22 April, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक २१ वा

तटिल्लेखा-तन्वीं तपन-शशि-वैश्वानर-मयीं
निषण्णां षण्णामप्युपरि कमलानां तव कलाम् ।
महापद्माटव्यां मृदित-मल-मायेन मनसा
महान्तः पश्यन्तो दधति परमाह्लाद-लहरीम् ॥ २१॥

या शरीरांत सहा चक्रे आहेत. त्यांना मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर इत्यादि नावे आहेत. या चक्रांना कमल अशी संज्ञा आहे. कारण कमलाप्रमाणे त्या चक्रांना दले असतात. उदाहरणार्थ, मुलाधारचक्राला चतुर्दलकमल असें म्हणतात, तर स्वाधिष्ठनाचक्राला षड्दलकमल असें म्हणतात. मणिपूरचक्राला दशदलकमल असें म्हणतात, तर अनाहतचक्राला द्वादशदलकमल असें म्हणतात, तर आज्ञाचक्राला द्विदलकमल असें म्हणतात. क्वचित् कमल या शब्दाच्या ऐवजी पद्य असाही शब्द वापरतात. दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. आचार्य म्हणतात, आई ! या साही कमळांच्या वर तुझी कला म्हणजे मूर्ति अथवा स्वरूप विराजमान झालेलें आहे. अथवा कला शब्दाचा सकलतत्त्वातीत, सर्वाधारभूत, शुद्धसच्चिदानंदरूप आदिशक्ति असाही अर्थ करतात. ही कला तंत्रशास्त्रांत सांगितलेल्या पंचवीस, छत्तीस अथवा एक्कावन तत्त्वांच्याही पलीकडची आहे. तिला शास्त्रांत "सादकला" असें म्हटलेलें आहे. ती सर्वांपेक्षा श्रेष्ट असल्यामुळें तिला परा, परात्परा अथवा परमेश्वरी असें म्हटलेलें आहे. आई जगज्जननी ! तूंच या शरीरांतील सर्व कमलांच्या वर विराजमान झालेली आहेस.

कांहीं लोक कला शब्दाचा अर्थ प्रकृतस्थलीं कुंडलिनीशक्ति असा करतात. कुंडलिनी ही श्रीत्रिपुरसुंदरीचेंच रूप आहे हें आपण नवव्या व दहाव्या लोकांत पाहिलेंच आहे. तीही पण शरीरातील साही चक्रांचा भेद करून अर्थात् साही कमळांचा भेद करून सर्वांच्या वर सहस्रदलकमलांतील चंद्रमंडलामध्यें विराजमान होत असते. कांही लोक कला शब्दाने कामकलाच येथें विवक्षित आहे असें म्हणतात. कामकला म्हणजे ईं हें बीजाक्षर. ईं हा बीजमंत्र महात्रिपुरसुंदरीस्वरूपच आहे. श्रीचक्रामध्ये ईं हा बीजमंत्र सर्व आवरणांच्या वर असलेल्या बैन्दवस्थानांत विराजमान झालेला आहे. आपल्या शरीरातही हे बैन्दवस्थान सर्व चक्रांवर असलेल्या ब्रह्मरंध्रांतील सहस्रदलकमलांत असलेलें चंद्रमंडलच मानलेले आहे. हाच अभिप्राय लक्षांत घेऊन आचार्यांनी साही कमलांच्या वर "निषण्या" म्हणजे विराजमान असलेली तुझी कला असें वर्णन केलें आहे.

आई ! कशी आहे तुझी कला असें कोणी विचारील तर सांगतो. " तटिल्लेखातन्वी तपन-शशि-वैश्वानरमयीं" तटिल्लेखा म्हणजे विद्युल्लता. ती जशी दीर्घ सूक्ष्म कुटिलाकार, प्रकाशमय आणि क्षणभर प्रतीतीला येणारी असते त्याचप्रमाणे तुझ्या उपासकाला आज्ञाचक्रामध्यें प्रतीति येत असते. त्याचप्रमाणें तपन म्हणजे सूर्य, शशी म्हणजे चंद्र आणि वैश्वानर म्हणजे अग्नि हेंच तुझें रूप आहे. तूं श्रीचक्रस्वरूप आहेस. श्रीचक्र हें त्रिखंड आहे. सोम, सूर्य आणि अग्नि हेच ते श्रीचक्रांतील तीनखंड होत. "त्रिखण्डं मातृकाचक्रं सोमसूर्यानलात्मकम्" असें श्रीचक्राचे वर्णन केले आहे. तेंच श्रीमहात्रिपुरसुंदरीचे रूप होय. श्रीचक्रांतील नऊ आवरणे म्हणजे अवांतर चक्रे यांचें पूर्वी वर्णन केलेलेंच आहे. त्यांतील बिंदुत्रिकोण आणि वसुकोण हा एक खंड समजला जातो. दहा-दहा त्रिकोण असलेलीं दोन चक्रें आणि चौदा त्रिकोणांचें एक चक्र यांना दुसरा खंड म्हणतात. तर अष्टदलचक्र, षोडशदलचक्र आणि भूपूरचक्र यांना तिसरा खंड म्हणतात. हे तीन खंड सोम, सूर्य आणि अग्निस्वरूप आहेत. या त्रिखंडालाच जागृति, स्वप्न आणि सुषुप्ति; स्थूल, सूक्ष्म आणि कारण, प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय; विश्व तैजस आणि प्राज्ञ, सृष्टि, स्थिति आणि प्रलय; ज्ञान, इच्छा आणि क्रिया इत्यादि त्रिपुटीसूचक नांवे दिली जातात. आपली आराध्यदेवता ही या त्रिपुटीची अधिष्ठात्री असल्यामुळेंच तिला त्रिपुरा अथवा त्रिपुरसुंदरी हें नांव पडलें. हे त्रिखंडात्मक श्रीचक्र हेंच त्रिपुरसुंदरीचे स्वरूप असल्यामुळें आणि तें सोम, सूर्य आणि अग्निस्वरूप असल्यामुळें आचार्यांनी त्रिपुरसुंदरीच्या कलेला "तपनशशिवैश्वानरमयी" असें विशेषण दिले आहे.

शरीरांतील षट्चक्रांच्या दृष्टीने विचार केला असतां मूलाधार आणि स्वाधिष्ठान या दोन चक्रांचें एक खंड मानतात. मणिपूर आणि अनाहत या दोन चक्रांचे दुसरें खंड मानतात तर विशुद्धिचक्र आणि आज्ञाचक्र या दोन चक्राचे तिसरें खंड मानतात. ही तिन्ही खंडें देखील सोम, सूर्य आणि अग्रिस्वरूपच आहेत. या तिन्ही खंडांच्या वर "महापद्माटवी" म्हणजे सहस्रदलकमलरूपी अरण्य आहे. मूर्धस्थानी असलेल्या सहस्रदलकमलाला हजार पाकळ्या असल्यामुळें महापद्म असें म्हटलें आहे. शरीरांतील सर्व कमलांत तें मोठे आहे. त्या कमलाचीं दले हीं अरण्यासारखीं दाट आणि जटिल आहेत, म्हणून त्या कमलाला "महापद्माटवी" असें म्हटलेलें आहे. अटवी म्हणजे अरण्य. आई त्रिपुरसुंदरी ! या अरण्यांत तुझा संचार असतो. तेथें तूं "निषण्णा" म्हणजे बसलेली आहेस. त्या सहस्रदलकमलांतील पूर्ण चंद्रांत तूं विराजमान झालेली आहेस. "महान्तः" म्हणजे मोठेमोठे तुझे अनन्यभक्त असलेले योगीश्वर हेच तुझ्या स्वरूपाला पहात असतात. कारण त्यांनीं आपल्या मनाला निर्मल केलेलें असतें. कामक्रोधादि विकार हेंच मनांतले मल होत. माया म्हणजे अविद्या, अहंकार, अभिनिवेश इत्यादि हें सर्व त्यांनीं जिंकलेले असतात. त्यांचा त्यांनी निरास करून आपल्या मनाला निर्मल केलेलें असतें. त्या निर्मल मनानेंच ते तुझ्या स्वरूपाचा साक्षात्कार करून घेतात. सकल तत्त्वातीत असलेल्या तुझ्या स्वरूपालाच "सादकला" असें म्हटलेलें आहे. साद म्हणजे चरम गति किंवा परम अधिष्ठान असा साद शब्दाचा अर्थ आहे. त्रिपुरसुंदरीच्या सादकलेचा साक्षात्कार झाल्यानंतर ते नित्य आणि निरतिशय आनंदाच्या लहरींत निमग्न होतात. "परमानन्दलहरीं दधति" आनंदाला सतत भरतें येत असल्याचा ते अनुभव घेत असतात. त्यांचा तो आनंद कधींही क्षीण होत नाहीं. अतृप्तीचा लेशही त्यांच्या चित्ताला स्पर्श करीत नाहीं. गीतेच्या शब्दांत सांगावयाचें झाल्यास "यलब्ध्वा चापरं लाभ मन्यते नाधिकं ततः" अशा अवस्थेला ते पोहोचतात. आई ! मलाही या आनंदाचा लाभ होईल. असा माझ्यावर तूं अनुग्रह कर हीच माझी प्रार्थना आहे.

सोन्याच्या, चांदीच्या अथवा तांब्याच्या पत्र्यावर हें यंत्र लिहून पंचेचाळीस दिवस पूजा करावी. रोज एक हजार या श्लोकाचा जप करावा. नैवेद्य मध, गुळ आणि केळें. याचें फल सर्व जनविरोधाचा निरास होऊन लोक वश होतील.

No comments: