02 April, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक १ ला

शिवः शक्त्या युक्तो यदि भवतिशक्तः प्रभवितुं
नचेदेवं देवो न खलु कुशलः स्पन्दितुमपि
अहस्त्वामाराध्यां हरि-हर-विरिञ्चादिभिरपि
प्रणन्तुं स्तोतुं वा कथमकृतपुण्यः प्रभवति ॥ १ ॥


भगवान् शिव हे जर शक्तीनें युक्त असतील तरच ते सर्व कार्य करण्यास समर्थ होतात. ते शक्तियुक्त नसतील तर त्यांच्या ठिकाणी खरोखर स्पंदन करण्याचेंही सामर्थ्य असूं शकत नाहीं ! म्हणून हे सकलशक्तिस्वरूपिणी माते ! ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांनी देखील आराधना करण्यास योग्य असलेल्या तुझ्या चरणी प्रणाम करण्यास किंवा तुझी स्तुति करण्यास, ज्याच्या पदरीं पुण्याची सामग्री नाहीं असा कोण बरें समर्थ होईल ?  अर्थात पदरीं पुण्याची सामग्री असल्याशिवाय तुझ्या चरणी प्रणाम करण्याची बुद्धि होणार नाहीं आणि तुझी स्तुति करण्याचीही पण बुद्धि होणार नाहीं. असा या श्लोकाचा सरळ अन्वयानुसारी अर्थ आहे.

" देवः शिवः यदि शक्त्या युक्तः भवति तदैव प्रभवितुं शक्तः, एवं न चेत् सः स्पन्दितु अपि खलु कुशलः न । अतः हरिहरविरिञ्चादिभिः अपि आराध्या त्वां प्रणन्तुं स्तोतुं वा अकृतपुण्यः कथं प्रभवति ॥ " असा या लोकाचा अन्वय आहे.

आतां आपण या श्लोकाच्या विशेष अर्थाचा विचार करूं. श्रीराजराजेश्वरी श्रीविद्यास्वरूप असलेली ललितामहात्रिपुरसुंदरी ही या स्तोत्राची अधिष्ठाची देवता आहे. ती शुद्धचैतन्यस्वरूप आहे. तिलाच आदिमाया चिच्छक्ति अथवा केवलशक्ति असेही म्हणतात. उत्पत्ति, स्थिति आणि प्रलय यारूपानें या विश्वप्रपंचाची जी अविरत घडामोड चाललेली आहे त्याच्या मुळाशीं तीच शक्ति कारणीभूत आहे. ती अनादि आणि अनंत असल्यामुळें तिला सनातन असेंही म्हणतात. अभिव्यक्त होणाऱ्या सर्व कार्यांचा ती शक्ति आश्रय असून तीच सर्व कार्यांच्या रूपाने नटते. याच अभिप्रायानें " सृष्टिस्थितिविनाशानां शक्तिभूते सनातनि । गुणाभये गुणमयि नारायणि नमास्तु ते " असें मार्कण्डेय पुराणांत तिचे वर्णन केले आहे.

यावर कोणी असें विचारील कीं, अहो या विश्वाच्या मुळाशी असलेल्या तत्त्वाला आदिविष्णु अथवा आदिनारायण असें म्हणतात. "विश्वस्य कर्ता भुवनस्य गोप्ता" अशा लगी शब्दांनीच त्याचें वर्णन केले आहे. शक्तितत्त्व हें विश्वाच्या उत्पत्तीचे अथवा प्रवृत्तीचे मूळ आहे असें तत्त्ववेत्ते मानीत नाहीत. पण ही आशंका बरोबर नाहीं. विश्वाच्या मुळाशी असलेल्या तत्त्वाचें प्रतिपादन करणारा शब्द पुंल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे हा खरा महत्वाचा मुद्दा नसून त्या तत्त्वाचे स्वरूप काय आहे ? हाच खरा महत्त्वाचा विषय आहे. स्नेही अथवा मित्र या अर्थाने प्रतिपादन करणारा संस्कृतमधला मित्र शब्द नपुंसकलिंगी आहे. जल अथवा पाणी या अर्थाचा संस्कृतमधील "आप" शब्द स्त्रीलिंगी आहे पत्नी अथवा स्त्री या अर्थाचा संस्कृतमधील "दार" शब्द पुंलिंगी आहे. याप्रमाणे शब्दाचे लिंग भिन्न असलें तरी अर्थामध्यें भेद होत नाहीं. याच न्यायानें विश्वाच्या मुळाशी असलेल्या तत्त्वाला आदिनारायण, आदिविष्णु, आदिशिव असे शब्द योजले काय किंवा आदिमाया, आदिशक्ति असे शब्द योजले काय, तत्त्वांत कांहींच फरक पडत नाही.

आदिभगवान्, आदिविष्णु, आदिनारायण अथवा आदिशिव इत्यादि शब्दांनी ओळखले जाणारे, विश्वाच्या मुळाशी असलेलें जें सोपाधिक चित्तत्त्व त्या तत्त्वाचेंही अधिष्ठान असलेलें जें निरुपाधिक चित्तत्त्व तेंच प्रकृतस्थळी आचार्यांना आदिशक्ति, महाशक्ति अथवा केवलशक्ति या शब्दाने विवक्षित आहे. याच शक्तीच्या प्रेरणेने परमात्मा ब्रह्मा, विष्णु आणि शिव या रूपानें नटला अनुक्रमे सर्व जगाची उत्पत्ति, स्थिति आणि प्रलय ही कार्य करूं लागला ! शक्तीशिवाय प्रेरणा नाहीं हा सिद्धान्त निर्विवाद आहे. याच शक्तीमुळे अव्यक्ताच्या ठिकाणी " तदैक्षत, बहुस्याम्, प्रजायेय " या वाक्यांत सांगितल्याप्रमाणें ईक्षण आणि बहुरूपानें नटण्याच्या संकल्पाचे स्फुरण अभिव्यक्त झाले. याच शक्तीमुळे परमात्मा बहुरूपाने नटूं शकला. याच परमात्म्याला कोणी आदिविष्णू म्हणतात तर कोणी आदिशिव असेही म्हणतात.

आदिविष्णूच्या किंवा आदि शिवाच्या ठिकाणी असलेली ही शक्ति त्यांच्याहून निराळ्या स्वरूपाने पहाता येत नाहीं म्हणूनच शक्ति आणि शक्तिमान् यांच्यामध्ये अभेद मानला जातो. लौकिक व्यवहारामध्ये देखील शक्तीने शक्तिमानाला सोडले कीं तो शक्तिमान् पूर्वींप्रमाणे शक्तिमान या स्वरूपांत शिल्लक उरत नाही. तो शक्तिहीन अर्थात् अचेतन, जड होतो. याच मूलशक्तीला  'चिच्छक्ति' असें म्हटलेले आहे. हीच चिच्छक्ति भिन्नभिन्न पदार्थांमध्ये त्या त्या पदार्थांच्या विशिष्ट शक्तीच्या रूपाने प्रतीतीला येत असते. याच अभिप्रायाने "अम्बास्तव" नांवाच्या स्तोत्रांत या शक्तीचे वर्णन करतांना "हे जगज्जननी अम्बे ! चंद्रामध्ये आल्हाददायक असलेली चंद्रिका हें तुझेच रूप आहे. सूर्यामध्ये प्रखर तेजाच्या रूपानें तूंच विराजमान झालेली आहेस. पुरुषांमध्यें चैतन्यरूपानें तूंच वास्तव्य करतेस. चराचर सर्व भूतांना प्राणदान देण्याचे अथवा बल देण्याचें वायूमध्ये असलेले सामर्थ्यही तूंच आहेस. गोडीच्या रूपाने पाण्यांत आणि उष्णतेच्या रूपाने अग्नींत तूंच रहातेस. फार काय सांगावे, या विश्वातील पदार्थमात्रांत साररूपानें तूंच रहातेस. साररूपानें सर्वत्र तूं आहेस म्हणूनच हें विश्व रमणीय आहे. तूं जर या विश्वांतील पदार्थांना सोडलेस तर हे सारे पदार्थ असार, तुच्छ, त्याज्य असेच होतील.  "त्वं चन्द्रिका शशिनि तिग्मरुचौ रुचिस्त्वं, त्वं चेतनाऽसि पुरुषे पवने बलं त्वम् । त्वं स्वादुताऽसि सलिले शिखिनि त्वमूषा, निःसारमेव निखिलं त्वदृते यदि स्यात् । "

याच शक्तीचे आणखी एका ठिकाणीं स्तवन करतांना असें म्हटलें आहे कीं, हें आई जगदंबे ! या त्रैलोक्यामध्ये साऱ्या शब्दप्रपंचाची व विश्वप्रपंचाची जननी तूंच आहेस. तुलाच वाग्वादिनी अथवा सरस्वती असें म्हणतात. तुझ्यापासूनच सृष्टीच्या आरंभी ब्रह्मा, विष्णु, महेश त्याचप्रमाणे इन्द्र, वरुण, कुबेर इत्यादि देव प्रकट होतात आणि सृष्टीच्या अंती खरोखर ते सर्व तुझ्यामध्येच लीन होतात ! खरोखर तुझा रूपमहिमा अचिंत्य आहे. तुझें काय वर्णन करावे ? "सर्वश्रेष्ठ शक्ति" याच एका शब्दानें तुझें वर्णन केलें जातें ! "शब्दानां जननी त्वमत्र भुवने वाग्वादिनीत्युच्यसे, त्वत्तः केशव-वासव-प्रभृतयोऽप्याविर्भवन्ति ध्रुवम् । लीयन्ते खलु यत्र कल्पविरमे ब्रह्मादयस्तेऽप्यमी, सा त्वं काचिदचिन्त्यरूपमहिमा शक्तिः परा गीयसे ॥ "

असो, ही शक्ति ज्याच्यामध्ये वास्तव्य करते ती त्याच्याहून निराळी दिसत नाहीं. म्हणून शक्ति आणि शक्तिमान हे दोघेही एकरूपच मानले जातात. वस्तुतः ते एकरूपच आहेत. शक्ति आणि शक्तिमान यांच्यांत भेद मानणें हें अपरिपक्व विचारांचेंच द्योतक आहे. एकाग्र चित्ताने तत्त्वचिंतन करणाऱ्या योग्यांना - तत्त्ववेत्त्यांना - शक्ति आणि शक्तिमान यांच्यांत भेद दिसत नाहीं. "शक्तिशक्ति मतोर्भेदं वदन्त्यपरमार्थतः । अभेदमनुपश्यन्ति योगिनस्तत्त्वचिन्तकाः"  (कूर्मपुराण). तात्पर्य, चिच्छक्ति, महाशक्ति, आदिशक्ति, शक्ति, अम्बा, जगज्जननी, दुर्गा, भवानी, ललिता, महाविद्या, श्रीविद्या, महात्रिपुरसुंदरी, महामाया इत्यादि सर्व नांवे एकाच तत्त्वाची आहेत.

आतां आपण "शिव" या शब्दाच्या अर्थाचा विचार करूं. शिव म्हणजे मंगलमय कल्याणस्वरूप सदाशिवतत्त्व. यालाच परमात्मा आदिविष्णु अथवा आदिशिव असेही म्हणतात. जन्ममरणादिरूप कोगत्याही विकाराचा ज्याला तिळमात्रही स्पर्श नाहीं, आध्यात्मिक, आधिदैविक अथवा आधिभौतिक अशा त्रिविध दुःखांपैकी कोणत्याही दुःखाचा ज्याच्या ठिकाणीं लेशही नाहीं; कोणत्याही प्रकारचे अशुभ, अमंगल ज्याच्या ठिकाणी नाहीं तो सदासर्वकाळ नित्य निरतिशय आनंदरूप असलेला परमात्मा हाच या ठिकाणी शिव शब्दाचा अर्थ आहे. 'वश्' या धातूपासून शिव शब्द निष्पन्न झालेला आहे. विश्वाच्या उत्पत्तीला कारणीभूत असलेल्या इच्छाशक्तीचा तो आश्रय असल्यामुळें त्याला शिव असें म्हणतात. "वष्टि इति शिवः" अशी शिव शब्दाची व्युत्पत्ति आहे. 'वश्' धातूचा अर्थ प्रकाशणें असा घेतल्यास "वशति" म्हणजे प्रकाशतो तो शिव. अर्थात स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश असलेला परमात्मा असा त्याचा अर्थ होतो. तो स्वतः स्वयंप्रकाश आहे, एवढेच नसून तो आपल्या प्रकाशाने साऱ्या विश्वालाही प्रकाशित करतो म्हणूनही त्याला शिव असे म्हटलेले आहे.

यावर कोणी असें विचारील की, अहो ! वश् धातूवरून शिव शब्द कसा निष्पन्न होणार ? पुढचा श मागें व मागचा व पुढे कसा गेला ? याला उत्तर असें कीं, क्वचित् प्रसंगीं असा वर्णविपर्यय होतो, अर्थात् विपरीत वर्णरचना होते. ही गोष्ट व्यवहारसिद्ध आहे. हिंस्र म्हणजे मारणें, ठार करणें या धातूपासून सिंह  शब्द बनला. दृश् पश्य पहाणे या धातूपासून पश्यक शब्द बनावयाचा, पण व्यवहारामध्ये पश्यक या शब्दाऐवजी कश्यप हाच शब्द रूढ असल्याचें दिसत आहे. याच न्यायाने वश् धातूपासून वर्णविपर्ययानें शिव शब्द निष्पन्न होऊन व्यवहारांत रूढ झाल्याचे दिसत आहे. मराठी भाषेंतही कोठे कोठे हा गमतीचा प्रकार पहावयास सांपडतो. अरसा या शब्दांतील रस शब्दाचा अर्थ पारा असा आहे. कांचेच्या एका बाजूस पारा लावला म्हणजे ती कांच प्रतिबिंब ग्रहण करण्यास योग्य बनते. वस्तुतः ही कांच रसाने म्हणजे पाऱ्याने युक्त झाल्यामुळे सरस झाली. पण व्यवहारांत तिला आपण आरसा म्हणतो  ! त्याचप्रमाणे वधूला वरण्यासाठी आलेल्या वरदेवाला उद्देशून आपण नवरदेव असा शब्दप्रयोग करतो.  याप्रमाणें मराठी भाषेत रूढीने वराचा नवरा केला. त्याचप्रमाणे वश् धातूपासून रूढीने शिव शब्द निष्पन्न झाल्याचें दृष्टीस पडते "हिंसि धातोः सिंहशब्दो, वशकान्तौ शिवः सूतः । वर्णव्यत्ययतः सिद्धौ पश्यकः कश्यपो यथा ॥ "

शी धातूचा अर्थ निद्रा घेणे व वा धातूचा अर्थ फेकणे, दूर टाकणे. या दोन धातूंपासून निष्पन्न झालेल्या शिव शब्दाचा अर्थ ज्यानें अज्ञानरूपी निद्रेला फेकून दिलेले आहे तो सदासर्वकाळ जागृत असलेला परमात्मा असाही करतात. वा धातूचा अर्थ वाहणे, जाणें असा केल्यास निद्रा शब्दाने उपलक्षित असलेल्या अज्ञानाला - अविद्येला अथवा मायेला धारण करून जीवभावाला प्राप्त होणारा परमात्मा असाही शिव शब्दाचा अर्थ करतात. तात्पर्य, कोणतीही व्युत्पत्ति घेतली तरी शिव शब्दाचा अर्थ परमात्मा भगवान सदाशिव असाच होतो. हा परमात्माच ब्रह्मा, विष्णु आणि शंकर या रूपाने नटतो व अखिल विश्वप्रपंचाचे उत्पादन, परिपालन आणि नियमन करीत रहातो. शिवस्वरूप असलेल्या परमात्म्याच्या ठिकाणीं हे सर्व सामर्थ्य आले कोठून ? यावर आचार्य उत्तर देतात, शिव म्हणजे परमात्मा. हा जेव्हां शक्तीने युक्त होतो तेव्हांच तो हें सर्व कार्य करण्यास समर्थ होतो. शिव शब्दांत असलेला इकार हा शक्तीचा वाचक आहे. शिव शब्दांतून तो इकार काढल्यानंतर राहिलेल्या शब्दाला कांहीं महत्त्वाचा अर्थ उरत नाहीं. शक्तिविरहित झालेला शिव हा शवासारखा जड अचेतन बनतो ! शक्तीमुळेच शिवाला देवपण आले आहे. शक्तीने त्याला सोडले कीं, तो तिळमात्रही हालचाल करूं शकत नाही. "न खलु कुशलः स्पन्दितुमपि" खरोखर स्पंदन करण्याचेंही सामर्थ्य त्याच्या ठिकाणी उरत नाहीं, मग तो विश्वाची घडामोड काय करणार ? तात्पर्य, परमेश्वराच्या ठिकाणी "कर्तुं अकर्तुं अन्यथा कर्तुं" असें जें सामर्थ्य आहे तें सर्व शक्तीमुळेच आहे. हे शक्तिस्वरूपिणी माते महात्रिपुरसुंदरी ! हा सर्व तुझाच प्रभाव आहे.

व्यवहारांमध्यें देखील वधूवर हे लक्ष्मीनारायणस्वरूप अथवा शिवशक्तिस्वरूपच मानले जातात. त्यांत वधू ही लक्ष्मीस्वरूप अथवा शक्तिस्वरूप आहे. या शक्तीचें साहाय्य नसेल तर वर हा नारायणस्वरूप अथवा शिवस्वरूप असूनही प्रपंचक्षमता त्याच्या ठिकाणी असूं शकत नाहीं ही गोष्ट प्रसिद्धच आहे. जें पिंडीं तें ब्रह्मांडीं हा न्याय प्रसिद्धच आहे.

अशा रीतीनें सर्व विश्वाची आधारशक्ति, ज्ञानशक्ति, इच्छाशक्ति आणि क्रियाशक्ति सर्व कांहीं श्रीमाता ललिता ललितामहात्रिपुरसुंदरीच असल्यामुळें ब्रह्मा विष्णू आणि रुद्र त्याचप्रमाणे इंद्र, वरुण, कुबेर, अग्नि आणि वायु इत्यादि देवही आपआपल्या अंगीकृत कार्याचें अर्थात् तें निर्वेधपणे पार पाडण्याचे सामर्थ्य आपल्याला लाभावे म्हणून तिची आराधना करीत असतात. सकलांचे सकल मनोरथ पूर्ण करण्याला तीच समर्थ असल्यामुळें या विश्वांत आराधना करण्याला तीच योग्य आहे .आचार्य म्हणतात, "आई ! तुझ्या अंगीं असलेले हे स्वतःसिद्ध गुण लक्षांत घेऊन मी तुझी स्तुति करण्यास प्रवृत्त झालो आहें. नसते गुण तुझ्या अंगीं कल्पून मी कांहीं तुझी खोटी स्तुति करीत नाही. आई ! तुझी स्तुति करण्याला अथवा तुझ्या चरणी प्रणाम करण्याला देखील पूर्वी कांहीं सुकृताची शिदोरी संपादन केलेली असेल तरच तो समर्थ होऊं शकेल. पदरीं पूर्वार्जित पुण्याची सामग्री नसेल तर तुझ्या चरणी प्रणाम करणें किंवा तुझी स्तुति करणें हे त्याला घडणार नाहीं."

भक्तांची सर्व दुःखे हरण करतो म्हणून विष्णूला हरि असें म्हणतात. प्रलयकालीं सर्व सृष्टीचा संहार करण्याचें कार्य महादेवाकडे असल्यामुळे महादेवाला हर असें म्हणतात. "विशेषेण रिञ्चति इति विरिञ्चः" विशेषेंकरून भौतिक सृष्टि निर्माण करतो म्हणून ब्रह्मदेवाला 'विरिञ्च' असें म्हणतात. हरिहरादिकांवर जसा तूं अनुग्रह करतेस तसाच माझ्यावरही पण कर. असा आचार्यांचा यांतील गर्भितार्थ आहे. या श्लोकातील शिव, शक्ति इत्यादि सर्व शब्द अभिप्रायगर्भित असल्यामुळें साहित्यशास्त्राच्या दृष्टीने परिकरालंकार होतो ! तसेंच पूर्वार्धांतील विषय उत्तरार्धांतील विषयाला कारणीभूत असल्यामुळें काव्यलिंग या नांवाचाही अलंकार आहेंच. श्लेष आणि समासोक्ति हेही अलंकार दृष्टीस पडतात. मंगलमय ध्येयभूत वस्तुस्थितीचे यथार्थ वर्णन हा तर सर्वांत मोठा अलंकार आहे. हें संपूर्ण स्तोत्र शिखरिणी वृत्तांत आहे. या वृत्तांत चार चरण असून प्रत्येक चरणांत सतरा अक्षरें असतात. सहाव्या आणि अकराव्या अक्षरावर विराम असतो. क्रमाने य्गण, मगण, नगण, सगण आणि भगण अशी गणांची योजना असून त्यापुढे एक लघु अक्षर आणि एक गुरु अक्षर असतें. "रसै रुद्रैश्छिन्ना यमनसभलागः शिखरिणी"

या स्तोत्रांतील प्रत्येक श्लोक मंत्रस्वरूप असल्यामुळें त्याचें सबीज यंत्र, त्याची पूजा-अनुष्ठान पद्धति व त्याचें फल इत्यादि सर्व प्रकार आंग्ल, केरळ, द्रविड, तामिळ, आंध्र आणि संस्कृत अशा अनेक भाषांतून प्रसिद्ध आहेत. आम्ही मराठीच्या जिज्ञासू वाचकांना त्याचा संक्षिप्त परिचय येथे देत आहों. यद्यपि कर्म हें निष्काम बुद्धीने अर्थात परमेश्वरार्पणबुद्धीनेच अतुष्ठिलें जाणें  श्रेयस्कर असतें. तथापि, एखाद्या काम्य फलाची कामना अपरिहार्य असेल आणि त्यांत कोणाचा द्वेष, मत्सर अथवा शोक, दुःख अभिप्रेत नसेल तर तें काम्य कर्मही करावयास हरकत नाहीं. 




हें यंत्र तांदळाचे पीठ कालवून स्थंडिलावर काढावे. त्याची पूर्वेकडे तोंड करून शास्त्रोक्त पूजा करावी. गूळ, नारळ आणि केळांचे मिश्रण करून नैवेद्य दाखवावा. तुपाचा दिवा लाबून बारा दिवस रोज एक हजार वेळ या श्लोकाचा जप करावा. सकल कार्यसिद्धि हें याचे फळ आहे. सोन्याच्या पत्र्यावर यंत्र काढून याच पद्धतीने तें सिद्ध करावें व कंठांत धारण करावें.

No comments: