20 January, 2009

आनंदानुभूति

आनंदानुभूति

:

'आनंदं ब्रह्मणो विद्वान", ब्रह्म आनंदस्वरूप आहे. का आनंदस्वरूप आहे ? हा विद्वानांच्या वादाचा विषय आहे. परंतु या ब्रह्माच्या अनुभवांत आनंद आणि केवळ आनंदच आहे. हे खास आनंदाचे मुख्य लक्षण म्हणजे भितीचा अभाव. ब्र्ह्मानुभावाच्या या आनंदानुभूतीत देहभावाचा अभाव असतो. तेथे जीवाशिवाचे सामरस्य, ऐक्य असते. जेथे द्वैत म्हणजे दोनपणा आहे/दोन आहेत तेथेच भिती असते. म्हणून ब्रह्मानंदाचे दुसरें लक्षण अभय आहे. ब्रह्मसंस्पर्श ज्याला झाला तो आनंदाच्या डोही आनंदतरंग होऊन राहतो.


या ब्रह्माचे दुसरे एक लक्षण ते अव्यय आहे. व्यय म्हणजे खर्ची पडणे, कमी होणे, नाहीसे होणे. व्यय याचा आणिक एक अर्थ - तो जुना होतो का ? त्याचा बदल् व्ययाकडे असतो का ? त्याला देश काल वस्तूचे बंधन आहे का ? तर वरील कोणताही अवगुण भगवंताला नाही, म्हणून परब्रह्म अव्यय आहे.


भगवंत/देव अनंत आहे. दिन प्रतिदिन तो वाढलेलाच अनुभवास येतो. या वाढत्या चढत्या साक्षात्कार सुखाचा आनंदपण देवाप्रमाणेच चढता वाढता असतो. आणि त्याला कारणभूत आहे श्रीसद्‌गुरूंकडून मिळालेले नाम. 'अठरा पुराणांच्या गोष्टी । नामाविण नाही गोष्टी ॥' जगातील सारसर्वस्व म्हणजे फक्त एक भगवंताचे नाम. तुकोबाराय म्हणतात, "सार सार सार । विठोबा नाम तुझे सार ॥" "नाम तेचि रूप" या साक्षात्कारी संतांच्या वचनाप्रमाणे नाम हे ब्रह्मबीज आहे. नाम हेच देव असल्याने त्याच्या स्मरणात कधी व्यय नाही, खर्च नाही. ज्या ज्या वेळी नामाचे स्मरण होते त्या त्या वेळी नामाची एकच असलेली जमेची बाजू सातत्याने वाढतच राहते. जाणून अगर न जाणून जरी नामाचा आठव झाला, तरी आपले सद्‌गुरू आपणास देवाचीच खूण दाखवत असतात. नाम व रूप एकच आहे. आपल्या प्रचीतीत सतत वाढ होते. "नाम आठवितां रूपी प्रगट पै झाला " हाच सोनियाचा अमृतस्वरूप आनंददिन.


या देवाच्या अनुभवात सातत्य पाहिजे. एकदा दिसलेले रूप पुनः पुनः दिसावयास हवे. "तो मज व्हावा, तो मज व्हावा । वेळोवेळा व्हावा पांडुरंग ॥" कटीवर हात ठेवलेला, पीतांबरधारी, गळा वैजयंतीमाळा, कस्तुरी मळवट, चंदनाची उटी, समचरण, समदृष्टी, सुंदर सावळे सुकुमार विठ्ठल पुनः पुनः दिसला पाहिजे. सातत्य हा देवाच्या स्वरूपाच्या सत्यानुभवाचा निकष आहे. या साठी चित्तात स्मरण, परेत नाम आणि डोळ्यांनी रूप एकाच वेळी झाले पाहिजे. स्मरण झाले पाहिजे, नाम आले पाहिजे आणि स्वरूप पाहिले - पाहतां आले पाहिजे.


कोणत्याही साध्यासाठी साधनाची नितांत गरज असतेच. साधना शिवाय साध्य शक्यच नाही. साधन व साध्य एका अर्थाने एकरूपच असतात. साधनात साध्य हे सामावलेले असतेच जसे दुधांत लोणी असतेच. पण तापवणे, विरजणे, घुसळणे ह्या प्रक्रिया खेरीज ते हातीं येत नाही. तसेच साध्य साधनाचे. साधनाची सुखात म्हणजे साध्याची पहिली पायरीच होय. "ज्या क्षणी अनुग्रह त्या क्षणीच मुक्तता" या वाक्याचा अर्थ हाच आहे. एकाच दिवसांत कोणी सावकार, श्रीमंत झाला नाही. आणि शाळेत जाऊन पहिल्याच दिवशी कोणी पंडित होत नाही. अगदी तसेच या देवाच्या आत्मसाक्षात्काराचे. भगवत्‌साक्षात्काराचे ध्येय गाठण्यासाठी सातत्याच्या साधनाचीच नितांत गरज आहे. साधकाला आपल्या उभ्या जीवनांत साधनेशिवाय दुसरे कांहीच मूल्यवान वाटता कामा नये.


साधनाचा उगम आपल्या सद्‌गुरूंकडून मिळालेल्या सबीज नामात आहे. या नामाचे निरंतर साधन करून अध्यात्माचे शिखर आपल्या शिष्याने गांठावे हीच श्रीगुरूंची आस. शिष्य शिष्यच न राहतां तो गुरुबोधाकार कधी होईल ? गुरुत्वास कसा पोहोंचेल अशीच वाट सद्‌गुरु पाहात असतात.


अण्णा -

No comments: