18 November, 2010

सौन्दर्यलहरी श्लोक ३४ वा

शरीरं त्वं शम्भोः शशि-मिहिर-वक्षोरुह-युगं
तवात्मानं मन्ये भगवति नवात्मानमनघम् ।
अतः शेषः शेषीत्ययमुभय-साधारणतया
स्थितः सम्बन्धो वां समरस-परानन्द-परयोः ॥ ३४॥


"हे भगवति त्वं सम्भोः शशिमिहिरवक्षोरुहयुगं शरीरं असि, अहं तव आत्मानं अनघं नवात्मानं मन्ये; अतः समरसपरानन्दपरयोः वां शेषः शेषी इति अयं सम्बन्धः उभयसारणतया स्थितः अस्ति." भगवती हें त्रिपुरसुंदरीचें विशेषण आहे. समग्र ऐश्वर्य समग्र धर्म, समग्र यश, समग्र श्री, पूर्ण ज्ञान आणि पूर्ण वैराग्य या सहांच्या समुच्चयाला भग असे म्हणतात. या सहांचा समुच्चय जेथे पूर्णत्वानें विराजतो त्या व्यक्तीला भगवान किंवा भगवती असें म्हणतात. अथवा सर्व विश्वाची उत्पत्ति, प्रलय, प्राणिमात्रांची उत्पत्ति कोठून व कशी होते, सर्व प्राण्यांचा शेवट कसा व कोठे होतो, विद्या म्हणजे काय आणि अविद्या म्हणजे काय, हें सर्व साकल्याने जो जाणतो त्याला भगवान् असें म्हणतात. त्या देवतेला भगवती असें म्हणतात. " ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशसः श्रियः । ज्ञानवैराग्ययोश्चैव षण्णा भग इतीङ्‍गना ॥" "उत्पत्तिं प्रलयं चैव भूतानामागतिं गतिम् । वेत्ति विद्यामविद्यां च स वाच्यो भगवानिति ॥" अशा या भग आणि भगवान या शब्दांच्या दोन व्याख्या प्रसिद्धच आहेत. श्रीमहात्रिपुरसुंदरीच्या ठिकाणी या दोन्ही व्याख्या पूर्णपणें सार्थ होत असल्यामुळें तिला भगवती हें विशेषण दिलेले आहे तें सर्वस्वी योग्य आहे. हे सर्वैश्वर्यादिगुणसंपन्न माते जगज्जननी ! तूं भगवान् शंकर यांचेंच शरीर म्हणजे मूर्तस्वरूप आहेस. या शिवशक्तीच्या मूर्तस्वरूपांत सूर्य आणि चंद्र हे स्तनाप्रमाणें शोभत आहेत. शशी म्हणजे चंद्र आणि मिहिर म्हणजे सूर्य. आई ! शिवस्वरूपाशीं समरस झालेला तुझा देह "अनघ" म्हणजे अत्यंत शुद्ध, निर्दोष असून तो जेव्हां पहावे तेव्हां "नवात्मा" म्हणजे नव्या स्वरूपाचाच दिसत असतो. तारुण्याच्या तेजाने तो मुसमुसत असतो. आई जगज्जननी ! तुझ्याशी समरस झालेले परानंद म्हणजे भगवान् शंकर आणि त्यांच्याशी समरस झालेली "परा" म्हणजे परात्पर शक्तिस्वरूप तूं, या तुम्हां दोघांभध्यें परस्परांशी परस्परांचे एवढें तादात्म्य आहे कीं, त्यामुळें तुमचा तो तादात्म्यसंबंध तुम्हां दोघांकडेही सारखाच दिसतो. तुमच्या तादात्म्यांत अणुमात्रही भेद दिसत नसल्यामुळे तुम्हां दोघांमध्ये कोण मुख्य आणि कोण गौण, कोण प्रधान आणि कोण अंग हें कळतच नाहीं. एकदा भगवान् शंकर प्रधान आहेत तर तूं अंगभूत म्हणजे गौण आहेस. एकदा तूं मुख्य आहेस तर भगवान् सदाशिव हे अंगभूत आहेत. असे हे तुझें स्वरूप मोठे अनिर्वचनीय आहे.

या लोकांमध्यें "नवात्मानं" या शब्दांत श्लेष आहे. एकाच शब्दांत अनेक अर्थ विवक्षित असणें याला श्लेष असें म्हणतात. काव्यशास्त्रांत हा एक अलंकार मानला जातो. नवात्मा याचा एक अर्थ आपण वर पाहिलाच आहे. आतां दुसरा अर्थ आपण पाहूं. नवात्मा या शब्दांतील नव शब्द नऊ या संख्येचा वाचक आहे. आत्मा म्हणजे स्वरूप. ज्याचे स्वरूप नऊ संख्येने विभागलें गेले आहे तो नवात्मा. नवात्मा म्हणजे भगवात् सदाशिव. ज्यांचा निर्देश पहिल्या चरणांत शंभु या शब्दाने केलेला आहे. त्यांनाच महाभैरव अथवा आनंदभरव असें म्हणतात. या आनंदभैरवालाच नवात्मा असेंही तंत्रशास्त्रांत म्हटलेले आहे. कारण तंत्रशास्त्रांत आनंदभैरवाची नऊ रूपे मानलेली आहेत. " कालव्यूहः कुलव्यूहो नामव्यूहस्तथैव च । ज्ञानव्यूहस्तथा चित्तव्यूह स्यात्तदनन्तरम् । नादव्यूहस्तथा बिन्दुव्यूहः स्यात्तदननरम् । कलाव्यूहस्तथा जीवव्यूहः स्यादिति ते नव ॥" व्यूह शब्दाचा अर्थ शरीर किंवा मूर्ति असा आहे. कालव्यूह, कुलव्यूह, नामव्यूह, ज्ञानव्यूह, चित्तव्यूह, नादव्यूह, बिंदुव्यूह, 'कलाव्यूह आणि जीवव्यूह, अशीं महाभैरवाची नऊ रूपे आहेत.

कालव्यूह म्हणजे चंद्र, सूर्य आणि त्यांच्या निमित्ताने होणारे कालखंड. क्षण, लव, घटका, मुहूर्त, दिन, पक्ष, मास, ऋतु, अयन आणि संवत्सर यांपासून कल्पान्तकालापर्यंतचा सर्व काल महाभैरवाचेंच स्वरूप होय. नामव्यूहः म्हणजे ताजे संज्ञास्कंध. व्यूहालाच स्कंध असा पर्याय आहे. संज्ञास्कंध म्हणजे पदार्थांची सामान्यनामें आणि विशेषनामें. हेंही एक भैरवाचेच रूप आहे. ज्ञानव्यूह म्हणजे विज्ञानस्कंध. सविकल्पक ज्ञान, निर्विकल्पक ज्ञान इत्यादि सर्व ज्ञानांचे प्रकार यांत अंतर्भूत होतात. हेंही आनंदभैरवाचेंच रूप होय. चित्तव्यूहामध्यें मन, बुद्धि, चित्त, अहंकार आणि महत्तत्व यांचा अंतर्भाव होतो. नादव्यूहामध्ये परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरीरूप, संपूर्ण अक्षरराशि अंतर्भूत होतो. बिंदुव्यूह म्हणजे षट्चक्रांचा समुदाय. कलाव्यूह म्हणजे मूळ मातृकासमूह अर्थात् अ पासून क्ष पर्यंतचे सर्व वर्ण. जीवव्यूह म्हणजे सुखदुःखांचे भोक्ते जीवात्मे. हे नऊही व्यूह आनंदभैरवाचेच देह मानले जातात. नामरूपात्मक, विश्वप्रपंच या नऊ व्यूहांचाच असल्यामुळें संपूर्ण विश्व हें आनंदभैरव भगवान् सदाशिव यांचाच देह होय ही गोष्ट सिद्ध झाली. याच अभिप्रायाने शंकरांना "नवात्मा" असें म्हटलेले आहे. जसे भगवान शंकर नवात्मा आहेत त्याचप्रमाणे भगवती त्रिपुरसुंदरी ही देखील नवात्माच आहे. पस्तिसाव्या श्लोकांत हा सिद्धान्त स्पष्टच मांडला आहे. श्रीचक्र हें नव- खंडात्मक आहे हें आपण पूर्वी पाहिलेच आहे. त्रिपुरसुंदरी ही श्रीचक्रस्वरूप आहे म्हणून तीही ही नवात्मा झालीच. संपूर्ण वर्णसमूह हें त्रिपुरसुंदरीचेच रूप आहे. तोही नऊ खंडांनी विभागला जातो. अवर्ग, कवर्ग, चवर्ग, टवर्ग, तवर्ग, पवर्ग, यवर्ग, शवर्ग आणि या सर्वांच्या मूर्धस्थानी मेरूप्रमाणें असलेला क्ष असे हे वर्णराशीचे नऊ विभाग आहेत. याही अभिप्रायानें त्रिपुरसुंदरीला नवात्मा असें म्हटलें जातें इत्यादि पुष्कळ सूक्ष्म विचार नवात्मा या शब्दांत अंतर्भूत आहे.

तात्पर्य, भगवान् शंकर हे जसे नवात्मा आहेत तसेंच त्रिपुरसुंदरीही नवात्मा आहे. याच अभिप्रायाने शंकर शंकरी, भैरव भैरवी, महाभैरव महाभैरवी, आनंदभैरव आनंदभैरवी इत्यादि नामसादृश्यही या दोघांमध्ये असल्याचें दृष्टीस पडते. अशा रीतीनें नामदृष्ट्या आणि रूपदृष्ट्या एकमेकांशी पूर्णपणे समरस असल्यामुळें परानंद म्हणजे भगवान शंकर आणि परा म्हणजे श्रीत्रिपुरसुंदरी यांच्यांतील गौण मुख्य भाव हा संबंध दोघांकडेही सारखाच आहे. आई ! तुम्हां दोघांपैकी कोणाला मुख्य म्हणूं ? आणि कोणाला गौण म्हणूं ? तुम्हा दोघांनाही मी भक्तिपूर्वक प्रणाम करतो. या श्लोकाची यंत्रपूजापद्धति स्ल्लोक सत्तावीसमध्यें दिली आहे.

07 November, 2010

श्रीमद् भागवत - स्कंध अकरावा - अध्याय पहिला (भाग - १)


श्रीशुक उवाच ।
कृत्वा दैत्यवधं कृष्णः सरामो यदुभिर्वृतः ।
भुवोऽवतारयद् भारं जविष्ठं जनयन् कलिम् ॥ १ ॥
ये कोपिताः सुबहु पाण्डुसुताः सपत्‍नैः ।
दुर्द्यूतहेलनकचग्रहणादिभिः तान् ।
कृत्वा निमित्तमितरेतरतः समेतान् ।
हत्वा नृपान् निरहरत् क्षितिभारमीशः ॥ २ ॥
भूभारराजपृतना यदुभिर्निरस्य ।
गुप्तैः स्वबाहुभिः अचिन्तयद्-अप्रमेयः ।
मन्येऽवनेर्ननु गतोऽप्यगतं हि भारं ।
यद्-यादवं कुलमहो अविषह्यमास्ते ॥ ३ ॥
नैवान्यतः परिभवोऽस्य भवेत् कथञ्चिन् ।
मत्संश्रयस्य विभवोन्नहनस्य नित्यम् ।
अन्तः कलिं यदुकुलस्य विधाय वेणु ।
स्तम्बस्य वह्निमिव शान्तिमुपैमि धाम ॥ ४ ॥
एवं व्यवसितो राजन् सत्यसङ्कल्प ईश्वरः ।
शापव्याजेन विप्राणां संजह्रे स्वकुलं विभुः ॥ ५ ॥ 
 या अध्यायातील पहिल्या पाच श्लोकात सांगितले आहे की जे लोक आपल्या व्यवहाराने दुष्ट दैत्य, दानव बनले होते त्यांचा श्रीकृष्णाने वध करविला. भुवोऽवतारयद् भारम् - पृथ्वीवरील भार हलका केला. कशा प्रकारे ? मग वर्णन येते की पाण्डवांच्या मनांत कोप निर्माण केला, त्यांना क्षुब्ध केले. कौरवांनी पाण्डवांशी द्यूत - छल करून त्यांच्या सर्व संपत्तीचे हरण केले, त्यांचा तिरस्कार केला, त्यांच्या पत्‍नीचे, द्रौपदीचे, केस धरून तिला फरफटत नेऊन अपमानित केले. त्या आधी त्यांच्यावर विषप्रयोग केले होते, त्यांना भस्मसात करण्याचा प्रयत्‍न केला होता. आता त्या सर्व कृत्यांची सीमा गाठली होती. हे सर्व भगवंतांनीच घडवून आणले. कां ? कारण असे केल्याशिवाय शांतिप्रेमी पाण्डव खवळणे अशक्य होते. आणि ते खवळल्याशिवाय दुष्ट कौरव (आणि त्यांचे समर्थन करणारे सर्वच) यांचा नाश करण्याचे सामर्थ्य आणखी कोणात नव्हते.
मन्ये अवनेः ननु गतो अपि अगतं भारम् - भारत युद्ध झाले. मग भार हलका झाला का ? पण भगवंताला अजून पूर्णपणे भार हलका झाला असे वाटेना. यादवांना बलाढ्य करून असंख्य दुष्ट मारले, पण आता यादवच शिरजोर झाले आहेत. कापूर खाऊन अग्नि वाढतो पण कापूर संपला की अग्नीही विझून जातो. त्याप्रमाणे यादवांनी संहार केला, आता त्यांच्या विनाशाची वेळ आली. कारण श्रीकृष्णाच्या कृपेने यादव बाहुबळाने वाढले होते. त्यांना शासन करणारा शास्ता उरला नाही. बल संपती वाढली की मग गर्विष्ठपणा कुकर्माला प्रवृत्त करतो. मग आता काय करावे ? अंतःकलिं यदुकुलस्य विधाय - अशावेळी सर्वात सोपे असते ते समूहामध्ये आपापसांतच संशय, कलह निर्माण करून, आपसांतच भांडणे लाऊन, त्यांनाच परस्पर एकमेकाशी जुंपून, त्यांची शक्ति क्षीण करून सर्वनाश घडवून आणणे. श्रीकृष्णांनी हेच केले.
शापव्याजेन विप्राणाम् - पण असे होण्यास काहीतरी निमित्त लागतेच. मग ऋषी-मुनींकडून शाप दिला गेला. बल संपत्तीने मद चढतो तेव्हां इतरांची टिंगल करण्यात काहीच गैर वाटत नाही. ऋषी-मुनींची यादवांनी खोड काढली आणि ते कपट जाणून ऋषींनी शाप दिला, वाग्‍वज्र सोडले - "हे मुसळ तुमच्या कुळाचा काळ होईल" (ती कथा पुढे येणारच आहे)
पण अशा शापाने कुलनाश कसा घडतो ? कोण्या तपस्व्याने शाप दिला (आणि विशेषतः शाप देणार्‍याचे बल माहीत असते तेव्हां तर) मनुष्य काय, अख्खा समाज हादरून जातो. माझा, आपला नाश होणार हा विचार (negative thought) आणि त्याचे भय हेच आपल्यामध्ये अशा गोष्टी घडवून आणते. Positive thoughts दृढ व्हायला तप करावे लागते. नदीच्या प्रवाहाच्या उलट पोहण्यासारखे असते ते. नकारात्मक विचार नदीच्या प्रवाहाप्रमाणे मनुष्याला उच्च अवस्थेपासून खाली ओढतात. सखल भागाकडे वाहणे हा जसा नदीचा स्वभाव तसेच मनुष्य स्वभावाचेही आहे. नकारात्मक विचार कोणा व्यक्तीचा, समाजाचा अथवा संपूर्ण राष्ट्राचाही विनाश घडवू शकतात.
इथे विचार करण्यासारख्या दोन गोष्टींचे दर्शन होते. तपाने मनःशक्ति संयत झाली की ती शक्ति काहीही घडवून आणू शकते. धारणेने मनःशक्ति एकवटली तर - येणें काही न निपजे । ऐंसे नाही ॥ (ज्ञानेश्वरी) पण केवळ मनाची शक्ति वाढविल्याने मन समचित्त होईल ? मनांत चराचराविषयी समभाव, प्रेमभाव स्थिर होईल ? कठीण आहे. त्याला परत आणखी विशेष प्रयत्‍नांची जोड लागते. विवेकाची जोड लागते. एवढे तपस्वी ऋषीमुनि. पण "माझी चेष्टा करतोस काय ?" या विचाराने देखील क्षुब्ध झालेच की ? असो. संयत मनाची वाग्‍वज्र सोडताच तसे घडवून आणण्याची ही शक्ति, मग असंयत, सदा भयाने, नकारात्मक विचारांनी ग्रासलेले मन त्याच नियमानुसार स्वनाश घडवून आणण्यास कारण होतेच.
आणखी थोडे चिंतन केल्यास कळून येते की आपल्या जीवनांत दोष आहेतच, पण ते दोषही विपरीत, उलट धारणा केल्याने दूर होऊ शकतात. मनांत काम उठला तर ब्रह्मचर्याचा संकल्प करावा, क्रोध आला तर लगेच ’मी क्रोधाला वश होणार नाही’ असा संकल्प करावा. लाचखोरीचा विचार आला - तर सावधान होऊन मनाला सांगावे, असे केल्याने नरकप्राप्ती निश्चितच. एकूण कामाच्या, लोभाच्या, क्रोधाच्या, अहिंसेच्या, असत्याच्या प्रत्येक विचारापुढे त्याच्या विपरीत संकल्प उभा करायचा. असे एक-दोनदा नाही, तर सतत. सद्‌गुणांची वृद्धी करीत, दुर्गुणांवर मात करीत सर्व दोषांची निवृत्ति होईपर्यंत. यालाच ’योग’ म्हणतात ना ? जर साधन केले नाही तर आपल्याच बेसावधपणामुळे, जडवून घेतलेल्या मूर्ख संवयींमुळे जे दोष निर्माण झाले आहेत ते सुटणार कसे ? आणि जरी आज दुःखमय परिस्थिती नसली तरी या सवयी, हे दोष उद्या नाहीतर परवा दुःख निर्माण करणारच.
आता कोणी म्हणेल, काम, क्रोध, लोभ सोडा हो ! संपूर्ण संसारच विक्षेपमय आहे त्याचे काय ? असेना. त्यावर मन शांतचित्त करणे हा उपाय आहेच की. पण आपले मन शांत राहावे यासाठी आपण किती प्रयत्‍न करतो ? ते सदा इकडे तिकडे भटकत राहून इंद्रियांना विषयात गुण्तवण्यात व्यग्र असते. मग विषय मनासारखा नसेल तर चिडचिड होते. निद्रा काळीच मन विश्राम पावते. एरव्ही ते सदा अशांतच असते. मग त्याला प्रयत्‍नपूर्वक शांत करण्याची गरज आहे. आपल्याला जर विक्षेपित होऊ नये असे वाटत असेल तर मनाचा विक्षेपित होण्याचा स्व-भाव आपल्यालाच बदलायला हवा.
यदुवंश व पाण्डव यांच्या साहाय्याने दुष्ट प्रवृत्तींचा विध्वंस - म्हणजेच तमोगुणी, रजोगुणी वृत्तींच्या अतिरेकास सात्विक वृत्तींचा आश्रय घेऊन विध्वंस करविला. सात्विक वृत्तींचा विक्षेप, धर्माचा, सदाचाराचा (आम्ही धार्मिक आहोत बरं का !) विक्षेपही शांत भावानेच नष्ट करावा लागतो.
पण श्रीकृष्णाने हे सर्व करायचे कां ठरविले ? त्यांच्याकडे सर्व प्रकारचे वैभव होते, भले मोठे कुटुंब होते, सत्ता होती, सर्व मान देत होतेच. सर्वकाही तर होते. पण परमात्माही जेव्हां जीवांशाने अवतरीत होतो तेव्हां त्यालाही या संसारापासून विरक्ति येतेच. त्यांनीही हाच विचार केला. बास झालं ! आता आपण आपल्या शांतिकुटीरात जावे हेच बरे. आपल्या साकेतधामास, वैकुंठास (हे सर्व शब्दच आहेत, हे असे कोणते स्थान नाही की जिथे आपण तिकीट काढून जाऊ शकू) जावे. भगवानही आपल्या मर्जीनेच येतात, आपल्या मर्जीनेच परत जातात. त्यांच्या कृपेनेच सर्व जीवांनाही असाच सुखदुःखमय प्रवास घडतो. पण प्रवासात आणि प्रवासाची अंतीम गती जीवाच्या संकल्पशक्तिने घडते असे दिसते. संकल्पानुसार भगवान मदत करतात एवढेच.