13 April, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक १२ वा

त्वदीयं सौन्दर्यं तुहिन-गिरि-कन्ये तुलयितुं
कवीन्द्राः कल्पन्ते कथमपि विरिञ्चि-प्रभृतयः ।
यदालोकौत्सुक्यादमर-ललना यान्ति मनसा
तपोभिर्दुष्प्रापामपि गिरिश-सायुज्य-पदवीम् ॥ १२॥


श्रीचक्राचे वर्णन केल्यानंतर आचार्य या श्लोकाने श्रीचक्राच्या ठिकाणी अधिष्ठित असलेल्या त्रिपुरसुंदरीच्या रूपसंपत्तीचें वर्णन करीत आहेत. हे तुहिनगिरिकन्ये, तुहिन म्हणजे बर्फ - त्यानें सतत आच्छादिलेला जो गिरि म्हणजे पर्वत अर्थात हिमालय पर्वत, त्याची तूं कन्या आहेस. हे पर्वतराजतनये आई त्रिपुरसुंदरी ! तुझ्या सौंदर्याची तुलना करण्याकरितां अर्थात् त्याला उपमा देऊन त्याचें वर्णन करण्याकरितां ब्रह्मदेव, विष्णू, इंद्र बृहस्पति यांच्यासारखे मोठे मोठे कवि म्हणजे श्रेष्ठ विद्वान असलेले प्रत्यक्ष देव देखील कथमपि म्हणजे कसें तरी मोठा प्रयास करून सुद्धां, "कल्पन्ते किम्" म्हणजे समर्थ होतात काय ? नाही. असेंच या प्रश्नाचें उत्तर द्यावे लागेल. तात्पर्य, हे आई जगज्जननी ! तुझ्या सौंदर्याचें तुलना करून वर्णन करावयास मोठे मोठे इंद्र-बृहस्पतीसारखे देवही समर्थ नाहींत तेथें माझी कथा काय ? मी काय वर्णन करणार ? तुझें सौंदर्य खरोखरच अवर्णनीय आहे.

अमरललना म्हणजे देवांच्या स्त्रिया देवता, अप्सरा वगैरे तुझें लावण्य अवलोकन करण्यास जेव्हां उत्कंठित होतात तेव्हां त्या मनाने शंकरांची समाराधना - उपासना करतात. योग, याग, तपश्चर्या इत्यादि साधनांनींही मिळविण्यास कठीण असलेले शिवपद, त्या भक्तिपूर्वक शंकरांची उपासना करून प्राप्त करून घेतात. "गिरिशसायुज्यपदवीं यान्ति" केवल मनःपूर्वक केल्या जाणाऱ्या भक्तीने त्या देवता आणि अप्सरा गिरिशांच्या म्हणजे शंकरांच्या सायुज्य पदवीला शिवसायुज्यपदाला पोहोंचतात, अर्थात् त्या शिवस्वरूप होतात. तात्पर्य, शिवस्वरूप होऊनच त्या तुझ्या सौंदर्याचा आस्वाद घेतात. केवळ मनाने शिवस्वरूप होऊन तुझ्या सौंदर्याला अवलोकन करण्याचा त्या मनोरथ करीत असतात असाही याचा अर्थ कांहीं विद्वान् करतात. तात्पर्य, श्रीमहात्रिपुरसुंदरीच्या सौंदर्याशीं तुलना करावी असें जगांत दुसरें कोणीच नाहीं. ब्राह्मी, वैष्णवी, इंद्राणी इत्यादि देवता किंवा उर्वशी, तिलोत्तमा, रंभा इत्यादि अप्सरा ह्या तर श्रीत्रिपुरसुंदरीच्या सौंदर्यलेशाच्या पासंगालाही पुरत नाहींत मग त्रिपुरसुंदरीच्या सौंदर्याला त्यांची काय उपमा देणार ?

श्रीत्रिपुरसुंदरीच्या सौंदर्यांचा आस्वाद भगवाच श्रीसदाशिवच घेऊं शकतात म्हणून त्या देवता मनानें सदाशिवाची उपासना करून सदाशिवस्वरूप होतात व सदाशिवाशीं तादात्म्य पावूनच त्या महात्रिपुरसुंदरीच्या सौंदर्यांचा आस्वाद घेतात, असें श्रीललितामहात्रिपुरसुंदरीचे सौंदर्य अपूर्व आहे. या अभिप्रायाने आचार्य म्हणतात, आई ! तुझ्या सौंदर्याचें मी काय वर्णन करणार ? यांत आचार्यांनी अनन्वयालंकार मोठ्या युक्ताने ध्वनित केला आहे. 




या श्लोकाचे यंत्र समचतुष्कोण असून त्यांत एकाखाली एक सौः सौः अशीं अक्षरे लिहिलेली असतात. हें यंत्र देवाच्या ताम्हणांत पाण्यावर लिहावे पंचेचाळीस दिवस विधिवत् पूजा करावी. मधाचा नैवेद्य दाखवावा. ताम्हणांतील जलाला स्पर्श करून या श्लोकाचा एक हजार रोज जप करावा. याप्रमाणे अभिमंत्रित केलेलें तें पाणी व मध प्राशन करावा. याने विद्या, वक्तुरत्व आणि सर्व लोकवशित्व प्राप्त होतें. 
 

No comments: