09 April, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक ८ वा

सुधासिन्धोर्मध्ये सुरविटपि-वाटी-परिवृते
मणिद्वीपे नीपोपवनवति चिन्तामणिगृहे ।
शिवाकारे मञ्चे परमशिव-पर्यङ्‍क-निलयां
भजन्ति त्वां धन्याः कतिचन चिदानन्दलहरीम् ॥ ८ ॥ 


"हे मातः धन्याः कतिचन चिदानन्दलहरीं त्वां भजन्ति" हे जगज्जननी माते ! धन्य म्हणजे भाग्यवान पुण्यवान असलेले असे फारच थोडे लोक अखंड चिदानन्द-प्रवाहस्वरूप असलेल्या तुझी उपासना करीत असतात. अर्थात चिदानन्द-स्वरूप असलेल्या तुझी उपासना करणारे फारच थोडे भाग्यवंत लोक असतात. असा या श्लोकातील मुख्य अन्वय आणि त्याचा अर्थ आहे.

मागील श्लोकांत ध्यान करण्याला उपयुक्त असें महात्रिपुरसुंदरीच्या सगुण स्वरूपाचे वर्णन केलें. आतां या श्लोकांत तिच्या ऐश्वर्याचे वर्णन करीत आहेत. .सुधासिंधु म्हणजे अमृताचा महासागर, क्षीरसागर असा अर्थ समजावा. या क्षीरसागरांत एक पुष्पराग, पद्यराग, गोमेद, वज्र, वैडूर्य, नील, मौक्तिक, प्रवाळ इत्यादि विविध रत्नांचे सुंदर द्वीप आहे. त्या द्वीपामध्ये जिकडे तिकडे देवांना अत्यंत प्रिय असलेल्या वृक्षांची अर्थात कल्पवृक्ष, संतानवृक्ष, हरिचंदनवृक्ष, मंदारवृक्ष आणि पारिजातवृक्ष या वृक्षांची गर्दी आहे. त्यांची वनेंच्या वनें दृष्टीस पडतात. वाटी म्हणजे उपवनें अथवा बगीचे. त्यांतही आंतल्या बाजूला कदंबवृक्षांचें सुंदर उपवन आहे. त्या कदंबवनांत चिंतामणि रत्‍नांचे सुंदर मंदिर आहे. त्या मंदिरांत परमरमागीय मंगलमय अशा स्वरूपाचे सिंहासन आहे. जणुं कांहीं भगवान् सदाशिव हेच सिंहासन बनलेले आहेत. त्या सिंहासनावर त्यांच्या अंकी अर्थात् वामांकीं श्रीललितामहात्रिपुरसुंदरी विराजमान झालेली  आहे. शिवतत्त्वाच्याही पलीकडे असलेलें परमशिवतत्त्व हेंच तिचे पर्यंकाप्रमाणें  "निलय" म्हणजे वास्तव्यस्थान आहे. परमशिवतत्त्वामध्येंही ती शक्तिरूपानें अधिष्ठित् झालेली आहे. ती शुद्धचित्स्वरूप आणि आनंदस्वरूप आहे. साधक ध्यान करीत करीत तेथपर्यंत जाऊन पोहोंचला कीं, साधकाच्याही अंतःकरणांत अनिर्वचनीय आनंदाच्या लहरी उसळतात ! चित् म्हणजे शुद्ध आत्मस्वरूपाचें ज्ञान, त्याच्या प्रकाशाने प्राप्त होणारा जो अद्वितीय अनिर्वचनीय आनंद अर्थात नित्य निरतिशय सुख अथवा आत्यंतिक समाधान. त्याचे तरंग साधकाच्या अंतःकरणांत उसळत असतात. त्याच्या आत्यंतिक आनंदाला सारखे भरते येत असतें ! आई ! केवढा तुझ्या स्वरूपसाक्षात्काराचा हा महिमा आहे ! तो फारच थोड्यांच्या वाट्याला येतो. तो ज्यांच्या वाट्याला येतो ते खरोखर धन्य होत. यद्यपि चिदानंद हा निर्विकार असल्यामुळें त्याला उसळी येणे किंवा भरते येणे हे संभवत नाहीं, तथापि या ठिकाणीं त्या आनंदाची परिपूर्ण अवस्थाच या ठिकाणी लहरी, उचंबळणे अथवा भरते येणें या शब्दांनी विवक्षित आहे. या ठिकाणचा हा आनंदलहरी शब्दच या स्तोत्राच्या पूर्वार्धाचा वाचक असल्याचें कांहीं विद्वान् मानतात.

कांहीं लोक या श्लोकाचा अर्थ श्रीचक्राला अनुलक्षूनही लावतात. श्रीचक्रामध्ये नऊ आवरणे असतात. आवरण शब्दाचाही अर्थ मंडल किंवा चक्र असाच करतात. श्रीचक्रामध्यें खालची चार चक्रें शिवाची व वरची पांच चक्रें शक्तीच्यी मानली जातात. शिवचक्रें आणि शक्तिचक्रें यांच्यामध्ये असलेल्या अवकाशाला सुधासिंधु असे म्हटलेले आहे. भूपुर, त्रिवलय, षोडशदल कमल आणि अष्टदल कमल हा परिसर ओलांडून आपण पुढें गेलों कीं, शक्तिचक्रांना आरंभ होतो. या शक्तिचक्रांच्या सभोंवारच परिसर हाच सुधासिंधु होय. या सुधासिंधूमध्यें चौदा त्रिकोणांचें एक चक्र दहा-दहा त्रिकोणांची दोन चक्रें आणि आठ त्रिकोणांचें एक चक्र, या सर्वच चक्रांतील बेचाळीस त्रिकोण ह्या जणुं कांहीं मंदार, पारिजात कल्पवृक्ष इत्यादि देववृक्षांच्या वाटिका म्हणजे बागाच आहेत. श्रीमहात्रिपुरसुंदरीच्या अंशभूत असलेल्या या त्रिकोणांतील देवता कल्पद्रुमाप्रमाणे भक्तजनांचे सकल मनोरथ पूर्ण करीत असतात म्हणून या त्रिकोणांना कल्पद्रुम असे म्हटलेले आहे या बेचाळीस त्रिकोणांनी मध्यवर्ति असलेला त्रिकोण हा सर्व बाजूंनी वेष्टिलेला आहे. या मुख्य त्रिकोणाला चिंतामणि-मंदिर म्हटलेले असून त्याच्या बाहेरच्या बेचाळीस त्रिकोण असलेल्या चक्रांना मणिद्वीप कल्पिलेलें आहे. या त्रिकोणांच्या घटक असलेल्या रेखा हे जणु कांहीं त्या मणिद्वीपांतील कदंबवृक्षच होत. कदंबवृक्ष हे श्रीमहात्रिपुरसुंदरीचे अत्यंत आवडते वृक्ष आहेत. म्हणूनच आचार्यानी तिला कदंबवनवासिनी, कदंबवनचारिणी, कदंबवनमध्यगा अशीं विशेषणे दिलेली आहेत.  "कदम्बकाननावासा कदम्बकुसुमप्रिया" असें त्रिशतीमध्यें तिचे वर्णन केलेले आहे. "कदम्बमञ्जरिकॢप्तकर्णापूरमनोहरा" कदंबाच्या मंजरी कर्णभूषण म्हणून तिने आपल्या कानांवर धारण केलेल्या असल्यामुळें ती मोठी मनोहर दिसत आहे असें ललितासहस्रनामांत तिचे वर्णन केलेले आहे. कदंब हा एक कल्पवृक्षांतलाच प्रकार आहे.

श्रीचक्रांतील मध्यवर्ति मुख्य त्रिकोणालाच या श्लोकांत चिंतामणिगृह असें म्हटले असून त्यांतील बिंदु हाच शिवाकार म्हणजे परमरमणीय मंगलमय  मंच म्हणजे पर्यंक अर्थात् पलंग अथवा सिंहासन होय. त्या ठिकाणीं विराजत असलेलें प्रकाशस्वरूप परमशिवतत्त्व म्हणजेच भगवाच सदाशिव, त्यांच्या अर्धांगीं विराजमान असलेली विमर्शस्वरूप महाशक्ति श्रीत्रिपुरसुंदरी हिलाच या श्लोकामध्ये चिदानंदंलहरी असें म्हटलेले आहे. आचार्य म्हणतात, आई त्रिपुरसुंदरी ! श्रीचक्रामध्यें तुझ्या या मंगलमय स्वरूपाचे फारच थोडे लोक चिंतन करतात. जे चिंतन करतात ते खरोखर धन्य होत.

आपला देह हाच शिवशक्तीचे अधिष्ठान असल्यामुळें कांहीं लोक सुधासिंधु शब्दाचा अर्थ देह असाच करतात. पाय किंवा मुलाधारचक्र ही शरीराची उत्तम रीतीने धारणा करीत असतात म्हणून त्यांना "सुध" असें म्हणतात. सुध + आसिन्धु =  सुधासिन्धु. आसिन्धु म्हणजे मस्तकामध्ये विराजमान असलेल्या सहस्रदल कमलांतील चंद्रमंडल "आसमन्तात् सेधति सिञ्चति नाडीमार्गं इति आसिन्धु" अशी आसिंधु या शब्दाची व्युत्पत्ति आहे. मस्तकस्थानीं विराजत असलेल्या चंद्रमंडलांतूनच अमृताचा स्त्राव होत असतो व त्याच्या योगानें देहांतील बहात्तर हजार नाड्यांचे व त्या नाड्यांच्या द्वारां संपूर्ण देहाचें पोषण होत असतें, म्हणून त्या चंद्रमंडलाला आसिंधु म्हणणें योग्यच आहे. तात्पर्य, सुधासिंधु म्हणजे आपला नखशिखांत देह. या देहामध्ये मुलाधारचक्र स्वाधिष्ठानचक्र इत्यादि चक्रस्थाने रत्नाप्रमाणे विलसत असल्यामुळें तीं चक्रेच  "मणीद्वीप" या शब्दाचा अर्थ समजावा. मणि म्हणजे रत्न आणि द्वीप म्हणजे देवतांचें विशिष्ट आश्रयस्थान. मुलाधारादि चक्रे ही गणेशादि देवतांची अधिष्ठानें आहेत हे प्रसिद्धच आहे. ही सर्व द्वीपें जीवचैतन्यानें व्यापलेली आहेत. म्हणूनच तीं कार्यप्रवण आहेत. याच अभिप्रायाने त्या मणिद्वीपांना "सुरविटपि वाटीपरिवृते" असें विशेषण दिलेले आहे.

"सुष्ठु राजते प्रकाशते इति सुरः" या व्युत्पत्तीप्रमाणे या देहांत विराज-मान असलेलें आत्मचैतन्यच सुर शब्दाचा अर्थ समजावा. या आत्मचैतन्यानें नरवशिखान्त देहाला व्यापलेले असल्यामुळें त्याला "विटपी" म्हणजे विशालवृक्ष असें म्हटले आहे. या वृक्षानें शरीरांतील चक्रस्थाने वेष्टिलेली आहेत. "वाटी" म्हणजे वेष्टन. या देहांत नीपांचीं उपवनें आहेत. नीप शब्दाचा प्रसिद्ध अर्थ कदंब असा आहे. शरीरदृष्टीनें त्रिपुरसुंदरीच्या वसतिस्थानाची कल्पना करीत असतांना नीप शब्दाचा अर्थ पांच मुख्य प्राण आणि पांच उपप्राण असा करतात. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान यांना मुख्य प्राण असें म्हणतात तर नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय या पांच वायूंना उपप्राण असें म्हणतात. हे सर्व वायु शरीराचा निर्वाह करीत असतात. शरीराला वागवितात व जगवितात म्हणून यांना "नीप" म्हटले आहे. " नयन्ति पान्ति च इति नीपाः" अशी नीप शब्दाची व्युत्पत्ति आहे. तात्पर्य, शरीरातील दशविध वायु अथवा इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता हेच या मणिद्वीपांतील कदंबवृक्ष होत. या कदंबसमूहांत असलेलें हृत्पुंडरीक अर्थात अनाहत चक्ररूपी हृदयकमल हेंच आपल्या इष्ट देवतेचें "चिन्तामणिगृह" होय. हृदय हें संकल्प-विकल्पात्मक मनाचें वसतिस्थान व आत्म्याचें अधिष्ठान असल्यामुळे आणि तो देहांतील सर्वश्रेष्ठ अवयव असल्यामुळें त्याला चिंतामणिगृह असें म्हणणें योग्यच आहे. तात्पर्य, अशा या हृत्कमलांत मंगलमय सिंहासनावर सदाशिवाशी अभिन्न रूपाने विराजमान असलेल्या श्रीमहात्रिपुरसुंदरीचे जें ध्यान करतात ते खरोखर धन्य होत.

कांहीं विद्वान् लोक सुधासिंधु शब्दाचा अर्थ ऋषिमुनींना अभिप्रेत असलेला संपूर्ण अखंड भारतवर्ष असाच करतात. सुधा म्हणजे श्रेष्ठ दर्जाचा खडीचा पांढरा शुप्र चुना. त्या चुन्याप्रमाणेच सदासर्वकाळ हिमालय पर्वत बर्फाने आच्छादित असल्यामुळें शुभ्र दिसत असतो, म्हणून सुधा शब्दाने हिमालय पर्वत घेतात. त्या हिमालयापासून "आसिन्धु" म्हणजे सेतु अथवा कन्याकुमारीपर्यंतचा सर्व भाग अर्थात् मानससरोवर आणि कैलास पर्वत यांच्यासह कन्याकुमारीपर्यंतचा सर्व भाग अखंड भारतांत समाविष्ट होतो. त्याचप्रमाणें भारताची पूर्व आणि पश्चिम मर्यादा ही हिमालयानें दाखविलेलीच आहे. "पूर्वापरौ तोयनिधी वगाह्य स्थितः पृथिव्याः इव मानदण्डः" असें कविकुलगुरू श्रीकालिदासानें त्याचें वर्णन केलेलेच आहे. असा हा अखंड भारत हाच प्रकृतस्थलीं सुधासिंधु शब्दाचा अर्थ आहे. अयोध्या मथुरा, हरिद्वार काशी, कांची त्याचप्रमाणे बदरीनाथ, केदारनाथ इत्यादि क्षेत्रें  - त्याचप्रमाणे गंगा, यमुना, गोदावरी, नर्मदा, सिंधु, कृष्णा, तुंगभद्रा इत्यादि तीर्थें त्याचप्रमागणें ज्योतिर्लिंगें हीच या भारतरूपी सुधासिंधूतील मणिमयद्वीपें समजावींत. यांत कदंबांची उपवनें तर आहेतच. त्या त्या तीर्थक्षेत्रांतील देवता ह्या कल्पवृक्षाप्रमाणे फळ देणाऱ्या असल्यामुळें त्याच या सुधासिंधूतील कल्पवृक्ष होत. अशा या अखंड भारतरूपी श्रीललितामहात्रिपुरसुंदरीच्या मंदिरांत चिंतामणीप्रमाणें मनोहर मंदिरे आहेत. अशा या भारतवर्षरूपी सुधासिंधूमध्यें विराजत असलेला कैलास पर्वत हाच "शिवाकार मंच" होय. कैलास पर्वताच्या भोंवताली असलेल्या पायथ्याच्या पर्वतांच्या रांगा या श्रीयंत्रांतील पहिल्या मुख्य त्रिकोणाप्रमाणेच दिसतात. जणुं कांहीं ती शंकरांची शाळुंकाच आहे. प्रत्यक्ष कैलास पर्वत हा त्या शाळुंकेंतील महादेवाच्या पिंडीप्रमाणे दिसतो. अथवा श्रीचक्रांतील मुख्य त्रिकोणांत असलेला मध्यवर्ती बिंदु जसा असावा तसाच तो कैलास पर्वत मानससरोवराच्या जवळ शोभत आहे. त्रैलोक्याचे गुरु भगवान् सदाशिव तेथेंच विराजमान झालेले आहेत. त्यांच्या वामभागीं अंकरूपी पर्यंकावर देवी श्रीमहात्रिपुरसुंदरी विराजत आहे. म्हणूनच तिला "परमशिवपर्यंकनिलया" असें म्हटलेले आहे. तात्पर्य, अखंड भारतरूपी सुधासिंधूमध्ये विलसत असलेल्या कैलासरूपी मंचकावर सदाशिवाच्या वामभागीं तादात्म्याने विराजत असलेल्या श्रीत्रिपुरसुंदरीचे जे कांहीं थोडे लोक ध्यान करतात ते धन्य होत. यद्यपि श्रीत्रिपुरसुंदरीच्या मंदिराचा परिसर असलेला भारत आज अखंड राहिला नाहीं तरी भक्तजनांच्या ध्यानाला यथार्थता यावी म्हणून सर्वसमर्थ असलेली श्रीमहात्रिपुरसुंदरी या भारताला पुन्हा अखंड करील. जगाला उपद्रव देणाऱ्या शुंभ, निशुंभ, चंड, मुंड अथवा महिषासुर इत्यादि दैत्यांचा जसा तिनें नाश केला तसाच ती भारताला खंडित करणाऱ्या दुष्टांचाही नाश करील. "इत्थं यदा यदा बाधा दानवोत्था भविष्यति तदा तदावतीर्याहं करिष्याम्यरिसक्षयम्" असें तिनेंच आश्वासन दिले आहे. मात्र वर वर्णन केल्याप्रमाणें तिची उपासना करणाऱ्या भक्तांची बहुसंख्या आणि अनन्यभक्ति यांची आवश्यकता आहे. कांहीं लोक ॐकारांतील अकार, उकार, मकार आणि अर्धमात्रा हाच शिवाकार मंचक समजून त्यावर विराजत असलेल्या शिवशक्तिस्वरूपाचे ध्यान करतात.



 




हें यंत्र रक्तचंदनाच्या तुकड्यावर तयार करून रक्तपुष्पांनी त्याची बारा दिवस विधिपूर्वक पूजा करावी. काळ्या मिऱ्यांचा नैवेद्य दाखवावा. रोज या श्लोकाचा बाराशे जप करावा.   या प्रमाणें यंत्र सिद्ध करून धारण केल्यास कारागारांतून सुटका होते व सर्व कार्यांमध्यें विजय मिळतो.

No comments: