07 April, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक ६ वा

धनुः पोष्पं मौर्वी मधुकरमयी पञ्च विशिखाः 
वसन्तः सामन्तो मलय-मरुदायोधन-रथः ।
तथाप्येकः सर्वं हिमगिरिसुते कामपि कृपा-
मपाङ्‌गात्ते लब्ध्वा जगदिदमनङ्‌गो विजयते ॥ ६ ॥


"हे हिमगिरिसुते ! अनङ्‌गः ते अपाङ्‌गात् कां अपि कृपां लब्ध्वा इदं सर्वं जगत् एकः विजयते" हे हैमवती गिरिजे माते ! हा अनंग म्हणजे शरीर नसलेला मदन अर्थात् कामदेव तुझ्या कृपापूर्ण कटाक्षांतून अनिर्वचनीय असा कृपेचा लेश संपादन करून त्याच्या जिवावर हें सर्व जग तो एकटाच जिंकतो. असा या श्लोकातील मुख्य अन्वय आणि त्याचा अर्थ आहे.

मागच्या श्लोकांत अनंग म्हणजे कामदेव हा श्रीविद्येच्या उपासनेनें समर्थ झाला असें सांगितले. त्याचेंच अधिक स्पष्टीकरण या श्लोकांत करीत आहेत. कामदेव हा स्वतः अनंग म्हणजे शरीररहित आहे. तरी तो सर्व जगाला जिंकीत असतो. बरें त्याची युद्धाची सामग्री तरी काय आहे ? त्याचे धनुष्य पहावें तर तें "पौष्पं" म्हणजे फुलांचें तयार केले असतें. म्हणूनच मदनाला संस्कृत भाषेमध्ये पुष्पधन्वा असें नांव आहे. मौर्वी म्हणजे धनुष्याची दोरी. ती पहावी तर "मधुकरमयी" अर्थात भ्रमरांची माळा. भ्रमरांचा समुह ! तो काय धनुष्याच्या दोरीचे काम करणार ? आणि फुलांचें धनुष्य तरी काय उपयोगाला येणार ? "विशिख" म्हणजे बाण. ते पहावेत तर ते संख्येने पांचच आहेत. हे पांच बाण हातचे निघून गेले कीं, पुढें तो काय युद्ध करणार ? बरें मदनाला साहाय्य करणारा पहावा तर तो वसंत. वर्षांतून दोन महिने त्याचें अस्तित्व ! तो बिचारा किती साहाय्य करणार ? बरें याचा युद्ध करण्याचा रथ तरी कोणता आहे ? असें विचाराल तर सांगतात, "मलयमरुत्" म्हणजे दक्षिणेकडील मलय पर्वतावरचा वारा ! त्याला ना रूप ना आकार ! असा हा कामदेवाच्या युद्धाच्या सामग्रीचा थाट आहे ! तरी देखील तो एकटा या सर्व जगाला जिंकीत असतोच. हा कशाचा प्रभाव आहे ? हे नगाधिराजतनये माते पार्वती ! हा तुझ्या कृपाकटाक्षाचा प्रभाव आहे ! तात्पर्य, आई जगदंबे ! तुझी कृपा मुक्यालाही वाचस्पति बनवते ! पंगुलाही मेरु पर्वताचे उल्लंघन करायला लावते ! राईचा पर्वत बनविते तर पर्वताचाही खंदक करते ! योग्य कारण नसतांनाही कार्याची निष्पति दाखविल्यामुळे या श्लोकांत विभावना अलंकार साधला आहे.

शंकरांनी कामदेवाला जाळून टाकले, पण पार्वतीने आपल्या कृपापूर्ण अमृतमय दृष्टीनें त्याला पुन्हा जन्म दिला ! अक्षि म्हणजे डोळा. पार्वतीच्या अक्षीपासून कामदेवाला पुन्हा जन्म मिळाल्यामुळे तिला कामाक्षी असें नांव पडलें. कांची नगरीची ती अधिष्ठात्री देवता आहे. "कामोऽक्षितो यतो जातस्तस्याः कामेश योषितः । कामाक्षीति ततः ख्यातिं सा गता काञ्चिचकापुरे" कामेश्वरयोषित् याचा अर्थ भगवान् सदाशिव यांची पत्नी जगन्माता महात्रिपुर सुंदरी असा आहे. तात्पर्य, आई जगज्जननी ! तुझा हा अद्‌मुत प्रभाव पाहूनच मी तुझ्या चरणीं शरण आलों आहे. कृपा करून तूं मलाही कृतार्थ कर.
 




श्लोक क्रमांक ५ प्रमाणेंच याही श्लोकाचें यंत्र केवळ त्रिशूलयुक्त समभुज चतुष्कोण तयार करून मध्यभागीं क्लीं क्लीं क्लीं या बीजांच्या एकाखाली एक अशा दोन ओळी लिहाव्यात. त्या दोन ओळींमध्ये थोडे अंतर ठेवून त्या जागी साध्याचा उल्लेख करावा. सोन्याच्या पत्र्यावर हें यंत्र लिहून पूर्वेकडे तोंड करून यथाशास्त्र एकवीस दिवस अनुष्ठान करावे. उंसाचे सोलीव तुकडे करून त्यांचा नैवेद्य दाखवावा. रोज पांचशे वेळां श्लोकाचा जप करावा. फल = षांढ्यनिवृत्ति आणि पुत्रप्राप्ति.

No comments: