22 February, 2012

भगवद्‌गीता - अपूर्व मोक्षोपाय उपदेश

भगवद्‌गीता - अपूर्व मोक्षोपाय उपदेश
( काय आहे यात)


सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः ।
पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् ॥
    सर्व उपनिषदें याच कोणी गायी, श्रीकृष्ण दूध काढणारा, अर्जुन वत्स आणि जे दूध ते गीतामृत असे श्रीमद् भगवद्‌गीतेचे अलंकारिक वर्णन केलेले आहे. या गीतेचा श्रीकृष्णाने अर्जुनास ज्या प्रसंगी उपदेश केला तो भारतीय युद्धाचा प्रसंग असा होता की, सार्वभौमत्वाच्या लालसेने कौरवांनी पांडवांचा अमानुष छळ केला होता. कौरवांनी भीमास विष घालून पाण्यांत बुडवून ठार करायचा प्रयत्‍न केला, लाक्षागृह तयार करवून त्यांत सर्व पांडवांना जीवे जाळण्याचा प्रयत्‍न केला, द्यूत खेळावयास प्रवृत्त करून त्यांचे सर्वस्व हरण करून थांबले नाही तर द्रौपदीची कुणालाही शोभणार नाही अशी विटंबना करून अपमान करविला. पण सार्वभौम होण्याचे त्यांचे सर्वच प्रयत्‍न फसले. पांडवांच्या नाशाकरितां जे जे उपाय योजले, ते सर्व विफल होऊन उलट पांडवांचा उत्कर्ष अधिकाधिक वाढूं लागला. कोणत्याही उपायाने पांडवांचे राज्य घशांत कसे उतरेल हा विचार व तद्‍नुसार हरप्रकारे कौरवांचे प्रयत्‍न चालूच होते. पापकर्म प्रवृत्तीच्या लोकांस साह्यकारी माणसे मिळतच राहतात हा जगाचा क्रम आहे. आणि पापकर्म करणार्‍यांकडे भीष्म आणि द्रोणांसारखे कर्ते पुरुषही मूक प्राण्यांप्रमाणे पहात राहतात (त्यांची कारणे - अर्थस्य दासोस्म्यहम् - ही असतील काय ?) अशा वेळेस कौरवांना शकुनी मामाची जोड मिळाली. द्यूत खेळण्यास बोलावून त्यांत त्यांचे सर्वस्व लुटून वर त्यांना बारा वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवासाच्या आपत्तीत लोटले. पण वनवास, अज्ञातवास भोगल्यानंतर आपले राज्य परत मागितले तेव्हां दुर्योधनाने ’सुईच्या टोकाएवढीही जमीन मिळणार नाही’ असे स्पष्ट सांगितले.
    सामोपचाराचे सर्व उपाय खुंटले. श्रीकृष्णाची मध्यस्तीही उपयोगास आली नाही. युद्धावाचून पर्याय उरला नाही. सार्वभौमत्वाला भाळलेले सर्व राजे कौरवांस मिळाले. ओशाळलेले धुरंधर भीष्म व द्रोण त्यांच्या बाजूने होतेच. भागवतात म्हटले आहे -
ये कोपिताः सुबहु पाण्डुसुताः सपत्‍नैः ।
दुर्द्यूतहेलनकच ग्रहणादिभिस्तान् ।
कृत्वा निमित्तमितरेतरतः समेतान् ।
हत्वा नृपान् निरहरत् क्षितिभारमीशः ॥
की अशी परिस्थिती निर्माण करवून, पांडवाना क्रोधित करून भगवंताने पृथ्वीचा भार हलका करायचे ठरविले होते त्याचा हा परिणाम.
    भारतीय युद्ध म्हणजे सत्य-असत्य निर्णयाचा प्रसंग होता. कौरव संख्येने बलाढ्य होते तरी त्यांना केवळ भीमार्जुनच पुरेसे होते. पण अशा प्रसंगी अर्जुनाला मायामोह झाल्यामुळे त्याला समोर प्रतिस्पर्धी न दिसतां तिथे आपले गुरु, आपले आजे, आपले काका, मामा, बंधु समोर दिसायला लागले. आप्तांच्या, गुरुंच्या हत्येचे पातक कसे शिरावर घ्यावे या विचाराने व्याकुळ होऊन तो गलितगात्र झाला. त्याने धनुष्य खाली ठेवले. अशा प्रसंगी भगवंतांनी जो उपदेश केला त्या ज्ञानाचा प्रभाव असा झाला की अर्जुन कर्तव्यतत्पर होऊन युद्धास तयार झाला.
    गीताप्रसंग आणि त्यातील उपदेश म्हणजे केवळ तत्त्वज्ञानच आहे असे नव्हे. व्यवहारांत मनुष्याने कसे वागावे व व्यवहारांतील नियम कसे पाळावे  या संबंधीचा विचार या ग्रंथांत सांगितला आहे आणि हेच या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. अद्वैतवादी शंकराचार्य, विशिष्टाद्वैती रामानुजाचार्य, द्वैतवादी मध्वाचार्य, वल्लभाचार्य, श्रीधर, शंकरानंद सदानंद, मधुसूदन सरस्वती, नीळकंठ  यांसारख्या आचार्यांनी भगवद्‍गीतेवर भाष्य केले. ज्ञानेश्वर, वामन पंडित, तुकाराम, मोरोपंत अशा संतकवींनी गीतार्थ वर्णन केला. याचे भाषांतर व यावरील ग्रंथ तर जगातील जवळपास एकूणएक भाषेत आढळतात. भगवद्‍गीतेच्या आधी आर्य संस्कृतीत कर्तव्य वा स्व-उन्नतीच्या उपदेशांच्या रचना झाल्या नाहीत असे नाही. उलट वर उद्धृत केलेल्या श्लोकानुसार गीता तर अशा प्रकारच्या आर्ष वाङ्‍मयाचे सार आहे. पण गीता सर्वमान्य होण्याचे मुख्य कारण म्हणजे ती सत्यनिष्ठ पांडवांच्या आपत्तिकाळी प्रत्यक्ष भगवंताने गतधैर्य झालेल्या अर्जुनाद्वारे जगांतील मानवी जीवांचे खरे कर्तव्य काय ते स्पष्ट करून दाखविले, हे होय. अपौरेषय वेदांपेक्षा कृष्णगीतेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे याचे दुसरे कारण म्हणजे यातील शब्द साक्षात परमेश्वराच्या मुखातून प्रविष्ट झालेले आणि अर्थातच त्यामुळे ते शब्द अमर झाले आहेत. भगवान् व्यास म्हणतात - एकं शास्त्रं देवकीपुत्रगीतं । एको देव देवकीपुत्र एव । एको मंत्र तस्य नामानियानि । कर्माप्येकं तस्य देवस्य सेवा ॥ - या विश्वामध्ये देवकीपुत्र योगेश्वराने गायलेले गीत म्हणजेच भगवद्‌गीता हे एकच शास्त्र आहे. देवकीपुत्र हा एकच वंदनीय जगद्‌गुरु आहे की ज्याला अनन्यभावाने शरण जाऊन त्याची पूजा, त्याची भक्ति, त्याची उपासना करावी. वेदामध्ये अनेक प्रकारचे मंत्र असले तरी सुद्धा प्रत्येक जीवाचा उद्धार करणारा एकच मंत्र आहे, आणि तो म्हणजे देवकीपुत्राचे नामस्मरण. वसुदेवपुत्र श्रीकृष्णाची काया, वाचा मने अनन्य भक्तीने सेवाकरणे हे एकच कर्म आहे - कारण तो साक्षात् परमेश्वरस्वरूप आहे.
    प्रत्येक जीव मायेच्या मोहात, संसारात गुरफटल्यामुळे आत्मोन्नतीच्या खर्‍या कर्तव्यास पराङ्‍मुख होतो. आहार, मैथुन, स्वार्थ यांत पशूप्रमाणेच सर्व आयुष्य घालवायचे तर मनुष्य जन्माचा उपयोग काय असा विचार प्रत्येकाला केव्हांना केव्हां पडतोच. गीतेने स्थितप्रज्ञ होऊन, निष्कामबुद्धीने विहित कर्म करीत आत्मज्ञान करून घेणे, स्वतःची उन्नती करून घेणे हीच समाधानी व सुखरूप होण्याची गुरुकिल्ली आहे हे दाखवून दिले आहे.
    पण स्थितप्रज्ञ होणे, निष्कामबुद्धीने विहित कर्म करणे, आत्मज्ञान करून घेणे हे सर्व जमायचे कसे ? कारण प्रत्येक साधक आपापल्या कुवतीप्रमाणे साधना करीत असतो. पण वर्षानुवर्षे साधना करूनही जीवनामध्ये आंतरिक शांति, समाधान मिळत नाही. कधी साधनेला निश्चित दिशा नसल्यामुळे, तर कधी साधनेला तात्त्विक बैठक नसते. पण कारण काहीही असो. यामुळे हळूहळू साधनेमधील सातत्य संपते श्रद्धेला तडा जातो. जीवनात नैराश्य येते. याकरिता कृष्णोपदेश जीवनात उतरण्याकरिता साधकाला ’अर्जुन’ बनणे नितांत आवश्यक आहे. कां ? डॉ. श्रीकृष्ण देशमुख (डॉ. काका) यांनी त्यांच्या एका प्रवचनात याबद्दल सांगितलेले पाहणे फारच उपयुक्त होईल. थोडक्यात त्यांचे सांगणे असे -  (सविस्तर ऐकायचे असल्यास इथे पहा)
    भगवद्‍गीता हा संवादात्मक ग्रंथ आहे. मुख्य वक्ता स्वयं भगवान् श्रीकृष्ण. मुख्य श्रोता धनुर्धर अर्जुन. हा संवाद चाललाय भारतीय युद्ध रणांगणावर. संजयाला दिव्य दृष्टी देऊन श्रीव्यासांनी या रणांगणावर काय चालले आहे याचा शब्दशः वृत्तान्त धृतराष्ट्राला समजण्याची व्यवस्था केली होती. म्हणून आणखी दोन श्रोते म्हणजे संजय आणि धृतराष्ट्र. ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वरांनी आणखी एक श्रोत्याचा उल्लेख केला आहे. तो म्हणजे अर्जुनाच्या रथावर आरूढ असलेला हनुमन्त. हनुमंत सोडल्यास गीतेतील मुख्य पात्रे चार. वक्ता श्रीभगवंताने सांगितलेल्या गीतेचा बाकी तीन श्रोत्यांवर काय परिणाम झाला ? संजय तर श्रीव्यासांचा कृपापात्र असलेला शिष्य. गीता ऐकून त्याची प्रतिक्रिया तो धृतराष्ट्राला या शब्दात सांगतोय - राजन्संस्मृत्य संस्मृत्य संवादं इममद्‌भुतम् । केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः ॥ - अर्जुनाचे काय ? तो म्हणतो - नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत । स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव ॥ राहता राहिला धृतराष्ट्र. त्याच्यावर काय परिणाम झाला ? ज्ञानेश्वरांच्या शब्दात सांगायचे तर - म्हैसा बैसला कुडा । हालोचि नेणे ॥ - जसा रेडा चिखलात निवांत बसतो, कोणत्याही परिस्थितीत जागेवरून हलायची तसदी घेत नाही, म्हणजे काहीही होवो, अगदी परिणाम शून्य असतो. तसा.
    गीता ’महाभारत’ ग्रंथातील एक प्रसंग. म्हणून महाभारतातील पात्रांचा विचार करणे उपयुक्त होईल. भारत युद्ध घडण्यास मुख्य पात्रे तीन. दुर्योधन, दुःशासन आणि शकुनि. आणि या तिघांच्या साहाय्याने आपली ईप्सित साध्य करण्याची मनिषा असलेला धृतराष्ट्र. प्रत्यक्षरित्या तो या तिघांच्या वृत्तिंचा प्रतिनिधिच, अर्थात् षड्‌रिपुंनी पछाडलेला अज्ञानी जीव.
    धृतराष्ट्राचा पुत्र दुर्योधन हा अत्यंत मानी, लोभी आणि अन्यायी होता. दुःशासन स्त्रीलंपट तर शकुनि काहीही साध्य करायचे असल्यास सदा तिरक्या विचारांच्या - scheming mentality  - योगे साध्य करण्यात पटाईत. या सर्व वृत्तींचा प्रतिनिधि म्हणजे धृतराष्ट्र. जीवनाच्या प्रत्येक व्यवहारात आपण तपासले पाहिजे की माझ्यातला दुर्योधन, माझ्यातल्या दुःशासन आणि माझ्यातला शकुनि यांचा माझ्यावर नेमका कितपत प्रभाव आहे. याचे प्रमाण जर जास्त असेल तर परमार्थाच्या वाटचालीतला आपला अधिकार, आपली तयारी तपासण्याची गरज आहे. आणि यात जो पर्यंत प्रगति दिसत नाही तो पर्यंत आपली स्थिती कितीही साधना करा, कितीही ग्रंथ वाचन/पारायण करा, त्याचा उपयोग होणे अवघड आहे.

No comments: