26 February, 2012

महर्षि वाल्मीकि - एक महान तपस्वी

       तपस्वी वाल्मीकि महर्षि वाल्मिकींनी ’रामायण’ नामक महाकाव्य रचले. रामायण महाकाव्याची कुणी पुराणात गणती करीत नाहीत. सद्यकालीन उपलब्ध रामायणात कितीतरी प्रक्षिप्त भाग आहे असे बरेच तज्ञांचे मत आहे. या विद्वानांचे विश्लेष पाहता असे दिसून येते की प्रक्षिप्त भाग काढला तर मूळ काव्यात श्रीराम हा विष्णुचा अवतार या अर्थाने श्रीरामाचे चरित्र सांगितलेले नाही. एका थोर विभूतीचे चरीत्र या दृष्टीने वाल्मिकी महर्षिंनी ते ग्रथित केलेले आहे. इतर पुराण ग्रंथांमध्ये आढळणारे मंगल वंदनपर श्लोक यात आढळत नाहीत. मग वाल्मिकीने हे महाकाव्य कशाकरिता रचले असावे ? एक तर्कानुसार वाल्मिकींचे पूर्व चरीत्र पाहतां त्यांना जगासमोर एका गुणसंपन्न व्यक्तीचा आदर्श ठेवावा ही प्रेरणा होणे जास्त संयुक्तिक वाटते. काव्याच्या सुरुवातीलाच ’सद्यकाली गुणवान, वीर्यवान, धर्मज्ञ, कृतज्ञ, सत्यवक्ता, दृढ प्रतिज्ञ, सदाचार परायण, विद्वान सामर्थ्यशाली, प्रियदर्शन, कान्तिमान, क्रोधावर जय असलेला, पण क्रोध आलाच तर देवसुद्धा ज्याला भितात अशी व्यक्ति कोणी आहे का ? असेल तर ती कोण ? असे महर्षिंनी नारदमुनिला विचारले. यावरून लोकांनी आपल्या जीवनात कसे आचरण करावे यासाठी एका आदर्श व्यक्तिचे चरीत्र त्यांच्यापुढे असावे या हेतूने ’रामायण’ महाकाव्य रचले असावे याचे शक्यता दाट आहे. 

        पण एवढे महान काव्य रचण्यास फार मोठी प्रतिभा असावी लागते. प्रतिभा काही अशी-तशी प्राप्त होत नाही. त्यासाठी तपस्याबळ पाठीशी असावी लागते. आपण एका वाक्यात वाचतो, ऐकतो की वाल्मिकीने फार मोठी तपस्या केली. फार मोठी म्हणजे किती, कशी हे स्वतः तपाचरणात असणारेच जाणू शकतात. रामायणात तपस्येचे वर्णन आढळतेच, पण पुढे हेही म्हटले आहे की त्या तपोबलाने ते ब्रह्मपदाला पोचले. मग सर्व प्रकारच्या सिद्धी त्यांना प्राप्त झाल्या असणार हे निश्चित. आपल्या सिद्धीने त्यांनी दशरथाच्या आधीपासून रामचरीत्र कसे घडले ते सर्व पाहिले, ऐकले असणार हे संभवनीय आहे. रामायणात उल्लेख आहे की ब्रह्मदेवाने त्यांना अशा प्रकारची दृष्टी दिली. आता तप प्रेरणेस देखील काहीतरी निमित्त लागतेच. पद्मपुराण, अध्यात्म रामायण इतरत्र साहित्यातून महर्षिंच्या पूर्व चरीत्राबद्दल निरनिराळ्या कथा आढळतात. महर्षिंच्या पूर्व चरीत्रासाठी आपण अध्यात्म रामायणातील त्यांनी स्वमुखे श्रीरामास निवेदन केलेले वर्णन पाहू. महर्षि श्रीरामाला म्हणतात – “अहं पुरा किरातेषु किरातैः सह वद्धितः । जन्ममात्र द्विजत्वं मे शूद्राचार रतं सदा ॥ (अ.रा. ६.६५). मी आधी रानटी होतो. दुष्कर्मात रत असे. जन्माने द्विज असलो तरी आचरणाने शूद्रच होतो.” शास्त्रात शूद्राची एक व्याख्या सापडते ती अशी – शुचा अभिदुद्रुवे इति शूद्रः – जो स्वतः दुःखी असतो आणि इतरंनाही दुःख देतो, त्यांना रडवतो त्याला शूद्र म्हणावे. यावरून असे दिसते की मनुष्य जन्माने कोणत्याही वर्णाचा असो (जातीचा नव्हे, हल्ली जात हा वर्णाला पर्यायी शब्द वापरला जातो) , त्याचे आचरण हीच खरी त्याच्या वर्णाची ओळख. वाल्मिकी जन्माने ब्राह्मण, पूर्वायुष्यातील आचरणामुळे शूद्र आणि तपस्येनंतर स्थित्यंतर पावल्याने परत ब्राह्मण. केवळ ब्राह्मणच नव्हे तर महर्षिपद, ब्रह्मपद पावलेला. 

       फार प्राचीन काळी एका गहन अरण्यात एक युवक राहात असे. कुटुंबाच्या उपजीविकेसाठी त्याने सोपा असा वाटमारीचा धंदा अवलंबिला होता. कोणी वाटसरू दिसला की त्यावर हल्ला करायचा आणि त्यांच्याकडे असेल नसेल ते लुबाडायचे, प्रसंगी कधी हत्याही होत असे. एकदा संयोग असा की देवर्षी नारद चालले होते आणि त्या युवकाने त्यांच्यावर झडप घातली. देवर्षि म्हणाले – मला लुटण्यास तू का प्रवृत्त होत आहेस ? लूटमार, हत्या करणे ही महापातके आहेत हे तुला ठाऊक नाही काय ? आणि ज्यांच्यासाठी तुझा हा जो उद्योग चाललाय ते तुझ्या अशाप्रकारे होणार्‍या पापसंचयात सहभागी होतील असे तुला वाटते काय ? तो म्हणाला – ते काही मला माहित नाही. मी घरी जाऊन विचारून येतो. त्याने देवर्षींना एका झाडाला बांधले आहे गेला घरी. आई, बाबा, पत्नी यांना त्याने सांगितले की मी वाटमारी करून तुम्हा सर्वांचे पालन पोषण करतोय, वेळप्रसंगी नरहत्याही घडते. मग मला सांगा की माझ्या पापाचा भाग तुम्ही घेणार, की नाही ? सर्वांनी एकमुखाने स्पष्टपणे सांगितले – मुळीच नाही. पापं तवैव तत्सर्वं, वयं तु फलभागिनः ॥ आमचे पोषण करणे हे तुझे कुटुंब प्रमुख म्हणून कर्तव्यच आहे. त्यासाठी तू कुठून धन आणतोस, काय कामधंदा करतोस हे आम्ही जाणत नाही. तुझ्या कर्तव्यपूर्तीमधे तुला पाप मिळणार असेल तर त्यात आम्ही काय म्हणून हिस्सेदार व्हायचे, नाही होणार. आम्ही काही कोणाला लुबाडत नाही की मारत नाही. त्या युवकाला पायाखालची जमीन दुभंगते आहे असा भास झाला. विचारांचे काहूर उठले. तो तडक उठला आणि देवर्षिकडे येऊन त्यांना साष्टांग प्रणिपात केला. पूर्ण शरणागति. अत्यंत व्याकुळ होऊन प्रार्थना करू लागला - ’प्रभो, मला वाचवा, मला मार्ग दाखवा.’ देवर्षि म्हणाले, “लोकांना दुःख देऊन आपण चैन करणे हे पाप आहे. आसक्ति, ममता, मोह यामुळे मनुष्य पापाचरण करतो पण सर्वजण तुझ्याकडे धन आहे तोवरच ते तुझे. ’यावत् वित्तोपार्जन सक्तः, तावत् निजपरिवारो रक्तः ॥’ तेव्हां सुखात-दुःखात, पापात-पुण्यात जो सदा तुझ्यापाशी असतो त्या दयाघन भगवंताची तू उपासना कर, मी सांगतो तसे आचरणात आणशील तर कर्माच्या बंधनातून मुक्त होशील.” देवर्षिने प्रबोधन केले. रामनामाचा अमृतोपम उपदेश केला. उपासनेची पद्धती समजाऊन सांगितली. संस्कारामुळे ’राम राम’ म्हणता येईना तर ’मरा मरा’ जप करण्यास सांगितले. आता शंका येते की ’मरा मरा’ जप करून कोणी कसा तरेल ? “जपतां उलटे नाम वाल्मिकी । बने ब्रह्मसम विदित लोकिं की ॥ (रामचरितमानस २.१९४) 

       श्रीरामाला महर्षि आपली कथा सांगताहेत. म्हणतात – “अहं यथोपदिष्टं तौः तथा अकरवमञ्जषसा । जपन् एकाग्रमनसा बाह्यं विस्मृतवान् अहम् ॥“ (अ.रा. २.६.८२) सर्वच शास्त्र ग्रंथांतून हेच सांगितले जाते की ’नाम’ श्रद्धापूर्वक, एकाग्रचित्ताने, सरळ शुद्ध भावनेने घेतले असता ते फलदायी होतेच. मग नाम कोणतेही असो. गुरुने राम म्हणायला सांगितले असो वा मरा म्हणायला सांगितले असो. श्रद्धा, भाव महत्वाचा. महर्षि तर म्हणतात की एकाग्र मनाने, सरळ भावाने मी जप करता करता त्याच्याशी इतका एकरूप झालो की मला बाह्य जगाची पूर्ण विस्मृति झाली. (आणि किती काळ ? अंगावर वारूळे उठे पर्यंत ?) परीणाम काय झाला ? वाटमार्यािचा मुनि झाला, ब्रह्मसम झाला. म्हणून तर वाल्मीकि रामायणात प्रथम श्लोकांत त्यांचा उल्लेख “तपस्वी” म्हणून आला आहे.

No comments: