04 May, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक ३३ वा

स्मरं योनिं लक्ष्मीं त्रितयमिदमादौ तव मनोः
निधायैके नित्ये निरवधि-महाभोग-रसिकाः ।
भजन्ति त्वां चिन्तामणि-गुण-निबद्धाक्ष-वलयाः
शिवाग्नौ जुह्वन्तः सुरभि-घृत-धाराहुति-शतैः ॥ ३३॥


" हे नित्ये निरवधिमहाभोगरसिकाः एके तव मनोः आदौ स्मरं योनिं लक्ष्मीं इदं त्रितयं निधाय चिन्तामणिगुणनिबद्धाक्षवलयाः शिवाग्नौ सुरभिघृतधाराहुतिशतैः जुह्वन्तः त्वां भजन्ति" असा या श्लोकाचा अन्वय आहे. आई जगज्जननी ! तूं अनादि आणि अनंत असल्यामुळें तुला नित्या असें म्हणतात. तुझे कांहीं भक्त निरवधि म्हणजे निःसीम, अनंत आणि अपरिच्छिन्न असा "महाभोग" म्हणजे निरतिशय आनंद, ज्याच्या शतांशाने ब्रह्मदेवाच्याही आनंदाची तुलना करतां येणार नाही असा महान आनंद, त्या आनंदाचा रसास्वाद घेण्यांत रसिक म्हणजे तत्पर असलेले तुझे ज्ञानी भक्त तुझ्या पंचदशाक्षरी मंत्राच्या आरंभी "स्मर" म्हणजे काम अर्थात् कामबीज ऐं अथवा क्लीं हे अक्षर तसेंच "योनि" म्हणजे भुवनेश्वरी बीज अर्थात् ह्रीं हें अक्षर आणि लक्ष्मी म्हणजे श्रीं हें बीज अशा तीन बीजांचे पल्लव जोडतात. अर्थात् ही तीन बीजाक्षरें त्या मंत्राच्या आरंभीं योजून तुझा जप करीत असतात. हा जप करतांना त्यांनीं चिंतामणिरत्‍नाच्या मण्यांची तयार केलेली माळ आपल्या हातांत धारण केलेली असते. आपल्या हृत्कमलरूपी वेदीवर स्थापन केलेल्या शिवशक्तिस्वरूप अग्नीमध्ये मंत्ररूपी कामधेनूच्या तुपाच्या धारा - शेकडों हजारों धारा आहुति म्हणून अर्पण करीत करीत ते "त्वां भजन्ति" म्हणजे तुझी उपासना करीत असतात. असा या श्लोकाचा अन्वयानुसारी अर्थ आहे.

मागील श्लोकांत श्रीविद्येमध्यें घटक असलेल्या पंधरा अक्षरांचा निर्देश केला. या पंधरा अक्षरांत ककार हें पहिलें अक्षर असल्यामुळें या मंत्राला कादिविद्या म्हणतात हेही सांगितलें. त्याचप्रमाणे ही अक्षरें सर्व अक्षरप्रपंचाचे व सर्व तत्त्वांचें मूळ असल्याचा निर्देश केला. अक्षरप्रपंचांतून आणि तत्त्वप्रपंचांतून सर्व नामरूपात्मक विश्वप्रपंच निर्माण होत असल्यामुळें ही अक्षरें सर्व विश्वाची मूलभूत अक्षरें होत, हेही आपण पाहिले. ही पंधरा अक्षरें षोडशकलात्मक श्रीमहात्रिपुरसुंदरीचेच रूप असल्याचेंही आपण पाहिले. श्रीमंत्र, श्रीयंत्र, मातृकाप्रपंच, तत्त्वप्रपंच शब्दप्रपंच, विश्वप्रपंच, पिंड आणि ब्रह्मांड या सर्वांचा परस्परसंबंध, साम्य आणि ऐक्य या सर्व गोष्टींचा विचार केला. असा हा विश्वव्यापी मूलमंत्राचा महिमा लक्षांत घेतल्यानंतर त्या मंत्राच्या जपाचें फल निर्दिष्ट करणें हे क्रमप्राप्तच आहे. प्रस्तुत लोकाच्या मिषानें मूल विद्येचाच फलनिर्देश केला जात आहे.

यावर कोणी असे विचारील कीं, या श्लोकात पल्लवित मंत्रांचा निर्देश आहे. मूलमंत्राचा फलनिर्देश यात नाहीं. पण ही शंका बरोबर नाही. पल्लवित मंत्राच्या फलनिर्देशांतच मूलमंत्राचाही फलनिर्देश सामावलेला आहे. मुळमंत्रामध्यें घटक असलेल्या केवळ ही या बीजमंत्राच्या किंवा त्या बीजमंत्रांतही घटक असलेल्या केवळ "ईं" या बीजमंत्राच्या जपानेंही सर्व ऐश्वर्याची सुखें ज्याच्यावरून ओवाळून टाकावीत अशा नित्यनिरतिशय आनंदाचा लाभ होतो असें सांगितलें आहे. तेथें मूलपंचदशाक्षरी मंत्राचे फळ काय निराळें सांगावयास पाहिजे ? तें तर कैमुतिकन्यायानेंच सिद्ध होत आहे. यावर प्रश्न असा येईल कीं, जर निरवधिक सौख्याचा लाभ मूलपंचदशाक्षरी कादिविद्येनेंच प्राप्त होत असेल तर मग या श्लोकांत कांहीं लोक तीन बीजांचें पल्लव जोडून या मंत्राचा जप करतात असें वर्णन का केलें यावर "रुचिवैचित्र्य" हेंच उत्तर आहे. "भिन्नरुचिर्ही लोकः" हा लोकस्वभाव प्रसिद्धच आहे. ब्रह्मा, विष्णु, महेश, इंद्र, चंद्र, कुबेर, सूर्य, यमदेव, कामदेव, कार्तिकस्वामी, दुर्वास, मनु, अगस्ति आणि अगस्तिऋषींची पत्नी श्रीलोपामुद्रा, त्याचप्रमाणे नंदिराज या सर्वांनी श्रीविद्येच्या मूलमंत्रानेच आपले मनोरथ सिद्ध करून घेतलेले आहेत. हे सर्व श्रीविद्येचे द्रष्टे मानले जातात. आचार्यपुरस्कृत कादिविद्येचें द्रष्ट्टत्व श्रीदक्षिणामूर्तिदेवाकडे आहे. या सर्व देवांच्या व ऋषिमुनींच्या वैभवावरून त्यांनीं पुरस्कारिलेल्या मंत्राचे व अनुष्ठिलेल्या जपाचें माहात्म्य लक्षांत घ्यावे. याप्रमाणे प्रस्तुत मूल मंत्रांत संपूर्ण फल देण्याचें सामर्थ्य असतांना पल्लव, संपुट इत्यादि कल्पना केवळ रुचिवैचिन्यमुलक आहेत असेंच म्हणावे लागतें.

कांहीं लोक मागील  श्लोकांत लोपामुद्रापुरस्कृत हादिविद्या सांगितली आहे व या  श्लोकांत कामदेवपुरस्कृत कादिविद्या सांगितली आहे असें वर्णन करतात. हादिमंत्र आणि कादिमंत्र हे दोन्ही मंत्र पंचदशाक्षरीच आहेत. हादिमंत्र हा मोक्षफलदायी आहे तर कादिमंत्र हा भोगफलदायी आहे असा फलभेदही ते कल्पितात. आमच्या मते श्रीललितामहात्रिपुरसुंदरीचा कोणताही मंत्र उपासकाला अभीष्ट फल देण्याला समर्थ आहे. भोग किंवा मोक्ष हा फलमेद उपासकाच्या इच्छेवर अवलंबून आहे. याच अभिप्रायाने सप्तशतीमध्यें "आराधिता सैव नृणां भोगस्वर्गापवर्गदा " असे म्हटलेले आहे. आराधना करणाऱ्याच्या इच्छेप्रमाणे भोग म्हणजे ऐहिक सुखे, स्वर्ग म्हणजे पारलौकिक सुखें आणि मोक्ष म्हणजे दुःखाचा जेथे लेशही स्पर्श करूं शकत नाहीं असें नित्य आणि निरतिशय सुख, हें सर्व कांहीं ती जगन्माता देवी भवानी आपल्या भक्ताला देते असें वर्णन केलेले आहे. राजा सुरथ आणि समाधि नांवाचा वैश्य दोघांनींही देवीमाहात्म्य ऐकले, एकच अनुष्ठान केलें पण दोघांनाही फळें मात्र निरनिराळी मिळाली. प्रसन्न झालेल्या देवीनें वर मागा असें म्हटल्याबरोबर समाधिवैश्यानें अध्यात्मज्ञान वरले व तो मुक्त झाला. सुरथ राजानें मात्र चित्तांत वैराग्य नसल्यामुळे राज्यच मागितले. मरेपर्यंत राज्य भोगले आणि मेल्यानंतरही तो पुन्हा सावर्णि नांवाचा मनु राजाच झाला ! तात्पर्य, मंत्र आणि देवता समर्थ असली तरी फलभेद हा उपासकाच्या अधीनच असतो. याच न्यायाने महात्रिपुरसुंदरीस्वरूप असलेली कादिविद्या ही एक भोगैश्वर्यच देते आणि हादिविद्या ही मोक्ष देते असा फलभेद मानणे हें शास्त्रसंगत आणि युक्तिसंगत होऊं शकत नाहीं, ही गोष्ट लक्षांत घ्यावी.

मागील  श्लोकांत हादिविद्या सांगितली आहे असें म्हणणार्‍यांच्या मतानें मागील श्लोकांतील शिव शब्दाचा अर्थ ह, शक्ति शब्दाचा अर्थ स आणि काम शब्दाचा अर्थ क असा आहे. बाकीची सर्व अक्षरें मागील  श्लोकांत सांगितल्याप्रमाणेच समजावींत. याप्रमाणें पंधरा अक्षरांचा हादि मंत्र तयार होतो. चालू श्लोकांत स्मर शब्दाने क, योनि शब्दाने ए आणि लक्ष्मी शब्दाने ई अशीं ही तीन अक्षरे घ्यावींत व हादिविद्येतील पहिली तीन अक्षरे काढून त्यांच्या जागी तीं योजावीत म्हणजे या श्लोकाने कादिविद्येचाच निर्देश केला असें म्हणतां येतें.

"निरवधि-महा-भोग-रसिकाः" आचार्यानी साधकांना हें जें विशेषण दिले आहे तें मोठे मार्मिक आहे. "भुज्यते इति भोगः" या व्युत्पत्तीप्रमाणे भोग शब्दाचा अर्थ सुख आणि दुःख असा होतो. दुःख हा कधींच इच्छेचा व मिळविण्याचा विषय होऊं शकत नाही. ते अनपेक्षित रीतीनें पुढें येतें व भोगावे लागतें. घटपटादि इष्ट पदार्थ हे जरी इच्छेचा आणि मिळविण्याचा विषय होत असले तरी अंतत सुख हाच इच्छेचा व मिळविण्याच्या प्रयत्नाचा विषय मानावा लागतो. या दृष्टीने प्रकृतस्थलीं भोग शब्दाचा अर्थ सुख असाच करावा लागतो. भोगाला निरवधि आणि महा ही दोन विशेषणें दिलेली असल्यामुळें या ठिकाणी निरवधि-महाभोग शब्दानें नित्यनिरतिशय निजानंदरूपी सुखच घ्यावे लागतें. सामान्य मानवाच्या आनंदापासून तो ब्रह्मदेवाच्या आनंदापर्यंत विषयजन्य सर्व सुखें ही निरवधि आणि महा या विशेषणांना पात्र होत नाहींत. कारण तीं सर्व सुखे विषयजन्य असल्यामुळें नाशिवंत असतात व नित्य आणि निरतिशय सुख त्यांच्यापेक्षां निराळेंच असतें. त्याच सुखाला अपवर्ग म्हणतात. "अपवृज्यन्ते सांसारिकदुःखानि यत्र स अपवर्गः" जेथे सर्व सांसारिक दुःखे निराळी होतात, सुटतात, मावळतात ती अवस्था म्हणजेच अपवर्ग होय. तात्पर्य, निरवधि-महाभोग शब्दाचा अर्थ अपवर्ग म्हणजे मोक्ष असाच होतो. या अपवर्गसुखाचे रसिक म्हणजे उत्कंठेने आस्वाद घेणारे भक्त असा हा निरवधि-भहाभोग-रसिक या शब्दाचा अर्थ झाला. हे भक्त परम विरक्त असल्यामुळे कोणत्याही विषयवैभवाची अपेक्षा न करतां कादिविद्येनें श्रीललिता महात्रिपरसुंदरीची उपासना करीत असतात.

"चिन्तामणि-गुण-निबद्धाक्ष-वलयाः" चिंतामणि रत्‍नाप्रमाणे इष्ट फल देणाऱ्या, त्याचप्रमाणे गुणनितबद्ध म्हणजे रेशमाच्या दोऱ्यात गोंवलेल्या अथवा सोने, चांदी, तांबे इत्यादि निर्मल धातूंच्या तारेंत गांठलेल्या, अक्ष म्हणजे मण्यांची, वलय म्हणजे माला त्यांनीं आपल्या हातांत धारण केलेली असते. अक्षमाला या शब्दाचा एक निराळा अर्थ अभिप्रेत आहे. अक्ष म्हणजे अपासून क्ष पर्यंतचे सर्व वर्ण. यांत क्ष हा माळेतल्या मेरूच्या मण्याप्रमाणें सर्वांच्या वर ठेवून अ  पासून ळ  पर्यंत पन्नास वर्ण उलट्या आणि सुलट्या क्रमाने योजले म्हणजे शंभर संख्येची अक्षमालाच तयार होते. स्फटिक, विद्रुम (पोवळें), मौक्तिक, रुद्राक्ष, पद्याक्ष अथवा पुत्रवंती यांच्या मण्यांची माळ केल्यानंतर त्या माळेंतील मण्यांवर अक्षमालेंतील वर्णांची स्थापना करावयाची असते. याला मालासंस्कार असें म्हणतात. अशी ही संस्कारसंपन्न माला जपाचे फल त्वरित प्राप्त करून देणारी असते. अशा तऱ्हेची अक्षमाला ज्यांनीं आपल्या हातांत धारण केलेली आहे असे भक्त असा याचा अर्थ झाला.

आई त्रिपुरसुंदरी ! तुझे हे भक्त आपल्या संवित्कमलामध्यें अंतर्हृदयावकाशामध्यें मंगलमय वेदिका अथवा स्थंडिल निर्माण करून तेथें तुझें आवाहन करतात. मूर्धस्थानी असलेल्या सहस्रदलकमलांतील पूर्णचंद्रबिंबामध्ये तूं विराजमान झालेली असतेस. तेथून तुला ते आपल्या हृत्कमलामध्यें आणतात. तेथें तुझी स्थापना करतात. त्यांची इष्ट व उपास्य देवता तूं, तुलाच ते अग्नि कल्पून सन्निरोधन अवकुंठन त्याचप्रमाणे जातकर्मादि संस्कारही तें तुझ्या ठिकाणी करीत असतात. याप्रमाणे संस्कारसंपन्न उपास्यदेवतारूपी अग्नीमध्यें कामधेनूच्या दुधापासून तयार केलेल्या मंत्ररूपी पवित्र घृताच्या शेकडो आहुति ते अर्पण करीत असतात. या त्यांच्या मानसउपासनेमध्यें "ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम्" असा सर्व यागाचा थाट असतो. याला तंत्रशास्त्रांत "अन्तर्याग" असेंच नांव दिलेलें आहे. याप्रमाणे उपास्थदेवतेशी सर्वस्वीं समरस झाले ते शेवटीं उपास्यदेवतारूपच होतात. श्रीललितामहात्रिपुरसुंदरीस्वरूपच ते होतात. ही अवस्था निरवधिमहाभोगस्वरूप असल्यामुळें त्यांतच ते तन्मय होऊन रहातात. आई ! तुझ्या जपाचा हा केवढा महिमा आहे !

पहिल्या श्लोकांतील यंत्राप्रमाणेच या श्लोकाचें यंत्र सोन्याच्या पत्र्यावर काढावे. त्यांत क्लीं या बीजाऐवजी श्रीं हें बीज लिहावे. पंचेचाळीस दिवस पूजा करावी. मुगाची खिचडी मुगदळ आणि मध याचा नैवेद्य दाखवावा. या श्लोकाचा रोज एक हजार जप करावा. सिद्धयंत्र धारण करावे. विपुल धनाचा लाभ हें त्याचें फळ सांगितले आहे. 

No comments: