10 April, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक ९ वा

महीं मूलाधारे कमपि मणिपूरे हुतवहं
स्थितं स्वाधिष्ठाने हृदि मरुतमाकाशमुपरि ।
मनोऽपि भ्रूमध्ये सकलमपि भित्त्वा कुलपथं
सहस्रारे पद्मे सह रहसि पत्या विहरसे ॥ ९ ॥


"हे मातः त्वं मूलाधारे महीं, मणिपूरे कं, स्वाधिष्ठाने स्थित हुतवहं अपि, हदि मरुतं, उपरि आकाशं, भ्रूमध्ये मनः अपि (एवं) सकलं अपि कुलपथं भित्त्वा सहस्रारे पद्मे रहसि पत्या सह विहरसे ।" ( एतादृशीं त्वां ये ध्यायन्ति ते धन्याः) आई त्रिपुरसुंदरी ! मूलाधारचक्रांत पृथ्वीतत्त्वाला, मणिपूरचक्रांत जलतत्त्वाला, त्याचप्रमाणे स्वाधिष्ठानचक्रांत असलेल्या अग्नितत्त्वालाही भेदून तसेंच हृदयाजवळ असलेल्या अनाहतचक्रांतील वायुतत्त्वाला, त्याच्याही वर कंठस्थानी असलेल्या विशुद्धिचक्रांतील आकाशतत्त्वाला आणि भ्रूमध्यप्रदेशीं असलेल्या आज्ञाचकक्रांतील मनस्तत्त्वाला भेदून, अर्थाद सर्वच कुलपथाला म्हणजे मुलाधारादि षट्चक्रांना अथवा सुषुम्नामार्गाला भेदून मूर्धस्थानी असलेल्या सहस्रदल कमलामध्ये आपल्या परमशिवस्वरूप पतीसह तूं एकांतामध्यें विहार करतेस. तुझ्या या चिदानन्दस्वरूप अवस्थेचे जे कोणी ध्यान करतात, खरोखर ते धन्य होत. असा या श्लोकाचा अन्वयानुसारी सरळ अर्थ आहे.

आपलः संपूर्ण देहच श्रीललितामहात्रिपुरसुंदरीचें अधिष्ठान आहे. त्यांतही विशेषेंकरून या देहांत असलेल्या मुख्य मुख्य चक्रांत तिचे प्रामुख्यानें वास्तव्य आहे. त्यांतही मुलाधारादि सहा चक्रांच्याही वर मूर्धस्थानीं विराजमान असलेलें सहस्रदल कमल हें तर तिचे अत्यंत आवडतें स्थान आहे. या देहांत श्रीत्रिपुरसुंदरी ही कुंडलिनीच्या रूपाने वास्तव्य करीत असते. कुंडलिनी ही एक विशिष्ट प्रकारची शक्ति आहे. ती प्रसुप्त असते तेव्हां इंद्रिये ही विषयोन्मुख होतात व मन विषयानंदामध्यें गर्क होत असतें. ती कुंडलिनीशक्ति जेव्हां जागृत होते तेव्हां सर्व इंद्रिये अंतर्मुख होतात व बुद्धि ही स्वतःसिद्ध, नित्य आणि निरतिशय अशा निजानंदाचा अनुभव घेत असते. "नीवारशूकवत्तन्वी कुंडली परदेवता" देवभाताच्या कुसाचा शेंडा जसा अगदीं बारिक असतो त्याप्रमाणें कुंडलिनी ही अत्यंत सूक्ष्म असून ती एक श्रेष्ठ देवता आहे असें संमोहनतंत्रांत तिचे वर्णन केले आहे.

ही कुंडलिनी मूलाधारचक्राचा आधार घेऊन स्वाधिष्ठानचक्रावर अधिष्ठित झालेली आहे. तेथें तिचे साडेतीन वेटोळे असल्याचें वर्णन करतात. नागाचें पिले । कुंकुमें न्हाले । वळण देऊनि आले । सेजे जैसे ॥ तैसी ते कुंडलिनी । मोटका औटे वळणी । अधोमुख सर्पिणी निदेली असे ॥ ( ज्ञानेश्वरी ६-१२२-१२३) मूलाधारचक आणि स्वाधिष्ठानचक्र ही दोन्हीं चक्रें अगदीं जवळ जवळ आहेत. मुलाधारचक्र हें चार दलाच्या कमलाप्रमाणे आहे तर स्वाधिष्ठानचक्र हें सहा दले असलेल्या कमलाप्रमाणे आहे. मुलाधारचक्र हे देहाच्या अगदीं मूलस्थानी म्हणजे गुदस्थानाच्या सान्निध्यांत आहे, तर स्वाधिष्ठानचक्र हे त्याच्या किंचित् वर उपस्थेंद्रियाच्या सान्निध्यांत आहे. मूलाधारचक्र हें देहांतील सर्व चक्रांचे आणि कुंडलिनीचेंही मुळ आधारभूत चक्र असल्यामुळें त्याला मूलाधार हें यथार्थ नांव आहे. त्याचप्रमाणे स्वाधिष्ठानचक्र याच्यांतील स्व शब्दाचा अर्थ कुंडलिनीच असल्यामुळे व तिचे तें चक्र अधिष्ठान म्हणजे वसतिस्थान असल्यामुळें त्या चक्रालाही स्वाधिष्ठानचक्र असें यथार्थ नांव मिळाले आहे. या दोन्ही चक्रांत वास्तव्य करणारी कुंडलिनी ही या प्रस्तुत सौंदर्यलहरीस्तोत्राची अधिष्ठात्री देवताच होय.

ललितासहस्रनामामध्यें "कुण्डलिनी" हें एक त्रिपुरसुंदरीचे नांव आहेच. " महासक्तिः कुण्डलिनी बिसतन्तुतनीयसी" कमळांतील तंतूप्रमाणें अत्यंत सूक्ष्म व गौरवर्ण असलेली ही कुण्डलिनी "महासक्ति" म्हणजे सर्वश्रेष्ठ सहस्रदल कमलामध्यें अत्यंत तेजस्वी असलेल्या चंद्रमंडलात शिवस्वरूपाशी समरस होऊन रहाण्याची तिला मोठी आवड आहे. अशी ती आहे म्हणूनच ती शरीरातील षट्चक्रांचे उल्लंघन करून सहस्रदल कमलामध्यें असलेल्या अमृतमंडलांत सचिदानंद परब्रह्मस्वरूप असलेल्या श्रीसदाशिवतत्त्वाशीं समरस होऊन रहाते म्हणून तिला "महासक्ति" म्हणतात. याच अभिप्रायानें कुण्डलिनीस्वरूप श्रीत्रिपुरसुंदरीला "चिच्छक्तिश्चेतनारूपा" आणि "चिदेकरसरूपिणी " अशीही नांवे दिलेली आहेत. सहस्रदल कमल हें साही चक्रांच्या वर असल्यामुळें  "षट्चक्रोपरि संस्थिता " असेही तिला म्हटले आहे.

"मूलाधाराम्बुजारूढा" "स्वाधिष्ठानांबुजगता" " मणिपूराब्जनिलया "  "अनाहताब्जनिलया" "विशुद्धिचक्रनिलया" "आज्ञाचक्राब्जनिलया" "सहसदलपद्मस्था" अशी श्रीललितामहात्रिपुरसुंदरीची ललितासहस्रनामांमध्यें नांवे आहेत. या नावांवरून ती शरीरातील सर्वच चक्रांची अधिष्ठात्री असल्याचे स्पष्टच दिसत आहे. या सर्व चक्रांत अधिष्ठित होऊन ती त्या त्या चक्रातील बीजांना, भूततत्त्वांना व देवतांना कार्यप्रवण करीत असते. ती जीवचैतन्याच्या रूपाने सर्व देहालाच जीवन देत असते. म्हणूनच तिला "प्राणदा प्राणरूपिणी" अथवा जीवा, जीवभूता असेही म्हटलें जातें. तंत्रसारग्रंथांतही मुलाधारचक्राच्या ठिकाणी इष्ट देवतास्वरूप कुंडलिनीचे एकाग्र मनाने ध्यान केंले असतां सर्व अशुभांचा निरास होतो असें सांगितले आहे. "ध्यायेत्कुण्डलिनी सूक्ष्मां मुलाधारनिवासिनीम् । तामिष्टदेवतारूपां सार्धत्रिवलयान्विताम् ॥ अशेषाशुभशान्त्यर्थं समाहितमनाश्चिरम्" मुलाधारचक्राप्रमाणेंच इतरही चक्रांत कुंडलिनीरूप त्रिपुरसुंदरीचे ध्यान केलें असतां निरनिराळी फलें प्राप्त होतात असेही सांगितलेले आहे. मूलाधारचक्र हें पृथ्वी तत्त्वाचें असल्यामुळें पृथ्वीचा धारकत्व हा गुण त्याच्यामध्ये आहे. धरा, धरित्री, धरणी अशी पृथ्वीची नावें आहेत. देहाला धारण करणारे पृथ्वीतत्त्व हें मुलाधारचक्रांत नसतें तर हा देह खाली तरी पडला असता अथवा आकाशांत तरी उडून गेला असता असे रुद्ररहस्यात म्हटलेले आहे. " सर्वाधारा मही यस्मात्, मूलाधारतया स्थिता । तदभावे तु देहस्य पातः स्यादुद्‌ग‍मोऽपि वा ॥"

स्वाधिष्ठानचक्र हें अग्नितत्त्वाचे आहे. अग्नि हा सर्व शक्तींचे मूळ आहे. अग्नीमुळेंच देहामध्ये सर्व प्रकारची शक्ति नांदत असते. "अग्निमुलं बलं पुंसाम्" हा सिद्धान्तच आहे. कांही लोक स्वाधिष्ठानचक्र हें जलतत्त्वाचे असून मणिपूरचक्र हें अग्नितत्त्वाचे आहे असे म्हणतात. तें कांहीं असो. आपली कुंडलिनीशक्ति ही ब्रह्मरन्ध्रांतील चंद्रमंडलाकडे जाण्यास उत्सुक झाली म्हणजे क्रमशः ती सर्व चक्रांचे उल्लंघन करीत असते. यालाच योगशास्त्रांत षट्चक्रभेदन असें म्हणतात.

माणिपूरचक्र हें दहा दलांच्या कमळासारखें आहे. मृलाधारचक्रांतील चार दलांत वं, शं, षं आणि सं अशी बीजे आहेत तर स्वाधिष्टानचक्रांतील सहा दलांत बं भं मं यं रं आणि लं अशी सहा बीजे आहेत. त्याचप्रमाणे मणिपूरचक्राच्या दहा दलांत ड-पासून फ-पर्यंतची अक्षरे बीजरूपाने रहातात. अक्षरे ही अनुस्वारयुक्त झाली कीं, त्यांना बीजांचे स्वरूप येते. मणिपूरचक्राच्या वर हृदयाच्या शेजारी असलेल्या चक्राला अनाहतचक्र असें म्हणतात. विविध प्रकारच्या अनाहत नादांना अभिव्यक्त होण्याची अवस्था याच चक्रांत प्राप्त होत असल्यामुळें या चक्राला अनाहतचक्र असें म्हटलें जातें. या चक्राला बारा पाकळ्या असून त्यांत कपातून ठ-पर्यतचीं बारा अक्षरे बीजरूपानें वसलेली आहेत. हे चक्र वायुतत्त्वाचे मानले जातें. या तत्त्वाचा भेद करून कुंडलिनीशक्तिस्वरूप श्रीमहात्रिपुरसुंदरी वर जाते तेव्हां ती विशुद्धिचक्रांत येते. विशुद्धिचक्र हे कंठस्थानीं आहे. हें आकाशतत्त्वाचे चक्र असल्यामुळें व आकाश हें स्वभावतःच अत्यंत शुद्ध, निर्मल असल्यामुळें अथवा शुद्ध स्फटिकाप्रमाणे त्याचा वर्ण स्वच्छ असल्यामुळें या चक्राला विशुद्धिचक्र असें म्हटले जातें. या चक्राला सोळा पाकळ्या असून त्यांत क्रमशः अ-पासून अः-पर्यत सोळा स्वर विराजमान झालेले आहेत. येथूनच अक्षरप्रपंचाला मूर्त स्वरूप येतें व पुढें तीं अक्षरे स्थानभेदानें कंठ, तालव्य इत्यादि शब्दांनी व्यवहारिलीं जातात.

विशुद्धिचक्राचा भेद करून कुंडलिनी वर गेली की, ती आज्ञाचक्रांत प्रवेश करते. आज्ञाचक्र हें दोन भुवयांच्या मध्ये असून याला दोनच पाकळ्या आहेत. या दोन पाकळ्यांत हं आणि क्षं ही दोन बीजे विराजत आहेत. साधकाला याच चक्राच्या आधारे आपल्या उपास्यदेवतेचा, श्रीमहात्रिपुरसुंदरीचा थोडासा साक्षात्कार होत असतो. आ म्हणजे थोडे आणि ज्ञा म्हणजे ज्ञान. अथवा श्रीत्रिपुरसुंदरी ही फारच थोडा काळ या चक्रांत विद्युलेखेप्रमाणें प्रतीतीला येते म्हणूनही या चक्राला आज्ञाचक्र असें म्हटलें जाते. मन हे या चक्राचें तत्त्व होय. या ठिकाणी मन या शब्दाने पंचज्ञानेंद्रिये आणि पंचकर्मेंद्रिये यांचाही अंतर्भाव विवक्षित आहेच. त्याचप्रमाणें पंचमहाभूतांनी पंचतन्मात्राही घेतल्या जातात. षट्चक्रांचे भेदन करतांना या एकवीस तत्त्वांचाही भेद होतोच. अर्थात् ही एकवीस तत्त्वें साधकाच्या अधीन होतात. त्यावर नियंत्रण ठेवण्याची साधकाला शक्ति प्राप्त होत असते. पुढें श्रीत्रिपुरसुंदरी सहस्रदल कमलांत प्रवेश करते तेव्हां ती माया, शुद्धविद्या, महेश्वर आणि सदाशिव या तत्त्वांशी संपृक्त होते. मायाविशिष्ट महेश्वर हा जीवभावाला प्राप्त होत असतो, तर शुद्धविद्याविशिष्ट सदाशिव हा परमशिवपदाला प्राप्त होत असतो. या परमशिवपदालाच शास्त्रांत सादाख्यकला असें म्हटले आहे. याच सहस्रदल कमलांत विलसत असलेल्या चंद्रमंडलांत आपली उपास्यदेवता श्रीमहात्रिपुरसुंदरी ही परमशिवतत्त्वाशीं समरस होऊन विहार करीत असते. अर्थात् एकरूप होऊन रहाते. तें शिवशक्तींचें ऐक्य एकमेव, अद्वितीय, परिपूर्ण, परब्रह्मस्वरूपच आहे.

आपल्या देहांत असलेल्या मुलाधारादि चक्रांपेक्षां मूर्धस्थानी असलेलें सहस्रदल कमल हें अत्यंत श्रेष्ठ होय. म्हणूनच या कमलाला चक्रराज असें म्हटलें जातें. हेंच आपल्या त्रिपुरसुंदरीचें निकेतन म्हणजे निवासस्थान असल्यामुळें याही अभिप्रायाने श्रीत्रिपुरसुंदरीला "चक्रराजनिकेतना" असें म्हटलेले आहे. परस्पर तादात्म्यभावाला प्राप्त झालेलें शिवतत्त्व आणि शक्तितत्त्व ही परस्परांच्या तपश्चर्येचीं जणुं मूर्तिमंत फळेंच होत. असे है सदासर्वकाळ पुरातनच असलेले विश्वप्रपंचाचे माता आणि पिता यांना आमचा नमस्कार असो. आम्ही भक्तिभावाने त्यांची स्तुति करीत आहोंत "परस्परतपःसंपत्फलायितपरस्परौ । प्रपञ्चमातापितरौ प्राञ्चौ जायापती स्तुमः" असें एका भक्ताने या शिवशक्तीचे वर्णन केलेले आहे तें अत्यंत योग्य आहे.

या श्लोकांतील "कुलपथ" या शब्दाचा अर्थ कांहीं विद्वान सुषुम्णामार्ग असा करतात, तर कांहीं विद्वान् षट्चक्रें असाही करतात. तात्पर्य, देहामध्यें कुंडलिनीच्या रूपानें विराजमान असलेली श्रीत्रिपुरसुंदरी ही सुषुम्णामार्गाने षट्चक्रांचा भेद करून साधकाच्या उपासनाबलानें ज्या वेळेला सहस्रदल कमलांत प्रवेश करते आणि तेथें असलेल्या चंद्रमंडलांत सच्चिदानंदरूप परमशिवतत्त्वाशीं समरस होते त्या वेळेला तिचा तो आपल्या परमप्रिय शिवतत्त्वस्वरूप पतीबरोबर "रहसि" म्हणजे एकान्तांत होणारा सामरस्य विहार ही तिची नित्यनिरतिशय आनंदरूप अवस्था होय. ही अवस्था लक्षांत घेऊनच तिला "सच्चिदानन्दरूपिणी" असें नांव दिलेले आहे. या अवस्थेंत जे भक्त तिचे चिंतन करतात ते खरोखर धन्य होत.

आसनें, प्राणायाम, धारणा आणि ध्यान या क्रियांनी शरीरातील वर सांगितलेल्या षट्चक्रांचा भेद करतां येतो. योगमार्गांतील मुलबंध, ओड्याणबंध आणि जालंधरबंध, त्याचप्रमाणे कांहीं मुद्रा यांचाही षट्चक्रभेदनाला उपयोग होतो. मुलाधारादि चक्रांच्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या इष्ट देवतेच्या उपासनेनेंही षट्चक्रांचा भेद घडवून आणता येतो. त्या त्या चक्रांतील बीजे, अधिष्ठात्री देवता आणि पृथ्वी, जल इत्यादि भूततत्त्वें यांचें चिंतन करीत श्रीललितामहात्रिपुरसुंदरीची त्या त्या चक्रांत जर उपासना केली तर कुंडलीस्वरूप असलेली भक्तकामकल्पद्रुम श्रीमहात्रिपुरसुंदरी ही स्वयंजागृत होऊन साधकाच्या षट्चक्रांचे भेदन करीत करीत सकलतत्त्वातीत असलेल्या सहस्रदलकमलांतील निष्कलंक आणि सर्व कलांनी पूर्ण अशा चंद्रमंडलात जेव्हां परमशिवतत्त्वाशीं विहार करते तेव्हां उपासनाबलानें तिच्या स्वरूपाशी तादात्म्य पावलेलें साधकांचे मनही त्या अद्वितीय आनंदाचा अनुभव घेत असते. असा हा अर्धनरनटेश्वरी असलेल्या श्रीत्रिपुरसुंदरीच्या उपासनेचा प्रभाव आहे.

मुलाधारचक्रात पृथ्वीतत्त्वाचा भेद झाल्यानंतर साधकाचे शरीर पृथ्वीचा आधार घेतल्यावांचूनही इतस्ततः संचार करूं शकते. वह्नितत्त्वाचा भेद केल्यानंतर त्याला अग्नि शीतल होतो. जलतत्त्वाचा भेद केल्यानंतर पाणी त्याला बुडवू शकत नाही. अनाहतचक्रांत वायुतत्त्वाचा भेद केल्यानंतर साधक वायुगतीनें संचार करूं शकतो. श्रीसदाशिवेंद्रसरस्वती, श्रीवासुदेवानंदसरस्वती इत्यादि सिद्ध सत्पुरुषांच्या चरित्रांत ह्या गोष्टी पहावयास सांपडतात. आकाशतत्त्वाचा भेद केल्यानंतर साधक आकाशगामी होतो. मनस्तत्त्वाचा भेद केल्यानंतर तो मनोगतीने त्रैलोक्यामध्ये संचार करतो. सहस्रदल कमलांतील विहार हा अनिर्वचनीय आनंदस्वरूप असल्यामुळें सर्व सिद्धींची तेथें परिसमाप्ति होते. "सा काष्ठा सा परागतिः" आई ! तुझ्या कृपेने ही अवस्था ज्यांना लाभली खरोखर ते मोठे धन्य होत असें 'रहस्यसिद्धिसोपान' या ग्रंथांत मोठे सुंदर वर्णन केलेले आहे.
 



वरील यंत्र सोन्याच्या पत्र्यावर काढून दहा दिवस त्याची रोज विधिपूर्वक पूजा करावी. आटीव दुधाचा अथवा पायसाचा नैवेद्य दाखवावा. रोज एक हजार वेळां श्लोकाचा जप करावा. देशांतरीं गेलेला माणूस लौकर परत येईल. याच यंत्राला केशर, कस्तूरी, चंदन इत्यादि सुगंधी द्रव्यांनी लेप करून ४५ दिवस वरच्याप्रमाणे आराधना केल्यास साधकाला पंचमहाभूतांवर विजय संपादन करतां येईल.

No comments: