11 April, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक १० वा

सुधा-धारासारैश्चरण-युगलान्तर्विगलितैः
प्रपञ्चं सिञ्चती पुनरपि रसाम्नाय-महसः ।
अवाप्य स्वां भूमिं भुजगनिभमध्युष्ट-वलयं
स्वमात्मानं कृत्वा स्वपिषि कुलकुण्डे कुहरिणि ॥ १० ॥ 

 हे मातः चरणयुगलान्तर्विगलितेः सुधाधारासारैः प्रपञ्चं सिञ्चन्ती रसाम्नायमहसः (सकाशात्) स्वां भूमिं पुनः अपि अवाप्य भुजगनिभं अध्युष्टवलयं स्वं आत्मानं कृत्वा कुलकुण्डे स्वपिषि" आई त्रिपुरसुंदरी ! तुझ्या दोन्ही चरणकमलांतून स्रवणाऱ्या अमृताच्या धारावृष्टींनीं तूं देहांतील सर्व नाड्यांच्या समूहाला आणि नाड्यांच्या द्वारा देहालाही पण शिपडतेस, तृप्त करतेस, त्यांचें पोषण करतेस आणि त्यानंतर पुन्हा चंद्रमंडलांतून खाली उतरतेस. आपल्या पहिल्या स्थानाला येतेस. तेथें सर्प जसा वेटोळें घालून बसावा त्याप्रमाणें तूं स्वतःचें (साडेतीन) वेटोळे करून कुंडाप्रमाणे असलेल्या आधारचक्रांतील कुहरांत अर्थात् छिद्रामध्ये पूर्वीप्रमाणेच झोंपतेस. तात्पर्य, लोकोपकाराकरितां हा तुझा सर्व खेळ चालला आहे ! असा या लोकाचा अन्वय आणि त्याचा अर्थ आहे.

मागील श्लोकांत कुंडलिनीरूप श्रीमहात्रिपुरसुंदरी मुलाधारादि चक्रांच्या ठिकाणी क्रमशः पृथ्वी, जल इत्यादि तत्त्वांचा लय करीत मस्तकामध्यें असलेल्या हजार पाकळ्यांच्या कमलांतील चंदमंडलामध्यें विहार करते असें सांगितलें. आतां या श्लोकांत ती त्या चंद्रमंडलांतील आपल्या चरणकमलांच्या स्पर्शाने पुनीत झालेल्या अमृताच्या वृष्टीने साधकाच्या देहांतील सर्व नाड्यांना व नाड्यांच्या द्वारा साधकाच्या शरीरपिंडालाही तृप्त करते, पुष्ट करते आणि पुन्हा पूर्ववत् सृष्टिक्रमाच्या अनुरोधानें सर्व तत्त्वांचा आविष्कार करीत मूलाधारचक्राजवळ असलेल्या आपल्या स्थानांत स्वाधिष्ठानचक्रांत वेटोळे घालून स्वस्थ झोपते. हें सर्व तिचे कार्य साधकाच्या शरीरपिंडाचें पोषण आणि परिपालन होण्याच्या दृष्टीनेंच चाललेले असतें. जें पिंडी तें ब्रह्माडी या न्यायाने साधकाच्या शरीरपिंडाप्रमाणेंच अखिल बह्मांडाचेंही ती पोषण आणि परिपालन करीत असतेच. अशा या तिच्या दयापूर्ण लीलेचें वर्णन आचार्य करीत आहेत.

आपल्या शरीरांत एक सहस्रदल कमल आहे. ज्याला आपण व्यवहारामध्ये मेंदू, मगज अथवा मस्तिष्क म्हणतो तेंच हें सहस्रदल कमल होय. हें सर्व तत्त्वांचे बीजस्थान आहे. सर्व तत्त्वांचा लय यांतच होत असतो. हेंच सच्चिदानंदरूप महात्रिपुरसुंदरीचें अधिष्ठान आहे. श्रीविद्येच्या ध्यानात्मक समाराधनेमध्यें या सहस्रदलकमलाला श्रीचक्र असेंच म्हटलेले आहे. नामरूपात्मक विश्वप्रपंचाचीं मूळ बीजभूत असलेली अक्षरें आणि तत्त्वें ही बाह्य श्रीचक्राप्रमाणेंच या ब्रह्मरंध्रस्थानीं असलेल्या सहस्रदल कमलरूपी श्रीचक्रांतही अंतर्भूत झालेलीं आहेत. शक्तितत्त्व हें वाक्प्रपंचाचें उगमस्थान आहे तर शिवतत्त्व हें अर्थप्रपंचाचें उगमस्थान आहे. शब्दप्रपंच आणि अर्थप्रपंच या दोन्ही प्रपंचाचे मूळ अक्षरांतच असल्यामुळें श्रीचक्रांतील सर्व त्रिकोणांत आणि कमलदलांत आपल्याला अक्षरांचाच विन्यास दृष्टीस पडेल. श्रीचक्र हें शिवशक्तिस्वरूप पूर्ण तत्त्वाचें अधिष्ठान असल्यामुळें श्रीचक्रांत आपल्याला शिवचक्रांचा आणि शक्तिचक्रांचाही एकत्र समावेश असलेला दृष्टीस पडतो. आपल्या घराला सर्व बाजूंनी जसा परिघ असावा किंवा कुसूं असावें त्याप्रमाणे श्रीचक्रांत आपल्याला बाहेरून आंत प्रवेश  करतांना पहिल्या प्रथम तीन रेघांचा चतुष्कोण दिसेल. यालाच भूपुर असें म्हणतात. या भूपुराला चार द्वारे आहेत. तीं क्वचित उघडी असतात तर क्वचित भूपुरांशीं अखंडपणें संलग्न असतात. आपण भूपुरांत प्रवेश केला कीं, त्या ठिकाणी कांहीं भाग मोकळा दृष्टीस पडेल. त्यापुढे आपल्याला तीन वर्तुळे दिसतील. अर्थात् तीन वर्तुळाकार रेघा दिसतील. कांहीं ठिकाणी त्या चारही असल्याचे दिसते. सर्वत्र विकल्प हा मतभेदामुळे अथवा संप्रदायभेदामुळें असतो ही गोष्ट लक्षांत घ्यावी. ही तीन वर्तुळे जणु कांहीं बाह्य विश्वाच्या त्रैगुण्याची द्योतक आहेत.

या वर्तुळांच्या आंत षोडशदल कमल आहे. त्याच्याही औत एक अष्टदल कमल आहे. षोडशदळकमलातील प्रत्येक पाकळीत अं, आ इत्यादि सोळा स्वरांची बीजे लिहिलेली असतात. श्रीचक्र आपल्या हातावर घेऊन पहा. त्यांत आंतल्या बाजूला असलेल्या भूपुराच्या द्वारामध्ये जें दल येईल त्यांत अं हें बीज दिसेल. पुढें उजवीकडून उलट्या बाजूनें प्रत्येक दलांत आ, ई इत्यादि स्वरबीजे पृथक पृथक् लिहिलेली असतात. याप्रमाणे सोळा दलांत सोळा स्वर पूर्ण होतात.

षोडशदल कमलानंतर आपल्याला आंतल्या बाजूस अष्टदल कमल दिसेल. पुढच्या बाजूस ऊर्ध्वमुरव त्रिकोणाशी संलग्न असलेल्या दलात क - वर्गातील बीजाक्षरें सरळ क्रमाने लिहिलेली दिसतील. आपल्या बाजूस असलेल्या अधोमुख त्रिकोणाशी संलग्न असलेल्या दलांत ट - वर्गांतील बीजाक्षरें लिहिलेली असतात. उजवीकडींल दलांत च - वर्गाचीं बीजाक्षरें लिहितात, तर डावीकडील दलात त - वर्गाची बीजाक्षरें लिहितात. उजव्या बाजूकडील वरच्या कोपऱ्यांतील दलांत प - वर्गातलीं बीजाक्षरें पहावयास सांपडतील तर खालच्या बाजूच्या कोपऱ्यांतील दलांत य - वर्गातील चार बीजाक्षरें लिहिलेली दिसतील. त्याचप्रमाणें डाव्या बाजूच्या खालच्या कोपऱ्यांतील दलांत श - वर्गातील चार बीजे लिहिलेलीं असून वरच्या कोपऱ्यातील दलात ळं आणि क्षं ही दोन बीजाक्षरें लिहिलेली असतात. याप्रमाणे अष्टदल कमलापर्यंतची सर्व चक्रे ही शिवचक्रे म्हणून समजली जातात. या शिवचक्रांच्या आंत आपण गेलों म्हणजे आपल्याला शक्तिचक्रांचा समूह दिसेल.

आतां आपण शक्तिचक्रांचा विचार करूं. अष्टदल कमलाचे अवलोकन करून आपण आंत गेलों की, प्रथम आपल्याला सर्व बाजूंनी मोकळा असलेला बराच मोठा वर्तुळाकार प्रदेश दृष्टीस पडेल. या प्रदेशांत अनेक त्रिकोणांनी संलग्न असलेली पांच चक्रें आहेत. पांचवे चक्र केवळ त्रिकोणात्मकच आहे. यांत पहिलें चक्र चौदा त्रिकोणांचे आहे, तर त्याच्या आंतील दोन चक्रे ही दहा-दहा त्रिकोणांची आहेत. त्यांच्या आंतील एक चक्र आठ त्रिकोणांचे असून त्याच्या आंत शुद्ध त्रिकोण दिसत आहे. पहिल्या चौदा त्रिकोणांच्या चक्राला "चतुर्दशार" असें म्हणतात, तर त्याच्या आतील दहा-दहा त्रिकोण असलेल्या दोन चक्रांना क्रमशः  "बहिर्दशार" आणि "अन्तर्दशार" असे म्हणतात. त्यांच्याही पलीकडे असलेल्या आठ त्रिकोणांच्या चक्राला अष्टकोण अथवा वसुकोण अशीं नांवे दिलेली आहेत. त्याच्याही आंत आपल्याला शुद्धत्रिकोण पहावयास सापडेल. या त्रिकोणात्मक चक्रांत दुसरा कोणताही त्रिकोण घटक झालेला नाहीं. म्हणून या चक्राला शुद्धित्रिकोण असेंच म्हटलें जातें. चतुर्दशार चक्रामध्यें खालच्या बाजूला जो त्रिकोण आहे त्यांत कं हें बीजाक्षर असून क्रमाक्रमाने उजवीकडून डावीकडे खं, गं या क्रमाने ढं पर्यंत चौदा बीजाक्षरें आहेत. त्याचप्रमाणे बहिर्दशारचक्रांतील दहा त्रिकोणांत खालच्या त्रिकोणापासून उजवीकडून डावीकडे णं-पासून भं-पर्यंत दहा बीजें लिहिली जातात, तर अंतर्दशार चक्रांतील दहा त्रिकोणांत मं पासून क्षं पर्यंत असलेलीं दहा बीजे लिहिलेली दृष्टीस पडतात. आपल्या देहांतही मूलाधारचक्रापासून आज्ञाचक्रापर्यंत जी सहा चक्रें आहेत त्या चक्रांच्याही दलांत सर्व स्वर आणि व्यंजने बीजरूपानें समावलेलींच आहेत. म्हणून कुलपथांतील अर्थात् सुषुम्नामार्गांतील षट्चक्रे आणि श्रीयंत्रांतील चक्रें ही एकरूपच समजली जातात.

मूर्धस्थानीं असलेल्या सहस्रदल कमलांतही श्रीचक्राची भावना केली जाते. या श्रीचक्रांतही स्वरवर्णात्मक मातृकाबीजांची स्थापना केलेली असतेच. या मूर्धस्थानी विलसत असलेल्या सहस्रदलकमलांतील श्रीचक्रांत सर्व कलांनी परिपूर्ण असलेले, वृद्धिक्षयविरहित आणि निष्कलंक असें एक चंद्रमंडल आहे. श्रीचक्रांतील त्रिकोणांत मध्यवर्ती जसा बिंदु आहे त्याचप्रमाणें हा पूर्ण चंद्र सहस्रदल कमलांतील श्रीचक्रांत विराजमान झालेला आहे. या पूर्ण चंद्रांतच आपली उपास्यदेवता श्रीललितामहात्रिपुरसुंदरी ही मंगलमय शिवततत्त्वाशीं समरस होऊन विहरत असते. याच वेळेला तिच्या चरणकमलाच्या स्पर्शानें स्पंदित झालेल्या चंद्रमंडलातून अमृताचा स्त्राव होत असतो व त्या अमृताने शरीरातील बहात्तर हजार नाड्यांचे व त्या नाड्यांबरोबर देहाचेंही परिपोषण होत असतें असा योग्यांचा व तांत्रिकांचा सिद्धान्त आहे.

श्रीचक्रांतील मूलभूत मध्यवर्ति असलेल्या त्रिकोणाच्या बाहेर जे आठ त्रिकोण असलेलें चक्र आहे, ज्याला "अष्टार" किंवा वसुकोण अथवा अष्टकोणचक्र म्हणतात, त्या चक्रांत आपल्या बाजूला अधोमुख असलेल्या त्रिकोणापासून उजवीकडून डावीकडे उलट्या क्रमाने प्रत्येक त्रिकोणांत मंत्रस्वरूप वाग्देवतांची बीजें स्थापन केलेली असतात. तीं क्रमाने र्ब्लूं, न्व्लीं, य्लूं, ज्र्मीं, ह्स्ल्व्यूं, झ्म्य्र्‌रूं, क्ष्म्रीं अशी आहेत. या अष्टारचक्राच्या आंत असलेल्या त्रिकोणांत आपल्या उपास्य देवतेचा पंचदशाक्षरी महामंत्रराज विराजमान झालेला आहे.

देवीभुजंगमस्तोत्रांतील सोळावा श्लोक पहा. या त्रिकोणांतही मध्यवर्ती असलेला बिंदू हा पूर्ण अर्थात् पोकळ स्वरूपाचा असून त्यामध्ये महामंत्रराजाच्या अंतिम बीजानें घटित असलेला "ॐ ईं ईं नमः" हा मंत्रच तादात्म्यभावाला प्राप्त झालेल्या शिवशक्तीच्या रूपाने विलसत आहे. उपासनाबलानें येथपर्यंत पोहचलेल्या साधकाच्या आनंदाला पारावार उरत नाहीं.

हें सर्व अंतर्गत व बहिर्गत श्रीचक्रसमाराधनेचें स्वरूप आणि फल लक्षांत घेऊन आचार्य या श्लोकाने वस्तुस्थितीनें श्रीललिता महात्रिपुरसुंदरीचें वर्णन करीत आहेत. आई जगज्जननी ! तुझे चरणकमल हें खरोखर अमृताचा वर्षाव करणारे आहेत. त्या अमृताच्या वृष्टीने तूं व्यष्टी आणि समष्टीच्या विश्वप्रपंचाचें सिंचन करतेस. "रसाम्नायमहसः" रसाम्नायमहस् शब्दाचा अर्थ चंद्र असा आहे. कारण तेथें रसाची - अमृताची पूर्ण अभिवृद्धि असते. आम्नाय शब्दाचा अर्थ जसा वेद आहे तसाच अभिवृद्धि असाही पण आहे. ज्याच्यामध्ये अमृताची पूर्ण अभिवृद्धि आहे असा 'महस्' म्हणजे तेजोमय अथवा कांतिरूप असलेला चंद्र, त्या चंद्रांतून अमृताचा वर्षाव होतो व त्या वृष्टीनें साधकाच्या सर्व नाड्यांचे व देहाचेंही पोषण होत असतें. हें सर्व कार्य कुंडलिनीच्या रूपाने चाललेले असतें. त्यानंतर पुन्हा ती त्रिपूरसुंदरी कुंडलिनीच्या रूपाने खालीं उतरते. पुन्हा पूर्ववत् ती आपल्या प्रदेशांत म्हणजे मूलाधारभूत चक्रावर आधारित होऊन स्वाधिष्ठानचक्रामध्यें एखाद्या सर्पाप्रमाणे साडेतीन वेटोळे घालून झोप घेत असते. ती तिची निदा आधारचक्राच्या मध्यभागी कुंडाप्रमाणे असलेल्या खळग्यांत तोंड घालून होत असते. त्याच ठिकाणी उगम पावणाऱ्या सुषुम्ना नाडीचाही मार्ग तिनें आपल्या मुखानें अवरुद्ध केलेला असतो. कु म्हणजे पृथ्वी तिचे लं इत्याकारक बीज तेथेंच लीन असतें. म्हणून आधारचक्राला कुल असें म्हटले आहे. त्या आधारचक्रांतला मध्यवर्ति भाग सखल असल्यामुळें त्याला कुलकुंड असे म्हणतात. त्या कुलकुंडांतही एक सूक्ष्म छिद्र आहे. त्यालाच आचार्यांनी कुहर असें म्हटले आहे. इडा आणि पिंगला यांच्यामध्ये असलेली सुषुम्ना नाडी येथूनच उगम पावत असते. निद्रिस्त असलेल्या सर्पाकार कुंडलिनीच्या मुखाने सुषुम्नेचें द्वार झाकलेले असतें. त्यामुळें प्राणवायुचा सुषुम्नेमध्यें प्रवेश होत नाहीं. जोपर्यंत सुषुम्ना नाडींत प्राणवायूचा प्रवेश होत नाहीं तोपर्यंत साधकाला अंतर्मुखता प्राप्त होत नाहीं. जोपर्यंत अंतर्मुखता नाहीं तोपर्यंत मनाला स्वास्थ्याचा लाभ होत नाहीं व जोपर्यंत स्वास्थ्याचा लाभ नाहीं तोपर्यंत समाधानही नाहीं. तात्पर्य समाधानासाठी स्वास्थ्य पाहिजे, स्वास्थ्यासाठी अंतर्मुखता पाहिजे, अंतर्मुखतेसाठी सुषुम्ना नाडीचे द्वार उघडले जाणें आवश्यक आहे व सुषुम्ना नाडीच्या द्वाराचें उद्‌घाटन होण्यासाठी कुंडलिनीची जागृति होणें आवश्यक आहे. ही कुंडलिनीची जागृति श्रीललितामहात्रिपुरसुंदरीच्या उपासनेने घडवून आणता येते. श्रीत्रिपुरसुंदरी ही कुंडलिनीस्वरूपच आहे. तेव्हां तिची उपासना हेंच तिच्या जागृतीचे उत्कृष्ट साधन आहे यांत संशय नाहीं. कांहीं लोक "कुहरिणि" हें श्रीललितामहात्रिपुरसुंदरीचेच विशेषण मानतात. कांहीं मानले तरी वर निर्दिष्ट केलेल्या अर्थाला बाध येत नाहीं. 





या यंत्रातील सहाही त्रिकोणांत ह्रीं बीज असल्याचें लक्षांत घ्यावें. हें यंत्र सोन्याच्या पत्र्यावर लिहून त्याची विधिपूर्वक सहा दिवस पूजा करावी. केळांचा नैवेद्य दाखवावा. रोज या श्लोकाचा एक हजार जप करावा. तांबड्या रेशमी दोऱ्यांत बाधून ते यंत्र धारण केल्यास शरीरातील तेजःस्वरूप शुक्र धातूची वृद्धि होते. षांढ्य जाते. हें सिद्ध यंत्र धारण केल्यास स्त्रियांच्या शरीरांतही रजःप्रवृत्ति निर्माण होते.

No comments: