकाणी काय म्हटले होते ते repeat करणे उपयुक्त ठरेल - पुरुषार्थ = whatever is my past, changing my future is in my hands. This requires lot of guts, belief in one's self, दृढ विश्वास, सामर्थ्य, चिकाटी, अविरत प्रयत्‍नांची पराकाष्ठा and all that. And all this is not easy. कोणत्याही कष्टमय तपाचरणात सातत्य राहणे हे सामान्यचे काम नव्हे Only firmly determined pursue पुरुषार्थ. Hence I guess 98 to 99.5% fall under 1st category. म्हणून तर गीतेत भगवान् म्हणतात - मनुष्याणां सहस्रेषु कस्चित यतति सिद्धये - इथे सहस्रेषु म्हणजे अगणित आणि सिद्धये म्हणजे आपल्या ध्येयपूर्तिसाठी- कोणी एकादाच विरळा सिद्धिसाठी प्रयत्नशील असतो.

26 November, 2008

'' तो '' कृपा करतोच, पण...

'' तो '' कृपा करतोच, पण...
परवा एका मित्राला म्हटले, 'चल सज्जनगडावर जाऊ, तिथून गोंदवलेस जाऊन मुक्काम करू आणि उद्या प्रसाद घेऊन संध्याकाळपर्यंत परत येऊ.' माझ्यापेक्षा लहान तो. तरी म्हणाला, 'अरे आता कुठे गड चढायला सांगतोस. हे आपलं वय आहे का गड चढायचं'. म्हटलं, वाटतं तितकं कठीण नाही. थोड्याशा आग्रहानंतर जायचे ठरले. एस् टी जाते तिथपर्यंत गाडीने गेलो. मग थोडीशी चढण आणि अवघ्या ५० पायर्‍या. एकून २० मिनिटात चढून झाले. आल्यावर हिची धाकटी बहिण तिला विचारते, "वर चढून गेलीस ? कसं काय ?" बरेच लोक, विशेषतः VRS किंवा निवृत्तिनंतर कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी करण्यास देखील निरुत्साही जाणवतात. अनुभवानंद स्वामी एका प्रवचनात म्हणत होते, "रिटायर् होने के बाद खाली मत बैठो. कंप्युटर सिखो, रशियन् सिखो, चाय बनाना सिखो, कुछ भी करो लेकीन व्यस्त रहो." अध्यात्मची, परमार्थाची गोडी लागली नाही अशांची गोष्ट सोडा पण परमार्थाची वाटचाल करणार्‍याने 'ह्या वयात आता हे शिकायचे कसे जमणार' , 'आता उमेद राहिली नाही हो' , ’ मी असलं काही करू शकेन असा माझा मलाच विश्वास वाटत नाही' वगैरे शब्द वापरले तर मला कसेसेच वाटते. वय झाल्यास हात पाय ढिले होतील, किंवा काही व्याधी असेल तर गीर्यारोहण सारखे शारिरीक क्षमता लागणारे काम करता येणार नाही हे कबूल. तरीही मला वाटते उमेदीचा संबंध मनाशी आहे. ज्या गोष्टीत शारिरीक कष्ट विशेष नाहीत त्या अवघड कशा ? मन थकले तर ? तर गीर्यारोहणाची शक्यता काय आशाच नाही असे होईल. पण आपण ठरविल्याशिवाय मन कधी थकत असते का ? तिरुपतीला जाताना ८०+ चे वयस्क १५ किलोमिटर पायी चढण माझ्याबरोबर चढत असलेले मी अनेकदा पाहिलेले आहेत. त्यांचे ते कृश आणि थकलेले शरीर पाहून मलाच कसेतरी वाटायचे. शंभर मिटर जाऊन बसतात आणि २-३ मिनिटात 'गोविंदा गोऽऽऽविंदा' अशी आरोळी ठोकून परत चढायला सुरू करतात. वैष्णवी देवीला जाताना देखील १३-१४ कि. मी. चढण आहे. एक अगदी म्हाताऽऽरी बाई थकून बसली होती. चार पोरे जाता जाता ओरडली, "नानी बोले जय मातादी, जोर लगाके जय मातादी". आणि नानी उठून तरातरा चढायला लागली. २०० मीटर जाऊन बसली परत. पण, परत कोणीतरी दुसरा डोस देई आणि परत चढणे चालू. उमेद मनात असते.
मुळात 'मी' काही करतो/करते ही भावनाच हळू हळू बाजूला करायचा प्रयत्‍न हवा. याचा अर्थ 'सर्व काही तो करतो, आपण काय करू शकतो. आपल्या हातात काही आहे का ?' असे म्हणत निवांत बसणे हेही योग्य नाही. कर्ता करविता "तो" आहे हे खरे पण I am a partner in His creation for which he lends me His helping hand हे देखील तितकेच खरे. बाळ चालते ते स्वप्रयत्‍नाने. आईबाप त्याच्या त्या प्रयत्‍नानंतरच त्याचे बोट धरतात आणि मदत करतात. पण बाळाने नुसतेच बसून राहून 'त्याने चालविल्या मी चालेन' असे म्हटले तर ते कधीच चालणार नाही. आधी बाळाने उढून उभे राहायचा प्रयत्‍न दिसला तर आईबापांची पुढची क्रिया संभवते. त्याअभावी आईबापांनी त्याचे बकोटे धरून त्याला उभे केले असे कधी पाहिलेत काय ? बाळाला जसे आईबाप तसे जीवाला गुरू आणि भगवंत. साधकाला गुरू/भगवंत भेटतात किंवा गुरू/भगवंत त्याला शोधत येतात ते साधकाच्या प्रयत्‍नामुळे. काही न करता " तो माझ्यावर केव्हां कृपा करील " अशी वाट बघणे व्यर्थ आहे. गुरू देखील मार्गदर्शन करताना, 'सर्व काही कर, पण त्याला नामाची (म्हणजेच अकर्तेपणाची) जोड दे. आपणही पाहतो एकेका गुरूचे कितीतरी शिष्य असतात. पण गुरूची मर्जी काही विशेष शिष्यांवरच असते. [मी फक्त सच्चे गुरू आणि सच्चे शिष्यांच्या बाबतीतच बोलतोय] बाकीच्या शिष्यावरही त्यांचे प्रेम असते, मार्गदर्शन करतात; पण त्यांची गति त्यांच्या स्वसाधनेवर अवलंबून असते. गीतेच्या दुसर्‍या अध्यायात भगवंत म्हणतात, "अरे ह्यांना तूच मारणार आहेस असे तुला वाटते आहे काय ? पुढे म्हणतात - तूं भ्रमलेपणे अहंकृती । यांसि घातु न धरिसी चित्तीं । तरी सांगे काय हे होती । चिरंतन ॥ - तूं यांना मारले नाहीस तर हे चिरंजीवी होणार आहेत असे तुला वाटते काय ? यांच्यापैकी कोण केव्हां कसे मरणार हे मी ठरविले आहे. तरीपण तू तुझ्या वाटेस आलेले कर्तव्य कर्म - म्हणजे युद्ध - कर. भारत युद्धाच्याही आधी अर्जुन पराक्रम करीतच होता, स्वपयत्‍न करीतच होता, आणि भगवंताला आवडणार्‍या गुणांचीही त्याने जोपासना केली होती. म्हणून तर भगवंताने त्याची निवड केली, ते काम त्याला सोपविले आणि कीर्तिने तो अमर झाला.
काहीही करायचे झाल्यास शारिरीक क्षमतेची जाणीव असावी हे योग्यच. पण जिथे त्याची विशेष जरूरी नाही अशा गोष्टी निरुत्साहाने टाळणे म्हणजे एका नव्या अनुभवाला आणि पर्यायाने आनंदाला मुकावे लागणार हे निश्चित.
कृपया कोणी उपदेश करतोय असे समजून घेऊ नये. पण या कलाने विचार केल्यास मनातील जळमटे नाहीशी होण्यास नक्कीच मदत होईल असे मला वाटते.

24 November, 2008

नामसाधना - ५

नामसाधना - ५
नाम घेण्याच्या पद्धतीमध्ये जर qualitative change असेल तर काही फरक पडतो का ? का काहीच फरक पडत नाही, हे तपासणे आवश्यक आहे. श्रीमहाराजांच्या २९ ऑक्टो. च्या प्रवचनाचे शीर्षक आहे 'भगवंताचे होण्यास आपण निर्दोष असणे जरूर आहे'. त्यात म्हटले आहे, 'मनाने नेहमी शुद्ध असावे'. कशासाठी निर्दोष असावे, कशासाठी शुद्ध असावे ? आपण जेव्हां नाम घेतो तेव्हां ते नाम घेत असताना आपल्या मनात वा at subconscious level वर काय चालले आहे, आपला भाव कशा प्रकारचा आहे ह्याच्याशी नाम घेणे या क्रियेचा काहीतरी संबंध आहे का ? नामाची वा ॐ ची आवर्तने भस्मासुरानेही केली रावणानेही केली आणि प्रल्हादानेही केली. भस्मासुराने आणि रावणाने लगेच पार्वतीमाई आणि सीतादेवी ह्यांनाच भोगायची इच्छा झाली. पण प्रल्हादाला भगवंताची स्तुतिच करावी वाटली. मग तिघेही भक्त प्रल्हाद का झाले नाहीत ? प्रल्हाद वा ध्रुवबाळ यांना दर्शन होण्यास किती काळ लागला ? आणि वाल्या कोळी वाल्मीकि ऋषि व्हायला किती काळ लागला ? तो तर दुष्टच माणूस होता. मग त्याचे चित्त शुद्ध व्हायला बराच बराच काळ लागला असणार हे उघड आहे, नाही का ? कारण - वाल्याची आधीची लुटालुट करण्याची वासना घालवून त्या जागी नविन शुद्ध वासनांची स्थापना करणे - हे करावे लागले; आणि असे घडायलाच नेमका जास्त काळ लागतो. कारण वासना चक्रातून बाहेर पडून दुसरे काही करायला माणूस सहसा कधीच तयार नसतो. Resistance to change ही इतकी बलवान असते की resistance overcome करायला त्याच मनाच्या दुसर्‍या शक्तीचा प्रचंड वापर करावा लागतो. ह्याचा अर्थ तप करतेवेळी भस्मासुर व रावण ह्यांच्या मनांत सत्तेची, त्याच्या जोरावर भौतिक जगतातले काय वाटेल ते साध्य करून घेण्याची महत्त्वाकांक्षा असली पाहिजे. म्हणजे नामाच्या आवर्तना बरोबरच अशा सुप्त संकल्पांची/विचारांची [subconscious मध्ये] आवर्तने होत असलीच पाहिजेत आणि पुढे ते विचार बळकट होऊन त्याला कृती करण्याची शक्ति प्राप्त होतेच. रामदासांचे शिष्य हेरंबशास्त्री आफळे ह्यांची गोष्ट पहा. आफळेंचा एक कोटी गायत्री जप झाल्यावर त्यांना वाचासिद्धी झाली होती. पण चित्त वृत्ति शुद्ध नसल्यामुळे उन्मत्तपणा आला होता. आणि त्यांची जेव्हां स्वामींशी गाठ पडली तेव्हां काय झाले ? भलत्या ठिकाणी सिद्धीचा वापर केल्यामुळे वाचासिद्धी गेली. सर्व तप फुकटच गेले ना ? अर्थात् कृत्याचा पश्चात्ताप झाल्यावर करुणामय स्वामींनी त्यांच्यावर कृपा केली हा भाग वेगळा. पण केव्हां ? पश्चात्ताप होऊन उन्मत्तपणा गेल्यावरच ना ? म्हणजे मन शुद्ध झालावरच ना ? तेच शुद्ध विचारांबरोबर गायत्रीची साधना झाली असती तर ती विशेषरूपे फलद्रूप झाली असती आणि पुढील तपाचरणात द्विगुणित झाली असती. पुराणाचे/इतिहासाचे जाऊ द्या. सद्यकाळीही काही अशी उदाहरणे दिसतात की कधी कधी १३ कोटी जप केलेल्या व्यक्तिपेक्षा तीन साडेतीन कोटी जप केलेल्या मनुष्यात संतपणाची लक्षणे जास्त आढळतात. पहिल्या व्यक्तिपेक्षा दुसर्‍या व्यक्तीची संगत जास्त हवी हवीशी वाटते. असे का ? आपणच विचार कारावा आणि आपणच उत्तर शोधावे.
मी जेव्हां पाण्यात प्रतिबिंब पाहायला जातो तेव्हा ते प्रतिबिंब पाणी किती स्थिर आहे वा स्वच्छ आहे ह्यावर अवलंबून असते. जर चंचलतेमुळे पाण्यात सतत तरंग असतील वा ते अतिशय गढूळ असेल तर प्रतिबिंब स्वच्छ दिसणार नाही. कदाचित् माझी छबी तिथे उमटणारच नाही. आणि जेव्हा उमटेल तेव्हांच कळेल की हे माझेच प्रतिबिंब आहे. आणि ते माझेच असल्यामुळे मला त्या बिंबाबद्दल आत्मीयता वाटते. जीव वा जीवात्मा परमेश्वराचे अंशात्मक प्रतिबिंब आहे असे शास्त्र म्हणते. पण हे प्रतिबिंब जेव्हां अहंकार धारण करते तेव्हां 'मी' म्हणजे मूळ बिंबाहून भिन्न अशी कल्पना करून घेते आणि त्याचा संसार, जन्म-मरण फेरे सुरू होतात. मी ह्या जगत् रूपी पाण्याशी, त्यातील विषय, त्या विषयांबद्दलची तृष्णा, तृष्णा शमविण्यासाठी वेळोवेळी करावी लागणारी अधार्मिक वा अनैतिक कर्मे; ह्या सर्वांशी मी इतका समरस झालो आहे, मग हे पाणी तर सोडाच मी स्वतःदेखील इतका गढूळ झालो आहे की, परमेश्वर मला - ह्या विशिष्ट जीवाला - पाहूच शकत नाही. पण मी, माझे विचार, माझे आचरण, माझ्या मनातून व्यक्त होणारे भाव - एकूण माझे चित्त व माझ्या वृत्ति - हे सर्व प्रयत्‍नपूर्वक मी शुद्ध करू शकतो का ? आणि शुद्ध करू शकलो तर माझे अशांत, अशुद्ध प्रतिबिंब परमेश्वराला नीट दिसायला, त्याला माझ्याबद्दल आत्मीयता वाटायला लावू शकेल का ? आणि मी माझ्या कोणत्याही बाबतीत यत्किंचितही बदल घडवून न आणता, परमेश्वरा धाव, परमेश्वरा धाव मला ह्या संसार सागरातून सोडव, असे म्हणत राहिलो तर ? No way. आधी असलेला विषयांच्या वासनेचा पगडा सुटून त्याजागी शुद्ध वासनेची स्थापना झाली तरच शक्य. मग तेरा कोटी काय आणि पंधरा कोटी काय. They remain only numbers. वाल्याने जितके कोटी केले तेवढे कोटी करावे लागणार का ? हो. resistance to change वर मात करे पर्यंत. वासना शुद्ध होईपर्यंत - अगदी subconscious level मधल्यादेखील, ज्याची आपल्याला सुतराम देखील कल्पना नसते. कारण नामाची जितकी आवर्तने त्याबरोबरच आपल्याला हव्या असलेल्या, प्रकट वा अप्रकट विचारांची आवर्तने असे गणित स्पष्ट दिसायला लागले आहे नाही का ?
एकोहम् 

23 November, 2008

नामसाधना - ४

नामसाधना - ४
मागे आपण पाहिले की - When we concentrate on a thought, the thought becomes true because our bodies transform it into action - हे कसे काय होते ?
आपण जेव्हां विचार करतो तेव्हां आपल्या अंतरंगात विचार तरंग निर्माण होतात. ज्या प्रकारची आपली विचार स्पंदने असतात त्याप्रकारची एक frequency निर्माण होते. आपल्याला वाटते की आपले विचार, विचार तरंग आपल्यापुरतेच मर्यादित असतात. पण तसे होत नाही. आपले विचार तरंग वातावरणात, आपल्या अवतीभवती असलेल्या space मध्ये पसरतात. मग एक महत्त्वाची क्रिया घडते आणि ती म्हणजे ज्या frequency चे आपले विचार आहेत ते त्याच frequency चे विचार शोधतात आणि त्या विचारांना उत्तेजित करतात. आपले विचार जर आनंदाचे असतील तर आनंदाची frequency घेऊन हा विचार बाहेर जातो आणि आपल्या आजूबाजूला आनंदाची frequency जागृत करतो, वातावरणात आनंदाच्या frequency जागृत करतो, इतर व्यक्तिंच्यात देखील आनंदाच्याच frequency जागृत करतो. ह्या कृतीला resonance म्हणतात. पण ह्या resonance प्रमाणे आसपासच्या इतर व्यक्ति लगेच आनंदित होतात काय ? तसे तर आपल्याला कधी दिसत नाही. कारण दोन frequencies जेव्हां जुळतात - match होतात - तेव्हांच resonance तयार होतो हा नियम आहे. मग आपल्या आनंदाच्या frequency चे होते काय ? त्याचे पडसाद जाणवत का नाहीत. ह्याचे कारण म्हणजे हा परिणाम अति सूक्ष्म स्तरावर असतो. एका मोठ्या पाण्याच्या पिंपात मिठाचा एक खडा टाकावा तसे. अर्थात् आनंदाच्या frequency बाहेर पडल्यास जशा आनंदाच्या ऊर्मी पसरतात तशाच दुःखाच्या, क्रोधाच्या, भितीच्या विचारांच्याही frequencies बाहेर पसरतात. आनंदाचे तरंग हे लांब पल्ल्याचे म्हणजे higher frequencies असतात, आणि मोह, लोभ, मद, मत्सर ह्यांच्या कमी अधिक प्रमाणात पण आनंदाच्या frequencies च्या तुलनेत कमी दाबाच्या, म्हणजे lower frequencies असतात. आता आपल्या सुदैवाने म्हणा ह्या system मध्ये एक नियम आहे. Higher frequencies can affect lower frequencies but not viceversa. म्हणजे आपल्या जवळील व्यक्ति दुःखात असली आणि त्याच्या दुःखाची level जर पाण्याच्या पिंपाएवढी नसून जर एका कपाएवढी असेल तर कदाचित काही वेळाने त्याचे दुःख जवळील आनंदाच्या frequency ने निवळेल. ह्याच नियमानुसार तुम्ही जर आनंदात असाल आणि जवळची व्यक्ति कोणत्यातरी विचाराने (भूतकाळातील अप्रिय घटना वा भविष्यातील चिंता) उद्विग्न वा शोकावस्थेत असेल तर त्याचा आपल्यावर परिणाम होत नाही. म्हणजे त्याच्या विचारांची lower frequency आपल्या विचारांच्या higher frequency वर परिणाम करून शकत नाही. तसेच पवित्र ठिकाणी, देवळात, मठात तेथील वातावरणामुळे बहुधा प्रसन्न होण्यास अनुकूल अशा frequencies असतात, कारण बहुतेक मंडळी त्याच प्रकारचे विचार घेऊन तेथे वावरत असतात. [मंडळी तुमचा अनुभव काय आहे ? हां पण जवळील व्यक्तिवर बेतलेली दुःखद घटना, आणि दुःखद विचारामुळे तो शोकाकुल झाला आहे का ? ह्या दोन गोष्टी अगदी भिन्न आहेत हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आपण तपासतो आहोत ते विचारांच्या frequencies चे परिणाम; घटनांचे परिणाम नव्हे; हे लक्षात ठेवून आपल्या अनुभवाचे निरीक्षण करावे]
आपण पाहिले की विचारांचे तरंग बाहेर पडतात आणि तत्सम तरंगांशी ते एकरूप होऊन तशा प्रकारचे वातावरण निर्माण करतात, आणि त्यानुसार वातावरणावर परिणाम होतो. ह्याच न्यायाने वातावरणातील frequencies ना आपणही आकर्षित करून घेत असतो. आपण जरा खिन्न झालो (lower frequency) की खिन्न प्रकारचे तरंग आपल्यावर परिणाम करायला टपून बसलेलेच आहेत म्हणा. म्हणजे आपण ज्या पद्धतीचे विचार करतो त्या पद्धतीच्याच गोष्टी आपण आपल्याकडे आकर्षित करीत असतो. म्हणजे आपण जर नेहमी सकारात्मक विचार करीत असलो तर वातावरणातील सकारात्मक विचारच आपण आकर्षित करून घेऊ. तसेच failure, disease, finance, low self esteem, I can never do that, inferiority complex इत्यादि संबंधीचे नकारात्मक विचार घेऊन वावरत असू तर, तर त्याचे परिणाम आपण सर्वत्र पाहतोच आहोत. - म्हणून ही frequency, resonance प्रणाली लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
सुमारे दहा वर्षापूर्वी मी ' रेकी ' चा अभ्यास करीत असताना मला quantum or string theory बद्दल काहीच कल्पना नव्हती. पण रेकीचा अभ्यास करताना मला एवढे समजले की आपल्या शरीरातील मध्य बिंदुपासून शरीराबाहेर सुमारे एक ते दीड फूट एवढे एक सूक्ष्म शरीर असते, त्याला etheric body म्हणतात; ज्याच्यावर आपले स्थूल शरीर आधारलेले आहे. [भाषांतर अवघड होत असल्या कारणाने मी एक परिच्छेदच उद्धृत करतो -
Penetrating the physical body is a more subtle body, vibrating at a higher frequency. This second body has come to be known as the etheric body. The etheric body contains an energy blueprint upon which the physical body is shaped and anchored. It contains the structures that allow us to absorb high-frequency energy of various kinds including the vital force (prana). It processes them and passes them into the physical. These etheric structures were seen by Indian seers (rishis) who called hem as Chakras].
ह्या सर्व गोष्टींचा 'नामस्मरणा'शी संबंध काय ? माझ्या मते आहे. मनात, बुद्धीत उत्पन्न होणार्‍या विचारांबद्दल जागरून राहून शुद्ध विचार पृष्ठभागी ठेवणे, त्याद्वारे मलीन वासनांचे शुद्धीकरण करणे, मलीन वासनांचे निर्दाळण करून चित्त व वृत्तिंची प्रचंड धाव, उधळण आटोक्यात आणणे आणि सरतेशेवटी मन प्रसन्न, शांत, तृप्त, उत्साही, निष्काम व आनंदी राहणे ह्या सर्वांचा आपल्या विचारांच्या qualitative परिणामाशी संबंध आहे असे मला वाटते. पाहू पुढे पटण्यासारखे आहे का ?
क्रमशः

22 November, 2008

नामसाधना - ३

नामसाधना - ३
मागच्या भागात आपण 'मनाची शक्ति' कशी काम करते हे पाहण्यासाठी अणुपासून सुरुवात केली. आपण पाहिले की नविन संशोधनानुसार आता हे स्पष्ट झाले आहे की ह्या विश्वात जे काही दृष्य वा अदृष्य आहे ते सर्व ऊर्जेचा अविष्कार आहे. ऊर्जा, स्पंदने, स्पंदनांचे 'resonance theory' नुसार वस्तूंचे एकमेकावर होणारे परिणाम हे पुढे आपण तपासूच. पण त्याआधी 'मन' म्हणजे काय आणि त्याची शक्ति म्हणजे काय ह्याचा एक आढावा घेऊ. 'मन' म्हणजे काय याची सर्वमान्य अशी नेमकी व्याख्या केलेली आढळत नाही. [निदान मला तरी तशी आढळली नाही]. विचारवंतांमध्ये याबद्दल बरेच मतभेद आहेत. पण मन म्हणजे विचारांची एक सरिता (नदी) असे बरेच विचारवंत मान्य करतात. जोपर्यंत विचारांची मालिका चालू आहे तोंवर मन आहे ह्याबद्दल शंकाच नसते. पण आपण जर काही क्षण विचार थांबवू शकलो तर जाणवते की मन गायब झाले आहे. अर्थात् विचाराव्यतिरिक्त 'भावना' हा देखील त्यातला एक घटक आहेच. पण भावनादेखील विचाराने प्रभावित होऊ शकते. तेव्हां आता विचार (thought) याबद्दल विचारबंत, संशोधक काय म्हणतात हे पाहू. अर्थात् काही उदाहरणेच. कारण विचार या विषयाबद्दल जगभर इतके संशोधन, लिखाण झाले आहे की कोणा एका माणसाला एका आयुष्यात ते सर्व तपासणे शक्य नाही. आता मनाची शक्ति म्हणजे विचारामुळे उत्पन्न होणारी, विचारामुळे प्रभाव पाडणारी शक्ति हे ओघाने आलेच. तेव्हां आपल्याला जे पाहायचे आहे ते मुख्यतः विचारांचा प्रभाव.
विसाव्या शतकाच्या सुरुवातील फ्रान्समध्ये एमिली कोये नावाचा एक डॉक्टर होऊन गेला. खरा तर तो रसायनशास्त्रज्ञ. पुढे त्याने संमोहनविद्येचा अभ्यास करून काही प्रयोग केले आणि आपली एक प्रणाली बनवली. १९१० मध्ये त्याने एक दवाखाना उघडला जिथे कोणात्याही रुग्णावर मोफत उपचार केले जात. खरे तर तो काहीच उपचार करत नव्हता. कारण त्याची थेरपी होती स्वयंसूचना - autosuggestion. त्याने अक्षरशः हजारो रुग्ण बरे केले. त्यात rheumatism. asthma, severe headaches, paralysis of a limb, fibrous tumors, ulcers and amazing variety of afflictions - ह्या सर्वांवर उपाय होते. उपाय म्हणजे त्याने कोणालाही कसलेही उपचार करून बरे केले नाही. त्याने सर्व रुग्णांना आपण स्वतः स्वतःलाच कसे बरे करावे हे शिकविले. त्याने त्या सर्व रुग्णांना स्वसूचना देण्यास शिकविले. अर्थात ह्या सर्व सूचना म्हणजे सकारात्मक, आपण बरे झालो आहोत अशा प्रकारच्या सूचना. डॉ. कोयेने स्वतः कसलाही उपचार न करता त्याच्या स्वसूचना प्रणालीने हजारो रुग्ण बरे झाले. आणि हे सर्व एक सुरेख रंगविलेले चित्र आहे असे नव्हे. कारण मी याबद्दल जिथे वाचले तिथे - All the cures are well documented - असे म्हटले आहे.
जगाला एक नविन प्रणाली मिळाली. ब्रीद वाक्य होते - Day by day, in every way, I am getting better, better and better - अर्थात् हे वाक्य डॉ. कोये यांचे होते का आणखी कोणाचे हे मला माहित नाही. पण या प्रणालीतून एक महत्त्वाचा निष्कर्ष जगापुढे आला. तो म्हणजे - When we concentrate on a thought, the thought becomes true because our bodies transform it into action. ह्याचा अर्थ आपले विचार - आपली हाडे, आपल्या मासपेशी, आपल्या रक्तपेशी, आपले अवयव - पदार्थ ह्या घटकात मोडणार्‍या वस्तूवर परिणाम करू शकतात, नव्हे करतात.
विचार फक्त आपल्यावरच प्रभाव पाडतात काय ? नाही त्याचा प्रभाव आपल्या आजूवाजूच्याच नव्हे तर हजारो मैल लांब असणार्‍या माणसांवर, घटनांवर, वस्तूवर होऊं शकतो. पण त्याआधी विचार - thought - यासंबंधी आणखी दोन-तीन जणांचे विश्लेषण पाहणे उपयोगी होईल.
क्रमशः

21 November, 2008

नामसाधना - २

नामसाधना - २

" मनाची अगाध शक्ति " ह्या विषयावर अनेक तज्ञांनी बरेच बरेच लिखाण केले आहे. पण ही शक्ति कशाप्रकारे काम करते ह्याचा शोध घेणे आवश्यक आहे. सुरुवात करायची आहे ती विश्वतील अती सूक्ष्म घटक असे समजल्या जाणार्‍या अणुपासून.
साधारण शंभर वर्षापूर्वी असा समज होता की ह्या विश्वातील सर्व वस्तूंचे दोन प्रकारात विभाजन होते. एक पदार्थ म्हणजे matter दुसरे म्हणजे energy अर्थात् चेतनत्त्व. पदार्थ म्हणजे दगड, भिंती, लाकूड, टेबल, सोफा, टीव्ही इत्यादि. चेतनत्त्व म्हणजे चेतनता असलेले वृक्ष, प्राणी, मानव वगैरे. दुसरा समज म्हणजे कोणत्याही पदार्थातील सर्वात सूक्ष्म कण म्हणजे अणु. पण पुढे आढळले की त्याच्याही अंतरंगात एक nucleus नावाचा घटक असून त्यात neutrons व protons असतात आणि बहिरंगात electrons असतात. nucleus स्थायी स्वरूपाचा असतो आणि electrons अंतस्थ nucleus च्या सभोवती वर्तुळाकार सतत फिरत असतात.
म्हणजे निसर्गात तीन मूलभूत कण (fundamental particles) असून त्यांचे गुणधर्म भिन्न भिन्न आहेत आणि अणूच्या निर्मितीत हे तिन्ही कण आवश्यक आहेत. पुढे समजले की अणू प्रारणे (radiation) शोषून घेऊन रासायनिक बदल घडवू शकतात तसेच योग्य परिस्थितीत अणू प्रारणे उत्सर्जित करतात. प्रारणे तरंगस्वरूप (frequency) असतात. आणखी काही वर्षांनी समजले की अणु व प्रारणे यांच्यात उर्जा विनिमय घडतो त्यावेळी प्रारणे पुंजस्वरूप (quantum) असल्यासारखीच वागतात. याचा अर्थ एकच वस्तू कधी प्रारणरूप तर कधी पुंजस्वरूप असू शकते. म्हणजे ती वस्तू पदार्थही आहे आणि ती ऊर्जाही आहे. म्हणजेच त्याचे स्वरूप द्वैती आहे. विरोधाभास दिसतो खरा पण वस्तुस्थिती द्वैती स्वरूपाचीच आहे. निष्कर्ष : निसर्ग कसा आहे हे निसर्ग ठरवतो. आपण नैसर्गिक वस्तुस्थिती समजावून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. अणु व प्रारणांचे द्वैतीस्वरूप हे वस्तुस्थितीचे शक्य तेवढे अचूक वर्णन आहे.
शास्त्रज्ञ बोहर याने अणुप्रणालीद्वारे सूक्ष्म अणु आणि त्याहून सूक्ष्मतर अणुघटक यांचे नविन गतिशास्त्र "पुंजगतिशास्त्र" (quantum mechanics) या शास्त्राचा पाया घातला. बरेच पुढे या शास्त्राचे परिपूर्ण भावंड quantum electrodynamics सुप्रतिष्टीत झाले. Quantum Electrodynamics या प्रणालीने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र यातील जवळजवळ सर्व घटनांचे यशस्वी स्पष्टीकरण दिलेले आहे.
आता अणुचे स्वरूप जर पदार्थ आहे तर त्यात ऊर्जा येते कुठून. अणुचे संशोधन चालूच होते. शास्त्रज्ञांनी अणुच्या अंतरंगाच्याही आत म्हणजे nucleus च्या आत जायचा प्रयत्न केला तेव्हां त्यांना तिथे quark नावाचा पदार्थ दिसला. जेव्हां त्यांनी त्याच्याही आंत जायचा प्रयत्‍न केला तेव्हां त्यांना एक विलक्षण गोष्ट आढळली आणि ती म्हणजे त्या quarks मध्ये होता एक तरंग, एक vibration. त्याला भौतिकशास्त्रात string म्हणतात. शास्त्रज्ञांच्या लक्षात आले की अणुला जिथून ऊर्जा मिळते ती या तरंगापासून उत्पन्न होते. याचा अर्थ हे सर्व विश्व तरंगापासून बनलेले आहे. ह्या विश्वामधली प्रत्येक वस्तू तरंगांनी बनलेली आहे म्हणजेच विश्वामध्ये सर्वत्र vibrations आहेत. हे सर्व विश्व तरंगाच्या कंपनांनी भरलेले एक अतिप्रचंड जाळे आहे. या विश्वातील प्रत्येक वस्तू एकमेकाशी एका अती सूक्ष्म स्तरावर जोडलेली आहे. म्हणून या विश्वाला Holographic Universe असेही म्हणतात.
आपण सर्व सूक्ष्मतरावर का असेना पण एकमेकाशी जोडलेलो आहोत ? कल्पना तरी मजेदार वाटते ना ? पाहू पुढे कसे काय ते.
क्रमशः

20 November, 2008

नामसाधना -

नामसाधना

वेदांतानुसार नामरूपात्मक जगत् अनादि आहे. तसेच त्याचे नाम-रूप व त्याचे प्रेम उत्पन्न करणारी लीला यांचा संबंधही अनादी व अविनाशी आहे. वेदकाळी जे नाम घेतले जायचे ते म्हणजे ॐ. पण सद्यकाळी शुद्ध अशुद्ध, ब्राह्मण ब्राह्मणेतर इत्यादि बरेच वाद (मानवानेच) निर्माण करून त्याबद्दल जनसामान्यांत एक आदरात्मक का असेना, पण ॐ उपासनेबद्दल एक भितीच निर्माण केली आहे. मग परमेश्वरच संत अवतार धारण करून सामान्य जनांना झेपतील, पटतील, जमतील असे मंत्र देऊन त्यांना नाम-उपासनेला लावतात. संतजण जो मंत्र नाम म्हणून देतात तो मंत्र म्हणजे ॐ चेच प्रतीक असते. श्रीज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताच्या तोंडी नाम घेतल्याने काय होते हे सांगितले आहे (अध्याय १७ ओवी ३३० ते ३३७). भगवान् म्हणतात -
जन्मास आलेल्या बालकास प्रथम नाम नसते, पण ते ठेवलेल्या नामाने हाक मारली असता, हे आपले नाव आहे, असे समजून ते "ओ" देत असते. संसारात अहोरात्र शीण करता करता त्रासलेले जीव जेव्हा आपल्या दुःखाचे निवारण करण्याकरिता परमेश्वराचा धावा करतात, तेव्हा ज्या नावाने मला हाक मारली असता मी धावून येतो, असे भगवंताने आपल्या वेदवाणीने ठरविले किंवा संकेत केला, ते संकेतरूप नाव हेच ( हेच म्हणजे ॐ ). परब्रह्म अखंड, अविकारी असे एकमेव सद्‍रूप आहे, त्यात काही बदल न होता, त्याची अबोल स्थिती बोलकी होईल व तेच परब्रह्म जीवाशी अद्वैत एकरूप राहून सद्‍रूपाने जीवाला गोचर होईल असा हा मंत्र कृपाळू बाप वेदाने शोधून काढला आहे. मग वेदाने ज्या एका नाममंत्राने परब्रह्माला आळविले असता दृष्टीआड असलेले परब्रह्मच दृष्टिगोचर होते. परंतु निगमरूपी पर्वताच्या शिखरावरील उपनिषदार्थरूप नगरात राहणार्‍या परब्रह्माच्या पंक्तीला जे बसले - परब्रह्मस्वरूप झाले, त्यांनाच ते कळून येते. [ भारीच जड वाक्य - काय कळून येते, तर परब्रह्माचे स्वरूप ]. प्रजापतीच्या ठिकाणी सृष्टी निर्माण करण्याची जी शक्ति आहे ती त्या एका नामाच्या आवर्तनामुळेच आली आहे. आता श्रीमहाराजांनी [ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर] ज्यांना नाम दिले आहे ते नाम म्हणजे 'श्रीराम' ह्या अवताराचे नाम नसून त्या अवताराचे जे मूळ, म्हणजे सर्वव्यापी परमात्म्याचे, ॐ ह्या रूपाचेच प्रतिक आहे. पण सगुण उपासना मात्र 'श्रीराम' ह्या अवताराचीच बरं.
          रामायणात एक घटना आहे. सेतूबंधनाचे वेळी श्रीरामाला वाटले आपणही एक दगड टाकून बघावा. पण तो दगड बुडाला. रामाला आश्चर्य वाटले. पण मारुतीराय म्हणाले, असू दे असू दे, दगड जर पाण्यात तरंगतात तर ते तुमच्यामुळे नव्हे, तुमच्या नामामुळे.
क्रमशः

06 October, 2008

भवरोग व नामसाधना

भवरोग व नामसाधना

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची 'प्रवचने' प्रसिद्ध आहेत. बरेच साधक त्याचे नियमित वाचनही करतात.
आजचे (६ ऑक्टोबर) प्रवचनांत श्रीमहाराज म्हणतात - आजारी माणसाला तीन गोष्टी कराव्या लागतात - कुपथ्य टाळणे, पथ्य पाळणे आणि औषध घेणे. मग आजार कोणताही असो. पण आपल्याला आजार झाला आहे ह्याची जाण झाली, त्याच्या निवारण्याची तीव्र इच्छा झाली, तरच या तीन गोष्टींकडे मनुष्य वळेल. शारीरिक आजार झाला असतां मनुष्य हे सर्व त्वरीत अंमलात आणतोच. पण मनुष्याला आपल्याला भवरोग झाला आहे ह्याची फार फार उशीरा जाण होते.
मनुष्यमात्र हा भवरोग घेऊनच जन्माला येतो. अर्थात् जे गतजन्मात योगाचरण (म्हणजे परमार्थिक उपासना) करता करता योग साध्य होण्याआधीच निवर्तले असे योगभ्रष्ट या जन्मी "शुचीनां श्रीमतां गेहे, अथवा योगिनां धीमतां कुले भवति" अशा प्रकारे जन्म घेऊन परत आपल्या मोक्ष प्राप्तीच्या, मुक्तीच्या मार्गाचे अनुसरण करतात. असे कांही मोजकेच संसारात असले तरी ते भवरोगाने पछाडलेले नसतात. पण असे फारच थोडे. श्रीमहाराजांचा उपदेश आहे तो सामान्यजन जे भवरोगाच्या अंमलाखाली आले आहेत त्यांच्यासाठी. पण सर्वच भवरोगी भवरोगाने त्रासलेले असतात का ? नाही. बर्‍याच अंशी भवरोग झाला आहे आणि त्याच्या निवारणाची आवश्यकता आहे हे समजण्यासच बराच काळ लागतो. पण समजल्यावर मग काय करावे, कसे करावे हे जाणून घेण्याची जिज्ञासा आणि धडपड सुरू होते. अशा भवरोग निवारण उद्देशाने वाटचाल करणार्‍या मुमुक्षुसाठी श्रीमहाराजांचा वरील उपदेश.
कुपथ्य टाळणे - पांच ज्ञानेंद्रियांचा विषयांशी संबंध होणे हे अटळ आहे. तसेच पांच कर्मेंद्रियांद्वारे कर्मे घडणेही अटळच. आणि या सर्वांचा राजा जे 'मन' त्याचा व्यवहारही चालणारच. पण डोळ्यांनी काय पाहायचे [थोड्या निरीक्षणानंतर आढळेल की जास्तीत जास्त विकार डोळ्याद्वारे शरीरात, मनांत, बुद्धीत शिरतात), कानांनी काय ऐकायचे, तोंडाने काय आणि किती खायचे यांचा विवेकपूर्व विचार करून त्या त्या विषयांचे सेवन करणे हे माणसाच्या हाती आहे. आपल्या हिताचे काय हे सर्वांनाच समजते. अहितकारक गोष्टींपासून इंद्रियांची निवृत्ति करीत विषयांचा दुष्परीणाम टाळणे म्हणजे कुपथ्य टाळणे.
पथ्य पाळणे - कुपथ्यापासून निवृत्ति समजली की पथ्यकारक काय याबद्दल भार गहन अभ्यास आवश्यक आहे असे नव्हे. डोळ्यांनी भगवंताचे रूप पाहणे - म्हणजेच चर-अचरात, सर्व प्राणीमात्रात भगवंताच्या अस्तित्वाची जाण ठेवणे, हातांनी कोणतीही क्रिया करताना भगवंताला आवडणार नाही असे कोणतेही कर्म न करणे, वाचेचा संयमित वापर - म्हणजे निंदा टाळणे, वाचेद्वारे कोणालाही न दुखावणे इ. हे सर्व म्हणजे पथ्य पाळणे झाले. पथ्य ह्यात आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी म्हणजे भ. गीता ६.१६,१७ इथे म्हटल्याप्रमाणे अती खाणे नको तसेच जळजळीत उपवास नको, अती झोप नको आणि अती जाग्रणही नको, अती आरामही योग्य नाही तसेच अती दमछाक होईपर्यंत काम करीत राहणे देखील योग्य नाही. सर्वकाही युक्त प्रमाणात, नियमीतपणे करणे.
नामस्मरण हेच औषध सेवन - आता नामसमरणाचा औषध म्हणून कसा उपयोग करता येईल ? स्वामी अनुभवानंद त्यांच्या प्रवचनांतून नाम कसे घ्यावे हे सांगतात. माणसाच्या चित्त आणि वृत्ति स्वस्वरूप आनंद स्थितीपासून नेहमीच भलावण करीत असतात. ही भलावण न व्हावी यासाठी आपण काय पाहतोय, ऐकतोय, करतोय ह्याबद्दल सतत जागरूक राहणे नितांत आवश्यक असते. प्रसन असलेले मन कशामुळे कलुशित होते हे समजले तर औषधचा योग्य परिणाम होतो. काही उदहरणे पाहू. एखादी न आवडणारे व्यक्ति समोर आली वा तिचे स्मरण झाले की त्या व्यक्तिबद्दल नकारात्मक (negative) विचार येतात. कासलातरी कर्कश आवाज कानी पडला, नको त्या वेळी (म्हणजे आपल्याला) पाऊस सुरू झाला, अवेळी फोन खणखणला, जिना उतरताना पाय मुरगळला, अप्राप्त विषयांची इच्छा, द्वेष, मत्सर अशा कितीतरी गोष्टी मनात उद्विग्न भाव उठण्यास, मनाची शांतवृत्ति बिघडविण्यास कारणीभूत होतात. असे झाले की लगेच "श्री राम जय राम जय जय राम" हा मंत्र अगदी सावकाश (म्हणजे ५ ते ७ सेकंद कालावधी लागेल इतके संथपणे) मनात म्हणावा अशी २-३ आवर्तने करावी. मनात उठलेली negative वृत्तिचे निवारण नाही झाले तर परत २-३ आवर्तनांचा एक डोस. ज्याबद्दल आपण काहीच करू शकत नाही ( ज्या आपल्या हातात नाहीत ) अशा कितीएक गोष्टींपासून उद्विग्न होऊन, वैतागून साध्य तर काहीच होत नाही. मग औषधाचे २-३ डोस घेतले - अर्थात उठलेली negative वृत्तिचे निरसन होईपर्यंत - की मन पूर्ववत प्रसन होते. होता होता उद्विग्न व्हायचे प्रसंगच कमी झालेत असे जाणवते. खरे तर प्रसंग कमी होत नाहीत. उद्विग्न व्हायची frequency कमी होते. पण या प्रयोगाचे एक गुपित आहे - नामाचे आवर्तन अगदी सावकाश करणे. प्रयोग करायला हरकत नाही ना ?
वरील औषध उपासना म्हणून नित्य, ठराविक जप करणे या व्यतिरिक्त आहे हे सांगणे आवश्यक नाहीच.

एकोहम् -

30 July, 2008

आसक्ति - आनंदकंदाची

आसक्ति - आनंदकंदाची


आपल्या हृदयातील भक्तिप्रेम भावनेचा परमोच्च भाव म्हणजेच एकांतभक्ति होय. हिलाच कोणी अद्वैतभक्ति अथवा पराभक्ति असेही म्हणतात. अशी भक्ति करता करता मग भक्ताला सर्व लौकिक सुखे, सुखकल्पना व जीवनव्यवहार नीरस वाटू लागतो. एका भगवंतावाचून दुसरे काहीही आवडेनासे होते. भक्त मग आपला सर्व जीव प्राण एकवटून हरि प्राप्तीसाठी झटतो, तळमळतो. जरा एक क्षणभरसुद्धा श्रीहरीचे विस्मरण झाले तर तो कासावीस होतो, अगदी व्याकूळ होतो.
"ना अरत्र ना परत्र" म्हणजे लौकिक व्यवहाराविषयी उदासीनता आणि श्रीहरि प्राप्ति तर अद्याप झालेली नाही अशा, 'ना हा कांठ ना तो' अशा अवस्थेत दिवस कष्टाने कंठित असताही जो हरिस्मरण एक क्षणभरही सोडीत नाही, अशा भक्तास अचानकपणे आवडत्या देवाच्या स्वरूपात साक्षातकार होतो.
ईश्वरस्वरूप भक्ताला तृप्त करून, त्याच्यावर आनंदघनाचा अमृतवर्षाव करून अप्ल काळात अंतर्धान पावतो, आणि नंतर त्या सच्चिदानंदकंद परमात्म्याचा प्रत्यय चराचर स्वरूपांत सृष्टींत अणूरेणूत अव्यक्तपणे येऊ लागतो. ज्ञानदृष्टीने ही ब्राह्मीस्थिती, तर भक्तियोगाच्या दृष्टीने हीच एकांतभक्ति, पराभक्ति, अद्वैतभक्ति होय. या अनुभवाच्या स्थितीत भक्त व देव यंतील अंतरच लोपते. त्यांचे मुलभूत ऐक्य प्रकटते, विलसूं लागते. ही परमोच्च भक्ति प्रत्येक भक्ताने आत्मसात करावी असा नारदासारख्या भक्ताचार्यांचा प्रेमळ आग्रह आहे.
भक्तीचा अपार महिमा येवढ्याने संपत नाही बघ. ही परमप्रेमस्वरूपा भक्ति, कर्म, योग व ज्ञान या अध्यात्म मार्गापेक्षा अधिकतरा आहे. आता ही अधिकतरा कोणत्या बाबतील आहे ? तर परमविरहावस्था आणि विरोधी भक्ति.
पराभक्तीच्या प्रकर्षाने प्रकट होणार्‍या, आणि अखिल जीवन व्यापणार्‍या एका स्थिर प्रत्ययी महाभावाला - आनंदभावाला भक्तिशास्त्रकारांनी एक वेगळेच विशेषण जाणीवपूर्वक योजले आहे. ते म्हणजे आसक्ति. सक्त म्हणजे जोडले जाणे, वज्रलेप होणे. या व्युत्पत्तीनुसार आसक्ति म्हणजे "आपल्या आवडत्या विषयाबद्दल मनास वाटणारी अनिवार्य ओढ, आणि या ओढीमुळे मनुष्य त्या विषयाशी विचारांनी व भावनांनी आसक्त होणे." प्रत्येक मनुष्यमात्राचा आवडता विषय वेगळा वेगळा असतो. अनन्य भक्ताचा एक आनंदकंद भगवंतच आवडता विषय असतो. म्हणजे आसक्ति ही भगवंताशी जोडली गेल्यावर तिचे सुद्धा उन्नयन होते. तो श्रीहरीशी अतूटपणे जोडला जातो.
नाहीतरी एरव्ही साधारणपणे वाईट गोष्टींची सवय दर्शविण्यासाठी 'आसक्ति' हा शब्द योजला जातो. जसा व्यसनासक्ति, द्युतासक्ति, धनासक्ति, सत्तासक्ति इत्यदि. अशा माणसाला आपल्या आवडीच्या गोष्टीबद्दल आत्यंतिक ओढा असतो. तत्पूर्ततेसाठी तो वाटेल तेवढे कष्ट व साहस सोसतो. परंतु भगवंत हाच एक मात्र आवडीचा (आनंदाचा) विषय होतो व त्याच बरोबर परमभक्ति प्रेमाने ओथंबलेली अत्युत्कट भावधारा हृदयांत सतत उचंबळते, तेव्हा त्याच आसक्तिस मान्यप्रद "भक्ति" असे म्हणतात.
भगवंतच्या ठिकाणी चित्त आसक्त होणे ही गोष्ट भक्तिशास्त्राने अत्यंत प्रशंसनीय म्हणून वर्णिलेली आहे. ती भक्तिप्रेमाची एक अत्युच्च कोटी आहे. सामान्य आसक्त मनुष्याच्या ठिकाणी स्व-आवडीबद्दल, व्यसनाबद्दल जी एकनिष्ठता, क्रियाशीलता, तडफ, उत्साह इतकंच काय जशी निर्लज्जता असते, अगदी तशीच एकाग्रता, प्रयत्‍नशीलता भगवत्‌ प्राप्तीसाठी भक्ताच्या ठिकाणी असावी हेच "आसक्ति" या शब्दामागील प्रयोजन भक्तिशास्त्रकारांना अभिप्रेत आहे.
असे झाल्यावर भक्ताची काय अवस्था होते पहा - "आता मज एक विठ्ठलाचा छंद । लौकिक संबंध दूर ठेला ॥ विठ्ठलावाचून न बोले वचन । न देखे नयन दुजे काही ॥ मज रात्रंदिन विठ्ठलाचे ध्यान । वाटे जीवप्राण विठ्ठलचि ॥"
ब्राह्मीभाव प्राप्त झाल्यावर, ज्या सर्वात्मभावात ज्ञानी, योगी पुरुष असतो, त्याच शिखरोच्च अवस्थेत भक्त भक्तियोगाने, प्रेमाने अवस्थित असतो. पण त्यानंतर सुद्धा "आई मला निर्विकल्प समाधीचा निश्चेष्टपणा नको, तर मला तुझ्या सृष्टीत मुक्तपणे नाचूं दे, गाऊं दे, भजन पूजन करूं दे" असेच श्रीरामकृष्ण परमहंस विनवीत असत. अशा देवभक्त सापेक्ष द्वैतभावाला बाळगून तो भक्त काही विशेष्ट स्नेहसंबंध विविध नातेसंबंध स्विकारून त्या आनंदघनाशी आमरण अतूट नाते जोडतो.

अण्णा

29 July, 2008

मानसमणिमाला (१२)


मानसमणिमाला (१२)

हिंदी : भल अनभल निज निज करतूती ।
लहत सुजस अपलोक विभूती ॥ १.४.७. ॥
सुधा सुधाकर सुरसरि सधु ।

गरल अनल कलिमल सति ब्याधू ॥ १.४.८. ॥
मराठी : भले बुरे निज निज कर्तूती ।

घेती कीर्ति अकीर्ति विभूती ॥ ७ ॥
सुधा सुधाकर सुरसरि सज्जन ।

गरल अनल कलिमलसति दुर्जन ॥ प्रज्ञानानंद
अर्थ : सज्जन अगर दुर्जन आपल्या चांगल्या किंवा वाईट करणीनें जगामध्ये सुयश कीर्ति, अगर अपकीर्तिरुपी वैभव प्राप्त करतात. सुधा (अमृत), सुधाकर (चंद्र) व सुरसरि गंगा यांच्या सारखे साधू सज्जन असतात तर दुर्जन हे गरल (विष), अनल (अग्नि) व कर्मनाशा नदी सारखे वाईट निंद्य असतात.

गोस्वामी तुलसीदासांनी या चौपायांमध्ये अगदी उदाहरणाने चांगले वाईट, साधु असाधु यातील फरक स्पष्ट केला आहे. अमृत आणि विष, दाहक अग्नि आणि शीतल चंद्र, पुण्य सलिला गंगा व पुण्य कर्मांचा नाश करणारी कर्मनाशा नदी, इतरांवर उपकार करणारे साधू व इतरांची स्वार्थाकरितां पारध करणारे व्याध (पारधी) अशा जोड्या घेऊन लोकसुखकारक कल्याणप्रद चांगले गुण व, त्यामुळे प्राप्त होणारी सत्‌कीर्ति व परपीडादायक दुर्गुण व त्यामुळे होणारी अपकीर्ति यांतील विरोध चांगल्या रीतीने दाखविला आहे.
अमृत सर्व व्यथा व मरणभयापासून माणसाला सोडविते त्याच प्रमाणे संत साधु जनांचा सहवास निर्भय करतो व त्यामुळे दुःख हरण होते. चंद्राचे अमृतभरित किरण आल्हाददायक तापशमन करणारे असतात हा तर सर्वांचाच अनुभव आहे तसेच साधू जनांचे बोल जणूं अमृताचे कल्लोळ असतात, त्यामुळे दुःखशमन तर होतेच पण मनोमालिन्य दूर होऊन मोह नाश होतो. जगदंबा पार्वती भगवान शंकरांना म्हणते - 'शशिकर सम गिरा तुम्हारी । मिटा मोह सरदा तप भारी ॥ १.१२० - मोह नाश हा केवढा मोठा गुण आहे साधू वचनामध्ये ! तशीच सुरसरि गंगा नदी - "कां फेडित पाप ताप । पोखीत तीरींचे पादप । समुद्र जाय आप । गंगेचे जैसे ॥" (ज्ञाने. १६.१९९) - सर्व जगाचे पाप पोटात घालून आणि जातां जातां तीरावरील असंख्य वृक्ष, पशुपक्षी, माणसे, शेतीवाडी व इतरही उद्योगधंद्यांना जिवनदान देत देत गंगामाई जशी समुद्रांत मिसळून जाते तसेच संतजनही आपल्या जीवन कालावधींत तर असंख्य जणांचा उद्धार करतातच परंतु भविष्यांतील अनेक पिढ्यांनासुद्धां मार्गदर्शन करीत परमात्म्यामध्ये विलीन होऊन जातात. 'सकल सुलभ सब दिन सब देसां' असे संत साधू आपली गुणसंपत्ती परोपकारार्थ वेचून कीर्तिमान होतात.
परंतु जगामध्ये जसे सुजनत्व आहे तशीच दुष्प्रवृत्तीही आहे. तीव्र विषाप्रमाने ती इतरांचा नाश करते आणि भडकणार्‍या अग्निप्रमाणे त्यांचा ठावठिकाणाही उरूं देत नाही. त्यावेळी दुःखातून बाहेरही पडणे अशक्य होईल. कर्मनाशा नदीप्रमाणे उरले सुरले सत्‌कर्म व शुभ वासना बुडवून टाकून निराशेच्या खोल गर्तेत ढकलून देते.


डॉ. सौ. उषा गुणे.

12 July, 2008

तुझा विसर न व्हावा.

तुझा विसर न व्हावा.
भक्ति म्हणजे भगवंताविषयी परमप्रेम भाव. ही भक्तिप्रेमभावना मोठी उत्कट हवी. अखंड आणि क्षण प्रतिक्षण वर्धमान होत जाणारी अशी 'भक्तिप्रेम भावधारा' असली पाहिजे. थोडासा भाव, थोडेसेच पूजन, भजन , वाचन, श्रवण एवढ्याने भागत नाही. तर मग किती हवा तो भाव ? तर सर्वच्या सर्व अंतःकरणच या भक्तिप्रेम भावाने अंतर्बाह्य व्यापून गेले पाहिजे. आणि त्याच बरोबर आपले मन-बुद्धि ह्या एका भगवंताच्याच विचारात आत्मीयतेने रस घेणारी झाली पाहिजे. असे होण्यासाठी त्या सावळ्या सुकुमार, आनंदचिद्‌घन भगवंताबद्दल परम आदर, तसाच निःस्वार्थी निष्काम 'भक्ति-प्रेम-अनुराग' असणे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर काय होईल ? तर सुरुवातीच्या चार दिवसानंतर उत्साह, ओढ, अधिरता, तळमळ, उत्कटता पार सर्वच मावळून जाईल. श्रीज्ञानोबाराय म्हणतात, "वर्षाकाळी सरिता । जैसी चढो लागे पंडुसुता । तैसी निच नवी भजता । श्रद्धा दिसे ॥" नारद म्हणतात, "प्रतिक्षणं वर्धमानम्‌" भगवद्‌भक्ति प्रेमयुक्त झाल्यावाचून उत्कट, एकाग्र, अव्यभिचारी आणि चिरस्थायी होऊंच शकत नाही, आणि अशी भक्ति झाल्यावर ती अत्यंत उत्कट प्रेमभक्ति ही एक त्या भगवंताची/परमेश्वराची शक्तिरूपा होते. मग अशा भाग्यवान थोर महाभागवाताच्या निकट कृपाकटाक्षात, छायेत, आश्रयाला जे जे येतील ते ते सुद्धा मोठेच भगवद्‌भक्त होतात.
भक्ति ही दिव्य, भव्य आणि उदात्त आहे. कोणतेही लाभ हेतु अथवा लौकिक आशा अपेक्षा न ठेवता श्रीहरीची निष्काम, उत्कट, मधुरभक्ति सातत्याने चढत्या वाढत्या प्रमाणात करणे हेच निष्कलंक, निरागस, निरामय भक्तीचे द्योतक आहे.
ही अत्यंत विशुद्ध निष्काम भक्ति सदा सर्वदा अहैतुकी असते. जरासाही लाभ हेतू न ठेवता, अंतःकरणापासूनच उसळणार्‍या अकृत्रिम भक्तिप्रेमा पोटीच ती प्रकटते, आकाराला येते आणि क्रियारूप होते.
अशा भक्ताला दर्शनावाचून अन्य काहीच कामना नसते. एकच कामना - 'तो मज व्हावा, तो मज व्हावा । वेळोवेळा व्हावा पांडुरंग । 'नृसिंह भगवंताने जेव्हा प्रसन्न होऊन भक्त प्रह्लादास कोणताही वर मागण्यास सांगितले, तेव्हा त्याने तत्काळ चोख उत्तर दिले "स्वामिन्‌ कृतार्थोस्मि, वरं न याचे ॥ " तो म्हणाला, "हे प्रभो, आपल्या (इतरांना अलभ्य अशा) दर्शनानेच मी कृतार्थ् व पूर्णतृप्त झालो आहे, आता आपल्या पुण्यस्मरणावाचून अन्य कोणतेही वरदान मला नको. आपले तुकोबाराय हेच सांगतात "हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥"
अशा निरपेक्ष, निर्मम, निर्मळ भक्तीनेच तो मोठा जगदीश्वर परमात्मा प्रसन्न होऊ शकतो. अशा भक्ति प्रेम योगात एक केवळ एक त्या आनंदघन रामाचेच चिंतन उरते. अखंड एकमेव भगवत्‌ चिंतनासाठी मन एकाग्र व्हावयास हवे. आणि भगवत्‌ स्वरूपावर मन एकाग्र करणे, त्या केवळ आनंद स्वरूपाचेच चिंतन करणे किती कठीण् आहे याची कल्पना नाम-चिंतन करावयास सुरुवात केली म्हणजेच कळते, की ते किती भरकटते ? कोठे कोठे जाते ? कशा कशाचे चिंतन करते ?
मग यावर उपाय काय ? मन स्थिर करण्यासाठी योग व ज्ञान या मार्गात अनेक उपाय कथन केले आहेत, पण ते सर्वच्या सर्व अति रुक्ष आहेत. भक्तिमार्गात एकच उपाय आहे, व तो मोठा रम्य आणि अमोघ आहे. भगवंताची दृढ उपासना म्हणजे त्याचे नामस्मरण.
भक्तिमार्गात, तत्त्वचर्चा व शास्त्राभ्यास यापेक्षा आचारावर व भावनाप्रवाहावर अधिकाधिक भर दिला आहे. उपासकाने, भक्ताने आपल्या सर्वच्या सर्व भाव भावना भगवत्‌ केंद्रित, श्रीगुरुकेंद्रित व संबंधित करावयाच्या. मग सगळ्याच्या सगळा आचार श्रीहरि प्रित्यर्थ, त्या आनंदकंदासाठीच करावयाचा अशा सर्व भावभावना व सर्व आचार भगवत्‌ केंद्रित् होणे हीच भक्ति होय.
अशा प्रकारे चित्त, भाव, भावना आचार अतूटपणे वासुदेवाच्याच ठिकाणी जोडले जाणे, आसक्त होणे हाच श्रेष्ठ असा भक्तियोग आहे. हा साध्य झाला की मग पूर्ण वैराग्य, भगवंताचे समग्रज्ञान, त्याचे दर्शन व अचल अशी वासुदेव स्वरूपता या सर्व गोष्टी सहजच प्राप्त होतात आणि भक्त हा भगवंताशी मूळच्या तन्मयतेला, तदाकारतेला, तद्‌रूपतेला तल्लीनतेला प्राप्त होतो.

अण्णा -

10 July, 2008

मानसमणिमाला (११)

मानसमणिमाला (११)

हिंदी : तेज कृसानु रोष महिषेसा ।
अघ अवगुन धन धनी धनेसा ॥ ५ ॥
पर अकाजु लगि तनु परिहरहिं ।
जिमि हिम उपल कृषी दलि गरहीं ॥ बालकाण्ड ३.७ ॥
मराठी : तेजिं कृशानु रोषिं महिषेश्वर ।
अघ-अवगुण-धन धनी धनेश्वर ॥ ५ ॥
परिहरति तनु परापकारा ।
पीक विनाशुनि वितळति गारा ॥ ३.७ प्रज्ञानानंद
अर्थ : हे खलगण तेजाने (तापट) अग्नीच असून क्रोधाने महिषासुरच असतात. पाप आणि दुर्गुण हेच त्यांचे धन असते व या धनाने ते खूपच श्रीमंत, अगदी कुबेरच असतात. ते दुसर्‍याचा अपकार करण्यासाठी अगदी आपल्या देहाचा सुद्धां नाश करायला तयार असतत. जसे पिकाचा नाश करून गारा स्वतःही वितळून नष्ट होतात.

क्रोध उसळून येणे हे खलवृत्तीचे ठळक लक्षण आहे. एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली किंवा घडविली तर सामान्यतः माणसाला राग येतोच. पण तो राग कारणाच्या प्रमाणात व व्यक्तिनुसार कमीजास्त असावा. अजाण बालके, अज्ञानी मनुष्य, आजारी रोगी व्यक्ति यांच्याकडून चुका झाल्यास त्या क्षम्य मानाव्या. अपराध मोठाच असेल तर ती समज देऊन, कारवाई करून राग वाढूं न देतां सर्व प्रकरण हाताळणे हेच शहाणपणाचे असते. परंतु हा विवेक दुष्प्रवृत्त माणसांजवळ नसतो. अग्नी जसा एकदम भडकतो व त्याच्या समोर असेल ते जाळीत सुटतो तसा दुष्ट माणसांचा क्रोध असतो. त्यांना लहान मोठे, ज्ञानी अज्ञानी वंद्य निंद्य यातील कांहीच फरक समजत नाही इतके ते रागानें बेभान होतात व त्यामुळेच त्यांच्या हातून अनेक दुष्कृत्यें घडतात. अनेक तर्‍हेचे अवगुण त्यांना येऊन चिकटतात. पण त्यांना त्याचे वाईट वाटत नाही, उलट फुशारकी वाटते हे खरोखर दुर्दैवच असते. एखादा माजलेला रेडा उन्मत्तपणानें वाटेल त्याला धडका मारून लोळवितो आणि जीवही घेतो तसे दुष्ट माणसाला आपले विकार आवरत नाहीत व त्या भरात ते इतरांचा नाश घडवून आणतात. त्यातच त्यांचा आनंद साठविलेला असतो.
परंतु या सर्व खटाटोपात ते स्वतःचाही सर्वनाश करून घेत असतात हे त्यांच्या लक्षांत येत नाही; इतके ते त्या दुष्ट विचारानें भारावलेले असतात. नको असलेल्या व्यक्तिचा नाश घडवून आणण्याकरिता स्वतः 'मानवी बाँब' होऊन आपलाही नाश पत्करावयाचा हे किती अघोरी कृत्य आहे ? त्यातून ना कुठला स्वार्थ साधता येतो ना परार्थ. उलट स्वतःच्या मनुष्यत्वाची हानी आणि जगाकडून शिव्याशाप व निंदा !
जगाच्या कल्याणाकरितां, देशकार्याकरितां, मानवतेच्या भूमिकेतून अनेक संत सत्‌शील व्यक्तींनी आपल्या प्राणांचे बलिदान केलेले आपण आदरानें स्मरतो. अनंतकाल पर्यंत त्यांच्या कीर्तिंचे गायन होत राहते. मरावे परि कीर्तिरुपे उरावें - असे त्यांचे चारित्र्य. या पार्श्वभूमीवर स्वतःचा नाश झाला तरी चालेल पण दुसर्‍याचा नाश केल्याखेरीज राहणार नाही ही विचारसरणी किती विपरीत आणि विघातक आहे नां ?
डॉ. सौ. उषा गुणे.

08 July, 2008

यद् यद् आचरति श्रेष्ठ: ...

यद् यद् आचरति श्रेष्ठ: ...

श्रीमद् भगवद्‍गीतेत भगवान् श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना एके ठिकाणी म्हणतात, ' सामान्य लोक समाजातील श्रेष्ठ पुरुष जसे आचरण करतात त्याचे अनुसरण करतात'. पुढारी भ्रष्ट असेल तर अनुयायी त्याचेच अनुकरण करणार. आई वडीलांचे आदर्श वा स्वैर वागणुक, जे असेल त्याचा अपत्यांवर परिणाम होतोच. वैदिक संस्कृतीचा पाया रचणारे जे जे विचारवंत होते त्यांना मनुष्य स्वभावाच्या या मूलभूत तत्त्वाची जाण होती. ह्याबाबतीत नेहमी जनकराजा, ययाति इत्यादिंचे उदाहरण दिले जाते. पण प्रभु श्रीराम देखील हाच विचार बाळगून आपले आयुष्य कंठीत होते हे वाल्मीकि रामायणातील एका प्रसंगावरून चांगलेच जाणवते.
प्रसंग आहे पित्याच्या आद्न्येनुसार श्रीराम वनांत गेल्यावर भरत त्याला परत अयोध्येला नेण्यासाठी येतो. सर्वांना पटत असते की श्रीराम जे करत आहेत ते धर्माला अनुसरून आहेच. पण सर्व प्रजाच काय राजा दशरथाचे मंत्रीगण ज्यात वसिष्ठ व वामदेव या दोन महर्षींव्यतिरिक्त सुयश, जाबाली, कश्यप, गौतम, मार्कण्डेय व कात्यायन् यांसारखे ऋषि देखील होते (बाल. सर्ग ७); त्यांची देखील हीच इच्छा होती की श्रीरामांनीच राज्याभिषेक करवून घ्यावा.
भरताची प्रार्थना ऐकून श्रीरामांनी त्याला बराच उपदेश केला आणि त्यालाच अयोध्येचे राज्य करणे अनिवार्य आहे हे पटविले. त्यानंतर जाबालींनी एक प्रयत्न केला. ते म्हणाले - "रघुनंदन, आपण जे काही म्हणालात ते ठीकच आहे. पण श्रेष्ठ बुद्धीच्या तपस्वी मनुष्याने असे अडाणी माणसाप्रमाणे निरर्थक विचार करणे योग्य नव्हे. जीव एकटाच जन्म घेतो व एकटाच नष्ट होतो. हे जीवन म्हणजे मार्गस्थाला पुढच्या मुक्कामाआधी धर्मशाळेत एक रात्र आश्रय घेण्यासारखे आहे. कोण कुणाचा बंधू आणि कोण कुणाचा पुत्र. पिता केवळ जन्मास निमित्तकारण असतो. राजे आपले कोणी नव्हेत आणि आपण त्यांचे कुणी नव्हेत. त्यांना जे करायचे होते ते त्यांनी केले. आपण व्यर्थच कष्ट भोगीत आहात. प्राप्त झालेल्या अर्थाचा त्याग करून धर्म परायणता स्वीकारणारा मनुष्य या जगात केवळ दुःख म्हणूनच मृत्युनंतर नष्ट होतो.
"श्राद्धकर्माचे देव पितर आहेत. श्राद्धाचं दान पितरांना मिळतं असं लोक समजतात. पण जरा logic वापरून पहा. या असल्या परंपरेने काय साध्य होते. केवळ अन्नाची नासाडी. मरण पावलेल्याला अना कसे पोहोचेल. एकाने खाल्लेले अन्न जर दुसर्‍ पोचत असेल तर परदेशी जाणार्यांसाठी देखील शिदोरी द्यायच्या ऐवजी त्याचेही श्राद्धच करावे. तेव्हां असा निश्चय करा की या लोकाशिवाय दुसरा लोक नाही. परोक्ष अथवा पारलौकिक वगैरे विचार योग्य नाही. तेव्हां आपण भरताबरोबर परत अयोध्येत जाऊन राज्य ग्रहण करावं " हे सर्व ऐकून श्रीरामांनी जाबालींच्या नास्तिक विचारांची केवळ निंदाच केली. ते म्हणाले की वेदविरुद्ध मार्गाचा आश्रय करणारे आपण नास्तिक आहात. पुढे असेही म्हणाले की, अशा पाखंडी बुद्धीच्या द्वारे अनुचित विचर करणार्‍या आपणांस माझ्या पिताजींनी आपल्याला याचक बनविले ह्या त्यांच्या कृत्याचीच मी निंदा करतो. जाबालींचे नास्तिक व्यक्तव्य खोडून काढणारे असे श्रीरामांचे पुढे बरेच कथन आहे. पण त्यात महत्त्वाचे म्हणजे ते म्हणाले - " आपण सांगितलेल्या मार्गाने मी गेल्यास मी प्रथमतः तर स्वेच्छाचारी होईन. नंतर हा लोक स्वेच्छाचारी बनेल. कारण राजाचं जसे आचरण असते तसंच आचरण प्रजा करू लागते. " वडीलधारी, मंत्रीगणांपैकी एक आणि त्यात ऋषि असून श्रीरामांनी जाबालींना खडसावले ? पण मग आदर्श व्यक्ति अशीच असते नाही का ? असत्य, अधर्म याचा पुरस्कार करणारा मग कोणीही असो; प्रभू त्याला विरोध करणारच.
पण आता प्रश्न पडतो की जाबाली असे वेदविरुद्ध बोललेच कसे ? सर्गाच्या शेवटी स्पष्टीकरण आहे की केवळ समयाच्या आवश्यकतेनुसार ते नास्तिकवादी 'बनले' - त्यामागचा उद्देश होता की कोणत्याही कारणांनी श्रीरामांनी अयोध्येस परत जाण्यास राजी व्हावं. गंमत म्हणजे इतकं होऊनही वसिष्ठांनी देखील एक वेगळे कारण सांगून श्रीरामांना अयोध्येस परतवण्याचा प्रयत्न केलाच. तरीही कोणत्याही युक्तीला बळी पडून अधर्म करायचा असेल तर मग तो " आदर्श राम " नव्हेच. तसे झाले असते तर सर्व रामायणच कोसळले असते.

एकोहम् -