07 November, 2010

श्रीमद् भागवत - स्कंध अकरावा - अध्याय पहिला (भाग - १)


श्रीशुक उवाच ।
कृत्वा दैत्यवधं कृष्णः सरामो यदुभिर्वृतः ।
भुवोऽवतारयद् भारं जविष्ठं जनयन् कलिम् ॥ १ ॥
ये कोपिताः सुबहु पाण्डुसुताः सपत्‍नैः ।
दुर्द्यूतहेलनकचग्रहणादिभिः तान् ।
कृत्वा निमित्तमितरेतरतः समेतान् ।
हत्वा नृपान् निरहरत् क्षितिभारमीशः ॥ २ ॥
भूभारराजपृतना यदुभिर्निरस्य ।
गुप्तैः स्वबाहुभिः अचिन्तयद्-अप्रमेयः ।
मन्येऽवनेर्ननु गतोऽप्यगतं हि भारं ।
यद्-यादवं कुलमहो अविषह्यमास्ते ॥ ३ ॥
नैवान्यतः परिभवोऽस्य भवेत् कथञ्चिन् ।
मत्संश्रयस्य विभवोन्नहनस्य नित्यम् ।
अन्तः कलिं यदुकुलस्य विधाय वेणु ।
स्तम्बस्य वह्निमिव शान्तिमुपैमि धाम ॥ ४ ॥
एवं व्यवसितो राजन् सत्यसङ्कल्प ईश्वरः ।
शापव्याजेन विप्राणां संजह्रे स्वकुलं विभुः ॥ ५ ॥ 
 या अध्यायातील पहिल्या पाच श्लोकात सांगितले आहे की जे लोक आपल्या व्यवहाराने दुष्ट दैत्य, दानव बनले होते त्यांचा श्रीकृष्णाने वध करविला. भुवोऽवतारयद् भारम् - पृथ्वीवरील भार हलका केला. कशा प्रकारे ? मग वर्णन येते की पाण्डवांच्या मनांत कोप निर्माण केला, त्यांना क्षुब्ध केले. कौरवांनी पाण्डवांशी द्यूत - छल करून त्यांच्या सर्व संपत्तीचे हरण केले, त्यांचा तिरस्कार केला, त्यांच्या पत्‍नीचे, द्रौपदीचे, केस धरून तिला फरफटत नेऊन अपमानित केले. त्या आधी त्यांच्यावर विषप्रयोग केले होते, त्यांना भस्मसात करण्याचा प्रयत्‍न केला होता. आता त्या सर्व कृत्यांची सीमा गाठली होती. हे सर्व भगवंतांनीच घडवून आणले. कां ? कारण असे केल्याशिवाय शांतिप्रेमी पाण्डव खवळणे अशक्य होते. आणि ते खवळल्याशिवाय दुष्ट कौरव (आणि त्यांचे समर्थन करणारे सर्वच) यांचा नाश करण्याचे सामर्थ्य आणखी कोणात नव्हते.
मन्ये अवनेः ननु गतो अपि अगतं भारम् - भारत युद्ध झाले. मग भार हलका झाला का ? पण भगवंताला अजून पूर्णपणे भार हलका झाला असे वाटेना. यादवांना बलाढ्य करून असंख्य दुष्ट मारले, पण आता यादवच शिरजोर झाले आहेत. कापूर खाऊन अग्नि वाढतो पण कापूर संपला की अग्नीही विझून जातो. त्याप्रमाणे यादवांनी संहार केला, आता त्यांच्या विनाशाची वेळ आली. कारण श्रीकृष्णाच्या कृपेने यादव बाहुबळाने वाढले होते. त्यांना शासन करणारा शास्ता उरला नाही. बल संपती वाढली की मग गर्विष्ठपणा कुकर्माला प्रवृत्त करतो. मग आता काय करावे ? अंतःकलिं यदुकुलस्य विधाय - अशावेळी सर्वात सोपे असते ते समूहामध्ये आपापसांतच संशय, कलह निर्माण करून, आपसांतच भांडणे लाऊन, त्यांनाच परस्पर एकमेकाशी जुंपून, त्यांची शक्ति क्षीण करून सर्वनाश घडवून आणणे. श्रीकृष्णांनी हेच केले.
शापव्याजेन विप्राणाम् - पण असे होण्यास काहीतरी निमित्त लागतेच. मग ऋषी-मुनींकडून शाप दिला गेला. बल संपत्तीने मद चढतो तेव्हां इतरांची टिंगल करण्यात काहीच गैर वाटत नाही. ऋषी-मुनींची यादवांनी खोड काढली आणि ते कपट जाणून ऋषींनी शाप दिला, वाग्‍वज्र सोडले - "हे मुसळ तुमच्या कुळाचा काळ होईल" (ती कथा पुढे येणारच आहे)
पण अशा शापाने कुलनाश कसा घडतो ? कोण्या तपस्व्याने शाप दिला (आणि विशेषतः शाप देणार्‍याचे बल माहीत असते तेव्हां तर) मनुष्य काय, अख्खा समाज हादरून जातो. माझा, आपला नाश होणार हा विचार (negative thought) आणि त्याचे भय हेच आपल्यामध्ये अशा गोष्टी घडवून आणते. Positive thoughts दृढ व्हायला तप करावे लागते. नदीच्या प्रवाहाच्या उलट पोहण्यासारखे असते ते. नकारात्मक विचार नदीच्या प्रवाहाप्रमाणे मनुष्याला उच्च अवस्थेपासून खाली ओढतात. सखल भागाकडे वाहणे हा जसा नदीचा स्वभाव तसेच मनुष्य स्वभावाचेही आहे. नकारात्मक विचार कोणा व्यक्तीचा, समाजाचा अथवा संपूर्ण राष्ट्राचाही विनाश घडवू शकतात.
इथे विचार करण्यासारख्या दोन गोष्टींचे दर्शन होते. तपाने मनःशक्ति संयत झाली की ती शक्ति काहीही घडवून आणू शकते. धारणेने मनःशक्ति एकवटली तर - येणें काही न निपजे । ऐंसे नाही ॥ (ज्ञानेश्वरी) पण केवळ मनाची शक्ति वाढविल्याने मन समचित्त होईल ? मनांत चराचराविषयी समभाव, प्रेमभाव स्थिर होईल ? कठीण आहे. त्याला परत आणखी विशेष प्रयत्‍नांची जोड लागते. विवेकाची जोड लागते. एवढे तपस्वी ऋषीमुनि. पण "माझी चेष्टा करतोस काय ?" या विचाराने देखील क्षुब्ध झालेच की ? असो. संयत मनाची वाग्‍वज्र सोडताच तसे घडवून आणण्याची ही शक्ति, मग असंयत, सदा भयाने, नकारात्मक विचारांनी ग्रासलेले मन त्याच नियमानुसार स्वनाश घडवून आणण्यास कारण होतेच.
आणखी थोडे चिंतन केल्यास कळून येते की आपल्या जीवनांत दोष आहेतच, पण ते दोषही विपरीत, उलट धारणा केल्याने दूर होऊ शकतात. मनांत काम उठला तर ब्रह्मचर्याचा संकल्प करावा, क्रोध आला तर लगेच ’मी क्रोधाला वश होणार नाही’ असा संकल्प करावा. लाचखोरीचा विचार आला - तर सावधान होऊन मनाला सांगावे, असे केल्याने नरकप्राप्ती निश्चितच. एकूण कामाच्या, लोभाच्या, क्रोधाच्या, अहिंसेच्या, असत्याच्या प्रत्येक विचारापुढे त्याच्या विपरीत संकल्प उभा करायचा. असे एक-दोनदा नाही, तर सतत. सद्‌गुणांची वृद्धी करीत, दुर्गुणांवर मात करीत सर्व दोषांची निवृत्ति होईपर्यंत. यालाच ’योग’ म्हणतात ना ? जर साधन केले नाही तर आपल्याच बेसावधपणामुळे, जडवून घेतलेल्या मूर्ख संवयींमुळे जे दोष निर्माण झाले आहेत ते सुटणार कसे ? आणि जरी आज दुःखमय परिस्थिती नसली तरी या सवयी, हे दोष उद्या नाहीतर परवा दुःख निर्माण करणारच.
आता कोणी म्हणेल, काम, क्रोध, लोभ सोडा हो ! संपूर्ण संसारच विक्षेपमय आहे त्याचे काय ? असेना. त्यावर मन शांतचित्त करणे हा उपाय आहेच की. पण आपले मन शांत राहावे यासाठी आपण किती प्रयत्‍न करतो ? ते सदा इकडे तिकडे भटकत राहून इंद्रियांना विषयात गुण्तवण्यात व्यग्र असते. मग विषय मनासारखा नसेल तर चिडचिड होते. निद्रा काळीच मन विश्राम पावते. एरव्ही ते सदा अशांतच असते. मग त्याला प्रयत्‍नपूर्वक शांत करण्याची गरज आहे. आपल्याला जर विक्षेपित होऊ नये असे वाटत असेल तर मनाचा विक्षेपित होण्याचा स्व-भाव आपल्यालाच बदलायला हवा.
यदुवंश व पाण्डव यांच्या साहाय्याने दुष्ट प्रवृत्तींचा विध्वंस - म्हणजेच तमोगुणी, रजोगुणी वृत्तींच्या अतिरेकास सात्विक वृत्तींचा आश्रय घेऊन विध्वंस करविला. सात्विक वृत्तींचा विक्षेप, धर्माचा, सदाचाराचा (आम्ही धार्मिक आहोत बरं का !) विक्षेपही शांत भावानेच नष्ट करावा लागतो.
पण श्रीकृष्णाने हे सर्व करायचे कां ठरविले ? त्यांच्याकडे सर्व प्रकारचे वैभव होते, भले मोठे कुटुंब होते, सत्ता होती, सर्व मान देत होतेच. सर्वकाही तर होते. पण परमात्माही जेव्हां जीवांशाने अवतरीत होतो तेव्हां त्यालाही या संसारापासून विरक्ति येतेच. त्यांनीही हाच विचार केला. बास झालं ! आता आपण आपल्या शांतिकुटीरात जावे हेच बरे. आपल्या साकेतधामास, वैकुंठास (हे सर्व शब्दच आहेत, हे असे कोणते स्थान नाही की जिथे आपण तिकीट काढून जाऊ शकू) जावे. भगवानही आपल्या मर्जीनेच येतात, आपल्या मर्जीनेच परत जातात. त्यांच्या कृपेनेच सर्व जीवांनाही असाच सुखदुःखमय प्रवास घडतो. पण प्रवासात आणि प्रवासाची अंतीम गती जीवाच्या संकल्पशक्तिने घडते असे दिसते. संकल्पानुसार भगवान मदत करतात एवढेच.  

1 comment:

आंब्रडकरस् said...

सुंदर विवेचन,क्षणभर किर्तनकारांचा सहवास जाणवला.