03 April, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक २ रा

तनीयांसं पांसुं तव चरणपङ्‌केरूहभवं
विरिञ्चिः संचिन्वन् विरचयति लोकानविकलम् 
वहत्येनं शौरि कथमपि सहस्रेण शिरसां
हरः संक्षुद्यैनं भजति भसितोद्धूलनविधिम् ॥ २ ॥ 

"हे भगवति ! विरिञ्चिः तव चरणपङ्‌केरूहभवं तनीयांसं पांसुं सञ्चिन्वन् लोकान् अविकलं विरचयति । शौरिः शिरसां सहस्रेण एनं कथमपि वहति । हरः एनं संक्षुद्य भसितोद्‌धूलनविधिं भजति" असा या लोकाचा अन्वय आहे. मागच्या श्लोकामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र त्याचप्रमाणें इंद्र, अग्नि आणि वायु इत्यादि इतरही देव थीललितामहात्रिपुरसुंदरीची आराधना करतात असा उल्लेख केला आहे. तिच्या कृपेनेच ते या विश्वरूपी संस्थेंतील आपआपलें अंगीकृत कार्य सुव्यस्थित रीतीनें पार पाडण्यास समर्थ होतात असा हा चिच्छक्तिस्वरूप असलेल्या जगन्मातेचा महिमा आहे असेही सांगितले. हाच विषय या दुसऱ्या श्लोकांत अधिक स्पष्ट करून सांगत आहेत.

हे जगन्माते महात्रिपुरसुंदरी ! ब्रह्मदेव, विष्णु आणि शंकर हे या सृष्टीच्या रचनेचे, संरक्षणाचे आणि संहाराचे अधिकारी आहेत. अधिकारपरत्वे आपआपलें कार्य ते तुझ्याच चरणकमलाच्या प्रभावानें पार पाडीत असतात. तुझ्या चरणकमलाचा महिमा मी काय वर्णन करूं ? त्याचें साकल्याने वर्णन करणें अशक्य आहे. आई ! ब्रह्मदेवाचे हे अवाढव्य सृष्टिरचनेचें कार्य चाललेले आहे, पण त्याचें भांडवल काय आहे ? असा जर कोणी प्रश्न केला तर तुझ्या चरणकमलांतील परागाचा एक लहानसा रजःकण हेंच त्याचें उत्तर आहे. कमळाप्रमाणें सुकोमल आणि आरक्तवर्ण असलेल्या तुझ्या चरणाचा एक लहानसा रजःकण गोळा करून अथवा हातीं घेऊन ब्रह्मदेव संपूर्ण भूतभौतिक विश्वप्रपंचाची रचना करीत असतो. भूलोक, भुवर्लोक स्वर्लोक इत्यादि वरची सात भुवने आणि अतल, वितल, सुतल इत्यादि खालची सात भुवने याप्रमाणे चतुर्दश भुदनात्मक प्रचंड ब्रह्मांडाच्या रचनेचें ब्रह्मदेवाचे साधन काय, तर तुझ्या चरणकमलांतील एक रजःकण !

प्रलयकाळीं सर्व कार्यप्रपंचाचा नाश होऊन जिकडे तिकडे पृथ्वी, जल तेज आणि वायु या महाभूतांचे परमाणूच परमाणु भरलेले असतात. ते परमाणू स्वभावतः जड असल्यामुळें त्यांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची हालचाल असूं शकत नाहीं. पुढें जन्माला येणाऱ्या प्राणिमात्रांच्या अदृष्टकर्मामुळे आदिशक्तिस्वरूप जगन्मातेकडून ब्रह्मदेवाला सृष्टि निर्माण करण्याची प्रेरणा मिळते. त्या प्रेरणेनंतर ब्रह्मदेव संकीर्ण असलेल्या परमाणूंचे पृथक्करण करतात. पार्थिव परमाणू, जलीय परमाणु, तैजस परमाणु आणि वायवीय परमाणु असें परमाणूंचे संकलन झाल्यानंतर दोन-दोन पार्थिव परमाणूंना एकत्र करून त्यांच्या संयोगाने द्‍व्यणुके निर्माण केली जातात. अशा तीन द्‍व्यणुकांचे एकत्रीकरण करून एक त्रसरेणु निर्माण केला जातो. हा त्रसरेणु इतका सूक्ष्म असतो की, कडोशाच्या रूपानें झरोक्यांतून घरांत येणाऱ्या सूर्याच्या किरणांतच आपण त्याला अंतराळांत परिभ्रमण करीत असलेल्या स्वरूपांत पाहूं शकतो. असे अनेक त्रसरेणु एकत्र झाले म्हणजे व्यवहारक्षम, कार्यरूप पृथ्वी उत्पन्न होते. याच पद्धतीने जल, तेज आणि वायु यांचीही पण उत्पत्ति होत असते. ही सर्व रचना आकाशाच्या उदरांत होत असल्यामुळे आकाशही निमित्तरूपानें त्यांत घटक झालेलें असतेंच. अशा या पंचमहाभूतांपासूनच ब्रह्मदेव, वृक्ष, लता, वेली, वनस्पति, डोंगर, नद, नद्या, सागर, अग्नि, विद्युत, ग्रह, नक्षत्र, सूर्य, चंद्र आणि विविध जातींचे वायु निर्माण करतात. याच पंचमहाभूतांपासून स्त्री, पुरुष, पशु, पक्षी, कीट, पतंग इत्यादि रूपांनीं अनंत शरीरांचीही रचना ब्रह्मदेवाकडून होत असते. यालाच आपण सृष्टि असें म्हणतो.

मनानेंही जिचे आकलन करतां येत नाहीं अशा या विशाल सृष्टिरचनेचें बह्मदेवाचें भांडवल म्हणजे आदिशक्तिस्वरूप असलेल्या जगज्जननीच्या चरणकमलांतील एक सूक्ष्म रजःकण होय. जिच्या चरणकमलाचा एक सूक्ष्म रजःकण ब्रह्मांडरूपाने नटला तिच्या संपूर्ण चरणकमलाचें स्वरूप केवढे विशाल असेल आणि त्याच्याही पलीकडे तिचे संपूर्ण नखशिखान्त स्वरूप किती विशाल असेल याचे कल्पनेलाही आकलन होत नाही ! तात्पर्य, आचार्य म्हणतात, "आई ! तुझ्या चरणकमलाच्या एका अत्यंत लहान रजःकणापासून ब्रह्मदेव अत्यंत सुस्पष्टपणे अथवा अविरतपणे या संपूर्ण स्थिरचर विश्वाची रचना करीत आहे. असा महिमा तुझ्या चरणकमलांतील एका लहानशा रजःकणाचा आहे. तर मग प्रत्यक्ष तुझा महिमा केवढा असणार ? आणि मी त्याचें वर्णन काय करणार ? " असा हा या श्लोकांतील पूर्वार्धाचा अभिप्राय झाला.

या श्लोकांतील उत्तरार्धाने भगवान विथ आणि श्रीशंकर यांच्याही दृष्टीने श्रीललिता महात्रिपुरसुंदरीच्या चरणकमलाच्या रजःकणाचा महिमा वर्णन करीत आहेत. शौरी म्हणजे भगवाच विष्णु. यदुवंशांत शूर नांवाचा राजा होऊन गेला. त्याच्याच कुलांत जन्माला आलेल्या वसुदेवाच्या पोटीं श्रीकृष्णरूपानें विष्णूने अवतार घेतला म्हणून श्रीकृष्णाप्रमाणे विष्णूला देखील शौरी असे म्हणतात. भगवाच विष्णु यांना हजारों मस्तकें आहेत. "सहस्रशीर्षा पुरुषः" असें वेदांत त्यांचे वर्णन केलेले आहे "नमोऽस्त्वनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशिरोरुबाहवे" याप्रमाणे पुराणांतही श्रीविष्णूला हजारों मस्तके असल्याचें वर्णिलेलें आहे. भगवान् श्रीविष्णू हें आपल्या हजारों मस्तकांनी श्रीललितामहात्रिपुरसुंदरीच्या चरणकमलांतील परागाच्या अत्यंत सूक्ष्म रजःकणाला मोठ्या आदराने धारण करीत आहेत. अर्थात् त्याचें संरक्षण करीत आहेत. सृष्टीचे संरक्षण करणें हें विष्णूच्या अवतारांतील मुख्य कार्य आहे. संपूर्ण सृष्टि ही श्रीललितामहात्रिपुरसुंदरीच्या चरणकमलांतील परागाचा एक लहानसा रजःकण आहे हें आपण वर पाहिलेच आहे. तात्पर्य, भगवान् विष्णु देखील हें कार्य आपल्या शक्तीच्या बाहेरचे आहे, ही जाणीव ठेवून "कथमपि" म्हणजे कसें तरी अत्यंत सावध-पणाने अर्थात् अत्यंत जपून सृष्टिस्वरूप असलेल्या महात्रिरसुंदरीच्या चरणकमलातील रजःकणाचें संगोपन करीत आहेत. केवढा हा श्रीविद्यारूपी आदिशक्तीच्या चरणकमलाचा महिमा आहे ! 

भगवान् शंकरदेखील प्रलयकाळीं आपल्या सर्वांगाला आदिमाता शक्तिस्वरूप असलेल्या श्रीमहात्रिपुरसुंदरीच्याच चरणकमलांतील रजःकणाचा भस्म म्हणून लेप लावीत असतात. सुष्टीचा संहार करणें हें महादेवाचे कार्य आहे. म्हणून प्रलयकाळीं महादेव या सृष्टीचे अर्थात् सृष्टिस्वरूप असलेल्या महात्रिपुरसुंदरीच्या चरणकमलांतील रजःकणाचें चूर्ण करून तें भस्म म्हणून आपल्या सर्वांगाला लावीत असतात. हाच त्यांचा भस्मोद्धूलनविधि किंवा भस्मधारणविधि होय. तात्पर्य, आई जगज्जननी ! प्रत्यक्ष भगवाच शंकर देखील तुझ्या चरणकमलांतील एका भूत-भौतिक प्रपंचरूपी सूक्ष्म रजःकणाला भस्म म्हणून आपल्या सर्वांगाला चर्चितात आणि स्वतःला पवित्र व धन्य मानतात ! असा हा तुझ्या चरणकमलांतील रजःकणाचा महिमा अद्वितीय आहे ! पृथ्वी, जल, तेज, वायु आणि आकाश ही पंचमहाभूतें व त्यांच्यापासून उत्पन्न झालेला भौतिक विश्वप्रपंच भस्मस्वरूपच आहे असें वेदानेंही वर्णन केलेले आहे. "अग्निरिति भस्म, वायुरिति भस्म, जलमिति भस्म, स्थलमिति भस्म, व्योमेति भस्म, सर्वं ह वा इदं भस्म, मन एतानि चक्षूंषि भस्मानि" असो. जिच्या चरणकमलांतील रजःकणाचा हा महिमा आहे तर मग प्रत्यक्ष या श्रीमहात्रिपुरसुंदरीचा महिमा किती अगाध असेल याची कल्पना करावी.

ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या कृतीवरून जगज्जननीच्या अगाध महिम्याचे या श्लोकांत निदर्शन केलेलें असल्यामुळें येथें  'निदर्शना' हा अलंकार मानतात. निदर्शनेच्या जोडीला स्वभावोक्ति हाही अलंकार आहेच.
 



या ऊर्ध्वमुख त्रिकोणांत ह्रीं हें बीज आहे. हें यंत्र सोन्याच्या पत्र्यावर काढून पंचावन दिवस उत्तरेकडे तोंड करून त्याची विधिपूर्वक पूजा करावी. पायसाचा नैवेद्य दाखवावा. रोज एक हजार वेळां या श्लोकाचा जप करून यंत्र सिद्ध करावे व तें दंडांत अथवा कंठांत धारण करावे. याने सर्व लोक वश होतील, प्रकृतीवर ताबा राहील आणि आरोग्य लाभेल. अनुष्ठानाच्या वेळीं सर्वत्र तुपाचा दिवा आणि उत्तम सुवासिक उदबत्ती लावलेली असावी.

No comments: