19 December, 2008

मानसमणिमाला (१६)

मानसमणिमाला (१६)
:

हिंदी : अस बिबेक जब देई विधाता । सब तजि दोष गुनहि मनुराता ॥ १ ॥
काल सुभाउ करम बरि आई । भलेऊ प्रकृति बस चुकई भलाई ॥ २ ॥
सो सुआरि हरि जन जिमि लेहीं । दलि दुख दोस विमल जसु देहीं ॥ बा. कां. १.६.३
मराठी : देई विधाता विवेक हा जै । गुणिंहि रमे मन त्यजि दोषांतै ॥
काल कर्म नी स्वभाव दडपणीं । भले प्रकृतिवश चुकति भलेपणिं ॥
ती घे हरिजन चूक सुधारुनी । देई सुयश दुख दोष निवारुनी ॥ १.६.१,२,३,॥ (प्रज्ञानंद)
अर्थ : हा नीराक्षिर विवेक विधाता जेव्हां देतो तेव्हां दोषांस सोडून मन गुणातच रमते ॥ १ ॥ क्वचित्‌ प्रसंगी काल, कर्म, स्वभाव यांच्या दडपणाने प्रकृतिवश होऊन भल्या माणसाकडूनही चुका होतात. ॥ २ ॥ ती सेवकाची चूक भगवान सुधारुन घेतात, व दुःखकारक दोषांचा नाश करून विमल यश देतात. ॥ ३ ॥

संपूर्ण सृष्टी परमेश्वराने जड चैतन्य युक्त तसेच गुणदोषयुक्त अशीच निर्मिलेली आहे. त्यातील सद्‌गुणांचा स्वीकार करणे, उपयोग करून घेणे व दुर्गुणांचा त्याग करणे, असा विवेक माणसाला करता येतो. तो सर्व व्यवहारात लागू करायला हवा. त्याकरितां आपली जीवनदृष्टि बदलायला हवी. देवाने आपल्या करताच जणू दुःख, अडचणी, विकृति निर्माण केल्या आहेत असे समजून खूप माणसे चिंतातूर झालेली असतात व परमेश्वराला सतत जाब विचारत असतात. जगातल्या सर्व घडामोडी काल, कर्म व स्वभावानुसार होत असतात. माणसाने त्याबद्दल परमेश्वराला, विशिष्ट व्यक्तीला, तिच्याच कर्माला अगर परिस्थितीला संपूर्ण जबाबदार धरता कामा नये. त्यामध्ये कांही गोष्टी आपल्या अनुकूल असतील, कांही नसतील. कांही इतरांना अनुकूल वा प्रतिकूल असतील व त्याही कालाच्या गतीनुसार बदलत राहात असतात. त्यामुळे शांतपणे, समदृष्टिने त्याचे, त्यातील योग्यायोग्यतेचा स्वीकार करून आपले कार्य करीत राहिले पाहिजे. चुका अगर दोष इतरांप्रमाणेच आपल्यांतही असतात याचेही भान सतत राहिले पाहिजे. संपूर्ण निर्दोष, सर्वगुणसंपन्न किंवा सर्वदोष युक्त असे कुणीच नसते. काल, कर्माच्या प्रभावाने चांगल्या व्यक्तींच्या हातूनही चुका घडण्याची शक्यता असते. परंतु भली माणसे आपल्या चुकांचे समर्थन करीत नाहीत. आपल्या हातून 'हिमालया एवढ्या चुका झाल्या' असे मोकळेपणाने कबूल करून महात्मा गांधींनी समाजाची, देशाची व परमेश्वराची क्षमा मागितली आहे ! अर्थातच अशा 'हरिजनां'च्या चुका सुधारण्याची मोठी जबाबदारी परमेश्वरावर, त्या हरिवर येऊन पडते. ती जबाबदारी परमेश्वर अत्यंत आनंदाने स्वीकारतो, एवढेच नाही तर त्यातील दुःख, दोष नाहीसे करून अत्यंत विमल, दिव्य यश प्रदान करतो !

डॉ. सौ. उषा गुणे.

No comments: