11 May, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक ४० वा

तटित्त्वन्तं भक्त्या तिमिर-परिपन्थि-स्फुरणया
स्फुरन्नानारत्नाभरण-परिणद्धेन्द्रधनुषम् ।
तव श्यामं मेघं कमपि मणिपूरैक-शरणं
निषेवे वर्षन्तं हर-मिहिर-तप्तं त्रिभुवनम् ॥ ४०॥


हे आई जगज्जननी ! माझ्या देहातील मणिपूरचक्र हें तुझेंच चक्र आहे. तुझ्या या मणिपूरचक्रांत भगवान् सदाशिव हे मेघेश्वररूपानें वास्तव्य करीत आहेत. कोणी त्यांना अमृतेश्वर असेही म्हणतात. तेथें त्यांच्या वामभागीं तूं अमृतेश्वरी या रूपाने अथवा सौदामनीदेवी या रूपाने विराजमान झालेली आहेस. तुझ्यासह त्या मणिपूरचक्रांत विराजमान असलेल्या अमृतेश्वराची मी भक्तिपूर्वक उपासना करीत आहे. ते मेघेश्वर महादेव हे 'तटित्वात्' आहेत. तटित् म्हणजे विद्युल्लता. मेघामध्ये जशी विद्युल्लता शोभावी तशी तूं सौदामनीदेवी अमृतेश्वराच्या सान्निध्यांत शोभत आहेस. तूं त्यांची शक्तिच आहेस. विद्युलतेनें युक्त असलेला मेघ हा वृष्टि करण्यास उद्युक्त असतो हें प्रसिद्धच आहे. विद्युल्लतेचें स्फुरण म्हणजे प्रकाश हा 'तिमिरपरिपन्थि' म्हणजे अंधकाराचा नाश करीत असतो. विद्युत् ही क्षणभरच प्रकाशत असते, पण तूं मात्र अमृतेश्वराच्या सान्निध्यांत नित्य स्थिररूपानें विराजमान झालेली आहेस. तामिस्रलोकस्वरूप असलेल्या मणिपूरचक्रांतील तिमिराचा नाश तुझ्याचमुळें होत असतो. तूं आपल्या अंगावर धारण केलेल्या अनेक रत्नजडित अलंकारांतील रत्नांच्या कांतीनें अमृतेश्वररूपी मेघामध्यें जणुं कांही इंद्रधनुष्यच निर्माण झालेलें आहे असे वाटतें. ढगांमध्ये दिसणारे इंद्रधनुष्य हें देखील वृष्टीचें द्योतक असतेंच. आई ! तुझ्या सान्निध्यांत असलेले मेघनाथ हे श्याम म्हणजे कृष्णवर्ण आहेत. मेघाचा कृष्णवर्ण देखील मेघ वृष्ट्युन्मुख असल्याचेंच सूचित करीत असतो. तुझें मणिपूरचक्र हें एक त्या अमृतेश्वराचें मुख्य मंदिर आहे. असें हे तुझ्याच सामर्थ्यामुळे समर्थ असलेले श्रीमेघनाथ हे हर म्हणजे अग्नि आणि मिहिर म्हणजे सूर्य यांच्या योगाने पतप्त झालेल्या त्रिभुवनाला अमृताची-जलाची वृष्टि करून शांत करीत आहेत. तात्पर्य, आई ! प्रलयकालीन अग्नि-सूर्याच्या तापाने तप्त झालेल्या त्रिभुवनाला शांत करणारे भगवान् अमृतेश्वर हे तुझ्याच सामर्थ्याने संपन्न असून ते तुझ्याच मणिपूरचक्रांत तुझ्यासह वास्तव्य करीत आहेत. मी तुम्हां उभयतांची भक्तिभावानें उपासना करीत आहे.

सोन्याच्या पत्र्यावर श्लोक तीनप्रमाणें यंत्र काढून त्यांत श्रींच्या जागी ठं हें बीज लिहावे. पंचेचाळीस दिवस पूजा करावी. मध, दूध, पायस आणि तांबूल यांचा नैवेद्य दाखवावा. या श्लोकाचा रोज एक हजार जप करावा. तें यंत्र उशीत घालून झोपावे. इष्ट वस्तूचे स्वप्नांत दर्शन घडेल. 10 May, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक ३९ वा

तव स्वाधिष्ठाने हुतवहमधिष्ठाय निरतं
तमीडे संवर्तं जननि महतीं तां च समयाम् ।
यदालोके लोकान् दहति महति क्रोधकलिते
दयार्द्रा या दृष्टिः शिशिरमुपचारं रचयति ॥ ३९॥


हे आई जगजननी ! माझ्या देहांतील स्वाधिष्ठानचक्र हें तुझेंच आहे. कारण त्याची तूं अधिष्ठात्री देवता आहेस. आई ! त्या तुझ्या स्वाधिष्ठानचक्रामध्यें असलेल्या अग्नितत्त्वाच्या ठिकाणी संवर्ताग्नीच्या रूपानें भगवान् सदाशिव निरंतर तन्मयतेनें वास्तव्य करतात. त्यांना तेथें संवर्तेश्वर असें म्हणतात. त्यांच्या वामभागीं सर्वश्रेष्ठ अशी तूं समया, समयांबा अथवा समयादेवी या नांवानें विराजमान झालेली आहेस. मी तुम्हा दोघांचीही "ईडे" म्हणजे स्तुति करीत आहे. आई ! संवर्ताग्नीच्या रूपाने स्वाधिष्ठानचक्रांतील अग्नितत्त्वाच्या ठिकाणी ज्या वेळेला भगवान् शंकर हे प्रलयाग्नीच्या रूपाने अधिष्ठित होतात त्या वेळीं त्यांचा आलोक म्हणजे प्रकाश किंवा ज्वाला क्रोधाने वाढू लागतात. भगवान् शंकर हे त्या वेळेला संहाराच्या अवस्थेंत असतात. म्हणून त्यांचा प्रक्षोभ होत असतो. प्रक्षुब्ध झालेल्या सदाशिवस्वरूप संवर्ताग्रीच्या ज्वाळा लोकांचा जेव्हां दाह करूं लागतात त्याच वेळेला आई ! तुझी दयार्द्र दृष्टि भक्तजनांना शीतोपचार करीत असते. तुझ्या कृपापूर्ण दृष्टीनें होणाऱ्या शीतल उपचारामुळे तुझ्या भक्तांना प्रलयाग्नीच्या ज्वालाही थंडीच्या दिवसांत अग्नीजवळ बसून शेकावें त्याप्रमाणें सुखदायक वाटतात. तात्पर्य, स्वाधिष्ठानचक्रामध्यें विराजमान असलेल्या संवर्तेश्वररूपी भगवान सदाशिवांशीं सर्वस्वीं अभिन्न - एकरूप असलेली तूं समयांबा पराशक्ति, मी तुझें स्वाधिष्ठान चक्रांत ध्यान करीत आहें. मी तुझें भक्तिपूर्वक स्तवन करीत आहें.

श्लोक तेराप्रमाणे सोन्याच्या पत्र्यावर चतुष्कोण काढावा. त्यांत वरच्या ओळींत ठं पं पः हीं अक्षरे लिहावींत. खालच्या ओळींत दोन दोन अक्षरांच्या खालीं ष आणि सं ही अक्षरे लिहावींत. बारा दिवस यंत्राची पूजा करावी. रोज एकशेआठ वेळां या श्लोकाचा जप करावा. दूध, पायस आणि मध यांचा नैवेद्य दाखवावा. हें यंत्र धारण केल्यास वाईट स्वप्ने पडण्याचें थांबते व दुःस्वप्न-दोष टळतो.

09 May, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक ३८ वा

समुन्मीलत्संवित्कमल-मकरन्दैक-रसिकं
भजे हंसद्वन्द्वं किमपि महतां मानस-चरम् ।
यदालापादष्टादश-गुणित-विद्या-परिणति-
र्यदादत्ते दोषाद् गुणमखिलमद्भ्यः पय इव ॥ ३८॥


आई जगज्जननी ! हें माझ्या हृदयाच्या सान्निध्यांत असलेलें अनाहतचक्र हें तुझेंच आहे. यालाच संवित्कमल असें म्हणतात. कांहीं विद्वान् संवित्कमल शब्दानें वक्षस्थलामध्यें असलेलें निराळेंच अष्टदलकमल घेतात; पण तें बरोबर नव्हे. क्रमाने षट्चक्रांचे वर्णन चालू असतां क्रमप्राप्त अनाहतचक्र सोडून मध्येंच दुसऱ्या चक्राचा निर्देश आचार्य करणार नाहीत. हें कमल बारा पाकळ्यांचें आहे. याच्या प्रत्येक दलांत एक एक आदित्यदेवता विराजमान झालेली आहे. द्वादश आदित्यांचा प्रकाश या ठिकाणी सदैव विलसत असतो. ज्ञानाचे - आत्मज्ञानाचेंही तेंच स्थान असल्यामुळें त्याला संवित्कमल असें म्हणतात. "समुन्मीलत्" म्हणजे उत्तम रीतीनें विकसित होणाऱ्या या संवित्कमलांतील मकरंदाचा - पुष्परसाचा प्रामुख्याने आस्वाद घेण्यामध्यें रसिक म्हणजे तत्पर असलेले असे दोन हंस तेथें आहेत. एक हंस आणि एक हंसी. मानसरोवरामध्ये जसे राजहंस असावेत त्याचप्रमाणे योगीजनांच्या अथवा भक्तजनांच्या मानस म्हणजे अंतःकरणरूपी सरोवरामध्यें संचार करणारे ते जसे कांहीं हंसच आहेत. हे दोन हंस म्हणजे एक साक्षात् भगवान् सदाशिव आणि दुसरी प्रत्यक्ष तूंच आदिमाया महाशक्ति. तुम्हा दोघांना या अनाहतचक्रामध्ये हंसेश्वर आणि हंसेश्वरी असे म्हणतात. त्यांचें स्वरूप 'किमपि' म्हणजे अनिर्वचनीय आहे. त्या राजहंसांच्या एकमेकांशी होणाऱ्या संवादांतूनच अठरा विद्यांची परिणति म्हणजे विकास झालेला आहे. या अठरा विद्या म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. त्याचप्रमाणे या चारी वेदांचे चार उपवेद. आयुर्वेद, धतुर्वेद, गांधर्ववेद आणि स्थापत्यवेद म्हणजे शिल्पशास्त्र. तसेंच शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, ज्योतिष आणि छन्दःशास्त्र ही सहा वेदांची अंगें आणि पूर्वोत्तर मीमांसाशास्त्र (मीमांसा आणि वेदान्त), न्यायशास्त्र, पुराण आणि धर्मशास्त्र. चौसष्ट कला आणि तंत्रशास्त्र वगैरे इतर विद्या या सर्वांचा या अठरा विद्यांतच अंतर्भाव होतो. राजहंस ज्याप्रमाणें एकत्र मिसळलेले दूध आणि पाणी यांचें पृथक्करण करतात त्याचप्रमाणे आई ! राजहंसस्वरूप असलेले तुम्ही दोघे देखील भक्तजनांच्या गुणदोषांचे पृथक्करण करून दोष बाजूला सारतां आणि गुणांचे ग्रहण करतां ! शंकरांनी लोकांना ताप देणारे विष कंठांत घातलें आणि आह्लाद देणारा चंद्र मस्तकावर धारण केला ! आई, मी तुम्हा दोघांना मनःपूर्वक भजत आहे.

कांहीं लोक या संवित्कमलामध्यें असलेल्या परमेश्वराला तो अग्नीच्या ज्वालेप्रमाणे असल्यामुळें ज्वालेश्वरमहादेव असें म्हणतात, तर त्यांच्या अर्धागीं विराजमान असलेल्या परमेश्वरीला ज्वालेश्वरीदेवी असें म्हणतात. नारायणोपनिषदांतही या अभिप्रायाने वर्णन केले आहे. "तस्य मध्ये वह्निशिखा अणीयोर्ध्वा व्यवस्थिता । नीलतोयदमध्यस्था विद्युल्लेखेव भास्वरा ॥" कंठस्थानाच्या खालीं वीतभर आणि नाभिप्रदेशाच्या ऊर्ध्वभागी हृत्कमलाचा निर्देश केलेला आहे. त्याच्यामध्ये वह्निशिखा म्हणजे अग्नीची ज्वाला दिसते. या ठिकाणी वह्निशिखा शब्दाने शुषुम्ना नाडी विवक्षित आहे. ती अग्नीच्या ज्वालेप्रमाणेंच दिसत असते. अत्यंत सूक्ष्म असते. उभी असते. पाण्यानें भरलेल्या ढगांत जशी वीज चमकावी त्याप्रमाणें ती भास्वर म्हणजे तेजस्वी दिसते. त्याच ठिकाणी साधकाला आत्मतत्त्वाचा साक्षात्कार होत असतो. "ज्वालमालाकुलं भाति विश्वस्यायतनं महत्" तें आत्मतत्त्व चोहोंकडून प्रकाशसमूहानें व्यापलेले दिसतें. विश्वाचे म्हणजे ब्रह्मांडाचे आयतन म्हणजे आधारभूत आहे. त्यालाच 'महत्' म्हणजे परब्रह्म असें म्हणतात. संवित्कमलामध्यें असलेल्या प्रकाश पुंजांत अग्निज्वालेप्रमाणें दिसणारी जी अत्यंत सूक्ष्म सुषुम्न नाडी आहे तिच्यांतच परमात्मतत्त्वाचा साक्षात्कार होत असतो. कारण तो तेथेंच प्रकटरूपानें आहे. "तस्याः शिखाया मध्ये परमात्मा व्यवस्थितः" असे त्याचें वर्णन केलेले आहे. त्यालाच नारायण असेंही म्हटलेले आहे. "नारायणः पर ब्रह्म तत्त्वं नारायणः परः । नारायणः परं ज्योतिरात्मा नारायणः परः" "स ब्रह्मा स शिवः सेन्द्रः सोक्षरः परमः स्वराट्" अशीं त्याला अनेक नांवें दिलेलीं आहेत. त्यालाच प्रकृतस्थलीं हंस असें म्हटले आहे. तो परमात्मा आपल्या शक्तीसह तेथें विराजमान असल्यामुळें त्याच्या शक्तीला हंसी असें म्हटलेले आहे. याप्रमाणें हृत्कमल, संवित्कमल आणि अनाहतचक्र ही तिन्ही कमलें वक्षस्थलींच असल्यामुळें त्यांचा व त्यांतील तत्त्वांचा एकरूपानें निर्देश केला गेला आहे. तात्पर्य, हंस आणि हंसी या रूपाने प्राणिमात्रांच्या हृदयांत शिवशक्तितत्त्व हें विराजमान झालेले आहे, ही गोष्ट निर्विवाद होय. याच अभिप्रायाने योगानुशासनांतही या हंसाच्या जोडीचे मोठे सुंदर वर्णन केलेलें आहे -

"अनुपममनभूति-स्वात्मसंवेद्यमाद्यं
वितत-सकल-विद्यालापमन्योन्यमुख्यम् ।
सकल-निगम-सारं सोऽहमोंकार-गम्यं
हृदृयकमल-मध्ये हंसयुग्मं नमामि ॥"

भूतमात्रांच्या हृत्कमलामध्यें विराजमान असलेल्या हंसाच्या जोडीला मी नमस्कार करतो. ती हंसाची जोडी मोठी अनुपम आहे. तिला उपमा देण्यासारखे या जगांत दुसरें कोणीच नाहीं. केवळ स्वतःच्या अनुभवानें स्वतःच जाणता येतें.  तें हंसाचें जोडपे सर्व विश्वाच्या अगोदरचें आहे. त्यांचे एकमेकांशी होत असलेले आलाप म्हणजे संभाषण हेंच सर्व विद्यांच्या रूपाने परिणत झालेलें आहे. त्या दोघांमध्ये कोण मुख्य आणि कोण गौण हें सांगतां येत नाहीं. दोघेंही एकरूप असल्यामुळें त्यांचा अंगागीभाव हा अनिर्वचनीय झालेला आहे. ते सर्व वेदांचे सारभूत; आहेत. "सोऽहं" हे त्यांचें स्वरूप आहे. सोऽहं यांतील सकार शक्तिस्वरूप आहे, तर हकार हा शिवस्वरूप आहे. या शिवशक्तीच्या तादात्म्याचेंच दुसरें रूप "हंसः" असें आहे. अशा रीतीनें सोऽहं आणि हंसः ही दोन्ही एकरूपच आहेत. सोऽहं यांतच अभिव्यक्त होणारा ॐकार हाच त्या हंसांची ओळख करून देऊं शकतो. माते जगज्जननी ! ही हंसाची जोडी म्हणजे तादात्म्यभावापन्न शिवशक्तिस्वरूप तूंच आहेस. हृत्कमलवर्ती हंस आणि हंसेश्वरीरूप तुम्हां दोघांना मी भक्तिभावानें भजत आहें. मी तुमचा आश्रय करीत आहें. मी तुमच्या चरणी प्रेमपूर्वक प्रणाम करीत आहे.

सोन्याच्या पत्र्यावर वर्तुळ काढून त्यांत कं हें बीज लिहावे. पंचेचाळीस दिवस पूजा करावी. या श्लोकाचा रोज एक हजार जप करावा. अकरा उडदाचे वडे, तांबूल, नारळ, आणि केळे यांचा नैवेद्य दाखवावा. तें यंत्र धारण करण्यास द्यावें. अथवा जल अभिमंत्रून प्रोक्षण करावे. लहान मुलांची सर्व अरिष्टे टळतील.

08 May, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक ३७ वा

विशुद्धौ ते शुद्ध-स्फटिक-विशदं व्योमजनकं
शिवं सेवे देवीमपि शिव-समान-व्यवसिताम् ।
ययोः कान्त्या यान्त्याः शशि-किरण-सारूप्यसरणे-
र्विधूतान्तर्ध्वान्ता विलसति चकोरीव जगती ॥ ३७॥


आई जगज्जननी ! कंठस्थानीं असलेल्या या षोडशदलात्मक विशुद्धिचक्राची अधिष्ठात्री देवता तूंच आहेस. तुझ्या या विशुद्धिचक्रामध्ये शुद्ध स्फटिकापमार्गे स्वच्छ असलेले भगवान् सदाशिव हे व्योमतत्त्वाचे जनक आहेत. व्योम म्हणजे आकाश. आकाशतत्त्व हे आत्मतत्त्वापासून अभिव्यक्त झालेले आहे. भगवान सदाशिव हे आत्मतत्त्वस्वरूपच आहेत. विशुद्धिचक्रामध्यें त्यांना व्योमेश्वर असे म्हणतात. आई ! मी त्यांची सेवा करीत आहे. त्याचप्रमाणे " शिवसमान-व्यवसितां त्वां देवीं अपि सेवे" विश्वाची उत्पत्ति, स्थिति, प्रलय, निग्रह आणि अनुग्रह इत्यादि सर्व कार्यें श्रीशंकराप्रमाणेच तूं आपल्याकडेही घेतलेली आहेस. तूं या विशुद्धिचक्रांतील देवी आहेस, मी तुझीही उपासना करीत आहें.

आई ! या विशुद्धिचक्रांत व्योमेश्वराच्या सान्निध्यांत विराजमान असलेली व्योमेश्वरी आहेस. चंद्राच्या किरणाप्रमाणें आह्लाद आणि प्रकाश देण्याचे जिचे सामर्थ्य आणि स्वभाव आहे ती तुम्हां दोघांची कांति भक्तांच्या अंतःकरणांत प्रसरण पावूं लागली असतां भक्तांचे जग हे अंतःकरणानें अधिक निर्मळ होतें. त्यांच्या अंतःकरणांतील अज्ञानरूपी तिमिर पार मावळून जातो. आणि चकोर पक्ष्याची स्त्री ज्याप्रमाणें चंद्राच्या प्रकाशाकडे पाहून आनंदित होते त्याचप्रमाणे तुझे भक्तही विशुद्धिचक्रामध्यें शिवशक्तिस्वरूपानें विराजमान असलेल्या तुम्हां दोघांकडे पाहून आनंदित होत असतात. आई ! मी तुम्हां दोघांनाही अनन्य चित्तानें भजत आहे.

चांदीच्या पत्र्यावर हे यंत्र काढून पूजा करावी. गूळ, नारळ आणि केळे यांचा नैवेद्य दाखवावा. पांच हजार या श्लोकाचा जप करून यंत्र धारण करावे अथवा पाणी अभिमंत्रून प्यावें. ब्रह्मराक्षसाची बाधा निवृत्त होईल.

07 May, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक ३६ वा

तवाज्ञाचक्रस्थं तपन-शशि-कोटि-द्युति-धरं
परं शम्भुं वन्दे परिमिलित-पार्श्वं परचिता ।
यमाराध्यन्भक्त्या रवि-शशि-शुचीनामविषये
निरालोकेऽलोके निवसति हि भालोकभवने ॥ ३६॥


छत्तीस श्लोकांपासून एक्केचाळीस श्लोकांपर्यंत आपल्या शरीरातील मूलाधारादि पदचक्रामध्ये शिवशक्तिस्वरूप श्रीत्रिपुरसुंदरीचे निरनिराळ्या रूपाने वास्तव्य असल्याचें वर्णन केले आहे. ही सहा चक्रे म्हणजे शरीरांतर्गत एक श्रीचक्रच होय अशा भावनेनेंही त्यांची उपासना केली जाते. या श्लोकांचे कांहीं विद्वानांनीं पुष्कळ विस्तृत विवेचन केलेले आहे. आम्ही मात्र ग्रंथविस्तारभयास्तव संक्षेपाने आवश्यक तोच अर्थ देत आहो. यांत एक विशेष लक्षांत घेण्यासारखा आहे तो असाः भूमध्यप्रदेशांतील द्विदल आज्ञाचक्र हें मनस्तत्त्वाचें आहे. येथील मनस्तत्त्व हें आत्मतत्त्वस्वरूप मानलेले आहे. " तस्माद्वा एतस्मादात्मन आकाशः सम्भूतः आकाशाद्वायुः" या श्रुतिवचनाप्रमाणें क्रमशः उत्पन्न झालेलीं पंचमहाभूततत्त्वें ही खालच्या चक्रांत सांगितलेली आहेत. त्यांत उपनिषदांतील उत्पत्तिकम आणि लयक्रम सोडून मणिपूरचक्रांत जलतत्त्वाचा व स्वाधिष्ठानचक्रांत अग्नितत्त्वाचा निर्देश केला आहे तो केवळ योगप्रक्रियेला आणि तांत्रिक प्रक्रियेला अनुलक्षून केलेला आहे. याच दृष्टीने नवव्या श्लोकांतही चक्रांचा क्रम बदललेला दिसेल. ही विसंगति टाळण्याकरितां कांहीं विद्वान् मणिपूरचक्राचें ठिकाण उपस्थाच्या मुळाशी मानतात व स्वाधिष्ठानचक्राचे ठिकाण नाभिस्थानाजवळ मानतात. पण हा स्थानविपर्यय बहुसंख्य योग्यांना व तांत्रिकांनाही मान्य असल्याचे दिसत नाहीं. आतां आपण क्रमाने या साही श्लोकांचा अर्थ पाहूं.

हे आई जगज्जननी ! माझ्या शरीरांत जी मूलाधारादि सहा चक्रे आहेत त्यांची अधिष्ठात्री तत्त्वतः तूंच आहेस म्हणून तीं सर्व चक्रे तुझीच आहेत ( श्लोक ९ पहा). त्यांतील माझ्या भूमध्यस्थानी असलेलें तुझें जें द्विदल आज्ञाचक्र आहे त्यामध्ये भगवान् शंभुनाथ हे तुझ्यासह विराजमान झाले आहेत. त्यांना परशंभुनाथ अथवा महाशंभुनाथ असेंही म्हणतात. आणि तुला त्या ठिकाणी चित्परांबा अथवा परचिदंबा असेंही म्हणतात. तेथें ते शंभुनाथ इतके तेजस्वी आहेत कीं, त्यांना पाहून तपन म्हणजे सूर्य आणि शशी म्हणजे चंद्र हे कोट्यवधि संख्येनें एकत्र झाले असतां जो प्रकाश आणि जो आह्लाद प्रतीतीस येईल तो प्रकाश आणि तो आह्लाद त्यांच्याकडे पाहून प्रतीतीस येतो. असें तेज त्यांनी धारण केलेलें आहे. परात्पर चित् शक्तिस्वरूप असलेल्या तुझ्या स्वरूपाशी त्यांच्या देहाचा वामभाग संमिलित झालेला आहे. भक्तियुक्त अंतःकरणाने त्यांची आराधना केली असतां तो भक्त अशा उत्तम लोकाला प्राप्त होतो कीं, त्या ठिकाणी चंद्र, सूर्य आणि अग्नि यांच्याही प्रकाशाला प्रवेश नाहीं. तेथें शुद्ध चित्तत्त्वाशिवाय दुसरा कोणताच प्रकाश नाहीं. त्याच्याच प्रकाशामुळे सर्व कांहीं प्रकाशत आहे. "न तत्र सूर्यो भाति न चन्द्रतारकं, नेमा विद्युतो भान्ति कुतोऽयमग्निः । तमेव भान्तमनुभाति सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाति ॥" असें त्याचें मुंडकोपनिषदांत वर्णन केलेले आहे. याच अभिप्रायाने त्याला "निरालोक" असें म्हटलेले आहे. तसेंच तो लोक "अलोक" म्हणजे विजन अर्थात पूर्ण एकान्त स्वरूपाचा आहे. तेथें पोहोचणारा हजारों लाखों लोकांमध्ये एखादा विरळाच असतो. आई ! तुझा भक्त तुझ्याच कृपेने त्या "भालोकभुवने" म्हणजे प्रकाश आणि आनंद यांचे स्थान असलेल्या अनिर्वचनीय आल्हाददायक अशा  स्थानांत तो सदासर्वकाळ विराजमान होऊन रहातो. तात्पर्य, आज्ञाचक्रांत अभिन्न शिव- शक्तिस्वरूप असलेल्या परशंभुनाथ आणि श्रीचित्परांबा देवी त्रिपुरसुंदरी यांच्या उपासनेचा केवढा हा प्रभाव आहे !

गंगा आणि यमुनास्वरूप असलेल्या इडा आणि पिंगला या दोन नाड्या मूलाधारचक्रापासून उगम पावतात आणि आज्ञाचक्रांत त्यांचा संगम होतो म्हणून या ठिकाणाला प्रयागराज असे म्हणतात. तेथून पुढें वरणा आणि असि या दोन माझ्या उगम पावून सहस्रदल कमलाकडे जावयास निघतात. वरणा आणि असि या दोन नाड्यांच्या मध्यभागी असलेल्या प्रदेशास वाराणसी असें म्हणतात. वाराणसी म्हणजेच काशी. या काशीक्षेत्राची अधिष्ठात्री देवता भगवान् विश्वनाथच आहेत. त्यांनाच शंभुनाथ असे म्हणतात. त्यांच्या अर्धांगीं चित्‌शक्तिरूप परांबा विराजमान झालेली आहे. प्राणप्रयाणसमयी जे कोणी भ्रूमध्यप्रदेशांत या शिवशक्तीचें स्मरण करतात त्यांना भगवान् शंकर तारकमंत्राचा उपदेश करतात. मृत्यूनंतर त्यांना या लोकाच्या उत्तरार्धांत सांगितलेल्या शिवलोकाची प्राप्ति होते. असाही एक अभिप्राय या श्लोकाचा लक्षांत घेण्यासारखा आहे.

सोन्याच्या पत्र्यावर वर्तुळ काढून त्या वर्तुळांत एकाखाली एक दुं दुं दुं अशी तीन बीजें लिहावींत. त्या तिन्ही बीजांच्या पुढें क्रमाने ठ, ष आणि श अशीं अक्षरे लिहावींत. पंचेचाळीस दिवस पूजा करावी. उडदाचे वडे आणि मध यांचा नैवेद्य दाखवावा. रोज एक हजार या श्लोकाचा जप करावा. ते यंत्र धारण करावे अथवा पाणी मत्रून प्यावयास द्यावे. नाना प्रकारचे कठीण रोग दूर होतील.

06 May, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक ३५ वा

मनस्त्वं व्योम त्वं मरुदसि मरुत्सारथिरसि
त्वमापस्त्वं भूमिस्त्वयि परिणतायां न हि परम् ।
त्वमेव स्वात्मानं परिणमयितुं विश्ववपुषा
चिदानन्दाकारं शिवयुवति भावेन बिभृषे ॥ ३५॥


हे आई जगजननी ! भ्रूमध्यप्रदेशी असलेल्या आज्ञाचक्रांतील मनस्तत्त्व म्हणजे मन तूंच आहेत. कंठस्थानीं असलेल्या विशुद्धिचक्रांतील आकाशतत्त्वही तूंच आहेस. हृदयाच्या जवळ असलेल्या अनाहत नांवाच्या संविच्चक्रांतील "मरुत' म्हणजे वायुतत्त्वही तूंच आहेस आणि उपस्थाच्या सान्निध्यांत असलेल्या स्वाधिष्ठानचक्रातील "मरुत्सारथि" म्हणजे अग्नितत्त्वही तूंच आहेस. वायु हा अग्नीचा मित्र असल्यामुळें त्याला मरुत्सारथि असें म्हटले आहे. मरुत म्हणजे वायु आणि सारथि म्हणजे साहाय्य करणारा. वायुचे साहाय्य असल्याशिवाय अग्नि प्रदीप्त होत नाहीं, हे तर प्रसिद्धच आहे. आई ! नाभिस्थानीं असलेल्या मणिपूरचक्रांतील आप म्हणजे जलतत्त्वही तूंच आहेस आणि मूलाधारचक्रांत असलेलें पृथ्वीतत्त्वही तूंच आहेस. मूलाधारचक्र हें गुदस्थानीं असल्याचें पूर्वी सांगितलेलेच आहे. तात्पर्य, पृथ्वी, जल, तेज, वायु आणि आकाश ही पंचमहाभूतें तूंच आहेस, "एवं त्वयि परिणतायां" याप्रमाणे पंचमहाभूतांच्या रूपाने तूं परिणाम पावली असतां "न ही परं" तुझ्यापेक्षा या जगांत निराळें असे कांहींच नाहीं.

"हे शिवयुवति ! त्वं एव स्वात्मानं विश्ववपुषा परिणमयितुं भावेन चिदानन्दाकारं बिमृषे" हे पार्वती ! तूंच स्वतःच्या रूपाला विश्वरूपानें परिणत करण्याकरितां अगदीं मनांतून मोठ्या हौसेनें चिदानन्दाकाराला "बिभृषे" म्हणजे धारण करतेस. चित् म्हणजे शक्तितत्त्व आणि आनंद म्हणजे शिवतत्त्व - या दोन्ही तत्त्वांच्या रूपाने तूंच नटतेस. अर्थात् शक्तीही तूंच आहेस आणि शिवही तूंच आहेस. सर्व कांहीं तूंच आहेस. कार्यही तूंच आहेस आणि कारणही तूंच आहेस. त्याचप्रमाणे सर्व कार्याचें व कारणांचे अधिष्ठानही तूंच आहेस. प्रकृतिरूपाने तूंच परिणत होतेस आणि अधिष्ठानरूपाने तूं निर्विकार रहातेस. आई ! तुला मी नमस्कार करतो.

हे यंत्र सोन्याच्या पत्र्यावर लिहून पंचेचाळीस दिवस पूजा करावी. दूध पायस आणि मध यांचा नैवेद्य दाखवावा. या श्लोकाचा रोज एक हजार जप करून हे यंत्र धारण करावे. रोज एक हिरडा अभिमत्रून सेवन करावा. यानें क्षयरोग जातो.

04 May, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक ३३ वा

स्मरं योनिं लक्ष्मीं त्रितयमिदमादौ तव मनोः
निधायैके नित्ये निरवधि-महाभोग-रसिकाः ।
भजन्ति त्वां चिन्तामणि-गुण-निबद्धाक्ष-वलयाः
शिवाग्नौ जुह्वन्तः सुरभि-घृत-धाराहुति-शतैः ॥ ३३॥


" हे नित्ये निरवधिमहाभोगरसिकाः एके तव मनोः आदौ स्मरं योनिं लक्ष्मीं इदं त्रितयं निधाय चिन्तामणिगुणनिबद्धाक्षवलयाः शिवाग्नौ सुरभिघृतधाराहुतिशतैः जुह्वन्तः त्वां भजन्ति" असा या श्लोकाचा अन्वय आहे. आई जगज्जननी ! तूं अनादि आणि अनंत असल्यामुळें तुला नित्या असें म्हणतात. तुझे कांहीं भक्त निरवधि म्हणजे निःसीम, अनंत आणि अपरिच्छिन्न असा "महाभोग" म्हणजे निरतिशय आनंद, ज्याच्या शतांशाने ब्रह्मदेवाच्याही आनंदाची तुलना करतां येणार नाही असा महान आनंद, त्या आनंदाचा रसास्वाद घेण्यांत रसिक म्हणजे तत्पर असलेले तुझे ज्ञानी भक्त तुझ्या पंचदशाक्षरी मंत्राच्या आरंभी "स्मर" म्हणजे काम अर्थात् कामबीज ऐं अथवा क्लीं हे अक्षर तसेंच "योनि" म्हणजे भुवनेश्वरी बीज अर्थात् ह्रीं हें अक्षर आणि लक्ष्मी म्हणजे श्रीं हें बीज अशा तीन बीजांचे पल्लव जोडतात. अर्थात् ही तीन बीजाक्षरें त्या मंत्राच्या आरंभीं योजून तुझा जप करीत असतात. हा जप करतांना त्यांनीं चिंतामणिरत्‍नाच्या मण्यांची तयार केलेली माळ आपल्या हातांत धारण केलेली असते. आपल्या हृत्कमलरूपी वेदीवर स्थापन केलेल्या शिवशक्तिस्वरूप अग्नीमध्ये मंत्ररूपी कामधेनूच्या तुपाच्या धारा - शेकडों हजारों धारा आहुति म्हणून अर्पण करीत करीत ते "त्वां भजन्ति" म्हणजे तुझी उपासना करीत असतात. असा या श्लोकाचा अन्वयानुसारी अर्थ आहे.

मागील श्लोकांत श्रीविद्येमध्यें घटक असलेल्या पंधरा अक्षरांचा निर्देश केला. या पंधरा अक्षरांत ककार हें पहिलें अक्षर असल्यामुळें या मंत्राला कादिविद्या म्हणतात हेही सांगितलें. त्याचप्रमाणे ही अक्षरें सर्व अक्षरप्रपंचाचे व सर्व तत्त्वांचें मूळ असल्याचा निर्देश केला. अक्षरप्रपंचांतून आणि तत्त्वप्रपंचांतून सर्व नामरूपात्मक विश्वप्रपंच निर्माण होत असल्यामुळें ही अक्षरें सर्व विश्वाची मूलभूत अक्षरें होत, हेही आपण पाहिले. ही पंधरा अक्षरें षोडशकलात्मक श्रीमहात्रिपुरसुंदरीचेच रूप असल्याचेंही आपण पाहिले. श्रीमंत्र, श्रीयंत्र, मातृकाप्रपंच, तत्त्वप्रपंच शब्दप्रपंच, विश्वप्रपंच, पिंड आणि ब्रह्मांड या सर्वांचा परस्परसंबंध, साम्य आणि ऐक्य या सर्व गोष्टींचा विचार केला. असा हा विश्वव्यापी मूलमंत्राचा महिमा लक्षांत घेतल्यानंतर त्या मंत्राच्या जपाचें फल निर्दिष्ट करणें हे क्रमप्राप्तच आहे. प्रस्तुत लोकाच्या मिषानें मूल विद्येचाच फलनिर्देश केला जात आहे.

यावर कोणी असे विचारील कीं, या श्लोकात पल्लवित मंत्रांचा निर्देश आहे. मूलमंत्राचा फलनिर्देश यात नाहीं. पण ही शंका बरोबर नाही. पल्लवित मंत्राच्या फलनिर्देशांतच मूलमंत्राचाही फलनिर्देश सामावलेला आहे. मुळमंत्रामध्यें घटक असलेल्या केवळ ही या बीजमंत्राच्या किंवा त्या बीजमंत्रांतही घटक असलेल्या केवळ "ईं" या बीजमंत्राच्या जपानेंही सर्व ऐश्वर्याची सुखें ज्याच्यावरून ओवाळून टाकावीत अशा नित्यनिरतिशय आनंदाचा लाभ होतो असें सांगितलें आहे. तेथें मूलपंचदशाक्षरी मंत्राचे फळ काय निराळें सांगावयास पाहिजे ? तें तर कैमुतिकन्यायानेंच सिद्ध होत आहे. यावर प्रश्न असा येईल कीं, जर निरवधिक सौख्याचा लाभ मूलपंचदशाक्षरी कादिविद्येनेंच प्राप्त होत असेल तर मग या श्लोकांत कांहीं लोक तीन बीजांचें पल्लव जोडून या मंत्राचा जप करतात असें वर्णन का केलें यावर "रुचिवैचित्र्य" हेंच उत्तर आहे. "भिन्नरुचिर्ही लोकः" हा लोकस्वभाव प्रसिद्धच आहे. ब्रह्मा, विष्णु, महेश, इंद्र, चंद्र, कुबेर, सूर्य, यमदेव, कामदेव, कार्तिकस्वामी, दुर्वास, मनु, अगस्ति आणि अगस्तिऋषींची पत्नी श्रीलोपामुद्रा, त्याचप्रमाणे नंदिराज या सर्वांनी श्रीविद्येच्या मूलमंत्रानेच आपले मनोरथ सिद्ध करून घेतलेले आहेत. हे सर्व श्रीविद्येचे द्रष्टे मानले जातात. आचार्यपुरस्कृत कादिविद्येचें द्रष्ट्टत्व श्रीदक्षिणामूर्तिदेवाकडे आहे. या सर्व देवांच्या व ऋषिमुनींच्या वैभवावरून त्यांनीं पुरस्कारिलेल्या मंत्राचे व अनुष्ठिलेल्या जपाचें माहात्म्य लक्षांत घ्यावे. याप्रमाणे प्रस्तुत मूल मंत्रांत संपूर्ण फल देण्याचें सामर्थ्य असतांना पल्लव, संपुट इत्यादि कल्पना केवळ रुचिवैचिन्यमुलक आहेत असेंच म्हणावे लागतें.

कांहीं लोक मागील  श्लोकांत लोपामुद्रापुरस्कृत हादिविद्या सांगितली आहे व या  श्लोकांत कामदेवपुरस्कृत कादिविद्या सांगितली आहे असें वर्णन करतात. हादिमंत्र आणि कादिमंत्र हे दोन्ही मंत्र पंचदशाक्षरीच आहेत. हादिमंत्र हा मोक्षफलदायी आहे तर कादिमंत्र हा भोगफलदायी आहे असा फलभेदही ते कल्पितात. आमच्या मते श्रीललितामहात्रिपुरसुंदरीचा कोणताही मंत्र उपासकाला अभीष्ट फल देण्याला समर्थ आहे. भोग किंवा मोक्ष हा फलमेद उपासकाच्या इच्छेवर अवलंबून आहे. याच अभिप्रायाने सप्तशतीमध्यें "आराधिता सैव नृणां भोगस्वर्गापवर्गदा " असे म्हटलेले आहे. आराधना करणाऱ्याच्या इच्छेप्रमाणे भोग म्हणजे ऐहिक सुखे, स्वर्ग म्हणजे पारलौकिक सुखें आणि मोक्ष म्हणजे दुःखाचा जेथे लेशही स्पर्श करूं शकत नाहीं असें नित्य आणि निरतिशय सुख, हें सर्व कांहीं ती जगन्माता देवी भवानी आपल्या भक्ताला देते असें वर्णन केलेले आहे. राजा सुरथ आणि समाधि नांवाचा वैश्य दोघांनींही देवीमाहात्म्य ऐकले, एकच अनुष्ठान केलें पण दोघांनाही फळें मात्र निरनिराळी मिळाली. प्रसन्न झालेल्या देवीनें वर मागा असें म्हटल्याबरोबर समाधिवैश्यानें अध्यात्मज्ञान वरले व तो मुक्त झाला. सुरथ राजानें मात्र चित्तांत वैराग्य नसल्यामुळे राज्यच मागितले. मरेपर्यंत राज्य भोगले आणि मेल्यानंतरही तो पुन्हा सावर्णि नांवाचा मनु राजाच झाला ! तात्पर्य, मंत्र आणि देवता समर्थ असली तरी फलभेद हा उपासकाच्या अधीनच असतो. याच न्यायाने महात्रिपुरसुंदरीस्वरूप असलेली कादिविद्या ही एक भोगैश्वर्यच देते आणि हादिविद्या ही मोक्ष देते असा फलभेद मानणे हें शास्त्रसंगत आणि युक्तिसंगत होऊं शकत नाहीं, ही गोष्ट लक्षांत घ्यावी.

मागील  श्लोकांत हादिविद्या सांगितली आहे असें म्हणणार्‍यांच्या मतानें मागील श्लोकांतील शिव शब्दाचा अर्थ ह, शक्ति शब्दाचा अर्थ स आणि काम शब्दाचा अर्थ क असा आहे. बाकीची सर्व अक्षरें मागील  श्लोकांत सांगितल्याप्रमाणेच समजावींत. याप्रमाणें पंधरा अक्षरांचा हादि मंत्र तयार होतो. चालू श्लोकांत स्मर शब्दाने क, योनि शब्दाने ए आणि लक्ष्मी शब्दाने ई अशीं ही तीन अक्षरे घ्यावींत व हादिविद्येतील पहिली तीन अक्षरे काढून त्यांच्या जागी तीं योजावीत म्हणजे या श्लोकाने कादिविद्येचाच निर्देश केला असें म्हणतां येतें.

"निरवधि-महा-भोग-रसिकाः" आचार्यानी साधकांना हें जें विशेषण दिले आहे तें मोठे मार्मिक आहे. "भुज्यते इति भोगः" या व्युत्पत्तीप्रमाणे भोग शब्दाचा अर्थ सुख आणि दुःख असा होतो. दुःख हा कधींच इच्छेचा व मिळविण्याचा विषय होऊं शकत नाही. ते अनपेक्षित रीतीनें पुढें येतें व भोगावे लागतें. घटपटादि इष्ट पदार्थ हे जरी इच्छेचा आणि मिळविण्याचा विषय होत असले तरी अंतत सुख हाच इच्छेचा व मिळविण्याच्या प्रयत्नाचा विषय मानावा लागतो. या दृष्टीने प्रकृतस्थलीं भोग शब्दाचा अर्थ सुख असाच करावा लागतो. भोगाला निरवधि आणि महा ही दोन विशेषणें दिलेली असल्यामुळें या ठिकाणी निरवधि-महाभोग शब्दानें नित्यनिरतिशय निजानंदरूपी सुखच घ्यावे लागतें. सामान्य मानवाच्या आनंदापासून तो ब्रह्मदेवाच्या आनंदापर्यंत विषयजन्य सर्व सुखें ही निरवधि आणि महा या विशेषणांना पात्र होत नाहींत. कारण तीं सर्व सुखे विषयजन्य असल्यामुळें नाशिवंत असतात व नित्य आणि निरतिशय सुख त्यांच्यापेक्षां निराळेंच असतें. त्याच सुखाला अपवर्ग म्हणतात. "अपवृज्यन्ते सांसारिकदुःखानि यत्र स अपवर्गः" जेथे सर्व सांसारिक दुःखे निराळी होतात, सुटतात, मावळतात ती अवस्था म्हणजेच अपवर्ग होय. तात्पर्य, निरवधि-महाभोग शब्दाचा अर्थ अपवर्ग म्हणजे मोक्ष असाच होतो. या अपवर्गसुखाचे रसिक म्हणजे उत्कंठेने आस्वाद घेणारे भक्त असा हा निरवधि-भहाभोग-रसिक या शब्दाचा अर्थ झाला. हे भक्त परम विरक्त असल्यामुळे कोणत्याही विषयवैभवाची अपेक्षा न करतां कादिविद्येनें श्रीललिता महात्रिपरसुंदरीची उपासना करीत असतात.

"चिन्तामणि-गुण-निबद्धाक्ष-वलयाः" चिंतामणि रत्‍नाप्रमाणे इष्ट फल देणाऱ्या, त्याचप्रमाणे गुणनितबद्ध म्हणजे रेशमाच्या दोऱ्यात गोंवलेल्या अथवा सोने, चांदी, तांबे इत्यादि निर्मल धातूंच्या तारेंत गांठलेल्या, अक्ष म्हणजे मण्यांची, वलय म्हणजे माला त्यांनीं आपल्या हातांत धारण केलेली असते. अक्षमाला या शब्दाचा एक निराळा अर्थ अभिप्रेत आहे. अक्ष म्हणजे अपासून क्ष पर्यंतचे सर्व वर्ण. यांत क्ष हा माळेतल्या मेरूच्या मण्याप्रमाणें सर्वांच्या वर ठेवून अ  पासून ळ  पर्यंत पन्नास वर्ण उलट्या आणि सुलट्या क्रमाने योजले म्हणजे शंभर संख्येची अक्षमालाच तयार होते. स्फटिक, विद्रुम (पोवळें), मौक्तिक, रुद्राक्ष, पद्याक्ष अथवा पुत्रवंती यांच्या मण्यांची माळ केल्यानंतर त्या माळेंतील मण्यांवर अक्षमालेंतील वर्णांची स्थापना करावयाची असते. याला मालासंस्कार असें म्हणतात. अशी ही संस्कारसंपन्न माला जपाचे फल त्वरित प्राप्त करून देणारी असते. अशा तऱ्हेची अक्षमाला ज्यांनीं आपल्या हातांत धारण केलेली आहे असे भक्त असा याचा अर्थ झाला.

आई त्रिपुरसुंदरी ! तुझे हे भक्त आपल्या संवित्कमलामध्यें अंतर्हृदयावकाशामध्यें मंगलमय वेदिका अथवा स्थंडिल निर्माण करून तेथें तुझें आवाहन करतात. मूर्धस्थानी असलेल्या सहस्रदलकमलांतील पूर्णचंद्रबिंबामध्ये तूं विराजमान झालेली असतेस. तेथून तुला ते आपल्या हृत्कमलामध्यें आणतात. तेथें तुझी स्थापना करतात. त्यांची इष्ट व उपास्य देवता तूं, तुलाच ते अग्नि कल्पून सन्निरोधन अवकुंठन त्याचप्रमाणे जातकर्मादि संस्कारही तें तुझ्या ठिकाणी करीत असतात. याप्रमाणे संस्कारसंपन्न उपास्यदेवतारूपी अग्नीमध्यें कामधेनूच्या दुधापासून तयार केलेल्या मंत्ररूपी पवित्र घृताच्या शेकडो आहुति ते अर्पण करीत असतात. या त्यांच्या मानसउपासनेमध्यें "ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम्" असा सर्व यागाचा थाट असतो. याला तंत्रशास्त्रांत "अन्तर्याग" असेंच नांव दिलेलें आहे. याप्रमाणे उपास्थदेवतेशी सर्वस्वीं समरस झाले ते शेवटीं उपास्यदेवतारूपच होतात. श्रीललितामहात्रिपुरसुंदरीस्वरूपच ते होतात. ही अवस्था निरवधिमहाभोगस्वरूप असल्यामुळें त्यांतच ते तन्मय होऊन रहातात. आई ! तुझ्या जपाचा हा केवढा महिमा आहे !

पहिल्या श्लोकांतील यंत्राप्रमाणेच या श्लोकाचें यंत्र सोन्याच्या पत्र्यावर काढावे. त्यांत क्लीं या बीजाऐवजी श्रीं हें बीज लिहावे. पंचेचाळीस दिवस पूजा करावी. मुगाची खिचडी मुगदळ आणि मध याचा नैवेद्य दाखवावा. या श्लोकाचा रोज एक हजार जप करावा. सिद्धयंत्र धारण करावे. विपुल धनाचा लाभ हें त्याचें फळ सांगितले आहे.