30 April, 2008

मानसमणिमाला (६)

मानसमणिमाला (६)
हिंदी : मज्जन फल पेखिअ तत्तकाला ।
काक होहिं पिक बक‍उ मराला ॥ १ ॥
सुनि आचरज करै जनि कोई ।
सतसंगति महिमा नहिं गोई ॥ २ ॥ बालकाण्ड.
मराठी: मज्जन फल तत्काल पहावे ।
बकेंहंस पिक काकें व्हावे ॥ १ ॥
ऐकुनि कुणि विस्मय ना माना ।
गुप्त संतसंगति महिमा ना ॥ २ ॥ प्रज्ञानानंद
अर्थ : साधुसमाजरुपी प्रयागात मज्जन केल्याचे म्हणजेच संतसंगतीचे फल तत्काल मिळते. अहो ! बगळा हंस होतो आणि कावळा कोकीळ होतो. हे ऐकून आश्चर्य वाटून घेऊ नका बरं ! कारण संतसंगतीचा महिमा, परिणाम कांही गुप्त नसतो !

संतसज्जनांच्या चरित्राचे अवलोकन केले, त्याचे खूप मनापासून चिंतन मनन केले म्हणजे त्यात गुडी मारली (मज्जन) तर त्याचा परिणाम आपल्या व्यक्तिगत विचारावरही झाल्याखेरिज राहात नाही. जशी माणसाची विचारसरणी असते तसे माणसचे आचरण असते. व ही विचारसरणी बहुतांशी बाहेरच्या संस्कारांनीच होत असते. मातापिता, गुरुजन व मित्र-परिवाराच्या विचारांचा संस्कार मनुष्याचे मन ताबडतोब उचलते. त्यामुळे कदाचित्‌ दुर्वृत्तीचेही संस्कार मनुष्य उचलतो आणि त्याचे वर्तन दुर्वृत्त होते. मन सहजतेने अधोगामी होते व त्या दुष्कृत्यांतून मिळणार्‍या सहज सुलभ सुखोपभोगांत बुडून जाते आणि पुन्हा पुन्हा तीच साखळी चालूच राहते.
परंतु सुखामागून दुःखे येणार हे निश्चितपणे ठरलेलेच असते व अशा वेळी आपल्या दुष्कृत्याबद्दल शिक्षा भोगण्याची, पश्चात्ताप करण्याची पाळी येते. पण शिक्षा भोगून, पश्चात्ताप करूनही जर त्या दुष्प्रवृत्तीमधून बाहेर कसे पडावे हे समजले नाही तर जीवन फारच दयनीय होऊन जाईल. अशावेळीं मनुष्याला परमेश्वराच्या कृपेने संताच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला तर त्याच्या जीवनांत अमूलाग्र बदल होईल व त्याचे जीवन धन्य होईल. बिनु सत्‌संग बिबेक न होई । रामकृपा बिनु पाव न तेहि ॥
रामक्रुपा मागण्याकरितां देवाजवळ जाणे सोपे थोडेच आहे ? परंतु संतसंगती - सकल सुलभ सब दिन सब देशा - सादर सेवत शमवी क्लेशां ॥ - अशी असल्याने थोड्या प्रयत्‍नानें व स्वतःच्या सदिच्छेनें प्राप्त होऊ शकेल. पण या संतसंगतीचे फल मात्र अलौकिक, खरोखर अनिर्वचनीय असते.
संत तुलसीदास म्हणतात, अहो ! कावळासुद्धा मंजुल आवाजाचा होईल आणि अगदी दांभिक बगळा सुद्धां सत्वगुणी राजहंस होईल. आणि यांत आश्चर्य वाटण्यासारखे कांही नाही. कारण हा आहे सत्‌संगतीचा प्रभाव. !
संत आपल्या आचरणाने, उपदेशानें, प्रेमाने दुर्जनांच्या स्वभावातील दुष्टता, विकृत विचारसरणी नाहीशी करतात व त्यांना सन्मार्गावर आणतात. पुराण प्रसिद्ध वाल्या कोळी आदि कवी वाल्मीकि झाले आणि अहंमन्य कर्मठ रामेश्वर भट्ट तुकोबांचे निस्सीम भक्त झाले ! असा संतसंगतीचा परिणाम अगदी अनिर्वचनीय असतो आणि अगदी हमखास घडून येणारा असतो. म्हणून परमभक्त तुकोबाराय स्वतःच देवाजवळ मागणी करतात - नलगे मुक्तिसंपदा - संतसंग देई सदा - हेचि दान देगा देवा !
डॉ. सौ. उषा गुणे.

No comments: