10 April, 2008

आनंदाचे लाडू घ्यारे तुम्ही

आनंदाचे लाडू घ्यारे तुम्ही

प्रारब्ध कर्माचा क्षय ती भोगल्यानेच होत असतो, म्हणून जीवनमुक्तांनाही देह पडेपर्यंत प्रारब्धकर्म करावीं लागतात व त्याच बरोबर भोगावी लागतात, असा वेदान्ताचा सिद्धांत आहे. आणि त्याच बरोबर अनेक जीवनमुक्त संत महात्म्यांच्या चरित्रावरून तर या प्रमेयाला बळकटी येते. अधिकच.

हे उरलेले प्रारब्धकर्म जन-कल्याणसाठी, जन समाज प्रबोधनासाठीं, लोकांच्या मनांत परमार्थाचे ज्ञान ठसविण्यासाठी असते असे सामान्यतः दिसून येते. "प्रारब्ध शेष उरले जननिश्चयाला" - श्रीतुकोबाराय पण ग्वाहीपूर्वक सांगतात कीं - "तुका म्हणे आतां । उरलो उपकारापुरतां ॥" संतांच्या या कर्मयोगाने जगाची, समाजाची पारमार्थिक उन्नती होत असते.

’कां फोडीत पापताप । पोखीत तिरींचे पादप ।
समुद्रा जाय आप । गंगेचे जैसे ॥
तैसी बांधिली सोडीत । बुडालीं काडत ।
सांकडी फेडीत । आर्तांचिया ॥
किंबहुना दिवसराती । पुढिलांचे सुख उधळती ।
आणित आणित स्वार्थी । प्रवेशिजे ॥

वरील सुंदर ओव्यांत श्रीज्ञानराज माऊलींनी वर्णिल्याप्रमाणे देह पडेपर्यंत नराला नारायण करण्याचे व याच प्रकारे, याच मार्गांनी व्यक्तिमात्राला व त्यामुळे समाजाला स्वरूपसुखशांती प्राप्त करून देण्याचे व्रत संत आचरीत असतात. मानवाला आपल्या मूलभूत भगवत तत्त्वाचे, परमतत्त्वाचे सतत स्मरण देऊन, भगवंतस्वरूप होण्याचा मार्ग दाखविण्याचे महत्‌कार्य या संत माहात्म्यांकडून सतत, सहजतेने घडत असते. "सहज बोलणे हित उपदेश । करोनि सायास शिकविती॥". आणि साधन मार्ग काय म्हणाल तर एकच - "नामस्मरण".

म्हणूनच त्यांची ही थोरवी अनेक थोर थोर संत पुरुषांनी अगदी मुक्त कंठाने व प्रेम, कृतज्ञता व अत्यंत आदर या भावनांनी दाटलेल्या अंतःकरणाने गायिली आहे. तत्त्वज्ञ म्हणतात - They are the salt of the Earth. "हे महात्मे म्हणजे जगाला सुपीकता व रस देणारे मीठ होत" - ते नसतील तर जगांत सगुणांचे व शाश्वत सुखरुपतेचें पीक येणार नाही.

अपूर्णातून पूर्णाकडे जाण्याचा मनुष्य सदा प्रयत्न करीत असतो. परंतु बहुतेकांना एकदेशी पूर्णतेचे आकर्षण वाटते. थोड्याच जणांना सर्वांगीण पूर्णतेचे आकर्षण वा ओढ असते. थोडेच प्रयत्न करतात. हीच नवजागृति किंवा परमार्थप्रवृत्ति.

परमार्थ साधनेने परमानंदाची प्राप्ती. परमानंदाने जीवनांतील अध्यात्मिक, अधिभौतिक व अधिदैविक अशा तापत्रयाचा नाश. सर्वाभूतीं आत्मभाव, व त्या योगे विश्वात्मक भाव. मग "सर्वही सुखरूप असावेत" असा एकच एक जीवनहेतू उरतो. संकुचित स्वार्थाचे स्मरणही राहात नाही. मग भगवंतच खरा, इतर सर्व आभास असा निश्चय/अनुभव. या अनुभवाने विश्वाचे कोडे सुटतें आणि भक्तिप्रेमभाव, निर्भयता, आदर, देव-भक्तांचे ऐक्य, आणि ऐक्यातून होणारी "भक्तिप्रेमसुखसेवा" या भावनांबरोबर एकरूपता अनुभवत, भ्रांतीनाश होतो, संशयरहितता येते. या आत्मानंदरूप स्थितीने भावनांना, भक्तिला, प्रेमाला, भक्ति-भाव-प्रेमाला पूर्णत्व येते. त्याचबरोबर विश्वात्मक भावाने त्यांच्या क्रियाशक्तीच्या व्यापाराला (WILL) पण पूर्णता येते.

हीच मानवी जीवनाची सफलता, सार्थकता, कृतार्थता, धन्यता, स्वरूप सुखाची परमोच्च अवस्था. मग "याचि देही याचि डोळां । भोगिजे मुक्तिचा सोहळा ॥" असा शेवटचा दिवस गोड होतो. आपण केलेल्या नामसाधनेचें (नामस्मरणाचें) असे मधुर, रसाळ, परिपक्व महान फळ आलेले पाहून स्वतःचे स्वतःलाच मोठे कौतुक वाटते. मुक्तीशी लग्न लावून, साक्षात्कारी महात्मा, जीवनमुक्त अवस्थेतील आपले उरलेले जीवन भक्ति-प्रेम सुखाच्या खेळीमेळींत आनंद लुटत असतांना आपल्याला मिळालेला आनंद जगाला वाटत असतो.

"सेवितो हा रस, वाटी तो आणिका ।
घ्यावे होऊ नकां रानभरी ॥
तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू ।
नका चडफडूं घ्यारें तुम्ही ॥ "
’देवाचा प्रसाद घ्या’ , ’आनंद व्हा’ हीच त्यांची तळमळ आणि आनंद होण्याचे साधन एकच - देवाचे "नाम".

अण्णा -

No comments: