31 January, 2012

रामायणाची रचना कशी झाली ?

        महर्षि वाल्मीकि पूर्वायुष्यात वाटमारीचे अधम कृत्य करीत असता त्यांना ब्रह्मर्षि नारदमुनींचा सत्संग घडला. नारदाने उपदेश केल्यावर वैराग्य आले आणि नारदांच्या उपदेशानुसार त्या वाटमार्‍याने तप करण्यास आरंभ केला. एकाग्र चित्ताने अहर्निश ईश्वराधना, ध्यानसाधना करण्यांत तो इतका तल्लीन झाला की त्याला बाह्य जगच काय पण देहभानाचाही विसर पडला. तपात निमग्न झालेल्या त्याचे शरीर काष्ठवत झाले. त्या शरीराला काष्ठ समजून किडा-मुंग्यांनी त्यावर वारूळ रचले. अनेक वर्षे लोटली. आणि एके दिवशी एका गंभीर वाणीने त्यांचे ध्यान भंगले. घनगंभीर आवाजात त्यांना कुणी म्हणत होते - ’महर्षि, उठा आता.’ तो चकित झाला. म्हणाला, ’कोण महर्षि ? मी तर एक लुटारू आहे.’ ती वाणी त्याला म्हणाली, ’नाही ! आता तुम्ही पापाचार रत असणारे लुटारू राहिला नाहीत. तुमचे हृदय आता पवित्र झाले आहे. सर्व पापांचा लय झाला आहे. तुमच्या देहाभोवती ’वल्मीक’ (वारूळ) उभारल्यामुळे तुम्ही आता वाल्मीकि नावाने प्रसिद्ध व्हाल. अशा रीतीने तो लुटारू कठोर तपश्चर्येच्या प्रभावाने महर्षि वाल्मीकि झाला.
        पुढे वाल्मीकिने एक आश्रम स्थापन केला. अध्ययन, अध्यापन सुरू झाले. मोठा शिष्य परिवार जमा झाला. एकदा महर्षि नदीवरून स्नान करून वनातील निसर्ग सौंदर्य अवलोकन करीत आश्रमाकडे परतताना एक चित्तवेधक घटना घडली. एक क्रौंच पक्ष्याचे जोडपे प्रणयक्रीडेत दंग झाले होते. निसर्ग दृष्य, वनातील रम्य वातावरणामुळे महर्षिंचे हृदय आनंदाने भरले होते. त्यात त्यांचे क्रौंच पक्षाच्या जोडप्याकडे लक्ष गेले. त्यांचे विहार कौतुकाने पहात असता एकाएकी एक बाण सूं सुं करत आला आणि त्याने नर-क्रौंचाचा वेध घेतला. तत्काळ तो गतप्राण होऊन रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडला. त्या पक्ष्याचे जीवन संपले. क्रीडेचे रूपांतर अचानक शोकावस्थेत झाले. क्रौंचिण हृदय विदारक विलाप करू लागली आणि ते पाहून महर्षिंचे हृदय द्रवले. त्यांनी एकडे तिकडे पाहिले आणि त्यांच्या लक्षात आले की हे क्रूर कर्म एका व्याधाने केले आहे. त्यांना फार दुःख झाले. त्या शोकावेगात त्यांच्या मुखातून एक श्लोक बाहेर पडला. आपल्या मुखातून काव्यमय श्लोक बाहेर पडल्याचे ध्यानात आल्यावर त्याचा त्यांनाच विस्मय वाटला. खरे पाहता यात आश्चर्य करण्यासारखे असे काही नाही. शास्त्रांत अनेक ठिकाणी उल्लेख सापडतात की तपाचरणाने मनुष्याच्या चित्त-वृत्ति शुद्ध होतात. क्रोध मत्सरादि दोष नाहिसे झाल्यामुळे हृदय निर्मळ होते, कोमल होते. असे हृदय जेव्हां समत्वबुद्धि, करुणा, प्रेम यांने द्रवित होते तेव्हां आपोआपच काव्य स्फुरते. पण महर्षिंना आपल्या तोंडून काव्य बाहेर पडल्याचे जाणवून अचंबा वाटला. महर्षि विचार करू लागले, अशा प्रकारची श्लोकवाणी माझ्या मुखे तर कधी बाहेर पडली नाही. काय बरे असेल हें ? या वरून मी काय समजावे ? इतक्यांत त्यांना एक वाणी ऐकूं आली. "तुझ्या मुखातून जे बाहेर पडले त्याला कविता म्हणतात. आता तूं जगत् कल्याणास्तव अशा प्रकारे कविता रचून रामचरित्राचे वर्णन कर." ही वाणी देववाणी म्हणा, आकाशवाणी म्हणा वा मुनिंच्या हृदयांतून निघालेली अंतःप्रेरित वाणी म्हणा; पण महान कार्ये करणार्‍या काहींना अशा प्रकारे अमानवी प्रेरणादायी संदेश मिळाल्याचे अनेक दाखले आहेत.
      प्रथम महाकाव्य निर्मितीचा हा इतिहास. महर्षि वाल्मीकींच्या हृदयातील करुणा त्यांच्या मुखावाटे श्लोकरूपाने बाहेर पडून विश्वातील आदि काव्य निर्माण झाले. हे काव्य म्हणजे परम मनोहर, रमणीय रामायण कथा. एका महान दिव्य विभूतीचे चरित्र. ह्या आधी संस्कृत भाषेत काव्य नव्हते असे नव्हे. वैदिक साहित्य हे तर रामायणाच्या बरेच आधीचे असून ते सर्व छंदोबद्ध, म्हणजेच पद्यात आहे. तरी देखील भारतात सर्वानुमते रामायणाला आदिकाव्याचा मान मिळाला आहे. हे काव्य तर इतके प्रभावी झाले आहे की भारतीय लोकवाणीत श्रीरामाएवढे रुजलेले दैवत दुसरे नाही. या काव्याने प्रेरित होऊन कितीतरी संतांनी कितीतरी भाषांमधून रामकथा रचल्या आहेत. तुलसीदास, एकनाथ, रामदास, श्रीधर कवि, कंबन (तामिळ), गुजराती भाषेतले गिरीधर रामायण, फारसी मध्ये मसीही रामायण ही सर्व प्रसिद्ध काव्ये थोर आणि उच्च कोटीची आहेत. एका संदर्भानुसार* जगातील ५०० भाषांमध्ये रामकथेची रचना केली गेली आहे. इंडोनेशियात कोर्टातून रामायणावर हात ठेऊन शपथ घेतली जाते यावरून दिसून येते की रामकथा किती जगन्मान्य झाली आहे. श्रीराम व रामकथा कधी कालौघात लुप्त होतील, नाहीशा होतील, विस्मृत होतील हे अशक्यप्राय आहे. आता अशा रामायणाबद्दल हे ऐतिहासिक का काल्पनिक काव्य, श्रीराम मानव का परमात्म अवतार या बद्दल अनेक मतमतांतरे आहेत. पण तो वेगळा विषय, पाहू नंतर कधीतरी.
       महर्षि वाल्मीकींनी वारूळातून बाहेर पडल्यावर रामायण काव्य रचण्यापर्यंत काय केले असेल. काय करणार ? इतर ऋषी मुनि जे करत होते तेच करणार. अध्ययन आणि अध्यापन. वेदाध्ययन, वेद शाखांचे अध्ययन, ब्रह्म विद्येचे अध्ययन आणि अध्यापन केले. ज्योतिष, आयुर्वेद, युद्धशास्त्र, योगशास्त्र इत्यादि शास्त्रांचा सखोल अभ्यासाचे त्यांच्या काव्यातून विपुल दर्शन होतेच. काव्यातील अयोध्याकाण्डाच्या सर्ग १०० मधे भरताचे कुशल विचारताना भरताला राज्य कारभारासंबंधी काय काय विचारले हे पाहिल्यावर राज्य कारभार, राजनीतिबद्दलचे महर्षिंचे ज्ञान पाहून थक्क व्हायला होते. एक साधु MBA न करता हे सर्व कसे जाणतो ? हा प्रश्न पडतोच.
    महर्षिंचा अनेक विषयांचा सखोल अभ्यास होताच. याव्यतिरिक्त त्यांना तपःसामर्थ्याने अवगत असलेल्या सिद्धींचेही दर्शन घडते. रामायण रचण्यासाठी महर्षिंनी आपल्या योगसामर्थ्याचा कसा वापर केला हे बालकाण्ड सर्ग ३ मधल्या खाली दिलेल्या श्लोक श्लोकार्थावरून स्पष्ट होते. 

रामलक्ष्मणसीताभी राज्ञा दशरथेन च ।
सभार्येण सराष्ट्रेण यत् प्राप्तं तत्र तत्त्वतः ॥ ३ ॥
हसितं भाषितं चैवं गतिर्यावच्च चेष्टितम् ।
तत्सर्वं धर्मवीर्येण यथावत् संप्रपश्यति ॥ ४ ॥
स्त्रीतृतीयेन च तथा यत् प्राप्तं चरता वने ।
सत्यसंधेन रामेण तत् सर्वं चान्ववेक्षितम् ॥ ५ ॥
ततः पश्यति धर्मात्मा तत्सर्वं योगमास्थितः ।
पुरा यत् तत्र निर्वृत्तं पाणौ अमलकं यथा ॥ ६ ॥


श्रीराम-लक्ष्मण-सीता तसेच राज्य आणि राण्यांच्यासहित राजा दशरथांशी संबंध असणार्‍या जितक्या गोष्टी होत्या - हसणे बोलणे, चालणे आणि राज्यपालन आदि जितक्या म्हाणून क्रिया झाल्या होत्या, त्या सर्वांचा महर्षिंनी आपल्या योगधर्माच्या बलाने उत्तम प्रकारे साक्षातकार करून घेतला. ॥ ३-४ ॥ सत्यप्रतिज्ञ श्रीरामचंद्रांनी लक्ष्मण आणि सीतेसह वनात विचरण करते समयी ज्या ज्या लीला केल्या होत्या, त्या सर्व त्यांच्या दृष्टीस पडल्या. ॥ ५ ॥     योगाचा आश्रय घेऊन त्या धर्मात्मा महर्षिने पूर्वकाली ज्या ज्या घटना घडल्या होत्या त्या सर्व तेथे हातावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे प्रत्यक्ष पाहिल्या. ॥ ६ ॥


*[ मुस्लिम बहुल इंडोनेशिया में रामायण को राष्ट्रीय पवित्र पुस्तक होने का गौरव प्राप्त है । वहां अदालतों में प्राय: रामायण पर हाथ रखकर ही शपथ ली जाती है। मलेशिया में "हिकायत सिरी राम" की पुस्तक के रूप में रामकथा को पढ़ा जाता है । थाईलैंड में रामकथा को "रामकियेन" या "रामकीर्ती" कहा जाता है । यहां के अधिकांश निवासी बौद्ध धर्म के उपासक हैं फिर भी यहां राम को बड़ी श्रृद्धा से देखा जाता है । वहां के लोगों का मानना है कि राम से संबन्धित संपूर्ण घटनाएं उन्ही की धरती पर हुई हैं । जावा में राम को पुरूषोत्तम के रूप में सम्मानित किया जाता है और वहां सरयू नदी भी है । इसी तरह लाओस में रामकथा के दो ग्रंथ उपलग्ध हैं- 1. फालाक फालाम और 2. फोमचक्र । वियतनाम (पुराना नाम चम्पा) में भी रामकथा के कई रूप प्रचलित हैं। बर्मा में "रामायागन" नाम से रामकथा लिखी गई । बर्मा में अनेक नाम राम पर आधारित हैं। रामकथा का प्रचार-प्रसार चीन, जापान में भी बहुत हुआ । ] 

No comments: