08 August, 2009

बद्ध - मुक्त लक्षणे - (४) (भागवत स्कंध ११ अध्याय ११)

बद्ध - मुक्त लक्षणे - (४)

भगवंत आता संतांना, भगवंताला अभिप्रेत असलेली भक्ति कशी असते आणि अशी भक्ति करणारा भक्त कसा असतो, त्या भक्ताचे २९ ते ३१ या तीन श्लोकांत २८ लक्षणे दर्शिविली आहेत. त्यापुढील दोन श्लोकात (३२ व ३३) आत्यंतिक भक्ताची विशेष लक्षणे सांगितली आहेत.

१. कृपा - सर्वांवर सदा कृपा करणारा, दयाळू . दयाळू भक्ताचे चित्त मोठे विलक्षण असते. प्राणीमात्रांचे जीव तो आपल्या जीवात घालतो, आणि दुःखाचे हरण करून सुख देतो. त्याची कृपा अद्‌भुत असते. श्रीमहाराज (श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज) तीर्थाटन करीत असताना एके समयी भिक्षा मागत एका घरी गेले. त्या घरची माऊली अति चिंतित दिसली. चवकशी करता कळले की घरात तिचा पुत्र अतिज्वराने फणफणत आहे. काही न बोलता महाराज घरात घुसले आणि तिच्या मुलाच्या हातून आपल्या हातावर उदक सोडवून घेतले आणि निघून गेले. काही वेळाने मुलाचा ताप उतरला आणि संध्याकाळपर्यंत तो खणखणीत बरा झाला. पण इकडे श्रीमहराज पुढील अकरा दिवस आजारी होते. (श्रीसद्‌गुरुलीलामृते समास दुसरा ओवी ५९ - ७२). असे भक्ततम जरी कधी कोणावर रागावले तरी - श्रीज्ञानेशांच्या शब्दात - शब्द पाठी अवतरे । कृपा आधी ॥

२. अद्रोह - कोणाशी द्रोह न करणारा. अमुक एक गोष्ट आपल्या मनाविरुद्ध असल्यास वा न पटणारी असल्यास द्रोह उत्पन्न होतो. पूर्ण विरागीच्या ठिकाणी मनोवांच्छेचा अभाव असतो म्हणून कशामुळेही द्रोह होत नाही. सर्वच प्राणीमात्रांमध्ये भगवंताला पहात असल्यामुळे द्रोहाची वार्ताच नाहीशी झालेली असते. कधी आपत्ती उत्पन्न झाल्यास आपत्तीमुळे वा आपत्तीविषयी देखील कधी द्वेष उत्पन्न होत नाही.

३. तितिक्षा - सुखदुःखादि सहन करणे. अभ्यासाने साध्य होणारी ही स्थिती आहे. उद्वेग निर्माण होणे हे साधारणतः बाह्य परिस्थितीमुळे होत असते, आणि तरीही मन शांत ठेवण्याच्या अभ्यासामुळे आंतरीक खळबळ नसते पण त्याचे स्वरूप काहीसे वादळापूर्वीच्या शांततेप्रमाणे सुप्त उद्रेकाप्रमाणे असू शकते. अगदी असह्य परीस्थितीमध्ये स्फोट होऊ शकतो. पण संतांना कोणत्याही बाह्य वस्तुंमध्ये (विषय वा ऊर्मी) भोग घेण्यात रस नसल्यामुळे त्यांच्या ठिकाणी तितिक्षा ही स्वाभाविक असते कारण - योगरतो वा भोगरतो वा सङ्गरतो वा सङ्गविहीनः - परिस्थिती अनुकूल असो वा प्रतिकूल, त्याचे चित्त सदा प्रसन्नच असते, सदा सर्वत्र आनंदी आनंदच असतो - यस्य ब्रह्मणि रमते चित्तं नन्दति नन्दति नन्दत्येव ॥

४. सत्य - सत्य हेच जीवनाचे सार असणे - जीवनात कितीही मोठे संकट आले तरी असत्याचा आधार घ्यायचा विचारही मनांत येत नाही. संत आणि इतरांमध्ये मुख्य फरक असतो तो सत्याच्या परीभाषेचा. प्रत्येक व्यक्तिचे सत्, रज, तम या गुणांच्या मिश्रणाचे प्रमाण वेगळे असते. त्यामुळे व त्याच्या वासना, समाजातील त्याचे ठिकाण, सभोंवतालचे वातावरण, सहनक्षमता, मनःस्थैर्य या सर्व गोष्टींमुळे प्रत्येकाची सत्याची परीभाषा वेगळी असते. सनत्कुमार, गौतम, दुर्वास, विश्वामित्र हे सर्व ज्ञानी पण केव्हां ना केव्हां कोपिष्ट होऊन शाप देतच असत. द्रोण ज्ञानी ब्राह्मण पण कौरवांच्या मिंधेपणामुळे आपला स्वामी दुराचार करतोय हे जाणूनही त्याला साथ देणे हे त्यांचे सत्य. तसेच भीष्माला कोणत्याही परिस्थितीत "माझी" प्रतिज्ञा हीच सत्यापेक्षा महत्त्वाची. कृष्ण तर भगवानच. पण त्याच्या सांगण्यावरून सत्यवचनी युधिष्ठीराचे देखील द्रोणवधासाठी - ’नरो वा कुंजरो वा’ असे सांगणे म्हणजे सत्याला धरून चालणे, असे झालेच की. प्रसंगानुरूप सत्याची व्याख्या कशी बदलते याचे एक छान उदाहरण म्हणजे बलिने वामनाला ’तुला काय मागायचे आहे ते माग’ असे म्हटल्यावर त्याचा गुरू शुक्राचार्य त्याला जो उपदेश करतो ते. बलिने तर ’माग’ म्हणून टाकले पण शुक्राचार्य जाणतात की वामन काय मागणार आहे. ते बलिला सांगतात (भागवत ८.१९.३९-४०) - "हे राजा, श्रुति वाक्यानुसार आता ’हो’ म्हणणे हे सत्य आहे आणि नकार देणे असत्य आहे. पण एक लक्षात ठेव, हे शरीर हा एक वृक्ष आहे आणि सत्य याचे फूल व फळ आहे. पण वृक्षच राहिला नाही तर फूल वा फळ कसे राहणार ? असत्य हेच शरीररूप वृक्षाचे मूळ आहे. म्हणून नकार देऊन शरीर वाचवावे. जसे मूळ राहिले नाही तर काही काळातच वृक्ष सुकून गळून पडतो, त्याचप्रमाणे असत्याशिवाय देह तात्काळ नष्ट होईल यात शंका नाही." त्यांना बहुधा सांगावयाचे होते की ’अतिरेक करू नकोस.’ एवढे सांगूनही बलि वामनाला दान करतोच, पण तो सत्यासाठी का "माझा शब्द खोटा होऊ नये" या अभिमानापोटी याबद्दल भागवतात काही माहिती नाही. पण दान दिल्यावरही त्याला भगवंताने (वामनाने) सुतललोकी (पाताळात) पाठवलेच. पुढे भगवतात एके ठिकाणी (८.२०.१६) बलि सत्यापासून ढळला नाही असा उल्लेख असला तरी ८.२२.३ येथे तो म्हणतो - "नरक, पाश, दुःख, दारिद्र्य, शिक्षा याला मी भीत नाही जितका मी माझ्या अपकीर्तिला भितो." भविष्यात कोणत्यातरी मन्वंतरात त्याला इंद्र केले जाणार आहे हेही भागवतात सांगून ठेवले आहे. यावरून शंका येते की बलिला सत्यापेक्षा इंद्रपद, माझी अपकीर्ति (म्हणजे एकून विषयच ना ?) हेच महत्त्वाचे असावेत. as against this दशरथाने सत्यापासून न ढळता मरण पत्करले असले तरी पुत्रस्नेहाव्यतिरिक्त त्याला आणखी कोणतीही अभिलाषा असल्याचा कुठे उल्लेख नाही. असो.
तात्पर्य : जीवनात सत्याला कोणते स्थान द्यायचे, त्याचा अतिरेक करायचा का त्याला चिकटून राहून वेळप्रसंगी सर्वनाश ओढवून घ्यायचा, असे हे सत्य प्रत्येकासाठी वेगळे असते एवढे मात्र खरे.

पुढची (२४+२) लक्षणे यथावकाश.

क्रमशः

एकोहम्

No comments: