08 April, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक ७ वा

क्वणत्काञ्चीदामा करिकलभ-कुम्भस्तननता 
परिक्षीणा मध्ये परिणत-शरच्चन्द्र-वदना ।
धनुर्बाणान्पाशं सृणिमपि दधाना करतलैः
पुरस्तादास्तां नः पुरपथितुराहोपुरुषिका ॥ ७ ॥


"पुरमथितु आहोपुरुषिका नः पुरस्तात् आस्ताम्" त्रिपुरारि भगवान् सदाशिव यांनी जिच्याबद्दल अहंकार बाळगावा, जिच्यामुळे स्वतःला धन्य मानावे, जिच्या सामर्थ्यावर विश्वाला सुखी करावे, शिव म्हणजे मंगलमय आणि शंकर म्हणजे सुखी करणारा अशी बहुमानाची ख्याति मिळवावी, ती शंकरांची आहोपुरुषिका म्हणजे मूर्तिमंत अहंकार अथवा उत्साहशक्ति श्रीदेवी महात्रिपुरसुंदरी,  "नः" म्हणजे आमच्या "पुरस्तात्" म्हणजे पुढें अर्थात् हृदयमंदिरामध्यें किंवा हृत्कमलामध्ये निरंतर विराजमान असो, असा या श्लोकांतील मुख्य अन्वय आणि त्याचा अर्थ आहे.

मागील दोन श्लोकांत भगवाच श्रीविष्णू आणि कामदेव यांनी श्रीविद्येची उपासना करूनच महात्रिपुरसुंदरीची कृपा संपादन केली व तिच्या कृपेनेच ते पूर्ण समर्थ बनले असे प्रतिपादन केलें. आपणही तिची उपासना करून कृतार्थ व्हावें या अभिप्रायाने या श्लोकांत श्रीविद्यास्वरूप असलेल्या महाशक्तीचे सगुण स्वरूप आचार्य स्पष्ट करीत आहेत. ध्यानाकरितां सगुण स्वरूपाचीच आवश्यकता असते. इष्टदेवतेच्या सगुण स्वरूपांत चित्ताला स्थिर करून तेथें त्याची एकतानता करणें यालाच ध्यान असें म्हणतात. तें ध्यान सगुण स्वरूपाचेंच होऊं शकते. निर्गुणाचे चिंतन करतां येतें पण ध्यान करतां येत नाहीं. याच अभिप्रायाने "अथ ध्यानं" असें म्हणून आपण जे लोक म्हणत असतो त्या श्लोकांत इष्ट देवतेच्या सगुण स्वरूपाचेंच वर्णन केलेलें असतें असें आपल्या दृष्टीस पडेल.

यावर कोणी असें म्हणेल कीं, अहो ! " ब्रह्मानन्दं परमसुरवदं केवल ज्ञानमूर्तियम्" या सद्‌गुरूच्या ध्यानांत सद्‌गुरूच्या निर्गुण स्वरूपाचेंच वर्णन केलेले आहे. तेव्हां ध्यानाकरितां सगुण स्वरूपच लागतें, हें विधान बरोबर नाहीं. यावर उत्तर असें कीं,  "ब्रह्मानन्दं परमसुखदं" या श्लोकांत शेवटीं "सद्‌गुरु तं नमामि" असें जें वाक्य आहे त्या वाक्यांतील सद्‌गुरु हाच शब्द त्यांच्या सगुण स्वरूपाचा द्योतक आहे. ब्रह्मानन्द इत्यादि शब्दांनी त्यांचा स्वभाव वर्णिलेला आहे. सद्‌गुरु हे आकृतीने मानव असले, तरी स्वभावाने ते परब्रह्म स्वरूप असतात. सद्‌गुरूंच्या स्वभावाचे चिंतन व आकृतीचे ध्यान हेंच त्या श्लोकांत विवक्षित आहे. निर्गुणाचेंही ध्यान करतां येतें असा कोणी आग्रहच धरला तर "क्लेशोऽधिकतरस्तेषां " त्यांना अत्यंत क्ल्श पडतात हें श्रीकृष्णाचे वचन त्यांनी लक्षांत घ्यावे.

असो. प्रकृतस्थलीं श्रीविद्यास्वरूप महात्रिपुरसुंदरीचे भक्तजनांना सहज सुलभ रीतीनें ध्यान करतां यावें म्हणून आचार्य तिच्या सगुण स्वरूपाचें वर्णन करीत आहेत. कशी आपली माता श्रीललितामहात्रिपुरसुंदरी आहे तें पहा : तिने आपल्या कमरेला रत्नजडित सुवर्णाचा कंबरपट्टा घातलेला आहे. त्या कंबरपट्ट्यांतील साखळ्यांना घुंगरे बसविलेली आहेत. त्या घुंगरांचा कर्णमधुर आवाज होत आहे. जगजननी त्रिपुरांबा श्रीविद्या आपल्यावर अनुग्रह करण्याकरितां चालत येत आहे. आपल्या हृत्कमलांत वास्तव्य करण्याकरितां ती चालत येत आहे. ती चालत आहे म्हणूनच तिच्या कंबरपट्ट्यांतील घुंगरांचा आवाज होत आहे याच अभिप्रायाने "क्वणत्काञ्चीदामा" या पदात क्वणत् या शब्दाचा उपयोग केलेला आहे. जिचा काञ्चीदाम म्हणजे कंबरपट्टा क्वणर् म्हणजे मधुर शब्द करणारा आहे अशी ती माता त्रिपुरसुंदरी. असा पहिल्या विशेषणाचा अर्थ आहे. कंबरपट्टा हें एक उदाहरणमात्र आहे. इतरही सर्व अलंकार यथायोग्य रीतीनें तिने घातलेले आहेत असेंच तिचे ध्यान करावे.

"करि-कलभ-कुम्भ-स्तन-नता" भक्तजनांचें पोषण करण्याकरितां तिने आपल्या स्तनांमध्यें स्तन्य अर्थातू अमृतरूप दुग्ध धारण केलेले असल्यामुळें ती तीस वर्षांच्या हत्तीच्या गंडस्थलाप्रमाणें पुष्ट असलेल्या स्तनभारानें किंचितू नम्र झालेली दिसत आहे. भगवान सदाशिव हे विश्वंभर आहेत तर त्यांची अर्धांगी जगज्जननी श्रीविद्या ही तत्स्वरूपच असल्यामुळें ती विश्वंभरा आहे. विश्वाच्या भरण-पोषणाला अनुरूप असा स्तनभार धारण करणें हें तिच्या अंगीं असलेल्या अनन्यसाधारण वात्सल्याचें द्योतक आहे. अनन्यभावानें आपण तिची आराधना केल्यास भक्तवत्सला जगज्जननी आपली उपेक्षा करणार नाही हें निश्चित समजावे असा भाव या विशेषणांत आहे.

"मध्ये परिक्षीणा" भक्तजनांनीं ध्यान करण्याकरितां तिने धारण केलेला देह हा मध्यभागी म्हणजे कमरेजवळ परिक्षीण म्हणजे कृश झालेला दिसत आहे. कमरेजवळ उदराची दिसणारी कृशता ही विकृति नसून तें देहरूपी उपाधीचे प्राकृतिक सौंदर्य आहे. जगज्जननीचे मुखकमल हें शरदृतूंतील पूर्णिमेच्या पूर्ण चंद्राप्रमाणे अत्यंत तेजस्वी आणि आल्हाददायक आहे. तिच्या वरच्या दोन्ही हातांत अंकुश आणि पाश ही दोन आयुधें आहेत. उजव्या हातांत अंकुश असून डाव्या हातांत पाश म्हणजे दोरी आहे. ही दोन्ही आयुधे सुवर्णाची आहेत. खालच्या उजव्या हातांत पुष्पांचे बाण असून डाव्या हातांत उंसाचे धनुष्य तिने धारण केले आहे. कपाळी केशराचा मळवट असून तिने केसांच्या भांगापर्यंत उभा कस्तूरीचा टिळा धारण केलेला आहे. नेत्र प्रफुल्लित आहेत. मुखावर मंद हास्य झळकत आहे. अरुण वर्णाचे वस्त्र परिधान केले असून, अरुण वर्ण असलेल्या फुलांची माळ तिच्या गळ्यांत शोभत आहे. तिची अंगकांतीही जास्वंदीच्या फुलाप्रमाणे देदीप्यमान आहे. असेंच जपाच्या वेळीं तिचे ध्यान करावे. याप्रमाणें आचार्यांनी तिचे दुसरीकडेही वर्णन केलेले आहे. श्रीललितामहात्रिपुरसुंदरी ही स्वतः निर्गुण, निराकार, निर्विकार, शुद्ध, चिन्मय, आनंदमय असूनही केवळ भक्तजनांच्या कल्याणासाठी तिने हें सगुण साकार रूप धारण केले आहे. साधकाने तिच्या याच स्वरूपाचे चिंतन करावे. ध्यान करावे. या श्लोकांतील  "आहोपुरुषिका" या शब्दाचा अर्थ अहंकार, स्वाभिमान असा आहे. गर्व त्याज्य असला तरी स्वत्वाभिमान हा आदरणीयच असतो. ही गोष्ट सर्वमान्य आहे  तात्पर्य, अशी ही श्रीदेवी ललितामहात्रिपुरसुंदरी आमच्यापुढे नित्य विराजमान असो. 
 


या श्लोकाचें यंत्र त्रिशूलरहित केवळ सोन्याच्या पत्र्यावर समभुज चतुष्कोण काढून मध्यभागी क्लीं हें बीज लिहावे. पंचेचाळीस दिवस पूर्वेकडे तोंड करून विधियुक्त पूजा करावी. रोज या लोकाच्या एक हजार जप करावा. पायसाचा नैवेद्य दाखवावा. सिद्ध केलेले हें यंत्र शत्रूवर विजय मिळविण्यास अत्यंत उपयुक्त आहे.

No comments: