09 May, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक ३८ वा

समुन्मीलत्संवित्कमल-मकरन्दैक-रसिकं
भजे हंसद्वन्द्वं किमपि महतां मानस-चरम् ।
यदालापादष्टादश-गुणित-विद्या-परिणति-
र्यदादत्ते दोषाद् गुणमखिलमद्भ्यः पय इव ॥ ३८॥


आई जगज्जननी ! हें माझ्या हृदयाच्या सान्निध्यांत असलेलें अनाहतचक्र हें तुझेंच आहे. यालाच संवित्कमल असें म्हणतात. कांहीं विद्वान् संवित्कमल शब्दानें वक्षस्थलामध्यें असलेलें निराळेंच अष्टदलकमल घेतात; पण तें बरोबर नव्हे. क्रमाने षट्चक्रांचे वर्णन चालू असतां क्रमप्राप्त अनाहतचक्र सोडून मध्येंच दुसऱ्या चक्राचा निर्देश आचार्य करणार नाहीत. हें कमल बारा पाकळ्यांचें आहे. याच्या प्रत्येक दलांत एक एक आदित्यदेवता विराजमान झालेली आहे. द्वादश आदित्यांचा प्रकाश या ठिकाणी सदैव विलसत असतो. ज्ञानाचे - आत्मज्ञानाचेंही तेंच स्थान असल्यामुळें त्याला संवित्कमल असें म्हणतात. "समुन्मीलत्" म्हणजे उत्तम रीतीनें विकसित होणाऱ्या या संवित्कमलांतील मकरंदाचा - पुष्परसाचा प्रामुख्याने आस्वाद घेण्यामध्यें रसिक म्हणजे तत्पर असलेले असे दोन हंस तेथें आहेत. एक हंस आणि एक हंसी. मानसरोवरामध्ये जसे राजहंस असावेत त्याचप्रमाणे योगीजनांच्या अथवा भक्तजनांच्या मानस म्हणजे अंतःकरणरूपी सरोवरामध्यें संचार करणारे ते जसे कांहीं हंसच आहेत. हे दोन हंस म्हणजे एक साक्षात् भगवान् सदाशिव आणि दुसरी प्रत्यक्ष तूंच आदिमाया महाशक्ति. तुम्हा दोघांना या अनाहतचक्रामध्ये हंसेश्वर आणि हंसेश्वरी असे म्हणतात. त्यांचें स्वरूप 'किमपि' म्हणजे अनिर्वचनीय आहे. त्या राजहंसांच्या एकमेकांशी होणाऱ्या संवादांतूनच अठरा विद्यांची परिणति म्हणजे विकास झालेला आहे. या अठरा विद्या म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. त्याचप्रमाणे या चारी वेदांचे चार उपवेद. आयुर्वेद, धतुर्वेद, गांधर्ववेद आणि स्थापत्यवेद म्हणजे शिल्पशास्त्र. तसेंच शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, ज्योतिष आणि छन्दःशास्त्र ही सहा वेदांची अंगें आणि पूर्वोत्तर मीमांसाशास्त्र (मीमांसा आणि वेदान्त), न्यायशास्त्र, पुराण आणि धर्मशास्त्र. चौसष्ट कला आणि तंत्रशास्त्र वगैरे इतर विद्या या सर्वांचा या अठरा विद्यांतच अंतर्भाव होतो. राजहंस ज्याप्रमाणें एकत्र मिसळलेले दूध आणि पाणी यांचें पृथक्करण करतात त्याचप्रमाणे आई ! राजहंसस्वरूप असलेले तुम्ही दोघे देखील भक्तजनांच्या गुणदोषांचे पृथक्करण करून दोष बाजूला सारतां आणि गुणांचे ग्रहण करतां ! शंकरांनी लोकांना ताप देणारे विष कंठांत घातलें आणि आह्लाद देणारा चंद्र मस्तकावर धारण केला ! आई, मी तुम्हा दोघांना मनःपूर्वक भजत आहे.

कांहीं लोक या संवित्कमलामध्यें असलेल्या परमेश्वराला तो अग्नीच्या ज्वालेप्रमाणे असल्यामुळें ज्वालेश्वरमहादेव असें म्हणतात, तर त्यांच्या अर्धागीं विराजमान असलेल्या परमेश्वरीला ज्वालेश्वरीदेवी असें म्हणतात. नारायणोपनिषदांतही या अभिप्रायाने वर्णन केले आहे. "तस्य मध्ये वह्निशिखा अणीयोर्ध्वा व्यवस्थिता । नीलतोयदमध्यस्था विद्युल्लेखेव भास्वरा ॥" कंठस्थानाच्या खालीं वीतभर आणि नाभिप्रदेशाच्या ऊर्ध्वभागी हृत्कमलाचा निर्देश केलेला आहे. त्याच्यामध्ये वह्निशिखा म्हणजे अग्नीची ज्वाला दिसते. या ठिकाणी वह्निशिखा शब्दाने शुषुम्ना नाडी विवक्षित आहे. ती अग्नीच्या ज्वालेप्रमाणेंच दिसत असते. अत्यंत सूक्ष्म असते. उभी असते. पाण्यानें भरलेल्या ढगांत जशी वीज चमकावी त्याप्रमाणें ती भास्वर म्हणजे तेजस्वी दिसते. त्याच ठिकाणी साधकाला आत्मतत्त्वाचा साक्षात्कार होत असतो. "ज्वालमालाकुलं भाति विश्वस्यायतनं महत्" तें आत्मतत्त्व चोहोंकडून प्रकाशसमूहानें व्यापलेले दिसतें. विश्वाचे म्हणजे ब्रह्मांडाचे आयतन म्हणजे आधारभूत आहे. त्यालाच 'महत्' म्हणजे परब्रह्म असें म्हणतात. संवित्कमलामध्यें असलेल्या प्रकाश पुंजांत अग्निज्वालेप्रमाणें दिसणारी जी अत्यंत सूक्ष्म सुषुम्न नाडी आहे तिच्यांतच परमात्मतत्त्वाचा साक्षात्कार होत असतो. कारण तो तेथेंच प्रकटरूपानें आहे. "तस्याः शिखाया मध्ये परमात्मा व्यवस्थितः" असे त्याचें वर्णन केलेले आहे. त्यालाच नारायण असेंही म्हटलेले आहे. "नारायणः पर ब्रह्म तत्त्वं नारायणः परः । नारायणः परं ज्योतिरात्मा नारायणः परः" "स ब्रह्मा स शिवः सेन्द्रः सोक्षरः परमः स्वराट्" अशीं त्याला अनेक नांवें दिलेलीं आहेत. त्यालाच प्रकृतस्थलीं हंस असें म्हटले आहे. तो परमात्मा आपल्या शक्तीसह तेथें विराजमान असल्यामुळें त्याच्या शक्तीला हंसी असें म्हटलेले आहे. याप्रमाणें हृत्कमल, संवित्कमल आणि अनाहतचक्र ही तिन्ही कमलें वक्षस्थलींच असल्यामुळें त्यांचा व त्यांतील तत्त्वांचा एकरूपानें निर्देश केला गेला आहे. तात्पर्य, हंस आणि हंसी या रूपाने प्राणिमात्रांच्या हृदयांत शिवशक्तितत्त्व हें विराजमान झालेले आहे, ही गोष्ट निर्विवाद होय. याच अभिप्रायाने योगानुशासनांतही या हंसाच्या जोडीचे मोठे सुंदर वर्णन केलेलें आहे -

"अनुपममनभूति-स्वात्मसंवेद्यमाद्यं
वितत-सकल-विद्यालापमन्योन्यमुख्यम् ।
सकल-निगम-सारं सोऽहमोंकार-गम्यं
हृदृयकमल-मध्ये हंसयुग्मं नमामि ॥"

भूतमात्रांच्या हृत्कमलामध्यें विराजमान असलेल्या हंसाच्या जोडीला मी नमस्कार करतो. ती हंसाची जोडी मोठी अनुपम आहे. तिला उपमा देण्यासारखे या जगांत दुसरें कोणीच नाहीं. केवळ स्वतःच्या अनुभवानें स्वतःच जाणता येतें.  तें हंसाचें जोडपे सर्व विश्वाच्या अगोदरचें आहे. त्यांचे एकमेकांशी होत असलेले आलाप म्हणजे संभाषण हेंच सर्व विद्यांच्या रूपाने परिणत झालेलें आहे. त्या दोघांमध्ये कोण मुख्य आणि कोण गौण हें सांगतां येत नाहीं. दोघेंही एकरूप असल्यामुळें त्यांचा अंगागीभाव हा अनिर्वचनीय झालेला आहे. ते सर्व वेदांचे सारभूत; आहेत. "सोऽहं" हे त्यांचें स्वरूप आहे. सोऽहं यांतील सकार शक्तिस्वरूप आहे, तर हकार हा शिवस्वरूप आहे. या शिवशक्तीच्या तादात्म्याचेंच दुसरें रूप "हंसः" असें आहे. अशा रीतीनें सोऽहं आणि हंसः ही दोन्ही एकरूपच आहेत. सोऽहं यांतच अभिव्यक्त होणारा ॐकार हाच त्या हंसांची ओळख करून देऊं शकतो. माते जगज्जननी ! ही हंसाची जोडी म्हणजे तादात्म्यभावापन्न शिवशक्तिस्वरूप तूंच आहेस. हृत्कमलवर्ती हंस आणि हंसेश्वरीरूप तुम्हां दोघांना मी भक्तिभावानें भजत आहें. मी तुमचा आश्रय करीत आहें. मी तुमच्या चरणी प्रेमपूर्वक प्रणाम करीत आहे.

सोन्याच्या पत्र्यावर वर्तुळ काढून त्यांत कं हें बीज लिहावे. पंचेचाळीस दिवस पूजा करावी. या श्लोकाचा रोज एक हजार जप करावा. अकरा उडदाचे वडे, तांबूल, नारळ, आणि केळे यांचा नैवेद्य दाखवावा. तें यंत्र धारण करण्यास द्यावें. अथवा जल अभिमंत्रून प्रोक्षण करावे. लहान मुलांची सर्व अरिष्टे टळतील.

No comments: