04 April, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक ३ रा

अविद्यानामन्तस्तिमिर-मिहिर-द्वीप-नगरी
जडानां चेतन्य-स्तबक-मकरन्द-स्रुति-झरी ।
दरिद्राणां चिन्तामणि-गुणनिका जन्मजलधौ
निमग्नानां दंष्ट्रा मुररिपुवराहस्य भवति ॥ ३ ॥


"हे मातः तव चरणकमलपांसुः अविद्यानां अन्तस्तिमिर-मिहिर-द्वीप-नगरी भवति, जडानां चैतन्यस्तबक-मकरन्द-स्त्रुति-झरी भवति, दरिद्राणां चिन्तामणि- गुणनिका भवति, जन्मजलधौ निमग्नानां मुररिपु-वराहस्य दंष्ट्रा भवति, स कथं मां अनुपयुक्तो भविष्यति ?" आचार्य म्हणतात, आई जगल्जननी ! तूं म्हणशील कीं, तूं माझी स्तुति करावयास कसा समर्थ होशील ? तूं अज्ञानी आहेस,  जड आहेस, तुझ्या ठिकाणी विचारसंपत्ति नाहीं, तूं दरिद्री आहेस, संसार-सागरांत बुडालेला आहेस. संसारांत गर्क झालेला आहेस, तुला काय माझी स्तुति करतां येणार ? यावर माझें उत्तर असें आहे कीं, आई ! तुझ्या चरणकमलाच्या रजःकणाचे सामर्थ्य फार मोठे आहे. अर्थात तुझेंही पण. मग मी तुझ्या कृपेने नाहीं कां समर्थ होणार ?

तुझ्या चरणकमलाचा राजःकण म्हणजे "अविद्य" अर्थात् अज्ञानी असलेल्या लोकांच्या अंतःकरणांतील अज्ञानरूपी तिमिराचा नाश करणाऱ्या सूर्याची ती उदयस्थानांतील अथवा उदयाचलावरील नगरी आहे. सूर्य उदयाला आला म्हणजे अंधकार जसा मावळतो त्याप्रमाणें आई ! तुझ्या चरणकमलाच्या रजःकणानेंही अज्ञ जनांच्या अंतःकरणांतील अज्ञानरूपी अंधकार मावळतो यांत शंका नाहीं. त्याचप्रमाणें तुझ्या चरणकमलांतील राजःकण म्हणजे जड अर्थात मतिमंद असलेल्या लोकांना चैतन्यरूपी पुष्पगुच्छांतील मकरंदाला अविरत स्रवणारा तो एक झराच आहे. तात्पर्य, जडालाही चैतन्य प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य आई ! तुझ्या चरणकमळाच्या रजःकणांत आहे. तो राजःकण म्हणजे दयनीय दरिद्री लोकांचे सकल मनोरथ पूर्ण करणारा चिंतामणिरत्नांचा समूहच आहे. गुणनिका शब्दाचा अर्थ माळा अथवा राशि, समूह असा आहे. एक चिंतामणि जरी हातीं लागला तरी दारिद्र्याचा परिहार होऊन सर्व मनोरथ पूर्ण होतात, तर मग चिंतामणि रत्नांची माळ अथवा राशि हातीं आल्यानंतर दारिद्र्याचा परिहार होईल हे काय सांगावयास पाहिजे ? आई ! तुझ्या चरागकमलाच्या कृपेनें माझ्या सर्व विचारदारिद्र्याचा परिहार होईल यांत शंकाच नाही.

आई जगज्जननी ! तुझ्या चरणकमलाचा राजःकण म्हणजे जन्ममरणरूपी संसारसागरांत पार बुडून गेलेल्या लोकांना त्यांचा उद्धार करणारी ती एक आदि विष्णूस्वरूप असलेल्या वराहाची दाढाच आहे ! पूर्वी ही पृथ्वी समुद्रामध्ये रसातळाला गेली असतां आदिविष्णूंनीं वराहाचा अवतार धारण करून विरोध करणाऱ्या हिरण्याक्षाचा वध केला आणि आपल्या दाढेवर तोलून धरून पृथ्वीचा उद्धार केला ही पुरातन ऐतिहासिक कथा प्रसिद्धच आहे. आई ! माझ्यासारख्या संसारसागरांत बुडालेल्या जनांचा उद्धार करण्याकरितां तुझ्या चरणकमलाचा रजःकण म्हणजे आदि-विष्णुस्वरूप असलेल्या वराहाची ती एक दाढाच आहे. तात्पर्य, संसारसागर कितीही गहन असला तरी तुझ्या चरणकमलाच्या कृपेने उद्धार होण्यास कांहींच अवघड नाहीं ! आई ! हा सर्व विचार करूनच मी तुझी स्तुति करण्यास प्रवृत्त झालो आहें. तात्पर्य, तुझ्या कृपेने माझे सकल मनोरथ पूर्ण झालेच पाहिजेत.

या श्लोकांत महात्रिपुरसुंदरीच्या चरणकमलांतील रजःकणाला नगरी, झरी, चिंतामणि-माला आणि वराहदंष्ट्रा अशी कल्पना करूनआचार्यांनी परंपरित रूपकाची जणुं कांहीं मालाच तयार केली आहे ! प्रत्येक ठिकाणी कल्पनेचे रमणीयत्व, गांभीर्य हें कांहीं अपूर्व आहे. कांहीं लोक या ठिकाणी परिणामालंकारही मानतात.
 



हें यंत्र सोन्याच्या पत्र्यावर लिहून त्याची ईशान्य दिशेकडे तोंड करून विधिपूर्वक चोपन दिवस पूजा करावी. उडदाच्या वड्यांचा नैवेद्य दाखवावा. रोज दोन हजार वेळां श्लोकाचा जप करून यंत्र सिद्ध करावे. याने सर्व ऐश्वर्याचा व विद्येचा लाभ होतो.

No comments: