20 April, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक १९ वा

मुखं बिन्दुं कृत्वा कुचयुगमधस्तस्य तदधो
हरार्धं ध्यायेद्यो हरमहिषि ते मन्मथकलाम् ।
स सद्यः संक्षोभं नयति वनिता इत्यतिलघु
त्रिलोकीमप्याशु भ्रमयति रवीन्दु-स्तन-युगाम् ॥ १९॥


"हे हरमहिषि ! मुखं बिन्दुं कृत्वा, तस्य अधः कुचयुगं कृत्वा, तदध हरार्धं कृत्वा, यः ते मन्मथकलां ध्यायेत् सः वनिताः सद्यः संक्षोभं नयति इति अतिलघु सः रवीन्दुस्तयुगां त्रिलोकीं अपि आशु भ्रमयति " असा या श्लोकाचा अन्वय आहे. या श्लोकाचा अर्थ वाचण्यापूर्वी वाचकांनी देवीभुजंगमस्तोत्रांतील सोळाव्या आणि सतराव्या श्लोकाचें विवेचन अवश्य वाचावे.

हर म्हणजे कामेश्वर भगवाच श्रीशंकर. त्यांची महिषी म्हणजे पट्टराणी कामेश्वरी श्रीललितामहात्रिपुरसुंदरी देवी. हे माते, त्रिपुरसुंदरी ! तुझी मन्मथकला म्हणजे कामकला अर्थात क्लीं हें बीजाक्षर अथवा ह्रीं या बीजांतील केवल ईं इत्याकारक बीजाक्षर. हें बीजाक्षर मंत्ररूपानें तर तुझें स्वरूप आहेच, पण आकृतीनेही तें तुझें मूर्तस्वरूप आहे. जो कोणी तुझ्या या मूर्तस्वरूपाचे ध्यान करील - उपासना करील, तो आपल्या अद्वितीय प्रभावाने त्रैलोक्यालाही मोहित करील. अशा अभिप्रायाने आचार्य या श्लोकानें महात्रिपुरसुंदरीचे वर्णन करीत आहेत.

ईं या बीजांत सर्वात वर एक बिंदु आहे. त्याच्या खाली दोन बिंदु असून त्यांच्याही खालीं ह या अक्षराचा अर्धा भाग आहे, ज्याला हार्दकला, योनि अथवा त्रिकोण असें म्हणतात. हार्दकला या शब्दाचाही अर्थ मन्मथकला किंवा कामकला असाच आहे. काम शब्दाचा अर्थ या ठिकाणी परमेश्वर भगवान सदाशिव असा आहे. "काम्यते सर्वैः इति कामः" आपल्या अभ्युदयासाठी सर्वांकडून ज्याची अपेक्षा केली जाते तो काम म्हणजे परमात्मा. त्याचें वास्तव्यस्थान हृदयच आहे. "ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति" हें गीतावचन प्रसिद्धच आहे. या अभिप्रायानें ईश्वराला 'हार्द' असे म्हणतात. त्याची जी कला म्हणजे शक्ति ती कामकला. अर्थात् श्रीललितामहात्रिपुरसुंदरी असा कामकला या शब्दाचा अर्थ होतो. त्रिपुरसुंदरीचा जो बीजमंत्र ईं इत्याकारक अक्षर, त्यालाही पण कामकला असेंच म्हणतात. कारण मंत्र आणि देवता दोन्ही एकरूपच असतात.

ईं या बीजांतील वरचा बिंदु हा शुद्ध रविस्वरूप आहे. "रूयते स्तूयते इति रविः" या व्युत्पत्तीप्रमाणे रवि शब्दाचा अर्थ सर्वांकडून स्तविला जाणारा परमात्मा असा होतो. तोच शक्तिसहकृत परमात्मा मुख्य बिंदूच्या रूपानें सर्वांत वर आहे. त्याच्या खालीं असलेले दोन बिंदु हे अग्नितत्त्व आणि सोमतत्त्व या स्वरूपाचे आहेत. अग्नि आणि सोम या दोन तत्त्वांनींच सर्व जगाचें पोषण होत असतें. याच अभिप्रायाने सर्व जगच "अग्नीषोमात्मक" मानले जातें. त्याच्याही खालीं असलेलें तत्त्व ज्याला योनि अथवा प्रकृति म्हणतात तें तर या जगाचे मूळकारणच आहे. याप्रमाणे परमात्मा, अग्नि, सोम आणि मूलप्रकृति हेंच आपल्या त्रिपुरसुंदरीचे रूप होय.

"नभो महाबिन्दुमुखी चन्द्रसूर्यस्तनद्वया ।
सुमेरु-हार-वलया शोभमाना महीपदा ॥
पाताल-तलविन्यासा त्रिलोकीयं तवाम्बिके ।
कामराज-कला-रूपा जागर्ति सचराचरा ॥ "

असें हें कामकलारूप श्रीत्रिपुरसुंदरीचे चित्र रुद्रयामलामध्ये वर्णिले आहे. या स्वरूपाच्या उपासनेला तंत्रशास्त्रांत मादनप्रयोग असेंही म्हटले आहे. निष्कामरूपानें केली जाणारी ही उपासना साधकाचे जीवन धन्य करते.

ईं बीजामध्ये तो जो रविरूप सर्वांत वर असलेला बिंदु तेंच श्रीमहात्रिपुरसुंदरीचे मुख आहे अशी भावना करावी. असा हा मुखं बिन्दुं कृत्वा याचा अर्थ झाला. त्यानंतर त्याच्या खालीं दोन बिंदूंच्या रूपाने अग्नि आणि सोम ही जी दोन तत्त्वे आहेत ते महात्रिपुरसुंदरीचें स्तन समजावेत. या ठिकाणीं स्तन या शब्दाने कंठापासून नाभिस्थानापर्यंतचा भाग समजावा. त्याचप्रमाणें त्या दोन बिंदूंच्या खालीं असलेला, ह या अक्षराच्या अर्धा भागाप्रमाणे दिसणारा भाग किंवा त्रिकोणामध्ये दिसणारा हा भाग आपल्या श्रीत्रिपुरसुंदरीच्या नाभिस्थानापासून चरणकमलापर्यंतचा भाग आहे अशी भावना करावी. याप्रमाणे माते ! जो तुझ्या मन्मथकलेचें अर्थात् ईं या बीजमंत्राच्या रूपाने नटलेल्या तुझें "यो ध्यायेत्" म्हणजे जो ध्यान करील, 'सः' तो भक्त त्या उपासनेच्या बलाने इतका प्रभावी होईल कीं, तो आपल्याकडे सर्व जगांतील स्त्रियांना आकृष्ट करून घेईल हें अगदीं सामान्य आहे. तो सूर्यमंडल आणि चंद्रमंडल हे दोन जिचे स्तन आहेत अर्थात विश्वाच्या पोषणाची साधने आहेत, त्या त्रिलोकरूपी कामिनीलाही आपल्याकडे सत्त्वर आकृष्ट करून घेईल. सारें त्रैलोक्य त्याच्यावर मुग्ध होईल असा याचा अर्थ आहे. आचार्य म्हणतात, आई, ईं या बीजाक्षराच्या रूपाने नटलेल्या तुझ्या स्वरूपाच्या ध्यानाचा हा केवढा महिमा आहे  ! तंत्रशास्त्रांतील निरनिराळ्या ग्रंथांत ठिकठिकाणी याप्रमाणें श्रीमहात्रिपुरसुंदरीचें ध्यान करण्याचें विधान केलेलें आहे. विस्तारभयास्तव त्यांचा येथें निर्देश करतां येत नाहीं. 


सोन्याच्या पत्र्यावर वर्तुलाकार यंत्र काढून त्यांत एकापुढे एक व एकाखालीं एक अशी चार "ह्रीं" ही बीजे लिहावींत. रोज विधिपूर्वक पूजा करून बाराशे वेळां या श्लोकाचा जप करावा. तें यंत्र धारण करावे अथवा चंदन, पुष्प, पंचवीस दिवस भस्म किंवा केशर अभिमंत्रून धारण करावे दूध, मध आणि केळे यांचा नैवेद्य दाखवावा. राजे-महाराजे, राक्षस, पशु, स्त्री, पुरुष सर्व वश होतील.

No comments: