30 April, 2008

मानसमणिमाला (६)

मानसमणिमाला (६)
हिंदी : मज्जन फल पेखिअ तत्तकाला ।
काक होहिं पिक बक‍उ मराला ॥ १ ॥
सुनि आचरज करै जनि कोई ।
सतसंगति महिमा नहिं गोई ॥ २ ॥ बालकाण्ड.
मराठी: मज्जन फल तत्काल पहावे ।
बकेंहंस पिक काकें व्हावे ॥ १ ॥
ऐकुनि कुणि विस्मय ना माना ।
गुप्त संतसंगति महिमा ना ॥ २ ॥ प्रज्ञानानंद
अर्थ : साधुसमाजरुपी प्रयागात मज्जन केल्याचे म्हणजेच संतसंगतीचे फल तत्काल मिळते. अहो ! बगळा हंस होतो आणि कावळा कोकीळ होतो. हे ऐकून आश्चर्य वाटून घेऊ नका बरं ! कारण संतसंगतीचा महिमा, परिणाम कांही गुप्त नसतो !

संतसज्जनांच्या चरित्राचे अवलोकन केले, त्याचे खूप मनापासून चिंतन मनन केले म्हणजे त्यात गुडी मारली (मज्जन) तर त्याचा परिणाम आपल्या व्यक्तिगत विचारावरही झाल्याखेरिज राहात नाही. जशी माणसाची विचारसरणी असते तसे माणसचे आचरण असते. व ही विचारसरणी बहुतांशी बाहेरच्या संस्कारांनीच होत असते. मातापिता, गुरुजन व मित्र-परिवाराच्या विचारांचा संस्कार मनुष्याचे मन ताबडतोब उचलते. त्यामुळे कदाचित्‌ दुर्वृत्तीचेही संस्कार मनुष्य उचलतो आणि त्याचे वर्तन दुर्वृत्त होते. मन सहजतेने अधोगामी होते व त्या दुष्कृत्यांतून मिळणार्‍या सहज सुलभ सुखोपभोगांत बुडून जाते आणि पुन्हा पुन्हा तीच साखळी चालूच राहते.
परंतु सुखामागून दुःखे येणार हे निश्चितपणे ठरलेलेच असते व अशा वेळी आपल्या दुष्कृत्याबद्दल शिक्षा भोगण्याची, पश्चात्ताप करण्याची पाळी येते. पण शिक्षा भोगून, पश्चात्ताप करूनही जर त्या दुष्प्रवृत्तीमधून बाहेर कसे पडावे हे समजले नाही तर जीवन फारच दयनीय होऊन जाईल. अशावेळीं मनुष्याला परमेश्वराच्या कृपेने संताच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला तर त्याच्या जीवनांत अमूलाग्र बदल होईल व त्याचे जीवन धन्य होईल. बिनु सत्‌संग बिबेक न होई । रामकृपा बिनु पाव न तेहि ॥
रामक्रुपा मागण्याकरितां देवाजवळ जाणे सोपे थोडेच आहे ? परंतु संतसंगती - सकल सुलभ सब दिन सब देशा - सादर सेवत शमवी क्लेशां ॥ - अशी असल्याने थोड्या प्रयत्‍नानें व स्वतःच्या सदिच्छेनें प्राप्त होऊ शकेल. पण या संतसंगतीचे फल मात्र अलौकिक, खरोखर अनिर्वचनीय असते.
संत तुलसीदास म्हणतात, अहो ! कावळासुद्धा मंजुल आवाजाचा होईल आणि अगदी दांभिक बगळा सुद्धां सत्वगुणी राजहंस होईल. आणि यांत आश्चर्य वाटण्यासारखे कांही नाही. कारण हा आहे सत्‌संगतीचा प्रभाव. !
संत आपल्या आचरणाने, उपदेशानें, प्रेमाने दुर्जनांच्या स्वभावातील दुष्टता, विकृत विचारसरणी नाहीशी करतात व त्यांना सन्मार्गावर आणतात. पुराण प्रसिद्ध वाल्या कोळी आदि कवी वाल्मीकि झाले आणि अहंमन्य कर्मठ रामेश्वर भट्ट तुकोबांचे निस्सीम भक्त झाले ! असा संतसंगतीचा परिणाम अगदी अनिर्वचनीय असतो आणि अगदी हमखास घडून येणारा असतो. म्हणून परमभक्त तुकोबाराय स्वतःच देवाजवळ मागणी करतात - नलगे मुक्तिसंपदा - संतसंग देई सदा - हेचि दान देगा देवा !
डॉ. सौ. उषा गुणे.

29 April, 2008

तत्सुखे सुखित्वं

तत्सुखे सुखित्वं

दर्शनाचे तीन प्रकार - १) स्वप्नात प्रभूचे दर्शन - साधारण दर्शन २) मंदिरांत, मूर्तीत दर्शन - मध्यम दर्शन ३) भगवंताचे अपरोक्ष दर्शन - उत्तम दर्शन.
द्रष्टा म्हणजे पाहणारा, भगवंताला पाहतांच भगवत्‌मय होऊन जातो त्याला "उत्तम दर्शन", अपरोक्ष साक्षात्कार असे म्हणतात. भगवंत जगात ओतप्रोत भरला आहे, असा अनुभव घेता घेता जो देवांत विलीन होऊन जातो तोच भगवंताचे परिपूर्ण स्वरूप जाणू शकतो, ओळखू शकतो. भगवंत सर्वव्यापक आहे.
तो मूर्तीत व मंदिरांत आहेच, पण तेवढाच तो नाही. दृष्टी जाईल तेथे तेथे भगवंत आहे, इतकंच काय पण मन जेथे जेथे जाईल तेथे तेथे पण तोच परमात्मा आहे. हेच भगवंताचे "उत्तम दर्शन". जो भगवंत माझ्यात आहे तो सर्वांमध्ये आहे. अखिल जगत भगवंतच आहे.
आपण जे जे कांही करतो ते देवासाठीच करतो अशी भावना असल्यावर त्या सर्व कर्माची परिणतता एका भक्तीतच होते. अशा तन्मय भक्तीने जीव कृतार्थ होतो. गोपी भक्ति मार्गाच्या आचार्या. त्यांचा आदर्श मन, डोळे यांच्यासमोर असावा.
सुखाचा साथी जीव आहे. दुःखाचा साथी भगवंत आहे. नेहमी ही गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे. मनुष्य पैसे मिळविण्यासाठी जेवढे प्रयत्न करतो, कष्ट करतो, दुःख सोसतो, त्यापेक्षा जरा थोडे तरी प्रयत्न, कष्ट तो एका सच्चिदानंदस्वरूप देवासाठी करील, तर त्याला भगवंताची प्राप्ती निश्चितच होईल.
श्रीकृष्ण तर न बोलावतांही गोपींच्या घरी जात असे. मग तो आपल्या घरीं कां बरे येत नाही ? आपल्या चित्तांत कां ठसत नाही ? याचा विचार कधीतरी आपल्या मनांत येतो का ?
श्रीठाकूरजींना लोणी फार प्रिय. लालाला लोणी फार फार आवडते. उत्तरेत एक वाक्‍प्रचार आहे "लालाको मख्खन भाये रे । कुछ और काम न आये रे ॥" लोणी सर्वाचे सार आहे. भगवंत पण साराचेही सार आहे. आपला भगवान बाळकृष्ण सारभोगी आहे. वैष्णवही सारभोगी असतात.
भक्ति हे प्रेमाच शास्त्र आहे. भक्ति हा पांचवा पुरुषार्थ आहे. परमप्रेमस्पद चिंतनात भान विसरते ती भक्ति. भगवंत हा प्रेमस्वरूप आहे. भक्तिमार्गात वेगळेपणा राहात नाही. विभक्त नव्हे तो भक्त. भक्ताला भगवंताचे, शिष्याला श्रीगुरुचे, रोग्याला औषध- पथ्यपाण्याचे ध्यान असावे. ध्यानाने तन्मयता वाढते, भक्ति-प्रेम भाव वाढतो. भगवंत अशा भक्ति-प्रेमाने ऋणी होतो. भक्ति-प्रेम भावांत हक्काची भावना अंतरात निर्माण करते.’स्व-सुख सुखित्वाला’ तिलांजली देऊन ’तत्सुख सुखित्वाचे’ संवर्धन हीच भक्ति. अशी भक्ति भगवंताने अण्णाला द्यावी हीच त्याच्या चरणी विनम्र प्रार्थना.
प्रभु रामचंद्रांनी राज्याभिषेकाच्या वेळी सर्व वानरांना सप्रेम भेट म्हणून पारितोषिके दिली, पण हनुमंताला कांहीच दिले नाही. म्हणून सीतामाईंना वाईट वाटले. त्या रामाला म्हणाल्या, "मारुतीला पण कांही द्या ना ? " श्रीराम म्हणाले, "त्याला मी काय देऊ ? त्यानेच माझ्यावर किती किती उपकार करून ठेवले आहेत". मारुतराय काय म्हणाले ? "सनमुख होई न सकत मन मोरा । " - म्हणाले, "प्रभू माझं मन कांही आपल्या पुढ्यात सन्मुख होत नाही, तेवढं करा". भक्ति-प्रेमात अपेक्षेचा भाव आला की भक्ति-प्रेम संपलेच. भगवंताने ही अपेक्षेची भावना अण्णाचे मनांतून तडीपार करावी. अपेक्षा असली तर भक्तिनें ती पूर्ण होते पण भगवंत मात्र हातातून निसटून जातो.
शांडिल्य ऋषींनी आपल्या भक्ति-सूत्रात म्हटले आहे "तत्सुखे सुखित्वं प्रेमलक्षणम् " - अन्याच्या सुखांत सुख अनुभवणे हे खर्‍या भक्तिप्रेमाचे लक्षण आहे. दयाघन, कृपाळू भगवंताने हा बोध अण्णाला द्यावा हीच प्रार्थना -

अण्णा -

15 April, 2008

सुकृतिनो vs दुष्कृतिनो - ३

सुकृतिनो vs दुष्कृतिनो -३

           भगवंतांनी अर्जुनाला सांगून टाकले की, "भ्रांतिरूप प्रपंचाचे ठिकाणी सत्यबुद्धि असणे हेंच अज्ञान." पण ही भ्रांती जीवमात्रावर इतकी दीर्घकालीन राहण्याचे कारण काय ? तर म्हणाले "माया". ही माया इतकी दुष्कर आहे की श्रीकृष्णच स्वतः तिला "दुरत्यया" म्हणतात. या मायेचा प्रभाव जितका जास्त तितका तो मूढ. मूढ का म्हणायचे ? कारण त्रिगुणात्मक मायेतील तमोगुणाचा इतका जबरदस्त पगडा असतो की त्याची बुद्धी अपहृत झालेली असते आणि त्याची बुद्धी ’आसुरं भावं आश्रिता’ झालेली असते. गीतेच्या १६ अध्यायात सांगितलेले सर्वच आसुरी संपदेचा तो धनी असतो. तो नर नाही, त्याला भगवंतांनी नराधम म्हटले आहे. चोराला पोलिस जसा शत्रू तसा परमात्मा म्हणजे शत्रूच. तो म्हणतो कोण भगवान ? तो तर म्हणतो ’ईश्वरो अहं, सिद्धो अहं बलवान् अहं, को अन्योऽस्ति सदृशो मया ? (गीता १६.१४) असा माणूस भगवंताचे भजन ते काय करणार ? तो कोणतेही चांगले कृत्य करूच शकत नाही. त्याला म्हणतात दुष्कृतिनो.
          मग सुकृतिनो कोण ? त्याच्यावर मायेचा प्रभाव नसतो का ? असतो. पण त्याच्यात मायेच्या तीनगुणांपैकी रजोगुण व सत्त्वगुण यांचाही अंश असतो. रामकृष्ण परमहंस एक गोष्ट सांगायचे. एकदा एक माणूस जंगलातून कुठेतरी जात असतो. अचानक त्याच्यासमोर तीन डाकू येतात आणि त्याचे सर्वकाही लुबाडून घेतात. नंतर तिघे आपापसात चर्चा करतात की आता ह्याचे काय करायचे ? एक म्हणतो की याला ठार करू आणि निघून जाऊ (तमोगुणी, क्रूरता भिनलेलीच असते.) दुसरा म्हणतो की ठार करायची काय गरज आहे. हा एकटा आपले काय करणार आहे ? (रजोगुणी) तिसराही त्याला सहमत असतो म्हणून पहिल्याला ’हो’ म्हणावे लागते. त्या वाटसरूला ते बांधून निघून जातात. पण थोड्या वेळाने तिसरा परत येतो, त्याला म्हणतो, ’अरेरे ! तुला खूप त्रास दिला आम्ही.’ (सात्त्विक) असे म्हणून त्याला सोडतो आणि म्हणतो चटकन् निघून जा. इथे हे लक्षात घेणे आवश्यक आहे की प्रत्येकात कमीजास्त प्रमाणात तिन्ही गुण असतातच. ज्या गुणाचे प्रमाण अधिक तो त्या गुणाचा असे समजावे. या तिघांवरही मायेचा निरनिराळा प्रभाव असतो.गीतेत दुष्कृतिनोची व्याख्या केलेली आहे पण सुकृतिनोचे स्पष्टीकरण नाही. याचा अर्थ घोर , नराधम यांना सोडून इतर सर्व सुकृतिनो म्हणायला हरकत नसावी असे दिसते. रजोगुणी व सत्त्वगुणी देखील वेळप्रसंगी खोटे बोलणे, चोरी, लबाडी करतातच. पण तो त्यांचा स्थायी भाव नव्हे. असे लोक कधी कधी भगवंतांची आठवण, आराधना वा भजन करतात. म्हणजे सुकृतही करतात. गीता ७.१६ इथे त्यांची वर्गवारी करून त्यांचे चार प्रकार सांगितले आहेत. त्यांना भक्तिचे अधिकारी म्हटले आहे. अशांच्या आयुष्यात ’यदृच्छया’ असे काही प्रसंग येतात की त्यांची भक्तीमार्गाकडे वाटचाल सुरू होते. मग दुष्कृतिनो यांना अधिकार नाही का ? तर असे नाही. त्यांना अधिकारी म्हटले नसले तरी अनधिकारी असेही म्हटलेले आढळत नाही. कारण गीता ९.३० मध्ये भगवान् म्हणता ’अपि चे सुदुराचारो भजते मां अनन्यभाक्’ त्यांच्याही आयुष्यात कधी ’यदृच्छये’ने कृपा होतेच. पण त्यांना मोजावे लागणारे दामही तेव्हढेच खडतर असते असे दिसते. दोन उदाहरणे पाहू - वाल्याचा वाल्मिकी होणे आणि कुबेरपुत्र नलकूबर - मणिग्रीव बंधूंना श्रीकृष्णाचे साक्षात दर्शन घडणे. पण त्यासाठी वाल्याला अंगावर वारूळ उठेपर्यंत तप करावे लागले आणि नलकूबर-मणिग्रीव बंधूंना देवांची शंभर वर्षे यमलार्जुन वृक्ष बनून उभे राहावे लागले.
 

10 April, 2008

आनंदाचे लाडू घ्यारे तुम्ही

आनंदाचे लाडू घ्यारे तुम्ही

प्रारब्ध कर्माचा क्षय ती भोगल्यानेच होत असतो, म्हणून जीवनमुक्तांनाही देह पडेपर्यंत प्रारब्धकर्म करावीं लागतात व त्याच बरोबर भोगावी लागतात, असा वेदान्ताचा सिद्धांत आहे. आणि त्याच बरोबर अनेक जीवनमुक्त संत महात्म्यांच्या चरित्रावरून तर या प्रमेयाला बळकटी येते. अधिकच.

हे उरलेले प्रारब्धकर्म जन-कल्याणसाठी, जन समाज प्रबोधनासाठीं, लोकांच्या मनांत परमार्थाचे ज्ञान ठसविण्यासाठी असते असे सामान्यतः दिसून येते. "प्रारब्ध शेष उरले जननिश्चयाला" - श्रीतुकोबाराय पण ग्वाहीपूर्वक सांगतात कीं - "तुका म्हणे आतां । उरलो उपकारापुरतां ॥" संतांच्या या कर्मयोगाने जगाची, समाजाची पारमार्थिक उन्नती होत असते.

’कां फोडीत पापताप । पोखीत तिरींचे पादप ।
समुद्रा जाय आप । गंगेचे जैसे ॥
तैसी बांधिली सोडीत । बुडालीं काडत ।
सांकडी फेडीत । आर्तांचिया ॥
किंबहुना दिवसराती । पुढिलांचे सुख उधळती ।
आणित आणित स्वार्थी । प्रवेशिजे ॥

वरील सुंदर ओव्यांत श्रीज्ञानराज माऊलींनी वर्णिल्याप्रमाणे देह पडेपर्यंत नराला नारायण करण्याचे व याच प्रकारे, याच मार्गांनी व्यक्तिमात्राला व त्यामुळे समाजाला स्वरूपसुखशांती प्राप्त करून देण्याचे व्रत संत आचरीत असतात. मानवाला आपल्या मूलभूत भगवत तत्त्वाचे, परमतत्त्वाचे सतत स्मरण देऊन, भगवंतस्वरूप होण्याचा मार्ग दाखविण्याचे महत्‌कार्य या संत माहात्म्यांकडून सतत, सहजतेने घडत असते. "सहज बोलणे हित उपदेश । करोनि सायास शिकविती॥". आणि साधन मार्ग काय म्हणाल तर एकच - "नामस्मरण".

म्हणूनच त्यांची ही थोरवी अनेक थोर थोर संत पुरुषांनी अगदी मुक्त कंठाने व प्रेम, कृतज्ञता व अत्यंत आदर या भावनांनी दाटलेल्या अंतःकरणाने गायिली आहे. तत्त्वज्ञ म्हणतात - They are the salt of the Earth. "हे महात्मे म्हणजे जगाला सुपीकता व रस देणारे मीठ होत" - ते नसतील तर जगांत सगुणांचे व शाश्वत सुखरुपतेचें पीक येणार नाही.

अपूर्णातून पूर्णाकडे जाण्याचा मनुष्य सदा प्रयत्न करीत असतो. परंतु बहुतेकांना एकदेशी पूर्णतेचे आकर्षण वाटते. थोड्याच जणांना सर्वांगीण पूर्णतेचे आकर्षण वा ओढ असते. थोडेच प्रयत्न करतात. हीच नवजागृति किंवा परमार्थप्रवृत्ति.

परमार्थ साधनेने परमानंदाची प्राप्ती. परमानंदाने जीवनांतील अध्यात्मिक, अधिभौतिक व अधिदैविक अशा तापत्रयाचा नाश. सर्वाभूतीं आत्मभाव, व त्या योगे विश्वात्मक भाव. मग "सर्वही सुखरूप असावेत" असा एकच एक जीवनहेतू उरतो. संकुचित स्वार्थाचे स्मरणही राहात नाही. मग भगवंतच खरा, इतर सर्व आभास असा निश्चय/अनुभव. या अनुभवाने विश्वाचे कोडे सुटतें आणि भक्तिप्रेमभाव, निर्भयता, आदर, देव-भक्तांचे ऐक्य, आणि ऐक्यातून होणारी "भक्तिप्रेमसुखसेवा" या भावनांबरोबर एकरूपता अनुभवत, भ्रांतीनाश होतो, संशयरहितता येते. या आत्मानंदरूप स्थितीने भावनांना, भक्तिला, प्रेमाला, भक्ति-भाव-प्रेमाला पूर्णत्व येते. त्याचबरोबर विश्वात्मक भावाने त्यांच्या क्रियाशक्तीच्या व्यापाराला (WILL) पण पूर्णता येते.

हीच मानवी जीवनाची सफलता, सार्थकता, कृतार्थता, धन्यता, स्वरूप सुखाची परमोच्च अवस्था. मग "याचि देही याचि डोळां । भोगिजे मुक्तिचा सोहळा ॥" असा शेवटचा दिवस गोड होतो. आपण केलेल्या नामसाधनेचें (नामस्मरणाचें) असे मधुर, रसाळ, परिपक्व महान फळ आलेले पाहून स्वतःचे स्वतःलाच मोठे कौतुक वाटते. मुक्तीशी लग्न लावून, साक्षात्कारी महात्मा, जीवनमुक्त अवस्थेतील आपले उरलेले जीवन भक्ति-प्रेम सुखाच्या खेळीमेळींत आनंद लुटत असतांना आपल्याला मिळालेला आनंद जगाला वाटत असतो.

"सेवितो हा रस, वाटी तो आणिका ।
घ्यावे होऊ नकां रानभरी ॥
तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू ।
नका चडफडूं घ्यारें तुम्ही ॥ "
’देवाचा प्रसाद घ्या’ , ’आनंद व्हा’ हीच त्यांची तळमळ आणि आनंद होण्याचे साधन एकच - देवाचे "नाम".

अण्णा -