12 April, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक ११ वा

चतुर्भिः श्रीकण्ठैः शिवयुवतिभिः पञ्चभिरपि
प्रभिन्नाभिः शम्भोर्नवभिरपि मूलप्रकृतिभिः ।
चतुश्चत्वारिंशद्वसुदल-कलाश्र-त्रिवलय-
त्रिरेखाभिः सार्धं तव शरणकोणाः परिणताः ॥ ११॥


"हें मातः त्रिपुरसुंदरि ! चतुर्भिः श्रीकण्ठैः शम्भोः सकाशात् प्रभिन्नाभिः पञ्चभिः शिवयुवतिभिः नवभिः अपि मूलप्रकृतिभिः तव शरण कोणाः वसुदल- कलाश्र-त्रिवलय-त्रिरेखाभिः सार्धं परिणताः सन्तः चतुश्चत्वारिंशत् भवन्ति" असा या श्लोकाचा अन्वय आहें. हे माते त्रिपुरसुंदरी ! चार ऊर्ध्वमुख त्रिकोण, ते शंकरांचे त्रिकोण असल्यामुळें त्यांना श्रीकंठ असें म्हणतात त्याचप्रमाणे मूळ बिंदुस्वरूप जो शंभु म्हणजे भगवान् सदाशिव त्याच्यापासून खालीं पांच अधोमुख त्रिकोण आहेत ते शक्तीचे त्रिकोण असल्यामुळें त्यांना "शिवयुवति" असें म्हटलेले आहे. हे ऊर्ध्वमुख चार त्रिकोण आणि अधोमुख पांच त्रिकोण मध्यवर्ति असलेल्या बिंदूनें प्रभिन्न म्हणजे पृथक् झालेले आहेत. असे हे श्रीचक्रांतील नऊ त्रिकोण म्हणजे जणुं कांहीं विश्वपपंचाचीं मूळ कारणेंच आहेत. ऊर्ध्वमुरव शिवचक्रांतील त्रिकोण आणि अधोमुख शक्तिचक्रांतील त्रिकोण सर्व मिळून त्रेचाळीस त्रिकोण होतात. श्रीत्रिपुरसुंदरीचे प्रत्यक्ष निवासस्थान असलेला मध्यवर्ति बिंदु हा चव्वेचाळीसावा समजावा. या सर्व त्रिकोणांच्या भोंवतालीं अष्टदल कमल, त्याच्याही बाहेर षोडशदल कमल, त्यांच्या बाहेर तीन वर्तुलें अथवा मेखला आणि त्यांच्याही बाहेर चतुष्कोणाकार तीन भूपुराच्या रेखा, अशा क्रमाने परिणत झालेलें, पूर्णतेला पोहोचलेलें श्रीचक्र हे तुझें मंदिर आहे. त्याचा महिमा मी काय वर्णन करूं ? तो अवर्णनीय आहे. असा या श्लोकाचा अन्वयानुसारी अर्थ आहे.

विश्वाचे माता आणि पिता त्याचप्रमाणे आपलें इष्ट दैवत असलेल्या अदैतभावापन्न शिवशक्तिस्वरूप श्रीललितामहात्रिपुरसुंदरीचें मंदिर असलेल्या श्रीचक्राचा काय थाट वर्णन करावा ? त्याचें जितके अवलोकन करावे, जितके चिंतन करावे तितके तें अपुरेच वाटतें. विविध वैभवाने संपन्न अशा एखाद्या विशाल राजमंदिरांत प्रवेश केल्यानंतर मन जसे तेथें रमते अथवा श्रीरामेश्वराच्या विशाल मंदिराचे प्राकार ओलांडून आपण जसा जसा आत संचार करतो तशी तशीं आपल्याला अनेक मंदिरें व तीर्थे दृष्टीस पडतात. अनेक देवतांचे दर्शन घडते. थाटामाटांत विराजमान झालेल्या श्रीरामेश्वराचें दर्शन घडले म्हणजे जीवाला एक प्रकारचे अनिर्वचनीय समाधान वाटतें. तोच प्रकार श्रीचक्राच्या स्वरूपाचे चिंतन करीत असतांना आपल्या प्रतीतीला येतो. मनाला समाधान वाटतें. आनंद वाटतो.

"चत्रुर्भिः शिवचक्रैश्च शक्तिचक्रैश्च पञ्चभिः ।
शिवशक्त्यात्मकं ज्ञेयं श्रीचक्र शिवयोर्वपुः ॥ "

ऊर्ध्वमुख चार शिवत्रिकोण आणि अधोमुख पांचः शक्तित्रिकोण असें हें नऊ त्रिकोणांचे शिवशक्तिस्वरूप असलेलें श्रीचक्र हें प्रत्यक्ष शिवपार्वतीचे स्वरूपच होय. या श्रीचक्रांत मध्यभागी असलेल्या एका वर्तुळांत ऊर्ध्वमुरव असे चार त्रिकोण दिसत आहेत तर अधोमुख असे पांच त्रिकोण दिसत आहेत. हा नऊ त्रिकोणांचा समूह हें श्रीचक्राचें अंतरंग स्वरूप आहे तर आठ दलांचे कमल, सोळा दलांचे कमल, तीन वर्तुळाकार मेखला आणि तीन रेघांचें भूपुर हें श्रीचक्राचे बहिरंग स्वरूप होय. अंतरंगाची मुख्य देवता शक्ति आहे तर बहिरंगाची मुख्य देवता शिव आहे. मध्यवर्ती असलेल्या बिंदुस्थानांत शिव आणि शक्ति तादात्म्यभावाला प्राप्त होऊन विराजमान झालेलीं आहेत. त्यांतही शक्तिस्वरूप श्रीत्रिपुरसुंदरी ही परमशिवाच्या अंकावर विराजमान झालेली आहे. अशा रीतीनें बिंदुस्थानाची देवता शिवशक्ति हीच मानली जाते. या शिवशक्तीलाच  "परदेवता" असें म्हटलें आहे.

श्रीचकाचीं एकंदर नऊ आवरणे आहेत. या प्रत्येक आवरणाला चक्र असेंच म्हटलें जातें. अधोमुख पांच त्रिकोण असलेली आपल्याकडील बाजू ही पश्चिम दिशा समजावी. ऊर्ध्वमुख चार त्रिकोण असलेली आपल्यासमोरची वरची बाजू ही पूर्वेकडील समजावी. आपल्या डाव्या बाजूस उत्तर आणि उजव्या बाजूस दक्षिण दिशा समजावी. पश्चिम आणि उत्तर यांमधील कोपरा वायव्य दिशेचा असून उत्तर आणि पूर्व यांमधील कोपरा ईशान्य दिशेचा समजावा. पूर्व आणि दक्षिण यांमधील कोपरा आग्नेय दिशेचा असून दक्षिण आणि पश्चिम यांमधील कोंपरा ही नैर्कत्य दिशा समजावी. असा हा श्रीचक्राचा दिग्विभाग लक्षांत घ्यावा. श्रीचक्रांतील तीन रेघांचे चतुष्कोणाकार भूपुर हे पहिलें आवरण असून याला त्रैलोक्यमोहनचक्र असें नांव आहे. सोळा पाकळ्यांचें कमल हें दुसरे आवरण असून याला सर्वाशापरिपूरकचक्र असें म्हणतात. आठ पाकळ्यांचें कमल हें श्रीचक्रांतील तिसरे आवरण असून याला सर्वसंक्षोभणचक्र असें म्हटले आहे. यानंतर चौदा त्रिकोण असलेलें चौथे चक्र हें श्रीचक्रांतील चौथे आवरण मानले जातें. या आवरणाला सर्वसौभाग्यदायकचक्र असें म्हणतात. यानंतर दहा त्रिकोण असलेलें बहिर्दशारचक्र हें पांचवे आवरण असून याला सर्वार्थसाधकचक्र असें नांव दिले आहे. त्यानंतर दहा त्रिकोणांचे दुसरें चक्र असून त्याला अंतर्दशारचक्र असें म्हणतात. हें चक्र श्रीचक्रातील सहावे आवरण असून त्याला सर्वरक्षाकरचक्र असें म्हटले आहे. याच्या आंत आठ त्रिकोण असलेलें सातवे आवरण असून त्याला सर्वरोगहरचक्र असें म्हटलें जातें. या सभोवार आठ त्रिकोण असलेल्या सातव्या आवरणांत मध्यवर्ती एक त्रिकोण आहे. तो मुख्य त्रिकोण असून श्रीचक्रांतील तें आठवे आवरण मानतात. या आवरणाला सर्वसिद्धिप्रदचक्र असें म्हणतात. या त्रिकोणांतही जो पोकळ शून्याकार बिंदु आहे तो या श्रीचक्रांतील नववे आवरण होय. या नवव्या आवरणाला सर्वानंदमयचक्र असें म्हणतात. याच चक्रामध्ये आपली आराध्यदेवता श्रीललितामहात्रिपुरसुंदरी ही शिवस्वरूपाशीं समरस होऊन विराजमान झालेली आहे. साधकाचें चित्त आपल्या या उपास्यदेवतेशी जेव्हां समरस होते तेव्हां त्याच्या आनंदाला सीमा रहात नाहीं. म्हणूनच या आवरणाला "सर्वानन्दमय" असें अगदीं योग्य नांव दिलेले आहे. बाकीची आवरणेंही आपआपल्या नांवाप्रमाणे साधकाला फले देतच असतात.

श्रीचक्रांतील भूपुराच्या चारी दिशांना चार दारे आहेत. चतुष्कोणाकृति भूपुर हें तीन रेघांचे आहे. जणु कांहीं ते तीन प्राकारच आहेत. पहिली रेषा शुक्र वर्णाची आहे तर दुसरी रेषा अरुण वर्णाची आहे. तिसऱ्या रेषेचा वर्ण पिवळा आहे. पहिल्या रेषेच्या चारी दरवाजांत, चारी कोंपऱ्यांत आणि पश्चिम आणि नैर्ऋत्य यांच्यामध्यें व पूर्व आणि ईशान यांच्यामध्यें दहा प्रकारच्या सिद्धि अर्थात त्या त्या सिद्धींच्या अधिष्ठात्री देवता विराजमान झालेल्या आहेत. अणिमा, महिमा, लघिमा, ईशित्व, वशित्व इत्यादि त्यांची नावे आहेत. भृपुराच्या दुसऱ्या रेषेंत चारी दरवाजामध्ये आपल्या वाम भागाकडे चार आणि चारी कोंपर्‍यांत चार अशा आठ मातृका ( लोकमाता) विराजमान झालेल्या आहेत. ब्राह्मी,  माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी इत्यादि त्यांची नावे आहेत. सात मातृका प्रसिद्धच आहेत. 

या ठिकाणी महालक्ष्मी ही आठवी मातृका असल्याचें दृष्टीस पडते. भूपुराच्या तिसऱ्या रेषेंत आपण आलों म्हणजे तेथें पहिल्या रेषेप्रमाणेंच सर्वसंक्षोभिणीमुद्राशक्ति, सर्वविद्राविणीमुद्राशक्ति इत्यादि दहा शक्तिदेवता चारी द्वारांत आणि चारी त्रिकोणांत त्याचप्रमाणे पश्चिम आणि नैर्ऋत यांच्यामध्यें एक आणि पूर्व आणि ईशान्य यांच्यामध्ये एक याप्रमाणे आपआपल्या स्थानी सुप्रतिष्ठित असलेल्य दृष्टीस पडतील. यांना प्रकट योगिनी असेही म्हणतात.

वर निर्दिष्ट केलेलें भूपुर ओलांडून आपण आत गेलों कीं पुढें सर्व बाजूंनी विशाल पटांगण असलेलें दृष्टीस पडेल. त्या पटांगणांतून पुढें आल्यावर आपल्याला तीन वलयें दिसतील. ही तीन वलये सत्त्व रज, आणि तम या तीन गुणांची द्योतक आहेत. अथवा सोम, सूर्य आणि अग्नि या तीन तत्त्वांची द्योतक आहेत अथवा इच्छाशक्ति, ज्ञानशक्ति आणि क्रियाशक्ति या तीन शक्तींची तीं द्योतक आहेत असेंही मानतात. कांहीं श्रीचक्रांतून ही तीन वलये षोडशदल कमलाला लागून असलेल्या वरच्या बाजूच्या वलयानंतर दाखवितात तर कांहीं श्रीचक्रांत चौदा त्रिकोण असलेल्या चतुर्दशारचक्राच्या बाहेर एक वर्तुल दाखवतात, तर अष्टदल कमलाच्या बाहेर दुसरें वर्तुळ दाखवितात. तसेंच तिसरे वर्तुल सोळा पाकळ्या असलेल्या कमलाच्या बाहेर त्या कमलदलांना लागून असलेलें दाखवितात. कांहीं श्रीचक्रातून पांच वर्तुलें दिसतात तर काहीतून तीं सहाही दिसतात.

श्रीचक्रांतील तीन मेखला ओलांडून आपणा आत गेलों म्हणजे आपल्याला सोळा पाकळ्यांचे कमल दिसेल. या सोळा पाकळ्या म्हणजे जशा कांहीं चंद्राच्या सोळा कलाच होत. म्हणूनच या सोळा पाकळ्यांच्या कमलाप्रमाणे असलेल्या चक्राला चंद्रस्वरूप मानलेलें आहे. बरोबर आपल्या बाजूकडील खालच्या पाकळीला आरंभ करून उजवीकडून डावीकडे प्रत्येक पाकळींत कामाकर्षिणी नित्या कलादेवी, बुद्ध्याकर्षिणी नित्या कलादेवी याप्रमाणें सोळा देवींची मंदिरे आहेत. या सोळा देवींना गुप्त योगिनी असें म्हणतात. या सर्व देवतांचे दर्शन घेऊन आपण आत गेलों म्हणजे आपल्याला आठ दलांचे कमल दिसेल. या कमलाची आठ दलें म्हणाजे भगवान् श्रीशंकर यांच्या प्रत्यक्ष आठ मूर्तिच होत. पृथ्वी, जल तेज, वायु आणि आकाश, त्याचप्रमाणे सूर्य, चंद्र आणि आत्मा ह्याच त्या शंकरांच्या आठ मूर्ति आहेत. शिवाय या कमलाच्या चारी दिशांची चार दलें आणि चारी कोणांतील चार दलें यांच्यामध्ये अनंगकुसुमादेवी, अनंगमेखलादेवी, अनंगमदनादेवी इत्यादि आठ देवतांची मंदिरे आहेत. त्या मंदिरांत सुप्रतिष्ठित असलेल्या या आठ देवता म्हणजे आपली उपास्यदेवता असलेल्या श्रीराजराजेश्वरी महात्रिपुरसुंदरीदेवीच्या गुप्तचर योगिनीच होत. हें गुप्त खाते मोठे जबरदस्त असून चौदाही भुवनांचे तें निरीक्षण करीत असतें. येथपर्यंत तीन आवरणे संपली.

अष्टदलकमलाचें वर्तुळ ओलांडून आपण आंत गेलों कीं, सर्व बाजूंनी मोकळा असलेला वर्तुलाकार असा बराच मोठा प्रदेश दृष्टीस पडेल. याच प्रदेशाला सुधासिंधु अथवा क्षीरसागर असें म्हटले आहे. या क्षीरसागरांत पुढें मोठे द्वीप दृष्टीस पडेल. याच द्वीपाला मणिद्वीप असें म्हटलेले आहे. यांत आपण प्रवेश केला कीं आपल्याला चौदा त्रिकोण असलेलें श्रीचक्रांतील चौथे आवरण दृष्टीस पडेल. याला सर्वसौभाग्यदायकचक्र असें म्हणतात. या चक्रांतील अधोमुख असलेल्या खालच्या त्रिकोणापासून उलट्या क्रमाने उजवीकडून डावीकडे असलेल्या प्रत्येक त्रिकोणांत सर्वसंक्षोभिणीशक्ति, सर्वविद्राविणीशक्ति इत्यादि नावे असलेल्या चौदा देवता विराजमान झालेल्या आहेत. यांना संप्रदाययोगिनी असें म्हणतात. याच्यापुढें दोन दशारचक्रें आहेत. एक बहिर्दशार व एक अंतर्दशार. यांतील बाहेरच्या दहा त्रिकोण असलेल्या चक्रांत खालच्या त्रिकोणापासून उलट्या क्रमाने सर्वसिद्धिप्रदादेवी, सर्वसंपत्प्रदादेवी इत्यादि नांवे असलेल्या दहा देवता सर्व त्रिकोणांत पहावयास सापडतील. हे चक्र दशावतारात्मक श्रीविष्णुस्वरूप आहे असें मानतात. यांतील देवतांना कुलोत्तीर्णयोगिनी असें म्हटलेले आहे. याच दशारचक्राप्रमाणें दुसऱ्या दहा त्रिकोण असलेल्या चक्रांतील प्रत्येक त्रिकोणांत सर्वज्ञादेवी, सर्वशक्तिदेवी, सर्वैश्वर्यप्रदादेवी इत्यादि दहा देवता आहेत. यांना निगर्भयोगिनी असे म्हणतात. याप्रमाणे पाचवे आणि सहावे आवरण ओलांडून आपण आत गेलो म्हणजे आपल्याला आठ त्रिकोण असलेलें सातवें आवरण दिसेल. या सातव्या आवरणांतही खालच्या त्रिकोणापासून उलट्या क्रमाने वशिनी वाग्देवता, कामेश्वरी वाग्देवता इत्यादि नांवे असलेल्या आठ वाग्देवता प्रत्येक त्रिकोणांत  एक-एक याप्रमाणे प्रतिष्ठित झालेल्या आहेत. यांना रहस्ययोगिनी असें म्हणतात.

सर्वरोगहर नांव असलेल्या या सातव्या आवरणांतून आपण आत गेलों की, आपल्याला मुख्य त्रिकोणाचे दर्शन होईल. या त्रिकोणाला सर्वसिद्धिप्रद असें नांव आहे. या त्रिकोणाच्या सभोंवार श्रीकामेश्वर भगवान् सदाशिव आणि श्रीकामेश्वरी महात्रिपुरसुंदरी यांची आयुधे आहेत. धनुष्यबाण, पाश आणि अंकुश अशीं त्या आयुधांची स्वरूपे आहेत. या त्रिकोणाच्या तीन भुजा म्हणजे सत्त्वगुण, रजोगुण आणि तमोगुणप्रधान अशा त्या तीन मूर्तिमंत शक्तिदेवताच आहेत. हा त्रिकोण नादशक्तीचे अधिष्ठान आहे. या त्रिकोणाचा वर्ण तांबड्या दुपारीच्या फुलासारखा आरक्त आहे. या त्रिकोणाच्या भुजांजवळ कामगिरिपीठ, जालंधरपीठ आणि पूर्णगिरिपीठ अशी तीन पीठें म्हणजे आसनस्थाने अथवा सिंहासने आहेत. या सिंहासनांवर ब्रह्मा, विष्णू आणि महेश आपआपल्या शक्तिदेवतेसह विराजमान झालेले आहेत. या देवता जागृति, स्वप्न आणि सुषुप्ति या तीन अवस्थांच्या अधिष्ठात्री आहेत. त्याचप्रमाणे सृष्टि, स्थिति आणि प्रलय यांच्याही त्या अधिष्ठात्री देवता आहेत. या त्रिकोणाच्या तीन भुजा म्हणजे अग्निचक्र, सूर्यचक्र आणि सोमचक्रच होत. इच्छाशक्ति, ज्ञानशक्ति आणि क्रियाशक्ति यांच्याही त्या अधिष्ठान आहेत. याच त्रिकोणांत आपल्या महात्रिपुरसुंदरीचेंच रूप बालात्रिपुरसुंदरीच्या रूपाने विराजमान झालेलें आहे. देवता ही मंत्रमय असल्यामुळें श्रीबालात्रिपुरसुंदरीचा मंत्रच या त्रिकोणांत दिलेला असल्याचें आढळतें, तर कांहीं श्रीचक्रांतून श्रीमहात्रिपुरसुंदरीचा पंचदशाक्षरी महामंत्र अथवा महामंत्रराज याच त्रिकोणांत विराजमान झालेले दिसतील. असा हा त्रिकोण अत्यंत महत्त्वाचा आहे.

वर निर्दिष्ट केलेल्या त्रिकोणाच्या आंत मध्यवर्ति असलेला बिंदु, ज्याला बैंदवस्थान असें म्हणतात, तो या श्रीचक्रांतील नववे आवरण होय. या बिंदुस्थानाला सर्वानंदमयचक्र असें म्हणतात. या नांवावरूनच आवरणाचे महत्त्व लक्षांत घ्यावे. हें या चक्रातील सर्वोच्च स्थान होय. जसा किल्ल्यांतील बालेकिल्ला व बालेकिल्ल्यांतील सभागृह. या सभागृहांत मधोमध एक रत्नजडित सिंहासन आहे. या सिंहासनाला चार पाय आहेत. या चारी पायांशीं ब्रह्मदेव विष्णु, रुद्र आणि महेश्वर हे सेवाभावानें नम्र होऊन बसले आहेत. त्या सिंहासनावर परम शिवस्वरूपाशी तादात्म्य पावलेली आपली उपास्यदेवता राजराजेश्वरी श्रीमहात्रिपुरसुंदरी विराजमान झालेली आहे. ती या ठिकाणी शुद्धसच्चिदानंदस्वरूपच आहे. जो साधक श्रीचक्राचा सांगोपांग विचार करीन येथपर्यंत येऊन पोहोंचतो आणि येथें श्रीमहात्रिपुरसुंदरीचे अनन्यचित्ताने दर्शन घेतो तो धन्य होतो. त्याची कर्माधीन जन्ममरण  परंपरा संपते व तो साक्षात् शिवस्वरूप होतो.

या बाह्य श्रीचक्राप्रमाणेंच आपल्या देहांतही षट्चक्रस्वरूपी श्रीचक्राचें वर्णन करतां येण्यासारखें आहे. त्याचप्रमाणे ब्रह्मरंध्रांतर्गत सहस्रदलकमल हेही एक स्वतंत्र श्रीचक्रच आहे. किंबहुना आपला संपूर्ण देहच श्रीचक्रस्वरूप आहे. या देहातील रस, रक्त, मांस, मेद आणि अस्थि हे धातु शक्तिचक्रस्वरूप आहेत तर मज्जा, शुक्र प्राण आणि जीव हे धातु शिवचक्रस्वरूप आहेत. "धारणाद्धातवः" या न्यायाने प्राण आणि जीव हे देहाची धारणा करीत असल्यामुळें त्यांनाही धातूच म्हटलें आहे. देहाप्रमाणेच संपूर्ण बाह्मांडही श्रीचक्रस्वरूपच आहे. पंचमहाभूतें हीं शक्तिचक्रस्वरूपच आहेत तर माया, शुद्धविद्या, महेश्वर आणि सदाशिव ही चार तत्त्वें शिवचक्रस्वरूप आहेत. या सर्वामध्ये सर्वोच्च स्थानीं असलेलें श्रीसच्चिदानंदघन परब्रह्मतत्त्व हीच आपली उपास्यदेवता श्रीललितामहात्रिपुरसुंदरी होय.

असें हें श्रीचक्राचें अलौकिक स्वरूप लक्षांत घेऊनच आचार्य वर्णन करीत आहेत : हे आई त्रिपुरसुंदरी ! बिंदुस्थानासह त्रेचाळीस त्रिकोणांनीं अर्थात् चव्वेचाळीस संख्येने पूर्णत्वाला पोहचलेलें तुझें श्रीचक्ररूपी मंदिर मोठे अवर्णनीय आहे. या श्लोकांत श्रीकंठ आणि शिवयुवति हे शब्द लाक्षणिक आहेत. श्रीकंठ हा शब्द शिवाचा वाचक आहे. प्रकृतस्थली श्रीकंठ शब्दानें चार शिवचक्रें समजावींत. त्याचप्रमाणे शिवयुवति या शब्दाचा वाच्यार्थ पार्वती अर्थात् शक्ति असा आहे. पण या ठिकाणी शिवयुवति या शब्दाचा अर्थ शक्तिचक्रें असा समजावा. त्याचप्रमाणें साक्षात् त्रिकोणांची संख्या त्रेचाळीस होत असल्यामुळें कांही पुस्तकांतून "त्रयश्चत्वारिंशात्" असा पाठ आढळतो. या मतानें "शरणकोणाः" या शब्दाचा षष्ठीतत्पुरुष समास मानावा लागतो. "चतुश्चत्वारिंशत्" हा पाठ मानल्यास "शरणकोणाः" या ठिकाणी शरणं च कोणाश्च असा द्वन्द्व समास स्वीकारावा लागतो. कांहीं केलें तरी तात्पर्य एकच आहे. शरण शब्दाचा अर्थ घर किंवा मंदिर असा आहे. 


हे यंत्र सोन्याच्या पत्र्यावर लिहून एक्याऐंशी दिवस शास्त्रोक्त पूजा करावी. नैवेद्य गूळ आणि पायस. श्लोकाचा जप रोज एक हजार. यंत्र सिद्ध करून धारण करावे. अथवा या श्लोकाने लोणी अभिमंत्रून एक्याऐंशी दिवस प्राशन करावे, याने वंध्या-दोष निवृत्त होतात. 
 

No comments: