15 April, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक १४ वा

क्षितौ षट् पञ्चाशद् द्वि समधिक पञ्चाशदुदके
हुताशे द्वाषष्टिश्चतुरधिक-पञ्चाशदनिले ।
दिवि द्विष्षट्त्रिंशन् मनसि च चतुःषष्टिरिति ये
मयूखास्तेषामप्युपरि तव पादाम्बुज-युगम् ॥ १४॥


श्रीविद्यारूप महात्रिपुरसुंदरीच्या चरणकमलाचा महिमा या श्लोकाने आचार्य वर्णन करीत आहेत. आपल्या शरीरामध्ये सहा चक्रें आहेत. मूलाधार स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धि आणि आला अशी त्या चक्रांची नावे आहेत. या सर्वांशी चक्र शब्द योजिला जातो. क्रमशः पृथ्वी अग्नि जल, वायु आणि आकाश ही पंचमहाभूतें आणि मन या सर्व तत्त्वांची ही चक्रें अधिष्ठान आहेत. ही तत्त्वें, या तत्त्वांतून अभिव्यक्त होणारा शब्दप्रपंच आणि अर्थप्रपंच म्हणजे त्या शब्दाचे वाच्यार्थ असलेल्या पदार्थांची सृष्टि. त्याचप्रमाणें त्या अक्षरांच्या व अर्थांच्या अधिष्ठात्री देवता हे सर्व त्या षट्चक्रांच्या दलांतूनच वास्तव्य आणि व्यवहार करीत असतात. या सर्व देवता चित्स्वरूप आणि स्वयंप्रकाश असलेल्या श्रीमहात्रिपुरसुंदरीच्याच अंशभूत देवता आहेत. अग्नीपासून जसे स्फुलिंग प्रकट व्हावेत किंवा सूर्यापासून जसे चोहोंकडे किरण पसरावेत त्याचप्रमाणे हीं सर्व तत्त्वें आणि या सर्व देवता श्रीललितात्रिपुरसुंदरीच्याच स्वरूपांतून प्रकट झालेल्या आहेत. श्रीविद्यास्वरूप श्रीत्रिपुरसुंदरीचे ते किरणच मानले जातात. या किरणांनाच उद्देशून प्रस्तुत श्लोकाच्या चौथ्या चरणांत मयूख हा शब्द उपयोगांत आणला आहे. "मयूख" म्हणजे किरण.

किरणें ही अनंत असली तरी परम सूक्ष्म मुलतत्त्वस्वरूप निरनिराळ्या चक्रांतील निरनिराळ्या तत्त्वांची किरणें ही सांकेतिक स्वरूपानें व संक्षिप्त संख्येने निर्दिष्ट करून सांगत आहेत. "क्षितौ" म्हणजे पृथ्वीतत्त्वाने युक्त असलेल्या मुलाधारचक्रामध्यें, "षट्पञ्चाशत्" म्हणजे छप्पन किरणें आहेत. सोळा स्वर आणि चौतीस व्यंजने मिळून पन्नास अक्षरे होतात. ही अक्षरें पंचमहाभूते, पंचतन्मात्रा, पचज्ञानेन्द्रियें, पंचकर्मेन्द्रिये, अंतःकरणचतुष्टय, दशविधमाण प्रकृतितत्त्व पुरुषतत्त्व इत्यादि तत्त्वांची सूचक आहेत. ही पन्नास अक्षरे अधिक ऐं ह्रीं श्रीं, ऐं क्लीं सौः ही मंत्रबीजाक्षरें सहा मिळून छप्पन्न किरणें पृथ्वीची अर्थात पृथ्वीतत्त्वाच्या मूलाधारचक्रांतील आहेत. ही छप्पन किरणे शिवशक्तिस्वरूप असल्यामुळें त्यांची जोडीजोडीनें अठ्ठावीस नांवेंही शास्त्रांत सांपडतात. उदाहरणार्थ, त्रिपुरसुंदरी, त्रिपुरसुंदर; महावज्रेश्वरी, महावज्रेश्वर; कुलसुंदरी, कुलसुंदर; परमेश्वरी, परमेश्वर इत्यादि. याप्रमाणे अठ्ठावीस दुणे छप्पन्न किरणें पृथ्वीतत्त्वात्मक मूलाधारचक्रांत आहेत. याचप्रमाणें जलतत्त्वामक मणिपूरचक्रांत बावन्न किरणे आहेत. याचप्रमाणें अग्नितत्त्वात्मक स्वाधिष्ठानचक्रामध्ये बासष्ट किरणें आहेत. श्लोकातील  उदक शब्दानें मणिपूरचक्र आणि हुताश शब्दानें अग्नितत्त्वाचें स्वाधिष्ठानचक्र घ्यावयाचें आहे.

"अनिले" अनिल म्हणजे वायु अर्थात् वायुतत्त्वात्मक हृदयाच्या जवळ असलेलें अनाहतचक्र. या चक्रांतही पन्नास मातृका म्हणजे मुळाक्षरे अधिक चार भूतांची बीजे यं रं लं वं मिळून चोपन्न किरणे आहेत. त्यांचींही अमृताकर्षिणी अमृताकर्षण; शरीराकर्षणी शरीराकर्षण इत्यादि नांवे आहेत. यानंतर "दिवि" म्हणजे कंठस्थानीं असलेल्या आकाशतत्त्वयुक्त विशुद्धिचक्रामध्यें "द्विः षट्त्रिंशत्" म्हणजे बहात्तर किरणें आहेत. याच्याही वर मन या तत्त्वानें युक्त असलेल्या आज्ञाचक्रांत चौसष्ट किरणें आहेत. या सर्व किरणांची बेरीज केली तर एकंदर तीनशेसाठ संख्या होते. एक वर्षाच्या कालचक्रांतही तीनशेंसाठ दिवस समाविष्ट झालेले असतात हें आपणांस माहीतच आहे. आपल्या देहांत जशी षट्चक्रे आहेत त्याचप्रमाणे एका वर्षाच्या कालखंडांतही वसंत, ग्रीष्म इत्यादि सहा अयनें असतात. ही अयनें संवत्सरात्मक कालपिंडांतील मुलाधारादि षट्चक्रेंच होत. तात्पर्य, जें कालपिंडांत तेंच देहपिंडांत आणि जें देहपिंडांत तेंच ब्रह्माण्डपिंडात अशी ही सर्व कल्पना लक्षांत घेऊन आचार्य म्हणतात, हे आई त्रिपुरसुंदरी ! याप्रमाणे वेदांत, शास्त्रांत आणि योगीजनांच्या अनुभवांत प्रसिद्ध असलेली जी किरणें (देवता आणि तत्त्वें) आहेत "तेषां अपि उपरि तव पादाम्बुजयुगं आस्त" म्हणजे त्या सर्वांच्याही वर श्रीचक्रांतील बिंदुस्थानांत, त्याचप्रमाणें कालचक्राच्याही वर आणि सर्वतत्त्वात्मक ब्रह्मांडाच्याही वर अर्थात् कालातीत आणि सर्वतत्त्वातीत अशा अनिर्वचनीय सर्वानंदमय आवरणांत तुझे चरणारविंद विराजमान झालेले आहेत. ते आमच्या देहपिंडांतही सर्वांच्यावर विराजमान असलेल्या ब्रह्मरंध्रांतर्गत सहस्रदलकमलातील पूर्ण चंद्रमंडलातही विराजमान झालेले आहेत. आई ! त्या तुझ्या चरणारविंदांचा महिमा मी काय वर्णन करणार ? 


या श्लोकाचे यंत्र - समभूज चतुष्कोण काढावा. चारी कोणांत एकत्र मिळणाऱ्या रेघांची टोकें किंचित् बाहेर काढून तेथें त्रिशूळाचा आकार द्यावा. एकंदर आठ त्रिशूल होतील. मधल्या भागांत क्लीं क्लीं क्लीं ही बीजे आडव्या दोन ओळींत लिहावींत. त्या दोन ओळींमध्ये आपल्या साध्याचा निर्देश करावा. हें यंत्र सोन्याच्या पत्र्यावर लिहून पूर्वेकडें तोड करून एकवीस दिवस समाराधना करावी. उसाच्या गंडेऱ्यांचा नैवेद्य दाखवावा. रोज पाचशे वेळां या श्लोकाचा जप करावा. सिद्धयंत्र धारण करावे याने षंढत्वनिरास आणि पुत्रप्राप्ति होते.

No comments: