09 January, 2009

अवीट गे माये -

अवीट गे माये -
:
शुद्ध पवित्र अशा भक्तिमार्गाचा अर्थ अगदी साधा सोपा आणि सरळ आहे. भक्ति अमृतस्वरूप, म्हणजे उज्ज्वल अशी हरिभक्ति. अंतःकरणाने उपास्याशी, भगवंताशी, श्रीगुरुंशी एकरूप होऊन पर भक्ति झाली तर हे दिव्य अमृत प्राप्त होते. आणि हे भक्तिपदतीर्थामृत भक्ताचे जीवन सुशांत व सुमंगल करते.

एकदा भगवद्‌भक्ति हे साध्य ठरविल्यावर साधन काळात भक्त निष्ठेने, नेमाने, अनेकविध भक्ति-उपाय अवलंबितो. या अमृतस्वरूप रसमय भक्तिमार्गाचे वैशिष्ठ्य म्हणजे अंतिम ध्येय साधल्यावरही भक्त भक्ति करणे बंद करीत नाही, तर उलट अधिकाधिक प्रेमाने, उत्साहाने, आनंदाने अविरत, अविश्रम, अखंड भक्तीच करत राहतो.

मात्र साधना भक्ति व सिद्ध भक्ति यात महदंतर आहे. मग असा सिद्धभक्त भगवंतावाचून अन्य दुसरे काहीच बोलत नाही, चिंतीत नाही, पहात नाही व जाणत नाही. कारण त्याला आंत व बाहेर एकच सर्वत्र, सर्वव्यापी, सर्वेसर्वा, सर्वज्ञ विश्वेशराचीच प्रतीति येत असते. "आंत हरि बाहेर हरि । हरीने घटीं व्यापिले । बाहेरि भितरि तुजच मी देखे ॥" असा त्याचा अनुभव असतो. "हरिः सर्वेषु भूतेषु भगवान्‌ अस्ति ईश्वरः । इति भूतानि मनसा कामैस्तैः साधु मानयेत्‌ ॥ असं भागवतकारांच पण म्हणणं आहे. अशा सर्वात्मक भावाने, भावनेने देवाचे पूजन, अर्चन, गुणनाम स्वरूपसंकीर्तन करण्याएवढा अमूप आनंद अन्य कशातही मिळत नाही ह्यात नवल ते काय ? पण अशा भक्ताची, वैष्णवांची सर्वतोपरी नुसती साथसंगत लाभली तरीसुद्धा आभाळात मावणार नाही एवढा आनंद मिळतो.

अशा वैष्णवाचे संगतीने काय होते ? तर प्रतिक्षणी नवतेजाने चित्तात हरिनाम स्फुरणे हेच अमृतस्वरूप आहे. भागवतकार म्हणतात अशा वैष्णवाचं अमृतपान करणे, परस्पर वैष्णवांनी परस्परांना अमृतपान देणे हे प्रत्यक्ष स्वर्लोकीच्या अमृतालाही लाजेने मान खाली घालायला लावणारे आहे. केव्हढे हे श्रेष्ठ अमृतपान ? "यदि भवति मुकुंदे भक्तिः आनंदसांद्राः । विळुढति चरणाग्रे मोक्षसाम्राज्यलक्ष्मीः ॥" या अमृतपानापुढे मोक्षलक्ष्मीसुद्धा तुच्छ.

वेदांत अध्यात्म शास्त्राच्या मते निर्वाण, मोक्ष हेच अंतिम प्राप्तव्य आहे; परंतु भक्तिशास्त्रकारांच्या मते, अशा अमृतभक्तिचे मूल्य त्या मोक्षाहून कितीतरी जास्त मोलाचे आहे. या पराभक्तीच्या भक्तिप्रेमामृतापुढे लौकिक पारलौकिक सुखेच काय पण मुक्ति कःपदार्थ वाटते. तुलसीरामदासजी म्हणतात, "मुक्ति निराद री, भक्ति लुभाने" भक्तिप्रेमाचे हे अमृतकुंभ, मुक्तिपेक्षापण आनंददायक. मोठे रसाळ शांति पुष्टी तुष्टि प्रदान करणारे असे मधुरतम आहेत.

अमृत शब्दाचा आणखी एक अर्थ शास्त्र संमत आहे. तो म्हणजे "यज्ञ करून जे शेष राहते तेच अमृत", 'यज्ञशेषमधामृतम्‌', यज्ञशेष प्रसादान्न. भगवंताच्या भोजनातील, श्रीगुरुंच्या भोजनातील शेष भाग, उच्छिष्ट ह्याला पण भक्तिशास्त्रकारांनी अमृतच म्हटले आहे. ते सेवन करण्यार्‍याला नित्य ब्रह्मपदाचीच प्राप्ती होते, असं गीतापण छातीठोकपणे सांगते "यज्ञाशिष्ट अमृत भुजः यान्ति ब्रह्म सनतनम्‌ ।"

यज्ञ म्हणजे आपल्या सर्वस्वाचा त्याग करणे व स्वामित्व सोडणे. हे सर्वस्वाचे समर्पण जाणीवेने, स्वेच्छेने, 'इदं न मम' असे म्हणत सोडावयाचे. या अमृतस्वरूप भक्तिमार्गात कामना, इच्छा, अपेक्षापूर्तीसाठी जे देवतापूजन घडते त्यास सकामभक्ति असे म्हणतात. अशी भक्ति श्रेष्ठ भक्ताचार्यांना गौण कनिष्ठ हलकी वाटते. भक्ति आराधना करायची ती जगदीश्वर परमात्म्याची, परब्रह्मस्वरूप श्रीगुरूंची, आणि ती कोणत्याही ऐहिक, पारलौकिक लाभाची, सुखाची इच्छा मनात न ठेवता करावयाची असते. म्हणजे मगच ती अशी सर्वतोपरि, सर्वांगानी अमृतस्वरूप होते.

अशी ही अमृतस्वरूप परमप्रेमाभक्ति भगवंतासाठीच, श्रीगुरूंसाठीच. एकदा या अमृताभक्तीची गोडी लागली की मग ती कधीच सुटत नाही, सुटणार नाही, आणि तिचा कधीच वीट येणार नाही. "वीटे ऐसे नाही सुख । अवीट गे माये विटेना ॥ असा श्रीगुरुज्ञनोबा माऊलीचा या भक्तिप्रेमसुखामृताचा निर्वाळा.

खरोखरी आनंदस्वरूपी अमृतसागरांत, दिव्यतेजाने उन्मेषित होणारी चैतन्यवेळ म्हणजेच ही निर्मळ, निष्काम, नितळ, पारदर्शक, नित्यनूतन अनन्यभक्ति आहे.

ही परमप्रेमस्वरूप भक्ति अंतर्बाह्य अमृताने नुसती सदैव ओथंबणारी अमृतवल्लीच आहे. प्रत्येक मनुष्यमात्राने ही भक्ति साध्य करावी, आणि सच्चिदानंद भगवंताशी, श्रीगुरूंशी समरस होऊन अखंड अमृतसागरांत मुक्तपणे विहार करावा. मुक्तपणे या अमृतपानाचा रसास्वाद घ्यावा हा ज्ञानोबारायांचा आग्रह आहे.

त्या भाग्यवान गोपांगना अमृतपानाने तृप्त असूनसुद्धा पुन्हा भगवंताच्या वेणूचा भाग्योदय पाहून हेवा करत. केवढी भक्ति, केवढी तृतता, केवढी धन्यता ? पण रसामृत सेवन करून पुनः तृप्तीला भूक लागली म्हणावयाच्या. असा हा भक्तिप्रेमरस केवळ गोड, अमृतमय आणि अवीट.
अण्णा -

No comments: