23 April, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक २२ वा

भवानि त्वं दासे मयि वितर दृष्टिं सकरुणा-
मिति स्तोतुं वाञ्छन् कथयति भवानि त्वमिति यः ।
तदैव त्वं तस्मै दिशसि निजसायुज्य-पदवीं
मुकुन्द-ब्रह्मेन्द्र-स्फुट-मकुटनी-राजित-पदाम् ॥ २२॥


आई त्रिपुरसुंदरी ! भवानी हें त्रिपुरसुंदरीचेंच नांव आहे. "भवानी भावनागम्या भवारण्यकुठारिका ।" असें सहस्रनामांत तिचे वर्णन केले आहे. खरोखरच तूं अत्यंत उदार आहेस. तुझ्या ध्यानाने त्रिविध पुरुषार्थाचा लाभ होईल यांत नवल काय आहे ? तुझी केवळ करुणा भाकण्याला आरंभ केला तरी देखील तूं त्याला परम पुरुषार्थाचा लाभ करून देतेस ! धन्य आहेस तूं. अशा अभिप्रायानें आचार्य स्तुति करीत आहेत. "हे भवानि त्वं दासे मयि सकरुणां दृष्टिं वितर" आईभवानी ! मी तुझा दास आहें. तूं माझ्यावर आपली करुणायुक्त दृष्टि टाक. तूं माझ्याकडे कृपापूर्ण दृष्टीने पहा. याप्रमाणे तुझी स्तुति करण्याची मनांत इच्छा ठेवून वाक्य उच्चारावयास जो कोणी आरंभ करतो, तो "भवानि त्वं" एवढी अक्षरे उच्चारतांक्षणींच "त्वं तस्मै निजसायुज्य-पदवीं दिशसि " तूं त्याला आपलें सायुज्यपदही देतेस ! ! कशी आहे तुझी सायुज्यपदवी ? असें कोणी विचारील तर सांगतो. "मुकुन्दब्रह्मेन्द्र-स्फुट-मकुट-नीराजित पदं" मुकुंद म्हणजे विष्णु, तसेंच ब्रह्मदेव आणि इंद्र इत्यादि देवही रत्नजडित मुकुट घालून तुझ्या चरणी नम्र होत असतांना जणुं कांहीं ते आपल्या मुकुटांनी स्पष्टपणे तुझ्या चरणकमलांना नीरांजनांनीं ओवाळींत आहेत असें वाटतें. तात्पर्य, ब्रह्मा, विष्णु, महेश, इंद्र, वरुण, कुबेर इत्यादि बडेबडे देवही तुझ्या चरणारविंदीं नम्र होऊन प्रणाम करीत आहेत. यावरून तुझ्या सायुज्यपदाचा महिमा लक्षांत घ्यावा.

या श्लोकांतील गूढ अभिप्राय असा आहे कीं, भवानि त्वं इत्यादि अन्वय वाक्यांतील भवानि हे पद संबोधन आहे. "हे आई भवानी ! तूं" अशा अभिप्रायानें स्तुतिवाक्याला आरंभ करीत असतांनाच "त्वं भवानि" आई तूंच मी व्हावें. भू-धातूचें आज्ञार्थी प्रथम पुरुषाचे एकवचन. अशा अभिप्रायाने जणुं कांहीं तो स्तुति करण्यास प्रवृत्त झालेला, तुझी अहंग्रहोपासनाच करीत आहे, असें समजून तूं त्याला सत्वर उत्तम फल देतेस. जप, होम इत्यादि साधनांपेक्षां अहंग्रहोपासनेनें फलप्राप्ति सत्त्वर होते. "अहं ब्रह्मास्मि" "अयमात्मा ब्रह्म" या महावाक्याप्रमाणेंच तो "तूं मी व्हावें" मी त्वत्स्वरूप व्हावें अशा तादात्म्य चिंतनाचेंही फल अनपेक्षित रीतीनें तुझ्याकडून त्याला प्राप्त होतें ! आई ! असा हा तुझा नाममहिमा आहे. कोणत्याही मिषाने का होईना तें मुखी आलें तरी कृतार्थता प्राप्त होते. "विक्रुश्य पुत्रमघवान् यदजामिलोऽपि नारायणेति स्त्रियमाण इयाय मुक्तिम्" (भागवत). पापी अजामिल मुलाला हाक मारण्याच्या मिषाने नारायण नारायण म्हणतांच कृतार्थ झाला. याच न्यायाने तुझ्या नाम संकीर्तनानेंही सायुज्यमुक्तीचा लाभ होतो मग इतर फलांची कथा काय ? सायुज्य म्हणजे तादात्म्य. जेथे सायुज्यमुक्तीचा लाभ झाला तेथें सालोक्य सारूप्य आणि सामीप्य प्राप्त होईल हें काय सांगावयास पाहिजे ? तें तर कैमुतिकन्यायानेंच सिद्ध होत आहे ! मागील सात श्लोकांनी ध्यानाचा महिमा सांगितला, तर या श्वोकाने नामाचाही महिमा वर्णिला आहे हें लक्षांत घ्यावे.

सायुज्यपदवी म्हणजे मोक्षाचा मार्ग अथवा मोक्षाची अवस्था. पदवी शब्दाचा अर्थ पद किंवा स्थान असाही आहे. सायुज्य पदवी म्हणजे मोक्षपद, परमात्मपद अथवा ब्रह्मपद. यालाच मुक्ति असें म्हणतात. ही मुक्ति चार प्रकारची मानलेली आहे. सालोक्य, सामीप्य, सारूप्य आणि सायुज्य अशी त्यांची नावे आहेत. उपासनेनें इष्टदैवतेच्या लोकाचा लाभ होणें याला सालोक्य म्हणतात. वैकुंठ लोक, कैलास लोक, गोलोक इत्यादि विविध लोक प्रसिद्ध आहेत. आनंद हें मोक्षाचे स्वरूप आहे. इष्टदेवतेचा लोक प्राप्त झाल्यानंतर साधकाच्या चित्ताला एक प्रकारचा अनिर्वचनीय आनंद होत असतो. म्हणून या अवस्थेला सालोक्यमुक्ति असें म्हणतात. इष्टदेवतेचा लोक प्राप्त झाल्यानंतर आपल्याला इष्टदेवतेचें सान्निध्य लाभते. इष्टदेवतेच्या सान्निध्याने साधकाचा आनंद पूर्वीपेक्षा अधिकच वाढतो. या अवस्थेला सामीप्यमुक्ति असे म्हणतात.

इष्टदेवतेच्या सान्निध्याचा लाभ झाल्यानंतर साधकाला इष्टदेवतेचें रूप प्राप्त होत असतें. असिस्टंट कलेक्टर किंवा पर्सनल सेस्टेरी झाला म्हणजे आपण मोठ्या पदाला चढल्याचे समाधान वाटत असतें. इष्टदेवतेचें रूप प्राप्त झाल्यानंतर असाच एकप्रकारचा अनिर्वचनीय आनंद वाढलेला असतो. या अवस्थेला सारूप्यमुक्ति असें म्हणतात. सारूप्यामुळें इष्टदेवता आणि त्या देवतेचा उपासक यांच्यांत भेद असतोच. भेद आहे तोंपर्यंत अपूर्णतेची जाणीव होतच असते. अपूर्णतेच्या जाणिवेने सुखांत न्यूनता येते. ती न्यूनता साधक हा आपल्या इष्टदेवतेशीं जेव्हां तादात्म्य पावतो तेव्हांच नाहीशी होत असते. इष्टदेवता ही तत्त्वतः सत्, चित् आणि आनंदस्वरूप असल्यामुळें इष्टदेवतेशीं तादात्म्य पावलेला साधकही सत् चित् आनंदस्वरूप होत असतो. याच अवस्थेला सायुज्यपदवी असें म्हणतात. ही पदवी ब्रह्मस्वरूपच असल्यामुळें हिला ब्रह्मपद असेही म्हणतात. मोक्षाचेही हेंच स्वरूप असल्यामुळें याला मोक्षपद असेही म्हणतात.

मोक्षाच्या स्वरूपाविषयी तत्त्ववेत्त्यांत अनेक मतभेद आहेत. मरण म्हणजेच मोक्ष असें चार्वाक म्हणतो. त्याची धाव याच्या पलीकडे गेलीच नाहीं.

नित्य ऊर्ध्वगमन म्हणते महाकाशांत वरवर जाणे हेंच मोक्षाचे स्वरूप होय असें जैन म्हणतात. निर्विषय, शुद्ध, क्षणिक, विज्ञानपरंपरेचा सतत अनुभव येत रहाणे म्हणजेच मोक्ष असें बौद्धांचे मत आहे. कायमचा दुःखांचा नाश होणें यालाच मोक्ष म्हणतात असें तार्किकांचे म्हणणें आहे. आदि विद्वान् सिद्धपुरुष असा जो ईश्वर त्याच्या नित्ययोग-शक्तीचा साक्षात्कार होऊन अनिर्वचनीय व नित्य आनंदाचा लाभ होणें म्हणजेच मोक्ष असें योगतत्त्ववेत्त्यांचें मत आहे. तर त्रिगुणात्मक मुलप्रकृति आणि चेतनपुरुष यांच्या पार्थक्याचा वास्तव भूमिकेवरून साक्षात्कार होणे म्हणजे मोक्ष होय, असें सांख्य तत्त्ववेत्त्यांचे म्हणणें आहे. नित्य आणि निरतिशय सुखाची अभिव्यक्ति होणें म्हणजेच मोक्ष असें मीमांसक म्हणतात, तर अविद्येची - अज्ञानाची निवृत्ति होणें म्हणजेच मोक्ष होय, असेही कांहीं वेदांती म्हणतात. "कर्मणामात्मलाभान्न परं विद्यते" सर्व कर्मांचे अंतिम फल म्हणजे आत्मलाभ. त्यालाच मोक्ष असें म्हणतात, असें आपस्तंबांचें म्हणणें आहे. सच्चिदानंदस्वरूप असलेल्या आपल्या उपास्यदेवतेशीं पूर्ण तादात्म्य प्राप्त होणे म्हणजेच मोक्ष होय, असा उपासनाशास्त्राचा सिद्धान्त आहे. प्रकृतस्थलीं परस्पर अभिन्न, एकरूप असलेल्या शिव-शक्तिस्वरूप इष्टदेवतेशीं पूर्ण तादात्म्य प्राप्त होणें हेंच मोक्षाचे स्वरूप असून यालाच प्रकृतस्थलीं सायुज्यपदवी असें म्हटलेले आहे. आई ! अनन्यचित्तानें तुझें नांव घेताक्षणीच तूं आपल्या भक्ताला सायुज्यमुक्तीचा लाभ करून देतेस ! धन्य आहे तुझें औदार्य.

वरील यंत्र हे श्रीयंत्र. सोन्याच्या पत्र्यावर काढून त्याची एखाद्या तीर्थक्षेत्रांत अथवा देवीच्या मंदिरांत रोज पंचेचाळीस दिवस विधिवत् पूजा करावी. गुळ, नारळ, केळे, दही, दूध, मध आणि खिचडीचा नैवेद्य दाखवावा. रोज एक हजार वेळां या श्लोकाचा जप करावा. याने ऐहिक सर्व कामना पूर्ण होतील. ऐश्वर्यप्राप्ति व साम्राज्यलाभही होईल.

No comments: