30 April, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक २९ वा

किरीटं वैरिञ्चं परिहर पुरः कैटभभिदः
कठोरे कोटीरे स्खलसि जहि जम्भारिमुकुटम् ।
प्रणम्रेष्वेतेषु प्रसभमुपयातस्य भवनं
भवस्याभ्युत्थाने तव परिजनोक्तिर्विजयते ॥ २९॥


आई त्रिपुरसुंदरी ! भगवान् शंकर हे जेव्हां तुझ्या मंदिरामध्यें येतात तेव्हां तुझी सेवा करण्याकरितां नियुक्त असलेल्या देवतांची काय धांदल उडते ! पहा. तुझ्या दर्शनाकरिता आलेले ब्रह्मदेव, विष्णु, इंद्र इत्यादि देव तुझ्या जवळ गर्दी करून उभे असतात. ते नम्र झालेले असतात. ते तुला साष्टांग प्रणिपात करीत असतात. भगवान् शंकर आल्याबरोबर तूं जेव्हां त्यांचें स्वागत करण्याकरितां सामोरी जातेस तेव्हां तुझा सेवकगण "वैरिञ्चं किरीटं परिहर" हा ब्रह्मदेवाचा मुकुट आहे त्याला बाजूला सारा. आणि हा कैटभजित् म्हणजे कैटभारि विष्णु त्यांच्या मुकुटाचे हे तीक्ष्ण टोंक आहे. ते लागेल पायाला. हा जंभारि म्हणजे इंद्र, त्याचा मुकुट आहे. "जहि" म्हणजे तो बाजूला टाका. आई ! याप्रमाणे सर्व देव तुझ्या चरणीं प्रणिपात करीत असतांना अकस्मात् जेव्हां शंकर येतात तेव्हां त्यांच्या स्वागताकरितां तूं उद्युक्त होतेस त्या वेळीं तुझें "परिजन" म्हणजे सेवक, त्यांच्या मुखांतून बाहेर पडणारे हे शब्द तुझा अपार महिमा सुचवीत आहेत. त्यांचा उत्कर्ष असो. त्यांचा विजय असो.

आई त्रिपुरसुंदरी ! सर्व देवांची तुझ्या चरणी साष्टांग प्रणिपात करण्यासाठी अलोट गर्दी होत असते. अशा वेळीं शंकराचे तूं सामोरे जाऊन स्वागत करतेस. यांत तुझ्या मनाचें औदार्य आणि तुझें पातिव्रत्य प्रकट होत आहे. हाही तुझा महिमाच आहे. तूं शंकरांना हात दिला नसतास तर त्यांची संसारांत फटफजिति झाली असती. शंकरांना स्वतःला पांच तोंडे आहेत. एक मुलगा सहा तोंडांचा षडानन - कार्तिकस्वामी, तर दुसरा मुलगा हत्तीच्या तोंडाचा - गजानन लंबोदर. परिवार पहावा तर तो भूत, प्रेत, पिशाच ! ! आई त्रिपुरसुंदरी ! खरोखर तूं जर अन्नपूर्णा या रूपानें शंकरांना हात दिला नसतास तर त्यांना पोटभर खावयास मिळालेंही नसतें ! तुझ्यावांचून शंकर हे मृततुल्य झाले असते ! (श्लोक १ पहा). तात्पर्य, आई ! तुझा महिमा अपार आहे. या श्लोकांत श्रीमहात्रिपुरसुंदरीच्या समृद्धीचें वर्णन केलेले असल्यामुळें हा श्लोक उदात्त अलंकाराचे उत्कृष्ट उदाहरण झाला आहे.

श्लोक १० मध्यें दाखविलेल्या यंत्राप्रमाणें सोन्याच्या पत्र्यावर सहा त्रिकोण असलेले यंत्र काढून मधल्या षट्कोनांत फक्त क्लीं हें एकच बीजाक्षर लिहावे. पंचेचाळीस दिवस विधिपूर्वक पूजा करून या श्लोकाचा रोज एक हजार जप करावा. नैवेद्याला मध आणि उडदाचे वडे असावेत. हें यंत्र धारण केल्यास दुष्ट आणि मुर्ख लोकांची दुर्बुद्धि नष्ट होऊन त्यांच्या मनांत आपल्याबद्दल सद्धावना निर्माण होईल व ते वश होतील.

29 April, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक २८ वा

सुधामप्यास्वाद्य प्रतिभय-जरा-मृत्युहरिणीं
विपद्यन्ते विश्वे विधि-शतमखाद्या दिविषदः ।
करालं यत्क्ष्वेलं कवलितवतः कालकलना
न शम्भोस्तन्मूलं तव जननि ताटङ्‌कमहिमा ॥ २८॥


इतर सर्व तत्त्वांचा व त्या तत्त्वांच्या अधिष्ठात्री असलेल्या देवतांचा सदाशिवतत्त्वांमध्यें लय होतो, पण सदाशिवतत्त्वाचा मात्र कधींच कोठे लय होत नाहीं. सदाशिवतत्त्व हें अखंड अविनाशी आहे. सदाशिवाला प्राप्त झालेलें हें अविनाशित्व श्रीत्रिपुरसुंदरीच्याच प्रभावाने प्राप्त झालेलें आहे. अशा अभिप्रायानें आचार्य वर्णन करीत आहेत. "विधिशतमखाद्याः विश्वे दिविषदः सुधां आस्वाद्य अपि विपद्यन्ते" विधि म्हणजे ब्रह्मदेव. शतमख म्हणजे इंद्र इत्यादि सर्व देव अमृताचा आस्वाद घेऊनही - अमृत प्राशन करूनही शेवटीं "विपद्यन्ते" म्हणजे मरतात. सुधा म्हणजे अमृत. तें प्राशन केलें असतां अत्यंत भयंकर असलेल्या जरा-मृत्यूचाही नाश होतो, तथापि त्यालाही कांहीं कालमर्यादा आहे. ती कालमर्यादा संपली कीं, जरामृत्यु यांचा नाश करणारे अमृत प्राशन करूनही देवांना मृत्यु येतोच. देवांचें अजरत्व आणि अमरत्व हें अखेर कालाच्या उदरांत गडप होतच असतें. याच्या उलट भगवान् शंकर हे विष प्राशन करूनही अविनाशी आहेत. वस्तुतः विष हें अत्यंत भयंकर आणि मारक असते, तथापि तें शंकरांना मारक झालें नाहीं. कारण -

कराल म्हणजे अत्यंत जहाल भयंकर अशा विषाचेंही शंकराने प्राशन करून टाकले होतें. म्हणूनच तर त्यांना नीलकंठ नांव पडलें. एवढे भयंकर विष प्राशन करूनही त्यांना "कालकलना न" म्हणजे काळ कांहीं ग्रासूं शकला नाहीं ! हा काय त्या शंभूमहादेवाचा स्वतःसिद्ध प्रताप आहे ? छे, तो त्यांचा स्वतःसिद्ध महिमा नव्हे. मग त्याचें मूळ कशांत आहे असें विचारशील तर सांगतो. आई ! तो तुझ्या ताटंकांचा म्हणजे कानांत घालावयाच्या सौभाग्यालंकारांचा महिमा आहे ! जिचे कुंकू बळकट तिचा पति दीर्घायु हें प्रसिद्धच आहे. याच न्यायाने जिचे सौभाग्यालंकार प्रभावी तिचा पति दीर्घायु असणें स्वाभाविकच आहे. तात्पर्य, आई ! शंकराचे अविनाशित्व हा तुझ्या कानांतील ताटंकांचा म्हणजे कर्णभूषणांचा महिमा आहे ! ! जिच्या सौभाग्यालंकाराचा हा महिमा आहे, तिचा साक्षात स्वतःचा महिमा केवढा असणार !

सोन्याच्या पत्र्यावर सममुज चतुष्कोन काढावा. चारी कोनांत मिळणाऱ्या रेषांची टोकें किंचित् पुढें करून त्यांना त्रिशुळाचा आकार द्यावा. चारी कोपऱ्यात आठ त्रिशूळ होतील. मध्यभागीं एकाखाली एक ठं ठं ठं अशीं तीन बीजे लिहावींत. पंचेचाळीस दिवस विधिपूर्वक पूजा करून या श्लोकाचा रोज एक हजार वेळां जप करावा. द्‌ध, पायस, गुळ, नारळ, केळे आणि तांबूल यांचा नैवेद्य दाखवावा. म्हणजे स्त्रियांची सर्व कार्यें सिद्ध होतील व पुरुषांचा अपमृत्यु टळेल.

28 April, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक २७ वा

जपो जल्पः शिल्पं सकलमपि मुद्राविरचना
गतिः प्रादक्षिण्य-क्रमणमशनाद्याहुति-विधिः ।
प्रणामं संवेशः सुखमखिलमात्मार्पणदृशा
सपर्या-पर्यायस्तव भवतु यन्मे विलसितम् ॥ २७॥


आई ! मी तुझी पूजा काय करणार ? निसर्गतः माझ्याकडून जें कांहीं होत असेल ते सर्व तुझी पूजाच आहे असें समज. अशा अभिप्रायानें आचार्य प्रार्थना करीत आहेत. आई ! लोक तुझ्या मंत्राचा जप करतात. माझ्या हातून तो कांहीं होत नाही. तेव्हां मी जें कांहीं व्यवहाराच्या निमित्ताने बोलत असेन तें माझें बोलणे हाच तुझा जप होय असें समज. व्यवहारांत वागतांना मला जे कांहीं हातानें अभिनय करावे लागतात त्या तुझ्या मुद्राच आहेत असें समज. तात्पर्य, " मे जल्पः ते जपः भवतु, मे शिल्पं ते मुद्राविरचना भवतु" माझी बडबड हीच तुझी स्तुति किंवा मंत्राचा जप होय. तसेच शिल्प म्हणजे हातापायानें केले जाणारे व्यवहार अथवा कामें. मुद्रा म्हणजे उपासनेच्या वेळीं इष्ट देवतेला हाताने जे निरनिराळे आकार दाखविले जातात ते. शंखमुद्रा, योनिमुद्रा, धेनुमुद्रा, इत्यादि. श्रीविद्येच्या उपासनेमध्यें सर्वसंक्षोभिणी, सर्वविद्राविणी, सर्वाकर्षिणी इत्यादि मुद्रांची नांवे आहेत. जपाने इष्टदेवतेचें सान्निध्य लाभते तर मुद्रा या इष्टदेवतेला संतुष्ट करीत असतात. मुदं म्हणजे संतोषाला रान्ति म्हणजे देतात त्या मुद्रा. "स्वाध्यायादिष्ट-देवता-संप्रयोगः" इष्ट देवतेचा जप करणें हाही एक प्रकारचा स्वाध्यायच होय. सम्प्रयोग म्हणजे चांगल्या प्रकारें उत्कृष्ट सान्निध्याचा सहयोगाचा लाभ होणें. हें इष्टदेवतेचें उत्कृष्ट सान्निध्य मन लावून केल्या जाणाऱ्या जपानें मिळतें. "स्वाध्यायाद्योगमासीत योगात्स्वाध्यायमामनत् । स्वाध्याययोगसम्पत्त्या परमात्मा प्रकाशते" जपानें इष्टदेवतेचें सान्निध्य मिळवावें व इष्टदेवतेच्या सान्निध्यानें उपासनेचे बळ वाढवावें. उपासनेचे बळ आणि इष्टदेवतेचा अनुग्रह हींच परमेश्वराच्या साक्षात्काराची साधनें होत, असें स्मृतीत म्हटलेलें आहे. "श्रोतव्यः श्रुतिवाक्येभ्यः मन्तव्यश्चोपपत्तिभिः । मत्वा च सततं ध्येयः एते दर्शनहेतवः" ईश्वराच्या साक्षात्काराकरितां प्रथम श्रुतिवाक्यांनी त्याचें श्रवण करावे, त्याचें स्वरूप जाणावे. तें जाणल्यानंतर साधक- बाधक प्रमाणांनीं त्याचा विचार करावा. विचारानें ते स्वरूप मनामध्ये ठसवावें. मननानें मनांत ठसलेल्या स्वरूपाचा पुढें निदिध्यास घ्यावा. सतत त्याचें ध्यान करावे. हींच ईश्वराच्या साक्षात्काराची साधने होत. आचार्य म्हणतात आई ! माझी बडबड हीच तुझी स्तुति किंवा हाच तुझा जप आणि हातांनीं होणाऱ्या निरनिराळ्या हालचाली ह्याच तुझ्या मुद्रा समज. "मुद्राविरचना" म्हणजे मुद्रा करणें.

आई ! माझ्या पायांची यदृच्छेने होणारी हालचाल गति-गमन हेंच माझें तुला प्रदक्षिणा घालणे होय. प्रादक्षिण्यक्रमण म्हणजे प्रदक्षिणा घालण्याच्या उद्देशाने पावलें टाकणें. तसेंच "अशनादि आहुतिविधिः" म्हणजे मी जें कांहीं खातों-पितो तेंच तुझ्या उपासनेचे अंगभूत असलेलें हवनकर्म समज. आहुतिविधि म्हणजे होमहवन करणें. त्याचप्रमाणे "संवेश" म्हणजे झोपणें, सुखानें गादीवर लोळणे हाच माझा प्रणाम समज. "मे अखिलं विलसितं आत्मार्पणदृशा तव सपर्या-पर्यायः भवतु" माझा हा सर्व जीवनविलास म्हणजे आत्मार्पणदृष्टीनें केल्या जाणाऱ्या तुझ्या पूजेचाच प्रकार होवो. मी तुलाच आत्मा समजून हें सर्व कांहीं अर्पण करीत आहें. "आत्मा त्वं, गिरिजा मतिः, सहचराः प्राणाः, शरीरं गृहं ... यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनम्"

"जपो जल्पः" या श्लोकांत आचार्यांनी जो भाव व्यक्त केला आहे त्याला मानसपूजा असें म्हणतात. पूजेचे दोन प्रकार आहेत. एक अंतःपूजा व दुसरी बाह्य पूजा. अंतःपूजेलाच मानसपूजा असे म्हणतात. यालाच तंत्रशास्त्रांत "समयाचार" असें म्हटलेले आहे. आपल्या इष्ट देवतेचे परब्रह्मस्वरूपाने सहस्रदलकमलांत ध्यान करून आपला संपूर्ण जीवनव्यवहार ही इष्टदेवतेची पूजाच होय अशी भावना समयाचार पद्धतीत ठेवावी लागते तर कौलाचार पद्धतीत सर्व बाह्यपूजेची साधनसामग्री संग्रहीत करून थाटामाटानें व शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करावी लागते. बाह्यपूजेपेक्षां अंतःपूजा श्रेष्ठ आहे म्हणूनच आचार्यांनी या श्लोकांत अंतःपूजेचा निर्देश केला आहे.

हें यंत्र सोन्याच्या पत्र्यावर अधोमुख त्रिकोण काढून त्याच्या तिन्ही कोनांना त्रिशूळाचा आकार दाखवा. मध्यभागी ह्रीं हें बीज लिहावे. यंत्राची विधिपूर्वक पूजा करून पंचेचाळीस दिवस या श्लोकाचा रोज एक हजार जप करावा. नैवेद्य गुळ आणि पायस यांचा दाखवावा. याप्रमाणे यंत्र सिद्ध करून धारण केल्यास मंत्रसिद्धि होते. देवीचें दर्शन घडते आणि आत्मज्ञानाचाही लाभ होतो. याचप्रमाणे यंत्र काढून याच पद्धतीने चौतिसाव्या श्लोकाने आराधना केल्यास साधक अत्यंत बुद्धिमात् होतो. नैवेद्य फक्त मध.

27 April, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक २६ वा

विरिञ्चिः पञ्चत्वं व्रजति हरिराप्नोति विरतिं
विनाशं कीनाशो भजति धनदो याति निधनम् ।
वितन्द्री माहेन्द्री विततिरपि संमीलितदृशा
महासंहारेऽस्मिन् विहरति सति त्वत्पतिरसौ ॥ २६॥


आई ! तुझा महिमा मी काय वर्णन करूं ? हा सृष्टिकर्ता ब्रह्मदेव पंचत्वाला जातो म्हणजे पृथक् पृथक् पंचमहाभूतांत तो विलीन होतो. हरि म्हणजे भगवान विष्णु देखील पंचमहाभूतांत विलीन होतात. "कीनाशः विनाशं भजति" म्हणजे यमाचाही नाश होतो. यम हा लोकांचा निष्ठुरपणें नाश करीत असतो म्हणून त्यास "कीनाश" असें म्हणतात. तात्पर्य, तो यमही मरतो आणि धनद म्हणजे कुबेर तोही निधन पावतो. "माहेन्द्री विततिः अपि सम्मीलितदृशा वितन्द्री भवति" चौदा भुवनांचे अधिपति चौदा इंद्र. त्यांना लोकपाल अथवा महेंद्र असे म्हणतात. या चौदा महेंद्रांचा समुदाय म्हणजे माहेन्द्री वितति या शब्दांचा अर्थ झाला. या इंद्रांच्या समुदायालाही कायमची तंद्री लागते. अर्थात् प्रलयकाळी त्यांचेही डोळे मिटतात, तेही मरतात. अशा या "महासंहारे" म्हणजे शेवटच्या कल्पांतकाळीं तुझे पति भगवान् सदाशिव हे तुझ्यासह आनंदाने विहार करीत असतात. इतरांप्रमाणे त्यांना मरण नाहीं, नाश नाहीं. हें त्यांचें अविनाशित्व हा तुझ्याच पातिव्रत्याचा प्रभाव होय.

हें यंत्र सोन्याच्या पत्र्यावर काढून अमावस्येच्या दिवशीं अथवा सहा दिवस विधिपूर्वक पूजा करून गुळपायसाचा नैवेद्य दाखवावा. रोज एक हजार या श्लोकाचा जप करून यंत्र धारण करावे. फल सर्व कार्यसिद्धि व शत्रुजय.

26 April, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक २५ वा

त्रयाणां देवानां त्रिगुण-जनितानां तव शिवे
भवेत्पूजा पूजा तव चरणयोर्या विरचिता ।
तथा हि त्वत्पादोद्वहन-मणि-पीठस्य निकटे
स्थिता ह्येते शश्वन्मुकुलित-करोत्तंस-मकुटाः ॥ २५॥


आई जगज्जननी ! तुझी पूजा केली म्हणजे सर्व देवांची पूजा केल्याचे श्रेय मिळतें. कारण सर्वांमध्ये श्रेष्ठ तूंच आहेस. ब्रह्मा, विष्णु आणि रुद्र हे सर्व देवांमध्ये श्रेष्ठ मानले जातात. पण हे तिन्ही देव तुझ्या सत्व, रज आणि तम या तीन गुणांपैकी एका-एका गुणापासून जन्माला आलेले आहेत. अथर ती तुझी लेकरेंच आहेत. "ब्रह्मविष्णूमहादेवा अस्याः पुत्रा वरानने । चतुर्थोऽहं महेशानि सुतस्तस्या महेश्वरः ॥" असें भगवान् शंकरच प्रत्यक्ष पार्वतीला शिवशक्ति तत्त्वाचे वर्णन करतांना दक्षिणामूर्तिसंहितेत सांगत आहेत. हे शिवा भवानी ! "शिवयति इति शिवा" सर्व विश्वाचें तूं कल्याण करतेस म्हणून तुला शिवा असें म्हटलेलें आहे. हे जगत्कल्याणकारिणी माते ! तुझ्या चरणकमलांची पूजा केली म्हणजे या सर्व देवांची पूजा केल्यासारखीच आहे. "तव चरणकमलयोः या पूजा विरचिता सा देवानां पूजा भवेत्" आई ! तूं म्हणशील, असें कसें म्हणतोस ? एकाची पूजा केल्याने दुसऱ्याची पूजा केल्यासारखे कसें होईल ? सांगतो ऐक.

सर्व देवांत श्रेष्ठ असलेले ब्रह्मा, विष्णु, रुद्र आणि महेश हे चारही देव तुझे पाय ठेवण्याकरितां तयार केलेले जें रत्नखचित पादपीठ म्हणजे चौरंगासारखें आसन अथवा उपसिंहासन आहे त्याच्या जवळ हात जोडून निरंतर नम्र भावाने उभे आहेत. त्यांनीं जोडलेले दोन्ही हात आपल्या मुकुटाला लावलेले असल्यामुळें त्यांचे मुकुट जणुं कांहीं तुरे लावल्याप्रमाणे दिसत आहेत. तात्पर्य, ब्रह्मा, विष्णु, रुद्र आणि महेश्वर हे सर्व देवांत श्रेष्ठ असलेले देव, तुझी सेवा घडावी म्हणून निरंतर तुझ्या सान्निध्यांत हात जोडून नम्र भावानें उभे आहेत. अशा स्थितींत एखाद्या भक्तानें तुझी पूजा केली तर त्यांत त्यांना अत्यंत संतोषच वाटतो. उलट तुझी पूजा सोडून त्यांची पूजा केली तर त्यांत त्यांना संतोष वाटणार नाहीं. हा भक्तांचा स्वभाव असतो. ते तुझे भक्त आहेत. तुझी पूजा केल्यानेंच त्यांना आनंद वाटत असल्यामुळें तुझी पूजा हीच त्यांची पूजा होय. हाच अभिप्राय लक्षांत घेऊन श्रीत्रिपुरसुंदरीच्या पूजेचा महिमा आगमग्रंथांत गालेला आहे.

"विष्णुपूजासहस्राणि शिवपूजाशतानि च
अम्बिकाचरणार्चायाः कलां नार्हन्ति षोडशीम्"

सोन्याच्या पत्र्यावर अधोमुख त्रिकोण काढून त्याच्या तिन्ही कोणाला बाहेरच्या बाजूने त्रिशूळ काढावेत. त्रिकोणामध्ये सौः हें बीजाक्षर लिहावे. पंचेचाळीस दिवस त्याची पूजा करावी. मधाचा नैवेद्य दाखवावा. या श्लोकाचा रोज एक हजार जप करावा. सिद्ध यंत्र धारण करावे. याच्या योगाने राजकीय अधिकाराचा लाभ होईल. उत्कृष्ट पदवीचाही लाभ होईल.

25 April, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक २४ वा

जगत्सूते धाता हरिरवति रुद्रः क्षपयते
तिरस्कुर्वन्नेतत्स्वमपि वपुरीशस्तिरयति ।
सदापूर्वः सर्वं तदिदमनुगृह्णाति च शिव-
स्तवाज्ञामालम्ब्य क्षणचलितयोर्भ्रूलतिकयोः ॥ २४॥ 


आई ! तुझ्या केवळ भुवयांच्या संकेताने ब्रह्मांडांच्या घडामोडीची केवढी प्रचंड कामें चाललेली आहेत. पहा - "धाता जगत् सूते" ब्रह्मदेव तुझ्या भुवयांचा संकेत होतांक्षणींच जग निर्माण करतो. "हरिः अवति" विष्णू त्या जगाचे पालन-पोषण करतो आणि "रुद्रः क्षपयते" म्हणजे प्रलयकाली रुद्र त्या जगाचा लय करतो. यापमाणें जगाची उत्पत्ति, स्थिति आणि प्रलय या कामी नियुक्त असलेले अधिकारी देव "तव भ्रूलतिकयोः आज्ञां आलम्ब्य" तुझ्या क्रियाशील झालेल्या भ्रूलतांची आज्ञा होतांच आपआपले कार्य करूं लागतात. रुद्रदेवतेनें प्रलयकाळीं सर्व कार्याचा नाश केल्यानंतर त्या कार्याची कारणें शिल्लक रहातात. घट फुटला तरी खापरे शिल्लक रहातात. पट फाटला तरी धागेदोरे शिलक रहातात. त्याचप्रमाणें कार्यप्रपंचाचा नाश झाला तरी कारणप्रपंच शिल्लक रहातोच. त्या कारण प्रपंचाचाही लय करण्याचें कार्य महेशाचे आहे. तो महेश देखील, आई ! तुझ्या भ्रुकुटीचा संकेत होतांच ती तुझी आज्ञा समजून त्या विस्कळित झालेल्या कारणप्रपंचाचा आपल्या स्वरूपांत लय करून घेतो. येथें लय शब्दाचा अर्थ अव्यक्त स्वरूपांत रहाणे असा समजावा. सर्व कारणप्रपंचाला आत्मस्वरूपांत लीन करून घेऊन शेवटीं तो महेश्वर देखील स्वतःला सदाशिवस्वरूपांत लीन करून घेतो. हाच अभिप्राय श्लोकाच्या दुसऱ्या चरणांत सांगितला आहे. "ईशः एतत् तिरस्कुर्वन् स्वं अपि वपुः तिरयति" ईश म्हणजे महेश्वर. या सर्वांचा लय करीत स्वतःच्या देहाचाही सदाशिवतत्त्वांत लय करून घेतो. सदाशब्दपूर्वक शिवतत्त्व म्हणजे भगवात् सदाशिव. हे ब्रह्मा, विष्णु, रुद्र आणि महेश या सर्वांनाच अव्यक्तरूपानें आपल्या स्वरूपांत ते लीन होऊन राहिले असतांना पुन्हां सृष्टिकालीं आविर्भूत करण्याचा प्रयत्न करतात. हा त्यांचा प्रयत्नही आई, तुझ्या भ्रुकुटीच्या संकेतानेच होत असतो. ब्रह्मा, विष्णु, रुद्र आणि ईशान म्हणजे महेश्वर यांना सृष्टिकाली त्यांच्या कार्यासह आविर्भूत करणें या क्रियेला अनुग्रह असें म्हणतात. सदाशिवाच्या अनुग्रहानेच हे सर्व देव सृष्टिकाली प्रकट होऊन आपआपली कार्यें करीत असतात. हा सदाशिवाचा अनुग्रह देखील तुझ्या भ्रूसंकेतावरच अवलंबून आहे. तात्पर्य, हे माते त्रिपुरसुंदरी ! तुझ्या केवळ भुवयांच्या संकेतानेच ब्रह्मा, विष्णु, रुद्र, ईशान आणि सदाशिव या पांचही देवता आपआपले कार्य सृष्टि, स्थिति, प्रलय, तिरोधान आणि अनुग्रह क्रमशः करीत असतात. आई ! तुझ्या नुसत्या भुवयांचा हा प्रभाव आहे तर मग साक्षात तुझा प्रभाव काय वर्णन करावा ? सर्वांवर अनुग्रह करणाऱ्या सदाशिवावर देखील तुझा अनुग्रह आहे, म्हणूनच तो सर्वांवर अनुग्रह करूं शकतो. ही सगळी कार्ये तत्त्वतः तूंच करीत आहेस, म्हणूनच तुझें वर्णन करतांना ललितासहस्रनामामध्यें -

सृष्टिकर्त्री ब्रह्मरूपा गोप्त्री गोविन्दरूपिणी ॥
संहारिणी स्वरूपा तिरोधानकरीश्वरी ।
सझाशवानुग्रहदा पञ्चकृत्यपरायणा ॥

असें वर्णन केलेले आहे. पंचकृत्य शब्दाचा अर्थ वर सांगितलेली उत्पत्ति स्थिति इत्यादि पांच कार्ये असा समजावा. या पांचही कार्यांचा आश्रय किंवा त्यामध्ये तत्पर श्रीललितामहात्रिपुरसुंदरीच आहे. सकलजननीस्तवामध्येंही हाच अभिप्राय मोठ्या बहारीने वर्णन केलेला आहे.

"विरिञ्चाख्या मातः सुजसि हरिसंज्ञा त्वमवसि
त्रिलोकीं रुद्राख्या हरसि विदधासीश्वरतया ।
भवन्ति सादाख्या प्रभवसि च पाशौघदलने
त्वमेवैकाऽनेका भवसि कृतिभेदैर्गिरिसुते ॥ "

हे आई ! ब्रह्मदेव हें नांव धारण करून तूं हे सर्व जग निर्माण करतेस. विष्णु हें नांव धारण करून त्याचें तूं संरक्षण करतेस. रुद्र हें नांव धारण करून तूं त्रैलोक्याचा संहार करतेस. तर पुन्हां ईश्वर हें नांव धारण करून या सर्वांना उत्पन्न करतेस. तूंच सच्चिदानंदरूप सर्वाधारभूत सादाख्यकलारूपाने सर्व जीवांच्या भवपाशांचे दुःखपाशांच्या समूहाचे निर्दालन करतेस. आई गिरिसुतु ! तत्त्वतः तूं एकच असून कार्यभेदानें अनेक नांवे व रूपें धारण करतेस धन्य आहेत तूं.

हें शिवयंत्र सोन्याच्या पत्र्यावर काढावे. विधिपूर्वक त्याची तीस दिवस पूजा करावी. मध उडदाचे वडे आणि तिळकुटाचा नैवेद्य दाखवावा. यंत्राजवळ बसून रोज या चोविसाव्या श्लोकाचा एक हजार जप करावा. हें यंत्र धारण केलें असता ३ भूतप्रेत-पिशाच बाधा नाहीशी होते. अपस्मार म्हणजे फीट येण्याचा विकार थांबतो.

24 April, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक २३ वा

त्वया हृत्वा वामं वपुरपरितृप्तेन मनसा
शरीरार्धं शम्भोरपरमपि शङ्‌के हृतमभूत् ।
यदेतत्त्वद्‌रूपं सकलमरुणाभं त्रिनयनं
कुचाभ्यामानम्रं कुटिल-शशि-चूडाल-मकुटम् ॥ २३॥


आई ! कदाचित तूं असें विचारशील की, लोक शिवसायुज्याची अपेक्षा करीत असतात. तूं माझ्या सायुज्याची अपेक्षा कां करतोस ? यावर माझें उत्तर असे आहे कीं, मला तुझें सायुज्य मिळाले की, शिवसायुज्य मिळाल्यासारखेच आहे. कारण तूंच शिवस्वरूप आहेस. पहा. तूं प्रथम शंकरांच्या देहाचा वामभाग हरण केलास. तेवढ्याने मन संतुष्ट झालें नाहीं म्हणून अतृप्त मनानें शंकरांच्या शरीराच्या दुसऱ्याही भागाचे हरण केलें आहेस असा मी तर्क करतो. कारण तुझें अरुणवर्ण असलेलें हें जें सगळे रूप आहे तें शंकरांच्या रूपासारखेच दिसत आहे. स्वभावतः अरुणवर्ण आणि स्तनभारानें किंचित् नम्र असलेली तूं शंकरांप्रमाणे "त्रिनयन" दिसत आहेस. त्रिलोचना, त्रिनयना, त्र्यंबका ही तुझीं नावे प्रसिद्धच आहेत. सूर्य, चंद्र आणि अग्नि हेच तुझे तीन नेत्र आहेत. आई ! तुझें हें त्रिनेत्रत्व शिवसायुज्याचेच द्योतक आहे. त्याचप्रमाणे हा अरुणवर्णही शिवसायुज्याचाच द्योतक आहे. भगवाच शंकर हे अरुणवर्ण आहेत. "असौ यस्ताम्रो अरुण उत बभ्रूः" असें वेदांत शंकरांचे वर्णन केले आहे. हा अरुणवर्ण शंकरांनी तुझ्याकडून घेतला का तूं शंकरांकडून घेतला ? माहीत नाहीं; पण तुम्ही दोघेही अरुणवर्णानें एकरूप आहां हें निश्चित. तसेंच तुझें रूप "कुटिलशशिचूडालमकुटं" म्हणजे चंद्राची किंचित वाकडी कोर तुऱ्याप्रमाणें जेथें मुकुटावर शोभत आहे असें आहे. म्हणजे भगवान् शंकर चंद्रचूड आहेत तर तूंही पण चंद्रचूड आहेस ! तुझ्या मस्तकावरील चंद्र हा अष्टमीच्या चंद्रासारखा शोभत आहे, "अष्टमीचन्द्रविभ्राजदलिकस्थलशोभिता" असें तुझें वर्णन प्रसिद्धच आहे. अशा रीतीनें हे आई ! तूं शिवसायुज्य प्राप्त करून घेतलेलेच आहेस. अथवा शिवाने तुझें सायुज्य प्राप्त करून घेतलेले आहे असें म्हटलें तरी हरकत नाहीं. दोहोंचाही अर्थ एकच आहे. तूं आणि शिव परस्पर सायुज्यभावाला प्राप्त झालेले असल्यामुळें तुम्ही दोघेही एकरूपच आहांत. "न शिवेन विना शक्तिः न शक्तिरहितः शिवः ।" तात्पर्य, तुझ्या सायुज्याने शिवसायुज्याचा व शिवसायुज्यानें तुझ्या सायुज्याचा लाभ हा सहजच होतो. आई ! सर्व कांहीं तूंच आहेस म्हणूनच मी तुझी प्रार्थना करीत आहे. तूं करुणादृष्टीनें माझ्याकडे पहा.

वरील पुढील यंत्र सोन्याच्या पत्र्यावर काढावे. चौरंगावर ठेवून त्याची रोज विधिपूर्वक पूजा करावी. तीस दिवस या लोकाचा रोज तीन हजार जप करावा. दूध अथवा पायसाचा नैवेद्य दाखवावा. याप्रमाणे हें यंत्र सिद्ध करून धारण करावें अथवा घरांत ठेवावे. यानें ऋण फिटेल. त्याचप्रमाणे भूतप्रेत, पिशाचबाधाही टळेल.

23 April, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक २२ वा

भवानि त्वं दासे मयि वितर दृष्टिं सकरुणा-
मिति स्तोतुं वाञ्छन् कथयति भवानि त्वमिति यः ।
तदैव त्वं तस्मै दिशसि निजसायुज्य-पदवीं
मुकुन्द-ब्रह्मेन्द्र-स्फुट-मकुटनी-राजित-पदाम् ॥ २२॥


आई त्रिपुरसुंदरी ! भवानी हें त्रिपुरसुंदरीचेंच नांव आहे. "भवानी भावनागम्या भवारण्यकुठारिका ।" असें सहस्रनामांत तिचे वर्णन केले आहे. खरोखरच तूं अत्यंत उदार आहेस. तुझ्या ध्यानाने त्रिविध पुरुषार्थाचा लाभ होईल यांत नवल काय आहे ? तुझी केवळ करुणा भाकण्याला आरंभ केला तरी देखील तूं त्याला परम पुरुषार्थाचा लाभ करून देतेस ! धन्य आहेस तूं. अशा अभिप्रायानें आचार्य स्तुति करीत आहेत. "हे भवानि त्वं दासे मयि सकरुणां दृष्टिं वितर" आईभवानी ! मी तुझा दास आहें. तूं माझ्यावर आपली करुणायुक्त दृष्टि टाक. तूं माझ्याकडे कृपापूर्ण दृष्टीने पहा. याप्रमाणे तुझी स्तुति करण्याची मनांत इच्छा ठेवून वाक्य उच्चारावयास जो कोणी आरंभ करतो, तो "भवानि त्वं" एवढी अक्षरे उच्चारतांक्षणींच "त्वं तस्मै निजसायुज्य-पदवीं दिशसि " तूं त्याला आपलें सायुज्यपदही देतेस ! ! कशी आहे तुझी सायुज्यपदवी ? असें कोणी विचारील तर सांगतो. "मुकुन्दब्रह्मेन्द्र-स्फुट-मकुट-नीराजित पदं" मुकुंद म्हणजे विष्णु, तसेंच ब्रह्मदेव आणि इंद्र इत्यादि देवही रत्नजडित मुकुट घालून तुझ्या चरणी नम्र होत असतांना जणुं कांहीं ते आपल्या मुकुटांनी स्पष्टपणे तुझ्या चरणकमलांना नीरांजनांनीं ओवाळींत आहेत असें वाटतें. तात्पर्य, ब्रह्मा, विष्णु, महेश, इंद्र, वरुण, कुबेर इत्यादि बडेबडे देवही तुझ्या चरणारविंदीं नम्र होऊन प्रणाम करीत आहेत. यावरून तुझ्या सायुज्यपदाचा महिमा लक्षांत घ्यावा.

या श्लोकांतील गूढ अभिप्राय असा आहे कीं, भवानि त्वं इत्यादि अन्वय वाक्यांतील भवानि हे पद संबोधन आहे. "हे आई भवानी ! तूं" अशा अभिप्रायानें स्तुतिवाक्याला आरंभ करीत असतांनाच "त्वं भवानि" आई तूंच मी व्हावें. भू-धातूचें आज्ञार्थी प्रथम पुरुषाचे एकवचन. अशा अभिप्रायाने जणुं कांहीं तो स्तुति करण्यास प्रवृत्त झालेला, तुझी अहंग्रहोपासनाच करीत आहे, असें समजून तूं त्याला सत्वर उत्तम फल देतेस. जप, होम इत्यादि साधनांपेक्षां अहंग्रहोपासनेनें फलप्राप्ति सत्त्वर होते. "अहं ब्रह्मास्मि" "अयमात्मा ब्रह्म" या महावाक्याप्रमाणेंच तो "तूं मी व्हावें" मी त्वत्स्वरूप व्हावें अशा तादात्म्य चिंतनाचेंही फल अनपेक्षित रीतीनें तुझ्याकडून त्याला प्राप्त होतें ! आई ! असा हा तुझा नाममहिमा आहे. कोणत्याही मिषाने का होईना तें मुखी आलें तरी कृतार्थता प्राप्त होते. "विक्रुश्य पुत्रमघवान् यदजामिलोऽपि नारायणेति स्त्रियमाण इयाय मुक्तिम्" (भागवत). पापी अजामिल मुलाला हाक मारण्याच्या मिषाने नारायण नारायण म्हणतांच कृतार्थ झाला. याच न्यायाने तुझ्या नाम संकीर्तनानेंही सायुज्यमुक्तीचा लाभ होतो मग इतर फलांची कथा काय ? सायुज्य म्हणजे तादात्म्य. जेथे सायुज्यमुक्तीचा लाभ झाला तेथें सालोक्य सारूप्य आणि सामीप्य प्राप्त होईल हें काय सांगावयास पाहिजे ? तें तर कैमुतिकन्यायानेंच सिद्ध होत आहे ! मागील सात श्लोकांनी ध्यानाचा महिमा सांगितला, तर या श्वोकाने नामाचाही महिमा वर्णिला आहे हें लक्षांत घ्यावे.

सायुज्यपदवी म्हणजे मोक्षाचा मार्ग अथवा मोक्षाची अवस्था. पदवी शब्दाचा अर्थ पद किंवा स्थान असाही आहे. सायुज्य पदवी म्हणजे मोक्षपद, परमात्मपद अथवा ब्रह्मपद. यालाच मुक्ति असें म्हणतात. ही मुक्ति चार प्रकारची मानलेली आहे. सालोक्य, सामीप्य, सारूप्य आणि सायुज्य अशी त्यांची नावे आहेत. उपासनेनें इष्टदैवतेच्या लोकाचा लाभ होणें याला सालोक्य म्हणतात. वैकुंठ लोक, कैलास लोक, गोलोक इत्यादि विविध लोक प्रसिद्ध आहेत. आनंद हें मोक्षाचे स्वरूप आहे. इष्टदेवतेचा लोक प्राप्त झाल्यानंतर साधकाच्या चित्ताला एक प्रकारचा अनिर्वचनीय आनंद होत असतो. म्हणून या अवस्थेला सालोक्यमुक्ति असें म्हणतात. इष्टदेवतेचा लोक प्राप्त झाल्यानंतर आपल्याला इष्टदेवतेचें सान्निध्य लाभते. इष्टदेवतेच्या सान्निध्याने साधकाचा आनंद पूर्वीपेक्षा अधिकच वाढतो. या अवस्थेला सामीप्यमुक्ति असे म्हणतात.

इष्टदेवतेच्या सान्निध्याचा लाभ झाल्यानंतर साधकाला इष्टदेवतेचें रूप प्राप्त होत असतें. असिस्टंट कलेक्टर किंवा पर्सनल सेस्टेरी झाला म्हणजे आपण मोठ्या पदाला चढल्याचे समाधान वाटत असतें. इष्टदेवतेचें रूप प्राप्त झाल्यानंतर असाच एकप्रकारचा अनिर्वचनीय आनंद वाढलेला असतो. या अवस्थेला सारूप्यमुक्ति असें म्हणतात. सारूप्यामुळें इष्टदेवता आणि त्या देवतेचा उपासक यांच्यांत भेद असतोच. भेद आहे तोंपर्यंत अपूर्णतेची जाणीव होतच असते. अपूर्णतेच्या जाणिवेने सुखांत न्यूनता येते. ती न्यूनता साधक हा आपल्या इष्टदेवतेशीं जेव्हां तादात्म्य पावतो तेव्हांच नाहीशी होत असते. इष्टदेवता ही तत्त्वतः सत्, चित् आणि आनंदस्वरूप असल्यामुळें इष्टदेवतेशीं तादात्म्य पावलेला साधकही सत् चित् आनंदस्वरूप होत असतो. याच अवस्थेला सायुज्यपदवी असें म्हणतात. ही पदवी ब्रह्मस्वरूपच असल्यामुळें हिला ब्रह्मपद असेही म्हणतात. मोक्षाचेही हेंच स्वरूप असल्यामुळें याला मोक्षपद असेही म्हणतात.

मोक्षाच्या स्वरूपाविषयी तत्त्ववेत्त्यांत अनेक मतभेद आहेत. मरण म्हणजेच मोक्ष असें चार्वाक म्हणतो. त्याची धाव याच्या पलीकडे गेलीच नाहीं.

नित्य ऊर्ध्वगमन म्हणते महाकाशांत वरवर जाणे हेंच मोक्षाचे स्वरूप होय असें जैन म्हणतात. निर्विषय, शुद्ध, क्षणिक, विज्ञानपरंपरेचा सतत अनुभव येत रहाणे म्हणजेच मोक्ष असें बौद्धांचे मत आहे. कायमचा दुःखांचा नाश होणें यालाच मोक्ष म्हणतात असें तार्किकांचे म्हणणें आहे. आदि विद्वान् सिद्धपुरुष असा जो ईश्वर त्याच्या नित्ययोग-शक्तीचा साक्षात्कार होऊन अनिर्वचनीय व नित्य आनंदाचा लाभ होणें म्हणजेच मोक्ष असें योगतत्त्ववेत्त्यांचें मत आहे. तर त्रिगुणात्मक मुलप्रकृति आणि चेतनपुरुष यांच्या पार्थक्याचा वास्तव भूमिकेवरून साक्षात्कार होणे म्हणजे मोक्ष होय, असें सांख्य तत्त्ववेत्त्यांचे म्हणणें आहे. नित्य आणि निरतिशय सुखाची अभिव्यक्ति होणें म्हणजेच मोक्ष असें मीमांसक म्हणतात, तर अविद्येची - अज्ञानाची निवृत्ति होणें म्हणजेच मोक्ष होय, असेही कांहीं वेदांती म्हणतात. "कर्मणामात्मलाभान्न परं विद्यते" सर्व कर्मांचे अंतिम फल म्हणजे आत्मलाभ. त्यालाच मोक्ष असें म्हणतात, असें आपस्तंबांचें म्हणणें आहे. सच्चिदानंदस्वरूप असलेल्या आपल्या उपास्यदेवतेशीं पूर्ण तादात्म्य प्राप्त होणे म्हणजेच मोक्ष होय, असा उपासनाशास्त्राचा सिद्धान्त आहे. प्रकृतस्थलीं परस्पर अभिन्न, एकरूप असलेल्या शिव-शक्तिस्वरूप इष्टदेवतेशीं पूर्ण तादात्म्य प्राप्त होणें हेंच मोक्षाचे स्वरूप असून यालाच प्रकृतस्थलीं सायुज्यपदवी असें म्हटलेले आहे. आई ! अनन्यचित्तानें तुझें नांव घेताक्षणीच तूं आपल्या भक्ताला सायुज्यमुक्तीचा लाभ करून देतेस ! धन्य आहे तुझें औदार्य.

वरील यंत्र हे श्रीयंत्र. सोन्याच्या पत्र्यावर काढून त्याची एखाद्या तीर्थक्षेत्रांत अथवा देवीच्या मंदिरांत रोज पंचेचाळीस दिवस विधिवत् पूजा करावी. गुळ, नारळ, केळे, दही, दूध, मध आणि खिचडीचा नैवेद्य दाखवावा. रोज एक हजार वेळां या श्लोकाचा जप करावा. याने ऐहिक सर्व कामना पूर्ण होतील. ऐश्वर्यप्राप्ति व साम्राज्यलाभही होईल.

22 April, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक २१ वा

तटिल्लेखा-तन्वीं तपन-शशि-वैश्वानर-मयीं
निषण्णां षण्णामप्युपरि कमलानां तव कलाम् ।
महापद्माटव्यां मृदित-मल-मायेन मनसा
महान्तः पश्यन्तो दधति परमाह्लाद-लहरीम् ॥ २१॥

या शरीरांत सहा चक्रे आहेत. त्यांना मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर इत्यादि नावे आहेत. या चक्रांना कमल अशी संज्ञा आहे. कारण कमलाप्रमाणे त्या चक्रांना दले असतात. उदाहरणार्थ, मुलाधारचक्राला चतुर्दलकमल असें म्हणतात, तर स्वाधिष्ठनाचक्राला षड्दलकमल असें म्हणतात. मणिपूरचक्राला दशदलकमल असें म्हणतात, तर अनाहतचक्राला द्वादशदलकमल असें म्हणतात, तर आज्ञाचक्राला द्विदलकमल असें म्हणतात. क्वचित् कमल या शब्दाच्या ऐवजी पद्य असाही शब्द वापरतात. दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. आचार्य म्हणतात, आई ! या साही कमळांच्या वर तुझी कला म्हणजे मूर्ति अथवा स्वरूप विराजमान झालेलें आहे. अथवा कला शब्दाचा सकलतत्त्वातीत, सर्वाधारभूत, शुद्धसच्चिदानंदरूप आदिशक्ति असाही अर्थ करतात. ही कला तंत्रशास्त्रांत सांगितलेल्या पंचवीस, छत्तीस अथवा एक्कावन तत्त्वांच्याही पलीकडची आहे. तिला शास्त्रांत "सादकला" असें म्हटलेलें आहे. ती सर्वांपेक्षा श्रेष्ट असल्यामुळें तिला परा, परात्परा अथवा परमेश्वरी असें म्हटलेलें आहे. आई जगज्जननी ! तूंच या शरीरांतील सर्व कमलांच्या वर विराजमान झालेली आहेस.

कांहीं लोक कला शब्दाचा अर्थ प्रकृतस्थलीं कुंडलिनीशक्ति असा करतात. कुंडलिनी ही श्रीत्रिपुरसुंदरीचेंच रूप आहे हें आपण नवव्या व दहाव्या लोकांत पाहिलेंच आहे. तीही पण शरीरातील साही चक्रांचा भेद करून अर्थात् साही कमळांचा भेद करून सर्वांच्या वर सहस्रदलकमलांतील चंद्रमंडलामध्यें विराजमान होत असते. कांही लोक कला शब्दाने कामकलाच येथें विवक्षित आहे असें म्हणतात. कामकला म्हणजे ईं हें बीजाक्षर. ईं हा बीजमंत्र महात्रिपुरसुंदरीस्वरूपच आहे. श्रीचक्रामध्ये ईं हा बीजमंत्र सर्व आवरणांच्या वर असलेल्या बैन्दवस्थानांत विराजमान झालेला आहे. आपल्या शरीरातही हे बैन्दवस्थान सर्व चक्रांवर असलेल्या ब्रह्मरंध्रांतील सहस्रदलकमलांत असलेलें चंद्रमंडलच मानलेले आहे. हाच अभिप्राय लक्षांत घेऊन आचार्यांनी साही कमलांच्या वर "निषण्या" म्हणजे विराजमान असलेली तुझी कला असें वर्णन केलें आहे.

आई ! कशी आहे तुझी कला असें कोणी विचारील तर सांगतो. " तटिल्लेखातन्वी तपन-शशि-वैश्वानरमयीं" तटिल्लेखा म्हणजे विद्युल्लता. ती जशी दीर्घ सूक्ष्म कुटिलाकार, प्रकाशमय आणि क्षणभर प्रतीतीला येणारी असते त्याचप्रमाणे तुझ्या उपासकाला आज्ञाचक्रामध्यें प्रतीति येत असते. त्याचप्रमाणें तपन म्हणजे सूर्य, शशी म्हणजे चंद्र आणि वैश्वानर म्हणजे अग्नि हेंच तुझें रूप आहे. तूं श्रीचक्रस्वरूप आहेस. श्रीचक्र हें त्रिखंड आहे. सोम, सूर्य आणि अग्नि हेच ते श्रीचक्रांतील तीनखंड होत. "त्रिखण्डं मातृकाचक्रं सोमसूर्यानलात्मकम्" असें श्रीचक्राचे वर्णन केले आहे. तेंच श्रीमहात्रिपुरसुंदरीचे रूप होय. श्रीचक्रांतील नऊ आवरणे म्हणजे अवांतर चक्रे यांचें पूर्वी वर्णन केलेलेंच आहे. त्यांतील बिंदुत्रिकोण आणि वसुकोण हा एक खंड समजला जातो. दहा-दहा त्रिकोण असलेलीं दोन चक्रें आणि चौदा त्रिकोणांचें एक चक्र यांना दुसरा खंड म्हणतात. तर अष्टदलचक्र, षोडशदलचक्र आणि भूपूरचक्र यांना तिसरा खंड म्हणतात. हे तीन खंड सोम, सूर्य आणि अग्निस्वरूप आहेत. या त्रिखंडालाच जागृति, स्वप्न आणि सुषुप्ति; स्थूल, सूक्ष्म आणि कारण, प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय; विश्व तैजस आणि प्राज्ञ, सृष्टि, स्थिति आणि प्रलय; ज्ञान, इच्छा आणि क्रिया इत्यादि त्रिपुटीसूचक नांवे दिली जातात. आपली आराध्यदेवता ही या त्रिपुटीची अधिष्ठात्री असल्यामुळेंच तिला त्रिपुरा अथवा त्रिपुरसुंदरी हें नांव पडलें. हे त्रिखंडात्मक श्रीचक्र हेंच त्रिपुरसुंदरीचे स्वरूप असल्यामुळें आणि तें सोम, सूर्य आणि अग्निस्वरूप असल्यामुळें आचार्यांनी त्रिपुरसुंदरीच्या कलेला "तपनशशिवैश्वानरमयी" असें विशेषण दिले आहे.

शरीरांतील षट्चक्रांच्या दृष्टीने विचार केला असतां मूलाधार आणि स्वाधिष्ठान या दोन चक्रांचें एक खंड मानतात. मणिपूर आणि अनाहत या दोन चक्रांचे दुसरें खंड मानतात तर विशुद्धिचक्र आणि आज्ञाचक्र या दोन चक्राचे तिसरें खंड मानतात. ही तिन्ही खंडें देखील सोम, सूर्य आणि अग्रिस्वरूपच आहेत. या तिन्ही खंडांच्या वर "महापद्माटवी" म्हणजे सहस्रदलकमलरूपी अरण्य आहे. मूर्धस्थानी असलेल्या सहस्रदलकमलाला हजार पाकळ्या असल्यामुळें महापद्म असें म्हटलें आहे. शरीरांतील सर्व कमलांत तें मोठे आहे. त्या कमलाचीं दले हीं अरण्यासारखीं दाट आणि जटिल आहेत, म्हणून त्या कमलाला "महापद्माटवी" असें म्हटलेलें आहे. अटवी म्हणजे अरण्य. आई त्रिपुरसुंदरी ! या अरण्यांत तुझा संचार असतो. तेथें तूं "निषण्णा" म्हणजे बसलेली आहेस. त्या सहस्रदलकमलांतील पूर्ण चंद्रांत तूं विराजमान झालेली आहेस. "महान्तः" म्हणजे मोठेमोठे तुझे अनन्यभक्त असलेले योगीश्वर हेच तुझ्या स्वरूपाला पहात असतात. कारण त्यांनीं आपल्या मनाला निर्मल केलेलें असतें. कामक्रोधादि विकार हेंच मनांतले मल होत. माया म्हणजे अविद्या, अहंकार, अभिनिवेश इत्यादि हें सर्व त्यांनीं जिंकलेले असतात. त्यांचा त्यांनी निरास करून आपल्या मनाला निर्मल केलेलें असतें. त्या निर्मल मनानेंच ते तुझ्या स्वरूपाचा साक्षात्कार करून घेतात. सकल तत्त्वातीत असलेल्या तुझ्या स्वरूपालाच "सादकला" असें म्हटलेलें आहे. साद म्हणजे चरम गति किंवा परम अधिष्ठान असा साद शब्दाचा अर्थ आहे. त्रिपुरसुंदरीच्या सादकलेचा साक्षात्कार झाल्यानंतर ते नित्य आणि निरतिशय आनंदाच्या लहरींत निमग्न होतात. "परमानन्दलहरीं दधति" आनंदाला सतत भरतें येत असल्याचा ते अनुभव घेत असतात. त्यांचा तो आनंद कधींही क्षीण होत नाहीं. अतृप्तीचा लेशही त्यांच्या चित्ताला स्पर्श करीत नाहीं. गीतेच्या शब्दांत सांगावयाचें झाल्यास "यलब्ध्वा चापरं लाभ मन्यते नाधिकं ततः" अशा अवस्थेला ते पोहोचतात. आई ! मलाही या आनंदाचा लाभ होईल. असा माझ्यावर तूं अनुग्रह कर हीच माझी प्रार्थना आहे.

सोन्याच्या, चांदीच्या अथवा तांब्याच्या पत्र्यावर हें यंत्र लिहून पंचेचाळीस दिवस पूजा करावी. रोज एक हजार या श्लोकाचा जप करावा. नैवेद्य मध, गुळ आणि केळें. याचें फल सर्व जनविरोधाचा निरास होऊन लोक वश होतील.

21 April, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक २० वा

किरन्तीमङ्‌गेभ्यः किरण-निकुरुम्बामृतरसं
हृदित्वामाधत्ते हिमकर-शिलामूर्तिमिव यः ।
स सर्पाणां दर्पं शमयति शकुन्ताधिप इव
ज्वरप्लुष्टान् दृष्ट्या सुखयति सुधाधारसिरया ॥ २०॥


"हे जननि ! किरणनिकुरुम्बामृतरस किरन्तीं हिमकर-शिलामुर्तिं इव यः त्वां हृदि आधत्ते सः शकुन्ताधिपः इव सर्पाणां दर्पं शमयति, सुधाधारसिरया दृष्ट्या ज्वरप्लुष्टान् सुखयति च" हे आई जगज्जननी, तूं आपल्या देहांतून किरणांचा समुदाय हाच कोणी अमृतरस. या अमृतरसाला चोहींकडे शिंपडित आहेस. चन्द्रकांतरत्नाप्रमाणे तुझी मूर्ति अत्यंत स्वच्छ आहे. जणुं कांहीं चंद्रकांतरत्नाचीच ती घडविलेली आहे ! आई ! तुझ्या या स्वरूपाला "अमृतेश्वरी" असें नांव आहे. तुझ्या या अमृतेश्वरीरूपाचें जो कोणी भक्त आपल्या हृदयामध्ये चिंतन करतो, त्याची उपासना करतो, तो सर्व पक्ष्यांचा राजा असलेल्या गरुडाप्रमाणें सर्पांचा दर्प शमवितो. त्याला पाहून सर्प घाबरतात व दाही दिशांना पळून जातात. त्याच्या दृष्टीनें सर्पविषाची बाधा नाहीशी होते. एक दिवसाआड, दोन दिवसांआड येणाऱ्या थंडी-तापांना व इतरही ज्वरबाधांना त्याची दृष्टि जणुं कांहीं अमृताच्या धारेला स्रवणारी "सिरा" म्हणजे प्रणालीच बनते. अमृताचा ती पाटच बनते. आई ! अमृतेश्वरीरूपानें केल्या जाणाऱ्या तुझ्या उपासनेचा हा केवढा प्रभाव आहे ! या उपासनेनें साधक हा गरुडासारखा प्रभावी होत असल्यामुळें या साधनाला "गरुडध्यानयोग" असे तंत्रशास्त्रांत नांव दिलेले आहे.

"षण्मासध्यानयोगेन जायते गरुडोपमः ।
दृष्ट्या कर्षयते लोकं दृष्ट्‍वैव हरते विषम् ॥
दृष्ट्या चातुर्थिकादींश्च ज्वरान्नाशयते क्षणात् ॥ "

याप्रमाणें चतुःशतीमध्यें या ध्यानाची फलश्रुति सांगितलेली आहे. 


हें यंत्र भस्मावर लिहावे. विधिपूर्वक देवतेची पूजा करून एक हजार वेळां या श्लोकाचा जप करावा. या भस्माने सर्पविष उतरेल. हे भस्म सर्पावर टाकल्यास सर्पाला मुर्च्छा येते. साधकाने हा मंत्र म्हणतच भस्माचा प्रयोग करावा.

अमृतेश्वरीरूपानें श्रीत्रिपुरेश्वरीची पूजा करून या श्लोकाचा रोज हजार वेळां जप करावा. पंचेचाळीस दिवस अनुष्ठान करावे. हा मंत्र सिद्ध होतो व साधकाला कधींही विषबाधा होत नाहीं.

मयुरताम्र आणि पुन्नागताम्रमिश्रित केलेल्या सोन्याच्या पत्र्यावर हें यंत्र लिहून वर सांगितल्याप्रमाणे अनुष्ठान करून यंत्र सिद्ध करावे. तें यंत्र आंगठीत बसवून धारण करावे. साधकानें वरचा श्लोक म्हणत त्या हाताने सर्पदंश झालेल्या मनुष्यावर - गाय, म्हैस, घोडा इत्यादि प्राण्यांवरही जल शिंपडावे. विषबाधा निवृत्त होईल.

20 April, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक १९ वा

मुखं बिन्दुं कृत्वा कुचयुगमधस्तस्य तदधो
हरार्धं ध्यायेद्यो हरमहिषि ते मन्मथकलाम् ।
स सद्यः संक्षोभं नयति वनिता इत्यतिलघु
त्रिलोकीमप्याशु भ्रमयति रवीन्दु-स्तन-युगाम् ॥ १९॥


"हे हरमहिषि ! मुखं बिन्दुं कृत्वा, तस्य अधः कुचयुगं कृत्वा, तदध हरार्धं कृत्वा, यः ते मन्मथकलां ध्यायेत् सः वनिताः सद्यः संक्षोभं नयति इति अतिलघु सः रवीन्दुस्तयुगां त्रिलोकीं अपि आशु भ्रमयति " असा या श्लोकाचा अन्वय आहे. या श्लोकाचा अर्थ वाचण्यापूर्वी वाचकांनी देवीभुजंगमस्तोत्रांतील सोळाव्या आणि सतराव्या श्लोकाचें विवेचन अवश्य वाचावे.

हर म्हणजे कामेश्वर भगवाच श्रीशंकर. त्यांची महिषी म्हणजे पट्टराणी कामेश्वरी श्रीललितामहात्रिपुरसुंदरी देवी. हे माते, त्रिपुरसुंदरी ! तुझी मन्मथकला म्हणजे कामकला अर्थात क्लीं हें बीजाक्षर अथवा ह्रीं या बीजांतील केवल ईं इत्याकारक बीजाक्षर. हें बीजाक्षर मंत्ररूपानें तर तुझें स्वरूप आहेच, पण आकृतीनेही तें तुझें मूर्तस्वरूप आहे. जो कोणी तुझ्या या मूर्तस्वरूपाचे ध्यान करील - उपासना करील, तो आपल्या अद्वितीय प्रभावाने त्रैलोक्यालाही मोहित करील. अशा अभिप्रायाने आचार्य या श्लोकानें महात्रिपुरसुंदरीचे वर्णन करीत आहेत.

ईं या बीजांत सर्वात वर एक बिंदु आहे. त्याच्या खाली दोन बिंदु असून त्यांच्याही खालीं ह या अक्षराचा अर्धा भाग आहे, ज्याला हार्दकला, योनि अथवा त्रिकोण असें म्हणतात. हार्दकला या शब्दाचाही अर्थ मन्मथकला किंवा कामकला असाच आहे. काम शब्दाचा अर्थ या ठिकाणी परमेश्वर भगवान सदाशिव असा आहे. "काम्यते सर्वैः इति कामः" आपल्या अभ्युदयासाठी सर्वांकडून ज्याची अपेक्षा केली जाते तो काम म्हणजे परमात्मा. त्याचें वास्तव्यस्थान हृदयच आहे. "ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति" हें गीतावचन प्रसिद्धच आहे. या अभिप्रायानें ईश्वराला 'हार्द' असे म्हणतात. त्याची जी कला म्हणजे शक्ति ती कामकला. अर्थात् श्रीललितामहात्रिपुरसुंदरी असा कामकला या शब्दाचा अर्थ होतो. त्रिपुरसुंदरीचा जो बीजमंत्र ईं इत्याकारक अक्षर, त्यालाही पण कामकला असेंच म्हणतात. कारण मंत्र आणि देवता दोन्ही एकरूपच असतात.

ईं या बीजांतील वरचा बिंदु हा शुद्ध रविस्वरूप आहे. "रूयते स्तूयते इति रविः" या व्युत्पत्तीप्रमाणे रवि शब्दाचा अर्थ सर्वांकडून स्तविला जाणारा परमात्मा असा होतो. तोच शक्तिसहकृत परमात्मा मुख्य बिंदूच्या रूपानें सर्वांत वर आहे. त्याच्या खालीं असलेले दोन बिंदु हे अग्नितत्त्व आणि सोमतत्त्व या स्वरूपाचे आहेत. अग्नि आणि सोम या दोन तत्त्वांनींच सर्व जगाचें पोषण होत असतें. याच अभिप्रायाने सर्व जगच "अग्नीषोमात्मक" मानले जातें. त्याच्याही खालीं असलेलें तत्त्व ज्याला योनि अथवा प्रकृति म्हणतात तें तर या जगाचे मूळकारणच आहे. याप्रमाणे परमात्मा, अग्नि, सोम आणि मूलप्रकृति हेंच आपल्या त्रिपुरसुंदरीचे रूप होय.

"नभो महाबिन्दुमुखी चन्द्रसूर्यस्तनद्वया ।
सुमेरु-हार-वलया शोभमाना महीपदा ॥
पाताल-तलविन्यासा त्रिलोकीयं तवाम्बिके ।
कामराज-कला-रूपा जागर्ति सचराचरा ॥ "

असें हें कामकलारूप श्रीत्रिपुरसुंदरीचे चित्र रुद्रयामलामध्ये वर्णिले आहे. या स्वरूपाच्या उपासनेला तंत्रशास्त्रांत मादनप्रयोग असेंही म्हटले आहे. निष्कामरूपानें केली जाणारी ही उपासना साधकाचे जीवन धन्य करते.

ईं बीजामध्ये तो जो रविरूप सर्वांत वर असलेला बिंदु तेंच श्रीमहात्रिपुरसुंदरीचे मुख आहे अशी भावना करावी. असा हा मुखं बिन्दुं कृत्वा याचा अर्थ झाला. त्यानंतर त्याच्या खालीं दोन बिंदूंच्या रूपाने अग्नि आणि सोम ही जी दोन तत्त्वे आहेत ते महात्रिपुरसुंदरीचें स्तन समजावेत. या ठिकाणीं स्तन या शब्दाने कंठापासून नाभिस्थानापर्यंतचा भाग समजावा. त्याचप्रमाणें त्या दोन बिंदूंच्या खालीं असलेला, ह या अक्षराच्या अर्धा भागाप्रमाणे दिसणारा भाग किंवा त्रिकोणामध्ये दिसणारा हा भाग आपल्या श्रीत्रिपुरसुंदरीच्या नाभिस्थानापासून चरणकमलापर्यंतचा भाग आहे अशी भावना करावी. याप्रमाणे माते ! जो तुझ्या मन्मथकलेचें अर्थात् ईं या बीजमंत्राच्या रूपाने नटलेल्या तुझें "यो ध्यायेत्" म्हणजे जो ध्यान करील, 'सः' तो भक्त त्या उपासनेच्या बलाने इतका प्रभावी होईल कीं, तो आपल्याकडे सर्व जगांतील स्त्रियांना आकृष्ट करून घेईल हें अगदीं सामान्य आहे. तो सूर्यमंडल आणि चंद्रमंडल हे दोन जिचे स्तन आहेत अर्थात विश्वाच्या पोषणाची साधने आहेत, त्या त्रिलोकरूपी कामिनीलाही आपल्याकडे सत्त्वर आकृष्ट करून घेईल. सारें त्रैलोक्य त्याच्यावर मुग्ध होईल असा याचा अर्थ आहे. आचार्य म्हणतात, आई, ईं या बीजाक्षराच्या रूपाने नटलेल्या तुझ्या स्वरूपाच्या ध्यानाचा हा केवढा महिमा आहे  ! तंत्रशास्त्रांतील निरनिराळ्या ग्रंथांत ठिकठिकाणी याप्रमाणें श्रीमहात्रिपुरसुंदरीचें ध्यान करण्याचें विधान केलेलें आहे. विस्तारभयास्तव त्यांचा येथें निर्देश करतां येत नाहीं. 


सोन्याच्या पत्र्यावर वर्तुलाकार यंत्र काढून त्यांत एकापुढे एक व एकाखालीं एक अशी चार "ह्रीं" ही बीजे लिहावींत. रोज विधिपूर्वक पूजा करून बाराशे वेळां या श्लोकाचा जप करावा. तें यंत्र धारण करावे अथवा चंदन, पुष्प, पंचवीस दिवस भस्म किंवा केशर अभिमंत्रून धारण करावे दूध, मध आणि केळे यांचा नैवेद्य दाखवावा. राजे-महाराजे, राक्षस, पशु, स्त्री, पुरुष सर्व वश होतील.

19 April, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक १८ वा

तनुच्छायाभिस्ते तरुण-तरणि-श्रीसरणिभि-
र्दिवं सर्वामुर्वीमरुणिमनि मग्नां स्मरति यः ।
भवन्त्यस्य त्रस्यद्वन-हरिण-शालीन-नयनाः
सहोर्वश्या वश्याः कति कति न गीर्वाणगणिकाः ॥ १८॥


हे आई जगज्जननी ! नुकतेच उदयाला येत असलेलें सूर्यांचे बिंब जसें आरक्तवर्ण असावें त्याचप्रमाणे तुझ्या शरीराची कांति आरक्त आहे. तरुणतर म्हणजे अत्यंत बालस्वरूपांतला अर्थात् नुकताच उदयाला येणारा असा जो तरणि म्हणजे सूर्य अर्थात् बालरवि. त्याच्या कांतीप्रमाणे आहे श्रीसरणि म्हणजे शोभेचा प्रकार अथवा पद्धति ज्यांची अशा तुझ्या "तनुच्छाया" म्हणजे अंगकांतींनीं अंतरिक्षलोक आणि संपूर्ण भूलोक जणुं कांहीं अरुणवर्णामध्यें निमग्न झाला आहे. तुझ्या अरुणवर्णामध्यें स्वर्गलोक आणि संपूर्ण भूलोक न्हाऊन निघाला आहे अशा स्वरूपानें जो कोणी तुझें चिंतन करील, स्वच्छंदपणे अरण्यामध्यें बागडत असतांना भ्यालेल्या - घाबरलेल्या हरिणीप्रमाणे ज्यांचे नेत्र शालीन म्हणजे सुंदर आणि चंचल आहेत अशा उर्वशीसह किती तरी देवांच्या गणिका म्हणजे अप्सरा त्याला कां वश होणार नाहींत ? सर्वच अप्सरा त्याला वश होतील. असा याचा अर्थ समजावा. तात्पर्य, तो तुझा भक्त अप्सरांच्याही चित्ताला मोह पडेल इतका सुंदर होतो. हा तुझ्या ध्यानाचा महिमा आहे. उर्वशी हें एका अप्सरेचे नांव आहे ती आपल्या रूपानें 'उरु' म्हणज श्रेष्ठ अशा ऋषिमुनि-देवांनाही 'वशयति' म्हणजे वश करते म्हणून तिला उर्वशी असें नाव पडले. 


हे यंत्र सोन्याच्या पत्र्यावर काढून पंचेचाळीस दिवस पूजा करावी. नैवेद्य दूध, पायस आणि तांबूल. या श्लोकाचा रोज एक हजार जप करावा. सिद्धयंत्र यंत्र धारण करावे. चंद्रन, केशर अथवा फूल अभिमंत्रून द्यावे. सकल प्राणी वश होतील.

18 April, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक १७ वा

सवित्रीभिर्वाचां शशि-मणि-शिला-भङ्‍गरुचिभि-
र्वशिन्याद्याभिस्त्वां सह जननि सञ्चिन्तयति यः ।
स कर्ता काव्यानां भवति महतां भङ्‌गिरुचिभि-
र्वचोभिर्वाग्देवी-वदन-कमलामोद-मधुरैः ॥ १७॥


"हे जननि ! वाचा सवित्रीभिः शशि-मणि-शिला-भङ्‌ग-रुचिभिः वशिन्याद्याभिः सह त्वां यः सश्चिन्तयति, सः महतां भङ्‌गिरुचिभिः वाग्देवी-कमला-गोदमधुरेः वचोभिः काव्यानां कर्ता भवति" असा या श्लोकाचा अन्वय आहे. हे आई जगज्जननी ! वाक्‌शक्तीला निर्माण करणाऱ्या आणि सर्व मुळाक्षरांच्या अधिष्ठात्री असलेल्या तसेंच चंद्रकांत रत्नाच्या तुकड्याप्रमाणे ज्यांची अंगकांति स्वच्छ व शुभ्र आहे अशा वशिनी, कामेश्वरी, मोदिनी इत्यादि ज्या आठ वाग्देवता आहेत त्यांच्यासह जो भक्त भक्तियुक्त अंतःकरणानें, तुझें चिंतन करील तो खरोखर मोठ्या मोठ्या विश्वमान्य असलेल्या सुप्रसिद्ध कवींच्या काव्यरचने प्रमाणे सुंदर असलेल्या आणि वाग्देवीच्या अर्थात् सरस्वतीच्या मुखकमलांतील आमोदाने मधुर असलेल्या अशा गोड गंभीर व मनोरंजक शब्दांनी उत्तम काव्य करणारा होईल. असें तुझ्या ध्यानाचे फल आहे. असा या श्लोकाचा अन्वयानुसारी अर्थ आहे.

यांतील अभिप्राय असा आहे कीं, श्रीललितात्रिपुरसुंदरी ही मातृकारूप आहे. मातृका शब्दाचा अर्थ वर्णसमुह असा आहे. अ- पासून क्ष-पर्यंत संपूर्ण वर्णसमूहाच्या अधिष्ठात्री देवतेला ही मातृका असेंच म्हणतात. या सर्व मातृकांचा समावेश श्रीचक्रांत झालेलाच आहे. श्रीचक्राची अधिष्ठात्री देवता आणि संपूर्ण मातृकांची अधिष्ठात्री देवता श्रीमहात्रिपुरसुंदरी ही एकच आहे. याच अभिप्रायाने तंत्र शास्त्रांत "मातृकां वशिनीयुक्तां योगिनीभिः समन्विताम् । गन्धाद्याकर्षिणीयुक्ता संस्मरेत्त्रिपुराम्बिकाम्" या श्लोकाने मातृका आणि त्रिपुराम्बिका या दोन्ही शब्दांनी एकाच देवतेचा निर्देश केलेला आहे. वेदांतही "गन्धद्वारां दुराधर्षां" या मंत्राने -याच मातृकारूप श्रीविद्यामहात्रिपुरसुंदरीचाच मंत्राच्या शेवटीं "श्रियम्" पदाने निर्देश केलेला आहे. श्रीचक्रामध्यें अधिष्ठित असलेल्या मातृकारूपी श्रीविद्या देवीच्या उपासनेनें उपासक कवि आणि विद्वान् होतो. अशी या उपासनेची फलश्रुति आहे.

वर निर्दिष्ट केलेल्या मातृका संख्येने पन्नास आहेत. या मातृकांचे आठ वर्ग कल्पिलेले आहेत. अवर्ग, कवर्ग, चवर्ग, टवर्ग तवर्ग, पवर्ग, यवर्ग आणि शवर्ग अशीं त्या वर्गांची नावें आहेत. अवर्गामध्यें सोळा स्वर येतात. कवर्गापासून पवर्गापर्यंत पंचवीस अक्षरे येतात. यांना व्याकरणांत स्पर्श अशी संज्ञा आहे य-वर्गामध्यें य, व, र, ल अशीं चार अक्षरे आहेत. त्यांना अंतस्थवर्ण असें म्हणतात. तसेंच शवर्गामध्यें श, ष, स, ह आणि क्ष अशीं पांच अक्षरे येतात एकूण या अक्षरांची संख्या पन्नास अक्षरे म्हणजे आपल्या श्रीललितामहात्रिपुरसुंदरीचेंच रूप होय.

वर सांगितलेल्या आठ वर्गांच्या ज्या आठ देवता आहेत त्यांना वाग्देवता असें म्हणतात. वशिनी, कामेश्वरी, मोदिनी, विमला इत्यादि त्यांचीं नावें आहेत. या वाग्देवतांबरोबरच विद्या, रेचिका, मोचिका इत्यादि बारा योगिनी आणि गंधाकर्षिणी, रूपाकर्षिणी इत्यादि चार शक्तिदेवता या सर्वांसह शास्त्रांत वर्णन केल्याप्रमाणें त्यांची नांवे, रूपे व ध्यानें लक्षांत घेऊन श्रीमहात्रिपुरसुंदरीचे चिंतन केलें असतां साधकाला विद्वत्त्व आणि कवित्व यांचा लाभ होतो. अशा अभिप्रायाने आचार्यांनी या सतराव्या श्लोकांत महात्रिपुरसुंदरीचें वर्णन केलेले आहे. 


हें यंत्र सोन्याच्या पत्र्यावर काढून एक्याण्णव दिवस त्याची विधिपूर्वक पूजा करावी. मध, केळे, दूध, साखर आणि खडीसाखर यांचें मिश्रण करून नैवेद्य दाखवावा. रोज एक हजार या श्लोकाचा जप करावा. सिद्ध यंत्र धारण करावें. याच्या योगें बुद्धि सर्व कलामध्यें निष्णात होईल.

17 April, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक १६ वा

कवीन्द्राणां चेतःकमलवन-बालातप-रुचिं
भजन्ते ये सन्तः कतिचिदरुणामेव भवतीम् ।
विरिञ्चि-प्रेयस्यास्तरुण-तर-शृङ्‌गार-लहरी-
गभीराभिर्वाग्भिर्विदधति सतां रञ्जनममी ॥ १६॥


"ये अरुणामेव भवतीं भजन्ते ते वाभिः सतां रञ्जनं विदधति" असा या लोकाचा मुख्य अन्वय आहे. हे आई त्रिपुरेश्वरी ! तुझा स्वाभाविक वर्ण अरुण आहे आणि तुझें नांवही पण अरुणाच आहे तेव्हां वर्णानें आणि नांवानेंही तूं अरुणा असल्याचें शास्त्रांत वर्णन केले आहे. तुझ्या या स्वरूपाचें जे कोणी सल्जन ध्यान करतात ते आपल्या अपूर्व वाग्विलासांनी सजनांची, मोठ्या मोठ्या विद्वानांची अथवा देवतांचीही मने रमविण्यास समर्थ होतात असा या अन्वयाचा अभिप्रेतार्थ आहे.

वामकेश्वर तंत्रामध्यें "अरुणाख्यां भगवतीमरुणाभां विचिन्तयेत्" असें सांगितले आहे. श्रीललितामहात्रिपुरसुंदरीचेंच हें एक रूप आहे या रूपांत अंगकांति अरुणवर्ण आहे. नांवही अरुणा असेंच आहे. सर्वैश्वर्यसंपन्न असलेल्या या अरुणादेवीला आठ हात असून पाश, अंकुश, धनुष्य, बाण, वरमुद्रा, अभयमुद्रा, पुस्तक आणि स्फटिकाच्या मण्यांची माळ तिने आपल्या हातांनीं धारण केलेली आहेत. तिला तीन नेत्र आहेत. ती अमृताच्या सागरामध्ये क्रीडा करीत आहे. याप्रमाणे जो साधक त्या मंगलमय देवीचे ध्यान करतो तो मोठा विद्वान् आणि कवि होतो. आपल्या अद्‌भुत आणि मधुर वाणीने तो विद्वानांचे व सज्जनांचे मनोरंजन करतो. या वर्णनाला अनुलक्षून आचार्य या श्लोकांत वर्णन करीत आहेत. हे आई, षड्गुणैश्वर्यसंपन्न माते ! ब्रह्मदेव, बृहस्पति इंद्र इत्यादि जे कवींद्र म्हणजे कवीश्वर अर्थात् ज्ञानी लोक, त्यांच्या अंतःकरणरूपी कमलांच्या वनाला प्रफुल्लित करणाऱ्या बालातपाप्रमाणें म्हणजे बालरवीच्या किरणांमाणे तुझी अंगकांति अरुणवर्ण आहे. बालरवि म्हणजे नुकताच उदयाला आलेला सूर्य. तो जसा अरुणवर्ण तशीच तुझी अंगकांति अरुणवर्ण आहे. तुझें नांवही पण अरुणा असेंच आहे. जे कांहीं सज्जन अशा तुझ्या रूपाचे ध्यान करतात, अशा रूपानें तुला भजतात ते देखील "विरिश्चिप्रेयसी" म्हणजे ब्रह्मदेवाची जी प्रिय पत्नी श्रीसरस्वतीदेवी तिच्या नव्या नव्या मधुरतम श्रृंगाररसाच्या तरंगानी युक्त अशा वाग्विलासांनीं सज्जनांच्या मनांचे रंजन करतात. तात्पर्य, "अमी" म्हणजे हे तुझी उपासना करणारे साधक तुझ्या उपासनेने प्राप्त झालेल्या अशा सर्वगुणसंपन्न वाग्वैमवाने सज्जनांची आणि मोठ्या मोठ्या विद्वज्जनांचींही मने रमवितात. आई, असा हा तुझा महिमा आहे. तो  "मूकं करोति वाचालम्" म्हणजे मुक्यालाही "वाचा" म्हणजे वाग्वैभवाने  "अलंकरोति" म्हणजे अलंकृत करतो, भूषवितो. आई ! माझा तुला नमस्कार असो. कांहीं लोक या श्लोकांत श्रीबालात्रिपुरसुंदरीचें ध्यान अभिप्रेत आहे असे मानतात. 



"अरुण-किरण-जालैरञ्जिता सावकाशा
विश्वत-जप-पटीका-पुस्तकाऽभीति-हस्ता ।
इतरकर-वराढ्या फुल्ल-कल्हार-माला
निवसतु हाई बाला नित्य-कल्याणशीला ॥ "

श्रीबालात्रिपुरसुंदरीच्या चिंतनानेंही साधकाचे ऐहिक व पारलौकिक जीवन धन्य होतें.

सोन्याच्या पत्र्यावर अधोमुख त्रिकोण काढावा. त्रिकोणाच्या तिन्ही कोंपर्‍यांत बाहेरच्या बाजूनने त्रिशूळाचा आकार काढावा. एकेचाळीस दिवस समाराधना करावी. मधाचा नैवेद्य दाखवावा. रोज या श्लोकाचा एक हजार जप करावा. सिद्ध यंत्र धारण करावे. वेदशाखादि विद्येमध्ये तो निष्णात होईल.

16 April, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक १५ वा

शरज्ज्योत्स्ना-शुद्धां शशि-युत-जटाजूट-मुकुटां
वर-त्रास-त्राण-स्फटिक-घटिका-पुस्तक-कराम् ।
सकृन्न त्वा नत्वा कथमिव सतां सन्न्निदधते
मधु-क्षीर-द्राक्षा-मधुरिम-धुरीणाः फणितयः ॥ १५॥ 


"हे मातः त्वा सकृन्नत्वा सतां मधु-क्षीर-द्राक्षा-मधुरिम-धुरीणाः फणितयः कथं इव न सन्निदधते ? अपि तु सन्निदधते एव" असा या श्लोकाचा मुख्य अन्वय आहे. आई त्रिपुरसुंदरी ! तुझ्या चरणी (भक्तिभावाने) एक वेळ जरी नमस्कार केला तरी देखील त्याला मोठ्या मोठ्या सज्जनांचे, कवीश्वरांचे गोड गोड शब्द - जे दूध, मध अथवा मनुका-द्राक्षें यांच्या माधुर्यालाही मागें सारतील ते कां बरें प्राप्त होणार नाहींत ? का बरें ते त्याच्या सान्निध्यांत येणार नाहींत ? अर्थात् अवश्य येतील. त्याच्या मुखांत उत्तम वाणी, उत्तम शब्द वास करतील. असा या मुख्य अन्वयाचा अर्थ आहे.

आई ! कशी आहेस तूं ! "शरज्ज्योत्स्नाशुद्धाम्" तुझें रूप, तुझी कांति ही शरदृतूंतील चंद्राच्या चांदण्याप्रमाणे अत्यंत शुद्ध म्हणजे स्वच्छ, शुभ्र, आहाददायक अशी आहे. त्याचप्रमाणे "शशियुत-जटा-जूट-मुकुटाम्" म्हणजे तुझ्या जटाजूटावर अर्थात् मस्तकावर शोभणाऱ्या मुकुटांत चंद्राची कोर झळकत आहे. चंद्राची कोर ही तुझें शिरोभूषण आहे. आई ! तुझ्या चार हातांपैकीं एका हातानें तूं "वर" म्हणजे वरसुद्धा धारण केलेली आहेस. दुसऱ्या हातानें "त्रासत्राण" म्हणजे भयापासून संरक्षण अर्थात् अभयमुदा धारण केलेली आहेस. एका हातांत स्फटिकाचा कलश धारण केलेला आहेस तर एका हातांत पुस्तकच धारण केले आहेस. स्फटिकघटिका या ठिकाणी कांहीं विद्वान "स्फटिकघुटिकां" असा पाठभेद स्वीकारतात आणि स्फटिक मण्यांची माळ असा त्याचा अर्थ करतात तोही योग्यच आहे. "स्फटिकगुलिका" असाही पाठ कांहीं ठिकाणी आढळतो. अर्थ एकच आहे. आई ! अशा या तुझ्या स्वरूपाचें ध्यान करून तुझ्या चरणी भक्तिभावाने एक वेळ जरी नमस्कार केला तरी त्याला दूध, मध आणि द्राक्षें यांच्या माधुर्यालाही जिंकून पुढें पाऊल टाकतील असे गोड शब्द, मनोहर शब्द आणि "सतां" म्हणजे बृहस्पतीसारख्या सज्जनांचे - कवीश्वरांचेही गुण त्याला प्राप्त होतात. आई ! तुझ्यासारखी सर्वसमर्थ कृपाळू प्रसन्न झाल्यानंतर काय बरें दुर्लभ आहे ?

हें श्रीत्रिपुरसुंदरीच्या वाग्वादिनी रूपाचें अथवा श्रीसरस्वतीरूपाचें ध्यान असल्यामुळें चौथ्या श्लोकाशी विरोध मानण्याचे कांहींच कारण नाहीं. श्रीबालात्रिपुरसुंदरीचेंही ध्यान असेंच आहे. फणिति शब्दाचा अर्थ वाग्वैभव अथवा वक्तृत्वशक्ति असा समजावा. 
हें यंत्र सोन्याच्या पत्र्यावर लिहून एक्केचाळीस दिवस त्याची समाराधना करावी. या श्लोकाचा रोज एक हजार जप करावा. नैवेद्य मध, केळे आणि साखर. सिद्ध यंत्र धारण करावें अथवा हें यंत्र पाण्यामध्यें लिहून पूर्ववत् पूजा आणि जप करून तें पाणी प्यावें. साधकाला कवित्वशक्ति - लाभ होईल तो ज्ञानविज्ञान संपन्न होईल.

15 April, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक १४ वा

क्षितौ षट् पञ्चाशद् द्वि समधिक पञ्चाशदुदके
हुताशे द्वाषष्टिश्चतुरधिक-पञ्चाशदनिले ।
दिवि द्विष्षट्त्रिंशन् मनसि च चतुःषष्टिरिति ये
मयूखास्तेषामप्युपरि तव पादाम्बुज-युगम् ॥ १४॥


श्रीविद्यारूप महात्रिपुरसुंदरीच्या चरणकमलाचा महिमा या श्लोकाने आचार्य वर्णन करीत आहेत. आपल्या शरीरामध्ये सहा चक्रें आहेत. मूलाधार स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धि आणि आला अशी त्या चक्रांची नावे आहेत. या सर्वांशी चक्र शब्द योजिला जातो. क्रमशः पृथ्वी अग्नि जल, वायु आणि आकाश ही पंचमहाभूतें आणि मन या सर्व तत्त्वांची ही चक्रें अधिष्ठान आहेत. ही तत्त्वें, या तत्त्वांतून अभिव्यक्त होणारा शब्दप्रपंच आणि अर्थप्रपंच म्हणजे त्या शब्दाचे वाच्यार्थ असलेल्या पदार्थांची सृष्टि. त्याचप्रमाणें त्या अक्षरांच्या व अर्थांच्या अधिष्ठात्री देवता हे सर्व त्या षट्चक्रांच्या दलांतूनच वास्तव्य आणि व्यवहार करीत असतात. या सर्व देवता चित्स्वरूप आणि स्वयंप्रकाश असलेल्या श्रीमहात्रिपुरसुंदरीच्याच अंशभूत देवता आहेत. अग्नीपासून जसे स्फुलिंग प्रकट व्हावेत किंवा सूर्यापासून जसे चोहोंकडे किरण पसरावेत त्याचप्रमाणे हीं सर्व तत्त्वें आणि या सर्व देवता श्रीललितात्रिपुरसुंदरीच्याच स्वरूपांतून प्रकट झालेल्या आहेत. श्रीविद्यास्वरूप श्रीत्रिपुरसुंदरीचे ते किरणच मानले जातात. या किरणांनाच उद्देशून प्रस्तुत श्लोकाच्या चौथ्या चरणांत मयूख हा शब्द उपयोगांत आणला आहे. "मयूख" म्हणजे किरण.

किरणें ही अनंत असली तरी परम सूक्ष्म मुलतत्त्वस्वरूप निरनिराळ्या चक्रांतील निरनिराळ्या तत्त्वांची किरणें ही सांकेतिक स्वरूपानें व संक्षिप्त संख्येने निर्दिष्ट करून सांगत आहेत. "क्षितौ" म्हणजे पृथ्वीतत्त्वाने युक्त असलेल्या मुलाधारचक्रामध्यें, "षट्पञ्चाशत्" म्हणजे छप्पन किरणें आहेत. सोळा स्वर आणि चौतीस व्यंजने मिळून पन्नास अक्षरे होतात. ही अक्षरें पंचमहाभूते, पंचतन्मात्रा, पचज्ञानेन्द्रियें, पंचकर्मेन्द्रिये, अंतःकरणचतुष्टय, दशविधमाण प्रकृतितत्त्व पुरुषतत्त्व इत्यादि तत्त्वांची सूचक आहेत. ही पन्नास अक्षरे अधिक ऐं ह्रीं श्रीं, ऐं क्लीं सौः ही मंत्रबीजाक्षरें सहा मिळून छप्पन्न किरणें पृथ्वीची अर्थात पृथ्वीतत्त्वाच्या मूलाधारचक्रांतील आहेत. ही छप्पन किरणे शिवशक्तिस्वरूप असल्यामुळें त्यांची जोडीजोडीनें अठ्ठावीस नांवेंही शास्त्रांत सांपडतात. उदाहरणार्थ, त्रिपुरसुंदरी, त्रिपुरसुंदर; महावज्रेश्वरी, महावज्रेश्वर; कुलसुंदरी, कुलसुंदर; परमेश्वरी, परमेश्वर इत्यादि. याप्रमाणे अठ्ठावीस दुणे छप्पन्न किरणें पृथ्वीतत्त्वात्मक मूलाधारचक्रांत आहेत. याचप्रमाणें जलतत्त्वामक मणिपूरचक्रांत बावन्न किरणे आहेत. याचप्रमाणें अग्नितत्त्वात्मक स्वाधिष्ठानचक्रामध्ये बासष्ट किरणें आहेत. श्लोकातील  उदक शब्दानें मणिपूरचक्र आणि हुताश शब्दानें अग्नितत्त्वाचें स्वाधिष्ठानचक्र घ्यावयाचें आहे.

"अनिले" अनिल म्हणजे वायु अर्थात् वायुतत्त्वात्मक हृदयाच्या जवळ असलेलें अनाहतचक्र. या चक्रांतही पन्नास मातृका म्हणजे मुळाक्षरे अधिक चार भूतांची बीजे यं रं लं वं मिळून चोपन्न किरणे आहेत. त्यांचींही अमृताकर्षिणी अमृताकर्षण; शरीराकर्षणी शरीराकर्षण इत्यादि नांवे आहेत. यानंतर "दिवि" म्हणजे कंठस्थानीं असलेल्या आकाशतत्त्वयुक्त विशुद्धिचक्रामध्यें "द्विः षट्त्रिंशत्" म्हणजे बहात्तर किरणें आहेत. याच्याही वर मन या तत्त्वानें युक्त असलेल्या आज्ञाचक्रांत चौसष्ट किरणें आहेत. या सर्व किरणांची बेरीज केली तर एकंदर तीनशेसाठ संख्या होते. एक वर्षाच्या कालचक्रांतही तीनशेंसाठ दिवस समाविष्ट झालेले असतात हें आपणांस माहीतच आहे. आपल्या देहांत जशी षट्चक्रे आहेत त्याचप्रमाणे एका वर्षाच्या कालखंडांतही वसंत, ग्रीष्म इत्यादि सहा अयनें असतात. ही अयनें संवत्सरात्मक कालपिंडांतील मुलाधारादि षट्चक्रेंच होत. तात्पर्य, जें कालपिंडांत तेंच देहपिंडांत आणि जें देहपिंडांत तेंच ब्रह्माण्डपिंडात अशी ही सर्व कल्पना लक्षांत घेऊन आचार्य म्हणतात, हे आई त्रिपुरसुंदरी ! याप्रमाणे वेदांत, शास्त्रांत आणि योगीजनांच्या अनुभवांत प्रसिद्ध असलेली जी किरणें (देवता आणि तत्त्वें) आहेत "तेषां अपि उपरि तव पादाम्बुजयुगं आस्त" म्हणजे त्या सर्वांच्याही वर श्रीचक्रांतील बिंदुस्थानांत, त्याचप्रमाणें कालचक्राच्याही वर आणि सर्वतत्त्वात्मक ब्रह्मांडाच्याही वर अर्थात् कालातीत आणि सर्वतत्त्वातीत अशा अनिर्वचनीय सर्वानंदमय आवरणांत तुझे चरणारविंद विराजमान झालेले आहेत. ते आमच्या देहपिंडांतही सर्वांच्यावर विराजमान असलेल्या ब्रह्मरंध्रांतर्गत सहस्रदलकमलातील पूर्ण चंद्रमंडलातही विराजमान झालेले आहेत. आई ! त्या तुझ्या चरणारविंदांचा महिमा मी काय वर्णन करणार ? 


या श्लोकाचे यंत्र - समभूज चतुष्कोण काढावा. चारी कोणांत एकत्र मिळणाऱ्या रेघांची टोकें किंचित् बाहेर काढून तेथें त्रिशूळाचा आकार द्यावा. एकंदर आठ त्रिशूल होतील. मधल्या भागांत क्लीं क्लीं क्लीं ही बीजे आडव्या दोन ओळींत लिहावींत. त्या दोन ओळींमध्ये आपल्या साध्याचा निर्देश करावा. हें यंत्र सोन्याच्या पत्र्यावर लिहून पूर्वेकडें तोड करून एकवीस दिवस समाराधना करावी. उसाच्या गंडेऱ्यांचा नैवेद्य दाखवावा. रोज पाचशे वेळां या श्लोकाचा जप करावा. सिद्धयंत्र धारण करावे याने षंढत्वनिरास आणि पुत्रप्राप्ति होते.

14 April, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक १३ वा

नरं वर्षीयांसं नयनविरसं नर्मसु जडं
तवापाङ्‌गालोके पतितमनुधावन्ति शतशः ।
गलद्वेणी-बन्धाः कुच-कलश-विस्रस्त-सिचया
हठात् त्रुट्यत्काञ्च्यो विगलित-दुकूला युवतयः ॥ १३॥


श्रीमहात्रिपुरसुंदरी ही स्वतः तर अत्यंत सुंदर आहेच, पण तिच्या कृपाकटाक्षाचा लेशही ज्याला लाभतो तो देखील सुंदर बनतो अशा अभिप्रायाने आचार्य वर्णन करीत आहेत. आई त्रिपुरसुंदरी ! मनुष्य "वर्षीयांसं" म्हणजे कितीही वृद्ध असला, डोळयांनी पहावत नाहीं असा विद्रूप असला, मनोरंजक हावभाव विनोद वगैरे गोष्टींमध्ये तो जड म्हणजे अनभिज्ञ असला तरी देखील तो तुझ्या कृपाकटाक्षाच्या टप्प्यांत आला असतां अर्थात् तुझ्या कृपाकटाक्षाची त्याला प्राप्ति झाली असतां शेकडो तरुण स्त्रिया पाठीमागे धांवतात. त्यांची जणुं कांहीं तारांबळ उडते. वेणीबंध शिथिल होतात. खांद्यावरचे "सिचय" म्हणजे पदर खालीं पडतात. कंबरपट्टे निसटतात आणि त्यांना वस्त्राचेंही भान उरत नाहीं ! तात्पर्य, तुझ्या कृपाकटाक्षाला पात्र झाल्याबरोबर तुझा भक्त इतका आकर्षक बनतो कीं, त्याच्याकडे पाहून तरुण स्त्रियांचीही ही अवस्था होते मग इतरांना तो आकर्षक वाटेल यांत नवल काय ? आई, धन्य आहे तुझा कृपाकटाक्षमहिमा !



या श्लोकाचें यंत्र एक लंब चतुष्कोण काढून त्यामध्ये क्लीं क्लीं क्लीं अशा तीन बीजांच्या दोन ओळी एकाखालीं एक लिहाव्यात. त्या दोन ओळींत मध्ये थोडे अंतर सोडावे. त्या अंतरांत आपल्या साध्याचा उल्लेख करावा. हे यंत्र सोन्याच्या पत्र्यावर लिहून सहा दिवस आराधना करावी. नैवेद्य गुळ, नारळ आणि केळांचें मिश्रण. या श्लोकाचा एक हजार जप करावा. फल स्त्री वश होते.

13 April, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक १२ वा

त्वदीयं सौन्दर्यं तुहिन-गिरि-कन्ये तुलयितुं
कवीन्द्राः कल्पन्ते कथमपि विरिञ्चि-प्रभृतयः ।
यदालोकौत्सुक्यादमर-ललना यान्ति मनसा
तपोभिर्दुष्प्रापामपि गिरिश-सायुज्य-पदवीम् ॥ १२॥


श्रीचक्राचे वर्णन केल्यानंतर आचार्य या श्लोकाने श्रीचक्राच्या ठिकाणी अधिष्ठित असलेल्या त्रिपुरसुंदरीच्या रूपसंपत्तीचें वर्णन करीत आहेत. हे तुहिनगिरिकन्ये, तुहिन म्हणजे बर्फ - त्यानें सतत आच्छादिलेला जो गिरि म्हणजे पर्वत अर्थात हिमालय पर्वत, त्याची तूं कन्या आहेस. हे पर्वतराजतनये आई त्रिपुरसुंदरी ! तुझ्या सौंदर्याची तुलना करण्याकरितां अर्थात् त्याला उपमा देऊन त्याचें वर्णन करण्याकरितां ब्रह्मदेव, विष्णू, इंद्र बृहस्पति यांच्यासारखे मोठे मोठे कवि म्हणजे श्रेष्ठ विद्वान असलेले प्रत्यक्ष देव देखील कथमपि म्हणजे कसें तरी मोठा प्रयास करून सुद्धां, "कल्पन्ते किम्" म्हणजे समर्थ होतात काय ? नाही. असेंच या प्रश्नाचें उत्तर द्यावे लागेल. तात्पर्य, हे आई जगज्जननी ! तुझ्या सौंदर्याचें तुलना करून वर्णन करावयास मोठे मोठे इंद्र-बृहस्पतीसारखे देवही समर्थ नाहींत तेथें माझी कथा काय ? मी काय वर्णन करणार ? तुझें सौंदर्य खरोखरच अवर्णनीय आहे.

अमरललना म्हणजे देवांच्या स्त्रिया देवता, अप्सरा वगैरे तुझें लावण्य अवलोकन करण्यास जेव्हां उत्कंठित होतात तेव्हां त्या मनाने शंकरांची समाराधना - उपासना करतात. योग, याग, तपश्चर्या इत्यादि साधनांनींही मिळविण्यास कठीण असलेले शिवपद, त्या भक्तिपूर्वक शंकरांची उपासना करून प्राप्त करून घेतात. "गिरिशसायुज्यपदवीं यान्ति" केवल मनःपूर्वक केल्या जाणाऱ्या भक्तीने त्या देवता आणि अप्सरा गिरिशांच्या म्हणजे शंकरांच्या सायुज्य पदवीला शिवसायुज्यपदाला पोहोंचतात, अर्थात् त्या शिवस्वरूप होतात. तात्पर्य, शिवस्वरूप होऊनच त्या तुझ्या सौंदर्याचा आस्वाद घेतात. केवळ मनाने शिवस्वरूप होऊन तुझ्या सौंदर्याला अवलोकन करण्याचा त्या मनोरथ करीत असतात असाही याचा अर्थ कांहीं विद्वान् करतात. तात्पर्य, श्रीमहात्रिपुरसुंदरीच्या सौंदर्याशीं तुलना करावी असें जगांत दुसरें कोणीच नाहीं. ब्राह्मी, वैष्णवी, इंद्राणी इत्यादि देवता किंवा उर्वशी, तिलोत्तमा, रंभा इत्यादि अप्सरा ह्या तर श्रीत्रिपुरसुंदरीच्या सौंदर्यलेशाच्या पासंगालाही पुरत नाहींत मग त्रिपुरसुंदरीच्या सौंदर्याला त्यांची काय उपमा देणार ?

श्रीत्रिपुरसुंदरीच्या सौंदर्यांचा आस्वाद भगवाच श्रीसदाशिवच घेऊं शकतात म्हणून त्या देवता मनानें सदाशिवाची उपासना करून सदाशिवस्वरूप होतात व सदाशिवाशीं तादात्म्य पावूनच त्या महात्रिपुरसुंदरीच्या सौंदर्यांचा आस्वाद घेतात, असें श्रीललितामहात्रिपुरसुंदरीचे सौंदर्य अपूर्व आहे. या अभिप्रायाने आचार्य म्हणतात, आई ! तुझ्या सौंदर्याचें मी काय वर्णन करणार ? यांत आचार्यांनी अनन्वयालंकार मोठ्या युक्ताने ध्वनित केला आहे. 




या श्लोकाचे यंत्र समचतुष्कोण असून त्यांत एकाखाली एक सौः सौः अशीं अक्षरे लिहिलेली असतात. हें यंत्र देवाच्या ताम्हणांत पाण्यावर लिहावे पंचेचाळीस दिवस विधिवत् पूजा करावी. मधाचा नैवेद्य दाखवावा. ताम्हणांतील जलाला स्पर्श करून या श्लोकाचा एक हजार रोज जप करावा. याप्रमाणे अभिमंत्रित केलेलें तें पाणी व मध प्राशन करावा. याने विद्या, वक्तुरत्व आणि सर्व लोकवशित्व प्राप्त होतें. 
 

12 April, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक ११ वा

चतुर्भिः श्रीकण्ठैः शिवयुवतिभिः पञ्चभिरपि
प्रभिन्नाभिः शम्भोर्नवभिरपि मूलप्रकृतिभिः ।
चतुश्चत्वारिंशद्वसुदल-कलाश्र-त्रिवलय-
त्रिरेखाभिः सार्धं तव शरणकोणाः परिणताः ॥ ११॥


"हें मातः त्रिपुरसुंदरि ! चतुर्भिः श्रीकण्ठैः शम्भोः सकाशात् प्रभिन्नाभिः पञ्चभिः शिवयुवतिभिः नवभिः अपि मूलप्रकृतिभिः तव शरण कोणाः वसुदल- कलाश्र-त्रिवलय-त्रिरेखाभिः सार्धं परिणताः सन्तः चतुश्चत्वारिंशत् भवन्ति" असा या श्लोकाचा अन्वय आहें. हे माते त्रिपुरसुंदरी ! चार ऊर्ध्वमुख त्रिकोण, ते शंकरांचे त्रिकोण असल्यामुळें त्यांना श्रीकंठ असें म्हणतात त्याचप्रमाणे मूळ बिंदुस्वरूप जो शंभु म्हणजे भगवान् सदाशिव त्याच्यापासून खालीं पांच अधोमुख त्रिकोण आहेत ते शक्तीचे त्रिकोण असल्यामुळें त्यांना "शिवयुवति" असें म्हटलेले आहे. हे ऊर्ध्वमुख चार त्रिकोण आणि अधोमुख पांच त्रिकोण मध्यवर्ति असलेल्या बिंदूनें प्रभिन्न म्हणजे पृथक् झालेले आहेत. असे हे श्रीचक्रांतील नऊ त्रिकोण म्हणजे जणुं कांहीं विश्वपपंचाचीं मूळ कारणेंच आहेत. ऊर्ध्वमुरव शिवचक्रांतील त्रिकोण आणि अधोमुख शक्तिचक्रांतील त्रिकोण सर्व मिळून त्रेचाळीस त्रिकोण होतात. श्रीत्रिपुरसुंदरीचे प्रत्यक्ष निवासस्थान असलेला मध्यवर्ति बिंदु हा चव्वेचाळीसावा समजावा. या सर्व त्रिकोणांच्या भोंवतालीं अष्टदल कमल, त्याच्याही बाहेर षोडशदल कमल, त्यांच्या बाहेर तीन वर्तुलें अथवा मेखला आणि त्यांच्याही बाहेर चतुष्कोणाकार तीन भूपुराच्या रेखा, अशा क्रमाने परिणत झालेलें, पूर्णतेला पोहोचलेलें श्रीचक्र हे तुझें मंदिर आहे. त्याचा महिमा मी काय वर्णन करूं ? तो अवर्णनीय आहे. असा या श्लोकाचा अन्वयानुसारी अर्थ आहे.

विश्वाचे माता आणि पिता त्याचप्रमाणे आपलें इष्ट दैवत असलेल्या अदैतभावापन्न शिवशक्तिस्वरूप श्रीललितामहात्रिपुरसुंदरीचें मंदिर असलेल्या श्रीचक्राचा काय थाट वर्णन करावा ? त्याचें जितके अवलोकन करावे, जितके चिंतन करावे तितके तें अपुरेच वाटतें. विविध वैभवाने संपन्न अशा एखाद्या विशाल राजमंदिरांत प्रवेश केल्यानंतर मन जसे तेथें रमते अथवा श्रीरामेश्वराच्या विशाल मंदिराचे प्राकार ओलांडून आपण जसा जसा आत संचार करतो तशी तशीं आपल्याला अनेक मंदिरें व तीर्थे दृष्टीस पडतात. अनेक देवतांचे दर्शन घडते. थाटामाटांत विराजमान झालेल्या श्रीरामेश्वराचें दर्शन घडले म्हणजे जीवाला एक प्रकारचे अनिर्वचनीय समाधान वाटतें. तोच प्रकार श्रीचक्राच्या स्वरूपाचे चिंतन करीत असतांना आपल्या प्रतीतीला येतो. मनाला समाधान वाटतें. आनंद वाटतो.

"चत्रुर्भिः शिवचक्रैश्च शक्तिचक्रैश्च पञ्चभिः ।
शिवशक्त्यात्मकं ज्ञेयं श्रीचक्र शिवयोर्वपुः ॥ "

ऊर्ध्वमुख चार शिवत्रिकोण आणि अधोमुख पांचः शक्तित्रिकोण असें हें नऊ त्रिकोणांचे शिवशक्तिस्वरूप असलेलें श्रीचक्र हें प्रत्यक्ष शिवपार्वतीचे स्वरूपच होय. या श्रीचक्रांत मध्यभागी असलेल्या एका वर्तुळांत ऊर्ध्वमुरव असे चार त्रिकोण दिसत आहेत तर अधोमुख असे पांच त्रिकोण दिसत आहेत. हा नऊ त्रिकोणांचा समूह हें श्रीचक्राचें अंतरंग स्वरूप आहे तर आठ दलांचे कमल, सोळा दलांचे कमल, तीन वर्तुळाकार मेखला आणि तीन रेघांचें भूपुर हें श्रीचक्राचे बहिरंग स्वरूप होय. अंतरंगाची मुख्य देवता शक्ति आहे तर बहिरंगाची मुख्य देवता शिव आहे. मध्यवर्ती असलेल्या बिंदुस्थानांत शिव आणि शक्ति तादात्म्यभावाला प्राप्त होऊन विराजमान झालेलीं आहेत. त्यांतही शक्तिस्वरूप श्रीत्रिपुरसुंदरी ही परमशिवाच्या अंकावर विराजमान झालेली आहे. अशा रीतीनें बिंदुस्थानाची देवता शिवशक्ति हीच मानली जाते. या शिवशक्तीलाच  "परदेवता" असें म्हटलें आहे.

श्रीचकाचीं एकंदर नऊ आवरणे आहेत. या प्रत्येक आवरणाला चक्र असेंच म्हटलें जातें. अधोमुख पांच त्रिकोण असलेली आपल्याकडील बाजू ही पश्चिम दिशा समजावी. ऊर्ध्वमुख चार त्रिकोण असलेली आपल्यासमोरची वरची बाजू ही पूर्वेकडील समजावी. आपल्या डाव्या बाजूस उत्तर आणि उजव्या बाजूस दक्षिण दिशा समजावी. पश्चिम आणि उत्तर यांमधील कोपरा वायव्य दिशेचा असून उत्तर आणि पूर्व यांमधील कोपरा ईशान्य दिशेचा समजावा. पूर्व आणि दक्षिण यांमधील कोपरा आग्नेय दिशेचा असून दक्षिण आणि पश्चिम यांमधील कोंपरा ही नैर्कत्य दिशा समजावी. असा हा श्रीचक्राचा दिग्विभाग लक्षांत घ्यावा. श्रीचक्रांतील तीन रेघांचे चतुष्कोणाकार भूपुर हे पहिलें आवरण असून याला त्रैलोक्यमोहनचक्र असें नांव आहे. सोळा पाकळ्यांचें कमल हें दुसरे आवरण असून याला सर्वाशापरिपूरकचक्र असें म्हणतात. आठ पाकळ्यांचें कमल हें श्रीचक्रांतील तिसरे आवरण असून याला सर्वसंक्षोभणचक्र असें म्हटले आहे. यानंतर चौदा त्रिकोण असलेलें चौथे चक्र हें श्रीचक्रांतील चौथे आवरण मानले जातें. या आवरणाला सर्वसौभाग्यदायकचक्र असें म्हणतात. यानंतर दहा त्रिकोण असलेलें बहिर्दशारचक्र हें पांचवे आवरण असून याला सर्वार्थसाधकचक्र असें नांव दिले आहे. त्यानंतर दहा त्रिकोणांचे दुसरें चक्र असून त्याला अंतर्दशारचक्र असें म्हणतात. हें चक्र श्रीचक्रातील सहावे आवरण असून त्याला सर्वरक्षाकरचक्र असें म्हटले आहे. याच्या आंत आठ त्रिकोण असलेलें सातवे आवरण असून त्याला सर्वरोगहरचक्र असें म्हटलें जातें. या सभोवार आठ त्रिकोण असलेल्या सातव्या आवरणांत मध्यवर्ती एक त्रिकोण आहे. तो मुख्य त्रिकोण असून श्रीचक्रांतील तें आठवे आवरण मानतात. या आवरणाला सर्वसिद्धिप्रदचक्र असें म्हणतात. या त्रिकोणांतही जो पोकळ शून्याकार बिंदु आहे तो या श्रीचक्रांतील नववे आवरण होय. या नवव्या आवरणाला सर्वानंदमयचक्र असें म्हणतात. याच चक्रामध्ये आपली आराध्यदेवता श्रीललितामहात्रिपुरसुंदरी ही शिवस्वरूपाशीं समरस होऊन विराजमान झालेली आहे. साधकाचें चित्त आपल्या या उपास्यदेवतेशी जेव्हां समरस होते तेव्हां त्याच्या आनंदाला सीमा रहात नाहीं. म्हणूनच या आवरणाला "सर्वानन्दमय" असें अगदीं योग्य नांव दिलेले आहे. बाकीची आवरणेंही आपआपल्या नांवाप्रमाणे साधकाला फले देतच असतात.

श्रीचक्रांतील भूपुराच्या चारी दिशांना चार दारे आहेत. चतुष्कोणाकृति भूपुर हें तीन रेघांचे आहे. जणु कांहीं ते तीन प्राकारच आहेत. पहिली रेषा शुक्र वर्णाची आहे तर दुसरी रेषा अरुण वर्णाची आहे. तिसऱ्या रेषेचा वर्ण पिवळा आहे. पहिल्या रेषेच्या चारी दरवाजांत, चारी कोंपऱ्यांत आणि पश्चिम आणि नैर्ऋत्य यांच्यामध्यें व पूर्व आणि ईशान यांच्यामध्यें दहा प्रकारच्या सिद्धि अर्थात त्या त्या सिद्धींच्या अधिष्ठात्री देवता विराजमान झालेल्या आहेत. अणिमा, महिमा, लघिमा, ईशित्व, वशित्व इत्यादि त्यांची नावे आहेत. भृपुराच्या दुसऱ्या रेषेंत चारी दरवाजामध्ये आपल्या वाम भागाकडे चार आणि चारी कोंपर्‍यांत चार अशा आठ मातृका ( लोकमाता) विराजमान झालेल्या आहेत. ब्राह्मी,  माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी इत्यादि त्यांची नावे आहेत. सात मातृका प्रसिद्धच आहेत. 

या ठिकाणी महालक्ष्मी ही आठवी मातृका असल्याचें दृष्टीस पडते. भूपुराच्या तिसऱ्या रेषेंत आपण आलों म्हणजे तेथें पहिल्या रेषेप्रमाणेंच सर्वसंक्षोभिणीमुद्राशक्ति, सर्वविद्राविणीमुद्राशक्ति इत्यादि दहा शक्तिदेवता चारी द्वारांत आणि चारी त्रिकोणांत त्याचप्रमाणे पश्चिम आणि नैर्ऋत यांच्यामध्यें एक आणि पूर्व आणि ईशान्य यांच्यामध्ये एक याप्रमाणे आपआपल्या स्थानी सुप्रतिष्ठित असलेल्य दृष्टीस पडतील. यांना प्रकट योगिनी असेही म्हणतात.

वर निर्दिष्ट केलेलें भूपुर ओलांडून आपण आत गेलों कीं पुढें सर्व बाजूंनी विशाल पटांगण असलेलें दृष्टीस पडेल. त्या पटांगणांतून पुढें आल्यावर आपल्याला तीन वलयें दिसतील. ही तीन वलये सत्त्व रज, आणि तम या तीन गुणांची द्योतक आहेत. अथवा सोम, सूर्य आणि अग्नि या तीन तत्त्वांची द्योतक आहेत अथवा इच्छाशक्ति, ज्ञानशक्ति आणि क्रियाशक्ति या तीन शक्तींची तीं द्योतक आहेत असेंही मानतात. कांहीं श्रीचक्रांतून ही तीन वलये षोडशदल कमलाला लागून असलेल्या वरच्या बाजूच्या वलयानंतर दाखवितात तर कांहीं श्रीचक्रांत चौदा त्रिकोण असलेल्या चतुर्दशारचक्राच्या बाहेर एक वर्तुल दाखवतात, तर अष्टदल कमलाच्या बाहेर दुसरें वर्तुळ दाखवितात. तसेंच तिसरे वर्तुल सोळा पाकळ्या असलेल्या कमलाच्या बाहेर त्या कमलदलांना लागून असलेलें दाखवितात. कांहीं श्रीचक्रातून पांच वर्तुलें दिसतात तर काहीतून तीं सहाही दिसतात.

श्रीचक्रांतील तीन मेखला ओलांडून आपणा आत गेलों म्हणजे आपल्याला सोळा पाकळ्यांचे कमल दिसेल. या सोळा पाकळ्या म्हणजे जशा कांहीं चंद्राच्या सोळा कलाच होत. म्हणूनच या सोळा पाकळ्यांच्या कमलाप्रमाणे असलेल्या चक्राला चंद्रस्वरूप मानलेलें आहे. बरोबर आपल्या बाजूकडील खालच्या पाकळीला आरंभ करून उजवीकडून डावीकडे प्रत्येक पाकळींत कामाकर्षिणी नित्या कलादेवी, बुद्ध्याकर्षिणी नित्या कलादेवी याप्रमाणें सोळा देवींची मंदिरे आहेत. या सोळा देवींना गुप्त योगिनी असें म्हणतात. या सर्व देवतांचे दर्शन घेऊन आपण आत गेलों म्हणजे आपल्याला आठ दलांचे कमल दिसेल. या कमलाची आठ दलें म्हणाजे भगवान् श्रीशंकर यांच्या प्रत्यक्ष आठ मूर्तिच होत. पृथ्वी, जल तेज, वायु आणि आकाश, त्याचप्रमाणे सूर्य, चंद्र आणि आत्मा ह्याच त्या शंकरांच्या आठ मूर्ति आहेत. शिवाय या कमलाच्या चारी दिशांची चार दलें आणि चारी कोणांतील चार दलें यांच्यामध्ये अनंगकुसुमादेवी, अनंगमेखलादेवी, अनंगमदनादेवी इत्यादि आठ देवतांची मंदिरे आहेत. त्या मंदिरांत सुप्रतिष्ठित असलेल्या या आठ देवता म्हणजे आपली उपास्यदेवता असलेल्या श्रीराजराजेश्वरी महात्रिपुरसुंदरीदेवीच्या गुप्तचर योगिनीच होत. हें गुप्त खाते मोठे जबरदस्त असून चौदाही भुवनांचे तें निरीक्षण करीत असतें. येथपर्यंत तीन आवरणे संपली.

अष्टदलकमलाचें वर्तुळ ओलांडून आपण आंत गेलों कीं, सर्व बाजूंनी मोकळा असलेला वर्तुलाकार असा बराच मोठा प्रदेश दृष्टीस पडेल. याच प्रदेशाला सुधासिंधु अथवा क्षीरसागर असें म्हटले आहे. या क्षीरसागरांत पुढें मोठे द्वीप दृष्टीस पडेल. याच द्वीपाला मणिद्वीप असें म्हटलेले आहे. यांत आपण प्रवेश केला कीं आपल्याला चौदा त्रिकोण असलेलें श्रीचक्रांतील चौथे आवरण दृष्टीस पडेल. याला सर्वसौभाग्यदायकचक्र असें म्हणतात. या चक्रांतील अधोमुख असलेल्या खालच्या त्रिकोणापासून उलट्या क्रमाने उजवीकडून डावीकडे असलेल्या प्रत्येक त्रिकोणांत सर्वसंक्षोभिणीशक्ति, सर्वविद्राविणीशक्ति इत्यादि नावे असलेल्या चौदा देवता विराजमान झालेल्या आहेत. यांना संप्रदाययोगिनी असें म्हणतात. याच्यापुढें दोन दशारचक्रें आहेत. एक बहिर्दशार व एक अंतर्दशार. यांतील बाहेरच्या दहा त्रिकोण असलेल्या चक्रांत खालच्या त्रिकोणापासून उलट्या क्रमाने सर्वसिद्धिप्रदादेवी, सर्वसंपत्प्रदादेवी इत्यादि नांवे असलेल्या दहा देवता सर्व त्रिकोणांत पहावयास सापडतील. हे चक्र दशावतारात्मक श्रीविष्णुस्वरूप आहे असें मानतात. यांतील देवतांना कुलोत्तीर्णयोगिनी असें म्हटलेले आहे. याच दशारचक्राप्रमाणें दुसऱ्या दहा त्रिकोण असलेल्या चक्रांतील प्रत्येक त्रिकोणांत सर्वज्ञादेवी, सर्वशक्तिदेवी, सर्वैश्वर्यप्रदादेवी इत्यादि दहा देवता आहेत. यांना निगर्भयोगिनी असे म्हणतात. याप्रमाणे पाचवे आणि सहावे आवरण ओलांडून आपण आत गेलो म्हणजे आपल्याला आठ त्रिकोण असलेलें सातवें आवरण दिसेल. या सातव्या आवरणांतही खालच्या त्रिकोणापासून उलट्या क्रमाने वशिनी वाग्देवता, कामेश्वरी वाग्देवता इत्यादि नांवे असलेल्या आठ वाग्देवता प्रत्येक त्रिकोणांत  एक-एक याप्रमाणे प्रतिष्ठित झालेल्या आहेत. यांना रहस्ययोगिनी असें म्हणतात.

सर्वरोगहर नांव असलेल्या या सातव्या आवरणांतून आपण आत गेलों की, आपल्याला मुख्य त्रिकोणाचे दर्शन होईल. या त्रिकोणाला सर्वसिद्धिप्रद असें नांव आहे. या त्रिकोणाच्या सभोंवार श्रीकामेश्वर भगवान् सदाशिव आणि श्रीकामेश्वरी महात्रिपुरसुंदरी यांची आयुधे आहेत. धनुष्यबाण, पाश आणि अंकुश अशीं त्या आयुधांची स्वरूपे आहेत. या त्रिकोणाच्या तीन भुजा म्हणजे सत्त्वगुण, रजोगुण आणि तमोगुणप्रधान अशा त्या तीन मूर्तिमंत शक्तिदेवताच आहेत. हा त्रिकोण नादशक्तीचे अधिष्ठान आहे. या त्रिकोणाचा वर्ण तांबड्या दुपारीच्या फुलासारखा आरक्त आहे. या त्रिकोणाच्या भुजांजवळ कामगिरिपीठ, जालंधरपीठ आणि पूर्णगिरिपीठ अशी तीन पीठें म्हणजे आसनस्थाने अथवा सिंहासने आहेत. या सिंहासनांवर ब्रह्मा, विष्णू आणि महेश आपआपल्या शक्तिदेवतेसह विराजमान झालेले आहेत. या देवता जागृति, स्वप्न आणि सुषुप्ति या तीन अवस्थांच्या अधिष्ठात्री आहेत. त्याचप्रमाणे सृष्टि, स्थिति आणि प्रलय यांच्याही त्या अधिष्ठात्री देवता आहेत. या त्रिकोणाच्या तीन भुजा म्हणजे अग्निचक्र, सूर्यचक्र आणि सोमचक्रच होत. इच्छाशक्ति, ज्ञानशक्ति आणि क्रियाशक्ति यांच्याही त्या अधिष्ठान आहेत. याच त्रिकोणांत आपल्या महात्रिपुरसुंदरीचेंच रूप बालात्रिपुरसुंदरीच्या रूपाने विराजमान झालेलें आहे. देवता ही मंत्रमय असल्यामुळें श्रीबालात्रिपुरसुंदरीचा मंत्रच या त्रिकोणांत दिलेला असल्याचें आढळतें, तर कांहीं श्रीचक्रांतून श्रीमहात्रिपुरसुंदरीचा पंचदशाक्षरी महामंत्र अथवा महामंत्रराज याच त्रिकोणांत विराजमान झालेले दिसतील. असा हा त्रिकोण अत्यंत महत्त्वाचा आहे.

वर निर्दिष्ट केलेल्या त्रिकोणाच्या आंत मध्यवर्ति असलेला बिंदु, ज्याला बैंदवस्थान असें म्हणतात, तो या श्रीचक्रांतील नववे आवरण होय. या बिंदुस्थानाला सर्वानंदमयचक्र असें म्हणतात. या नांवावरूनच आवरणाचे महत्त्व लक्षांत घ्यावे. हें या चक्रातील सर्वोच्च स्थान होय. जसा किल्ल्यांतील बालेकिल्ला व बालेकिल्ल्यांतील सभागृह. या सभागृहांत मधोमध एक रत्नजडित सिंहासन आहे. या सिंहासनाला चार पाय आहेत. या चारी पायांशीं ब्रह्मदेव विष्णु, रुद्र आणि महेश्वर हे सेवाभावानें नम्र होऊन बसले आहेत. त्या सिंहासनावर परम शिवस्वरूपाशी तादात्म्य पावलेली आपली उपास्यदेवता राजराजेश्वरी श्रीमहात्रिपुरसुंदरी विराजमान झालेली आहे. ती या ठिकाणी शुद्धसच्चिदानंदस्वरूपच आहे. जो साधक श्रीचक्राचा सांगोपांग विचार करीन येथपर्यंत येऊन पोहोंचतो आणि येथें श्रीमहात्रिपुरसुंदरीचे अनन्यचित्ताने दर्शन घेतो तो धन्य होतो. त्याची कर्माधीन जन्ममरण  परंपरा संपते व तो साक्षात् शिवस्वरूप होतो.

या बाह्य श्रीचक्राप्रमाणेंच आपल्या देहांतही षट्चक्रस्वरूपी श्रीचक्राचें वर्णन करतां येण्यासारखें आहे. त्याचप्रमाणे ब्रह्मरंध्रांतर्गत सहस्रदलकमल हेही एक स्वतंत्र श्रीचक्रच आहे. किंबहुना आपला संपूर्ण देहच श्रीचक्रस्वरूप आहे. या देहातील रस, रक्त, मांस, मेद आणि अस्थि हे धातु शक्तिचक्रस्वरूप आहेत तर मज्जा, शुक्र प्राण आणि जीव हे धातु शिवचक्रस्वरूप आहेत. "धारणाद्धातवः" या न्यायाने प्राण आणि जीव हे देहाची धारणा करीत असल्यामुळें त्यांनाही धातूच म्हटलें आहे. देहाप्रमाणेच संपूर्ण बाह्मांडही श्रीचक्रस्वरूपच आहे. पंचमहाभूतें हीं शक्तिचक्रस्वरूपच आहेत तर माया, शुद्धविद्या, महेश्वर आणि सदाशिव ही चार तत्त्वें शिवचक्रस्वरूप आहेत. या सर्वामध्ये सर्वोच्च स्थानीं असलेलें श्रीसच्चिदानंदघन परब्रह्मतत्त्व हीच आपली उपास्यदेवता श्रीललितामहात्रिपुरसुंदरी होय.

असें हें श्रीचक्राचें अलौकिक स्वरूप लक्षांत घेऊनच आचार्य वर्णन करीत आहेत : हे आई त्रिपुरसुंदरी ! बिंदुस्थानासह त्रेचाळीस त्रिकोणांनीं अर्थात् चव्वेचाळीस संख्येने पूर्णत्वाला पोहचलेलें तुझें श्रीचक्ररूपी मंदिर मोठे अवर्णनीय आहे. या श्लोकांत श्रीकंठ आणि शिवयुवति हे शब्द लाक्षणिक आहेत. श्रीकंठ हा शब्द शिवाचा वाचक आहे. प्रकृतस्थली श्रीकंठ शब्दानें चार शिवचक्रें समजावींत. त्याचप्रमाणे शिवयुवति या शब्दाचा वाच्यार्थ पार्वती अर्थात् शक्ति असा आहे. पण या ठिकाणी शिवयुवति या शब्दाचा अर्थ शक्तिचक्रें असा समजावा. त्याचप्रमाणें साक्षात् त्रिकोणांची संख्या त्रेचाळीस होत असल्यामुळें कांही पुस्तकांतून "त्रयश्चत्वारिंशात्" असा पाठ आढळतो. या मतानें "शरणकोणाः" या शब्दाचा षष्ठीतत्पुरुष समास मानावा लागतो. "चतुश्चत्वारिंशत्" हा पाठ मानल्यास "शरणकोणाः" या ठिकाणी शरणं च कोणाश्च असा द्वन्द्व समास स्वीकारावा लागतो. कांहीं केलें तरी तात्पर्य एकच आहे. शरण शब्दाचा अर्थ घर किंवा मंदिर असा आहे. 


हे यंत्र सोन्याच्या पत्र्यावर लिहून एक्याऐंशी दिवस शास्त्रोक्त पूजा करावी. नैवेद्य गूळ आणि पायस. श्लोकाचा जप रोज एक हजार. यंत्र सिद्ध करून धारण करावे. अथवा या श्लोकाने लोणी अभिमंत्रून एक्याऐंशी दिवस प्राशन करावे, याने वंध्या-दोष निवृत्त होतात. 
 

11 April, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक १० वा

सुधा-धारासारैश्चरण-युगलान्तर्विगलितैः
प्रपञ्चं सिञ्चती पुनरपि रसाम्नाय-महसः ।
अवाप्य स्वां भूमिं भुजगनिभमध्युष्ट-वलयं
स्वमात्मानं कृत्वा स्वपिषि कुलकुण्डे कुहरिणि ॥ १० ॥ 

 हे मातः चरणयुगलान्तर्विगलितेः सुधाधारासारैः प्रपञ्चं सिञ्चन्ती रसाम्नायमहसः (सकाशात्) स्वां भूमिं पुनः अपि अवाप्य भुजगनिभं अध्युष्टवलयं स्वं आत्मानं कृत्वा कुलकुण्डे स्वपिषि" आई त्रिपुरसुंदरी ! तुझ्या दोन्ही चरणकमलांतून स्रवणाऱ्या अमृताच्या धारावृष्टींनीं तूं देहांतील सर्व नाड्यांच्या समूहाला आणि नाड्यांच्या द्वारा देहालाही पण शिपडतेस, तृप्त करतेस, त्यांचें पोषण करतेस आणि त्यानंतर पुन्हा चंद्रमंडलांतून खाली उतरतेस. आपल्या पहिल्या स्थानाला येतेस. तेथें सर्प जसा वेटोळें घालून बसावा त्याप्रमाणें तूं स्वतःचें (साडेतीन) वेटोळे करून कुंडाप्रमाणे असलेल्या आधारचक्रांतील कुहरांत अर्थात् छिद्रामध्ये पूर्वीप्रमाणेच झोंपतेस. तात्पर्य, लोकोपकाराकरितां हा तुझा सर्व खेळ चालला आहे ! असा या लोकाचा अन्वय आणि त्याचा अर्थ आहे.

मागील श्लोकांत कुंडलिनीरूप श्रीमहात्रिपुरसुंदरी मुलाधारादि चक्रांच्या ठिकाणी क्रमशः पृथ्वी, जल इत्यादि तत्त्वांचा लय करीत मस्तकामध्यें असलेल्या हजार पाकळ्यांच्या कमलांतील चंदमंडलामध्यें विहार करते असें सांगितलें. आतां या श्लोकांत ती त्या चंद्रमंडलांतील आपल्या चरणकमलांच्या स्पर्शाने पुनीत झालेल्या अमृताच्या वृष्टीने साधकाच्या देहांतील सर्व नाड्यांना व नाड्यांच्या द्वारा साधकाच्या शरीरपिंडालाही तृप्त करते, पुष्ट करते आणि पुन्हा पूर्ववत् सृष्टिक्रमाच्या अनुरोधानें सर्व तत्त्वांचा आविष्कार करीत मूलाधारचक्राजवळ असलेल्या आपल्या स्थानांत स्वाधिष्ठानचक्रांत वेटोळे घालून स्वस्थ झोपते. हें सर्व तिचे कार्य साधकाच्या शरीरपिंडाचें पोषण आणि परिपालन होण्याच्या दृष्टीनेंच चाललेले असतें. जें पिंडी तें ब्रह्माडी या न्यायाने साधकाच्या शरीरपिंडाप्रमाणेंच अखिल बह्मांडाचेंही ती पोषण आणि परिपालन करीत असतेच. अशा या तिच्या दयापूर्ण लीलेचें वर्णन आचार्य करीत आहेत.

आपल्या शरीरांत एक सहस्रदल कमल आहे. ज्याला आपण व्यवहारामध्ये मेंदू, मगज अथवा मस्तिष्क म्हणतो तेंच हें सहस्रदल कमल होय. हें सर्व तत्त्वांचे बीजस्थान आहे. सर्व तत्त्वांचा लय यांतच होत असतो. हेंच सच्चिदानंदरूप महात्रिपुरसुंदरीचें अधिष्ठान आहे. श्रीविद्येच्या ध्यानात्मक समाराधनेमध्यें या सहस्रदलकमलाला श्रीचक्र असेंच म्हटलेले आहे. नामरूपात्मक विश्वप्रपंचाचीं मूळ बीजभूत असलेली अक्षरें आणि तत्त्वें ही बाह्य श्रीचक्राप्रमाणेंच या ब्रह्मरंध्रस्थानीं असलेल्या सहस्रदल कमलरूपी श्रीचक्रांतही अंतर्भूत झालेलीं आहेत. शक्तितत्त्व हें वाक्प्रपंचाचें उगमस्थान आहे तर शिवतत्त्व हें अर्थप्रपंचाचें उगमस्थान आहे. शब्दप्रपंच आणि अर्थप्रपंच या दोन्ही प्रपंचाचे मूळ अक्षरांतच असल्यामुळें श्रीचक्रांतील सर्व त्रिकोणांत आणि कमलदलांत आपल्याला अक्षरांचाच विन्यास दृष्टीस पडेल. श्रीचक्र हें शिवशक्तिस्वरूप पूर्ण तत्त्वाचें अधिष्ठान असल्यामुळें श्रीचक्रांत आपल्याला शिवचक्रांचा आणि शक्तिचक्रांचाही एकत्र समावेश असलेला दृष्टीस पडतो. आपल्या घराला सर्व बाजूंनी जसा परिघ असावा किंवा कुसूं असावें त्याप्रमाणे श्रीचक्रांत आपल्याला बाहेरून आंत प्रवेश  करतांना पहिल्या प्रथम तीन रेघांचा चतुष्कोण दिसेल. यालाच भूपुर असें म्हणतात. या भूपुराला चार द्वारे आहेत. तीं क्वचित उघडी असतात तर क्वचित भूपुरांशीं अखंडपणें संलग्न असतात. आपण भूपुरांत प्रवेश केला कीं, त्या ठिकाणी कांहीं भाग मोकळा दृष्टीस पडेल. त्यापुढे आपल्याला तीन वर्तुळे दिसतील. अर्थात् तीन वर्तुळाकार रेघा दिसतील. कांहीं ठिकाणी त्या चारही असल्याचे दिसते. सर्वत्र विकल्प हा मतभेदामुळे अथवा संप्रदायभेदामुळें असतो ही गोष्ट लक्षांत घ्यावी. ही तीन वर्तुळे जणु कांहीं बाह्य विश्वाच्या त्रैगुण्याची द्योतक आहेत.

या वर्तुळांच्या आंत षोडशदल कमल आहे. त्याच्याही औत एक अष्टदल कमल आहे. षोडशदळकमलातील प्रत्येक पाकळीत अं, आ इत्यादि सोळा स्वरांची बीजे लिहिलेली असतात. श्रीचक्र आपल्या हातावर घेऊन पहा. त्यांत आंतल्या बाजूला असलेल्या भूपुराच्या द्वारामध्ये जें दल येईल त्यांत अं हें बीज दिसेल. पुढें उजवीकडून उलट्या बाजूनें प्रत्येक दलांत आ, ई इत्यादि स्वरबीजे पृथक पृथक् लिहिलेली असतात. याप्रमाणे सोळा दलांत सोळा स्वर पूर्ण होतात.

षोडशदल कमलानंतर आपल्याला आंतल्या बाजूस अष्टदल कमल दिसेल. पुढच्या बाजूस ऊर्ध्वमुरव त्रिकोणाशी संलग्न असलेल्या दलात क - वर्गातील बीजाक्षरें सरळ क्रमाने लिहिलेली दिसतील. आपल्या बाजूस असलेल्या अधोमुख त्रिकोणाशी संलग्न असलेल्या दलांत ट - वर्गांतील बीजाक्षरें लिहिलेली असतात. उजवीकडींल दलांत च - वर्गाचीं बीजाक्षरें लिहितात, तर डावीकडील दलात त - वर्गाची बीजाक्षरें लिहितात. उजव्या बाजूकडील वरच्या कोपऱ्यांतील दलांत प - वर्गातलीं बीजाक्षरें पहावयास सांपडतील तर खालच्या बाजूच्या कोपऱ्यांतील दलांत य - वर्गातील चार बीजाक्षरें लिहिलेली दिसतील. त्याचप्रमाणें डाव्या बाजूच्या खालच्या कोपऱ्यांतील दलांत श - वर्गातील चार बीजे लिहिलेलीं असून वरच्या कोपऱ्यातील दलात ळं आणि क्षं ही दोन बीजाक्षरें लिहिलेली असतात. याप्रमाणे अष्टदल कमलापर्यंतची सर्व चक्रे ही शिवचक्रे म्हणून समजली जातात. या शिवचक्रांच्या आंत आपण गेलों म्हणजे आपल्याला शक्तिचक्रांचा समूह दिसेल.

आतां आपण शक्तिचक्रांचा विचार करूं. अष्टदल कमलाचे अवलोकन करून आपण आंत गेलों की, प्रथम आपल्याला सर्व बाजूंनी मोकळा असलेला बराच मोठा वर्तुळाकार प्रदेश दृष्टीस पडेल. या प्रदेशांत अनेक त्रिकोणांनी संलग्न असलेली पांच चक्रें आहेत. पांचवे चक्र केवळ त्रिकोणात्मकच आहे. यांत पहिलें चक्र चौदा त्रिकोणांचे आहे, तर त्याच्या आंतील दोन चक्रे ही दहा-दहा त्रिकोणांची आहेत. त्यांच्या आंतील एक चक्र आठ त्रिकोणांचे असून त्याच्या आंत शुद्ध त्रिकोण दिसत आहे. पहिल्या चौदा त्रिकोणांच्या चक्राला "चतुर्दशार" असें म्हणतात, तर त्याच्या आतील दहा-दहा त्रिकोण असलेल्या दोन चक्रांना क्रमशः  "बहिर्दशार" आणि "अन्तर्दशार" असे म्हणतात. त्यांच्याही पलीकडे असलेल्या आठ त्रिकोणांच्या चक्राला अष्टकोण अथवा वसुकोण अशीं नांवे दिलेली आहेत. त्याच्याही आंत आपल्याला शुद्धत्रिकोण पहावयास सापडेल. या त्रिकोणात्मक चक्रांत दुसरा कोणताही त्रिकोण घटक झालेला नाहीं. म्हणून या चक्राला शुद्धित्रिकोण असेंच म्हटलें जातें. चतुर्दशार चक्रामध्यें खालच्या बाजूला जो त्रिकोण आहे त्यांत कं हें बीजाक्षर असून क्रमाक्रमाने उजवीकडून डावीकडे खं, गं या क्रमाने ढं पर्यंत चौदा बीजाक्षरें आहेत. त्याचप्रमाणे बहिर्दशारचक्रांतील दहा त्रिकोणांत खालच्या त्रिकोणापासून उजवीकडून डावीकडे णं-पासून भं-पर्यंत दहा बीजें लिहिली जातात, तर अंतर्दशार चक्रांतील दहा त्रिकोणांत मं पासून क्षं पर्यंत असलेलीं दहा बीजे लिहिलेली दृष्टीस पडतात. आपल्या देहांतही मूलाधारचक्रापासून आज्ञाचक्रापर्यंत जी सहा चक्रें आहेत त्या चक्रांच्याही दलांत सर्व स्वर आणि व्यंजने बीजरूपानें समावलेलींच आहेत. म्हणून कुलपथांतील अर्थात् सुषुम्नामार्गांतील षट्चक्रे आणि श्रीयंत्रांतील चक्रें ही एकरूपच समजली जातात.

मूर्धस्थानीं असलेल्या सहस्रदल कमलांतही श्रीचक्राची भावना केली जाते. या श्रीचक्रांतही स्वरवर्णात्मक मातृकाबीजांची स्थापना केलेली असतेच. या मूर्धस्थानी विलसत असलेल्या सहस्रदलकमलांतील श्रीचक्रांत सर्व कलांनी परिपूर्ण असलेले, वृद्धिक्षयविरहित आणि निष्कलंक असें एक चंद्रमंडल आहे. श्रीचक्रांतील त्रिकोणांत मध्यवर्ती जसा बिंदु आहे त्याचप्रमाणें हा पूर्ण चंद्र सहस्रदल कमलांतील श्रीचक्रांत विराजमान झालेला आहे. या पूर्ण चंद्रांतच आपली उपास्यदेवता श्रीललितामहात्रिपुरसुंदरी ही मंगलमय शिवततत्त्वाशीं समरस होऊन विहरत असते. याच वेळेला तिच्या चरणकमलाच्या स्पर्शानें स्पंदित झालेल्या चंद्रमंडलातून अमृताचा स्त्राव होत असतो व त्या अमृताने शरीरातील बहात्तर हजार नाड्यांचे व त्या नाड्यांबरोबर देहाचेंही परिपोषण होत असतें असा योग्यांचा व तांत्रिकांचा सिद्धान्त आहे.

श्रीचक्रांतील मूलभूत मध्यवर्ति असलेल्या त्रिकोणाच्या बाहेर जे आठ त्रिकोण असलेलें चक्र आहे, ज्याला "अष्टार" किंवा वसुकोण अथवा अष्टकोणचक्र म्हणतात, त्या चक्रांत आपल्या बाजूला अधोमुख असलेल्या त्रिकोणापासून उजवीकडून डावीकडे उलट्या क्रमाने प्रत्येक त्रिकोणांत मंत्रस्वरूप वाग्देवतांची बीजें स्थापन केलेली असतात. तीं क्रमाने र्ब्लूं, न्व्लीं, य्लूं, ज्र्मीं, ह्स्ल्व्यूं, झ्म्य्र्‌रूं, क्ष्म्रीं अशी आहेत. या अष्टारचक्राच्या आंत असलेल्या त्रिकोणांत आपल्या उपास्य देवतेचा पंचदशाक्षरी महामंत्रराज विराजमान झालेला आहे.

देवीभुजंगमस्तोत्रांतील सोळावा श्लोक पहा. या त्रिकोणांतही मध्यवर्ती असलेला बिंदू हा पूर्ण अर्थात् पोकळ स्वरूपाचा असून त्यामध्ये महामंत्रराजाच्या अंतिम बीजानें घटित असलेला "ॐ ईं ईं नमः" हा मंत्रच तादात्म्यभावाला प्राप्त झालेल्या शिवशक्तीच्या रूपाने विलसत आहे. उपासनाबलानें येथपर्यंत पोहचलेल्या साधकाच्या आनंदाला पारावार उरत नाहीं.

हें सर्व अंतर्गत व बहिर्गत श्रीचक्रसमाराधनेचें स्वरूप आणि फल लक्षांत घेऊन आचार्य या श्लोकाने वस्तुस्थितीनें श्रीललिता महात्रिपुरसुंदरीचें वर्णन करीत आहेत. आई जगज्जननी ! तुझे चरणकमल हें खरोखर अमृताचा वर्षाव करणारे आहेत. त्या अमृताच्या वृष्टीने तूं व्यष्टी आणि समष्टीच्या विश्वप्रपंचाचें सिंचन करतेस. "रसाम्नायमहसः" रसाम्नायमहस् शब्दाचा अर्थ चंद्र असा आहे. कारण तेथें रसाची - अमृताची पूर्ण अभिवृद्धि असते. आम्नाय शब्दाचा अर्थ जसा वेद आहे तसाच अभिवृद्धि असाही पण आहे. ज्याच्यामध्ये अमृताची पूर्ण अभिवृद्धि आहे असा 'महस्' म्हणजे तेजोमय अथवा कांतिरूप असलेला चंद्र, त्या चंद्रांतून अमृताचा वर्षाव होतो व त्या वृष्टीनें साधकाच्या सर्व नाड्यांचे व देहाचेंही पोषण होत असतें. हें सर्व कार्य कुंडलिनीच्या रूपाने चाललेले असतें. त्यानंतर पुन्हा ती त्रिपूरसुंदरी कुंडलिनीच्या रूपाने खालीं उतरते. पुन्हा पूर्ववत् ती आपल्या प्रदेशांत म्हणजे मूलाधारभूत चक्रावर आधारित होऊन स्वाधिष्ठानचक्रामध्यें एखाद्या सर्पाप्रमाणे साडेतीन वेटोळे घालून झोप घेत असते. ती तिची निदा आधारचक्राच्या मध्यभागी कुंडाप्रमाणे असलेल्या खळग्यांत तोंड घालून होत असते. त्याच ठिकाणी उगम पावणाऱ्या सुषुम्ना नाडीचाही मार्ग तिनें आपल्या मुखानें अवरुद्ध केलेला असतो. कु म्हणजे पृथ्वी तिचे लं इत्याकारक बीज तेथेंच लीन असतें. म्हणून आधारचक्राला कुल असें म्हटले आहे. त्या आधारचक्रांतला मध्यवर्ति भाग सखल असल्यामुळें त्याला कुलकुंड असे म्हणतात. त्या कुलकुंडांतही एक सूक्ष्म छिद्र आहे. त्यालाच आचार्यांनी कुहर असें म्हटले आहे. इडा आणि पिंगला यांच्यामध्ये असलेली सुषुम्ना नाडी येथूनच उगम पावत असते. निद्रिस्त असलेल्या सर्पाकार कुंडलिनीच्या मुखाने सुषुम्नेचें द्वार झाकलेले असतें. त्यामुळें प्राणवायुचा सुषुम्नेमध्यें प्रवेश होत नाहीं. जोपर्यंत सुषुम्ना नाडींत प्राणवायूचा प्रवेश होत नाहीं तोपर्यंत साधकाला अंतर्मुखता प्राप्त होत नाहीं. जोपर्यंत अंतर्मुखता नाहीं तोपर्यंत मनाला स्वास्थ्याचा लाभ होत नाहीं व जोपर्यंत स्वास्थ्याचा लाभ नाहीं तोपर्यंत समाधानही नाहीं. तात्पर्य समाधानासाठी स्वास्थ्य पाहिजे, स्वास्थ्यासाठी अंतर्मुखता पाहिजे, अंतर्मुखतेसाठी सुषुम्ना नाडीचे द्वार उघडले जाणें आवश्यक आहे व सुषुम्ना नाडीच्या द्वाराचें उद्‌घाटन होण्यासाठी कुंडलिनीची जागृति होणें आवश्यक आहे. ही कुंडलिनीची जागृति श्रीललितामहात्रिपुरसुंदरीच्या उपासनेने घडवून आणता येते. श्रीत्रिपुरसुंदरी ही कुंडलिनीस्वरूपच आहे. तेव्हां तिची उपासना हेंच तिच्या जागृतीचे उत्कृष्ट साधन आहे यांत संशय नाहीं. कांहीं लोक "कुहरिणि" हें श्रीललितामहात्रिपुरसुंदरीचेच विशेषण मानतात. कांहीं मानले तरी वर निर्दिष्ट केलेल्या अर्थाला बाध येत नाहीं. 





या यंत्रातील सहाही त्रिकोणांत ह्रीं बीज असल्याचें लक्षांत घ्यावें. हें यंत्र सोन्याच्या पत्र्यावर लिहून त्याची विधिपूर्वक सहा दिवस पूजा करावी. केळांचा नैवेद्य दाखवावा. रोज या श्लोकाचा एक हजार जप करावा. तांबड्या रेशमी दोऱ्यांत बाधून ते यंत्र धारण केल्यास शरीरातील तेजःस्वरूप शुक्र धातूची वृद्धि होते. षांढ्य जाते. हें सिद्ध यंत्र धारण केल्यास स्त्रियांच्या शरीरांतही रजःप्रवृत्ति निर्माण होते.

10 April, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक ९ वा

महीं मूलाधारे कमपि मणिपूरे हुतवहं
स्थितं स्वाधिष्ठाने हृदि मरुतमाकाशमुपरि ।
मनोऽपि भ्रूमध्ये सकलमपि भित्त्वा कुलपथं
सहस्रारे पद्मे सह रहसि पत्या विहरसे ॥ ९ ॥


"हे मातः त्वं मूलाधारे महीं, मणिपूरे कं, स्वाधिष्ठाने स्थित हुतवहं अपि, हदि मरुतं, उपरि आकाशं, भ्रूमध्ये मनः अपि (एवं) सकलं अपि कुलपथं भित्त्वा सहस्रारे पद्मे रहसि पत्या सह विहरसे ।" ( एतादृशीं त्वां ये ध्यायन्ति ते धन्याः) आई त्रिपुरसुंदरी ! मूलाधारचक्रांत पृथ्वीतत्त्वाला, मणिपूरचक्रांत जलतत्त्वाला, त्याचप्रमाणे स्वाधिष्ठानचक्रांत असलेल्या अग्नितत्त्वालाही भेदून तसेंच हृदयाजवळ असलेल्या अनाहतचक्रांतील वायुतत्त्वाला, त्याच्याही वर कंठस्थानी असलेल्या विशुद्धिचक्रांतील आकाशतत्त्वाला आणि भ्रूमध्यप्रदेशीं असलेल्या आज्ञाचकक्रांतील मनस्तत्त्वाला भेदून, अर्थाद सर्वच कुलपथाला म्हणजे मुलाधारादि षट्चक्रांना अथवा सुषुम्नामार्गाला भेदून मूर्धस्थानी असलेल्या सहस्रदल कमलामध्ये आपल्या परमशिवस्वरूप पतीसह तूं एकांतामध्यें विहार करतेस. तुझ्या या चिदानन्दस्वरूप अवस्थेचे जे कोणी ध्यान करतात, खरोखर ते धन्य होत. असा या श्लोकाचा अन्वयानुसारी सरळ अर्थ आहे.

आपलः संपूर्ण देहच श्रीललितामहात्रिपुरसुंदरीचें अधिष्ठान आहे. त्यांतही विशेषेंकरून या देहांत असलेल्या मुख्य मुख्य चक्रांत तिचे प्रामुख्यानें वास्तव्य आहे. त्यांतही मुलाधारादि सहा चक्रांच्याही वर मूर्धस्थानीं विराजमान असलेलें सहस्रदल कमल हें तर तिचे अत्यंत आवडतें स्थान आहे. या देहांत श्रीत्रिपुरसुंदरी ही कुंडलिनीच्या रूपाने वास्तव्य करीत असते. कुंडलिनी ही एक विशिष्ट प्रकारची शक्ति आहे. ती प्रसुप्त असते तेव्हां इंद्रिये ही विषयोन्मुख होतात व मन विषयानंदामध्यें गर्क होत असतें. ती कुंडलिनीशक्ति जेव्हां जागृत होते तेव्हां सर्व इंद्रिये अंतर्मुख होतात व बुद्धि ही स्वतःसिद्ध, नित्य आणि निरतिशय अशा निजानंदाचा अनुभव घेत असते. "नीवारशूकवत्तन्वी कुंडली परदेवता" देवभाताच्या कुसाचा शेंडा जसा अगदीं बारिक असतो त्याप्रमाणें कुंडलिनी ही अत्यंत सूक्ष्म असून ती एक श्रेष्ठ देवता आहे असें संमोहनतंत्रांत तिचे वर्णन केले आहे.

ही कुंडलिनी मूलाधारचक्राचा आधार घेऊन स्वाधिष्ठानचक्रावर अधिष्ठित झालेली आहे. तेथें तिचे साडेतीन वेटोळे असल्याचें वर्णन करतात. नागाचें पिले । कुंकुमें न्हाले । वळण देऊनि आले । सेजे जैसे ॥ तैसी ते कुंडलिनी । मोटका औटे वळणी । अधोमुख सर्पिणी निदेली असे ॥ ( ज्ञानेश्वरी ६-१२२-१२३) मूलाधारचक आणि स्वाधिष्ठानचक्र ही दोन्हीं चक्रें अगदीं जवळ जवळ आहेत. मुलाधारचक्र हें चार दलाच्या कमलाप्रमाणे आहे तर स्वाधिष्ठानचक्र हें सहा दले असलेल्या कमलाप्रमाणे आहे. मुलाधारचक्र हे देहाच्या अगदीं मूलस्थानी म्हणजे गुदस्थानाच्या सान्निध्यांत आहे, तर स्वाधिष्ठानचक्र हे त्याच्या किंचित् वर उपस्थेंद्रियाच्या सान्निध्यांत आहे. मूलाधारचक्र हें देहांतील सर्व चक्रांचे आणि कुंडलिनीचेंही मुळ आधारभूत चक्र असल्यामुळें त्याला मूलाधार हें यथार्थ नांव आहे. त्याचप्रमाणे स्वाधिष्ठानचक्र याच्यांतील स्व शब्दाचा अर्थ कुंडलिनीच असल्यामुळे व तिचे तें चक्र अधिष्ठान म्हणजे वसतिस्थान असल्यामुळें त्या चक्रालाही स्वाधिष्ठानचक्र असें यथार्थ नांव मिळाले आहे. या दोन्ही चक्रांत वास्तव्य करणारी कुंडलिनी ही या प्रस्तुत सौंदर्यलहरीस्तोत्राची अधिष्ठात्री देवताच होय.

ललितासहस्रनामामध्यें "कुण्डलिनी" हें एक त्रिपुरसुंदरीचे नांव आहेच. " महासक्तिः कुण्डलिनी बिसतन्तुतनीयसी" कमळांतील तंतूप्रमाणें अत्यंत सूक्ष्म व गौरवर्ण असलेली ही कुण्डलिनी "महासक्ति" म्हणजे सर्वश्रेष्ठ सहस्रदल कमलामध्यें अत्यंत तेजस्वी असलेल्या चंद्रमंडलात शिवस्वरूपाशी समरस होऊन रहाण्याची तिला मोठी आवड आहे. अशी ती आहे म्हणूनच ती शरीरातील षट्चक्रांचे उल्लंघन करून सहस्रदल कमलामध्यें असलेल्या अमृतमंडलांत सचिदानंद परब्रह्मस्वरूप असलेल्या श्रीसदाशिवतत्त्वाशीं समरस होऊन रहाते म्हणून तिला "महासक्ति" म्हणतात. याच अभिप्रायानें कुण्डलिनीस्वरूप श्रीत्रिपुरसुंदरीला "चिच्छक्तिश्चेतनारूपा" आणि "चिदेकरसरूपिणी " अशीही नांवे दिलेली आहेत. सहस्रदल कमल हें साही चक्रांच्या वर असल्यामुळें  "षट्चक्रोपरि संस्थिता " असेही तिला म्हटले आहे.

"मूलाधाराम्बुजारूढा" "स्वाधिष्ठानांबुजगता" " मणिपूराब्जनिलया "  "अनाहताब्जनिलया" "विशुद्धिचक्रनिलया" "आज्ञाचक्राब्जनिलया" "सहसदलपद्मस्था" अशी श्रीललितामहात्रिपुरसुंदरीची ललितासहस्रनामांमध्यें नांवे आहेत. या नावांवरून ती शरीरातील सर्वच चक्रांची अधिष्ठात्री असल्याचे स्पष्टच दिसत आहे. या सर्व चक्रांत अधिष्ठित होऊन ती त्या त्या चक्रातील बीजांना, भूततत्त्वांना व देवतांना कार्यप्रवण करीत असते. ती जीवचैतन्याच्या रूपाने सर्व देहालाच जीवन देत असते. म्हणूनच तिला "प्राणदा प्राणरूपिणी" अथवा जीवा, जीवभूता असेही म्हटलें जातें. तंत्रसारग्रंथांतही मुलाधारचक्राच्या ठिकाणी इष्ट देवतास्वरूप कुंडलिनीचे एकाग्र मनाने ध्यान केंले असतां सर्व अशुभांचा निरास होतो असें सांगितले आहे. "ध्यायेत्कुण्डलिनी सूक्ष्मां मुलाधारनिवासिनीम् । तामिष्टदेवतारूपां सार्धत्रिवलयान्विताम् ॥ अशेषाशुभशान्त्यर्थं समाहितमनाश्चिरम्" मुलाधारचक्राप्रमाणेंच इतरही चक्रांत कुंडलिनीरूप त्रिपुरसुंदरीचे ध्यान केलें असतां निरनिराळी फलें प्राप्त होतात असेही सांगितलेले आहे. मूलाधारचक्र हें पृथ्वी तत्त्वाचें असल्यामुळें पृथ्वीचा धारकत्व हा गुण त्याच्यामध्ये आहे. धरा, धरित्री, धरणी अशी पृथ्वीची नावें आहेत. देहाला धारण करणारे पृथ्वीतत्त्व हें मुलाधारचक्रांत नसतें तर हा देह खाली तरी पडला असता अथवा आकाशांत तरी उडून गेला असता असे रुद्ररहस्यात म्हटलेले आहे. " सर्वाधारा मही यस्मात्, मूलाधारतया स्थिता । तदभावे तु देहस्य पातः स्यादुद्‌ग‍मोऽपि वा ॥"

स्वाधिष्ठानचक्र हें अग्नितत्त्वाचे आहे. अग्नि हा सर्व शक्तींचे मूळ आहे. अग्नीमुळेंच देहामध्ये सर्व प्रकारची शक्ति नांदत असते. "अग्निमुलं बलं पुंसाम्" हा सिद्धान्तच आहे. कांही लोक स्वाधिष्ठानचक्र हें जलतत्त्वाचे असून मणिपूरचक्र हें अग्नितत्त्वाचे आहे असे म्हणतात. तें कांहीं असो. आपली कुंडलिनीशक्ति ही ब्रह्मरन्ध्रांतील चंद्रमंडलाकडे जाण्यास उत्सुक झाली म्हणजे क्रमशः ती सर्व चक्रांचे उल्लंघन करीत असते. यालाच योगशास्त्रांत षट्चक्रभेदन असें म्हणतात.

माणिपूरचक्र हें दहा दलांच्या कमळासारखें आहे. मृलाधारचक्रांतील चार दलांत वं, शं, षं आणि सं अशी बीजे आहेत तर स्वाधिष्टानचक्रांतील सहा दलांत बं भं मं यं रं आणि लं अशी सहा बीजे आहेत. त्याचप्रमाणे मणिपूरचक्राच्या दहा दलांत ड-पासून फ-पर्यंतची अक्षरे बीजरूपाने रहातात. अक्षरे ही अनुस्वारयुक्त झाली कीं, त्यांना बीजांचे स्वरूप येते. मणिपूरचक्राच्या वर हृदयाच्या शेजारी असलेल्या चक्राला अनाहतचक्र असें म्हणतात. विविध प्रकारच्या अनाहत नादांना अभिव्यक्त होण्याची अवस्था याच चक्रांत प्राप्त होत असल्यामुळें या चक्राला अनाहतचक्र असें म्हटलें जातें. या चक्राला बारा पाकळ्या असून त्यांत कपातून ठ-पर्यतचीं बारा अक्षरे बीजरूपानें वसलेली आहेत. हे चक्र वायुतत्त्वाचे मानले जातें. या तत्त्वाचा भेद करून कुंडलिनीशक्तिस्वरूप श्रीमहात्रिपुरसुंदरी वर जाते तेव्हां ती विशुद्धिचक्रांत येते. विशुद्धिचक्र हे कंठस्थानीं आहे. हें आकाशतत्त्वाचे चक्र असल्यामुळें व आकाश हें स्वभावतःच अत्यंत शुद्ध, निर्मल असल्यामुळें अथवा शुद्ध स्फटिकाप्रमाणे त्याचा वर्ण स्वच्छ असल्यामुळें या चक्राला विशुद्धिचक्र असें म्हटले जातें. या चक्राला सोळा पाकळ्या असून त्यांत क्रमशः अ-पासून अः-पर्यत सोळा स्वर विराजमान झालेले आहेत. येथूनच अक्षरप्रपंचाला मूर्त स्वरूप येतें व पुढें तीं अक्षरे स्थानभेदानें कंठ, तालव्य इत्यादि शब्दांनी व्यवहारिलीं जातात.

विशुद्धिचक्राचा भेद करून कुंडलिनी वर गेली की, ती आज्ञाचक्रांत प्रवेश करते. आज्ञाचक्र हें दोन भुवयांच्या मध्ये असून याला दोनच पाकळ्या आहेत. या दोन पाकळ्यांत हं आणि क्षं ही दोन बीजे विराजत आहेत. साधकाला याच चक्राच्या आधारे आपल्या उपास्यदेवतेचा, श्रीमहात्रिपुरसुंदरीचा थोडासा साक्षात्कार होत असतो. आ म्हणजे थोडे आणि ज्ञा म्हणजे ज्ञान. अथवा श्रीत्रिपुरसुंदरी ही फारच थोडा काळ या चक्रांत विद्युलेखेप्रमाणें प्रतीतीला येते म्हणूनही या चक्राला आज्ञाचक्र असें म्हटलें जाते. मन हे या चक्राचें तत्त्व होय. या ठिकाणी मन या शब्दाने पंचज्ञानेंद्रिये आणि पंचकर्मेंद्रिये यांचाही अंतर्भाव विवक्षित आहेच. त्याचप्रमाणें पंचमहाभूतांनी पंचतन्मात्राही घेतल्या जातात. षट्चक्रांचे भेदन करतांना या एकवीस तत्त्वांचाही भेद होतोच. अर्थात् ही एकवीस तत्त्वें साधकाच्या अधीन होतात. त्यावर नियंत्रण ठेवण्याची साधकाला शक्ति प्राप्त होत असते. पुढें श्रीत्रिपुरसुंदरी सहस्रदल कमलांत प्रवेश करते तेव्हां ती माया, शुद्धविद्या, महेश्वर आणि सदाशिव या तत्त्वांशी संपृक्त होते. मायाविशिष्ट महेश्वर हा जीवभावाला प्राप्त होत असतो, तर शुद्धविद्याविशिष्ट सदाशिव हा परमशिवपदाला प्राप्त होत असतो. या परमशिवपदालाच शास्त्रांत सादाख्यकला असें म्हटले आहे. याच सहस्रदल कमलांत विलसत असलेल्या चंद्रमंडलांत आपली उपास्यदेवता श्रीमहात्रिपुरसुंदरी ही परमशिवतत्त्वाशीं समरस होऊन विहार करीत असते. अर्थात् एकरूप होऊन रहाते. तें शिवशक्तींचें ऐक्य एकमेव, अद्वितीय, परिपूर्ण, परब्रह्मस्वरूपच आहे.

आपल्या देहांत असलेल्या मुलाधारादि चक्रांपेक्षां मूर्धस्थानी असलेलें सहस्रदल कमल हें अत्यंत श्रेष्ठ होय. म्हणूनच या कमलाला चक्रराज असें म्हटलें जातें. हेंच आपल्या त्रिपुरसुंदरीचें निकेतन म्हणजे निवासस्थान असल्यामुळें याही अभिप्रायाने श्रीत्रिपुरसुंदरीला "चक्रराजनिकेतना" असें म्हटलेले आहे. परस्पर तादात्म्यभावाला प्राप्त झालेलें शिवतत्त्व आणि शक्तितत्त्व ही परस्परांच्या तपश्चर्येचीं जणुं मूर्तिमंत फळेंच होत. असे है सदासर्वकाळ पुरातनच असलेले विश्वप्रपंचाचे माता आणि पिता यांना आमचा नमस्कार असो. आम्ही भक्तिभावाने त्यांची स्तुति करीत आहोंत "परस्परतपःसंपत्फलायितपरस्परौ । प्रपञ्चमातापितरौ प्राञ्चौ जायापती स्तुमः" असें एका भक्ताने या शिवशक्तीचे वर्णन केलेले आहे तें अत्यंत योग्य आहे.

या श्लोकांतील "कुलपथ" या शब्दाचा अर्थ कांहीं विद्वान सुषुम्णामार्ग असा करतात, तर कांहीं विद्वान् षट्चक्रें असाही करतात. तात्पर्य, देहामध्यें कुंडलिनीच्या रूपानें विराजमान असलेली श्रीत्रिपुरसुंदरी ही सुषुम्णामार्गाने षट्चक्रांचा भेद करून साधकाच्या उपासनाबलानें ज्या वेळेला सहस्रदल कमलांत प्रवेश करते आणि तेथें असलेल्या चंद्रमंडलांत सच्चिदानंदरूप परमशिवतत्त्वाशीं समरस होते त्या वेळेला तिचा तो आपल्या परमप्रिय शिवतत्त्वस्वरूप पतीबरोबर "रहसि" म्हणजे एकान्तांत होणारा सामरस्य विहार ही तिची नित्यनिरतिशय आनंदरूप अवस्था होय. ही अवस्था लक्षांत घेऊनच तिला "सच्चिदानन्दरूपिणी" असें नांव दिलेले आहे. या अवस्थेंत जे भक्त तिचे चिंतन करतात ते खरोखर धन्य होत.

आसनें, प्राणायाम, धारणा आणि ध्यान या क्रियांनी शरीरातील वर सांगितलेल्या षट्चक्रांचा भेद करतां येतो. योगमार्गांतील मुलबंध, ओड्याणबंध आणि जालंधरबंध, त्याचप्रमाणे कांहीं मुद्रा यांचाही षट्चक्रभेदनाला उपयोग होतो. मुलाधारादि चक्रांच्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या इष्ट देवतेच्या उपासनेनेंही षट्चक्रांचा भेद घडवून आणता येतो. त्या त्या चक्रांतील बीजे, अधिष्ठात्री देवता आणि पृथ्वी, जल इत्यादि भूततत्त्वें यांचें चिंतन करीत श्रीललितामहात्रिपुरसुंदरीची त्या त्या चक्रांत जर उपासना केली तर कुंडलीस्वरूप असलेली भक्तकामकल्पद्रुम श्रीमहात्रिपुरसुंदरी ही स्वयंजागृत होऊन साधकाच्या षट्चक्रांचे भेदन करीत करीत सकलतत्त्वातीत असलेल्या सहस्रदलकमलांतील निष्कलंक आणि सर्व कलांनी पूर्ण अशा चंद्रमंडलात जेव्हां परमशिवतत्त्वाशीं विहार करते तेव्हां उपासनाबलानें तिच्या स्वरूपाशी तादात्म्य पावलेलें साधकांचे मनही त्या अद्वितीय आनंदाचा अनुभव घेत असते. असा हा अर्धनरनटेश्वरी असलेल्या श्रीत्रिपुरसुंदरीच्या उपासनेचा प्रभाव आहे.

मुलाधारचक्रात पृथ्वीतत्त्वाचा भेद झाल्यानंतर साधकाचे शरीर पृथ्वीचा आधार घेतल्यावांचूनही इतस्ततः संचार करूं शकते. वह्नितत्त्वाचा भेद केल्यानंतर त्याला अग्नि शीतल होतो. जलतत्त्वाचा भेद केल्यानंतर पाणी त्याला बुडवू शकत नाही. अनाहतचक्रांत वायुतत्त्वाचा भेद केल्यानंतर साधक वायुगतीनें संचार करूं शकतो. श्रीसदाशिवेंद्रसरस्वती, श्रीवासुदेवानंदसरस्वती इत्यादि सिद्ध सत्पुरुषांच्या चरित्रांत ह्या गोष्टी पहावयास सांपडतात. आकाशतत्त्वाचा भेद केल्यानंतर साधक आकाशगामी होतो. मनस्तत्त्वाचा भेद केल्यानंतर तो मनोगतीने त्रैलोक्यामध्ये संचार करतो. सहस्रदल कमलांतील विहार हा अनिर्वचनीय आनंदस्वरूप असल्यामुळें सर्व सिद्धींची तेथें परिसमाप्ति होते. "सा काष्ठा सा परागतिः" आई ! तुझ्या कृपेने ही अवस्था ज्यांना लाभली खरोखर ते मोठे धन्य होत असें 'रहस्यसिद्धिसोपान' या ग्रंथांत मोठे सुंदर वर्णन केलेले आहे.
 



वरील यंत्र सोन्याच्या पत्र्यावर काढून दहा दिवस त्याची रोज विधिपूर्वक पूजा करावी. आटीव दुधाचा अथवा पायसाचा नैवेद्य दाखवावा. रोज एक हजार वेळां श्लोकाचा जप करावा. देशांतरीं गेलेला माणूस लौकर परत येईल. याच यंत्राला केशर, कस्तूरी, चंदन इत्यादि सुगंधी द्रव्यांनी लेप करून ४५ दिवस वरच्याप्रमाणे आराधना केल्यास साधकाला पंचमहाभूतांवर विजय संपादन करतां येईल.